वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 मे पृ. २६-३१
  • इतरांच्या निर्णयांचा आदर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांच्या निर्णयांचा आदर करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला इतरांचे निर्णय पटणार नाहीत?
  • आपण इतरांच्या निर्णयांचा आदर का केला पाहिजे?
  • आपण इतरांच्या मतांचा आदर कसा करू शकतो?
  • यहोवाला आवडतील असे निर्णय घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 मे पृ. २६-३१

३-९ ऑगस्ट, २०२६

गीत ११३ शांतीचा ठेवा

इतरांच्या निर्णयांचा आदर करा

“वैयक्‍तिक मतांवरून कोणाचा न्याय करू नका”—रोम. १४:१.

या लेखात:

इतरांनी घेतलेले निर्णय आपल्याला पटत नसले, तरी आपण त्यांचा आदर कसा करू शकतो ते पाहा.

१-२. कधीकधी आपले निर्णय इतर भाऊबहिणींपेक्षा वेगळे का असू शकतात?

तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे कोणी तुमची कधी टीका केली आहे का? किंवा इतरांनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही त्यांची टीका केली आहे का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असं घडलं असेल यात काही शंका नाही.

२ आपले विचार किंवा निर्णय नेहमी इतरांशी जुळतीलच असं नाही. का बरं? कारण आपण सगळे वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसंच, आपण ज्या संस्कृतीत आणि ज्या वातावरणात वाढलोय आणि आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्याचा आपल्या विचारांवर प्रभाव पडतो. पण आपली मतं जरी वेगळी असली, तरी त्यामुळे मंडळीतली एकता आणि शांती भंग होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे.—इफिस. ४:३.

३. इतरांनी घेतलेला निर्णय आपल्याला पटत नसला तर आपल्याला काय करावंसं वाटू शकतं?

३ जेव्हा भाऊबहिणींनी घेतलेला निर्णय आपल्याला पटत नाही, तेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा असं आपल्याला वाटू शकतं. किंवा त्यांनी घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे हे आपण इतरांना सांगावं असंही आपल्याला वाटू शकतं. आपलं त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे आणि त्यांची काळजी असल्यामुळे त्यांचं काही नुकसान होऊ नये असं आपल्याला वाटतं. (नीति. १७:१७) तसंच, त्यांच्या निर्णयाचा नंतर त्यांना पस्तावा होऊ नये आणि यहोवासोबतचं त्यांचं नातं धोक्यात येऊ नये असंही आपल्याला वाटतं.

४-५. ‘मी एखाद्याच्या जागी असतो तर मी असा निर्णय घेतला नसता’ असं आपल्याला वाटत असेल तर काय?

४ एखाद्याने घेतलेला निर्णय आपल्याला पटत नसेल, तर आपण त्याच्याशी जाऊन बोललं पाहिजे का? असं करण्याआधी आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की, त्याने घेतलेल्या निर्णयामुळे खरंच बायबलचं तत्त्व मोडतंय का? असं असेल तर प्रेमापोटी आपण त्याचे विचार बदलायला त्याला नक्की मदत केली पाहिजे. (नीति. २७:५, ६) पण फक्‍त आपण त्याच्या जागेवर असतो तर आपण असा निर्णय घेतला नसता, असं आपल्याला वाटत असेल तर काय? अशा वेळी आपण या लेखाचं मुख्य वचन लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात म्हटलंय: “वैयक्‍तिक मतांवरून कोणाचा न्याय करू नका.”—रोम. १४:१.

५ असं असलं तरी, इतरांच्या निर्णयांचा आदर करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणूनच आपण इतरांच्या निर्णयाचा आदर का केला पाहिजे आणि आपण तो कसा करू शकतो हे या लेखात आपण पाहू या. पण सर्वात आधी आपण पाहू, की कोणत्या परिस्थितींमुळे आपल्याला भाऊबहिणींचे निर्णय पटणार नाहीत.

कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला इतरांचे निर्णय पटणार नाहीत?

६-७. आपल्याला इतरांचे कोणते निर्णय कदाचित खटकू शकतात? उदाहरण द्या.

