बायबलचा दृष्टिकोन
गरिबीमुळे चोरी करण्यात गैर नाही?
“गरिबी हा मानवी आनंदाचा एक मोठा शत्रू आहे; त्यामुळे माणसाच्या हक्कांपासून एखाद्याला वंचित केले जाते आणि काही नीतितत्त्वे अव्यवहार्य बनतात तर काहींचे पालन करणे अतिशय कठीण होऊन बसते.”—सॅम्युएल जॉनसन, १८ व्या शतकाचे लेखक.
रोमन मुत्सद्दी, मॉग्नुस आउरेलीउस कासीअडोरस म्हणाले: “गरिबी ही गुन्हेगारीची जननी होय.” वरील मतांवरून असे सुचवले जाते की जणू काही गुन्हे गरिबीमुळे घडणे हा गरिबीचा साहजिक परिणाम आहे. आज अनेकांना यात काही गैर वाटत नाही विशषेतः हा गुन्हा चोरीचा असतो तेव्हा.
जुलूम आणि गरिबीमुळे चोरी करणे चालते अशी सामान्य समजूत आहे. रॉबिन हुडवरील १४ व्या शतकातल्या जगप्रसिद्ध इंग्रजी बॅलडचेच उदाहरण घ्या; त्यात हद्दपार केलेल्या एका काल्पनिक व्यक्तीचे वर्णन आहे जो श्रीमंतांना लुटून गरिबांमध्ये ती लूट वाटतो. कित्येक शतकांपासून त्याला दाता मानले गेले आहे.
आज, अनेकांना अत्यंत हालअपेष्टेत जगावे लागते हे खरे आहे. वर्ल्ड बँकच्या अलीकडच्याच अहवालानुसार, १.३१ अब्ज लोक दिवसा १ डॉलरपेक्षा कमी पैशांत निर्वाह करतात. एका सर्वेक्षणात ७० टक्के फिलिपिन्नोंच्या मते ते गरीब होते. ब्राझीलमध्ये, लोकसंख्येतील २० टक्के सर्वात श्रीमंत लोक लोकसंख्येतल्या २० टक्के सर्वात गरीब लोकांपेक्षा ३२ पटीने जास्त कमवतात. अशा हालअपेष्टांमुळे काही लोक इतके निराश होतात की दररोजच्या गरजा कशाबशा भागवायला ते काहीही करायला, अगदी चोरीचा मार्ग पत्करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
बायबलमध्ये चोरीचे स्पष्टपणे खंडन केले आहे. दहा आज्ञांपैकीची आठवी आज्ञा म्हणते: “चोरी करू नको.” (निर्गम २०:१५) तरीही, बायबलवर विश्वास करणारे अनेक लोकही, दयनीय आर्थिक परिस्थितींमुळे एखाद्याने चोरी केली तर चालते असा विचार करतात.
यावरून काही गंभीर प्रश्न उठतात: गरिबीमुळे चोरी केली तर चालते हे खरे आहे का? जर एखाद्या व्यक्तीची परिस्थिती अगदीच हलाखीची असली तर तिने काय करावे? त्याची मुले आजारी किंवा उपाशी असली तर? अशा परिस्थितींमध्ये यहोवा देव चोरीला अनुमती देईल का? विशेषतः ज्याची चोरी केली आहे त्या व्यक्तीला त्या वस्तूंची कमी भासणार नसल्यास?
देवाचे काय मत आहे?
येशूने आपल्या पित्याचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित केल्यामुळे त्याच्या उदाहरणावरून देवाचा दृष्टिकोन काय आहे ते समजायला आपल्याला मदत मिळू शकते. (योहान १२:४९) पृथ्वीवर असताना, गरजवंत लोकांसोबत येशू अत्यंत दयाळुपणे वागायचा. बायबल म्हणते की, “लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला.” (मत्तय ९:३६) परंतु, त्याने कोणत्याही परिस्थितीत चोरी करण्याला क्षुल्लक समजले नाही. त्याचप्रमाणे, देवाला गरीबांची चिंता वाटत असली, तरीही गरिबीमुळे चोरी केली तर चालते हे त्याला मान्य नाही. यशया ६१:८ (सुबोध भाषांतर) मध्ये बायबल आपल्याला सांगते की, देवाला ‘चोरी आणि अन्याय यांचा तिटकारा’ आहे. शिवाय प्रेषित पौल स्पष्टपणे म्हणतो की, चोरांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तर अशाप्रकारे, आपल्याला देवाचा दृष्टिकोन काय ते स्पष्टपणे सांगितलेले आहे.—१ करिंथकर ६:१०.
तथापि, नीतिसूत्रे ६:३० म्हणते की, “चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली, तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत.” या वाक्यावरून चोरीसाठी कारण मिळते का? मुळीच नाही. संदर्भावरून दिसून येते, की असे असतानाही त्या चोराला त्याच्या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे असे देव समजतो. त्याच्या पुढील वचनात म्हटले आहे: “पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मत्ता देईल.”—नीतिसूत्रे ६:३१.
भुकेमुळे चोरी केलेला चोर जरी हव्यासापोटी किंवा दुसऱ्या व्यक्तीला हानी पोचवण्यासाठी चोरी केलेल्या चोराइतका दोषी नसला, तरी देवाला संतोषविण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या चोरीसाठी दोषी असू नये. हालअपेष्टेची परिस्थिती असली तरी चोरीमुळे देवाचा अनादर होतो. नीतिसूत्रे ३०:८, ९ मध्ये असे म्हटले आहे: “मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. . . . मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.” होय, चोर देवाच्या नामाची निंदा करतो. चोरी करणे हे एक प्रेमरहित कृत्य असल्यामुळे, श्रीमंतांची चोरी केली काय किंवा गरिबांची चोरी केली काय ते एक पापच ठरते. देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणाऱ्यांना चोरीसाठी कोणतीच सबब देता येत नाही.—मत्तय २२:३९; रोमकर १३:९, १०.
गरीब व्यक्तीला चोरी करण्याचा हक्क आहे हा वाद काही तर्काला पटण्यासारखा नाही. हे असे म्हणण्यासारखे असेल की, कमकुवत शरीरयष्टी असलेल्या धावपटूने जिंकण्यासाठी अवैध औषधे घेतली तर चालते. तो जिंकून आला तरी तो बेईमान मार्गानेच जिंकून आला. म्हणून त्याने गैरमार्गाने आपल्याकडून जिंकण्याची संधी हिरावून घेतली असे इतरांना वाटले तर त्यात काही चुकीचे नाही. हेच चोराच्या बाबतीतही खरे ठरते. इतरांच्या मालकीची गोष्ट तो बेईमान मार्गाने मिळवतो. तो गरीब असला तरीसुद्धा त्याने पत्करलेला मार्ग काही योग्य ठरत नाही.
देवाची स्वीकृती हवी असणाऱ्या कोणत्याही चोराने आपल्या जीवनशैलीबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे. बायबल ताकीद देते: “चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर . . . जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) खरोखर पूर्वी चोर असलेले पश्चात्तापी जण, यहोवा त्यांना क्षमा करील ही खात्री बाळगू शकतात.—यहेज्केल ३३:१४-१६.
गरिबांनी काय करावे?
बायबल वचन देते: “परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करितो.” (नीतिसूत्रे १०:३) आपल्या कामना पूर्ण करायला देवाच्या नियमाचे मुद्दामहून उल्लंघन करणाऱ्यांना देव मदत करणार नाही. पण, प्रामाणिकपणे त्याच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविषयी त्याला कळवळा वाटतो आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना तो आशीर्वादित करतो.—स्तोत्र ३७:२५.
ईश्वरी तत्त्वांचे पालन केल्यावर आपली परिस्थिती सुधारल्याचे लाखो लोकांनी आधीच अनुभवले आहे. उदाहरणार्थ, मेहनती असावे आणि जुगार, दारूबाजी, धुम्रपान आणि मादक औषधांचा दुरुपयोग अशा वाईट सवयी टाळाव्यात हा बायबलचा सल्ला लागू केल्याने आवश्यक वस्तू खरेदी करायला त्यांच्याजवळ आणखी पैसे शिल्लक राहतात. (गलतीकर ५:१९-२१) यासाठी विश्वास संपादन करण्याची गरज आहे आणि विश्वास संपादन केलेल्यांना “परमेश्वर किती चांगला आहे” आणि त्याच्यावर भरवसा करणाऱ्या लोकांना तो खरोखर मदत करतो हे कळून चुकले आहे.—स्तोत्र ३४:८.
[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]
रॉबिन हुड: General Research Division/The New York Public Library/Astor, Lenox and Tilden Foundations