बायबलमधून नवीन काहीतरी
मासेमारीच्या जाळ्या
येशूचे काही शिष्य कोळी होते. (मार्क १:१६-२०) गालील समुद्रात मासे पकडण्यासाठी ते जाळीचा वापर करायचे.
मासे पकडण्याची जाळी सुतळी किंवा लिननच्या दोऱ्याने विणली जायची. छोटी छिद्रं असलेली जाळी छोटे मासे पकडण्यासाठी तर मोठी छिद्रं असलेली जाळी मोठे मासे पकडण्यासाठी वापरली जायची. छोट्या जाळीच्या बाजूला शिसं किंवा दगडाची वजनं लावली जायची. यामुळे ती जाळी पाण्यावर तरंगण्याऐवजी पाण्यात बुडायची आणि त्यात मासे अडकले जायचे. तर मोठ्या जाळीच्या खालच्या बाजूला वजनं लावली जायची आणि वरच्या बाजूला लाकडाची फळी किंवा ठोकळे बांधले जायचे. यामुळे जाळीचा वरचा भाग पाण्यावर तरंगायचा आणि खालचा भाग पाण्याखाली जायचा.
मासे पकडायची जाळी महाग असायची. बऱ्याचदा ती समुद्रतळाला असलेल्या खडकांमुळे किंवा माशांच्या वजनामुळे ती फाटायची. (लूक ५:६) बायबलमध्ये याकोब आणि योहान त्यांची “जाळी नीट करत होते” असं सांगितलंय. यासाठी ते लिननच्या दोऱ्याने ती जाळी शिवत असतील. (मत्त. ४:२१) मासेमारी करणारे कदाचित प्रत्येक वापरानंतर ती जाळी शिवत असावेत. तसंच, ते आपली जाळी धूत होते असा लूकनेही उल्लेख केला. कदाचित ते त्यात अडकलेला गाळ किंवा कचरा काढत असतील. (लूक ५:२) यानंतर, ते त्यांची जाळी सडू नये म्हणून वाळवायचे.—यहे. ४७:१०.
येशूने मासेमारी करणाऱ्या त्याच्या शिष्यांना आता मासे नाही तर “माणसं धरणारे” बनण्याचं आमंत्रण दिलं.