१०-१६ ऑगस्ट, २०२६
गीत १२२ निर्भय व निश्चयी राहा!
विश्वासाची परीक्षा होत असतानाही यहोवाला एकनिष्ठ राहा
“प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.”—योहा. ६:६८.
या लेखात:
आपल्या विश्वासाची कोणत्याही प्रकारे परीक्षा झाली तरी आपण यहोवाला कसं एकनिष्ठ राहू शकतो ते पाहा.
१-२. येशू कफर्णहूममध्ये शिकवत होता तेव्हा काय झालं?
एकदा कफर्णहूममध्ये लोकांच्या जमावाला शिकवताना येशू म्हणाला: “जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या मुलाचं मांस खात नाही आणि त्याचं रक्त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही. जो माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळालंय आणि मी शेवटच्या दिवशी त्याला पुन्हा जिवंत करीन.” (योहा. ६:५३, ५४) पण ही गोष्टी त्याच्या बऱ्याच शिष्यांना आवडली नाही. ते म्हणाले: “काय बोलतोय हा? कोण ऐकून घेईल अशा गोष्टी?”—योहा. ६:६०.
२ येशूने सांगितलेल्या गोष्टी ज्यांना पटल्या नाहीत, ते त्याला सोडून गेले. मग त्यांचा येशूवर अजिबातच विश्वास नव्हता असा याचा अर्थ होतो का? नाही. कारण या घटनेच्या काही काळाआधीच येशूने केलेला चमत्कार पाहून ते म्हणाले होते, “जो संदेष्टा जगात येणार होता, तो हाच आहे.” (योहा. ६:१४) यावरून कळतं, की त्यांचा काही प्रमाणात येशूवर विश्वास होता. पण त्यांच्या विश्वासाची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा ते त्याला एकनिष्ठ राहिले नाहीत.
३. येशूचे शब्द ऐकून प्रेषितांनी काय केलं आणि का? (चित्रसुद्धा पाहा.)
३ पण येशूच्या प्रेषितांनी मात्र तसं केलं नाही. तुम्हालाही जायचंय का, असं येशूने त्यांना विचारलं तेव्हा पेत्र म्हणाला: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत. आम्ही विश्वास ठेवलाय आणि देवाचा जो पवित्र, तो तूच आहेस हे आम्ही ओळखलंय.” (योहा. ६:६८, ६९) येशूचं मांस खाण्याचा आणि रक्त पिण्याचा नेमका काय अर्थ होतो हे पेत्रला आणि इतर प्रेषितांना त्या वेळी जरी पूर्णपणे समजलं नसलं, तरी ते त्याला एकनिष्ठ राहिले. कारण, “[येशू] देवाने पाठवलेला ख्रिस्त” आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.—लूक ९:२०, ३५.
येशूचे बरेच शिष्य त्याला सोडून गेले, पण पेत्र आणि इतर प्रेषित मात्र त्याला जडून राहिले (परिच्छेद ३ पाहा)
४. कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते?
४ आज काही वेळा संघटनेकडून बायबल वचानांबद्दलची आपली समज सुधारली जाऊ शकते किंवा प्रचार कामाच्या पद्धतीत फेरबदल केले जाऊ शकतात. तसंच आपल्यावर एखादं संकट कोसळतं, तेव्हा यहोवाने हे का थांबवलं नाही असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. शिवाय, कधीकधी आपले भाऊबहीण आपलं मन दुखावू शकतात किंवा आपण ज्यांचा खूप आदर करतो तेच आपल्याशी वाईट वागू शकतात. अशा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते.
५. आपला विश्वास मजबूत असणं का गरजेचं आहे? उदाहरण द्या. (कलस्सैकर १:२३)
५ आपल्याला जर कठीण परिस्थितींत यहोवाला विश्वासू राहायचं असेल, तर आपला विश्वास मजबूत असणं गरजेचं आहे. जसं एखाद्या इमारतीचा पाया भक्कम असेल, तर कितीही मोठा भूकंप आला तरी ती स्थिर राहू शकते. त्याच प्रकारे, आपला विश्वास जर मजबूत असेल, तर कितीही बिकट परिस्थिती आली तरी आपण विश्वासात स्थिर राहू शकतो. म्हणून आपण आपला विश्वास मजबूत करत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण यहोवाची उपासना करत राहू.—१ करिंथ. १५:५८; कलस्सैकर १:२३ वाचा.
६. येशूचे प्रेषित त्याला एकनिष्ठ का राहू शकले?
६ येशूचे प्रेषित त्याला एकनिष्ठ का राहू शकले? यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे त्याला आपली उपासना मिळवायचा हक्क आहे याची त्यांना खातरी होती. तसंच त्यांना याचीही खातरी होती, की येशू देवाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडेच “सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी” आहेत. शिवाय, त्याला यहोवाचा पूर्ण पाठिंबा आहे हेही त्यांना माहीत होतं. आज आपल्याही विश्वासाची वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये परीक्षा होऊ शकते. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी, कोणती तीन सत्यं लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला विश्वासात टिकून राहायला मदत होऊ शकते यावर आपण चर्चा करू या. (१) यहोवा निर्माणकर्ता आहे. (२) बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय. (३) यहोवाच आपली संघटना चालवतोय. जर आपला या सत्यांवर ठाम विश्वास असेल, तर कोणत्याही परिस्थितींत आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहायला मदत होईल.
यहोवा निर्माणकर्ता आहे
७. प्रकटीकरण ४:११ मध्ये यहोवाबद्दल काय सांगितलंय आणि आपण परीक्षेत असताना यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?
७ प्रकटीकरण ४:११ वाचा. यहोवानेच सगळं काही बनवलंय याची या वचनातून आपल्याला खातरी पटते. खरंतर त्याची उपासना करण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे. तो किती शक्तिशाली आहे यावर आपण विचार करतो, तेव्हा तो आपल्याला सगळ्या संकटातून वाचवू शकतो याची आपल्याला खातरी पटते. पण आपण असा विचार करू नये, असं सैतानाला वाटतं. म्हणूनच तो आज लोकांच्या मनात यहोवाबद्दल चुकीच्या गोष्टी भरवायचा प्रयत्न करतो. बरेच वैज्ञानिकसुद्धा असा दावा करतात, की जीवनाची सुरुवात आपोआप झाली आणि निर्माणकर्ता वगैरे काही नाही. पण यहोवा निर्माणकर्ता आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे याची आपल्याला जर पूर्ण खातरी असेल, तर आपल्या मनात त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका येणार नाही. तसंच, आपल्या विश्वासाची परीक्षा होते तेव्हा तो आपल्याला वाचवेल की नाही असा प्रश्नही आपल्याला पडणार नाही.—इब्री ११:६.
८-९. यहोवाच निर्माणकर्ता आहे याबद्दल तुमच्या मनात शंका आली तर तुम्ही काय करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
८ यहोवाच्या अस्तित्वाबद्दल तुमच्या मनात जराही शंका असेल, तर लगेच पाऊल उचला. यहोवाच निर्माणकर्ता आहे याचा पुरावा देणाऱ्या आपल्या प्रकाशनांचा तुम्ही सखोल अभ्यास करू शकता. वॉझ लाईफ क्रिएटेड? आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न या माहितीपत्रकांचा वापर करून तुम्ही तुमचा विश्वास वाढवू शकता. यासोबतच jw.org वरच्या “उत्क्रांती की निर्मिती?” या मालिकेमुळेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. अमेरिकेत राहणारी आपली एक तरुण बहीण जेसिका म्हणते: “जीवसृष्टीची सुरुवात या माहितीपत्रकामुळे एक बुद्धिमान निर्माणकर्ता अस्तित्वात आहे यावरचा माझा भरवसा आणखी वाढला. मला हे आधीपासूनच माहीत होतं. पण या माहितीपत्रकातल्या तर्कांवर विचार केल्यामुळे आता माझ्या मनात जराही शंका उरलेली नाही.” तसंच, बऱ्याच भाऊबहिणींना कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या सहाव्या आणि सातव्या धड्यामुळेही खूप फायदा झालाय. कदाचित तुम्ही याआधी हे धडे वाचले असतील. पण तुम्ही पुन्हा एकदा त्यांचा अभ्यास करू शकता.
९ तुमच्या वैयक्तिक अभ्यासात तुम्ही देवाच्या अस्तित्वाबद्दलच्या पुराव्यांचा विचार करू शकता. यामुळे तुमचा यहोवाच्या अस्तित्वावरचा भरवसा तर वाढेलच, शिवाय यहोवाच्या गुणांबद्दलही तुम्हाला बरंच काही शिकता येईल. (रोम. १:२०) तसंच, या माहितीमुळे तुम्हाला यहोवाच्या अस्तित्वावर इतरांचा भरवसा वाढवायलाही मदत होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर, यहोवाच निर्माणकर्ता आहे हे सांगणारे बरेच पुरावे त्याने आपल्याला दिले आहेत.
Nebula: IAC/RGO/David Malin Images; fish and car: Mercedes-Benz USA; plane: Kristen Bartlett/University of Florida
कदाचित तुम्ही वॉज लाईफ क्रिएटेड हे माहितीपत्रक वाचलं असेल. पण तुम्ही ते पुन्हा वाचू शकता (परिच्छेद ८ पाहा)
बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय
१०. बायबल आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? (२ तीमथ्य ३:१६, १७)
१० २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा. बायबल हे यहोवाकडून सर्व मानवांना मिळालेलं एक पत्र आहे. त्यात आपल्याला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तसंच, यहोवाची इच्छा काय आहे आणि तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो याबद्दलही आपल्याला त्यातून कळतं. यहोवाच बायबलचा लेखक आहे असा आपला विश्वास असल्यामुळे, ते आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यामुळेच त्यातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्या जीवनात लागू करण्यासाठी आपण शक्य ते सगळं करतो.
११. बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय याची तुम्हाला कशामुळे खातरी पटते?
११ बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय याची आपल्याला खातरी का आहे? याची बरीच कारणं आहेत. जसं की, इतिहासाबद्दल ते अचूक माहिती देतं. (लूक ३:१, २) तसंच, निसर्गाबद्दलसुद्धा त्यात अचूक माहिती देण्यात आली आहे. (ईयो. २६:७) सैतानाने बायबलचं नामोनिशाण मिटवायचा इतका प्रयत्न करूनसुद्धा त्याचा कट यशस्वी झाला नाही. उलट आतापर्यंत कोणत्याच पुस्तकाचं बायबलइतकं वितरण झालेलं नाही. बायबलचं लिखाण ४० वेगवेगळ्या लोकांनी १,६०० वर्षांच्या काळात केलं. तरीसुद्धा त्यातला संदेश सुसंगत आहे आणि त्यातला सल्ला आजही रोजच्या जीवनात खूप फायदेकारक आहे. (नीति. १३:२०; १५:२१; मत्त. ७:१२) इतकंच काय, तर बायबलच्या कित्येक भविष्यवाण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बायबलवरचा आपला भरवसा आणखी वाढतो. (यहो. २३:१४) खरंच, बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेलं पुस्तक आहे!
१२. बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय याबद्दल जर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही काय करू शकता?
१२ बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय याबद्दल जर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता आणि त्याप्रमाणे पावलंही उचलू शकता. आपला एक तरुण भाऊ जॉर्डन याचा विचार करा. तो सत्यातच लहानाचा मोठा झाला. तो म्हणतो: “मला जे काही सांगितलं जातं, त्यावर मी असाच विश्वास ठेवत नाही तर मी स्वतः त्या गोष्टी तपासून पाहतो. खरं सांगायचं तर, आजही माझ्या मनात काही वेळा शंका येतात. पण असं होतं तेव्हा मी आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करून माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आणि माझ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो.” बायबल यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलंय यावरचा आपला भरवसा जर आपणसुद्धा वाढवला, तर आपल्या विश्वासाचा पाया भक्कम होईल.—१ करिंथ. ३:१२, १३.
यहोवाच आपली संघटना चालवतोय
१३. देवाचे लोक कोण आहेत याबद्दल तुमच्या मनात शंका येत असेल तर तुम्ही काय करू शकता?
१३ यहोवाच्या साक्षीदारांची संघटना यहोवाच चालवतोय, याबद्दल जर तुमच्या मनात जराही शंका आली तर लगेच पाऊल उचला. तुमच्या शंकांचं निरसण करण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा: ‘आज कोणते लोक बायबलच्या स्तरांप्रमाणे जगण्यासाठी शक्य ते सगळं करतात? कोणत्या संघटनेच्या शिकवणी फक्त बायबलवर आधारित आहेत?’ (२ तीम. ४:३, ४) ‘आज यहोवाची इच्छा कोण पूर्ण करतंय?’—मत्त. ७:२०, २१.
१४. आज यहोवा त्याच्या लोकांचा वापर करून मत्तय २४:१४ मधली भविष्यवाणी कशी पूर्ण करतोय?
१४ या दुष्ट जगाचा अंत होण्याआधी सगळ्या लोकांना देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश ऐकायला मिळावा, अशी यहोवाची इच्छा आहे. जरा विचार करा, ‘आज प्रचाराचं हे काम कोण करतंय?’ (मत्त. २४:१४) याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. फक्त यहोवाचे साक्षीदार! खरंतर, यहोवाच आपला वापर करून हे काम पूर्ण करतोय. फक्त आपणच २४० पेक्षा जास्त देशांमध्ये राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करतोय. हे काम आपण १०० पेक्षा जास्त वर्षांपासून करत आलोय. खरंच, देवाच्या लोकांनी प्रचाराच्या कामाला कायमच महत्त्व दिलंय.—मत्त. २८:१९, २०.
१५. यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी आज यहोवाच्या साक्षीदारांनी काय केलंय? (मत्तय ६:९; यशया ४३:१०)
१५ मत्तय ६:९ आणि यशया ४३:१० वाचा. आपल्याला यहोवा देवाच्या नावाने ओळखलं जातं. आणि यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे. देवाचं नाव यहोवा आहे, हे आज जगातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही. पण पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यामध्ये बायबलच्या मूळ लिखाणांत जिथेजिथे यहोवाचं नाव होतं, तिथेतिथे ते टाकण्यात आलंय. त्यात ७,००० पेक्षा जास्त वेळा यहोवाचं नाव आलंय. हे बायबल प्रकाशित करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी खूप मेहनत घेतली आहे.
१६. यहोवाचे साक्षीदार योहान १३:३४, ३५ मध्ये दिलेली आज्ञा पाळत आहेत असं आपण का म्हणू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ योहान १३:३४, ३५ वाचा. आज जगात आपल्याला जिथे पाहावं तिथे लोकांमध्ये द्वेष असल्याचं आणि त्यांच्यात फुटी पडल्याचं पाहायला मिळतं. पण आपल्या भाऊबहिणींच्या बाबतीत अगदी उलट आहे. ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि त्यांच्यात एकता आहे. खरंतर, हा एक चमत्कारच आहे! आपण जगातल्या वेगवेगळ्या भागांतून असलो, आपली संस्कृती वेगवेगळी असली आणि आपण कोणत्याही परिस्थितीत वाढलो असलो, तरी आपण आपल्यातलं प्रेम वाढवायचा आणि शांती टिकवून ठेवायचा होताहोईल तितका प्रयत्न करतो. आपण जगातल्या कोणत्याही मंडळीत गेलो, तरी आपल्याला एकसारखंच प्रेम आणि एकता पाहायला मिळते. यावरून हेच स्पष्ट होतं, की आज यहोवा त्याच्या लोकांचा म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांचा वापर करून त्याची इच्छा पूर्ण करतोय. ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, तर आपल्या विश्वासाची परीक्षा होत असतानाही यहोवाला एकनिष्ठ राहायला आपल्याला मदत होईल.
आपल्या भाऊबहिणींमधलं प्रेम आणि एकता हा एक चमत्कारच आहे! (परिच्छेद १६ पाहा) a
यहोवाला कधीच सोडू नका
१७-१८. आपल्यासमोर कोणती आव्हानं येऊ शकतात, पण आपण कशाची खातरी ठेवू शकतो?
१७ आपण शेवटच्या काळात जगत असल्यामुळे आपल्यासमोर आणखी आव्हानं येतील. (२ तीम. ३:१, १३) कदाचित संघटनेने घेतलेले निर्णय आपल्याला पूर्णपणे समजणार नाहीत. तसंच, संघटनेने दिलेलं मार्गदर्शन आपल्याला कधीकधी पटणार नाही किंवा ते लागू करणं कदाचित कठीण जाईल. शिवाय, भाऊबहिणींना आपल्याबद्दल गैरसमज होऊ शकतो किंवा ते आपलं मन दुखावू शकतात. अशा परिस्थितींना तोंड देताना आपल्यासोबत हे का घडतंय आणि आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कधीकधी कळत नाही.
१८ या समस्यांमुळे आपण कितीही खचून गेलो, तरी आपण यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहू शकतो. पण यासाठी आपल्याला काही गोष्टींवर पूर्ण भरवसा ठेवावा लागेल; त्या म्हणजे यहोवाच निर्माणकर्ता आहे, बायबल त्याचं वचन आहे आणि तोच आपली संघटना चालवतोय. जर आपण असं केलं, तर पेत्रने येशूला जे म्हटलं तेच आपणही यहोवाला म्हणू शकू: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.”
गीत १२३ देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला
a चित्राचं वर्णन: एक बहीण आणि तिची लहान मुलगी बसमधून प्रवास करत आहेत. बाहेर रस्त्यावर इतर भाऊबहिणींना प्रचार करताना पाहून त्यांना आनंद होतोय.