येशूकडून शिका
‘तुम्ही लढायांचा आवाज ऐकाल’
“मी जवळपास ६० वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करतोय आणि आजपर्यंत जगभरातल्या ४० पेक्षा जास्त लढाया आणि युद्धग्रस्त भागांत मी गेलोय. मी शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांचे आपसातले तणाव शीगेला पोहोचलेले पाहिलेत आणि ते अचानक मावळलेलेसुद्धा पाहिलेत. पण आजपर्यंत मी २०२५ सारखं तणावांनी भरलेलं वर्ष कधीही पाहिलं नाही. यामागचं एक कारण म्हणजे, या वर्षी अनेक मोठी युद्धं झाली. इतकंच नाही, तर या युद्धांमुळे जगभरातल्या राजकीय घडामोडींवर आणि अनेक देशांवर याचा मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम होऊ शकतो.”—जॉन सिम्पसन, BBC.
जगभरात होत असलेल्या अनेक लढायांमुळे लोकांना पुढे काय होईल याची चिंता आणि भीती वाटते. परिस्थिती कधी सुधारेल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. पण याबद्दल येशूने काय सांगितलं?
येशूने काय शिकवलं
आज जगात जी परिस्थिती आहे त्याबद्दल येशूने आधीच सांगितलं होतं. त्याने आपल्या शिष्यांना सावध करताना असं म्हटलं: “तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल.”—मत्तय २४:६.
अनेक ठिकाणी लढाया आणि हिंसक संघर्ष होत असलेला पाहून आपल्याला चिंता आणि भीती वाटत असली, तरी भविष्याकडे आशेने पाहण्यासाठी आपल्याकडे एक चांगंल कारणसुद्धा आहे. ते कोणतं? येशूने शिकवलं की लढाया, मोठमोठी युद्धं, त्यासोबतच घडत असलेल्या इतर घटना आणि लोकांची बदलत चाललेली मनोवृत्ती हे सगळं या वाईट “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह” आहे. (मत्तय २४:३; लूक २१:७) याचा अर्थ, भविष्यात लवकरच येशू सगळी युद्धं आणि लढाया थांबवणार आहे. ते कसं?
येशू काय करणार आहे
भविष्यात लवकरच येशू, देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, ‘सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत’ करणार आहे.—स्तोत्र ४६:९.
या सुदंर भविष्याबद्दल आणि ते नेमकं कसं असेल याबद्दल आणखी शिकून घेण्यासाठी, आणि याचा तुम्हाला कसा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी “युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?” हा लेख वाचा.