आपले मौल्यवान वातावरण
मे ४, १९६१ रोजी, मॅल्कम रॉस आणि वीक प्रेथर यांना ३४.६ किलोमीटरच्या उंचीवर नेण्यात आले. त्यावेळी, नवीन विक्रम करणे रॉससाठी इतके महत्त्व राखून नव्हते. त्याने काळजीपूर्वकतेने वेनेशियन ब्लाईंड उघडून गोंडोलातून बाहेर पहिल्यांदा पाहिल्यावर जे दृश्य त्याला दिसले त्याने तो प्रभावीत झाला.
तो आठवून सांगतो, “आम्ही ३०,५०० मीटरच्या उंचीवर पोहंचल्यावर जो देखावा पाहावयास मिळाला तो खरोखरच उदात्त होता.” वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांचे रंग पाहून रॉस आश्चर्यचकित झाला. प्रथम, पृथ्वीच्या वर १६ किलोमीटरपर्यंत विस्तारलेले “भडक आणि पांढरट निळ्या रंगाचे” ट्रोपोसस्पीयर आहे. त्यानंतर स्ट्रॅटोसस्पीयरचा गडद निळा रंग अधिक गडद होऊन शेवटी काळे अंतराळ येते. रॉसने नॅशनल जॉग्रफीक यात लिहिले, “आम्ही भीतीयुक्त आश्चर्यासह स्तब्ध राहून स्वर्गीय वातावरणाच्या सौंदर्याचे चिंतन केले.”
खरोखरच, आपले लावण्यपूर्ण वातावरण चिंतन करण्याच्या योग्यतेचे आहे.
जीवन बचावणारे
परिणामतः, आपले वातावरण पृथ्वीला ८० किलोमीटर्सच्या उंचीपर्यंत वेष्टिणारा हवेचा सागर आहे. त्याचे वजन ५०,००० खरब टनापेक्षाही अधिक आहे आणि ते समुद्रसपाटीच्या दर चौकस सेंटीमीटरवर १.०३ किलोग्रॅमच्या शक्तीने आपल्या डोक्यांवर दाब देते. त्या हवेच्या दाबाशिवाय आपण जगू शकलो नसतो कारण तो आपल्या शरीरातील द्रव्यांची वाफ होण्यापासून टाळतो. मानवी जीवनाला टिकवून ठेवण्याकरता वरील वातावरणात हवेचा पुरेसा दाब नाही. यास्तव, रॉस आणि प्रेथर यांना दाबयुक्त अंतराळ वस्त्रे घालावी लागली. रॉसने समजावले, “कृत्रिम दाबाविना आपले रक्त उकळेल आणि आपल्या रक्त वाहिन्या आणि अवयव फुटतील.”
अर्थात, श्वास घेत राहण्यासाठी देखील आपल्याला या हवेच्या सागराची गरज आहे. तथापि, तो दिसत नसल्यामुळे, आपल्यापैकी बहुतेकजण या गोष्टीचा गंभीर विचार करत नाहीत. प्राचीन काळातील एका धार्मिक पुरुषाने गुणग्राहकतेने म्हटले: “जीवन, प्राण व सर्व काही [देव] स्वतः सर्वांना देतो.”—प्रेषितांची कृत्ये १७:२४, २५.
आपल्या वातावरणाविना, पाण्याचे थेंब जिच्या भोवती निर्माण होतात ती धूळ वर धरून ठेवण्यास कोणतेच माध्यम राहिले नसते. त्यासाठी पाऊस झालाच नसता. आपले वातावरण नसते, तर आपण सूर्याच्या थेट किरणांनी होरपळून गेलो असतो आणि रात्रीच्या वेळी गारठलो असतो. वातावरण एखाद्या घोंगडीप्रमाणे सूर्याची काही उष्णता अडवून धरते. त्यामुळे रात्र ह्या अतिशय थंड नसतात.
त्याशिवाय, पृथ्वीच्या रहिवाश्यांना इजा पोहंचेल अशा बाहेरून येणाऱ्या उल्कांपासून देखील वातावरण संरक्षण पुरवते. हर्बट रील हे वातावरणाचा परिचय (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात असे स्पष्टीकरण देतात, “अंतराळातून वातावरणाच्या बाहेरील सीमेत प्रत्येक दिवशी अंदाजे कित्येक हजारो टन वजनाच्या घन वस्तू येतात.” परंतु, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहंचण्याआधीच अनेक उल्कांचे वातावरणातच तुकडे होतात.
वातावरण आपल्या जीवनाच्या आनंदात अधिक भर घालते. ते आपल्याला सुंदर निळे आभाळ, पांढरे शुभ्र फुगीर ढग, तजेला देणारा पाऊस आणि रमणीय सूर्योदय व सूर्यास्त देते. त्याहून अधिक, वातावरणाविना आपण आपल्या प्रियजनांचे आवाज ऐकू शकलो नसतो, तसेच आपण आपले मनपसंत संगीत देखील ऐकू शकलो नसतो. का बरे? कारण ध्वनी लहरी वाहण्यासाठी पदार्थाची गरज असते. हवा उत्तम ध्वनी वाहक आहे. परंतु, अंतराळात कोणताच आवज ऐकू येत नाही.
एक अद्भुत मिश्रण
प्राचीन काळातील लोक वातावरण एकाच पदार्थाचे असल्याचा दृष्टिकोन बाळगत होते. नंतर, १८ व्या शतकाच्या शेवटी, शास्त्रज्ञांना शोध लागला की ते मुख्यत्वे दोन पूरक वायू म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचे मिळून बनलेले आहे. वातावरणात जवळजवळ ७८ टक्के नायट्रोजन आणि २१ टक्के ऑक्सिजन आहे; उर्वरित १ टक्का आरगॉन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड, नेआन, हेलियम, क्रिप्टॉन, हायड्रोजन, झेनान आणि ओझोन या वायुंचा बनलेला आहे.
अर्थात, ऑक्सिजन हा जीवन-आवश्यक वायू आहे. आपली शरीरे श्वसनाद्वारे तो घेतात. आपल्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण पृथ्वीवरील जीवनाकरता एकदम योग्य आहे. कोणत्याही कारणामुळे त्याचे प्रमाण कमी झाल्यास, आपल्याला गुंगी येईल आणि शेवटी आपण बेशुद्ध पडू. त्याची संहती अधिक वाढल्यास, ओल्या फांद्या आणि जंगलातील गवत देखील पेट घेईल असे म्हटले जाते.
नायट्रोजन हा ऑक्सिजनला योग्यपणे विरळ करणारा वायू आहे. तथापि, तो जीवन टिकवून ठेवण्यात मात्र निष्क्रिय भूमिका करण्यापेक्षा अधिक काही करतो. सर्व जीवांना जिवंत राहण्याकरता त्याची गरज असते. वनस्पतींना वीज आणि एका खास प्रकारच्या सूक्ष्म जंतूद्वारे वातावरणातून नायट्रोजन प्राप्त होते. त्या बदली आपण, अन्न खाल्ल्याने नायट्रोजन प्राप्त करतो.
आपले वातावरण ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे उचित प्रमाण राखते हे एक आश्चर्यच आहे. अतिसूक्ष्म जंतुंच्या मौल्यवान कार्यामुळे नायट्रोजन वातावरणात पुन्हा सोडला जातो. ऑक्सिजनबद्दल काय? अग्नीमुळे आणि मानव व पशुंच्या श्वसनाद्वारे ऑक्सिजनच्या मोठ्या प्रमाणाचा वापर केला जातो. तरीसुद्धा, वातावरण २१ टक्के ऑक्सिजनचे आपले प्रमाण राखते. ते कसे? प्रकाश संश्लेषणाद्वारे—ती हिरवी पाने आणि शैवाल यांच्यामध्ये होणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्याद्वारे प्रत्येक दिवशी महापद्मापेक्षा अधिक ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो.
प्रकाश संश्लेषण कार्बन डायऑक्साइडशिवाय घडू शकत नाही. तो वातावरणाचा केवळ ०.०३ टक्के भाग असलेला अल्पांश वायू आहे. प्रकाशाच्या साहाय्याने, वनस्पती वाढण्यास, फळे, कवच असलेली फळे, धान्य आणि भाज्या उत्पन्न करण्यास कार्बन डायऑक्साइडवर अवलंबून राहतात. आपला ग्रह उबदार ठेवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड पृथ्वीकडे उष्णता देखील परावर्तीत करतो. परंतु अधिक जळण, कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांना जाळल्याने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले तर कालांतराने, पृथ्वीचे तापमान इतके उष्ण होईल की त्यामुळे जीवनाचा अंत होईल. दुसऱ्या बाजूला पाहता, कार्बन डायऑक्साइड खूपच कमी झाल्यास, प्रकाश संश्लेषण थांबेल आणि आपली उपासमार होईल.
