हवामानावर चर्चा
तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असला किंवा तुम्ही कोणीही असला, तरी हवामानाचा तुमच्या जीवनावर परिणाम होतोच. आज खूप गरम होईल आणि ऊन असेल अशी चुणूक लागली, तर तुम्ही हलके कपडे घालता. थंडी असेल, तर शाल-मफलर गुंडाळता, आणि पाऊस असला तर? छत्री घेता.
काही वेळा हवामानामुळे आपले मन उल्लासते; तर इतर वेळा निराश वाटते. कधीकधी, वावटळ, झंझावात, अनावृष्टी, बर्फाची वादळे किंवा जोरदार पावसाच्या रूपात हे हवामान प्राणघातक ठरते. हवामान आपल्याला आवडत असले किंवा नसले, त्याला शाप दिला किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तरी हवामानास टाळता येत नाही; इतिपासून ते अंतापर्यंत त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर सतत पडत असतोच.
कोणीतरी उपरोधाने म्हटले: “हवामानाबद्दल सगळेजण बोलतात पण त्यासाठी काही करत मात्र नाहीत.” खरेच, हवामानात कोणत्याही प्रकारचा बदल करणे हे आपल्या हातात नाही असे नेहमीच वाटले आहे. परंतु, आता अधिकाधिक शास्त्रज्ञांचे हे मत राहिलेले नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, आपल्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू सोडल्याने हवामानाच्या दीर्घकालीन पद्धतींमध्ये—आपल्या ऋतूमानात—बदल होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या संभाव्य कायापालटाचे स्वरूप कसे आहे? इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) यांच्याकडून येणारे उत्तर कदाचित सर्वात जास्त अधिकाराचे आहे; ८० देशांतील २,५०० पेक्षा अधिक जलवायुविज्ञानशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि धोका-परीक्षण तज्ज्ञांचे मत त्यात दिले गेले होते. आपल्या १९९५ सालाच्या अहवालात, पृथ्वीचे ऋतूमान उष्ण होत चालले आहे असा निष्कर्ष आयपीसीसीने काढला होता. पुढील शतकादरम्यान, परिस्थिती अशीच राहिली तर, तापमानात ३.५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन-चार डिग्री वाढ म्हणजे काही खास चिंतेची गोष्ट नाही असे वाटत असले, तरी जगाच्या ऋतूमानाच्या तापमानात हलकासा फरक झाला तरी देखील ते विनाशकारी ठरू शकते. अनेकांना आगामी शतकाची पुढीलप्रमाणे चिन्हे दिसू लागली आहेत.
टोकाचे प्रादेशिक हवामान. काही भागांमध्ये, अनावृष्टी दीर्घकाळापर्यंत राहील तर इतर ठिकाणी पाऊस आणखी जोरदार होईल. वादळे आणि पूर आणखीन तीव्र, तर वावटळे अधिक विध्वंसक होऊ शकतात. पूर आणि दुष्काळामुळे लाखो जण तर मरतातच परंतु, पृथ्वीचे तापमान वाढले तर हे मृत्यूप्रमाण अधिकच वाढू शकते.
आरोग्याला अधिक धोका. उष्णतेने संभवणारे रोग आणि मृत्यू वाढू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मलेरिया आणि डेंग्यूसारखे उष्णकटिबंधीय रोग वाहून नेणाऱ्या कीटकांचे क्षेत्रही पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे विस्तारू शकते. शिवाय, प्रांतीय पर्जन्यात आणि हिमवर्षेत बदल झाल्याने, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे पाण्याद्वारे आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोगांचे व परजीवींचे प्रमाण वाढू शकते.
नैसर्गिक निवासस्थानांना धोका. उष्ण तापमानांमुळे आणि पर्जन्यवृष्टीत बदल झाल्यामुळे आपली हवा आणि पाणी ज्यामुळे शुद्ध होतात त्या जंगलांना आणि दलदलीच्या प्रदेशांना धोका संभवू शकतो. वणवे अधिक वेळा आणि अधिक तीव्र होऊ शकतात.
वाढत्या समुद्र पातळ्या. समुद्राला बांध घालण्यासाठी खर्चीक प्रकल्प राबवले तर ठीक नाहीतर किनारपट्टीच्या खालच्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना ठिकाण बदलावे लागेल. काही बेटेच्या बेटे पाण्याखाली जातील.
या भयशंका साधार आहेत का? पृथ्वीचे तापमान वाढत आहे का? असल्यास, त्यासाठी मानव जबाबदार आहेत का? एवढा हा धोका असताना, तज्ज्ञ अशा प्रश्नांवर जोरदार वादविवाद करतात ही काही नवलाईची गोष्ट नाही. यामध्ये काय काय गोवलेले आहे याचे परीक्षण आणि आपल्या ग्रहाच्या भविष्याविषयी आपल्याला चिंता करायची गरज आहे का या प्रश्नाला पुढील दोन लेखात हाताळले जाईल.