वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जुलै पृ. १४-१९
  • तुम्ही यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय?
  • यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखणं का गरजेचं आहे?
  • आपण यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे कसं ओळखू शकतो?
  • आपण नेहमी शिकतच राहू
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • “आजच ठरवा तुम्ही कोणाची उपासना करणार”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जुलै पृ. १४-१९

२१-२७ सप्टेंबर, २०२६

गीत १२ महान देव यहोवा

तुम्ही यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत आहात का?

‘आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे आणि पूर्ण हृदयाने त्याची सेवा कर’—१ इति. २८:९.

या लेखात:

यहोवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो, आपण त्याला चांगल्या प्रकारे का ओळखलं पाहिजे आणि आपण ते कसं करू शकतो ते पाहा.

१. आपण यहोवाची बुद्धी, ज्ञान आणि त्याने केलेल्या अद्‌भुत गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं?

यहोवा देवाची बुद्धी किती विशाल आहे, त्याचं ज्ञान किती अफाट आहे आणि त्याने केलेल्या गोष्टी किती अद्‌भुत आहेत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण आपल्या महान निर्माणकर्त्याचा विचार करतो, तेव्हा आपण त्याच्यासमोर किती क्षुल्लक आहोत याची आपल्याला जाणीव होते. आपल्यालाही प्रेषित पौलसारखंच वाटतं. त्याने लिहिलं: “त्याची बुद्धी आणि ज्ञान किती अफाट आहे! त्याचे निर्णय सखोल आणि मार्ग आपल्या बुद्धीपलीकडे आहेत.”—रोम. ११:३३, ३४.

२. आपण यहोवाला ओळखू शकतो असं का म्हणता येईल?

२ यहोवाबद्दल आपल्याला सगळं काही जाणून घेता येत नसलं, तरी आपण काही प्रमाणात त्याला नक्कीच ओळखू शकतो. दावीदने त्याचा मुलगा शलमोन याला असं सांगितलं: ‘तू आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे आणि पूर्ण हृदयाने त्याची सेवा कर. तू त्याला शोधलंस तर तो तुला सापडेल.’ (१ इति. २८:९) याच्या हजारो वर्षांनंतर प्रेषित योहानने ख्रिश्‍चनांना अशी आठवण करून दिली: “त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून त्याने आपल्याला बुद्धी दिली आहे.” (१ योहा. ५:२०) आणि येशूनेही असं म्हटलं होतं, “ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, तोच पित्याला ओळखतो.”—मत्त. ११:२७.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

३ यहोवाची सेवा करणाऱ्‍या सगळ्यांनीच यहोवाबद्दल बरंच काही शिकून घेतलंय. पण असं असलं तरी, आपण त्याला आणखी “ओळखणं गरजेचं आहे.” (योहा. १७:३) यहोवाला खूश करण्याबद्दल आणि त्याच्यावरचा आपला भरवसा वाढवण्याबद्दल आपण नेहमीच शिकत राहू शकतो. म्हणूनच या लेखात आपण तीन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: यहोवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय? त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखणं का गरजेचं आहे? आणि आपण ते कसं करू शकतो? आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो, तरीही या प्रश्‍नांवर चर्चा केल्यामुळे आपल्याला फायदा होईल.

यहोवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय?

४. यहोवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो?

४ बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांबद्दल यहोवा जे बोलला, त्यावरून त्याला ओळखण्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला समजतं. त्याने असं म्हटलं होतं: “मी यहोवा आहे हे ओळखणारं हृदय मी त्यांना देईन.” (यिर्म. २४:७) त्या यहुद्यांना यहोवाबद्दल आधीपासूनच माहीत होतं यात काही शंका नाही. पण आता त्यांना यहोवाला ओळखायचं होतं, म्हणजे त्याच्यासोबतचं नातं मजबूत करायचं होतं. एका संदर्भात याबद्दल असं म्हटलंय: “प्रेमाबद्दल वाचण्यात आणि प्रेमात पडण्यात जसा फरक आहे, तसाच यहोवाबद्दल माहीत असण्यात आणि त्याला ओळखण्यात फरक आहे.” मग देवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय? देवाला ओळखणं म्हणजे, त्याचं नाव यहोवा आहे फक्‍त एवढंच माहीत असणं नाही, तर तो कशा प्रकारची व्यक्‍ती आहे आणि त्याच्यात कोणकोणते गुण आहेत हे माहीत असणं आहे.

५. यहोवाला ओळखण्याबद्दल आपण योशीया राजाकडून काय शिकतो?

५ आपण यहोवाबद्दल जसजसं जाणून घेऊ, तसतसं आपण काय केल्याने त्याला आनंद होईल किंवा त्याला वाईट वाटेल हे आपल्याला कळेल. योशीया राजाचंच उदाहरण घ्या. बायबलमध्ये त्याच्याबद्दल असं म्हटलंय: “तो आपल्या राज्याच्या आठव्या वर्षी, अद्याप लहानच असता आपला पूर्वज दावीद याच्या देवाला शोधू लागला.” (२ इति. ३४:३ पं.र.भा.) या वचनात सांगितल्याप्रमाणे तो “देवाला शोधू लागला,” म्हणजे त्याच्याबद्दल शिकू लागला. पण योशीया यहोवाबद्दल फक्‍त शिकलाच नाही, तर शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागलासुद्धा. हे आपल्याला कसं कळतं? यहोवाने यिर्मयाला योशीयाबद्दल असं लिहून ठेवायला सांगितलं: “त्याने खरेपणाने न्याय केला आणि तो नीतीने वागला . . . त्याच्याकडे आलेल्या दीनदुबळ्यांना आणि गरिबांना त्याने न्याय दिला.” म्हणूनच यहोवाने पुढे असं म्हटलं: “मला ओळखण्याचा हाच अर्थ होत नाही का?”—यिर्म. २२:१५, १६.

६. स्तोत्र ९:१० मध्ये सांगितल्याप्रमाणे, यहोवाला ओळखल्यामुळे आणखी काय होऊ शकतं?

६ स्तोत्र ९:१० वाचा. आपण यहोवाला जसजसं ओळखू लागतो, तसतसं त्याच्यावरचा आपला विश्‍वास आणखी वाढतो. पौलच्या बाबतीतही हेच खरं होतं. त्याच्या मृत्यूच्या आधी तो कैदेत होता, तेव्हा त्याने असं लिहिलं: “मला याची लाज वाटत नाही. कारण ज्याच्यावर मी विश्‍वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो.” (२ तीम. १:१२) पौलच्या जीवनात ज्या घटना घडल्या त्यामुळे त्याचा देवावरचा विश्‍वास आणखी वाढला. पौलला पूर्ण भरवसा होता, की यहोवा त्याला आणि त्याच्या सेवेला कधीच विसरणार नाही आणि त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याला तो पुन्हा जिवंत करेल.

यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखणं का गरजेचं आहे?

७. काळाच्या ओघात आपल्यासोबत काय होऊ शकतं?

७ आपण सुरुवातीला यहोवाबद्दल शिकू लागतो, तेव्हा त्याला ओळखण्यासाठी आपण बरीच मेहनत घेतो. पण काळाच्या ओघात आपण आधीसारखी मेहनत घ्यायला कमी पडतो. असं का होऊ शकतं? याचं एक कारण म्हणजे, आपण बायबल वाचतो किंवा मंडळीत बायबल वाचलं जातं, तेव्हा त्या माहितीचा आपल्याला आणि इतरांना कसा फायदा होईल याचाच आपण जास्त विचार करतो आणि असं करणं काही चुकीचं नाही. कारण बायबलमध्येच आपल्याला असं करायचं प्रोत्साहन दिलंय. (२ तीम. ३:१६, १७) पण बायबल वाचताना आपण आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘यातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?’a—स्तो. २५:८-१०.

८. यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यामुळे त्याच्यासोबतच्या आपल्या मैत्रीवर कसा परिणाम होईल? (स्तोत्र ७३:२४-२८)

८ आपण जसजसं यहोवाला आणखी ओळखू लागतो, तसतसं त्याच्यासोबतची आपली मैत्री घट्ट होते. विचार करा, तुम्ही रोज बायबल वाचता, ब्रॉडकास्टिंग पाहता, एखाद्या संमेलनाला किंवा अधिवेशनाला जाता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? यात काही शंका नाही, की तुम्हाला यहोवाच्या आणखी जवळ गेल्यासारखं वाटतं. असं का होतं? कारण तुम्ही त्याच्याबद्दल बरंच शिकून घेतलेलं असतं. त्यामुळेच तुम्ही त्याची स्तुती करायला आणि त्याचे आभार मानायला प्रवृत्त होता. याबाबतीत आपल्या सगळ्यांनाच स्तोत्रकर्त्यासारखं वाटतं. यहोवाने त्याची कशी काळजी घेतली यावर त्याने जेव्हा मनन केलं, तेव्हा तो असं म्हणाला: “देव माझा खडक आहे, तो माझ्या मनाला बळ देतो. तोच माझा सर्वकाळाचा वाटा आहे.” (स्तोत्र ७३:२४-२८ वाचा.) यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण मेहनत घेतो, तेव्हा त्याच्यासोबतच्या मैत्रीची आपली कदर आणखी वाढते.

९. यहोवाची ‘आठवण ठेवल्यामुळे’ आपल्याला चांगले निर्णय घ्यायला कशी मदत होते? उदाहरण द्या.

९ बायबलमध्ये असं सांगितलंय, की आपण सगळ्या कामांमध्ये यहोवाची ‘आठवण ठेवावी.’ (नीति. ३:५, ६) याचा अर्थ, आपण त्याच्याबद्दल जे शिकलोय त्याचा आणि आपल्या वागण्या-बोलण्यामुळे त्याला कसं वाटेल याचा विचार करणं असा होतो. असं केल्यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील. जसं बरेच भाऊबहीण त्यांच्या जोडीदाराचा फोटो त्यांच्या पाकीटात किंवा फोनवर ठेवतात. यामुळे तो पाहिल्यावर त्यांना त्यांच्या जोडीदारावर असलेल्या त्यांच्या प्रेमाची आठवण होते आणि यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यांचा जोडीदार खूश होईल की दुःखी होईल याचा विचार करायला त्यांना मदत होते. त्याच प्रकारे, आपण यहोवाबद्दल जितका जास्त विचार करू, तितकं जास्त त्याला आवडतील असे निर्णय घ्यायला आपल्याला मदत होईल.—स्तो. १९:१३, १४.

१०. यहोवाबद्दल जास्तीत जास्त शिकून घेतल्यामुळे आपल्याला काय करता येईल?

१० यहोवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं असल्यामुळे आपण त्याच्यासारखे गुण दाखवू शकतो. (उत्प. १:२६) आपण जितकं जास्त त्याच्या गुणांबद्दल शिकून घेऊ, तितकं जास्त त्याच्यासारखं वागायला आपल्याला मदत होईल. येशूच्या काळातले शास्त्री आणि परूशी यहोवासारखे गुण दाखवायला कमी पडले, त्यामुळे येशूने त्यांना फटकारलं. ते नियमशास्त्रातल्या छोट्याछोट्या गोष्टी करण्यावर खूप भर द्यायचे. ‘पण, नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय, दया आणि विश्‍वासूपणा यांकडे ते दुर्लक्ष करायचे.’ (मत्त. २३:२३) आपल्याला त्यांच्यासारखं व्हायची इच्छा नाही. त्यामुळे बायबलमधल्या नियमांमधून आणि तत्त्वांमधून आपल्याला यहोवाच्या कोणकोणत्या गुणांबद्दल शिकायला मिळतं हे जाणून घ्यायचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला त्याच्यासारखे गुण वाढवता येतील.—१ योहा. ४:८, ११.

आपण यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे कसं ओळखू शकतो?

११. तुम्हाला यहोवाबद्दल कसं समजलं?

११ तुम्हाला यहोवाबद्दल कसं समजलं? कदाचित तुम्ही सत्यात लहानाचे मोठे झाले असाल. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला देवाच्या सुंदर गुणांबद्दल शिकवण्यासाठी बायबलमधल्या गोष्टी सांगितल्या असतील किंवा सृष्टीतल्या गोष्टींबद्दल सांगितलं असेल. कदाचित, तुम्हाला एखाद्या साक्षीदाराकडून यहोवाबद्दल समजलं असेल आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! सारख्या एखाद्या पुस्तकातून तुमचा अभ्यास झाला असेल. तुमचा बायबल अभ्यास घेणाऱ्‍याने बायबलमधल्या अहवालांवर आणि सृष्टीतल्या गोष्टींवर विचार करायला तुम्हाला मदत केली असेल. त्यामुळे तुम्हाला यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल शिकता आलं असेल.b (नहे. ८:८; प्रे. कार्यं १४:१७) आता आपण पाहू की आपण यहोवाबद्दल पुढेही कसं शिकत राहू शकतो.

१२-१३. बायबल वाचल्यामुळे आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? उदाहरण द्या. (यिर्मया ३९:१५-१८) (चित्रसुद्धा पाहा.)

१२ पहिलं म्हणजे, बायबल वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं. बायबलमध्ये काही ठिकाणी यहोवाच्या गुणांबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे. (निर्ग. ३४:६, ७) पण त्यात बऱ्‍याच ठिकाणी लोकांबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असे अहवाल वाचता, तेव्हा तुम्हाला त्यांतून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं याचा विचार करा.

१३ एका उदाहरणाचा विचार करा. यिर्मया ३८:६-१३ या वचनात आपल्याला इथियोपियाच्या एबद-मलेखबद्दल वाचायला मिळतं. यिर्मया संदेष्ट्याला वाचवणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, तरी त्याने त्याला वाचवलं. यावरून त्याचं धैर्य आणि प्रेम हे गुण लगेच दिसून येतात. पण या अहवालातून तुम्हाला यहोवाचे गुणही दिसून येतात का? (यिर्मया ३९:१५-१८ वाचा.) जसं की, यहोवा आपली कदर करतो, तो न्यायी आहे आणि तो भेदभाव करत नाही हे तुम्हाला दिसून आलं का? याशिवाय या अहवालातून तुम्हाला यहोवाचे आणखी कोणते गुण पाहायला मिळाले? तुम्ही बायबलचा एखादा अहवाल वाचता तेव्हा त्यातून यहोवाचे गुण कसे दिसून येतात याचा विचार करा आणि त्यासाठी त्याचे आभार मानून त्याची स्तुती करा.

एबद-मलेख आणि काही माणसं दोरांच्या साहाय्याने यिर्मयाला कोरड्या विहिरीतून बाहेर काढत आहेत. तसंच हातात हत्यारं असलेली इतर माणसं आजूबाजूला लक्ष देत आहेत.

एबद-मलेखने धाडस दाखवून यिर्मयाला कोरड्या विहिरीतून बाहेर काढलं (परिच्छेद १२-१३ पाहा)


१४. सृष्टीतल्या गोष्टींवर आपण खोलवर विचार का केला पाहिजे?

१४ दुसरं म्हणजे, सृष्टीतल्या गोष्टींवर मनन करणं. (स्तो. १४५:९, १०) यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी फक्‍त निसर्गातल्या गोष्टी पाहणंच पुरेसं नाही. कारण कितीतरी लोक निसर्गाचा अभ्यास करण्यात त्यांचं अख्खं आयुष्य घालवतात. तरी त्यांना देवाच्या गुणांबद्दल कळत नाही. इतकंच काय, तर एवढा अभ्यास करूनही ते देवाच्या अस्तित्वाला नाकारतात. प्रेषित पौलने असं लिहिलं: ‘जगाच्या निर्मितीपासूनच देवाचे अदृश्‍य गुण त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात.’ (रोम. १:२०) आणखी एका बायबल भाषांतरात हे वचन अशा प्रकारे देण्यात आलंय: “एखाद्याने थोडा जरी विचार केला, तरी त्याला देवाचे गुण स्पष्टपणे दिसून येतील.” म्हणून आपण सृष्टीतल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला देवाचे गुण समजतील.

१५. यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी पॅट्रीकने काय केलं आणि आपणही काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ बरेच लोक शहरात राहतात त्यामुळे त्यांना निसर्गातल्या गोष्टी सहसा पाहायला मिळत नाहीत. मग अशा परिस्थितीतही आपण सृष्टीतल्या गोष्टींतून यहोवाबद्दल कसं शिकू शकतो? काँगो प्रजासत्ताक या देशातल्या ब्राझव्हिल नावाच्या एका मोठ्या शहरात राहणारा पॅट्रीक म्हणतो: “माझ्या घराच्या बाल्कनीतून मी सृष्टीतल्या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न करतो. मला बऱ्‍याचदा छोटे किडे किंवा पक्षी अन्‍न किंवा राहायची जागा शोधताना दिसतात. एकदा मी पाहिलं की काही पक्षी घरटं बांधण्यासाठी काही गोष्टी गोळा करत आहेत. त्यानंतर त्यांनी एक सुंदर घरटं बनवलं आणि त्यात अंडी घातली.” हे पाहून पॅट्रीक आपल्या निर्माणकर्त्याबद्दल आणखी खोलवर विचार करू लागला. तो म्हणतो: “यहोवा छोट्याछोट्या पक्ष्यांचीसुद्धा काळजी घेतो यावरून मला याची खातरी पटते, की तो माझीही नेहमी काळजी घेईल आणि माझ्या गरजा पूर्ण करेल.”

मोठ्या शहरात राहणारी एक बहीण बाल्कनीतल्या तिच्या झाडांना पाणी घालत असताना फुलांचा रस शोषणाऱ्‍या हमिंगबर्डकडे पाहत आहे.

सृष्टीतल्या गोष्टींवर मनन करून यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखा (परिच्छेद १५ पाहा)


१६. यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मरीयाला कशी मदत झाली आणि आपण तिचं अनुकरण कसं करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ तिसरं म्हणजे, यहोवाने आपल्याला कशी मदत केली आहे याचा विचार करणं. येशूची आई मरीया हिनेही असंच केलं. तिला आधीपासूनच यहोवाबद्दल बरंच काही माहीत होतं आणि ‘देवाने तिच्यावर कृपा केली होती.’ (लूक १:३०) मग तिला देवाच्या मुलाची आई होण्याची एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. यहोवाने गब्रीएल स्वर्गदूताचा आणि तिची नातेवाईक अलीशिबा हिचा वापर करून तिला बळ दिलं आणि मदत केली. तिला आलेल्या अनुभवातून यहोवाचे कोणते गुण दिसून येतात यावर तिने नंतर मनन केलं. यहोवा किती शक्‍तिशाली आहे, दयाळू आहे, तो भेदभाव करत नाही आणि समाजात क्षुल्लक समजल्या जाणाऱ्‍या लोकांचीही तो काळजी घेतो यावर तिने मनन केलं. (लूक १:४६-५५) यहोवाने केलेल्या मदतीसाठी मरीया कृतज्ञ होती, तसंच आपणही आपल्याला योग्य वेळी मिळालेल्या मदतीसाठी कृतज्ञ असलं पाहिजे. (इब्री ४:१६) यहोवा तुम्हाला मदत करतो तेव्हा स्वतःला विचारा: ‘यातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? आणि यातून त्याचे कोणते गुण दिसून येतात?’

कोलाज: एक भाऊ यहोवाने त्याला पूर्वी कशी मदत केली हे आठवतोय. १. सभेत चांगल्या प्रकारे भाग सादर करता यावा म्हणून त्याने यहोवाला कळकळीने प्रार्थना केली होती. २. त्याने सभेत चांगल्या प्रकारे भाग सादर केला होता.

यहोवाने तुम्हाला कशी मदत केली याचा विचार करून त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखा (परिच्छेद १६ पाहा) c


आपण नेहमी शिकतच राहू

१७-१८. आपण यहोवाबद्दल कितीही शिकलो तरी ते कमीच आहे असं आपण का म्हणू शकतो?

१७ नवीन जगात आपल्याला यहोवाबद्दल किती शिकता येईल याचा विचार करा. त्या वेळी यहोवाला खूश करण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजण्यासाठी नवीन गुंडाळ्या उघडल्या जातील. (प्रकटी. २०:१२) यहोवाने बनवलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला आणखी शिकता येईल. (यश. ११:६-९) आज यहोवाबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्‍याच गोष्टी आपल्याला तेव्हा कळतील. आपल्या जवळचे लोक पुन्हा उठतील आणि आपण सगळे हळूहळू परिपूर्ण होत जाऊ.

१८ आपण यहोवाबद्दल कितीही शिकलो तरी ते कमीच आहे. कारण तो अनादिकाळापासून अस्तित्वात आहे आणि “त्याची बुद्धी अमर्याद आहे.” (स्तो. ९०:२; १४७:५) त्याने “जे काही केलं आहे, ते माणसाला कधीही पूर्णपणे समजणार नाही.” (उप. ३:११) त्यामुळे आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो, तरी आपण आपल्या निर्माणकर्त्याबद्दल शिकत राहण्याच्या प्रत्येक संधीचं सोनं करू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय?

  • यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखणं का गरजेचं आहे?

  • आपण यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे कसं ओळखू शकतो?

गीत २८ यहोवा तुझे मित्र कोण?

a पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यामध्ये सुरुवातीला असलेल्या “देवाच्या वचनाबद्दल थोडी माहिती” या भागातला प्रश्‍न २० पाहा.

b कायम जीवनाचा आनंद घ्या! पुस्तकातला धडा ०७ मुद्दे ५-७ पाहा.

c चित्राचं वर्णन: एका भावाला भाषण द्यायला खूप भीती वाटते, पण यहोवाने त्याला आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत त्याचा भाग करायला कशी मदत केली यावर तो मनन करतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा