अभ्यास लेख २७
गीत ७९ त्यांना टिकून राहायला मदत कर!
बायबल विद्यार्थ्यांना सत्याची बाजू घ्यायला मदत करा
“विश्वासात स्थिर राहा, . . . आणि सामर्थ्यशाली व्हा.”—१ करिंथ. १६:१३.
या लेखात:
सत्याची बाजू घेण्यासाठी लागणारं धैर्य आणि विश्वास वाढवण्यासाठी आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो हे पाहा.
१-२. (क) काही बायबल विद्यार्थी सत्याची बाजू घ्यायला का कचरतात? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
तुम्ही जेव्हा बायबल अभ्यास करत होता, तेव्हा अशा काही गोष्टी होत्या का, ज्यांमुळे यहोवाचे साक्षीदार बनायला तुम्हाला भीती वाटत होती? कदाचित तुमच्या कामावरचे लोक, मित्रमैत्रिणी किंवा घरचे लोक रागावतील अशी तुम्हाला भीती वाटली असेल. किंवा कदाचित देवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे आपल्याला कधीच जगता येणार नाही, असंही तुम्हाला वाटलं असेल. आणि जर खरंच असं झालं असेल, तर सत्याची बाजू घ्यायला कचरणाऱ्या तुमच्या बायबल विद्यार्थ्याच्या भावना तुम्हाला समजून घेता येतील.
२ येशूला माहीत होतं, की अशा प्रकारच्या भीतीमुळे एखाद्याची आध्यात्मिक वाढ खुंटू शकते. (मत्त. १३:२०-२२) पण त्याचे शिष्य बनण्यासाठी ज्यांना भीती वाटत होती, अशांबद्दल त्याने आशा सोडली नाही. उलट, त्याने आपल्याला अशा लोकांना, (१) त्यांच्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे ओळखायला, (२) यहोवावरचं त्यांचं प्रेम वाढवायला, (३) यहोवाच्या सेवेला पहिली जागा द्यायला, आणि (४) समस्यांचा सामना करायला कशी मदत करता येईल, हे त्याच्या उदाहरणातून शिकवलं. मग, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून बायबल विद्यार्थ्यासोबत अभ्यास करत असताना, येशूसारखं वागून आपण त्याला सत्याची बाजू घ्यायला कशी मदत करू शकतो?
प्रगतीच्या आड येणारे अडथळे ओळखायला मदत करा
३. येशूचा शिष्य बनण्यापासून निकदेमला कोणती गोष्ट रोखत असावी?
३ निकदेम हा यहुद्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी एक होता. येशूचा शिष्य बनण्यासाठी त्याच्यासमोर एक अडथळा होता. येशूचं सेवाकार्य सुरू झाल्याच्या जवळपास सहा महिन्यांतच, येशूच मसीहा आहे हे त्याने ओळखलं होतं. (योहा. ३:१, २) पण “यहुद्यांच्या भीतीमुळे” तो येशूला गुपचूप भेटला. (योहा. ७:१३; १२:४२) त्याने कदाचित असा विचार केला असेल, की येशूचा शिष्य बनल्यानंतर त्याला बरंच काही गमवावं लागेल.a
४. यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घ्यायला येशूने निकदेमला कशी मदत केली?
४ निकदेमला नियमशास्त्राचं ज्ञान होतं. पण यहोवा त्याच्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यासाठी त्याला मदतीची गरज होती. मग येशूने त्याला कशी मदत केली? निकदेम रात्रीच्या वेळी येशूला भेटला. तरीसुद्धा येशू त्याच्याशी बोलायला आणि त्याच्यासोबत वेळ घालवायला तयार होता. तसंच, त्याचा शिष्य बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हेसुद्धा येशूने त्याला स्पष्टपणे सांगितलं. त्याने त्याला सांगितलं, की त्याला त्याच्या पापांबद्दल पश्चात्ताप करावा लागेल, पाण्यात बाप्तिस्मा घ्यावा लागेल आणि देवाच्या मुलावर विश्वास असल्याचं दाखवावं लागेल.—योहा. ३:५, १४-२१.
५. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी ओळखायला कशी मदत करू शकतो?
५ बायबल विद्यार्थ्याला शास्त्रवचनांची चांगली समज असू शकते. पण त्याच्या प्रगतीत कोणते अडथळे येत आहेत, हे ओळखायला त्याला मदतीची गरज लागू शकते. कदाचित त्याचा कामात जास्त वेळ जात असेल, किंवा तो एक यहोवाचा साक्षीदार बनू नये, असं त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना वाटत असेल. म्हणून येशूसारखं, तुमच्या विद्यार्थ्याला मदत करायला वेळ काढा. तुम्ही त्याला घरी चहासाठी किंवा सहज गप्पा मारायला बोलवू शकता. असं केल्यामुळे तो त्याच्या समस्यांबद्दल अगदी मनमोकळेपणाने तुम्हाला सांगू शकेल. आणि तुम्हालाही त्याच्या समस्या समजून घेता येतील. तुमच्या विद्यार्थ्याला योग्य ते बदल करायचं प्रोत्साहन द्या. त्याला हे समजून घ्यायला मदत करा, की त्याला तुम्हाला नाही तर यहोवाला खूश करण्यासाठी बदल करायचे आहेत.
६. धाडसाने सत्याची बाजू घ्यायला तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता? (१ करिंथकर १६:१३)
६ यहोवा आपल्याला बायबल स्तरांनुसार जगायला मदत करेल यावरचा बायबल विद्यार्थ्याचा भरवसा वाढतो, तेव्हा त्याला शिकलेल्या गोष्टी लागू करायचं धाडस मिळतं. (१ करिंथकर १६:१३ वाचा.) बायबल विद्यार्थ्याला मदत करताना तुमची भूमिका शाळेतल्या शिक्षकासारखी असू शकते. शाळेत तुमचे आवडते शिक्षक कोण होते? कदाचित त्यांनी तुम्हाला खूप धीराने काही गोष्टी शिकवल्या असतील, तुमचा आत्मविश्वास वाढवला असेल. अशाच प्रकारे, एक चांगला बायबल शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याला देव त्याच्याकडून काय अपेक्षा करतो हे तर शिकवतोच, शिवाय त्याला त्याच्या जीवनात बदल करायला यहोवा मदत करेल याची खातरीसुद्धा देतो. मग तुम्ही हे कसं करू शकता?
यहोवावरचं प्रेम वाढवायला मदत करा
७. येशूने त्याचं ऐकणाऱ्यांना यहोवावरचं प्रेम वाढवायला कशी मदत केली?
७ येशूला माहीत होतं, की त्याच्या शिष्यांना देवावर असलेल्या प्रेमामुळेच शिकलेल्या गोष्टी लागू करायचं प्रोत्साहन मिळेल. येशूने बऱ्याचदा त्यांना आपल्या स्वर्गातल्या पित्यावरचं त्यांचं प्रेम वाढेल अशा गोष्टी शिकवल्या. त्याने यहोवाची तुलना आपल्या मुलांना नेहमी चांगल्या गोष्टी देणाऱ्या एका माणसासोबत केली. (मत्त. ७:९-११) तसंच, येशूने लोकांना एका प्रेमळ पित्याचं उदाहरण दिलं. या पित्याने वाईट मार्ग सोडून येणाऱ्या त्याच्या मुलाचं स्वागत केलं. येशूचं ऐकणाऱ्यांपैकी काही जणांचे वडील कदाचित प्रेमळ नसावेत. म्हणून जेव्हा येशूने हे उदाहरण दिलं तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल याचा विचार करा. यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे पाहायला त्यांना नक्कीच मदत झाली असेल.—लूक १५:२०-२४.
८. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला यहोवावरचं प्रेम वाढवायला तुम्ही कशी मदत करू शकता?
८ बायबल विद्यार्थ्याला शिकवत असताना त्याचं लक्ष यहोवाच्या गुणांकडे वेधा. यामुळे तुम्हाला यहोवावरचं त्याचं प्रेम वाढवायला त्याला मदत करता येईल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तो जे शिकतोय, त्यातून यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं हे त्याला सांगा. खंडणी बलिदानाची व्यवस्था संपूर्ण मानवजातीसाठी जरी असली, तरी ती भेट खासकरून त्याच्यासाठी आहे हे समजून घ्यायला त्याला मदत करा. (रोम. ५:८; १ योहा. ४:१०) यहोवाचं त्याच्यावर किती प्रेम आहे, हे समजून घेतल्यामुळे त्याला यहोवावरचं प्रेम वाढवायला मदत होईल.—गलती. २:२०.
९. मायकलला त्याच्या जीवनात बदल करायला कशामुळे मदत झाली?
९ इंडोनेशियातल्या मायकलचा विचार करा. तो लहान असताना त्याला सत्याबद्दल माहीत होतं. पण त्याने बाप्तिस्मा घेतला नव्हता. १८ वर्षांचा असताना तो एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी बाहेरगावी गेला. नंतर त्याचं लग्न झालं. पण त्याच्या कुटुंबाला इंडोनेशियामध्येच ठेवून तो परत बाहेरगावी काम करायला गेला. त्या मधल्या काळात, त्याच्या बायकोने आणि मुलीने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली आणि प्रगतीसुद्धा केली. त्याची आई वारल्यानंतर वडिलांची काळजी घेण्यासाठी मायकलने परत घरी यायचा निर्णय घेतला. तसंच तो बायबल अभ्यास करायलासुद्धा तयार झाला. कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या २७ व्या अध्यायात “आणखी जाणून घेऊ या” हा भाग त्याच्या मनाला खूप भिडला. यहोवाला त्याच्या मुलाला दुःख सोसताना पाहून किती त्रास झाला असेल, याचा विचार करून मायकलच्या डोळ्यात पाणी आलं. खंडणी बलिदानासाठी त्याची कदर खूप वाढली आणि म्हणून त्याने जीवनात बदल करायचा आणि बाप्तिस्मा घ्यायचा निर्णय घेतला.
यहोवाच्या सेवेला पहिली जागा द्यायला मदत करा
१०. येशूने सुरुवातीच्या शिष्यांना यहोवाच्या सेवेला पहिली जागा देण्यासाठी कशी मदत केली? (लूक ५:५-११) (चित्रसुद्धा पाहा.)
१० सुरुवातीच्या शिष्यांनी, येशूच वचन दिलेला मसीहा आहे हे पटकन ओळखलं होतं. पण त्यांना यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात पहिली जागा देण्यासाठी मदतीची गरज होती. जसं की, पेत्र आणि अंद्रिया येशूचे शिष्य बनल्यानंतरसुद्धा मासेमारीचा व्यवसाय करत होते आणि चांगला पैसा कमवत होते. कदाचित याकोब आणि योहानसुद्धा त्यांच्यासोबत हा व्यवसाय करत असावेत. (मार्क १:१६-२०) पण नंतर येशूने त्यांना पूर्ण वेळेच्या सेवेसाठी बोलवलं. (मत्त. ४:१८, १९) येशूचं ऐकून पेत्र आणि अंद्रियाने त्यांची “जाळी टाकून दिली,” म्हणजेच त्यांनी त्यांचा मासेमारीचा व्यवसाय सोडून दिला. पण यात काहीच शंका नाही की जेव्हा ते येशूच्या मागे गेले, तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था नक्कीच केली असेल. पण एवढा मोठा बदल करायला त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? लूकच्या अहवालातून आपल्याला हे कळतं की येशूने जो चमत्कार केला, त्यातून यहोवा त्यांच्या गरजा पुरवू शकतो यावरचा त्यांचा विश्वास वाढला.—लूक ५:५-११ वाचा.
येशूने आपल्या शिष्यांना यहोवाच्या सेवेला पहिली जागा द्यायला मदत केली, त्यातून आपण काय शिकू शकतो? (परिच्छेद १० पाहा)b
११. विद्यार्थ्याचा विश्वास मजबूत करण्यासाठी आपण आपल्या अनुभवांचा वापर कसा करू शकतो?
११ हे खरंय की आपण येशूसारखे चमत्कार करू शकत नाही. पण ज्यांनी यहोवाला त्यांच्या जीवनात पहिली जागा दिली त्यांना यहोवाने कशी मदत केली ते आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला नक्कीच सांगू शकतो. उदाहरणार्थ, सत्य शिकत असताना तुम्ही सभांना यायला सुरुवात केली होती, तेव्हा यहोवाने तुम्हाला कशी मदत केली हे तुम्हाला आठवतं का? कदाचित तुम्हाला तुमच्या मालकाला भेटावं लागलं असेल आणि हे सांगावं लागलं असेल की सभांच्या वेळी तुम्ही ओव्हरटाईम करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला तुमचे हे अनुभव सांगू शकता. तसंच यहोवाच्या सेवेला पहिली जागा देण्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतला, त्यामुळे त्याने तुम्हाला कशी मदत केली हेसुद्धा तुम्ही त्याला सांगू शकता. शिवाय यामुळे तुमचा विश्वास कसा वाढला हेसुद्धा त्याला सांगा.
१२. (क) आपण वेगवेगळ्या भाऊबहिणींना बायबल अभ्यासाला का घेऊन गेलं पाहिजे? (ख) आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी तुम्ही व्हिडिओचा कसा वापर करू शकता? उदाहरण द्या.
१२ इतर भाऊबहिणींनी यहोवाला त्यांच्या जीवनात पहिली जागा देण्यासाठी कोणते बदल केले हे जाणून घेतल्यामुळेसुद्धा तुमच्या विद्यार्थ्याला खूप फायदा होईल. म्हणून त्याच्या अभ्यासाला जाताना तुम्ही वेगवेगळ्या भाऊबहिणींना सोबत घेऊन जाऊ शकता. त्यांना त्यांचे अनुभव विद्यार्थ्याला सांगायला सांगा. ते सत्यात कसे आले? यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात पहिली जागा देण्यासाठी त्यांनी कायकाय बदल केले? हे त्यांना सांगायला सांगा. तसंच, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला “आणखी जाणून घेऊ या” आणि “हेसुद्धा पाहा” या भागातले व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यासोबत बघण्यासाठीसुद्धा वेळ काढा. उदाहरणार्थ, या पुस्तकाच्या ३७ व्या धड्यात, यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल हा व्हिडिओ दिलाय. हा व्हिडिओ तुम्ही आपल्या विद्यार्थ्यासोबत पाहू शकता आणि त्याने जर आपल्या जीवनात यहोवाला पहिली जागा दिली, तर यहोवा त्यालाही मदत करेल हेसुद्धा तुम्ही त्याला सांगू शकता.
समस्यांचा सामना करायला मदत करा
१३. येशूने त्याच्या शिष्यांना विरोधाचा सामना करण्यासाठी कसं तयार केलं?
१३ येशूने त्याच्या शिष्यांना वारंवार हे सांगितलं, की त्यांना इतरांकडून आणि नातेवाइकांकडूनसुद्धा विरोधाचा सामना करावा लागेल. (मत्त. ५:११; १०:२२, ३६) येशूचं सेवाकार्य संपत आलं, तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना असा इशारा दिला, की त्यांना मृत्यूचासुद्धा सामना करावा लागू शकतो. (मत्त. २४:९; योहा. १५:२०; १६:२) म्हणून त्याने त्याच्या शिष्यांना प्रचारात सावध राहायचा सल्ला दिला. त्याने त्यांना सांगितलं की विरोध करणाऱ्यांसोबत त्यांनी वाद घालू नये, तर सावध राहावं. म्हणजे त्यांना प्रचाराचं काम करत राहता येईल.
१४. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला विरोधाचा सामना करण्यासाठी कसं तयार करू शकतो? (२ तीमथ्य ३:१२)
१४ आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला विरोधाचा सामना करण्यासाठी तयार करू शकतो. यासाठी त्याच्या कामावरचे लोक, मित्र किंवा नातेवाईक त्याला कदाचित काय बोलतील हे आपण त्याला सांगू शकतो. (२ तीमथ्य ३:१२ वाचा.) बायबलच्या शिकवणींनुसार जीवन जगत असल्यामुळे कामावरचे काही लोक कदाचित त्याची थट्टा करतील. इतर जण किंवा जवळचे नातेवाईकसुद्धा त्याच्या बायबल आधारित विश्वासाची टीका करतील. आपण लवकरात लवकर आपल्या बायबल विद्यार्थ्याला विरोधाचा सामना करायला तयार केलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा खरोखर त्याला विरोधाचा सामना करावा लागेल, तेव्हा तो तयार असेल.
१५. घरच्यांकडून होत असलेल्या विरोधाचा सामना करायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला कशामुळे मदत होईल?
१५ तुमच्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या घरच्यांकडून विरोधाचा सामना करावा लागत असेल. पण, ते त्याचा विरोध का करत आहेत हे समजून घ्यायला तुम्ही त्याला मदत करू शकता. कदाचित ते विचार करत असतील, की त्याची कोणीतरी दिशाभूल करतंय किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल त्यांचं काहीतरी गैरसमज असेल. येशूसुद्धा जे करत होता ते त्याच्या घरच्यांना पटत नव्हतं. (मार्क ३:२१; योहा. ७:५) म्हणून, तुमच्या बायबल विद्यार्थ्याला इतरांशी आणि घरच्यांशीसुद्धा धीराने आणि प्रेमाने वागायला शिकवा.
१६. तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या विश्वासाबद्दल प्रेमाने आणि समंजसपणे इतरांना सांगायला कशी मदत करू शकता?
१६ जेव्हा नातेवाईक सत्यामध्ये आवड दाखवतात तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांना सगळं काही सांगणं विद्यार्थ्यासाठी योग्य ठरणार नाही. कारण, त्याने जर असं केलं तर कदाचित ते भारावून जातील आणि पुढच्या वेळी त्याबद्दल बोलायला तयार होणार नाहीत. म्हणून, तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्या विश्वासाबद्दल थोडक्यात सांगायचं प्रोत्साहन द्या. यामुळे पुढच्या वेळीसुद्धा ते बायबलबद्दल आणखीन जास्त ऐकायला तयार होतील. (कलस्सै. ४:६) तो त्यांना jw.org ही वेबसाईटसुद्धा बघायला सांगू शकतो. यामुळे, त्यांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल हवं तेव्हा आणि हवी तेवढी माहिती घेता येईल.
१७. तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेले इतरांचे गैरसमज दूर करायला कसं प्रशिक्षण देऊ शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ तुमच्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या नातेवाइकांनी किंवा कामावरच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार करा. असं करण्यासाठी तुम्ही jw.org वर असलेल्या “सहसा विचारले जाणारे प्रश्न” या लेख मालिकेचा उपयोग करू शकता. (२ तीम. २:२४, २५) कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातल्या प्रत्येक धड्यात शेवटी “काही जण म्हणतात” हा भाग दिला आहे. यावरसुद्धा तुम्ही चर्चा करू शकता. नातेवाइकांना किंवा कामावरच्या लोकांना त्याच्या शब्दात तो कसं उत्तर देऊ शकतो याबद्दल सराव करायला तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता. तसंच, तो आणखी चांगल्या प्रकारे इतरांना उत्तर कसं देऊ शकतो याबद्दलचा सल्ला द्यायला कचरू नका. अशा प्रकारचा सराव केल्यामुळे त्याला त्याच्या विश्वासाबद्दल ठामपणे इतरांना सांगायला मदत होईल.
तुमच्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगण्याआधी सराव करण्याचं प्रोत्साहन द्या (परिच्छेद १७ पाहा)c
१८. तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला प्रचारात भाग घ्यायचं प्रोत्साहन कसं देऊ शकता? (मत्तय १०:२७)
१८ येशूने त्याच्या शिष्यांना राज्याचा आनंदाचा संदेश इतरांना सांगायची आज्ञा दिली. (मत्तय १०:२७ वाचा.) बायबल विद्यार्थी त्याच्या विश्वासाबद्दल इतरांना जितक्या लवकर सांगेल, तितक्या लवकर तो यहोवावर अवलंबून राहायला शिकेल. मग, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला हे ध्येय ठेवायला कशी मदत करू शकता? जेव्हा मंडळीमध्ये एखाद्या प्रचार मोहिमेची घोषणा केली जाते, तेव्हा प्रचारक बनण्यासाठी विद्यार्थ्याला काय करावं लागेल याचा विचार करायचं प्रोत्साहन तुम्ही त्याला देऊ शकता. सहसा अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये प्रचार करायला सोपं जातं, हे तुम्ही त्याला सांगू शकता. आठवड्याच्या मध्ये होणाऱ्या सभेत विद्यार्थी भाग केल्यामुळेसुद्धा त्याला फायदा होऊ शकतो. हे ध्येय गाठल्यामुळे त्याला इतरांना त्याच्या विश्वासाबद्दल सांगता येईल.
विद्यार्थ्यावर भरवसा असल्याचं दाखवा
१९. येशूने त्याच्या शिष्यांवर भरवसा असल्याचं कसं दाखवलं आणि आपण त्याच्यासारखं कसं वागू शकतो?
१९ स्वर्गात जाण्याआधी येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं, की ते पुन्हा त्याला भेटतील. खरंतर येशूला असं म्हणायचं होतं, की पुढे त्याचे हे शिष्य त्याच्यासोबत स्वर्गात असतील. पण, ही गोष्ट त्याच्या शिष्यांना तेव्हा कळली नव्हती. कदाचित त्यांच्या मनात काही शंका असाव्यात. तरीसुद्धा येशूने त्यांच्या शंकांवर नाही तर त्यांच्या एकनिष्ठेवर लक्ष दिलं. (योहा. १४:१-५, ८) येशूला माहीत होतं, की ‘स्वर्गातल्या जीवनाची आशा’ यांसारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागेल. (योहा. १६:१२) आपल्या बायबल विद्यार्थ्यालासुद्धा यहोवाला खूश करायची इच्छा आहे. म्हणून येशूसारखंच आपणसुद्धा त्याच्यावर भरवसा असल्याचं दाखवू शकतो.
बायबल विद्यार्थी त्याच्या विश्वासाबद्दल इतरांना जितक्या लवकर सांगेल, तितक्या लवकर तो यहोवावर अवलंबून राहायला शिकेल
२०. मलावीतल्या बहिणीने तिच्या बायबल विद्यार्थीनीवर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?
२० आपल्या बायबल विद्यार्थ्याला योग्य तेच करायचं आहे याबद्दल आपण खातरी बाळगू शकतो. मलावीमध्ये राहणाऱ्या चिफुन्डो नावाच्या बहिणीचा विचार करा. तिने अलिनाफे नावाच्या एका कॅथोलिक स्त्रीसोबत कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. या पुस्तकातला १४ वा अध्याय संपल्यानंतर चिफुन्डोने अलिनाफेला उपासनेत मूर्तींचा वापर करण्याबद्दल तिला काय वाटतं हे विचारलं. तेव्हा अलिनाफे खूप भावुक झाली. आणि तिने म्हटलं: “हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.” आता बायबल अभ्यास इथेच बंद पडतो की काय, असं चिफुन्डोला वाटलं. पण तिने धीराने अलिनाफेसोबत बायबल अभ्यास सुरू ठेवला. कारण, तिला खातरी होती की काही काळानंतर तिला तो मुद्दा कळेल. काही महिन्यांनी चिफुन्डोने अलिनाफेला ३४ व्या अध्यायातला प्रश्न विचारला: “बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि खऱ्या देवाबद्दल म्हणजेच यहोवाबद्दल शिकून घेतल्यामुळे आतापर्यंत तुम्हाला कोणते फायदे झाले आहेत?”अलीनाफेने जे उत्तर दिलं त्याबद्दल चिफुन्डो म्हणते: “तिने बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यांपैकी एक म्हणजे, यहोवाचे साक्षीदार बायबलच्या विरोधात असलेल्या कोणत्याच गोष्टी करत नाहीत.” यानंतर लगेच अलिनाफेने उपासनेत मूर्तींचा वापर करायचं सोडून दिलं आणि बाप्तिस्मा घेतला.
२१. आपण सत्याची बाजू घेऊ शकतो याबद्दल बायबल विद्यार्थ्याचा आत्मविश्वास आपण कसा वाढवू शकतो?
२१ “वाढवणारा” जरी यहोवा असला तरी बायबल विद्यार्थ्याला प्रगती करण्यासाठी मदत करण्यात आपलीसुद्धा भूमिका आहे. (१ करिंथ. ३:७) देव त्याच्याकडून काय अपेक्षा करतो हे तर आपण त्याला शिकवतोच, शिवाय आपण त्याला इतरही बऱ्याच गोष्टी शिकवतो. आपण त्याला यहोवावरचं प्रेम वाढवायला मदत करतो. त्याला यहोवाच्या सेवेला जीवनात पहिली जागा द्यायला प्रोत्साहन देतो. समस्या येतात तेव्हा त्याला यहोवावर अवलंबून राहायला शिकवतो. तसंच, आपण त्याच्यावर भरवसा असल्याचंसुद्धा दाखवतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो, की तो यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगू शकतो आणि सत्याची बाजू घेऊ शकतो.
गीत ५५ भिऊ नको वैऱ्यांना!
a येशूला भेटल्याच्या अडीच वर्षानंतरसुद्धा निकदेम यहुदी न्यायसभेचा सदस्य होता. (योहा. ७:४५-५२) एका संदर्भानुसार येशूच्या मृत्यूनंतरच निकदेम त्याचा शिष्य बनला असावा.—योहा. १९:३८-४०.
b चित्राचं वर्णन: पूर्ण वेळेची सेवा करण्यासाठी पेत्र आणि इतर जण मासेमारीचा व्यवसाय सोडून देतात.
c चित्राचं वर्णन: एक बहीण तिच्या विद्यार्थीनीला प्रचारात कसं बोलायचं याची तयारी करायला मदत करते.