६ आधी पाहिल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमुळे किंवा आपल्याला आलेल्या अनुभवांमुळे काही गोष्टींबद्दल आपली ठाम मतं असू शकतात. आणि इतरांचीही तिच मतं असावीत असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. पण हे बरोबर आहे का? काही परिस्थितींचा विचार करा. पहिली परिस्थिती: एक भाऊ लहान असताना त्याचे वडील खूप दारू प्यायचे. त्यामुळे दारूबद्दल त्याचं एक विशिष्ट मत आहे. एका पार्टीत तो काही भाऊबहिणींना दारू पिताना पाहतो आणि ते चुकीचं आहे असं त्याला वाटतं. दुसरी परिस्थिती: एक बहीण गंभीर आजारातून बरी होते. नंतर तिला समजतं, की आणखी एका बहिणीला तोच आजार झालाय. तिला त्या बहिणीला मदत करायची इच्छा असते. त्यामुळे त्या बहिणीनेही तिच्यासारखाच इलाज करावा, औषध-गोळ्या घ्याव्यात किंवा घरगुती उपाय करावेत असं ती तिला सांगते. तिसरी परिस्थिती: सत्य शिकण्याआधी एक भाऊ चर्चला जायचा. पण आता त्याला त्याचं आधीचं जीवन मुळीच आवडत नाही. जेव्हा एक भाऊ अंत्यविधीसाठी चर्चमध्ये गेल्याचं त्याला कळतं तेव्हा तो नाराज होतो.a

७ आणखी काही परिस्थितींचा विचार करा. चौथी परिस्थिती: एक भाऊ मोठा होत असताना त्याने हेच ऐकलं होतं, की भावांनी दाढी ठेवणं आणि बहिणींना सभांना, प्रचाराला आणि संमेलनांना फॉर्मल ट्राउजर किंवा पॅन्ट घालणं चुकीचं आहे. संघटनेने याबद्दल आपली समज सुधारली असली, तरी हे चुकीचं आहे असं तो भाऊबहिणींना सांगतो. पाचवी परिस्थिती: आणखी शिक्षण घेतल्यामुळे एक भाऊ सत्य सोडून गेल्याचं एका वडिलाला माहीत आहे. आता त्याच्या मंडळीतल्या एका तरुणाने आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलंय. पण त्याची काळजी वाटत असल्यामुळे तो वडील त्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं पटवून द्यायचा प्रयत्न करतो.

८. (क) कोणत्या गोष्टीमुळे आईवडील इतर आईवडिलांची टीका करू शकतात? (ख) इतरांचं वागणं चुकीचं आहे असा विचार करत राहिल्यामुळे मंडळीवर काय परिणाम होऊ शकतो?

८ आता आईवडिलांसमोर येणाऱ्‍या एका परिस्थितीचा विचार करा. सहावी परिस्थिती: तुम्ही तुमच्या मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवायला खूप मेहनत घेता. (इफिस. ६:४) पण दुसरे काही आईवडील त्यांच्या मुलांना खूप सूट देतात. जसं की, त्यांची मुलं उशीरा घरी आली तरी ते त्यांना रागवत नाहीत, त्यांना हिंसक नसलेले व्हिडिओ गेम खेळू देतात आणि कमी वयातच फोनही घेऊन देतात. त्यामुळे तुमच्या मुलांना वाटतं, की तुम्ही त्यांच्याशी खूपच सक्‍तीने वागता. ते कदाचित म्हणतील, “माझ्या मित्राचे मम्मी-पप्पा किती चांगले आहेत. तुम्ही त्यांच्यासारखं का नाही वागत?” म्हणून इतर आईवडिलांचं वागणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटेल. हे खरंय, की इतरांचे निर्णय आपल्यापेक्षा वेगळे असतात तेव्हा आपल्यात मतभेद होऊ शकतात. उदाहरणार्थ, इतर जण जसे पैसे खर्च करतात, जितक्या वेळा फिरायला जातात किंवा जसं मनोरंजन निवडतात ते आपल्याला खटकू शकतं. पण त्यांचं वागणं चुकीचं आहे असा आपण विचार करत राहिलो, तर मंडळीत फूट पडू शकते. त्यामुळे आपण आपल्या भावनांना मंडळीच्या एकतेपेक्षा जास्त महत्त्वाचं समजू नये.

९. आपण कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

९ कदाचित एका परिस्थितीत दोन लोक वेगवेगळे निर्णय घेतील आणि ते दोन्ही निर्णय बरोबर असतील. (रोम. १४:५) हे खरंय, की बायबलमध्ये आपल्याला “एकमताने विचार” करायचं प्रोत्साहन देण्यात आलंय. पण हा सल्ला निर्णय घेण्याच्या बाबतीत नाही, तर यहोवाची तत्त्वं पाळण्याबद्दल देण्यात आलाय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचेच निर्णय सारखे असतील असं नाही. (२ करिंथ. १३:११) हे समजायला एक उदाहरण घ्या. एखाद्या ठिकाणी जायला वेगवेगळे रस्ते असू शकतात. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या परिस्थितीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे वेगवेगळा रस्ता निवडेल. त्याच प्रकारे, आपले वैयक्‍तिक निर्णय वेगळे असले तरी आपलं ध्येयं मात्र एकच आहे. ते म्हणजे, यहोवाला खूश करणं. म्हणून आपण इतरांच्या निर्णयाबद्दल मत बनवणं चुकीचं ठरेल.—मत्त. ७:१; १ थेस्सलनी. ४:११.

रस्ता शोधण्यासाठी असलेलं एक ॲप फोनवर उघडलेलं आहे, त्यात एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळे मार्ग आणि साधनं दिसत आहेत.

एखाद्या ठिकाणी जायला वेगवेगळे रस्ते असू शकतात; त्याच प्रकारे, प्रत्येक भाऊबहिणीचे निर्णयही वेगवेगळे असू शकतात (परिच्छेद ९ पाहा)


आपण इतरांच्या निर्णयांचा आदर का केला पाहिजे?

१०. याकोब ४:१२ प्रमाणे आपल्याला कोणता अधिकार नाही आणि का?

१० आपण इतरांच्या निर्णयांचा आदर का केला पाहिजे याबद्दल बायबलमध्ये बरीच कारणं सांगितली आहेत. त्यांपैकी काहींचा आता आपण विचार करू या. इतरांच्या निर्णयांवरून त्यांचा न्याय करायचा अधिकार आपल्याला नाही. (याकोब ४:१२ वाचा.) बायबलमध्ये म्हटलंय: “नियम देणारा आणि न्यायाधीश फक्‍त [यहोवा] आहे.” बरोबर काय आणि चूक काय हे ठरवण्याचा अधिकार फक्‍त त्यालाच आहे. म्हणून आपले भाऊबहीण त्यांच्या निर्णयांसाठी आपल्याला नाही तर यहोवाला हिशोब देतील. (रोम. १४:१०) त्यामुळे आपल्या मतांच्या आधारावर इतरांचा न्याय करणं चुकीचंय.b

११. आपण मंडळीच्या एकतेला हातभार कसा लावू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

११ यहोवाला वाटतं की त्याच्या सेवकांमध्ये एकता असावी, ते एकसारखेच असावेत असं त्याला वाटत नाही. खरंतर, त्याला विविधता खूप आवडते! आणि हीच गोष्ट त्याने बनवलेल्या सृष्टीतूनही दिसून येते. जरा विचार करा, यहोवाने प्रत्येक फुल वेगळं बनवलंय. मानवांचाही विचार करा. जगात ८०० कोटी लोक आहेत. पण कोणत्याही दोन लोकांचा चेहरा, स्वभाव किंवा आवडीनिवडी हुबेहूब सारख्या नसतात. यहोवाने मुळात आपल्याला एकसारखं बनवलेलंच नाही. त्यामुळे त्याच्या सेवकांमध्ये विविधता असली, तरी या विविधतेत एकता असावी असं त्याला वाटतं. म्हणून आपण आपला वेगळेपणा स्वीकारला पाहिजे. आपल्या वेगळेपणामुळे आपल्यात फूट पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या मतांपेक्षा किंवा आवडीनिवडींपेक्षा आपल्या मंडळीची शांती आणि एकता सगळ्यात महत्त्वाची आहे हे आपण विसरून चालणार नाही.—रोम. १४:१९.

वेगवेगळ्या वंशातले आणि वयोगटातले भाऊबहीण सोबत मिळून जेवणाचा आनंद लुटत आहेत. त्यांतले काही जण मद्य घेत आहेत तर काही नाहीत. तसंच, काही जण ब्रेड खात आहेत तर काही नाहीत.

यहोवाने आपल्याला एकमेकांपेक्षा वेगळं बनवलं असलं, तरी आपल्यात एकता असावी असं त्याला वाटतं (परिच्छेद ११ पाहा)


आपण इतरांच्या मतांचा आदर कसा करू शकतो?

