‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करण्याचा’ काय अर्थ होतो?
बायबलचं उत्तर
बायबलमध्ये “आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा” ही आज्ञा बऱ्याचदा वाचायला मिळते. (निर्गम २०:१२; अनुवाद ५:१६; मत्तय १५:४; इफिसकर ६:२, ३) या आज्ञेमध्ये चार मुख्य गोष्टी करणं सामील आहे.
१. त्यांची कदर करणं. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असेल, तर आपल्याला त्यांची कदर करता येईल. त्यांच्या मार्गदर्शनाला अनमोल समजून तुम्ही कदर दाखवू शकतो. (नीतिवचनं ७:१, २; २३:२६) आपल्या आईवडिलांमुळे आपला “गौरव” होतो या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्याकडे पाहावं, असं बायबल प्रोत्साहन देतं. दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे.—नीतिवचनं १७:६.
२. त्यांचा अधिकार मान्य करा. तुम्ही लहान असता तेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या अधिकाराखाली असता. कारण देवाने तो अधिकार त्यांना दिलाय हे तुम्ही ओळखता आणि त्यांचा आदर करता. बायबल कलस्सैकर ३:२० मध्ये लहान मुलांना सांगतं: “सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.” येशू लहान होता तेव्हा तोसुद्धा त्याच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला.—लूक २:५१.
३. त्यांचा आदर करा. (लेवीय १९:३; इब्री लोकांना १२:९) तुम्ही काय बोलता आणि कशा प्रकारे बोलता याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. काही आईवडील कधीकधी आपल्या मुलांशी वाईट वागतात. त्यामुळे मुलांना त्यांचा आदर करणं कठीण जातं. असं असलं तरी, त्यांनी आईवडिलांशी उद्धटपणे बोलून नये किंवा वाईट वागू नये. (नीतिवचनं ३०:१७) बायबल सांगतं, की आईवडिलांशी अपमानास्पद बोलणं हा गंभीर गुन्हा आहे.—मत्तय १५:४.
४. त्यांच्या गरजा पुरवा. तुमच्या आईवडिलांचं वय झाल्यावर त्यांना मदतीची गरज पडू शकते. तेव्हा त्यांना लागत असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत, याची खातरी करून तुम्ही त्यांचा आदर करू शकता. (१ तीमथ्य ५:४, ८) येशूनेही आपल्या मृत्यूच्या आधी त्याच्या आईची काळजी घेण्याची व्यवस्था केली.—योहान १९:२५-२७.
आईवडिलांचा आदर करण्याबाबतीत असलेले गैरसमज
गैरसमज: तुम्ही आईवडिलांना तुमच्या वैवाहिक जीवनावर नियंत्रण करू दिलं, तरच तुम्ही त्यांचा आदर करताय असं दिसून येईल.
खरी माहिती: बायबल शिकवतं, की कुटुंबातल्या इतर नात्यांपेक्षा लग्नाचं नातं महत्त्वाचं असतं. त्यात एका ठिकाणी म्हणजे उत्पत्ती २:२४ मध्ये म्हटलंय: “माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील.” (मत्तय १९:४, ५) हे खरंय, की नवरा-बायकोला आपल्या आईवडिलांच्या किंवा सासू-सासऱ्यांच्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो. (नीतिवचनं २३:२२) असं असलं तरी, आपण आपल्या नातेवाइकांना आपल्या संसारात कितपत लुडबुड करू द्यायची हे ते ठरवू शकतात.—मत्तय १९:६.
गैरसमज: आईवडिलांचा अधिकार मोठा आहे.
खरी माहिती: देवाने कुटुंबात आईवडिलांना अधिकार दिला असला, तरी मानवी अधिकारांना सीमा असते. ते कधीच देवाच्या अधिकारापेक्षा वरचढ नसतात. जसं की, येशूच्या काळातल्या उच्च न्यायालयाने त्याच्या शिष्यांना देवाची आज्ञा मोडायचा आदेश दिला, तेव्हा त्यांनी असं म्हटलं: “आम्ही माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे.” (प्रेषितांची कार्यं ५:२७-२९) त्याचप्रकारे, मुलंही “देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत” राहतात. म्हणजे ते देवाच्या विरोधात नसलेल्या आईवडिलांच्या सगळ्या आज्ञा पाळतात.—इफिसकर ६:१.
गैरसमज: तुम्हाला आईवडिलांचा आदर करायचा असेल, तर तुमचे आणि त्यांचे धार्मिक विश्वास सारखेच असले पाहिजेत.
खरी माहिती: आपल्याला जे शिकवलं जातं ते खरंय का, हे तपासून पाहण्याचं प्रोत्साहन बायबल आपल्याला देतं. (प्रेषितांची कार्यं १७:११; १ योहान ४:१) असं करणारी व्यक्ती कदाचित आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळं काहीतरी मानायचं निवडेल. बायबलमध्ये अब्राहाम, रूथ आणि प्रेषित पौल यांसारख्या देवाच्या काही विश्वासू सेवकांबद्दल सांगितलंय. त्यांचा धार्मिक विश्वास त्यांच्या आईवडिलांपेक्षा वेगळा होता.—यहोशवा २४:२, १४, १५; रूथ १:१५, १६; गलतीकर १:१४-१६, २२-२४.
गैरसमज: तुम्हाला आईवडिलांचा आदर करायचा असेल, तर तुम्ही पूर्वजांसाठी असलेल्या रितीरिवाजात भाग घेतला पाहिजे.
खरी माहिती: बायबल म्हणतं: “तू फक्त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि फक्त त्याचीच पवित्र सेवा कर.” (लूक ४:८) जी व्यक्ती आपल्या पूर्वजांची उपासना करते ती देवाला आवडत नाही. बायबल असंसुद्धा सांगतं, की “मेलेल्यांना तर काहीच माहीत नसतं.” त्यामुळे आपण त्यांना देत असलेल्या श्रद्धांजलीशी त्यांना काही घेणंदेणं नसतं. तसंच, ते आपल्याला मदत करू शकत नाहीत किंवा कुठली इजाही पोचवू शकत नाहीत.—उपदेशक ९:५, १०; यशया ८:१९.