पृथ्वीचे जीवन ज्यावर अवलंबून आहे असा आणखी एक अल्पांश वायू म्हणजे ओझोन होय. वातावरणाच्या स्ट्रॅटोसस्पीयर म्हटल्या जाणाऱ्या वरील भागातील ओझोन सूर्याकडील अतिनील किरणे शोषून घेतो. अशाप्रकारे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्याला या हानीकारक अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते.
खरोखरच, वातावरणाबद्दल आपल्याला जितकी अधिक माहिती मिळते तितकेच आश्चर्य करण्यासाठी अधिक कारण आहे. त्यातील नायट्रोजन, ऑक्सिजन आणि अल्पांश वायुंचे मिश्रण अगदी योग्य आहे. पृथ्वीचा आकार देखील तो समतोल राखण्यास अगदीच योग्य आहे. पृथ्वी लहान आकाराची असली आणि तिचे वजन कमी असले, तर तिची गुरुत्वाकर्षण शक्ती फारच दुर्बळ असली असती आणि आपले पुष्कळ वातावरण अंतराळात मिसळले असते.
जीवनाचे वातावरण (इंग्रजी) हे पुस्तक सांगते, “दुसऱ्या बाजूला पाहता, पृथ्वी आहे त्यापेक्षा किंचितही मोठी असती, तर अधिक गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मोठ्या प्रमाणात वायू रोखून धरण्यात आले असते. . . . वातावरणाच्या वायुंमधील नाजूक समतोल बिघडला असता.”
तथापि, दुःखाची गोष्ट म्हणजे, मानवाच्या आधुनिक जीवन-शैलीमुळे हा “नाजूक समतोल” बिघडवला जात आहे. परिस्थिती आता किती गंभीर आहे, तसेच आपले मौल्यवान वातावरण नष्ट होण्यापासून बचावले जाईल यासाठी कोणती आशा आहे? (g94 12/22)
[५ पानांवरील चौकट/चित्र]
सूर्यास्त रमणीय दिसतात तेव्हा
वातावरण सूर्याच्या किरणांना अशाप्रकारे परावर्तीत करते की, ज्यामुळे आभाळाला एक प्रफुल्लित करणारे निळे स्वरूप मिळते. सूर्य क्षितिजावर मावळतो तसे, त्याच्या किरणांना अधिक वातावरणातून पार व्हावे लागते. यामुळे विविध गडद रंग निर्माण होतात. शहरातील रहिवाश्यांना हे मुळीच पाहायला मिळत नाही.
औद्योगिक शहरांतील सूर्यास्त बहुधा निस्तेज असतात आणि त्यामध्ये लाल रंगांच्या छटांशिवाय इतर रंग नसतात. नवीन शास्त्रज्ञ (इंग्रजी) हे नियतकालिक असे निरीक्षण करते की, क्षेत्र खूपच दूषित असल्यास, “सूर्य एखाद्या निस्तेज लाल रंगाच्या बिंबाप्रमाणे दिसतो व ते बिंब क्षितिजाला पोहंचण्याआधीच फिके पडू शकते.”
वरील नियतकालिक स्पष्ट करते, “असाधारणतः निर्मळ आणि शुद्ध वातावरणात सूर्यास्ताचे रंग विशेषतः गडद असतात. सूर्य चकचकीत पिवळ्या रंगाचा असतो आणि भोवतालचे आभाळ केशरी आणि पिवळ्या छटांचे असते. सूर्य क्षितिजावर नाहीसा होतो तसे हे रंग हळूहळू केशरीपासून निळ्या रंगात बदलतात. सूर्य पूर्णपणे नाहीसा झाल्यावरही, क्षितिजाजवळील ढग त्याचा प्रकाश परावर्तीत करीत राहतात.”
एका प्रदूषणरहित जगात विविध रमणीय सूर्यास्तांचा आनंद घेतला जाण्याची जरा कल्पना करा!—प्रकटीकरण २१:३-५. (g94 12/22)