वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. १८-२०
  • चोरी—का नाही?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चोरी—का नाही?
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते चोरी का करतात
  • भावनात्मक दुःख लपविणे?
  • समवयस्क आणि त्यांचा दबाव
  • देवाचा दृष्टिकोन जाणणे
  • मोहपाशाविरुद्ध लढा देणे
  • गरिबीमुळे चोरी करण्यात गैर नाही?
    सावध राहा!—१९९७
  • चोरीचे प्रमाण का वाढत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • ही खरीच चोरी आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. १८-२०

तरुण लोक विचारतात. . . .

चोरी—का नाही?

“मी १६ वर्षांची असून माझी एक फार मोठी समस्या आहे. अलीकडे माझे चोरी करण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. मी सहज बाजारात गेले आणि तेथून मी कर्णफुलांच्या सात जोड्यांची चोरी केली. माझी समस्या इतर कोणालाही सांगण्यास मला भीती वाटते. कृपया मला मदत करावी!”

संभ्रमात पडलेल्या एका किशोरवयीन मुलीने नियतकालिकाच्या सल्ला रकाना या सदराखाली असे लिहिले. एका लेखकाने असा अहवाल दिला: “अंदाजपत्रकानुसार [अमेरिकेमध्ये] किरकोळ विक्री करणाऱ्‍या दुकानांतून दर वर्षी दहा अब्ज डॉलर किंमतीच्या उपभोग्य वस्तूंची . . . चोरी केली जाते, लुटले जाते, किंवा त्यावर धाड घातली जाते. दुकानांत चोरी करणाऱ्‍यांपैकी निम्म्याजणांना अटक केली जाते आणि यातील प्रमुख भाग किशोरावस्थेतील मुले होत.”

नुकत्याच केलेल्या परीक्षणानुसार हायस्कूल (माध्यमिक विद्यालय) मधील एक तृतीयांशपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दुकानांत चोरी करत असल्याचे मान्य केले. जॅन नॉरमन आणि मायरन हॅरीस या संशोधकांनी केलेल्या आणखी एका पाहणीनुसार, “सामान्यतः सर्वच [युवक] केव्हा ना केव्हा तरी पैसे न देता एखादी वस्तू चोरल्याचे कबूल करतात.”

ते चोरी का करतात

एखाद्याच्या मालकीची वस्तू हेतुतः परवानगी शिवाय घेणारी व्यक्‍ती म्हणजे चोर होय. व्यक्‍तिगत गरजेवरून चोरीचे समर्थन केल्याचे काही वेळा दिसून येते. “माझी परिस्थिती फारच बिकट होती,” एक गरीब युवक आठवून सांगतो. “मी [फास्ट फूड रेस्टॉरंटच्या] मागे जात असे आणि लाथेने दार उघडून कोंबडीच्या मांसाचे काही तुकडे घेत असे. त्याशिवाय मी काही देखील घेत नसे. केवळ भुकेला असल्यामुळे मी हे केले.”

बायबलमधील नीतिसूत्र म्हणते: “चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत.” तरी देखील चोरी करणे नैतिक रीत्या चुकीचे आहे. बायबलच्या पुढील वचनाने दाखविले की, चोराला—भुकेला असला तरी कडक शिक्षा चुकती करण्याद्वारे “भरपाई” करावी लागत असे.—नीतिसूत्रे ६:३०, ३१, NW.

परंतु एखाद्या वास्तविक गरजेपोटी चोरी करणारे किशोरवयीन फारच कमी आहेत, हे अविश्‍वसनीयच आहे. मेरी जॅन हे याचे एक उदाहरण आहे आणि ती कबूल करते: “होय, मी दुकानांत चोरी केली आणि खरोखरच हे फारच विचित्र होते कारण असे मी का केले हे माझे मलाच कळत नाही. माझे पालक सर्व गोष्टींसाठी मला पैसे देतात. मला कोणत्याही गोष्टीची आवश्‍यकता नव्हती.”a सेव्हन्टीन या नियतकालिकाने अशाच प्रकारचा अहवाल दिला: “राष्ट्रीय गुन्हा प्रतिबंध मंडळाने केलेल्या पाहणीनुसार, एखादी गोष्ट मोफत मिळावी असे त्यांना वाटत होते, हेच कारण सर्व गुन्हेगारांनी दिले.” दुकानांतील ‘किंमती फारच महाग आहेत,’ असे म्हणण्याद्वारे काही युवक चोरी करण्याच्या त्यांच्या कृत्याचे समर्थन देखील करतात!

अनेक युवकांसाठी चोरी म्हणजे त्यांच्या निरसपणाला कमी करण्याचा केवळ एक मार्ग होय. “शाळा संपल्यानंतर काहीतरी करायचे म्हणून चोरी करणे,” पूर्वी चोरी करणारा जरमी सांगतो. काहींना चोरी जोखमीच्या खेळाप्रमाणेच वाटते; एखादा ब्लाऊज पर्समध्ये कोंबून किंवा एखादी कॉम्पॅक्ट डिस्क कॅन्व्हसच्या पिशवीमध्ये टाकून जोराने पळ काढल्याने ॲड्रनलाईनमुळे निर्माण होणाऱ्‍या भावना काहींना आवडतात.

भावनात्मक दुःख लपविणे?

अर्थातच, तुरुंगवासाच्या शिक्षेची जोखीम पत्करण्याऐवजी निरसपणाला तोंड देण्याकरता अधिक सुरक्षित मार्ग उपलब्ध आहेत. तर मग, केवळ मौज करण्याच्या इच्छेपेक्षा रोमांचक गोष्टींना उद्दीपित करणारे इतर घटक असू शकतात का? असे घटक असल्याचा अनेक तज्ज्ञांचा विश्‍वास आहे. लेडिज होम जर्नलने असे निरीक्षिले, काही युवकांना त्यांचे “वय वाढते तसतसे सामोऱ्‍या येणाऱ्‍या दबावांना तोंड देण्यास फारच अवघड जाते. पालकांबरोबर भांडण होणे, मैत्रीचा भंग होणे, परीक्षेत कमी गुण मिळणे, वगैरे गोष्टींमुळे त्यांना, त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखे वाटते आणि नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना त्यांचे सामर्थ्य पुन्हा मिळाल्यासारखे वाटते.”

होय, चोराच्या फाजील फुशारकी मागे फार मोठी इजा आणि दुःख असू शकते. बायबल याचे वर्णन, “हास्याच्या मुखवट्याने दुःखी हृदय लपले जात नाही.” असे करते. (नीतिसूत्रे १४:१३, सुबोध भाषांतर) पुरावा हे दाखवून देतो की, दुकानांत वारंवार चोऱ्‍या करणे हे खिन्‍नतेचे लक्षण असू शकते. मुलांना दिली जाणारी गैरवागणूक, हा काही युवा चोरांचा इतिहास आहे असेही निदर्शनास येते. दुःखाचे कोणतेही कारण असले तरी चोरी करण्यातील रोमांचितपणा कमीत-कमी काही वेळाकरता—भावनिक खिन्‍नता दाबून टाकत असल्याचे वाटेल.b एका उदाहरणाचा विचार करा, एका अमेरिकी युवकाला मोटारगाड्यांची चोरी करून त्या आनंदाने बेफाम होऊन चालवण्यात मौज वाटते. “असे केल्याने बरे वाटते,” तो म्हणतो. “नशेने धुंद होऊन तुम्हाला घाबरल्यासारखे वाटते.”

समवयस्क आणि त्यांचा दबाव

बायबल म्हणते: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) हे सत्य सर्वत्र लोकमान्य आहे. “क्वचितच एखादी युवा व्यक्‍ती स्वतः होऊन संकटात सापडते,” असे डेनिज व्ही. लँग या लेखिकेने निरीक्षिले. काही वेळा, समवयस्क एखाद्या गोष्टीची चोरी करण्याकरता एकमेकांमध्ये पैज लावतील. खेदाची गोष्ट म्हणजे, अनेक युवक अशा दबावापुढे आपली मान टाकतात.

“कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुलींच्या एका गटामध्ये मी सामील झाले,” युवा कॅथी म्हणते. एकमेव असणाऱ्‍या या गटाचा सदस्य होण्याकरता काय करायचे होते? एका महागड्या स्वेटरची चोरी. “मला या गटात राहायचे होते म्हणून मी दुकानात जाऊन स्वेटरची चोरी केली,” ती कबूल करते.

देवाचा दृष्टिकोन जाणणे

विकत घेण्याची ऐपत नसणाऱ्‍या गोष्टींची, अतिशय जोखमीच्या रोमांचितपणाचा आनंद घेण्याची किंवा समवयस्कांची मर्जी संपादन करण्याची आशा बाळगल्यामुळे कदाचित चोरी करणे आकर्षक वाटत असेल. तथापि, “चोरी करू नको,” ही बायबल मधील दहा आज्ञांपैकी एक आज्ञा आहे. (निर्गम २०:१५) ‘चोरांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही,’ असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर ६:१०) ख्रिस्ती या नात्याने संगोपन झालेल्या युवकांनी देवाचा दृष्टिकोन विशेष लक्षात घेतला पाहिजे. धार्मिकतेचा आव आणून गुप्तपणे चोरीची कामे करणे किती दांभिकपणाचे होईल! प्रेषित पौलाने अशा प्रकारे लिहिले: “दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय?”—रोमकर २:२१.

अटक होण्यामुळे होणारी मानखंडना हे कारण चोरीच्या दुर्गुणाला टाळण्यास पुरेसे आहे. एका युवा चोराला अटक केल्यानंतर त्याने म्हटले: “मला मरावेसे वाटते.” यहोवाला ‘लुटीचा वीट आहे,’ हे जाणून घेतल्याचे सबळ कारण चोरी करण्याच्या अनावर इच्छेला—किंवा दबावाला टाळण्यास पुरेसे आहे. (यशया ६१:८) एखाद्याला दुकानदार, पोलीस आणि पालकांपासून चोरी केल्याचे लपवून ठेवण्यास शक्य झाले तरी तो यहोवापासून ती चोरी लपवू शकत नाही. चोरी उघडकीस येणे अपरिहार्य आहे.—यशया २९:१५.

पातक मनुष्याला कठीण बनवते, हे देखील लक्षात ठेवा. (इब्रीयांस ३:१३) भुरट्या चोऱ्‍यांमुळे अनेकदा दुःसाहस करण्यात आणि उताविळपणे कार्य करण्यात वाढ होते. उदाहरणार्थ, रॉजर या युवकाने त्याच्या गुन्हेगारी जीवनाची सुरवात आईच्या पर्समधून पैसे चोरी करण्याद्वारे केली. कालांतराने, तो वयस्कर स्त्रियांना जमिनीवर पाडून त्यांच्याकडील पर्सच्या चोऱ्‍या करू लागला!

मोहपाशाविरुद्ध लढा देणे

एखाद्याने गुप्तपणे चोरी करण्यास सुरवात केल्यास त्याच्यासाठी चोरी करण्याचे थांबवणे कदाचित सोपे नसेल हे स्वीकार्हार्य देखील आहे. एक युवक मान्य करतो: “हे एक प्रकारे व्यसनाधीन होण्यासारखे आहे.” एका युवकाला अगर युवतीला त्याच्या किंवा तिच्या मार्गामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकेल?

तुमचे पाप देवापाशी कबूल करा. स्वतःच्या पातकांबद्दल पश्‍चात्ताप करून त्या पातकांना देवासमोर उघडपणे कबूल करणाऱ्‍यांना देव “भरपूर क्षमा” करील.—यशया ५५:७.

मदत मिळवा. या नियतकालिकाचे अनेक वाचक त्यांच्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीशी परिचित आहेत. अशा प्रकारचे लोक स्थानिक ख्रिस्ती पर्यवेक्षकांकडे जाऊ शकतात आणि त्यांना आध्यात्मिक मदत आणि सुधारणेसाठी विनंती करू शकतात. (याकोब ५:१४, १५) उत्तम नैतिक तत्त्वे आचरणारे पालक देखील मदतीचा आणि पाठिंब्याचा स्रोत ठरू शकतात. मुलांच्या गैरवर्तणुकीचे कारण इजा, दुःख किंवा केवळ निरसपणा असल्यास त्यांचे दयाळुपणे ऐकून त्यांच्याशी संबंधित गोष्टींविषयी बोलणे फारच मदतदायी ठरू शकते.—नीतिसूत्रे १२:२५.

भरपाई करा. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे चोरांकडून चोरी केलेल्या मालाची व्याजासहित भरपाई करण्याची अपेक्षा केली जात होती. (लेवीय ६:४, ५) असे केल्याने एखाद्याचा फक्‍त विवेक शुद्ध होण्यासच मदत होत नाही तर चोरी केल्यामुळे संबंधित व्यक्‍तींना किती दुःख होते याची जाणीव देखील यामुळे होते. बायबल याचे अभिवचन देते की, मनुष्य “हरण केलेले परत देईल आणि . . . , जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरावयाचा नाही.”—यहेज्केल ३३:१५.

हेवा आणि लोभ या भावनांना दाबून टाका. ‘आपल्या शेजाऱ्‍याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नको,’ ही दहा आज्ञांतील शेवटली आज्ञा होय. (निर्गम २०:१७) विकत घेण्याची ऐपत नसलेल्या एखाद्या गोष्टीची तुम्हाला खरोखरच गरज असल्यास—किंवा हवी असल्यास कदाचित पैसे कमावून ती गोष्ट तुम्हाला प्राप्त करता येईल. प्रेषित पौलाने सल्ला दिला: “ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये, तर त्या ऐवजी आपल्या हातांनी चांगले करीत असता श्रम करावे.”—इफिसकर ४:२८, पंडिता रमाबाई भाषांतर.

तुमच्या सोबत्यांपासून दक्ष असा. डेनिस लँग हा लेखक याचे स्मरण करून देतो की, “अपकृत्य किंवा गुन्हा करणाऱ्‍या तुमच्या मित्राबरोबर किंवा मित्रांच्या गटाबरोबर तुम्ही असल्यास तुम्हाला देखील केवळ त्यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे अपराधी म्हणून गृहीत धरण्यात येईल.” समवयस्कांनी एखादे बेकायदेशीर कृत्य करण्याचे सुचवल्यास तसे करण्यास धैर्याने, नाही असे म्हणा.—नीतिसूत्रे १:१०-१९.

चोरीमुळे इतरांना होणाऱ्‍या हानीचा विचार करा. चोर केवळ स्वतःपुरताच विचार करतो. परंतु येशू आपल्याला सल्ला देतो: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) एखादा मनुष्य इतर लोकांची काळजी घेण्याचे शिकतो तेव्हा त्याचा कल इतरांना हानी पोहंचविण्याकडे नसतो.

तुमच्यावर होणाऱ्‍या परिणामांचा विचार करा. (गलतीकर ६:७) विकत घेण्याची ऐपत नसणारा आकर्षक दागिना किंवा उपकरण तुमच्यापाशी असल्यास किती उत्तम होईल यावर विचार करत बसण्यापेक्षा त्या संबंधित गोष्टीची चोरी करताना पकडले जाऊन तुमच्यावर खटला भरणे किती अपमानास्पद असेल याचा जरा विचार करा; तुमच्या पालकांच्या आणि स्वतः देवाच्या होणाऱ्‍या निंदेचा विचार करा! चोरी करणे ही काही उत्तम कल्पना नव्हे या निष्कर्षास तुम्ही निश्‍चितच याल.

[तळटीपा]

a काही नावे बदलण्यात आली आहेत.

b आम्ही येथे क्लेप्टमेनिआ—मानसिक विकृतीमुळे चोरी करण्याची होणारी अनावर इच्छा याबद्दल चर्चा करत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, क्लेप्टमेनिआ फारच क्वचित लोकांना होतो आणि दुकानांत चोरी करणाऱ्‍यांपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना याचा प्रादुर्भाव होतो. ही विकृती अनेकदा औषधोपचाराने बरी केली जाते.

[१९ पानांवरील चित्र]

दुकानांत चोरी करणारे, पकडले गेल्यामुळे अनेकदा मानखंडना सहन करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा