२८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर, २०२६
गीत ७९ त्यांना टिकून राहायला मदत कर!
इतरांना यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखायला मदत करा
“सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांनी एकाच खऱ्या देवाला, . . . ओळखणं गरजेचं आहे.” —योहा. १७:३.
या लेखात:
तुमच्या बायबल विद्यार्थ्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकायला आणि आपण काय केल्याने तो खूश होतो किंवा दुःखी होतो हे समजून घ्यायला मदत कशी करता येईल ते पाहा.
१. तुमचा बायबल विद्यार्थी प्रगती करतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
तुमचा बायबल विद्यार्थी पहिल्यांदा सभेला येतो, उत्तर देतो, त्याच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगतो आणि कालांतराने आपलं जीवन यहोवाला समर्पित करायचा निर्णय घेतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच खूप आनंद होत असेल यात काही शंका नाही. जेव्हा आपला बायबल विद्यार्थी प्रगती करतो तेव्हा त्याचं सगळं श्रेय यहोवाला जातं. त्यामुळेच यहोवाने त्याला पावलोपावली प्रगती करायला कशी मदत केली आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण यहोवाची स्तुती करायला प्रवृत्त होतो.—१ करिंथ. ३:५-९; ३ योहा. ३, ४.
२. बायबल विद्यार्थ्यांसाठी यहोवाची काय इच्छा आहे? (१ तीमथ्य २:३, ४)
२ “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं” अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४ वाचा.) त्याची इच्छा आहे, की लोकांना त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल चांगल्या प्रकारे समजावं. (यिर्म. ९:२४) यासाठी त्यांनी सत्याचं अचूक ज्ञान घेणं गरजेचं आहे. “अचूक ज्ञान” घेण्याचा अर्थ यहोवाबद्दल फक्त माहिती गोळा करणं असा होत नाही. तर, एका बायबल विद्वानाने सांगितल्याप्रमाणे याचा अर्थ, शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जगणं असा होतो. त्यामुळे एखादा बायबल विद्यार्थी यहोवाबद्दल ज्ञान घेतो तेव्हा त्याला यहोवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायची प्रेरणा मिळते. तसंच, त्याला “सर्वकाळाचं जीवन” मिळवायची आशाही मिळते.—योहा. १७:३.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ आपल्याला यहोवाबद्दल इतरांना सांगायची खूप मोठी संधी मिळाली आहे. या कामात आपल्याला मदत व्हावी म्हणून आपण या लेखात पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करू: आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखणं का गरजेचं आहे? यहोवा कसा आहे हे आपण त्यांना कसं शिकवू शकतो? आणि शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जगायला आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
बायबल विद्यार्थ्याला यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखायला मदत करा
४. मार्क १२:३० प्रमाणे, बायबल अभ्यास घ्यायचा आपला मुख्य उद्देश काय आहे?
४ येशूने सांगितलं होतं, की यहोवावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करणं ही सगळ्यात महत्त्वाची आज्ञा आहे. (मार्क १२:३० वाचा.) यहोवावरचं प्रेम वाढवण्यासाठी बायबल विद्यार्थ्याने यहोवाला ओळखणं खूप गरजेचं आहे. आपल्या बायबल विद्यार्थ्याने आपल्यासाठी, संघटनेसाठी किंवा त्याला एखादी बायबलची शिकवण आवडते यासाठी नाही, तर यहोवाच्या प्रेमापोटी समर्पण करावं अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपण बायबल अभ्यास घेतो, तेव्हा आपला मुख्य उद्देश आपल्या विद्यार्थ्याला यहोवाला ओळखायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत करणं हा असतो.
५. यहोवावरच्या प्रेमामुळे बायबल विद्यार्थी काय करायला प्रवृत्त होईल?
५ प्रेमाचा आणि आज्ञा पाळण्याचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा बायबल विद्यार्थी यहोवाला ओळखू लागतो आणि त्याच्यावर प्रेम करू लागतो, तेव्हा तो त्याच्या आज्ञा पाळायला प्रवृत्त होतो. येशूने म्हटलं होतं: “माझं पित्यावर प्रेम आहे, हे जगाला कळावं म्हणून पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करतोय.” (योहा. १४:३१) त्याचप्रमाणे, आपल्या बायबल विद्यार्थ्याचं कुठल्याही गोष्टीपेक्षा जर यहोवावर जास्त प्रेम असेल तर तो त्याच्या आज्ञा पाळायला आणि त्याला जडून राहायला प्रवृत्त होईल.—१ योहा. ५:३.
६. यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळे बायबल विद्यार्थ्याला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत होईल? उदाहरण द्या.
६ बायबल विद्यार्थी जेव्हा यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेतो, तेव्हा त्याला बऱ्याचदा चांगले निर्णय घ्यायला मदत होते. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. गाडी कशी चालवायची याची फक्त माहिती घेऊन आपल्याला गाडी चालवता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला गाडी चालवायचा सराव करावा लागेल. आपण जितका जास्त सराव करू तितकं जास्त वेगवेगळ्या ठिकाणी गाडी कशी चालवायची हे आपल्याला समजेल. त्याच प्रकारे, फक्त अभ्यास करून बायबल विद्यार्थ्याला यहोवाबद्दल जाणून घेता येणार नाही. तर यहोवाच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतल्यामुळे कसा फायदा होतो हे जेव्हा बायबल विद्यार्थी पाहील, तेव्हा त्याला यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखता येईल. आणि तो यहोवाला जितकं जास्त ओळखेल तितकं जास्त त्याला कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.
७. यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे योसेफला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली?
७ योसेफ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळेच पोटीफरच्या बायकोने त्याला तिच्यासोबत अनैतिक लैंगिक संबंध ठेवायची जबरदस्ती केली तेव्हा तो तिला नाही म्हणू शकला. लहानपणी योसेफने आदाम आणि हव्वा, तसंच अब्राहाम आणि सारा यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल. (उत्प. २:२४; २०:३, ६) त्यांच्या अहवालांवरून योसेफला समजलं असेल, की यहोवाचा लग्नाबद्दल आणि लैंगिक संबंधाबद्दल काय दृष्टिकोन आहे. योसेफ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळेच तो पोटीफरच्या बायकोला नकार देऊ शकला. त्याने म्हटलं: “इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?” (उत्प. ३९:७-९) यहोवाच्या नजरेत काय योग्य आणि काय अयोग्य हे योसेफला माहीत होतं. काय केल्याने यहोवाला वाईट वाटेल याचीही त्याला जाणीव होती. म्हणूनच तो योग्य निर्णय घेऊ शकला. त्याच प्रकारे, आपण जर आपल्या बायबल विद्यार्थ्याला यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखायला आणि त्याला काय आवडतं आणि काय नाही हे जाणून घ्यायला मदत केली, तर यहोवा खूश होईल असे निर्णय घ्यायला त्याला मदत होईल.
यहोवा कसा आहे हे बायबल विद्यार्थ्याला शिकवा
८. विद्यार्थ्याला यहोवाबद्दल शिकून घ्यायला तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा कसा वापर करू शकता?
८ तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला यहोवाबद्दल कसं शिकवू शकता? यहोवाने एकदा ईयोबला ५० पेक्षा जास्त प्रश्न विचारले. यामुळे त्याला यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायला मदत झाली. (ईयो. ३८:१–४१:३४) आपणही आपल्या बायबल विद्यार्थ्याला प्रश्न विचारले पाहिजेत. यहोवा कशा प्रकारची व्यक्ती आहे हे विद्यार्थ्याला समजावं म्हणून कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकात बरेच प्रश्न दिले आहेत. (“शिकवताना उपयोगी पडतील असे प्रश्न” ही चौकटसुद्धा पाहा.) त्यामुळे विद्यार्थ्याला शिकवताना हे प्रश्न न विसरता विचारा.
९-१०. (क) बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून बायबल विद्यार्थ्याला कशामुळे मदत होईल? (याकोब ५:११) (ख) बायबल अहवालातून यहोवाला काय आवडतं आणि काय नाही हे कसं दिसून येतं याचं एक उदाहरण द्या.
