वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०३ पृ. ३-६
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बेथेल सेवेकरता मूलभूत अपेक्षा
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ९/०३ पृ. ३-६

तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?

१ सा.यु.पू. ७७८ साली, एक अनोखी घटना घडली. संदेष्टा यशया याने एका दृष्टान्तात, ‘प्रभूला [यहोवाला] उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले पाहिले.’ यहोवाच्या गौरवाकडे लक्ष आकर्षित करत सराफांना असे म्हणताना त्याने ऐकले: “पवित्र! पवित्र! पवित्र! सेनाधीश परमेश्‍वर!” संदेष्टा यशया हे पाहून किती भारावून गेला असेल! त्याच दृष्टान्तात, यहोवा एक आव्हान करतो: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” ही कोणत्या प्रकारची नेमणूक होती किंवा जी व्यक्‍ती जाण्यास तयार होईल तिला या नेमणूकीतून काय लाभ मिळेल याविषयी कसलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तरीपण, यशया कुचराई न करता म्हणतो: “हा मी आहे, मला पाठीव.”—यश. ६:१, ३, ८.

२ यहोवा जे काही करायला सांगतो ते करण्याची तयारी दाखवण्याचा आत्मा, त्याच्या लोकांचे ओळखचिन्ह आहे. (स्तो. ११०:३) आणि आता, स्वतःला उपलब्ध करू शकणाऱ्‍यांना एक खास आमंत्रण दिले जात आहे. यशयाप्रमाणे तुम्ही देखील प्रतिसाद द्यायला स्वेच्छा दाखवता का?

३ बेथेलमध्ये सेवा करू शकणाऱ्‍या बांधवांची सतत गरज आहे. यासाठी त्यांना राज्याला प्रथम स्थान देण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे आणि जगभरातील प्रचार कार्याला हातभार लावण्याकरता जे काही अपेक्षिले जाते ते करण्याची तयारी असली पाहिजे. (मत्त. ६:३३) वास्तविक पाहता, बेथेल कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सेवा केल्याने एखाद्याला पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याची संधी मिळते. ती कशी?

४ बेथेलमध्ये केले जाणारे कार्य: कर्नाटक, बंगळूर येथील बेथेल संकुलात चालणाऱ्‍या नियमित कार्याचा जरा विचार करा. २२० बंधूभगिनींच्या मिळून बनलेल्या बेथेल कुटुंबाला, जगभरातील क्षेत्र सेवेसाठी व व्यक्‍तिगत अभ्यासासाठी लागणारे बायबल साहित्य निर्माण करणाऱ्‍या विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या व या दासवर्गाच्या नियमन मंडळाच्या अगदी निकट राहून सेवा करण्याचा सुहक्क लाभला आहे. (मत्त. २४:४५) उदाहरणार्थ, गेल्या वर्षी, बंगळूर येथील बेथेल कुटुंबाच्या संयुक्‍त परिश्रमामुळे, ७५,२०७ पुस्तके, २,६३,७८४ पुस्तिका व माहितीपत्रके, १५,६६५ कॅलेंडर, २०,२०,०२१ नियतकालिके, ३३,३९,२३९ पत्रिका आणि १,०३३ व्हिडिओकॅसेट यांचे निर्माण करून त्यांचे वितरण करता आले. या प्रकाशनांसाठी “सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने” शोधण्यासाठी व निवडण्यासाठी बरेच परिश्रम केले जातात. (उप. १२:९, १०) २५ पेक्षा अधिक भाषांमध्ये साहित्य निर्माण करण्यात हातभार लावणाऱ्‍या सुमारे ७० अनुवादकांना देखील मार्गदर्शन पुरवले जाते. साहित्य छापकाम, त्यांचे वितरण, स्वच्छतेचे काम, मेंटनन्स, भोजन बनवणे, खरेदारी करणे, आरोग्य विभागात काम करण्यासाठी आणि बेथेलमधील इतर कार्यांसाठी पुष्कळ इच्छुक स्वयंसेवकांची गरज आहे.

५ ही सर्व कामे प्रचंड वाटत असली तरी आध्यात्मिकरीत्या समाधान देणारी कामे आहेत. आपली सर्व शक्‍ती, आपले सर्व बल प्रचार व शिकवण्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी वापरले जात आहे ही जाणीव अतिशय आनंददायक आहे. बेथेल सेवेमुळे आपल्याला यहोवाच्या संघटनेविषयी खूपच सविस्तर माहिती मिळते. स्तोत्रकर्त्याने इस्राएली लोकांना त्यांच्या दिवसांत पृथ्वीवर ईश्‍वरशासित केंद्र असलेल्या मंदिराला अगदी जवळून जाणण्याचे उत्तेजन दिले.—स्तो. ४८:१२, १३.

६ बेथेल सेवेचे आशीर्वाद: बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍यांना त्यांच्या विशेषाधिकाराविषयी कसे वाटते? बेथेल कुटुंबातील नव्या आणि जुन्या सदस्यांनी काढलेल्या पुढील उद्‌गारांची नोंद घ्या. तीन वर्षांपासून बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या एका भगिनीने म्हटले: “बेथेलमध्ये राहिल्यामुळे यहोवाबरोबरचा माझा नातेसंबंध पक्का झाला आहे. मी जितका काळ येथे राहते व बेथेलच्या कार्याविषयी जितके अधिक शिकते तितकेच मला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी शिकायला मिळते. शिवाय, यहोवा लोकांचा—सर्व प्रकारच्या लोकांचा उपयोग करतो हे पाहण्यासाठी बेथेल सेवेने माझे डोळे उघडले. त्याला ग्रहणयोग्य होण्याकरता तुम्ही परिपूर्ण असले पाहिजे असे नाही.”

७ एक तरुण बांधव आठवून सांगतो: “मला असा विचार केल्याचे आठवते, की ‘नवीन जगात गेल्यावर मी प्राचीन विश्‍वासू लोकांना सांगेन की मी जगात पैसा कमावण्यात वेळ न घालवता बेथेलमध्ये अनेक वर्षांपासून सेवा केली.’”

८ एक तरुण बांधव आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणावर मनन करीत म्हणाला: “स्वतःविषयी जाणून घेणे आणि आपल्याला कोणते गुण विकसित केले पाहिजेत हे माहीत झाल्यावर ते गुण विकसित केल्यामुळे मला खूप आशीर्वाद मिळाले आहेत. मला वाटतं, की आता मी यहोवाची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करू शकतो. मला दिसतं, की मी पहिल्यापेक्षा अधिक सहनशील झालो आहे, अधिक संयमी आणि अधिक प्रेमळ झालो आहे.”

९ एक भगिनी आतापर्यंत तिला मिळालेल्या आशीर्वादांचा विचार करत म्हणाली: “इथल्या आध्यात्मिक कार्यक्रमांनी मला यहोवाविषयी, आणि माझ्या विचारांद्वारे, भावनांद्वारे व कार्यांद्वारे मी त्याचे जवळून अनुकरण कसे करू शकते याविषयी पुष्कळ काही शिकवलं आहे. आणि इथलं प्रशिक्षण सतत चालू असल्यामुळे आशीर्वादही सतत मिळत राहतात.”

१० पूर्ण-वेळेच्या सेवेत एकूण ५९ वर्षे खर्च केलेल्या व त्यापैकी ४३ वर्षे बेथेलमध्ये घालवलेल्या एका बांधवाने म्हटले: “काहींना वाटतं तसं बेथेल काही एक मठ नाही. आमच्या नियोजनबद्ध जीवनामुळे आम्ही पुष्कळ काही साध्य करतो. . . . मी कामावर आलो आणि मला माझ्या कामाचा कंटाळा आला असं एकदाही घडल्याचं मला आठवत नाही. का बरं? कारण आपण जिवेभावे स्वतःस यहोवाला देऊ करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचं समाधान वाटत असतं की ‘आपण आपलं कर्तव्य केलं आहे.’”—लूक १७:१०.

११ बेथेलमध्ये ६२ वर्षांपासून सेवा करणाऱ्‍या आणखी एका बांधवाने म्हटले: “पृथ्वीवर परादीस येण्याआधी, बेथेल हे पृथ्वीवरील सर्वात उत्तम ठिकाण आहे असा माझा पक्का विश्‍वास आहे. पूर्ण वेळेच्या सेवेला माझे जीवन-ध्येय बनवल्याबद्दल मला जराही पस्तावा होत नाही. यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेची वाढ होत असताना पाहणे व त्यात सहभाग घेणे खरोखरच किती आनंदविणारे आहे! मी ठाम निश्‍चय केला आहे, की मी यहोवाच्या मदतीनं बेथेललाच माझं घर समजेन व राज्याच्या कार्यात पूर्ण मनाने भाग घेईन.”

१२ बेथेल कुटुंबाच्या या सदस्यांनी, बेथेल सेवेकरता स्वतःला उपलब्ध करून दिल्याने मिळणाऱ्‍या असंख्य आशीर्वादांपैकी केवळ काही आशीर्वादांचा येथे उल्लेख केला आहे. परंतु, सेवेच्या कोणत्याही विशेषाधिकाराबाबत खरे असते त्याप्रमाणे, सर्वप्रथम तुम्ही याकरता पात्र ठरले पाहिजे. बेथेल कुटुंबाचे सदस्य या नात्याने सेवा करण्याच्या काही अपेक्षा कोणत्या आहेत?

१३ बेथेल सेवेच्या अपेक्षा: सोबतच्या पेटीत बेथेल सेवेकरता अर्ज भरणाऱ्‍यांकरता कोणत्या मूलभूत अपेक्षा आहेत ते दाखवले आहे. शिवाय, त्यांनी कष्टाचे काम करण्यास इच्छुक असले पाहिजे; ‘सुखविलासाची आवड धरणारे’ असू नये. (२ तीम. ३:४; १ करिंथ. १३:११) बेथेल कुटुंबाच्या सदस्यांनी आध्यात्मिक स्त्री-पुरुष असावे, व्यक्‍तिगत अभ्यासाच्या उत्तम सवयी असलेले असावे आणि ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना “चांगले आणि वाईट समजण्याचा” सराव झाला आहे असे असावे. (इब्री ५:१४) त्यांचे ख्रिस्ती प्रौढत्व जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये दिसायला हवे—वेशभूषा, केशभूषा, संगीताची निवड आणि मनोरंजन यांबाबतीतही. राजीखुषीने कार्य करणारे बेथेल कुटुंबाचे सदस्य गरज असेल तेथे कोठेही काम करायला तयार असतात. सहसा तरुण सदस्यांना छपाई, साहित्य तयार करणे व साहित्य भरणे व पाठवणे, मेंटनन्स, हाऊसकिपींग, स्वच्छता, लाँड्री आणि स्वयंपाक अशा शारीरिक मेहनतीच्या नेमणुका दिल्या जातात. (नीति. २०:२९) परंतु जगिक नोकरीत न मिळणारे समाधान मात्र या नेमणुकीत मिळत असते कारण ती यहोवाला गौरवणारी पवित्र सेवा आहे.—कलस्सै. ३:२३.

१४ बेथेल सेवेकरता बोलवलेल्यांना कमीत कमी एक वर्षाचे आमंत्रण असते. यादरम्यान फलदायी कामकरी बनण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळते. ते बेथेलला आपले घर समजू लागतील अशी आशा केली जाते. बेथेल कुटुंबाचे सदस्य यहोवाबद्दलच्या प्रेमापायी व्यक्‍तिगत गोष्टींऐवजी राज्याच्या कार्याला प्रथमस्थान देतात आणि हे यहोवाला संतोषकारक आहे.—मत्त. १६:२४.

१५ चालू गरजा: बेथेलमधील कामाचे स्वरूप पाहता आम्हाला सध्या मुख्यतः अविवाहित बांधवांची गरज आहे. त्यातल्या त्यात सामान्य पायनियरांना प्राधान्य दिले जाते कारण ते पूर्ण वेळेच्या कार्यात आधीच आहेत; परंतु अशी अपेक्षा नाही. काही वेळा, १९ ते ३५ वयोगटातील आणि बेथेलमध्ये आवश्‍यक असलेली खास कौशल्ये असलेल्या अविवाहित बहिणी आणि विवाहित जोडप्यांना संधी मिळू शकते. शिवाय, जे बंधू-भगिनी ३५ हून अधिक वयाचे आहेत परंतु ज्यांच्याजवळ काही खास कौशल्ये आहेत किंवा प्रशिक्षण आहे त्यांना देखील बेथेलमध्ये अर्ज भरण्याकरता प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणार्थ, डेन्टिस्ट, डॉक्टर, सर्टिफाईड अकाउंटंट, आर्किटेक्ट, इंजिनियर, रेजिस्टर्ड नर्सेस, ऑटोमोबाईल मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन. परंतु, बेथेलमध्ये घेण्याची शक्यता वाढवण्याकरता बंधू-बहिणींनी खास शिक्षण किंवा प्रशिक्षण घ्यावे असे उत्तेजन आम्ही देत नाही. ज्यांनी आधीच—कदाचित सत्यात येण्याआधी—असे खास प्रशिक्षण घेतले असेल ते हवे असल्यास, आपल्या शिक्षणाबद्दलची तपशीलवार माहिती लिहून बेथेल अर्जासोबत जोडू शकतात.

१६ तुम्ही बेथेलसाठी अर्ज भरला आणि तुम्हाला बोलावले गेले नाही तर निराश होऊ नका. वर्षातून एकदा तुम्ही नवीन अर्ज भरण्याचा विचार करू शकता. बेथेलमध्ये ज्यांची गरज आहे असे खास प्रशिक्षण आणि कौशल्ये असलेल्या काही बांधवांनी तात्पुरत्या स्वयंसेवेकरता स्वतःला उपलब्ध केले आहे. बेथेलमध्ये एक, दोन, तीन किंवा चार आठवडे अथवा तीन महिने तात्पुरती सेवा करायला ते अर्ज करू शकतात. अशाप्रकारे मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकरता मंडळीच्या सचिवांकडे तात्पुरती स्वयंसेवा अर्ज आहेत. लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मद्वारे तात्पुरती स्वयंसेवा अर्ज मागवले जाऊ शकतात.

१७ ख्रिस्ताच्या बांधवांसोबतच्या निकट सहवासात राहून यहोवाची सेवा करणे हा बेथेलमध्ये कार्य करणाऱ्‍यांसाठी एक अनोखा विशेष हक्क आहे. आपल्या जागतिक बंधुवर्गाच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःला सेवेकरता उपलब्ध करणाऱ्‍या सर्वांच्या आत्मत्यागी मनोवृत्तीबद्दल नियमन मंडळ प्रशंसा व्यक्‍त करते.—फिलिप्पै. २:२०-२२; २ तीम. ४:११.

१८ तरुणांनो—बेथेल सेवेकरता स्वतःला आता तयार करा: बेथेलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी कमीत कमी वयोमानाची अपेक्षा १९ वर्षे असली तरी बेथेल सेवेकरता फार आधीपासूनच तयारी सुरू होते. तरुण लोक, बेथेल सेवेकरता स्वतःची तयारी कशी करू शकतील? येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) तयारी आणि योजना या गोष्टी कोणत्याही बांधकाम प्रकल्पाच्या यशाकरता आवश्‍यक असल्यामुळे, यहोवाच्या सेवेत आपण आपले भविष्य कसे बांधत आहोत याकडे तरुणांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे हे किती महत्त्वाचे आहे! आध्यात्मिक ध्येय प्राप्तीकरता मजबूत पाया घालण्याची सुरवात जीवनात लवकर झाली पाहिजे. तरुण या नात्याने, तुम्ही आपला पाया कसा घालत आहात? बेथेलमध्ये तुम्हाला सेवा करायची असल्यास, पुढील गोष्टींचा नीट विचार केल्याने तुम्हाला फायदा होईल.

१९ सेवेच्या या खास विशेषाधिकारासाठी ‘जागा करा’: मत्तय १९:१२ [NW] मध्ये म्हटल्यानुसार येशूने आपल्या शिष्यांना अविवाहित राहण्याकरता ‘जागा करण्यास’ उत्तेजन दिले. का? व्यक्‍तिगत कारणांसाठी नव्हे तर “स्वर्गाच्या राज्यासाठी.” पौलाने देखील अविवाहित राहून “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करण्यास प्रोत्साहन दिले. (१ करिंथ. ७:३२-३५) परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, पुष्कळजण अविवाहित पुरुष राहून बेथेलमध्ये सेवा करण्याची सुसंधी लवकर लग्न करून गमावून बसतात. आम्ही आपल्या बांधवांना असे उत्तेजन देऊ इच्छितो की, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या नसेपर्यंत त्यांनी आपल्या शक्‍तीचा उपयोग पूर्ण-वेळेच्या सेवेत करावा. मग, काही काळानंतर त्यांनी विवाह करायचा विचार केल्यास जीवनात व ख्रिस्ती सेवाकार्यात अधिक अनुभव प्राप्त केल्यामुळे ते अधिक चांगले पती बनू शकतील. बेथेलमध्ये अनेक वर्षे सेवा केल्यानंतर काहींनी विवाह केला आणि आपल्या सोबत्याबरोबर ते तेथेच राहून कार्य करू शकले आहेत. नंतर त्यांना विभागीय किंवा प्रांतीय कार्यासारखे इतर विशेषाधिकार दिले जातात तेव्हा बेथेल सेवेकरता जागा केल्याबद्दल त्यांना मुळीच पस्तावा होत नाही.

२० भौतिक गोष्टींमुळे विकर्षित होऊ नका: प्रत्येक तरुणाने स्वतःला हा प्रश्‍न विचारल्यास बरे राहील: ‘शिक्षण पूर्ण झाल्यावर माझे ध्येय काय आहे, पूर्ण-वेळ ऐहिक नोकरी की पूर्ण-वेळ यहोवाची सेवा?’ इतके खरे की, पूर्ण-वेळ यहोवाची सेवा करण्यासाठी काही त्याग करावे लागतील. परंतु ऐहिक नोकरीसाठीही करावेच लागतील! शेवटी, कोणते मार्गाक्रमण टिकणारे आणि फायदेकारक परिणाम मिळवून देणारे आहे? येशूने याचे स्पष्ट उत्तर दिले. मत्तय ६:१९-२१ नुसार, त्याने म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ति साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनहि लागेल.” यहोवाची पूर्ण जिवाने सेवा करण्याऐवजी जगामधील कारकीर्द किंवा भौतिक गोष्टी यांच्या मागे लागण्यासाठी प्रवृत्त करण्यास आपण आपल्या हृदयाला कधीही अनुमती देऊ नये. आपण सर्वांनी हे ओळखले पाहिजे की यहोवासोबत चांगला नातेसंबंध राखण्याचा प्रयत्न करणे हीच सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि यामुळे आपण त्याचे मन आनंदित करू. (नीति. २७:११) तरुण असताना यहोवाला आपल्या जीवनात प्राधान्य दिल्याने, आपली मूल्ये काय आहेत आणि देवाचे राज्य आपल्याला किती महत्त्वाचे वाटते हे आपण दाखवतो. लक्षात ठेवा, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” (नीति. १०:२२) यहोवाने दिलेल्या सर्व गोष्टींबद्दल त्याला काही मौल्यवान देऊन आपले मन नेमके कशात आहे हे दाखवण्याची उत्तम संधी तरुणांजवळ आहे. अशी बहुमोल संधी बेथेल सेवा पात्र ठरणाऱ्‍यांना देते.

२१ बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍यांनी नैतिकरित्या शुद्ध असावे: स्तोत्रकर्त्याने विचारले: “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” त्याने उत्तरही दिले: “[यहोवाच्या] वचनानुसार तो राखण्याने.” (स्तो. ११९:९) सैतानाच्या या व्यवस्थीकरणातील नीतिभ्रष्टतेपासून दूर राहणे असा याचा अर्थ होतो. इंटरनेटवरील पोर्नोग्राफी, विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अनुचित वर्तन, खालच्या दर्जाचे संगीत, हिणकस मनोरंजन आणि कमी वयात पिण्याची सवय या काही गोष्टींद्वारे सैतान आपल्या तरुणांना आध्यात्मिक ध्येये गाठू देत नाही. या युक्‍त्‌यांचा प्रतिकार करण्यासाठी दृढ संकल्प असण्याची गरज आहे. तरुण यानात्याने, यांपैकी कोणत्याही गोष्टीत गुरफटत असल्याचे तुम्हाला जाणवल्यास, आपल्या मंडळीतील वडिलांशी बोला आणि बेथेल सेवेचा अर्ज भरण्याआधी या गोष्टींपासून मुक्‍त व्हा. यहोवाची पूर्णार्थाने सेवा करण्यासाठी शुद्ध विवेक असणे महत्त्वाचे आहे.—१ तीम. १:५.

२२ इतरांसोबत जमवून घेण्यास शिका: बेथेल सेवेत यश मिळवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतरांसोबत जमवून घेण्यास शिकणे. बंगळूर येथील बेथेल कुटुंबात विविध पार्श्‍वभूमीतील बंधू-बहिणी आहेत. ही विविधता बेथेलचे देखणेपण वाढवत असली तरी काही वेळा याने समस्या देखील निर्माण होऊ शकतात. बेथेल सेवेचा तुम्ही विचार करत असल्यास, हा प्रश्‍न स्वतःला विचारणे उचित ठरेल: ‘माझ्याशी लोक सहमत होत नाहीत तेव्हा मला लगेच राग येतो का? इतरांना माझ्याशी जमवून घ्यायला सोपे वाटते का?’ या बाबतीत सुधारणा करण्याची गरज असल्यास आतापासूनच त्यावर कार्य करू लागा. असे केल्याने बेथेल कुटुंबाच्या सदस्यांसोबत राहणे व काम करणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.

२३ यहोवासोबत निकटचा नातेसंबंध निर्माण करून आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्याचा कसोशीने प्रयत्न करा. व्यक्‍तिगत अभ्यासाचा चांगला नित्यक्रम बनवा; यात दररोज बायबल वाचण्याची सवय असली पाहिजे. इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी सक्रिय असा. या गोष्टी आचरणात आणल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती सर्वांना दिसून येईल. (१ तीम. ४:१५) पूर्ण-वेळेची सेवा हेच आपले ध्येय बनवण्यासाठी जे आतापासूनच तयारी करतात त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे!

२४ पालकहो, आपल्या मुलांना प्रशिक्षण द्या: आपल्या तरुण मुलांना पूर्ण-वेळेची सेवा स्वीकारण्यासाठी पालक त्यांना कसे उत्तेजन देऊ शकतात? येशूने म्हटले: “पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.” (लूक ६:४०) पूर्णपणे प्रशिक्षण मिळालेला शिष्य साहजिकच आपल्या समर्पित शिक्षकाचे उत्तम गुण प्रदर्शित करील. ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना “सुभक्‍तीविषयी” प्रशिक्षण देण्याचे कष्ट घेताना हे तत्त्व लक्षात ठेवावे. (१ तीम. ४:७) आपल्या पालकांची आध्यात्मिक गोष्टींबद्दल जी मनोवृत्ती आहे तीच प्रदर्शित करण्याची प्रवृत्ती लहान मुलांमध्ये असल्याने पालकांनी स्वतःला हे विचारणे बरे राहील: ‘यहोवाच्या खऱ्‍या उपासनेच्या कार्याला बढावा देण्यासाठी बेथेलमध्ये होणाऱ्‍या कार्याची आम्हाला स्वतःला किंमत वाटते का? बेथेलच्या व्यवस्थेवर यहोवाचा आशीर्वाद आहे ही गोष्ट आम्ही कबूल करतो का? यहोवाच्या सेवेतील जीवनाची निवड, हा आपल्या मुलांचा सर्वात उत्तम करिअर आहे असा आपल्याला विश्‍वास आहे का?’ बेथेल सेवेकरता आणि तेथील कार्याकरता आपल्याला मनःपूर्वक कृतज्ञता असल्यास आपण आपल्या मुलांमध्येही अशीच कृतज्ञता निर्माण करू शकू.

२५ एलकाना आणि हन्‍ना या दोघांनाही खऱ्‍या उपासनेबद्दल मनापासून कृतज्ञता वाटत होती. त्यांनी आजच्या ख्रिस्ती पालकांकरता उल्लेखनीय उदाहरण मांडले आहे. प्राचीन इस्राएलमध्ये, निवासमंडपात वर्षातून तीनदा केवळ इस्राएली पुरुषांना “प्रभु परमेश्‍वरासमोर हजर” राहण्याची अपेक्षा होती. परंतु, यहोवाच्या उपासनेच्या केंद्रस्थानी अर्पण करण्यासाठी एलकाना आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन, कदाचित पायी होणारा हा ३० किलोमीटरचा प्रवास “दरवर्षी” करत असे. (निर्ग. २३:१७; १ शमु. १:३, ४, ९, १९; २:१९) आपल्या संपूर्ण कुटुंबाने आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपल्यासारखाच उत्साह दाखवावा असे या कुटुंब प्रमुखाला वाटत होते हे स्पष्ट आहे.

२६ हन्‍नाला खऱ्‍या उपासनेबद्दल आपल्या पतीसारखाच उत्साह होता. निवासमंडपातील खऱ्‍या उपासनेकरता योगदान देण्याचे आपले कर्तव्य आहे असे तिला मनापासून वाटत होते. हन्‍नाने शपथ घेतली की, यहोवाने तिला पुत्र दिल्यास, ती त्याला निवासमंडपातील सेवेकरता पाठवून देईल. (१ शमु. १:११) मोशेच्या नियमशास्त्रात, एखाद्या पत्नीने अनुचित नवस केल्यावर तो रद्द करण्याचा अधिकार पतीला देण्यात आला होता. (गण. ३०:६-८) परंतु, एलकानाने हन्‍नाच्या नवसाबद्दल स्पष्टपणे मान्यता देऊन खऱ्‍या उपासनेच्या त्या अभिव्यक्‍तीला आपला पाठिंबा प्रदर्शित केला.—१ शमु. १:२२, २३.

२७ आपल्या पालकांनी दाखवलेली कदर आणि उत्तम मनोवृत्ती यांचा चांगला परिणाम त्यांचा पुत्र शमुवेल याच्यावर झाला का? होय, निश्‍चित. शमुवेलाने आपल्या लहानपणीच स्वेच्छेने आणि विश्‍वासूपणे आपल्याला नेमून दिलेले काम पार पाडले आणि देवाच्या सेवेतील अधिक महत्त्वपूर्ण विशेषाधिकारांसाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आले. एलकाना आणि हन्‍नाला त्याच्या सेवेबद्दल वाटणारा उत्साह, शमुवेलाने निवासमंडपात कार्य करण्यास सुरू केल्यावरही संपला नाही. तो पूर्ण-वेळेच्या सेवेत असताना ते त्याला नियमितरित्या भेटायला जाऊन प्रोत्साहन देत असत आणि मदत करत असत.—१ शमु. २:१८, १९.

२८ एलकाना आणि हन्‍नाचे आजच्या ख्रिस्ती पालकांसमोर किती उल्लेखनीय उदाहरण आहे! बेथेल सेवेच्या विशेषाधिकाराबद्दल मनापासून व्यक्‍त केलेली आपली कदर आणि राज्याच्या हितांना बढावा देण्यासाठी दाखवलेली आपली आत्मत्यागी मनोवृत्ती पाहून आपल्या मुलांचे अंतःकरणही इतरांची सेवा करण्यास प्रवृत्त होईल. पुष्कळ आईवडील आपल्या मुलांबद्दल ही हितकर प्रवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते यशस्वी देखील ठरले आहेत. एका सात वर्षांच्या मुलीने लिहिले: “मोठी झाल्यावर मला बेथेलला जायचंय, आणि मला तिथं जाऊन (१) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! पत्रिका टाईप करायला आवडेल, (२) तुमच्या आर्ट विभागात काम करायला आवडेल आणि (३) लाँड्रीची घडी घालायला आवडेल. यातलं कुठलंही काम मला चालेल. मी कोणतंही काम करायला तयार आहे.” आपल्या मुलांमध्ये हा स्वेच्छेचा आत्मा पाहून मनाला किती दिलासा मिळतो!

२९ तरुणांनो, लक्षात ठेवा की, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) आध्यात्मिक ध्येय ठेवा; बेथेल सेवेच्या खास विशेषाधिकाराचे ध्येय देखील ठेवा. पालकहो, गतकाळात ज्या विश्‍वासू जणांनी आपल्या मुलांना सुभक्‍तीचा गुण विकसित करण्यास प्रोत्साहन दिले त्यांचे अनुकरण करा. (२ पेत्र ३:११) आपल्या तरुण बंधू-बहिणींना पूर्णार्थाने आपल्या महान निर्माणकर्त्याची सेवा करण्यास मदत करण्यासाठी आपण सर्वजण हातभार लावू या कारण याने “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” मिळते.—१ तीम. ४:८; उप. १२:१.

[४ पानांवरील चौकट]

बेथेल सेवेकरता मूलभूत अपेक्षा

• बाप्तिस्मा होऊन एक वर्ष पूर्ण झाले पाहिजे

• आध्यात्मिक व्यक्‍ती असून यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल गाढ प्रेम असले पाहिजे

• आध्यात्मिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असले पाहिजे

• भारताचा नागरिक किंवा कायदेशीररित्या स्थायी रहिवाशी असले पाहिजे

• इंग्रजी भाषा उत्तमरित्या लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे

• १९-३५ वर्षांच्या वयोगटातील असले पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा