जीवन कथा
क्युबामध्ये ७० वर्षं यहोवाची सेवा करताना
माझा जन्म १९४७ साली क्युबा नावाच्या एका सुंदर बेटावर झाला. हे बेट उत्तर कॅरिबियन सागर आणि ॲटलांटिक महासागर यांचा संगम होतो तिथे वसलेलंय. माझ्या जन्मानंतर माझ्या दोन बहिणींचा जन्म झाला. मी, माझ्या दोन बहिणी आणि माझे आईवडील एस्मराल्डा नावाच्या गावात राहायचो.
आमचं गावातलं जीवन खूप सुखाचं होतं. माझे काही नातेवाईक आणि आजीआजोबासुद्धा आमच्या जवळच राहायचे. आमच्याकडे खाण्यापिण्याच्या पुरेशा गोष्टी असायच्या आणि आम्ही आनंदाने राहायचो.
मी पाच वर्षांचा असताना माझ्या आईवडिलांनी वॉल्टन जोन्स नावाच्या एका भावासोबत बायबल अभ्यास सुरू केला. ते भाऊ एक आवेशी प्रचारक होते. आमच्या गावात यायला त्यांना दहा तास चालत यावं लागायचं. प्रत्येक वेळी ते यायचे तेव्हा आमचे बरेच नातेवाईक माझ्या आजीआजोबांच्या घरी जमायचे. तिथे ते तासंतास बायबलवर चर्चा करायचे. माझे आईवडील, पेड्रो काका आणि एला आत्या यांना बायबलमधल्या गोष्टी खूप आवडायच्या. म्हणून त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला. माझी आत्या आज १०० वर्षांची आहे आणि आजही ती क्युबामध्ये पायनियर म्हणून सेवा करत आहे.
त्या वेळी, क्युबामध्ये यहोवाचे साक्षीदार स्वतंत्रपणे यहोवाची उपासना करू शकत होते. तिथे आम्ही घरोघरच्या प्रचार कार्यावरून ओळखले जायचो. आम्ही प्रचाराला जाताना बॅगेतून आणि ब्रिफकेसमधून भरपूर बायबल प्रकाशनं घेऊन जायचो. आम्ही प्रचारासाठी लांबपर्यंत चालत जायचो. आजही मला माझ्या आयुष्यातले ते चांगले दिवस आठवून खूप आनंद होतो. पण त्यानंतर आम्हाला वाईट दिवसही पाहावे लागले.—२ तीम. ४:२.
क्युबामधले वाईट दिवस
मी जवळजवळ पाच वर्षांचा असताना माझे वडील आणि काका संमेलनासाठी आमच्याच बेटावर एका दुसऱ्या ठिकाणी गेले होते. प्रवासादरम्यान दूषित पाणी पिल्यामुळे त्या दोघांनाही टायफॉईड झाला. ते घरी परत आले तेव्हा आजारपणामुळे माझ्या काकांच्या डोक्यावरचे सगळे केस गेले, पण ते वाचले. माझे वडील मात्र त्यातून वाचले नाहीत. ते वारले तेव्हा ते फक्त ३२ वर्षांचे होते.
माझे वडील वारल्यावर आईने आम्हा भावंडांना घेऊन माझ्या मामाच्या घरी जाऊन राहायचं ठरवलं. ते लोम्बियो या गावात राहायचे. आमचं आमच्या नातेवाइकांवर आणि आजीआजोबांवर खूप प्रेम होतं. पण आता आम्हाला त्या सगळ्यांना सोडून जावं लागणार होतं. असं असूनसुद्धा मामाच्या घरी राहून आम्ही यहोवाची सेवा करत राहिलो.
२६ ऑगस्ट, १९५७ ला लोम्बियो इथल्या एका तळ्यात माझा बाप्तिस्मा झाला. मी त्या वेळी दहा वर्षांचा होतो. त्याच्या दोन वर्षांच्या आतच क्युबामधल्या यहोवाच्या साक्षीदारांचं जीवन इतकं बदलून जाईल याचा मी जराही विचार केला नव्हता. १९५९ मध्ये तिथलं सरकार उलथून टाकण्यात आलं आणि तिथली सत्ता कम्युनिस्ट सरकाराच्या हाती गेली.
जास्तीत जास्त लोकांनी सैन्यात भरती व्हावं अशी या नवीन सरकाराची इच्छा होती. पण यहोवाचे साक्षीदार सैन्यात किंवा राजनैतिक गोष्टीत भाग घेत नसल्यामुळे त्यांचं जीवन कठीण झालं. यामुळे आम्हाला आधीसारखं स्वतंत्रपणे सभांना आणि प्रचाराला जाणं हळूहळू अवघड होत गेलं. पुढे काही काळातच आपल्या सगळ्या कामांवर बंदी आली. शेकडो भावांना तुरुंगात डांबण्यात आलं. काहींना तर वारंवार मारहाण केली जायची आणि उपाशीसुद्धा ठेवलं जायचं. कधीकधी तर त्यांना रक्त असलेलं जेवण दिलं जायचं.
इतक्या समस्या असूनही आम्ही उपासनेसाठी एकत्र यायचं सोडलं नाही. (इब्री १०:२५) आम्ही शेतांमध्ये आणि अशा प्रकारच्या इतर ठिकाणीसुद्धा संमेलनं भरवली. एकदा एका भावाने आम्हाला संमेलनासाठी त्याचं मैदान दिलं. तिथे तो मेंढरं पाळायचा. पण कार्यक्रमाआधी ते मैदान साफ करणं आणि तिथली मेंढरं हलवणं आम्हाला शक्य झालं नाही. त्यामुळे संमेलनात देवाची मेंढरं आणि खरोखरची मेंढरं दोन्ही हजर होती!—मीखा २:१२.
त्या काळात आम्हाला आध्यात्मिक अन्न मिळावं म्हणून भावांनी खूप मेहनत घेतली. जसं की, संमेलनांचे कार्यक्रम कॅसेटवर रेकॉर्ड केले जायचे आणि देशभरात साक्षीदारांपर्यंत ते पोचवले जायचे. कधीकधी फक्त दोनच भाऊ कार्यक्रमातली सगळी भाषणं तयार करायचे आणि ते रेकॉर्डही करायचे. हा कार्यक्रम गुप्त ठिकाणी रेकॉर्ड केला जात असल्यामुळे कधीकधी त्यात काही दुसरे आवाजही रेकॉर्ड व्हायचे; जसं की, कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज. जर संमेलनाच्या ठिकाणी वीजपुरवठा नसला, तर वीजनिर्मिती करण्यासाठी एक भाऊ स्टॅन्डवर लावलेल्या सायकलचं पेडल मारत राहायचा. सायकलला एक उपकरण (डायनामो) जोडलेलं असायचं आणि त्यामुळे वीजनिर्मिती व्हायची. अशा प्रकारे टेप रेकॉर्डरवर आम्हाला भाषणं ऐकता यायची. आमची परिस्थिती चांगली नसली किंवा इतर देशातल्या भाऊबहिणींसारखं आमच्याकडे भरपूर छापील प्रकाशनं नसली, तरी आम्हाला कधीच आध्यात्मिक अन्नाची टंचाई भासली नाही. त्या कठीण काळातही आम्ही एकत्र येऊन आनंदाने यहोवाची उपासना करत राहिलो.—नहे. ८:१०.
पायनियर सेवा करणं आणि मुलांना वाढवणं
मी १८ वर्षांचा झाल्यानंतर लगेचच फ्लोरीडामध्ये पायनियर सेवा सुरू केली. एक वर्षानंतर मला कामाग्वे इथे खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. हे क्युबामधलं सगळ्यात मोठं शहर आहे. तिथे मी एमिलीया नावाच्या एका सुंदर मुलीला भेटलो. ती सॅन्टियागो दे क्युबा इथली होती. आम्ही डेटिंग करू लागलो आणि एका वर्षातच आमचं लग्न झालं.
(डावीकडे) १९६६ साली क्युबामधल्या कामाग्वे इथे झालेली वडिलांसाठीची राज्य सेवा प्रशाला
(उजवीकडे) १९६७ साली आमच्या लग्नाच्या दिवशी
मी एका सरकारी साखर कारखान्यात पूर्ण वेळची नोकरी करू लागलो. त्यामुळे मला आणि एमिलीयाला पायनियर सेवा सोडावी लागली. पण तरी आम्हाला आध्यात्मिक गोष्टींसाठी जास्तीत जास्त वेळ द्यायची इच्छा होती. तसं तर मला सकाळी लवकर उठायला आवडायचं नाही, पण तरी मी पहाटे तीन ते सकाळी अकरा पर्यंतची पाळी मागून घेतली. त्यामुळे मला प्रचाराला जाणं आणि एमिलीयासोबत सभांना नियमितपणे जाणं शक्य झालं.
१९६९ मध्ये आमच्या पहिल्या मुलाचा, गस्तावोचा जन्म झाला. त्या वेळी मला भावांनी विभागीय पर्यवेक्षक म्हणून पुन्हा पूर्ण वेळची सेवा सुरू करण्यासाठी विचारलं. त्या काळात विभागीय पर्यवेक्षकाला मुलंबाळं असली तरी चालायचं. या नेमणुकीमुळे आमचा सगळ्यात आनंदाचा पण सगळ्यात व्यस्त असा जीवन-प्रवास सुरू झाला. अशा प्रकारे आपल्या भाऊबहिणींची सेवा करायची संधी मिळणं माझ्यासाठी आणि एमिलीयासाठी खूप मोठा बहुमान होता. नंतर विभागीय सेवेत असतानाच आमचा दुसरा मुलगा ओबेद आणि मग अबनेर याचा जन्म झाला. काही वर्षांनंतर आमची छोटी मुलगी माहेल हिचा जन्म झाला.
विभागीय कामात घालवलेल्या वेळेची आज जेव्हा मला आठवण होते, तेव्हा यहोवाने क्युबामधल्या त्याच्या लोकांना कसा आशीर्वाद दिलाय हे पाहून मला खूप आनंद होतो. तसंच, आमच्या मुलांच्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम रुजवण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली, त्यावरही त्याने किती आशीर्वाद दिला हे पाहून मला आनंद होतो. विभागीय सेवेतलं माझं आणि एमिलीयाचं जीवन कसं होतं याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो.
देशात बंदी असताना विभागीय सेवा करणं
१९६० आणि १९७० च्या दशकांत आम्हाला देशातल्या बंदीची झळ बसू लागली. राज्य सभागृहं बंद पाडण्यात आली. मिशनरी भाऊबहिणींना देशातून पाठवून देण्यात आलं. बऱ्याच तरुण भावांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. आणि हवानामधलं शाखा कार्यालयसुद्धा बंद पाडण्यात आलं.
१९९० च्या दशकात विभागीय कार्यात असताना
बंदीमुळे आम्ही मंडळींना फक्त आठवड्याच्या शेवटीच भेटी देऊ शकत होतो. त्यामुळे प्रत्येक मंडळीला आम्ही दोन आठवडे शनिवार-रविवार भेटी द्यायला जायचो. आम्ही जास्त सामान घेऊन जात नव्हतो आणि सहसा सायकलीवरून जायचो. त्यामुळे आम्ही लोकांच्या जास्त नजरेत येत नव्हतो. आम्ही मंडळीला भेट देणार आहोत ही गोष्ट जाहीर केली जात नव्हती. आम्ही असं दाखवायचो, की आम्ही आमच्या नातेवाइकांना भेटायला आलोय. हे करणं सोपं होतं. कधीकधी आम्ही विसरूनच जायचो की आम्ही सेवेसाठी तिथे आलोय. कारण आम्ही खरोखरच आमच्या नातेवाइकांकडे आलोय असं आम्हाला वाटायचं. (मार्क १०:२९, ३०) पण तरी, आम्हाला सावध राहावं लागायचं. कारण पोलीस सहसा आमचा पाठलाग करायचे आणि चौकशीही करायचे. आम्ही तिथे का आलोय हे जर त्यांना कळलं असतं तर आम्ही ज्यांच्या घरी राहतोय, त्या भाऊबहिणींनाही अटक होण्याची शक्यता असायची.—रोम. १६:४.
त्या दरम्यान आम्हाला बऱ्याच भाऊबहिणींनी कमालीची उदारता दाखवली. त्यांच्याकडे जास्त काही नसायचं, तरी ते आम्हाला मदत करायला नेहमी तयार असायचे. काही ठिकाणी भरमसाठ डास असायचे. तिथे आम्हाला रात्री सुखाची झोप मिळावी म्हणून भाऊबहीण त्यांच्याकडची एकमेव मच्छरदाणी आम्हाला द्यायचे. इतर काही जणांकडे खाण्यापिण्याच्या गोष्टींचा तुटवडा असायचा, तरी ते आमची त्यांच्या घरी सोय करायचे. कधीकधी आम्ही स्वतःच घरून जेवण घेऊन जायचो आणि त्यांनाही त्यातून द्यायचो.
मंडळ्यांना भेट देताना आम्ही सगळ्याच मुलांना सोबत घेऊन जात नव्हतो. आम्ही फक्त एका मुलाला सोबत घ्यायचो आणि बाकीच्यांना माझ्या आई आणि बहिणीकडे सोडायचो. खरंतर, लहान बाळाला घेऊन गेल्यामुळे आमचंच संरक्षण व्हायचं. कारण, बऱ्याच वेळेस पोलीस आमची झडती घ्यायचे. पण आम्ही आपली प्रकाशनं बाळाने घाण केलेल्या डायपरच्या पिशवीत लपवायचो. पोलीस या पिशवीची कधीच झडती घेत नव्हते.
एमिलीयाने पूर्ण वेळच्या सेवेत माझी खूप साथ दिली. तसंच, ती मुलांची काळजी घेण्यातही कधी कमी पडली नाही. मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करताना साखर कारखान्यातही नोकरी करत होतो. शनिवारी-रविवारी मला मंडळ्यांच्या भेटीसाठी जाता यावं, म्हणून मी कधीकधी आठवड्यात एक किंवा दोन दिवस दोनदोन पाळ्या करायचो. नंतर मला टीमचा लीडर बनवण्यात आलं. त्यामुळे मला आठवड्याच्या सातही दिवस कामाला जाणं भाग होतं. पण मी माझ्या टीमला शनिवार-रविवारसाठी पुरेसं काम द्यायचो आणि भेटींसाठी जायचो. माझ्या लक्षात आलं, की त्यांच्याकडे पुरेसं काम असेल तर मी कामाला आलेलो नाही ही गोष्ट ते कोणालाच सांगायचे नाहीत. खरंतर, मी आठवड्याच्या शेवटी कामावर जायचो नाही हे माझ्या बॉसला कधीच कळलं नाही!
बदलत्या परिस्थितीतही आनंदी
१९९४ साली बंदी उठल्यानंतर झालेलं पहिलं अधिवेशन
१९९४ मध्ये एका दिवशी, क्युबामध्ये पुढाकार घेणाऱ्या भावांनी हवानामध्ये एक खास सभा भरवायचं ठरवलं. तिथे त्यांनी सर्व ८० प्रवासी पर्यवेक्षकांना बोलावलं. इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटून आम्हाला किती आनंद झाला हे मला सांगता येणार नाही! त्या सभेत आम्ही संघटनेत होणाऱ्या काही बदलांबद्दल आधी चर्चा केली. त्यानंतर एक धक्कादायक घोषणा करण्यात आली. भावांनी आम्हाला सांगितलं, की ते अधिकाऱ्यांना आमच्याबद्दल माहिती देणार आहेत.
त्यांनी आम्हाला सांगितलं, की सरकार आणि यहोवाच्या साक्षीदारांमधले संबंध सुधारण्यासाठी ते सरकारी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. त्या भेटींदरम्यान अधिकाऱ्यांनी सगळ्या विभागीय पर्यवेक्षकांच्या नावांची यादी मागितली. म्हणून आम्ही सगळे आमची नावं द्यायला तयार झालो. याचा परिणाम म्हणजे, सरकार आणि आमचे संबंध चांगले होऊ लागले.
काही काळानंतर आम्हाला सभेला आणि प्रचाराला जायची मोकळीक मिळाली. पण अजूनही आम्हाला देशात कायदेशीर मान्यता मिळाली नव्हती. आम्हाला नंतर कळलं, की अधिकाऱ्यांना आमच्यापैकी काही प्रवासी पर्यवेक्षकांची नावं तर आधीपासूनच माहीत होती. त्यांना फक्त आमच्याकडून खातरी करून घ्यायची होती.
सप्टेंबर १९९४ मध्ये आम्हाला शाखा कार्यालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली. विशेष म्हणजे, २० वर्षांआधी जी इमारत शाखेच्या कामासाठी वापरली जायची, तीच इमारत आता आम्हाला पुन्हा वापरता येणार होती.
१९९६ मध्ये मला आणि एमिलीयाला बेथेलमध्ये सेवा करायचं आमंत्रण मिळालं. सुरुवातीला तर आम्हाला विश्वासच बसला नाही! मी भावांना सांगितलं, की माझ्यावर अजूनही दोन मुलांची जबाबदारी आहे. पण तरीसुद्धा आम्ही बेथेलला यावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आम्ही ते आमंत्रण स्वीकारलं आणि आमच्या मुलांना घेऊन हवानाला जायची तयारी करू लागलो.
(डावीकडे) २००० च्या दशकात एमिलीया क्युबा शाखा कार्यालयात शिवण विभागात काम करताना
(उजवीकडे) २०१२ साली झालेलं संमेलनगृहाचं समर्पण
खरं सांगायचं तर, सुरुवातीला मला बेथेलमध्ये काम करायला इतकं काही आवडायचं नाही. मी बरीच वर्षं विभागीय कार्यात असल्यामुळे माझं मन अजूनही तिथेच होतं. त्यामुळे ऑफिसमध्ये बसून काम करायला मला अवघड जायचं. पण याबाबतीत बेथेलमधल्या भाऊबहिणींनी आणि खासकरून एमिलीयाने माझा दृष्टिकोन बदलायला मला खूप मदत केली. त्यामुळे मला माझा हरवलेला आनंद पुन्हा मिळवता आला आणि मी आजही आनंदाने बेथेलमध्ये सेवा करतोय.
(डावीकडे) २०१३ साली झालेली ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला
(उजवीकडे) २०१३ साली क्युबामधली शाखा समिती
संमेलनात आमच्या मुलीसोबत आणि जावयासोबत
आता आमचं वय झालंय. इतक्या वर्षांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या भाऊबहिणींना जाणून घ्यायची, त्यांना मदत करायची संधी मिळाली याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. आमची मुलं आणि नातवंडंही यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो. आम्हालाही प्रेषित योहानसारखंच वाटतं. त्याने म्हटलं: “माझी मुलं सत्याच्या मार्गावर चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.”—३ योहा. ४.
आम्हाला बेथेलमध्ये सेवा करून जवळजवळ ३० वर्षं झाली आहेत. कॅन्सर आणि म्हातारपणाशी आम्हाला रोज झगडावं लागतं. पण असं असलं, तरी आमची नेमणूक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आम्ही शक्य ते सगळं करायचा प्रयत्न करतो. आजपर्यंत यहोवाच्या सेवेत आम्हाला बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागलंय. पण तरी गेल्या ७० वर्षांपासून क्युबा बेटावर आम्ही ‘आनंदी देवाची’ पूर्ण मनाने सेवा करत आहोत!—१ तीम. १:११; स्तो. ९७:१.