येशूकडून शिका
संपूर्ण जगात लवकरच शांती असेल
सगळीकडे शांती असावी आणि आपण शांतीपूर्ण वातावरणात राहावं असं सर्वांनाच वाटतं. म्हणूनच जर आपण इतिहासाची पानं उलटून पाहिली तर आपल्याला दिसून येतं की जगात जिथे अशांतता होती, तिथे शांती आणण्यासाठी जागतिक नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. कधीकधी त्यांच्या या प्रयत्नांना काही काळासाठी थोडंफार यश मिळालंही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, तिथे पुन्हा अशांतता, लढाया आणि संघर्ष सुरू झाले. मग, संपूर्ण जगात कधी खरंच शांती असेल का?
येशू काय करणार आहे
संपूर्ण जगात शांती आणण्यासाठी येशू लवकरच काय करणार आहे हे बायबल आपल्याला सांगतं
“[येशूला] शांतीचा राजकुमार म्हटलं जाईल. त्याचं शासन सतत वाढत जाईल आणि शांतीचा कधीही अंत होणार नाही.” (यशया ९:६, ७) देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू संपूर्ण जगात शांती आणेल आणि ती कायम टिकून राहील.
“साहाय्यासाठी हाक मारणाऱ्या गरिबांची . . . आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल.” (स्तोत्र ७२:१२-१४) येशू आपल्या अधिकाराचा वापर करून खरा न्याय करेल आणि सर्वांना समान वागणूक देईल. तसंच, तो सर्व युद्धं, हिंसा, संघर्ष आणि दुःख कायमचं काढून टाकेल.
“यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही, आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.” (यशया २:४) येशूच्या शासनाखाली, सर्व लोक एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकतील. कोणीही भांडणं, लढाई किंवा युद्ध करणार नाही.
येशू संपूर्ण जगात शांती आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी कशा करणार आहे याबद्दल आणखी शिकून घेण्यासाठी आणि यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल हे माहीत करून घेण्यासाठी “देवाचं राज्य काय आहे?” हा व्हिडिओ पाहा.
येशूने काय शिकवलं
येशूच्या शिकवणींमुळे आजही लाखो लोकांना शांतीने राहायला मदत होत आहे. आपल्या डोंगरावच्या प्रवचनात येशूने शांतीने जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतील अशी तत्त्वं शिकवली. त्यांतली काही उदाहरणं पाहू.
“जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात ते सुखी आहेत.” (मत्तय ५:९) येशूने आपल्या शिष्यांना फक्त भांडणतंट्यांपासून दूर राहायलाच शिकवलं नाही, तर शांती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायलाही शिकवलं.
“आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.” (मत्तय ५:२३, २४) एकमेकांसोबत काही वाद असतील तर ते लवकरात लवकर मिटवावेत असं येशूने प्रोत्साहन दिलं. देवासोबत आपल्याला चांगलं नातं जोडायचं असेल तर एकमेकांसोबत शांतीने राहणं खूप महत्त्वाचं आहे असं त्याने शिकवलं.
“तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढायचं सोडून द्या.” (मत्तय ७:१) इतरांचा आपण कठोरपणे किंवा ढोंगीपणे न्याय करू नये. ज्या गोष्टी आपण स्वतः करणार नाही, त्यांची इतरांकडून अपेक्षा करू नये असं येशूने शिकवलं. कारण, अशा वृत्तीमुळेच भांडणतंटे वाढतात. याउलट, इतरांचे दोष काढण्याऐवजी आपण इतरांच्या चुका “क्षमा करत” राहाव्यात असं येशूने शिकवलं.—लूक ६:३७.
येशूच्या या शिकवणी जगभरातले लाखो लोक आपल्या जीवनात लागू करत आहेत. ज्या ठिकाणी भेदभाव आणि मानवी संघर्ष सुरू आहेत, अगदी अशा ठिकाणीही अनेक लोक येशूच्या शिकवणींमुळे भांडणतंटे न करता वाद सोडवायला, एकमेकांना क्षमा करायला आणि इतरजण कसंही वागले तरी त्यांच्याशी प्रेमाने वागायला शिकत आहेत.
येशूच्या शिकवणींमुळे लोकांना कसा फायदा झाला याची काही उदाहरणं पाहण्यासाठी हा लेख वाचा “युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता.”