मेकअप करण्याबद्दल आणि दागदागिने घालण्याबद्दल बायबल काय म्हणतं?
बायबलचं उत्तर
बायबलमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा केलेली नाही. पण मेकअप करायला, दागिने घालायला किंवा इतर अलंकारांचा वापर करायला बायबल मनाई करत नाही. उलट शारीरिक सौंदर्याकडे लक्ष देण्याऐवजी बायबल आपल्याला “शांत वृत्ती आणि सौम्यता” यांसारख्या ‘कधी नष्ट न होणाऱ्या’ गुणांनी स्वतःला सजवायला सांगतं.—१ पेत्र ३:३, ४.
स्वतःला सजवण्याबद्दल बायबल मनाई करत नाही
बायबल काळातल्या विश्वासू स्त्रियांनी स्वतःला सजवलं होतं. अब्राहामचा मुलगा इसहाक याच्याशी लग्न करणाऱ्या रिबकाने तिच्या भावी सारऱ्याकडून भेट म्हणून मिळालेली सोन्याची नथ, अंगठी, सोन्याच्या बांगड्या आणि इतर महागडे दागिने घातले होते. (उत्पत्ती २४:२२, ३०, ५३) तसंच, पर्शियाच्या साम्राज्याची राणी बनायची एस्तेरची शक्यता होती, तेव्हा तिने ‘सौंदर्य उपचार’ स्वीकारले होते. (एस्ते. २:७, ९, १२) असं दिसतं की या उपचारांमध्ये ‘सौंदर्य प्रसाधनांचा’ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मेकअपचा वापर केला जात असावा.
बायबलमध्ये चांगल्या गोष्टींची तुलना करण्यासाठी दागिन्यांचं उदाहरण वापरलं गेलंय. उदाहरणार्थ, चांगला सल्ला देणाऱ्याची तुलना ऐकून घेणाऱ्याच्या कानामध्ये असलेल्या ‘सोन्याच्या कर्णफुलांशी’ केली आहे. (नीतिवचनं २५:१२) त्याच प्रकारे, देव इस्राएल राष्ट्राशी ज्या प्रकारे वागला त्याची तुलना त्याने अशा पतीशी केली जो आपल्या वधूला बांगड्या, हार आणि कानातल्या दागिन्यांनी सजवतो. असं म्हटलंय की या अलंकारांमुळे ते राष्ट्र ‘अतिशय देखणं आणि सुंदर’ बनलं.—यहेज्केल १६:११-१३.
मेकअप आणि दागिन्यांबद्दलचे गैरसमज
गैरसमज: १ पेत्र ३:३ मध्ये बायबल ‘केशरचना करायची आणि सोन्याचे दागिने’ घालायची मनाई करतं.
खरी माहिती: संदर्भ लक्षात घेतला तर हे स्पष्ट होतं, की चांगलं दिसणं किंवा स्वतःला सजवणं यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त महत्त्वाचं आहे, या गोष्टीवर इथे जोर देण्यात आलाय. (१ पेत्र ३:३-६) अशा प्रकारची तुलना बायबलमध्ये इतर ठिकाणीसुद्धा करण्यात आली आहे.—१ शमुवेल १६:७; नीतिवचनं ११:२२; ३१:३०; १ तीमथ्य २:९, १०.
गैरसमज: दुष्ट राणी ईजबेलने डोळे रंगवले होते किंवा “डोळ्यांत सुरमा” घातला होता म्हणून मेकअप करणं चुकीचं आहे.—२ राजे ९:३०, तळटीप.
खरी माहिती: ईजबेल राणीला तिच्या दिसण्यामुळे नाही तर भूतविद्येमुळे आणि खून केल्यामुळे शिक्षा देण्यात आली होती.—२ राजे ९:७, २२, ३६, ३७.