सोने—त्याभोवती असलेले गूढतेचे वलय
सोने—अनादीकाळापासून या नरम, पिवळ्याधमक धातूला त्याच्या अनन्यसाधारण गुणधर्मांसाठी लाखमोलाचे समजले जाते. त्याचा रंग, त्याची चमक, त्याची लवचिकता व त्याची गंजप्रतिकार क्षमता या सर्व गुणांमुळे ते सर्व धातूंमध्ये अप्रतिम आहे. सोन्याचा शोध लावणाऱ्यांच्या मनात त्याला अफाट मूल्य आहे. त्यामुळे, दुसऱ्या कोणत्याही धातूपेक्षा सोन्याचा इतिहास अनन्यसाधारण आहे.
“सोनं सापडलं, सोनं! अहो खरंच सोनं आहे! सोन्याचा शोध लावला गेला तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे अत्यानंदाने वेडे होण्याची वेळ आली. जमिनीवर, पाण्यात आणि भूगर्भात हजारो फूट खोलपर्यंत याचा शोध लावला गेला आहे.
एक किंमती जडजवाहीर म्हणून सोन्याने राजेरजवाड्यांना आभूषित केले आहे तर सिंहासनांची व राजमहलांची देखील शोभा वाढवली आहे. मासे, पक्षी, प्राणी व इतर आकारांत बनविलेल्या सुवर्ण मूर्तिंची पूजा केली गेली आहे. सोन्यासाठी केलेली अविश्राम खटपट मानव समाजावर पडलेल्या त्याच्या प्रभावाप्रमाणेच दूरगामी आहे.
सोन्याचा इतिहास
प्राचीन इजिप्तचे फॅअरो (राजे), सोन्याचा शोध लावण्यासाठी आपल्या व्यापाऱ्यांना व सैन्यांना दूरदूरच्या दुर्गम भागांत पाठवत असत; आणि ही सर्वस्वी इजिप्तच्या देवदैवतांची व फॅअरोंची संपत्ती समजली जात होती. १९२२ साली सापडलेले टूटानखामेनचे थडगे सोन्याच्या अनमोल खजिन्यांनी भरलेले होते. त्याची शवपेटी देखील भरीव सोन्याची होती.
काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार सिकंदर बादशहा “प्रथम आशियाकडे आकृष्ट झाला तो पर्शियात असलेल्या सोन्याच्या विख्यात खजिन्यांविषयी ऐकल्यामुळेच.” त्याने पर्शियात लुटलेले सोने त्याच्या सैन्याने हजारो जनावरांमार्फत ग्रीसमध्ये वाहून नेले असे सांगण्यात येते. यामुळे ग्रीस एक सुवर्णसंपन्न राष्ट्र बनले.
एक इतिहासकार म्हणतो की, “आपल्या अमलदारांचा विश्वास जिंकण्यासाठी तसेच इतर देशांतील बड्या माणसांना प्रभावित करण्यासाठी रोमचे सम्राट मुक्तहस्ताने सोन्याची उधळण करत असत. लोकांवर आपल्या धनदौलतीची, ऐश्वर्याची छाप पडावी, आपली जरब बसावी म्हणून हे रोमी सम्राट मुद्दामहून आपल्या सुवर्णाभूषणांचे प्रदर्शन करत असत.” एक अधिकारसूत्र म्हणते, की स्पेनवर विजय घोषित करून तसेच स्पेनमधील सोन्याच्या खाणीवर ताबा मिळवून रोमन लोकांनी भरघोस सोने मिळवले.
पण सोन्याच्या रक्तरंजित इतिहासाची पाने उलटल्याशिवाय त्याची कहाणी अधुरीच राहील. ही आहे संघर्षाची, अमानुषपणाची, गुलामगिरीची व हत्याकांडाची कहाणी.
रक्ताने माखलेला इतिहास
मानव समाज प्रगत होऊ लागला तसा नवनवीन देशांचा शोध लावण्यासाठी, नवीन वसाहती स्थापन करण्यासाठी तसेच सोन्याचा शोध लावण्यासाठी अधिक मोठी व मजबूत जहाजे पाठवली गेली. अनेकानेक शोधक-प्रवासी सोन्याचा शोध लावण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटले होते; शूर दर्यावर्दी शोधक क्रिस्टोफर कोलंबस (१४५१-१५०६) देखील यामध्ये शामील होता.
सोन्याचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने मूळच्या रहिवाशांची काडीइतकीही पर्वा केली नाही. त्याच्या शोधमोहिमेसाठी अमाप पैसा खर्च केलेल्या स्पेनच्या राजाराणीला, एका बेटावरील आपला अनुभव कथन करताना कोलंबसने आपल्या नोंदवहित लिहिले: “इथं राज्य करायचं असेल तर आपल्याला फक्त इथं स्थिरस्थावर होऊन इथल्या मूळच्या रहिवाशांवर हुकूम चालवण्याची गरज आहे. . . . हे रहिवासी . . . उघडेबाघडे व लाचार आहेत; त्यामुळे आपण हुकूम सोडताच राबण्यास ते तयार होतील.” कोलंबसचा विश्वास होता, की त्याच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद आहे. सोन्याच्या खजिन्यांमुळे स्पेनला आपल्या धर्मयुद्धांसाठी आर्थिक साहाय्य पुरवणे शक्य होणार होते. एकदा त्याला भेट म्हणून एक सोन्याचा मुखवटा दिला गेला तेव्हा त्याने म्हटले होते, ‘परमेश्वराने दया दाखवून सोने शोधण्यात माझी मदत करावी.’
कोलंबसच्या पाठोपाठ त्याच मार्गाने सोन्याच्या शोधात निघालेल्या स्पेनिश विजेत्यांनी त्याच मार्गाने समुद्रप्रवास केला; स्पेनचा राजा फर्डिनँड याने हुकूम दिला: “माझ्यासाठी सोनं आणा! जमलंच तर माणुसकी दाखवून आणा. नाहीतर दुसरं काहीही करा. पण मला सोनं पाहिजे म्हणजे पाहिजे.” निर्दयी शोधक-प्रवाशांनी मेक्सिको व मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील हजारो रहिवाशांची हत्या केली. या विजेत्यांनी जहाजातून स्पेनला वाहून नेलेले सोने जणू रक्ताने माखलेले होते.
मग आले पायरेट्स म्हणजेच समुद्र दरोडेखोर; अर्थात हे कोणा एका विशिष्ट देशाचे नव्हते. मुक्त समुद्रावर त्यांनी सोने व इतर मौल्यवान खजिन्यांनी मालामाल असलेली स्पॅनिश जहाजे लुटली. सहसा या जहाजांवर पर्याप्त शस्त्रसामग्री व माणसे नसल्यामुळे ती समुद्रावरील सशस्त्र लुटारूंची बरोबरी करू शकली नाहीत. खासकरून वेस्ट इंडिजमध्ये व अमेरिकी समुद्रतटावर १७ व्या व १८ व्या शतकांतल्या समुद्रावरील या लुटारूंमुळे समुद्रप्रवास अतिशय धोकेदायक झाला होता.
१९ व्या शतकातील गोल्ड रशेस
सन १८४८, मध्ये कॅलिफोर्नियाच्या सेक्रेमेंटो खोऱ्यात सोन्याचा फार मोठा खजिना हाती लागला. ही बातमी प्रकाशवेगाने सर्वत्र पसरली आणि यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्या दिशेने लोकांची झुंबड उडाली. त्याच्या पुढच्या वर्षापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो हजारो लोक आपले नशीब आजमावण्यासाठी कॅलिफोर्नियात अवतरले; यांना फॉर्टी-नायनर्स म्हणायचे. परिणामस्वरूपी, कॅलिफोर्नियाची लोकसंख्या, जी १८४८ साली केवळ २६,००० होती ती १८६० साली ३,८०,००० एवढी झाली. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या, नाविकांनी जहाजांवरील काम सोडून दिले, सैनिकांनी सैन्यातून पळ काढला—हे सर्व केवळ सोने मिळवण्यासाठी. काहींचे वर्णन “रक्तपिपासू लुच्चे” असे करण्यात आले. जगभरातून येथे आलेल्या लोकांसोबतच गुन्हे आणि हिंसेचीही लाट वाहिली. ज्यांना काही मेहनत न करता सोने मिळवण्याची हाव होती अशांनी चोऱ्यामाऱ्या करण्याचे, घोडागाड्या व ट्रेन्स लुटण्याचे सुरू केले.
सन १८५१ मध्ये म्हणजे लोकांच्या डोक्यावरून कॅलिफोर्नियातील गोल्ड रशचे भूत उतरते न उतरते तोच ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात सोने गवसल्याची बातमी पसरली. बातमी अशी होती, की “विश्वास बसणार नाही इतके सोने सापडले.” निदान काही काळापर्यंत तरी ऑस्ट्रेलिया जगातील सोन्याचे सर्वात मोठे उत्पादक बनले. कॅलिफोर्नियात स्थलांतर केलेल्या काही लोकांनी लागलीच आपला बोरीबिस्तरा गुंडाळून ऑस्ट्रेलियाच्या दिशेने प्रयाण केले. यामुळे मग ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येत उल्लेखनीय वाढ झाली; १८५० साली ४,००,००० असलेली तिथली लोकसंख्या १८६० साली ११,००,००० च्याही वर गेली. अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडल्यामुळे शेतीवरची त्याप्रमाणेच इतर कामे देखील ठप्प पडली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सोने मिळवण्यासाठी निघालेला या वेड्या लोकांचा ताफा युकोन व अलास्काकडे वळला कारण आता तेथेही सोन्याचा शोध लागला होता. सोन्यावर आपला हक्क सांगण्यासाठी हजारो लोकांनी जीवघेण्या थंडीत उत्तर ध्रूवाजवळील क्लानडाईक प्रदेशाकडे व अलास्काला प्रयाण केले.
समुद्रतळाशी बुडालेला खजिना
विसाव्या शतकात खोल पाण्यात जाणे शक्य झाले तेव्हा सोने शोधणाऱ्यांनी आपले लक्ष समुद्रातळाकडे वळवले. त्यात बुडालेले खजिने—सोने व मानवाने कितीतरी शतकांपूर्वी निर्माण केलेल्या वस्तू प्राप्त करण्यासाठी ते समुद्रतळाशी बुडालेल्या जहाजांचा शोध करू लागले.
सप्टेंबर २०, १६३८ रोजी स्पेनचे जहाज कॉनसेपस्यॉन भयंकर वादळामुळे खडकांवर आदळल्यानंतर साईपनच्या समुद्रतटापासून दूर असलेल्या प्रशांत महासागरात बुडाले. या जहाजात सोने तर होतेच होते पण इतर खजिनेही होते ज्यांची किंमत आज लाखो डॉलर्सच्या घरात जाते. जहाजावर असलेल्या ४०० लोकांपैकी अधिकतर लोकांना पाण्याची समाधी मिळाली. पाणबुड्यांना या बुडालेल्या जहाजातून ३२ सोन्याच्या साखळ्या सापडल्या; प्रत्येक साखळी लांबीला पाच फूट होती तर तिचे वजन कित्येक पौंड होते. एकंदर, या लोकांनी सोन्याचे १,३०० दागिने—साखळ्या, क्रॉसेस, बटन्स, ब्रूचेस, अंगठ्या व बक्कल्स पाण्यातून बाहेर काढले.
समुद्रतळाशी बुडालेली इतर जहाजेही हाती लागली. १९८० साली संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडाच्या समुद्रतटातील पाणबुड्यांना सान्टा मार्गारिटा नामक १७ व्या शतकात समुद्रात बुडालेले स्पेनचे जहाज सापडले. याच्या पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पाणबुड्यांनी ४४ किलोग्रॅम सोन्याच्या वीटा व इतर मानवनिर्मित वस्तू शोधून काढल्या होत्या.
