जीवन कथा
यहोवा मला एक चांगली व्यक्ती बनायला शिकवत आलाय
अमेरिकेतल्या बेथेलमधल्या छापखान्यातला माझा पहिला दिवस मी कधीच विसरू शकत नाही. कारखान्यात पाय ठेवताच, तिथल्या रात्रंदिवस चालणाऱ्या मशीन पाहून आणि त्यांचा होणारा मोठा आवाज ऐकून मी अगदी भारावून गेलो! जिथे पाहवं तिथे कागदांचे तुकडे पसरले होते, अक्षरशः हवेतसुद्धा! संपूर्ण कारखान्यात रसायनांचा उग्र वास येत होता.
मी तिथे बऱ्याच गोष्टी पाहिल्या. पण, तिथे काम करणाऱ्या भाऊबहिणींनी माझ्या मनावर खोलवर छाप पाडली. तिथले तरुण भाऊबहीण दररोज तेचतेच काम करायचे आणि ते काम कोणाच्या नजरेत येईल असं नव्हतं. तरीही ते सगळे खूप आनंदी आणि समाधानी दिसायचे. यहोवाची सेवा नम्रपणे कशी करावी हे मी त्यांच्याकडून शिकलो.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून यहोवा मला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी मदत करत आलाय. मी आधी बौद्ध धर्म मानायचो, पण तरीही मी सत्याच्या शोधात होतो. सत्य मला कसं सापडलं याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो.
लहान वयात देवाच्या शोधात
माझा जन्म अमेरिकेच्या शिकागो शहरात झाला. मी तिथेच लहनाचा मोठा झालो. मला तीन लहान भावंडं आहेत. एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून माझे आईवडील जपानवरून अमेरिकेला राहायला आले होते. आम्हाला सगळ्यात चांगलं शिक्षण मिळावं आणि आम्ही जीवनात यशस्वी व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
माझे आईवडील कट्टर बौद्ध होते. माझी आई ज्या घरात लहानाची मोठी झाली त्या घरात एक मंदिर होतं. माझे आजोबा आणि दोन मामा भिक्षू होते. या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासूनच माझ्या जीवनावर खूप प्रभाव पडला. मी शाळेतून घरी येताच सगळ्यात आधी घरातल्या मूर्तीसमोर धूप जाळायचो आणि तिला तांदूळ आणि पाणी वाहायचो. दर रविवारी आम्ही एका मोठ्या मंदिरात जायचो आणि तिथल्या सोन्याने मढलेल्या विशाल मूर्तीसमोर जप करायचो.
मला आठवतंय, मी जवळपास सात वर्षांचा असताना आमच्या घरातल्या मूर्तीकडे एकटक पाहून एकदा असा विचार करत होतो, ‘मेल्यानंतर माझं काय होईल?’ बौद्ध धर्मात मी शिकलो होतो, की मेल्यानंतर माझा आत्मा कुठे न् कुठे जिवंत असेल. मला जाणीव झाली, की माझं जीवन एक दिवस अचानक संपेल. मी आत्मा म्हणून जरी जिवंत असलो, तरी आज मला मानव म्हणून जे करता येतं ते सगळं करता येणार नाही. त्यामुळे मी खूप उदास झालो आणि मला एकदम लाचार असल्यासारखं वाटू लागलं.
जवळपास १५ वर्षांचा झाल्यावर बौद्ध धर्माचे रितीरिवाज मला व्यर्थ वाटू लागले. मला वाटू लागलं, की माझ्या जीवनात कशाचीतरी कमी आहे. (मत्त. ५:३) मला मनात कुठेतरी माहीत होतं, की एक सर्वशक्तिमान आणि जिवंत देव नक्कीच आहे. मला त्याला जाणून घ्यायचं होतं. मी विचार केला, की कदाचित बायबलमध्ये मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणून मी बायबलची एक वापरलेली प्रत विकत घेतली आणि तेही एका बौद्ध मेळाव्यात!
माझा अभ्यास घेणाऱ्या भाऊ विल्सन बाशू यांच्यासोबत
एकदा असं झालं, की मी माझ्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेलो होतो. रस्त्यात माझी भेट विल्सन बाशू नावाच्या एका भावाशी झाली. त्यांनी मला विचारलं: “भविष्यात देव काय करणार आहे हे तुला माहीत आहे का?” या प्रश्नामुळे आमची बायबलवर बरीच चर्चा झाली. त्यांनी मला प्रकटीकरण १७:१ वाचून दाखवलं आणि विचारलं: “मोठी वेश्या ज्या ‘पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांवर’ बसली आहे ते पाणी कशाला सूचित करतं?” मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मग त्यांनी मला १५ वं वचन दाखवलं. त्यात सांगितलंय, की पाणी लोकांना सूचित करतं. यहोवाचे साक्षीदार बायबलमधल्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधूनच देतात हे पाहून मला खूप कौतुक वाटलं. मग निघताना त्यांनी मला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक दिलं. या निळ्या पुस्तकामुळे माझं जीवनच बदलून गेलं! त्या वेळी मी फक्त १७ वर्षांचा होतो.
या घटनेच्या दहा दिवसांनी मी पहिल्यांदा सभेला गेलो. तिथे भाऊबहिणींनी माझं खूप प्रेमाने स्वागत केलं. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. त्या दिवसानंतर मी सभेला जायचं कधीच सोडलं नाही. नंतर, भाऊ विल्सनने माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. मला बायबलवर चर्चा करायला इतकं आवडायचं, की कधीकधी आम्ही आठ-आठ तास चर्चा करायचो. यामुळे माझ्या आईवडिलांना माझी खूप चिंता वाटू लागली. ते माझ्यावर बायबल अभ्यास बंद करायचा दबाव टाकू लागले. पण मी जितका जास्त अभ्यास करू लागलो, तितकी जास्त मला खातरी पटली की हेच सत्य आहे. मग १९८३ ला माझा बाप्तिस्मा झाला.
युनिव्हर्सिटीचं शिक्षण सोडून पायनियर सेवा
माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बनण्याचं शिक्षण घेत होतो. मला हे शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या आईवडिलांनी खूप त्याग केले होते. मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं असतं, पण मला यहोवाला सगळ्यात चांगलं ते द्यायचं होतं आणि पूर्ण वेळची सेवा करायची होती.
पण माझ्या वडिलांनी मला अशी ताकीद दिली होती, “तू शिक्षण घ्यायचं सोडलं तर मी तुला घरातून हाकलून लावीन!” त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. काय करावं हे मला सुचत नव्हतं. माझं माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम होतं आणि मला त्यांना दुखवायचं नव्हतं. मी बऱ्याचदा रात्री उशीरा कॉलेजच्या मैदानात जायचो आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहून यहोवाला असं म्हणायचो, “यहोवा प्लीज मला योग्य निर्णय घ्यायला मदत कर.” शेवटी मी शिक्षण सोडायचं ठरवलं. आणि माझ्या वडिलांनी मला घराबहेर काढलं. मी लगेच भाऊ विल्सनला फोन केला आणि त्यांना झालेलं सगळं काही सांगितलं. त्यांनी मला त्यांच्या घरी राहायला बोलावलं. मी माझं सगळं सामान एका बॅगेत भरलं आणि बस पकडून त्यांच्या घराकडे निघालो. त्या वेळी माझ्या मनाची घालमेल किती कमी झाली हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मला जाणवलं की मी योग्य निर्णय घेतलाय.
मला पिंजऱ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटलं! मला पूर्ण वेळची सेवा करण्यापासून रोखणारं आता कोणीच नव्हतं. मी १९८४ मध्ये पायनियर सेवा सुरू केली.
मी पायनियर सेवा करत असताना, यहोवाने मला चिकाटीसारखे बरेच चांगले गुण वाढवायला मदत केली आहे. एकदा मला प्रचाराला जावंसं वाटत नव्हतं. त्यातल्या त्यात दुपारी माझ्यासोबत प्रचाराला जायलाही कोणीच नव्हतं, म्हणून मी खूप निराश होतो. पण तरी मी कसाबसा गेलो. दोन तास प्रचार केल्यानंतर मी एका बिल्डींगमध्ये शेवटचं घर करायचं ठरवलं. मी खूप थकलो होतो. मला एकटं वाटत होतं आणि ढगही दाटून आले होते. आता घरी गेलेलंच बरं असं मला वाटलं. पण तरी मी तिसऱ्या मजल्यावर गेलो. तिथे मला एक तरुण मुलगा दिसला. मला वाटलं, ‘हा काय माझं ऐकणार?’ पण मी चुकीचा विचार करत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलाने अभ्यास सुरू केला. आणि आज तो माझा आध्यात्मिक भाऊ आहे.
ब्रुकलिन बेथेलमध्ये शिकलेल्या गोष्टी
भाऊ विल्सनसोबत दोन वर्षं राहिल्यावर मला १९८५ साली ब्रुकलिन बेथेलला बोलावण्यात आलं. आधी सांगितल्याप्रमाणे, मला छापखान्यात काम करायला सांगण्यात आलं. एकदा मशीनवर काम करत असताना माझ्याकडून एक चूक झाली आणि शेकडो पुस्तकांचे कव्हर खराब झाले. याबद्दल भावांनी मला माझ्या पर्यवेक्षकाशी बोलायला सांगितलं. हे सगळं का घडलं याची मी त्याला बरीच कारणं सांगू लागलो. पण मी एक गोष्ट विसरलो; मी माफी मागितली नाही. त्या भावाने मला प्रेमळपणे असं म्हटलं: “चूक कबूल करणं केव्हाही चांगलं असतं.” त्या दिवशी मी एक महत्त्वाचा धडा शिकलो, तो म्हणजे चूक कबूल करून माफी मागणं खूप गरजेचं आहे.
ब्रुकलिन बेथेल बघायला आलेल्या भाऊबहिणींना छापखाना दाखवताना
बेथेलमध्ये बरीच वर्षं काम केलेल्या भाऊबहिणींकडून मला इतरांची सेवा करण्याबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. एकदा नियमन मंडळाचे भाऊ मिल्टन हेन्शल आमच्यासोबत दुपारी जेवायला बसले होते. त्या दिवशी डायनिंग रूम खचाखच भरलं होतं. त्यामुळे जेवण वाढणाऱ्या भावांची खूप धांदल उडाली होती. आम्ही सगळी तरुण मुलं टेबलवर बसून, जेवण वाढणारे भाऊ किती हळूहळू काम करत आहेत अशी कुजबुज करत होतो. पण भाऊ हेन्शल एकही शब्द न बोलता अचानक उठले आणि त्या भावांना जेवण वाढायला मदत करू लागले. भाऊ हेन्शलला पाहून मला येशूची आठवण झाली. त्यानेही त्याच्या प्रेषितांची अशीच सेवा केली होती. त्यांनी जे केलं ते माझ्या मनात खोलवर रुजलं. मी ते कधीच विसरू शकणार नाही.—योहा. १३:३-५.
“तू जपानी भाषा शिकली पाहिजेस!”
बहिण मिचिको ओडा आणि त्यांच्या पतीसोबत
१९८७ मध्ये मी जपानला गेलो होतो. तिथल्या भाऊबहिणींमधला आवेश आणि नम्रता बघून मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. मला त्यांना मदत करायची खूप इच्छा होती. पण मला जपानी भाषा येत नव्हती. मिचिको ओडा या बेथेलमधल्या बहिणीने मला अगदी थेटपणे म्हटलं: “तू जपानी भाषा शिकली पाहिजेस!” आणि मी तेच केलं. ती बहीण मला जे बोलली त्याचा पुढे माझ्यावर किती परिणाम होईल, हे मला त्या वेळी माहीत नव्हतं.
काही महिन्यांनतर, मी न्यूयॉर्कमधल्या जपानी भाषेच्या मंडळीत गेलो. जपानी भाषा शिकल्यामुळे मला बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाची सेवा करायची संधी मिळाली. १९८९ मध्ये मी कॅलिफोर्नियात झालेल्या जपानी भाषेच्या अधिवेशनाला पहिल्यांदाच गेलो होतो. त्या अधिवेशनात झालेल्या नाटकात मिवाको ओनामी नावाच्या पायनियर बहिणीने काम केलं होतं. तिला बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो!
१९९२ मध्ये माझं आणि मिवाकोचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही ब्रुकलिन बेथेलमध्ये सोबत मिळून सेवा करू लागलो. मिवाको इतरांचा खूप विचार करते, लोकांशी प्रेमळपणे वागते. ती नेहमी दुसऱ्यांना मदत करायला तयार असते. मी तिच्याकडून इतरांशी आणखी दयाळूपणे वागायला शिकलो. खरंच, ती माझ्यासाठी यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहे! तिच्यामुळे माझं जीवन खूप आनंदी झालंय.
आमच्या लग्नाच्या दिवशी
जपान शाखेत आणि खास पायनियर म्हणून सेवा करताना
काही काळाने मिवाकोचे आईवडील खूप आजारी पडले. ते जपानमध्ये राहायचे. आम्हाला त्यांची काळजी घेता यावी आणि त्यांच्याजवळ राहता यावं, म्हणून भावांनी आम्हाला जपान शाखेला जायची परवानगी दिली. मग १९९९ मध्ये आम्ही तिथे गेलो.
तिथल्या बेथेलमधल्या भाऊबहिणींनी आम्हाला लगेच आपलंसं करून घेतलं आणि आम्हीही तिथे पटकन रुळलो. तिथल्या भाऊबहिणींकडून मला बरंच काही शिकता आलं. ते खूप उदार मनाचे होते आणि पाहुणचार करायला नेहमी तयार असायचे. कामाच्या बाबतीत जपानचे लोक कधीच टंगळमंगळ करत नाहीत आणि कामावरून त्यांचं लक्ष कधीच भरकटू देत नाहीत. दुसऱ्यांसोबत एकत्र मिळून काम करणं त्यांना चांगलं जमतं. कारण त्यांच्या संस्कृतीत एकटं काम करण्यापेक्षा सगळ्यांसोबत मिळूनमिसळून काम करण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. त्यांच्या या उदाहरणामुळे मी नम्रपणे इतरांसोबत काम करायला शिकलोय. यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात माझा वाटा कितीही छोटा असला, तरी त्याबद्दल कदर बाळगायलाही मला मदत झाली आहे.
पण मी अमेरिकेत लहानाचा मोठा झाल्यामुळे, इथले लोक एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट पद्धतीने का करतात हे मला काही वेळा समजायचं नाही. मला धीर दाखवायला आणि भावनेच्या भरात येऊन एखादी गोष्ट न करायला शिकून घ्यावं लागलं. कालांतराने मला माझा दृष्टिकोन बदलता आला. मी शिकलो, की यहोवाच्या संघटनेने पुरवलेलं मार्गदर्शन आपण पाळलं, तर यहोवा कोणत्याही निर्णयावर आशीर्वाद देऊ शकतो. शेवटी आपल्या कामात आपल्याला यश मिळवून देणारा तोच आहे.
मला बेथेलमध्ये जे शिकायला मिळालं त्याचा विचार करून मला मोशेच्या उदाहरणाची आठवण होते. ४० वर्षं मेंढपाळ म्हणून काम करत असताना, यहोवाने त्याला नम्र व्हायला शिकवलं. मोशेसारखं माझंही बरंच शिक्षण झालं होतं. माझ्या शिक्षणामुळे माझ्या मनात कुठेतरी गर्वाची भावना होती. मी स्वतःवर जास्त भरवसा ठेवू लागलो होतो. पण बेथेलमध्ये मी नम्र राहायला आणि यहोवावर अवलंबून राहायला शिकलो. यहोवाने जसं मोशेला धीराने शिकवलं, तसंच तो इतक्या वर्षांत मलाही शिकवत आलाय.
जपान शाखेत काम करताना
आम्ही जवळजवळ २४ वर्षं मिवाकोच्या आईवडिलांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेतली. त्या वर्षांदरम्यान आम्हाला ते बऱ्याचदा फोन करायचे. त्यांच्या तब्येतीबद्दल ऐकून आम्हाला खूप चिंता वाटायची आणि त्यांच्यासाठी आम्हाला बऱ्याचदा हॉस्पिटलला फेऱ्या माराव्या लागायच्या. मिवाकोची आई मसाको यांची तब्येत इतकी खालावत गेली, की त्यांना नीट चालणंही शक्य नव्हतं. सभांना आणि प्रचाराला जाणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. शेवटीशेवटी तर त्यांना व्हीलचेअर वापरावी लागायची. असं असलं तरी, या संपूर्ण काळादरम्यान यहोवावरचं त्यांचं प्रेम कधीच आटलं नाही. त्या इतरांना सत्याबद्दल सांगायच्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असायचं. त्या यहोवाच्या सेवेत कधीच कमी पडल्या नाहीत. परिस्थिती कशीही असली तरी, त्या नेहमी आनंदी आणि समाधानी राहायच्या. त्यांच्या उदाहरणामुळे मला खूप शिकायला मिळालं.
मिवाकोसोबत ओकीनावामध्ये प्रचार करत असताना
२०२४ मध्ये आमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळालं. ३० पेक्षा जास्त वर्षं बेथेलमध्ये सेवा केल्यानंतर आम्हाला खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं. आमची ही नवीन नेमणूक ओकीनावा या बेटावर होती. तिथे जवळपास असलेल्या लष्करी छावण्यांमधल्या कुटुंबांना प्रचार करायची आम्हाला संधी मिळाली. बेथेलमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणामुळे ही नवीन नेमणूक स्वीकारायला आम्हाला सोपं गेलं. जसं की, वेळेचा चांगला उपयोग करता यावा, म्हणून आम्ही दिवसभरात कायकाय करायचं हे आधीच ठरवतो. यामुळे आम्हाला प्रचारावर लक्ष द्यायला आणि मेहनत घ्यायला मदत होते. आम्ही आज बऱ्याच जणांचा बायबल अभ्यास घेतो. ते आमच्या कुटुंबासारखे झाले आहेत. हे सगळं यहोवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झालंय. लोकांवर प्रेम करणं किती गरजेचं आहे हे आम्हाला आता आधीपेक्षा जास्त समजतंय. मिवाको आणि मी या नेमणुकीसाठी दररोज यहोवाचे आभार मानतो.
यहोवाकडून कायम शिकत राहण्याचा निर्धार
माझे घरचे आज मला यहोवाची सेवा करण्यापासून रोखत नसले, तरी ते अजून सत्यात आलेले नाहीत. पण येशूने सांगितलं होतं, की जे त्याच्यासाठी आपलं घरदार सोडतील त्यांना शंभरपटीने जास्त भाऊबहीण मिळतील. (मार्क १०:२९, ३०) आणि माझ्या बाबतीत हे अगदी खरं ठरलंय. माझं कुटुंब जगभरात पसरलेलं आहे आणि त्यात किती लोक आहेत हे मला मोजताही येणार नाही. इतक्या वर्षांत त्यांच्याकडून मिळालेलं प्रेम आणि त्यांनी घेतलेली काळजी मी कधीच विसरू शकणार नाही.
ते निळं पुस्तक आजही माझ्याजवळ आहे. यहोवाने मला त्याच्यापर्यंत पोहोचायला कशी मदत केली याची मला या पुस्तकाकडे पाहून नेहमी आठवण होते. (१ इति. २८:९) यहोवाकडून पुढेही शिकत राहायचा आणि इतरांना सर्वकाळाचं जीवन देणारं सत्य सांगायचा मी निश्चय केलाय!