९ आपण सुरुवातीपासूनच विद्यार्थ्याला नियमितपणे बायबल वाचायचं प्रोत्साहन देऊ शकतो.a मग बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून आपण त्याला कशी मदत करू शकतो? प्रत्येक वेळी बायबल वाचताना तो अहवाल यहोवाने बायबलमध्ये का लिहून ठेवला असेल आणि त्यातून त्याचे कोणते गुण दिसून येतात, यावर विचार करायचं आपण त्याला प्रोत्साहन देऊ शकतो. शिष्य याकोबनेही ईयोबबद्दल सांगताना फक्त त्याच्या धीराच्या गुणाबद्दलच नाही, तर यहोवाच्या दया आणि करुणा या गुणांबद्दलही सांगितलं.—याकोब ५:११ वाचा.
१० यहोवाला काय आवडतं आणि काय नाही हे विद्यार्थ्याला बायबल वाचताना समजावं अशी आपली इच्छा आहे. कदाचित तुमचा विद्यार्थी तुम्हाला सांगेल की त्याने कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकात “बायबल वाचायला सुरुवात करा” हा तक्ता पाहिला आहे आणि ‘दानीएल सिंहाच्या गुहेत’ हा अहवाल वाचायचं ठरवलंय. अशा वेळी तुम्ही त्याला काही प्रश्नांवर विचार करायला लावू शकता: ‘यहोवाने दानीएलला का वाचवलं? कोणत्या गोष्टीमुळे यहोवाला आनंद होतो हे या अहवालातून कसं समजतं?’ (दानी. ६:१०, २२) तसंच, ‘दानीएलवर आरोप लावणाऱ्या माणसांचं पुढे काय झालं? काय केल्याने यहोवाला वाईट वाटतं हे या अहवालातून कसं समजतं?’ (दानी. ६:४, ५, २४) शेवटी या अहवालातून यहोवाच्या आणखी कोणत्या गुणांबद्दल शिकायला मिळतं यावरसुद्धा तो मनन करू शकतो.—दानी. ६:२६, २७.
११. बायबल अभ्यास ही यहोवाकडून मिळालेली भेट आहे हे विद्यार्थ्याला समजून घ्यायला आपण कशी मदत करू शकतो?
११ बायबलमधून शिकलेल्या गोष्टी फायद्याच्या आहेत हे आपल्या विद्यार्थ्याला जाणवतं तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. पण या सगळ्या गोष्टी आपला महान शिक्षक यहोवा याच्यामुळेच शक्य झाल्या आहेत याची आपण त्याला आठवण करून दिली पाहिजे. (यश. ३०:२०, २१) आपला विद्यार्थी कदाचित शिकत असलेल्या गोष्टींसाठी आपले आभार मानेल किंवा आपल्या शिकवण्याची पद्धत पाहून आपली स्तुती करेल. असं करणं चुकीचं नसलं, तरी सगळ्या गोष्टींचं श्रेय त्याने यहोवाला द्यावं असं आपण त्याला सांगितलं पाहिजे.
विद्यार्थ्याला शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जगायला मदत करा
१२-१३. एखादा बायबलचा अहवाल समजून घेणं विद्यार्थ्याला कठीण जातं तेव्हा यहोवाला जाणून घेतल्यामुळे त्याला कशी मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
१२ अचूक ज्ञानाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण शिकलेल्या गोष्टी लागू करणं गरजेचं आहे. मग आपण बायबल विद्यार्थ्याला शिकलेल्या गोष्टी लागू करायला कशी मदत करू शकतो? पहिलं म्हणजे, बायबल वाचताना एखादा अहवाल समजून घेणं विद्यार्थ्याला कठीण जात असेल, तर त्याला यहोवाबद्दल काय माहीत आहे हे आठवायचं त्याला प्रोत्साहन द्या. कदाचित, बायबल काळात यहोवाने काही लोकांना शिक्षा का दिली आणि काही लोकांना का वाचवलं हे समजून घ्यायला त्याला कठीण जात असेल. मग, अशा वेळी तुम्ही विद्यार्थ्याला योग्य विचार करायला कशी मदत करू शकता?
१३ विद्यार्थी आतापर्यंत यहोवाबद्दल जे काही शिकलाय त्याचा विचार करायला त्याला मदत करा. जसं की, यहोवासाठी जीवन किती मौल्यवान आहे? (२ पेत्र ३:९) आपण पापी असूनही आपल्याला वाचवण्यासाठी यहोवाने कायकाय केलंय? (इफिस. २:४, ५) चांगल्या लोकांना यहोवा शिक्षा होऊ देईल का? तसंच, वाईट लोकांना तो असंच सोडून देईल का? यावर विचार करायला त्याला मदत करा. (निर्ग. ३४:६, ७) काही वेळा बायबलमध्ये यहोवाने एखादी गोष्ट का केली याबद्दलची बारीकसारीक माहिती दिलेली नसते. पण, आपल्याला या माहितीची गरज नाही. कारण यहोवा कसा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला याची पूर्ण खातरी आहे की तो जे काही करतो ते योग्यच असतं.
बायबलचा एखादा अहवाल समजून घेणं विद्यार्थ्याला कठीण जात असेल, तर त्याला यहोवाबद्दल काय माहीत आहे हे आठवायचं त्याला प्रोत्साहन द्या (परिच्छेद १२-१३ पाहा)
१४. मंडळीतलं कोणीतरी तुमच्या विद्यार्थ्याचं मन दुखावतं, तेव्हा तुम्ही त्याला कशी मदत करू शकता?
१४ विद्यार्थ्याला शिकलेल्या गोष्टी लागू करायला मदत करण्यासाठी आणखी एका मार्गाचा विचार करा. समजा, तुमचा विद्यार्थी सभांना येऊ लागतो आणि मंडळीतलं कोणीतरी त्याचं मन दुखावतं. अशा वेळी, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला भाऊबहिणींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करू शकता. त्यांच्या प्रेमापोटी यहोवाने कोणता त्याग केलाय याचा त्याला विचार करायला लावा. (योहा. ३:१६) तसंच, आपल्यातली एकता यहोवासाठी किती महत्त्वाची आहे यावरही त्याला विचार करायला लावा. (स्तो. १३३:१) शिवाय, आपण मंडळीतली एकता टिकवून ठेवायला होईल ते सगळं करतो, तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे समजून घ्यायला त्याला मदत करा. (२ करिंथ. १३:११) आपण जेव्हा भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो आणि त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा यहोवाला किती आनंद होतो हे विद्यार्थ्याला शिकायला मदत करा.
१५-१६. (क) महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा बायबल विद्यार्थी येशूचं अनुकरण कसं करू शकतात? (योहान ८:२९) (ख) मॅरीॲनने तिच्या विद्यार्थीनीला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत केली? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ शेवटी, यहोवाबद्दल शिकलेल्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थ्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करा. यासाठी तुम्ही त्याला सगळ्यात आधी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला, “आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो?” हा ३५ वा धडा वाचायला लावू शकता. पण जर तुमच्या विद्यार्थ्याने प्रार्थना केली, बरंच संशोधन केलं तरी त्याला योग्य निर्णय घ्यायला कठीण जात असेल तर काय? कदाचित, त्या विषयावर असलेल्या बायबलच्या वेगवेगळ्या तत्त्वांमधून नेमकं कोणतं तत्त्व लागू करायचं हे त्याला समजत नसेल. अशा वेळी तुम्ही त्याला येशूच्या उदाहरणावर मनन करायला लावू शकता. येशूने निर्णय घेताना कोणती गोष्टी लक्षात ठेवली? त्याने म्हटलं: “मी नेहमी [माझ्या पित्याला] आवडणाऱ्या गोष्टी करतो.” (योहान ८:२९ वाचा.) तुमच्या विद्यार्थ्याला या प्रश्नावर विचार करायला लावा: ‘मी जे संशोधन केलंय आणि यहोवाबद्दल मला जे माहीत आहे त्यावरून मला काय समजतं? कोणता निर्णय घेतल्याने यहोवाला आनंद होईल?’ तुमच्या विद्यार्थ्याने जर यहोवाला आवडेल असा निर्णय घेतला, तर तो योग्य निर्णय असेल याची तो खातरी ठेवू शकतो.
१६ चिलीमध्ये बायबल अभ्यास करणाऱ्या एका स्त्रीला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. तिच्या घरच्यांनी तिच्यावर एक मोठी नोकरी करायचा दाबाव टाकला. पण ही नोकरी केल्यामुळे तिला सभेला जाणं शक्य होणार नव्हतं. मग या परिस्थितीत तिला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली? याबद्दल तिचा अभ्यास घेणारी बहीण मॅरीॲन म्हणते: “मी तिला विचार करायला लावला, की तिने घेतलेल्या निर्णयामुळे यहोवाला कसं वाटेल, तो खूश होईल की दुःखी होईल. मी तिला तिच्या परिस्थितीबद्दल यहोवाला प्रार्थना करायचं आणि तो त्या प्रार्थनेचं कसं उत्तर देतो हे पाहायचं प्रोत्साहन दिलं. नंतर तिने ती नोकरी न करायचा निर्णय घेतला आणि सभेला नियमितपणे जाता येईल अशी नोकरी शोधली.” या उदाहरणातून आपल्याला काय कळतं? लक्ष द्या, बहीण मॅरीॲनने त्या स्त्रीला कोणता निर्णय घ्यायचा हे सांगितलं नाही. उलट, तिला यहोवाबद्दल जे माहीत आहे त्यावर विचार करायचं प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मॅरीॲनच्या विद्यार्थीनीचं तिच्यासोबतचं नातं तर घट्ट झालंच, शिवाय यहोवासोबतचं नातंही घट्ट झालं. मॅरीॲन पुढे तिच्याबद्दल असं म्हणते: “आपण यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात पहिली जागा दिली, तर यहोवा नेहमी आपली काळजी घेईल हे माझ्या विद्यार्थीनीला शिकायला मिळालं.”
बायबल विद्यार्थ्याला यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला मदत करा (परिच्छेद १५-१६ पाहा) b
यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्यांना तो आशीर्वाद देईल
१७. आपल्या विद्यार्थ्याने मूलभूत सत्यांसोबत आणखी काय शिकावं असं आपल्याला वाटतं?
१७ बायबल अभ्यासातून आपल्या विद्यार्थ्याला बऱ्याच मूलभूत सत्यांबद्दल शिकायला मिळतं. जसं की, मेलेल्या लोकांची स्थिती, खंडणी आणि देवाचं राज्य. तसंच, त्यांना संघटनेबद्दलही बरंच काही शिकायला मिळतं. जसं की, सभा कशा चालवल्या जातात, वडील मंडळीला कशी मदत करतात आणि नियमन मंडळ म्हणजे काय. पण आपल्या विद्यार्थ्याने या गोष्टी शिकून घेण्यासोबतच यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखावं अशी आपली इच्छा आहे.
१८. यहोवाला ओळखणाऱ्यांना तो कोणते आशीर्वाद देईल?
१८ इतरांना यहोवाला ओळखायला मदत करणं हा आपल्याला मिळालेला खूप मोठा बहुमान आहे! आज जे लोक यहोवाला ओळखतात आणि त्याची उपासना करतात ते सगळ्यात सुखी आहेत. (स्तो. २५:१२-१५) भविष्यात “जो खरा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान” घेणाऱ्यांना सर्वकाळचं जीवन मिळेल. (१ योहा. ५:२०) इतकंच काय, तर जे यहोवाला जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मेहनत घेतात त्यांना आजही एक मोठा आशीर्वाद मिळू शकतो. तो म्हणजे, यहोवा ‘त्यांना ओळखतो.’ (१ करिंथ. ८:३) खरंच, सर्वशक्तिमान देव आपल्याला ओळखतो आणि आपल्याला त्याचे मित्र समजतो ही आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे! हा आपल्याला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे!
गीत ८४ याहाच्या सेवेत सर्वस्व देऊ या
a कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातल्या ०५ धड्यात दिलेलं ध्येयं असं आहे: “पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या ‘बायबल वाचायला सुरुवात करा’ या तक्त्याचा उपयोग करून दररोज बायबल वाचा.”
b चित्राचं वर्णन: मॅरीॲनची विद्यार्थ्यीनी मोठ्या नोकरीला नाही म्हणत असल्याचं नाट्यरूपांतर.