८-१४ जून, २०२६
गीत ८ यहोवा आमचा गड
‘सत्याचा देव’ दिलेलं वचन नेहमी पाळतो
“हे यहोवा, सत्याच्या देवा, तू मला सोडवलं आहेस.”—स्तो. ३१:५.
या लेखात:
यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करेल आणि सैतानाचं खोटं लवकरच उघडं पाडेल यावरचा आपला विश्वास आपण कसा मजबूत करू शकतो ते पाहा.
१. स्तोत्र ३१:२-५ प्रमाणे आपण यहोवावर भरवसा का ठेवू शकतो?
सैतानाच्या या जगात खोटारडेपणा आणि फसवणूक खूप सामान्य गोष्ट आहे. म्हणून कधीकधी कोणावर भरवसा ठेवावा हे आपल्याला कळत नाही. व्यापारी बेईमानी करतात. जाहिरात करणारे वस्तूंची खोटी जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करतात. इतकंच काय तर काही वेळा आपल्या जवळचे लोकही दिलेला शब्द पाळत नाहीत. पण आपण यहोवावर नेहमी भरवसा ठेवू शकतो हे माहीत असल्यामुळे आपल्याला किती दिलासा मिळतो, नाही का? यहोवा ‘सत्याचा देव’ आहे. (स्तोत्र ३१:२-५ वाचा.) सत्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तो जे काही बोलतो किंवा करतो त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ आपण यहोवावर पूर्ण मनाने भरवसा का ठेवू शकतो हे सर्वात आधी आपण या लेखात पाहू. तसंच, तो सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत कसा करेल आणि त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तो आज काय करत आहे यावरही आपण चर्चा करू. या गोष्टींवर चर्चा केल्यामुळे आपल्याला आणखी धाडसाने इतरांना यहोवाबद्दल सांगता येईल.
आपण सत्याच्या देवावर भरवसा का ठेवू शकतो?
३. आपण यहोवावर पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?
३ तो निर्माणकर्ता आहे. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता आहे आणि जीवनाचा स्रोत आहे. (उत्प. १:१; स्तो. ३६:९; प्रकटी. ४:११) जिवंत राहण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्यांचा साठा या पृथ्वीवर मुबलक प्रमाणात नेहमी राहील अशा प्रकारे त्याने पृथ्वीला घडवलंय. सगळ्या विश्वावर त्याचं नियंत्रण आहे आणि पुढेही कायम राहील. यहोवाने आपल्याला बनवलंय, त्याला सर्वकाही माहीत आहे आणि त्याच्याकडे अमर्याद ताकद असल्यामुळे आपण मार्गदर्शनासाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. आणि तो आपल्याला चांगलं भविष्य देईल याची खातरीही बाळगू शकतो.
४. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे असं आपण का म्हणू शकतो?
४ त्याचं आपल्यावर प्रेम आहे. मानवांनी जीवनाचा आनंद घ्यावा आणि नेहमी आनंदी राहावं यासाठी यहोवाने त्यांना बनवलं. यहोवाने मानवांना बनवताना असं म्हटलं: “आपण आपल्या प्रतिरूपाचा, आपल्यासारखा असलेला माणूस निर्माण करू.” (उत्प. १:२६) त्याने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलंय, राहण्यासाठी सुंदर घर दिलंय. (स्तो. ११५:१६) इतकंच काय, तर त्याने आपल्या पहिल्या आईवडिलांना एक सुंदर काम दिलं होतं. त्यांना या घराला, म्हणजे पृथ्वीला नंदनवन बनवायचं होतं. (उत्प. १:२८; २:१५) त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही याची यहोवाने काळजी घेतली. त्याने त्यांना मुबलक प्रमाणात खाण्या-पिण्याच्या गोष्टी दिल्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि प्राणीसुद्धा दिले. त्यांनी जीवनाचा आनंद घ्यावा आणि नेहमी आनंदी राहावं यासाठी त्याने हे सगळं केलं होतं. खरंच, त्याने दाखवून दिलंय, की “त्याचं एकनिष्ठ प्रेम . . . सर्वकाळ टिकून राहतं.”—स्तो. १०३:१७.