युद्धात लुटलेले सोने
सन १९४५ मधील जर्मन शासनाच्या शरणागतीनंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्यदलाने थयूरीजीआ, जर्मनीतील काइजरोडाच्या मीठागरांत चकित करणारा शोध लावला. दि ॲटलांटा जर्नलनुसार “या मीठागरांत २.१ अरब डॉलर किंमती सोन्याच्या वीटा, शोभिवंत वस्तू, चलन व दस्तऐवज सापडले.” याशिवाय, सोन्याचांदीचे दांत भरलेल्या थैल्याच्या थैल्याही सापडल्या; नात्सी अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या जबरदस्तीने काढून घेतलेल्या या दातांपैकी काही वितळविले होते. हाती लागलेल्या सोन्याच्या या भरघोस गुप्त साठ्यामुळे नात्सी सरदारांना आपल्या लांबविलेल्या युद्धास अर्थसाह्य पुरवणे शक्य झाले. जर्नल वृत्तपत्र म्हणते, की शोध लागलेल्या अंदाजे २.५ अरब डॉलर सोने एकेकाळी हिटलरचा कब्जा असलेल्या जवळजवळ दहा देशांना परत करण्यात आले आहे. दडवून ठेवलेले सर्व नात्सींच्या मालकीचे सोने अद्याप सापडलेले नाही या सर्वसामान्य ग्रहामुळे अजूनही त्याचा शोध चालू आहे.
सोने मौल्यवान आहे यात शंकाच नाही. तथापि, बायबल म्हणते, की इतर भौतिक संपत्तीप्रमाणेच सोने देखील त्याच्या पाठीस लागणाऱ्यांना जीवदान देऊ शकत नाही. (स्तोत्र ४९:६-८; सफन्या १:१८) बायबलचे नीतिसूत्रे म्हणते: “ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे!” (नीतिसूत्रे १६:१६) सृष्टीकर्ता यहोवा देव हा खऱ्या सुज्ञतेचा स्रोत असून ही सुज्ञता त्याचे वचन बायबल यात आढळते. देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने अशा सुज्ञतेचा शोध करणारी व्यक्ती देवाचे नियम, सिद्धान्त व सल्ला शिकून हे सर्व आचरणात आणू शकते. अशाप्रकारे मिळविलेली सुज्ञता मानवाने आजपर्यंत मिळविलेल्या सर्व सोन्यापेक्षा कितीतरी वांच्छनीय आहे. ही सुज्ञता प्राप्त केल्याने आज आपल्याला उत्तम जीवन मिळू शकेल शिवाय भविष्यात अनंतकाळचे जीवन मिळू शकते.—नीतिसूत्रे ३:१३-१८.
[२७ पानांवरील चौकट]
सोन्याबद्दल काही
• सर्व धातूंमध्ये सोने सगळ्यात लवचीक व तंतुक्षम आहे. त्याला मारून ०.१ मायक्रोमीटर बारीक केले जाऊ शकते. २८ ग्रॅम सोन्याला मारून त्यास इतके पसरवले जाऊ शकते की ते चक्क १९० चौरसफूट क्षेत्र व्यापू शकते. व तितक्याच सोन्याला ७० किलोमीटर लांब पसरवले जाऊ शकते.
• शुद्ध सोने इतके नरम असल्यामुळे त्याचे काठिण्य वाढविण्यासाठी त्यास इतर धातूंबरोबर मिसळले जाते जेणेकरून दागिने व इतर सोन्याच्या वस्तू बनविण्यात ते उपयुक्त ठरते. इतर धातू किती प्रमाणावर मिसळलेले आहे हे दाखवण्यासाठी सोन्याचा अंश २४ व्या मध्ये अर्थात कॅरेटमध्ये दाखवण्यात येतो; १२ कॅरेटच्या सोन्यामध्ये ५० टक्के सोने असते, १८ कॅरेटच्या सोन्यामध्ये ७५ टक्के सोने असते तर २४ कॅरेटच्या सोन्यामध्ये शंभर टक्के सोने असते.
• दक्षिण आफ्रिका व संयुक्त संस्थाने ही सोने उत्पादन करणारी प्रमुख राष्ट्रे आहेत.
[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]
सिकंदर बादशाह: वॉल्टर्स आर्ट गॅलरी, बाल्टिमोर
[२६ पानांवरील चित्रं]
सन १४९२ मध्ये सोन्याच्या खजिन्याचा शोध लावण्यासाठी बहामामध्ये क्रिस्टोफर कोलंबसचे आगमन झाले तेव्हाचे चित्र
[चित्राचे श्रेय]
Courtesy of the Museo Naval, Madrid (Spain), and with the kind permission of Don Manuel González López