वाचकांचे प्रश्न
गलतीकर ४:२४ मध्ये प्रेषित पौल कोणत्या दोन करारांबद्दल सांगत होता?
अब्राहामचं सारा आणि हागारसोबत जे नातं होतं त्याचा उल्लेख केल्यावर पौल म्हणाला: “या गोष्टींमध्ये एक लाक्षणिक अर्थ दडलेला आहे. कारण, या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार.” (गलती. ४:२२-२४). आधी आपण असं मानायचो, की हे दोन करार नियमशास्त्राच्या कराराला आणि नवीन कराराला सूचित करतात. पण आणखी अभ्यास केल्यानंतर, या वचनाचा वेगळा अर्थ असल्याचं आपल्याला दिसून आलं. तो कोणता? तो म्हणजे पौल इथे नवीन कराराबद्दल नाही, तर अब्राहामच्या कराराबद्दल बोलत होता. असं आपण का म्हणू शकतो याची काही कारणं आपण पुढे पाहू या.a
पौलने हागारचा सिनाय पर्वताशी संबंध जोडला. (गलती. ४:२५) याचा अर्थ इ.स.पू. १५१३ मध्ये सिनाय पर्वतावर देण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या कराराला ती सूचित करत होती. (निर्ग. १९:५, ६) सगळेच मानव अपरिपूर्ण असल्यामुळे कोणीच हे नियमशास्त्र पूर्णपणे पाळू शकत नव्हतं. म्हणून या नियमशास्त्रामुळे यहुद्यांना आपण पापाचे गुलाम असल्याची सतत आठवण व्हायची. फक्त मसीहाच हे नियमशास्त्र पूर्णपणे पाळू शकत होता. म्हणून या करारामुळे त्याला ओळखायला इस्राएली लोकांना मदत होणार होती. तसंच, देवाचा उद्देश होता की अपरिपूर्ण माणसांची पापातून आणि मृत्यूतून सुटका व्हावी. आणि यासाठी मसीहाला आपलं जीवन बलिदान म्हणून द्याव लागणार होतं. (गलती. ३:१९, २४, २५) हा उद्देश पूर्ण झाल्यावर नियमशास्त्राची गरज पडणार नव्हती.—रोम. १०:४.
पौलने हगारची तुलना साराशी केली. सारा एक ‘स्वतंत्र स्त्री’ होती आणि तिच्या मुलाचा जन्म “अभिवचनाद्वारे झाला होता.” (गलती. ४:२३) हे अभिवचन म्हणजे अब्राहामशी केलेला करार आहे. (गलती. ३:२९; ४:२८, ३०) याबद्दल उत्पत्ती २२:१८ मध्ये असं म्हटलंय: “तुझ्या संततीमुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल, कारण तू माझं ऐकलं आहेस.”
अब्राहामसोबत केलेल्या या करारामुळे आपल्याला यहोवाने एदेन बागेत केलेल्या अभिवचनाबद्दल आणखी माहिती मिळते. (उत्प. ३:१५) यातून हे कळतं, की वचन दिलेली “संतती” अब्राहामच्या वंशातून येणार होती. या संततीचा प्रमुख भाग येशू आहे असं पौलने सांगितलं. तसंच, येशूसोबत त्याच्या राज्यात राज्य करणारे १,४४,००० अभिषिक्त जनसुद्धा या संततीचा भाग असणार होते. यांना पौलने ते “ख्रिस्ताचे आहेत” असं म्हटलं. (गलती. ३:१६, २९; प्रकटी. १४:१-३) यहोवाने अब्राहामशी केलेल्या करारामुळे, येशूला स्वीकारणाऱ्यांना आणि त्याची आज्ञा पाळणाऱ्यांना बरेच आशीर्वाद मिळतील.
पौलने या गोष्टींचा उल्लेख का केला असेल? कारण त्याला हे समजावून सांगायचं होतं, की त्याच्या काळातले यहुदी लोक नियमशास्त्र पाळण्यावर अडून राहिले तर ते हागारसारखे दास बनणार होते; म्हणजेच ते पाप आणि मृत्यूच्या गुलामगिरीत राहणार होते. पण जर त्यांनी अब्राहामच्या संततीच्या मुख्य भागाला, म्हणजे येशूला स्वीकारलं तर ते सारासारखे स्वतंत्र होणार होते; म्हणजेच त्यांची खऱ्या अर्थाने पाप आणि मृत्यूतून सुटका होणार होती. (योहा. ८:३२-३४) नियमशास्त्राच्या कराराचा मुख्य उद्देश यहुदी लोकांना ख्रिस्तापर्यंत घेऊन जाणं होता. पण जर त्यांनी येशूला स्विकारलं नसतं, तर त्यांना या कराराचा काहीच फायदा होणार नव्हता.
गलतीकर मंडळीतल्या ज्या ख्रिश्चनांना पौलने पत्र लिहिलं, त्यांतले बरेच जण गैर-यहुदी होते आणि त्यांनी कधीच नियमशास्त्रातल्या गोष्टी पाळल्या नव्हत्या. पण तरी काही यहुदी मत समर्थक असलेले ख्रिस्ती त्यांना नियमशास्त्र पाळण्याची जबरदस्ती करत होते. जसं की ते त्यांना सुंता करायला लावत होते. याबद्दल पौलने म्हटलं, की जर ख्रिस्ताचे असल्यामुळे त्यांना आधीच ‘स्वातंत्र्य’ मिळालं होतं, तर मग नियमशास्त्र पाळून पुन्हा ‘गुलामगिरीत’ जाण्यात काहीच अर्थ नव्हता!—गलती. ५:१, १०-१४.
a आपली आधीची समज काय होती याबद्दल १५ मार्च, २००६ च्या टेहळणी बरूज (हिंदी) अंकातल्या पान १०-१२ वरच्या लेखात सांगण्यात आलंय.