५. (क) आदाम आणि हव्वाने बंड केल्यावर यहोवाने काय केलं? (ख) यहोवाने पूर्ण केलेल्या काही अभिवचनांबद्दल सांगा? (“नेहमी खरं बोलणारा देव” ही चौकट पाहा.)
५ तो दिलेला शब्द पाळतो. यहोवाने “पृथ्वी विनाकारण बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं.” (यश. ४५:१८, १९) आदाम आणि हव्वा यांनी यहोवाविरुद्ध बंड करून स्वतःवर मृत्यू ओढावून घेतला. त्यामुळे कोणालाही वाटलं असतं, की आता यहोवाचा उद्देश फोल ठरेल. पण यहोवा दिलेलं वचन पाळणारा देव आहे. (यश. ४६:१०, ११) पृथ्वी नीतिमान स्त्री-पुरुषांनी भरून जावी हा त्याचा उद्देश अजूनही बदललेला नाही. म्हणून यहोवाने आदाम आणि हव्वाला मुलं होऊ दिली. आणि आदामच्या मुलांना वाचवण्यासाठी, तसंच त्यांना कायम जगता यावं यासाठी त्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाच्या खंडणी बलिदानाची व्यवस्था केली.—योहा. ३:१६.
सत्याचा देव अभिवचनं पूर्ण करतो
६. आदाम-हव्वाने बंड केल्यावर यहोवाने कोणतं अभिवचन दिलं?
६ ‘दियाबल आणि सैतान म्हटलेल्या जुन्या सापाने’a आदाम आणि हव्वाला यहोवाविरुद्ध बंड करायला प्रवृत्त केलं. (प्रकटी. १२:९; उत्प. ३:४, ५; योहा. ८:४४) त्यामुळे यहोवाने सैतानाचा नाश करायचं अभिवचन दिलं. (उत्प. ३:१५) पण सैतानाचा नाश होईपर्यंत बरेच जण त्याला साथ देतील आणि त्याच्यासारखं वागतील. असं असलं तरी, काही लोक यहोवाला जडून राहतील.
७. आज सैतानाला कोण साथ देतं आणि त्यांचं काय होईल?
७ आज दुष्ट स्वर्गदूत आणि यहोवाची आज्ञा न पाळणारे लोक सैतानाला साथ देतात. ते यहोवाच्या उद्देशाच्या विरोधात वागतात आणि सैतानाच्या बाजूने असल्याचं दाखवतात. पण यहोवा त्याच्या नेमलेल्या वेळी सैतानाचा आणि त्याला साथ देणाऱ्या सगळ्यांचा नाश करेल.—दानी. २:४४; रोम. १६:२०.
८. १९१४ मध्ये येशूने काय केलं? (चित्रंसुद्धा पाहा.)
८ यहोवा सैतानाचा आणि त्याला साथ देणाऱ्यांचा नक्की नाश करेल असा भरवसा आपण का बाळगू शकतो? १९१४ मध्ये यहोवाने येशूला त्याच्या राज्याचा राजा म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर येशूने लगेच पाऊल उचललं. त्याने सैतान आणि त्याला साथ देणाऱ्यांना पृथ्वीवर फेकून दिलं. (प्रकटी. १२:७-९) हे सगळं स्वर्गात झालं असलं, तरी त्याचे परिणाम पृथ्वीवरही पाहायला मिळतात. बायबल म्हणतं: “पृथ्वी आणि समुद्र यांच्यावर मात्र मोठी विपत्ती ओढवली आहे. कारण आपला फार कमी वेळ उरला आहे हे ओळखून सैतान खूप क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.” (प्रकटी. १२:१२) १९१४ पासून सैतान लोकांना बहकवण्याचा प्रयत्न करतोय आणि यामुळे जगाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. खरंच, पृथ्वीवर किती “मोठी विपत्ती ओढवली आहे!” पण येशू लवकरच सैतान आणि त्याची साथ देणाऱ्यांचा नाश करेल आणि ‘आपला विजय पूर्ण करेल.’ (प्रकटी. ६:२) असं करून तो यहोवाच्या नावावर लागलेला कलंक कायमचा मिटवून टाकेल. (स्तो. ४५:४-६) त्यानंतर सगळ्यांना कळून येईल, की यहोवा सत्याचा देव आहे!—यहे. ३८:२३.
World War I: U.S. National Archives photo; bomb: USAF photo; pandemic: blvdone/stock.adobe.com; riot: inhauscreative/E+ via Getty Images
१९१४ पासून जगाची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे (परिच्छेद ८ पाहा)
सत्याचा देव सत्यावर प्रेम करणाऱ्यांना एकत्र करतो
९. यहोवा आज कोणाला एकत्र करतोय?
९ आज यहोवा “स्वर्गातल्या गोष्टी आणि पृथ्वीवर असलेल्या गोष्टी, ख्रिस्तामध्ये एकत्र” करतोय. (इफिस. १:१०) “स्वर्गातल्या गोष्टी” म्हणजे, येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलेले अभिषिक्त जन. आणि “पृथ्वीवर असलेल्या गोष्टी” म्हणजे, नंदनवनात कायमचं जीवन जगण्याची आशा असलेले लोक. यहोवाचे हे सेवक, सैतानाचं खोटं उघडं पाडण्यासाठी आणि नम्र मनाच्या लोकांना यहोवाबद्दलचं सत्य सांगण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.
१०. आज यहोवा लोकांना खोट्या धर्माच्या शिकवणींपासून कसं सोडवतोय? (प्रकटीकरण १४:६, ७)
१० ज्यांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांना त्याबद्दल शिकून घ्यायला यहोवा त्याच्या सेवकांचा वापर करतोय. आजपर्यंत कधी झालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचे सेवक हे काम करत आहेत. (प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.) आज यहोवा आनंदाचा संदेश इतरांना सांगायला माणसांचा वापर करत असला, तरी नम्र लोकांना सत्यात आणण्यात स्वर्गदूतांचाही मोठा वाटा आहे. सैतानाने खोट्या धर्माचा वापर करून कित्येक शतकांपासून यहोवाबद्दल खोट्या शिकवणी पसरवल्या आहेत. पण प्रचाराच्या कामामुळे त्याचं पितळ उघडं पडतंय. (प्रकटी. १८:२, ४) लवकरच, यहोवा खोट्या धर्माचा नाश करेल. आणि त्यानंतर यहोवावर प्रेम करणारे सगळे त्याचा महिमा करतील. कारण तो त्याचा हक्क आहे.—प्रकटी. १७:१६.
११. यहोवाच्या खऱ्या उपासकांना कसं ओळखलं जाऊ शकतं?
११ यहोवा सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र करतोय; मग त्यांची संस्कृती, पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी. (प्रकटी. ७:९, १०) जेव्हा ते ‘आनंदाचा संदेश’ ऐकतात, तेव्हा हेच सत्य असल्याची त्यांना खातरी पटते. आणि ते यहोवाच्या सेवकांसोबत त्याची उपासना करू लागतात. (मार्क १३:१०) मलाखी संदेष्ट्याने अशी भविष्यवाणी केली होती: “मग तुम्हाला पुन्हा एकदा, नीतिमान आणि दुष्ट माणसातला; आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक दिसून येईल.” (मला. ३:१८) या भविष्यवाणीप्रमाणे, आज देवाची खरी उपासना नेमकी कोण करतंय हे दिवसेंदिवस स्पष्ट होत चाललंय. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावरून आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून, तेच खऱ्या देवाची उपासना करत असल्याचं सिद्ध होतंय.
१२. प्रचार कार्यामुळे यहोवाचा उद्देश कसा पूर्ण होतो?
१२ ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ लोकांना सांगून आपण येशूची आज्ञा तर पाळतोच, शिवाय आपण बायबलची भविष्यवाणीही पूर्ण करतो. (मत्त. २४:१४; २८:१८-२०) या कामामुळे जगभरातल्या बऱ्याच लोकांना येशूचे शिष्य बनायची संधी मिळाली आहे. तसंच, कायमसाठी खऱ्या देवाची उपासना करायची आशाही त्यांना मिळाली आहे. खरंच, यहोवाच्या उद्देशाबद्दल इतरांना सांगायचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळालाय!
यहोवा त्याचा शब्द नक्की पाळेल
१३. सैतान खासकरून कोणाचा छळ करतो आणि का?
१३ ‘आपला फार कमी वेळ उरला आहे’ आणि लवकरच या जगाचा अंत होणार आहे हे माहीत असल्यामुळे सैतान खूप संतापलाय. (प्रकटी. १२:१२, १३) तो खासकरून अभिषिक्त जनांचा छळ करतो. कारण ‘ते देवाच्या आज्ञांचं पालन करतात आणि त्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य नेमण्यात आलं आहे.’ (प्रकटी. १२:१७; १४:१२) तसंच, त्यांची साथ देणाऱ्यांचाही तो छळ करतो.
१४. सैतान यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल, तेव्हा काय होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर सैतानाला साथ देणारे यहोवाच्या लोकांविरुद्ध पेटून उठतील. आणि मग हर्मगिदोनच्या युद्धाची सुरुवात होईल. (प्रकटी. १६:१३, १४, १६) पण येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य देवाच्या लोकांना वाचवायला येईल आणि सैतानाच्या या दुष्ट जगाचा पूर्णपणे नाश करेल. (प्रकटी. १९:१९-२१) या युद्धात खोटं बोलणाऱ्यांचा, दुष्ट लोकांचा आणि फसवणाऱ्यांचा कायमचा नाश होईल. (प्रकटी. २१:८) आणि शेवटी सत्याच्या आणि नीतिमत्त्वाच्या देवाचं नाव पवित्र होईल.
हर्मगिदोनच्या युद्धात देवाच्या शत्रूंचा नाश करायला येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य येत आहे (परिच्छेद १४ पाहा)
१५. यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करेल याची आपल्याला खातरी का आहे? (यशया ६५:१६, १७) (चित्रसुद्धा पाहा.)
१५ आज जगात आपल्याला कुठेच एकता बघायला मिळत नाही. पण यहोवाच्या कृपेमुळे त्याच्या लोकांमध्ये एकता आहे. चांगल्या मनाच्या लोकांना एकत्र करायचं काम आज संपूर्ण जगभरात चालू आहे. आणि कोणतीच गोष्ट यहोवाला हे काम करण्यापासून आणि त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्यापासून रोखू शकत नाही. (यशया ६५:१६, १७ वाचा.) यहोवा त्याची अभिवचनं नक्की पूर्ण करेल याची आपल्याला खातरी आहे. कारण रोमकर ८:३८, ३९ प्रमाणे आपल्याला माहीत आहे: “कोणतीही गोष्ट म्हणजे मृत्यू, जीवन, स्वर्गदूत, कोणतंही सरकार, सध्याच्या गोष्टी, भविष्यातल्या गोष्टी, सामर्थ्य, उंची, खोली, किंवा सृष्टीतली दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही, जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलं आहे.”
नवीन जगात आपल्याला आजच्या समस्या आठवणार नाहीत (परिच्छेद १५ पाहा)
१६. तुम्ही पूर्ण मनाने यहोवावर भरवसा का ठेवता?
१६ खरंच, यहोवावर भरवसा ठेवायची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. तो आपला निर्माणकर्ता आहे, त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो जगभरातल्या चांगल्या मनाच्या लोकांना त्याची सेवा करण्यासाठी एकत्र करतोय. (यश. ६०:२२; जख. ८:२३) आपल्याला माहीत आहे, की तो दिलेलं वचन नेहमी पाळतो. आणि तो लवकरच सैतानाचं पितळ उघडं पाडणार आहे. तर चला, आपणही दावीदसारखं म्हणू या: “[यहोवाची] स्तुती असो! तोच अद्भुत कार्यं करतो. त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो! त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!”—स्तो. ७२:१८, १९.
गीत २ देवाचं अतुल्य नाव!
a बायबलमध्ये या दुष्ट स्वर्गदूताचं नाव देण्यात आलेलं नाही. त्याला ‘दियाबल’ म्हणजे खोटं बोलणारा आणि ‘सैतान’ म्हणजे देवाचा विरोध करणारा असं म्हणण्यात आलंय.