१२-१३. एखाद्याने “चुकीचं पाऊल” उचललंय असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? (गलतीकर ६:१; “पटत नसतं तेव्हा . . . ” ही चौकटसुद्धा पाहा.)

१२ इतर जण निर्णय घेतात तेव्हा, स्वतःला विचारा: ‘तो खरंच “चुकीचं पाऊल” उचलतोय की फक्‍त माझ्यापेक्षा वेगळा विचार करतोय?’ जर तो खरंच चुकीचं पाऊल उचलणार असेल, म्हणजे बायबलचं तत्त्व मोडणार असेल तर स्वतःला विचारा: ‘त्याला सुधारण्यासाठी बायबलमध्ये सांगितलेली पात्रता खरंच माझ्याकडे आहे का? की मंडळीचे वडील त्याला याबाबतीत मदत करू शकतात?’ जर तुमच्याकडे ती पात्रता असेल, तर सौम्यतेने त्याची चूक सुधारा. (गलतीकर ६:१ वाचा.) पण जर तुम्हाला कळलं, की तो फक्‍त तुमच्यापेक्षा वेगळा विचार करतोय किंवा त्याचं मत वेगळं आहे, तर त्याच्या निर्णयाची टीका करू नका. स्वतःचे निर्णय घ्यायच्या त्याच्या अधिकाराचा मान राखा. त्याचा न्याय करू नका.—रोम. १४:२-४.

१३ एका उदाहरणाचा विचार करा. तुम्ही तुमच्या मित्रासोबत बाहेर जेवायला जाता, तेव्हा तुम्हाला जे खायचंय तेच तुमच्या मित्रानेही मागवावं असा तुम्ही आग्रह कराल का? नक्कीच नाही. तुम्ही त्याला त्याच्या आवडीचं जेवण मागवू द्याल कारण तो त्याचा हक्क आहे. आणि त्याने मागवलेलं जेवण तुमच्या आवडीचं नसलं, तरी तुम्हाला जास्त काही फरक पडणार नाही. कारण तसंही ते जेवण तुम्हाला खावं लागणार नाही. तसंच, तुमच्या मित्राने त्याच्या आवडीचं जेवण तुमच्यासाठी मागवावं असंही तुम्हाला वाटणार नाही. त्याच प्रकारे, इतरांवर आपली मतं न थोपता आपण त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देतो तेव्हा आपण त्यांचा आदर करत असतो.

पटत नसतं तेव्हा . . .

तुम्हाला जर एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा निर्णय पटत नसेल, तर तुम्ही पुढे दिलेल्या प्रश्‍नांचा विचार करू शकता. यामुळे तुम्हाला अवाजवी चिंता टाळायला मदत होईल.—गलती. ६:५.

  • या निर्णयामुळे बायबलचं तत्त्व मोडतंय का?

  • तो ज्या परिस्थितीत वाढलाय त्यामुळे तो असा निर्णय घेतोय का?

  • त्याच्या निर्णयामुळे खरंच त्याचं नुकसान होईल की फक्‍त मलाच तसं वाटतंय?

  • त्याच्या निर्णयाचे कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?

  • तो खरंच “चुकीचं पाऊल” उचलतोय की फक्‍त माझ्यापेक्षा वेगळा विचार करतोय?

  • जर तो चुकीचं पाऊल उचलणार असेल, तर त्याला सुधारण्यासाठी बायबलमध्ये सांगितलेली पात्रता खरंच माझ्याकडे आहे का?

१४. निर्णय घेताना तुम्ही शांती कशी टिकवून ठेवू शकता? (१ करिंथकर ८:१२, १३)

१४ तुम्ही निर्णय घेता तेव्हा, इतरांना वाईट वाटणार नाही याची खातरी करा. यामुळे मंडळीची शांती टिकून राहील. (१ करिंथकर ८:१२, १३ वाचा.) काही वेळा तुम्ही घेणार असलेला निर्णय “कायदेशीर” असल्याचं तुम्हाला माहीत असतं. पण यामुळे जर एखाद्याला अडखळण होणार असेल, तर स्वतःला विचारा: ‘हा निर्णय खरंच “फायद्याचा” ठरेल का?’c (१ करिंथ. १०:२३, २४) अशा वेळी, तो निर्णय घेणं माझा हक्क आहे असा विचार करण्याऐवजी त्यामुळे इतरांना कसं वाटेल याचा विचार करा. (रोम. १५:१) पण कदाचित तुम्ही म्हणाल, की आपण तर आतच शिकलो, इतरांनी आपल्या निर्णयांचा आदर केला पाहिजे. हे जरी खरं असलं, तरी आपण रोमकर १२:१८, मध्ये सांगितलेली गोष्टसुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. त्यात म्हटलंय: “शक्यतो, सगळ्यांसोबत होईल तितकं शांतीने राहा.” म्हणून शांती टिकून राहावी आणि इतरांना अडखळण होऊ नये यासाठी आपण शक्य ते सगळं केलं पाहिजे.

१५. मंडळीतली एकता टिकवून ठेवायला वडील काय करू शकतात? (१ करिंथकर ४:६)

१५ वडील इतरांच्या निर्णयांचा आदर करतात तेव्हा, ते मंडळीतल्या एकतेला हातभार लावत असतात. ते इतरांच्या निर्णयांच्या बाबतीत कोणतेही नियम बनवत नाहीत. आणि बायबलमध्ये “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे” जात नाहीत. (१ करिंथकर ४:६ वाचा.) तसंच, ते आपल्या प्रकाशनांमध्ये दिलेल्या बायबल आधारित सल्ल्यांच्याही पलीकडे जात नाहीत. शिवाय, भाऊबहीण त्यांच्याकडे सल्ला मागतात तेव्हा ते मनाचा सल्ला देत नाहीत. उलट, ते नेहमी बायबलवर अवलंबून राहतात.—यश. ४८:१७, १८.

१६. वडीलवर्गाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक वडील आदर कसा करू शकतो?

१६ वडीलवर्गाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचाही प्रत्येक वडीलाने आदर केला पाहिजे. वडीलवर्गातले भाऊ एखादा निर्णय घेण्याआधी पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना करतात, बायबलच्या तत्त्वांवर विचार करून ती कशी लागू करता येतील यावर चर्चा करतात आणि मग निर्णय घेतात. प्रत्येक वडीलाने या निर्णयाला साथ देणं गरजेचं आहे; मग हा निर्णय त्याच्या मताविरुद्ध असला तरीही. (इफिस. ५:१७) तसंच, वडिलांनी बायबल आणि आपल्या प्रकाशनांमधल्या मार्गदर्शनाच्या पुढे जाऊन कोणतेही नियम बनवू नयेत. जसं की, आपल्या प्रकाशनांमधलं फक्‍त एखादं वाक्य घेऊन स्वतःचं मत पटवून द्यायचा प्रयत्न करू नये.

१७. इतरांच्या निर्णयांचा आदर केल्यामुळे कोणता फायदा होईल?

१७ खरंच, यहोवाच्या लोकांमध्ये खूप विविधता आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि मतं वेगळी आहेत. आणि ही किती चांगली गोष्ट आहे! कारण यामुळे आपल्या मंडळीची सुंदरता आणखी वाढते. म्हणून आपल्या विविधतेमुळे आपण आपल्यात कधीच फूट पडू देऊ नये, तर नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करावा. तसंच, इतरांना अडखळण होईल असं काहीही आपण करू नये. शिवाय, इतरांच्या निर्णयांचा आपण नेहमी आदर करावा. जर आपण असं केलं, तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल, आपल्या मंडळीतली एकता वाढेल आणि त्यात सुख-शांती नांदेल!—स्तो. १३३:१; मत्त. ५:९.

खाली दिलेल्या वचनांमुळे आपल्याला इतरांच्या मतांचा आणि निर्णयांचा आदर करायला कशी मदत होईल?

  • याकोब ४:१२

  • गलतीकर ६:१

  • १ करिंथकर ४:६; ८:१२, १३

गीत ८९ ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!

a एखाद्या लग्नासाठी किंवा अंत्यविधीसाठी चर्चमध्ये जायचं की नाही हे ठरवताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. याबद्दल आणखी माहितीसाठी १५ मे, २००२ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

b एखाद्याने जर बायबल तत्त्वांविरुद्ध असलेलं चुकीचं काम केलं तर वडिलांना त्याचा न्याय करावा लागू शकतो. पण अशा वेळी ते स्वतःच्या मतांप्रमाणे नाही, तर यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे त्याचा न्याय करतील.—२ इतिहास १९:६ सोबत तुलना करा.

c याची काही उदाहरणं पाहण्यासाठी, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ३५, मुद्दा ५ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा