तुमची प्रकृती सांभाळण्याचे सहा मार्ग
नायजेरियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ), विकसनशील देशांत राहणाऱ्या सुमारे २५ टक्के लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. ६६ टक्क्यांहून अधिक—जवळजवळ २.५ अब्ज लोकांकडे—सांडपाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. अनेकांसाठी त्यांचा परिणाम रोग आणि मृत्यू यात होतो.
अशा परिस्थितींमध्ये स्वच्छता राखणे जरा कठीणच आहे. परंतु, तुम्ही जर व्यक्तिगत स्वच्छतेची सवय अंगवळणी पाडून घेतली तर तुम्ही अनेक रोगांपासून आपले संरक्षण करू शकाल. जे जंतू शरीरात प्रवेश करून आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात अशांपासून स्वतःचे त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करायला येथे सहा पायऱ्या दिल्या आहेत.
१. विष्ठेशी संपर्क आल्यावर आणि अन्नाला स्पर्श करण्याआधी साबणाने आणि पाण्याने तुमचे हात धुवा.
आजार टाळण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे, घरात नेहमी साबण व पाणी असण्याची खात्री करा ज्यामुळे तुमच्या कुटुंबातले सर्वजण हात धुऊ शकतात. साबण व पाण्याने हातावरून जंतू धुतले जातात—नाहीतर हे जंतू तुमच्या अन्नात किंवा तोंडात जाऊ शकतात. लहान मुले नेहमी आपले हात तोंडात घालत असल्यामुळे वारंवार, विशेषतः जेवणाआधी त्यांचे हात धुणे महत्त्वाचे आहे.
विशेषतः शौचालयात जाऊन आल्यावर, अन्नाला स्पर्श करण्याआधी आणि संडास केलेल्या बाळाला किंवा लहान मुलाला धुतल्यावर हात धुणे महत्त्वाचे आहे.
२. शौचालयाचा उपयोग करा.
जंतू पसरू नयेत म्हणून विष्ठेची योग्यपणे विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. अनेक आजार, विशेषतः अतिसार हा मानवी विष्ठेतल्या जंतूंमुळे होतो. हे जंतू पिण्याच्या पाण्यात किंवा अन्नात शिरू शकतात, हातांवर किंवा स्वयंपाकाची तयारी आणि जेवण वाढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांवर आणि जागेवर येऊ शकतात. तसे झाल्यास, लोकांच्या पोटात हे जंतू जाऊ शकतात आणि मग ते आजारी पडतात.
हे टाळण्यासाठी शौचालयाचा उपयोग करावा. प्राण्यांची विष्ठा घरापासून आणि पाणी घेतो त्या ठिकाणापासून दूर असावी. प्रौढांपेक्षा बाळांची आणि लहान मुलांची विष्ठा अधिक घातक असते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणून लहान मुलांना सुद्धा शौचालयात जायला शिकवावे. लहान मुले इतर ठिकाणी संडास करतात तेव्हा ती जागा लागलीच साफ करावी आणि त्यांची विष्ठा शौचालयात टाकावी अथवा ती पुरून टाकावी.
शौचालये साफ आणि बंद ठेवावीत.
३. स्वच्छ पाणी वापरा.
ज्या घरांमध्ये स्वच्छ आणि नळाच्या पाण्याचा भरपूर पुरवठा असतो त्या घरातले लोक असा पुरवठा नसलेल्या लोकांपेक्षा इतक्यांदा आजारी पडत नाहीत. ज्यांच्या घरात नळाचे पाणी येत नाही ते विहिरी नीट झाकून आणि पिण्याच्या, आंघोळीच्या किंवा धुण्यासाठी वापरले जाणाऱ्या पाण्यापासून सांडपाणी वेगळे ठेवून आपली प्रकृती जपू शकतात. त्याचप्रमाणे प्राण्यांना घराबाहेर आणि पिण्याच्या पाण्यापासून दूर ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
रोगापासून मुक्त राहण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे पाणी शेंदण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बादल्या, दोर आणि भांडी होता होईल तितकी स्वच्छ ठेवावीत. उदाहरणार्थ, बादली खाली जमिनीवर ठेवण्याऐवजी ती टांगून ठेवली तर अधिक उत्तम.
घरातले पिण्याचे पाणी स्वच्छ, झाकलेल्या भांड्यात ठेवावे. त्या भांड्यातून स्वच्छ पळीने किंवा कपाने पाणी काढावे. लोकांना पिण्याच्या पाण्यात हात बुडवू देऊ नका किंवा थेट भांड्यातून पाणी पिऊ देऊ नका.
४. नळाचे पाणी नसल्यास पिण्याचे पाणी उकळून घ्या.
बहुधा नळाचे पाणी हे सर्वात सुरक्षित पिण्याचे पाणी असते. इतर ठिकाणांहून मिळणारे पाणी स्वच्छ दिसत असले तरी त्यात जंतू असण्याची अधिक शक्यता असते.
पाणी उकळल्याने जंतू नष्ट होतात. म्हणून तुम्ही तलाव, झरे किंवा टाक्यांमधून पाणी घेता तेव्हा ते पाणी पिण्याआधी उकळून, थंड करून पिणे सर्वात उत्तम. खास बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी जंतूरहित पिण्याचे पाणी असणे फारच महत्त्वाचे आहे कारण प्रौढांपेक्षा त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते.
पिण्याचे पाणी उकळणे तुम्हाला शक्य नसल्यास, पारदर्शक प्लास्टिकच्या किंवा काचेच्या झाकलेल्या भांड्यात पाणी ठेवावे. ते भांडे दोन दिवसांसाठी उन्हात ठेवा आणि मग ते पाणी प्या.
५. अन्न स्वच्छ ठेवा.
कच्चे खावयाचे अन्नपदार्थ स्वच्छ धुऊन घ्यावेत. दुसरे अन्नपदार्थ, खासकरून मटण आणि कोंबडी नीट शीजवून घ्यावी.
अन्न शिजवल्यावर ते लगेच खाणे केव्हाही उत्तम; तसे केल्यास ते आंबणार नाही. शिजवलेले अन्न तुम्हाला पाच तासांपेक्षा अधिक वेळ ठेवावे लागत असल्यास, ते एकतर गरम ठेवावे किंवा फ्रिजमध्ये ठेवावे. ते अन्न सेवन करण्याआधी पुन्हा नीट गरम करून घ्यावे.
कच्च्या मटणात बहुधा जंतू असतात म्हणून शिजवलेल्या अन्नाच्या ते संपर्कात येऊ देऊ नये. कच्चे मटण साफ करून घेतल्यावर, त्यासाठी जी भांडी वापरली होती आणि किचनमध्ये जेथे ते ठेवले होते ते सगळे धुवून घ्या.
स्वयंपाकाची तयारी जेथे केली जाते तो भाग नेहमी स्वच्छ ठेवला जावा. अन्न झाकून ठेवावे आणि माश्या, घुशी, उंदीर आणि इतर प्राण्यांपासून ते सुरक्षित ठेवावे.
६. घरातला केरकचरा जाळा अथवा पुरा.
उरल्यासुरल्या अन्नाचा कचरा म्हणजे जंतू पसरवणाऱ्या माश्यांच्या प्रजोत्पत्तीची आवडती जागा. म्हणून घरातला कचरा जमिनीवर टाकून देऊ नये. दररोजच्या दररोज त्याची पुरून, जाळून किंवा दुसऱ्या पद्धतीने विल्हेवाट लावावी.
या मार्गदर्शकांना लागू करून तुम्ही अतिसार, पटकी, विषमज्वर, कृमिरोग, अन्नाची विषबाधा आणि इतर अनेक रोगांपासून स्वतःचे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता.
[चित्राचे श्रेय]
उगम: युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक, ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन, आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने प्रकाशित केलेले फॅक्ट्स फॉर लाईफ.