वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. ४-९
  • विनाशकारी हवामान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विनाशकारी हवामान
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अनिश्‍चिततांमुळे वादविवाद
  • काय केले जात आहे?
  • बदलाची किंमत
  • आपले मौल्यवान वातावरण
    सावध राहा!—१९९५
  • आपले वातावरण बिघडवले जाते तेव्हा
    सावध राहा!—१९९५
  • प्रवाळ खडकांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. ४-९

विनाशकारी हवामान

या न त्या मार्गाने आपल्यातील बहुतेकजण कार्बनजन्य इंधनांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्‍या मोटारी आणि इतर वाहने आपण वापरतो. विद्युतकेंद्रातून पुरवठा होणाऱ्‍या विद्युतशक्‍तीचा आपण वापर करतो; ही विद्युतकेंद्रे कोळसा, नैसर्गिक वायू आणि तेलावर चालतात. स्वयंपाकासाठी किंवा शेकोटी पेटवण्यासाठी आपण लाकूड, लोणारी कोळसा, नैसर्गिक वायू किंवा दगडी कोळसा यांचा उपयोग करतो. या सर्वांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडची भर पडते. हा वायू सूर्याची उष्णता आत अडवून ठेवतो.

आपण उष्णता अडवून ठेवणाऱ्‍या इतरही हरितगृहवायूंची भर वातावरणात पाडत असतो. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्‍या नायट्रोजन खतांमधून नायट्रस ऑक्साईडची भर पडते. भाताच्या शेतींमधून आणि गुरांच्या कुरणांमधून मिथेन वायू बाहेर पडतो. प्लॅस्टिक फोमच्या उत्पादनामुळे आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमुळे क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) निर्माण होतात. सीएफसी केवळ उष्णताच अडवून ठेवत नाहीत तर पृथ्वीचा स्थिरावरणीय ओझोन थर देखील नष्ट करतात.

सीएफसीवर सध्या नियंत्रण असल्यामुळे त्यांना वगळले तर उष्णता अडवून ठेवणारे हे वायू अधिकच वाढत्या प्रमाणात वातावरणामध्ये सोडले जात आहेत. काही अंशी पृथ्वीवरील लोकांची संख्यावाढ आणि त्यासोबतच ऊर्जेचा अधिक उपयोग, वाढती औद्योगिक क्रिया आणि कृषी क्षेत्र हे सर्व यासाठी जबाबदार आहे. वॉशिंग्टन येथील वातावरण संरक्षण एजेन्सीनुसार सध्या दर वर्षी, मानव सहा अब्ज टन कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृहवायू वातावरणात सोडतात. हे हरितगृहवायू नुसतेच विरून जात नाहीत; तर दशकानुदशके ते वातावरणात तसेच राहू शकतात.

वैज्ञानिकांना दोन गोष्टींविषयी पूर्ण खात्री वाटते. एकतर, अलीकडील दशकांमध्ये आणि शतकांमध्ये, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे आणि इतर हरितगृहवायूंचे प्रमाण वाढले आहे. दुसरी गोष्ट अशी की, गेल्या शंभर वर्षांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान ०.३ ते ०.६ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले आहे.

आता प्रश्‍न येतो की, पृथ्वीच्या तापमानातील वाढ आणि मानवांद्वारे होणाऱ्‍या हरितगृहवायूंची वाढ यात काही संबंध आहे का? काही वैज्ञानिकांच्या मते कदाचित नाही; नैसर्गिक फेरबदलांमुळे तापमानात वाढ होत असते आणि सूर्य यासाठी जबाबदार असेल असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने दिलेल्या अहवालातील म्हणण्याशी अनेक हवामान तज्ज्ञ सहमत आहेत. तापमानातील वाढ “संपूर्णतः नैसर्गिक असण्याची शक्यता कमीच आहे” आणि “जगाच्या हवामानावर मानवी प्रभाव स्पष्ट दिसत असल्याचे साधार पुराव्यांवरून सूचित होते,” असे त्यात म्हटले होते. तरीही, मानवी कार्यहालचालींमुळे पृथ्वीचे तापमान वाढते का, याबद्दल अद्यापही अनिश्‍चितता आहे—विशेषतः पृथ्वीचे तापमान २१ व्या शतकात किती वेगाने वाढेल आणि त्याचे नक्की कोणते परिणाम होतील याविषयी अनिश्‍चितता आहे.

अनिश्‍चिततांमुळे वादविवाद

जलवायूविज्ञानतज्ज्ञ जेव्हा भावी हरितगृह परिणामाविषयी भाकीत करतात तेव्हा जगातल्या सर्वाधिक गतिमान आणि शक्‍तिमान संगणकांवरील क्लायमेट मॉडेल्सच्या जोरावर ते असे भाकीत करतात. तथापि, पृथ्वीचे भ्रमण, वातावरण, सागर, बर्फ, जमिनीवरील वैशिष्ट्ये आणि सूर्य यांच्यातील अत्यंत क्लिष्ट परस्परक्रियेद्वारे पृथ्वीचे ऋतूमान ठरवले जाते. पण, इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक घटक पृथ्वीच्या ऋतूमानावर प्रभाव पाडत असल्याने, आतापासून ५० किंवा १०० वर्षांनंतर काय होईल हे निश्‍चित रूपाने सांगणे कोणत्याही संगणकाला अशक्य आहे. अलीकडेच विज्ञान (इंग्रजी) या पत्रिकेने म्हटले: “अनेक ऋतूमान तज्ज्ञांचा असा इशारा आहे की, पृथ्वीचे तापमान मानवी कार्यहालचालींमुळे वाढू लागले आहे—अथवा हरितगृह उष्णता घडून येईल तेव्हा ते किती गंभीर असेल अशी स्पष्टता अद्याप मुळीच मिळालेली नाही.”

अनिश्‍चिततेमुळे एखादा धोका आहे याकडे दुर्लक्ष करणे सोपे जाते. पृथ्वीचे तापमान वाढत आहे याविषयी शंका व्यक्‍त करणारे वैज्ञानिक त्याचप्रमाणे सध्याची स्थिती तशीच राहू देण्यात ज्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत असे शक्‍तिशाली उद्योगधंदे असा वाद मांडतात की, खर्चीक उपाययोजना करण्यासाठी सध्या जितकी माहिती आहे तितकी पुरेशी नाही. त्यांचे म्हणणे आहे की, लोक विचार करतात तितके कदाचित भविष्य वाईट नसेल.

यावर पर्यावरणतज्ज्ञ असे म्हणून प्रतिरोध करतात की, वैज्ञानिकदृष्ट्या अनिश्‍चितता आहे म्हणून धोरणकर्त्यांनी यात समाधान मानू नये. काहींना वाटते तितके हे भावी ऋतूमान कदाचित बिकट नसेलही, पण स्थिती याहून बिकट असण्याची शक्यता देखील असू शकते! शिवाय, त्यांची कारणमीमांसा अशी आहे की, भविष्यात काय घडेल याची आपल्याला निश्‍चितार्थाने कल्पना नाही याचा अर्थ धोका कमी करण्यासाठी काहीच केले जाऊ नये असा होत नाही. उदाहरणार्थ, धूम्रपान सोडून देणारे लोक, आपण धूम्रपान करत राहिलो तर आपल्याला ३० किंवा ४० वर्षांत निश्‍चितच फुफ्फुसाचा कर्करोग संभावेल असा वैज्ञानिक पुरावा आधी मागत नाहीत. ते धोका ओळखून घेतात आणि तो कमी करण्याची किंवा टाळण्याची त्यांना इच्छा असते म्हणून ते धूम्रपान सोडून देतात.

काय केले जात आहे?

पृथ्वीचे तापमान वाढण्याची समस्या किती व्यापक आहे—आणि अशी समस्या खरीच आहे का यावर—इतका वाद असल्याकारणाने काय करावे याबद्दल निरनिराळे दृष्टिकोन आहेत यात काहीच नवल नाही. कित्येक वर्षे, पर्यावरणवादी गटांनी प्रदूषण-मुक्‍त ऊर्जा साधनांचा व्यापक उपयोग करण्याला दुजोरा दिला आहे. सूर्य, वारा, नद्या आणि वाफ व गरम पाण्याच्या जमिनीखालच्या साठ्यांतील ऊर्जेचा उपयोग करता येतो.

पर्यावरणवाद्यांनी उष्णता अडवणाऱ्‍या वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारांना नियम बनवण्यास आर्जवले आहे. सरकारांनी कागदांवर सह्‍या केल्या आहेत. उदाहरणार्थ, १९९२ मध्ये, रायो दी झानेइरु, ब्राझील येथे पृथ्वी परिषदेत सुमारे १५० देशांच्या प्रतिनिधींनी हरितगृहवायूंचे उत्सर्जन, विशेषतः कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याबाबत आपण वचनबद्ध आहोत हे दाखवण्याकरता एका करारावर सह्‍या केल्या. औद्योगिक राष्ट्रांच्या हरितगृहवायूंच्या उत्सर्जनाची पातळी सन २००० पर्यंत १९९० च्या पातळीपर्यंत कमी केली जाईल हे मूळ ध्येय होते. दोन-चार देशांनी या दिशेने प्रगती केली असली, तरी बहुतांश श्रीमंत राष्ट्रांनी हे मर्यादित वचन पूर्ण करण्यासंबंधी काही सुद्धा केलेले नाही. कपात करण्याऐवजी बहुतांश राष्ट्रे हरितगृहवायूंचे आणखीनच उत्सर्जन करू लागले आहेत! उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत, असे मानले जाते की, सन २००० पर्यंत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन १९९० मध्ये होते त्यापेक्षा ११ टक्क्यांनी अधिक असण्याची शक्यता आहे.

अगदी अलीकडे, आंतरराष्ट्रीय करार “दमदार” करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सन १९९२ च्या करारानुसार आपखुशीने कपात करण्याची सूट देण्याऐवजी हरितगृह उत्सर्जनांची बंधनकारी ध्येये गाठण्याची मागणी करण्यात आली आहे.

बदलाची किंमत

राजकीय नेत्यांना आपण पृथ्वीचे मित्र आहोत अशी प्रतिमा उमटवण्याची खूप इच्छा असते. तथापि, बदलामुळे अर्थव्यवस्थेत होणाऱ्‍या परिणामांवरही त्यांचा डोळा असतो. द इकोनॉमिस्ट पत्रिकेनुसार, ९० टक्के जग ऊर्जेसाठी कार्बनजन्य इंधनावर अवलंबून असल्यामुळे, त्याचा वापर बंद केला तर फार मोठे बदल होतील; या बदलामुळे मोजाव्या लागणाऱ्‍या किंमतीवर जोरदार वाद चालू आहे.

हरितगृहवायूंच्या उत्सर्जनांची सन २०१० पर्यंत १९९० च्या पातळीपेक्षा १० टक्के कपात करण्याची किती किंमत मोजावी लागेल? याचे उत्तर तुम्ही कोणाला हा प्रश्‍न विचारता यावर निर्भर करते. इतर कोणत्याही देशापेक्षा वातावरणात सर्वात अधिक हरितगृहवायूंचे उत्सर्जन करणाऱ्‍या संयुक्‍त संस्थानांतील मतांचा विचार करा. उद्योग क्षेत्रातल्या थिंक टँक्स असा इशारा देतात की, या कपातीसाठी संयुक्‍त संस्थानांच्या अर्थव्यवस्थेला दर वर्षी अब्जावधी डॉलर किंमत मोजावी लागेल आणि त्यामुळे ६,००,००० लोक बेकार होतील. याच्या अगदीच उलट, पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की, हेच उद्दिष्ट साध्य केले तर दर वर्षी अर्थव्यवस्थेच्या अब्जावधी डॉलर्सची बचत होईल आणि ७,७३,००० नवीन नोकऱ्‍या निर्माण होतील.

पर्यावरणवादी गटांनी तत्काळ कार्यहालचाल करण्याची मागणी केली असतानाही, शक्‍तिशाली उद्योग—नावे द्यायचीच असतील तर, मोटार उद्योग, तेल उद्योग आणि कोळसा उद्योजक—पृथ्वीचे तापमान वाढत असल्याच्या धोक्याला क्षुल्लक ठरवण्यासाठी आणि जीवाश्‍म इंधनांचा वापर थांबवला तर अर्थव्यवस्थेवर त्याचा केवढा भयंकर परिणाम होईल हे फुगवून सांगण्यासाठी आपला भरमसाट पैसा आणि प्रभाव उपयोगात आणत आहेत.

हा वाद अद्याप सुरूच आहे. तथापि, मानव जर ऋतूमानात बदल घडवत असले आणि त्याविषयी फक्‍त बोलून प्रत्यक्षात काही करत नसले, तर सर्वजण हवामानाबद्दल फक्‍त बोलतात पण कोणी काही करत नाही हे म्हणणे एक अभद्र रूप धारण करील.

[पानांवरील चौकट 5]

क्योटो प्रस्ताव

डिसेंबर १९९७ मध्ये, १६१ राष्ट्रांतील २,२०० पेक्षा अधिक प्रतिनिधी जपानमधील क्योटो येथे पृथ्वीचे तापमान वाढण्याच्या धोक्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एक करार किंवा प्रस्ताव तयार करण्यास जमले होते. एका आठवड्याहून अधिक दिवस चर्चा केल्यावर, विकसित राष्ट्रांनी हरितगृहवायूंच्या उत्सर्जनामध्ये सन २०१२ पर्यंत १९९० च्या पातळीपेक्षा सरासरी ५.२ टक्के कपात करावी असे प्रतिनिधींनी ठरवले. या कराराचे उल्लंघन करणाऱ्‍यांना कोणती शिक्षा दिली जाईल हे नंतर ठरवले जाणार होते. सर्व राष्ट्रे हा करार पाळतील असे गृहीत धरले, तर ५.२ टक्के कपात केल्याने केवढा फरक पडेल? स्पष्टतः, फारच कमी. टाईम पत्रिकेने अहवाल दिला: “औद्योगिक क्रांतीच्या सुरवातीपासून वातावरणात साठत गेलेले हरितगृहवायू खरोखर कमी करायचे असतील तर त्यांच्या उत्सर्जनात ६०% कपात करावी लागेल.”

[Box/Diagram on page 7]

(For fully formatted text, see publication)

हरितगृह परिणामाचे सचित्र स्पष्टीकरण

हरितगृह परिणाम: हरितगृहातील काचेच्या खिडक्यांप्रमाणे पृथ्वीचे वातावरण सूर्याची उष्णता आत अडवून ठेवते. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, पण ही निर्माण झालेली उष्णता—जी अवरक्‍त प्रारणाने वाहिली जाते ती—वातावरणातून सहजासहजी निसटू शकत नाही. त्याउलट, हरितगृहवायू या प्रारणाला अडवतात आणि त्यातील काही पुन्हा पृथ्वीकडे पाठवले जाते ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान आणखीनच वाढते.

१. सूर्य

२. अडवलेले अवरक्‍त प्रारण

३. हरितगृहवायू

४. निसटणारे प्रारण

[Box/Diagram on page 8]

(For fully formatted text, see publication)

ऋतूमान नियंत्रित करणाऱ्‍या शक्‍ती

पृथ्वीचे तापमान वाढण्याविषयी चालू असलेला वाद आपल्याला समजून घ्यायचा असल्यास, आपले ऋतूमान ज्या शक्‍तींमुळे सध्या असे आहे त्या विस्मयकारक शक्‍तींबद्दल आपण आधी समजून घेतले पाहिजे. काही मूलभूत गोष्टी आपण विचारात घेऊ या.

१. सूर्य—उष्णता आणि प्रकाशाचा उगम

पृथ्वीवरील जीवन, आपण ज्याला सूर्य म्हणतो त्या अफाट अणुकेंद्रिय भट्टीवर अवलंबून आहे. दहा लाख पृथ्वींपेक्षाही मोठा असलेला हा सूर्य उष्णता आणि प्रकाशाचा अनंत पुरवठा आहे. सूर्याचा प्रकाश आणि उष्णता यांत घट झाला तर आपला ग्रह बर्फाने आच्छादला जाईल; आणि त्यांत वाढ झाली तर पृथ्वी उकळत्या तेलाच्या कढईसारखी होईल. सूर्यापासून ही पृथ्वी १५ कोटी किलोमीटर अंतरावर भ्रमण करत असल्याने सूर्याच्या एकूण ऊर्जेच्या २ अब्ज भागांतील केवळ एक भाग तिला मिळतो. तथापि, हे प्रमाण सजीव सृष्टीच्या भरभराटीकरता अगदी अनुकूल ऋतूमान निर्माण करते.

२. वातावरण —पृथ्वीची उबदार घोंगडी

पृथ्वीचे तापमान केवळ सूर्यावरच अवलंबून नाही; आपल्या वातावरणाचेही त्यात महत्त्वपूर्ण योगदान असते. पृथ्वी आणि चंद्र हे दोन्ही सूर्यापासून सारख्याच अंतरावर असल्याकारणाने, सूर्यापासून दोघांनाही जवळजवळ सारख्याच प्रमाणात उष्णता मिळते. तरीसुद्धा, पृथ्वीचे सरासरी तापमान १५ डिग्री सेल्सियस आहे तर चंद्राचे सरासरी तापमान थिजवणारे म्हणजे उणे १८ डिग्री सेल्सियस आहे. हा फरक कशाला? पृथ्वीभोवती वातावरण आहे; चंद्राभोवती ते नाही.

आपले वातावरण—ऑक्सीजन, नायट्रोजन आणि इतर वायूंचे पृथ्वीभोवती असलेले दाट बाळंते—सूर्याची थोडीफार उष्णता अडवून बाकी उष्णता बाहेर जाऊ देते. ही क्रिया बहुधा हरितगृहासारखीच असते. तुम्हाला कदाचित ठाऊकच असेल की, हरितगृह म्हणजे काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भिंती आणि छत असलेले गृह असते. त्यातून सूर्यप्रकाश सहज आत शिरतो आणि आतील भाग गरम होतो. त्याचवेळी, छत आणि खिडक्यांमुळे उष्णता लवकर बाहेर पडू दिली जात नाही.

त्याचप्रमाणे, आपले वातावरण पृथ्वीचा पृष्ठभाग तापवण्यासाठी सूर्यप्रकाशाला आत शिरू देते. त्यावर पृथ्वी, अवरक्‍त प्रारणाच्या रूपात ही ऊष्मीय ऊर्जा पुन्हा एकदा वातावरणात पाठवते. यातील बहुतांश प्रारण थेट अंतराळात जात नाही कारण वातावरणातील काही विशिष्ट वायू ते प्रारण शोषून त्यास पुन्हा पृथ्वीकडे पाठवतात आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान आणखी वाढते. पृथ्वीचे तापमान वाढण्याच्या याच क्रियेला हरितगृह परिणाम म्हटले जाते. आपल्या वातावरणाने अशातऱ्‍हेने सूर्याची उष्णता अडवून ठेवली नसती, तर आपली पृथ्वी चंद्रासारखी निर्जीव झाली असती.

३. बाष्प —सर्वात अत्यावश्‍यक हरितगृहवायू

आपले नव्याण्णव टक्के वातावरण दोन वायूंचे बनलेले आहे: नायट्रोजन आणि ऑक्सीजन. पृथ्वीवरील जीवनाचे भरणपोषण करणाऱ्‍या किचकट चक्रांमध्ये या वायूंचा महत्त्वपूर्ण भाग असला, तरी ऋतूमानाचे नियंत्रण करण्यात यांचा थेट असा सहभाग नाहीच. ऋतूमान नियंत्रणाचे काम वातावरणातील बाकीच्या १ टक्क्यावर, उष्णता अडवून धरणाऱ्‍या हरितगृहवायूंवर अवलंबून असते ज्यांमध्ये बाष्प, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि ओझोन यांचा समावेश होतो.

सर्वात महत्त्वपूर्ण हरितगृहवायू अर्थात बाष्प याला वायू समजलेच जात नाही कारण पाणी म्हटले की द्रवरूप असाच विचार करण्याची सवय आपल्याला झालेली आहे. तरीही, वातावरणातील बाष्पाच्या प्रत्येक रेणूत ऊष्मीय ऊर्जा दाटून भरलेली असते. उदारणार्थ, ढगातले बाष्प थंड होऊन सांद्र होते, तेव्हा उष्णता बाहेर सोडली जाते आणि त्यामुळे शक्‍तिशाली संनयन धारा निर्माण होतात. आपल्या वातावरणात बाष्पाच्या गतिशील कार्यहालचालीची हवामान आणि ऋतूमान ठरवण्यात एक महत्त्वपूर्ण आणि क्लिष्ट भूमिका असते.

४.कार्बन डायऑक्साईड—जीवनावश्‍यक

पृथ्वीचे तापमान वाढण्याविषयीच्या चर्चांमध्ये अधिककरून कार्बन डायऑक्साईड वायूबद्दल बोलले जाते. कार्बन डायऑक्साईड हा केवळ दूषक आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कार्बन डायऑक्साईड हा प्रकाशसंश्‍लेषणातला—हिरव्या वनस्पती आपले अन्‍न तयार करतात त्या क्रियेतला—एक अत्यावश्‍यक घटक आहे. मानव आणि प्राणी श्‍वासोच्छ्‌वास करताना ऑक्सीजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. खरे म्हणजे, पृथ्वीवरील जीवन चालू ठेवण्यासाठी निर्माणकर्त्याने केलेली ही एक तरतूद आहे.a परंतु, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे अधिक प्रमाण म्हणजे आणखी एक घोंगडी घेण्यासारखे असेल. त्यामुळे उष्णता आणखीन वाढू शकते.

गुंतागुंतीच्या वैविध्यपूर्ण शक्‍ती

सूर्य आणि वातावरण या दोघांमुळेच ऋतूमान ठरवले जात नाही. यात सागरे आणि हिमनद, पृष्ठभागावरील खनिज आणि वनस्पती, पृथ्वीवरील परिसंस्था, अनेक जीवभूरसायन प्रक्रिया आणि पृथ्वीच्या भ्रमण कक्षेचे भौतिक विज्ञान हे सर्व देखील सामील आहे. ऋतूमानाच्या अभ्यासात पृथ्वीच्या जवळजवळ सर्व शास्त्रांचा समावेश होतो.

[७ पानांवरील चित्र]

[७ पानांवरील चित्र]

1

[७ पानांवरील चित्र]

2

[७ पानांवरील चित्र]

3

[७ पानांवरील चित्र]

4

सूर्य

वातावरण

बाष्प (H2O)

कार्बन डायऑक्साईड (CO2)

[तळटीप]

a पृथ्वीवरील जीवनाचे बहुतेक सर्व प्रकार कार्बनी उगमांतून ऊर्जा मिळवतात व अशाप्रकारे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात. परंतु, अकार्बनी रसायनांतून ऊर्जा मिळवून काही जीव सागराच्या तळाशी असलेल्या अंधारातही जगतात. प्रकाशसंश्‍लेषणाच्या प्रक्रियेऐवजी हे जीव रसायनसंश्‍लेषण नामक प्रक्रियेचा उपयोग करतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा