वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 एप्रिल पृ. २-७
  • यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा मला पुढेही प्रशिक्षण देत राहिला
  • पायनियर सेवेतला आनंद
  • सेनेगलमधली नेमणूक
  • न्यू ब्रून्सविक आणि क्यूबेकमधली नेमणूक
  • जीव ओतून काम करणारे भाऊबहीण
  • विश्‍वासू भावांकडून मिळालेले मोलाचे धडे
  • अमेरिकेमध्ये असताना
  • चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • इतरांबद्दल काळजी असल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 एप्रिल पृ. २-७
भाऊ डेविड स्प्लेन त्यांच्या नेमणूकीतलं काम करत आहेत.

जीवन कथा

यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे

डेविड स्प्लेन

मला एका भावाने एक चिठ्ठी दिली. त्यावर असं लिहिलं होतं: “डेविड स्प्लेन, ८ एप्रिल १९५३: हर्मगिदोनची घोषणा करा.” मी त्या भावाला विचारलं, “हे काय आहे?” ते म्हणाले, “ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतa तुला या विषयावर भाषण द्यायचंय.” मी आश्‍चर्याने म्हणालो, “मी कधी म्हटलं मला भाषण द्यायचंय?”

अरे, मी तर मधूनच सुरुवात केली! थांबा, सुरुवातीपासून सांगतो. माझा जन्म दुसरं महायुद्ध सुरू असताना कॅनडाच्या कॅलगरीमध्ये झाला. आजपासून जवळपास ७५ वर्षांपूर्वी डॉनल्ड फ्रेझर नावाच्या एका तरुण पायनियरने आमचं दार ठोठावलं. सगळ्यात आधी माझ्या आईने बायबल अभ्यास सुरू केला. सत्य तिच्या मनापर्यंत पोहोचलं. पण गंभीर आजारपणामुळे तिला नेहमी सभांना जाता येत नव्हतं. असं असलं तरी, तिने प्रगती केली आणि १९५० मध्ये बाप्तिस्मा घेतला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, याच्या दोन वर्षांच्या आतच ती वारली. माझे वडील त्या वेळी सत्यात नव्हते. पण तरी त्यांनी साक्षीदारांना तिचा अंत्यविधी करू दिला.

अंत्यविधीच्या काही दिवसांनंतर ॲलीस नावाच्या एका वयस्कर अभिषिक्‍त बहिणीने मला सभेला यायचं आमंत्रण दिलं. ती मला ओळखायची कारण माझ्या आईची तब्येत बरी असताना मीसुद्धा तिच्यासोबत आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभांना जायचो. मी माझ्या वडिलांकडे सभेला जायची परवानगी मागितली. त्यांनासुद्धा “फक्‍त एकदा” सभेला येऊन अंत्यविधीचं भाषण देणाऱ्‍या भावाचे आभार मानायचे होते. म्हणून तेसुद्धा सभेला आले. ती ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा होती. बरं झालं माझे वडील त्या सभेला आले. खरंतर, माझ्या वडिलांनी भाषण द्यायचा एक कोर्स केला होता. पण सभेत भावांना इतक्या चांगल्या प्रकारे भाषण देताना पाहून ते भारावून गेले. त्यानंतर त्यांनी दर आठवडी या सभेला यायचं ठरवलं. मग हळूहळू ते इतर सभांनाही येऊ लागले.

त्या काळात, ईश्‍वरशासित सेवा प्रशाला सेवक, सभेच्या सुरुवातीला प्रशालेत नाव नोंदवलेल्या प्रत्येक भावाचं नाव घ्यायचा. आणि आपलं नाव घेतल्यानंतर प्रत्येक जण “हजर” असं म्हणायचा. एका सभेनंतर मी त्या भावाला म्हटलं, की पुढच्या सभेत माझंही नाव घ्या. तेव्हा त्या भावाने माझी खूप प्रशंसा केली. पण याचा नेमका अर्थ मला कळलाय का, हे त्यांनी मला विचारलं नाही.

भावाने सभेत फक्‍त माझं नाव घ्यावं असं मला वाटत होतं. पण प्रशालेत नाव नोंदवल्यामुळे मला भाषण द्यावं लागेल याची मला काहीच कल्पना नव्हती. पुढच्या सभेत माझं नाव घेण्यात आलं तेव्हा मी अभिमानाने “हजर” असं म्हटलं. सभेनंतर सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. मग काही आठवड्यांनी या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेली ती चिठ्ठी मला मिळाली.

माझी फजितीच झाली! त्या काळात सभेत बायबल वाचनाचा भाग नसायचा, तर सरळ सात ते आठ मिनिटांची भाषणं द्यावी लागायची. म्हणून माझ्या वडिलांनी मला भाषण तयार करायला मदत केली आणि ते सादर करण्यापूर्वी २० वेळा माझ्याकडून सराव करून घेतला. सभेनंतर मला पर्यवेक्षकाने खूप मोलाचा सल्ला दिला. तेव्हापासून यहोवाने मला माझ्या वडिलांचा, भाऊबहिणींचा आणि त्याच्या संघटनेचा वापर करून प्रशिक्षण दिलंय.

यहोवा मला पुढेही प्रशिक्षण देत राहिला

मी प्रचाराला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला सांगितलेल्या ॲलीस नावाच्या बहिणीने मला खूप मदत केली. त्या काळात आम्हाला सांगितलं जायचं, की तुम्ही घरमालकाला आधी तीन वचनं वाचून दाखवा आणि मग एखादं पुस्तक द्या. घरमालकाशी बोलायची जेव्हा माझी वेळ असायची तेव्हा ॲलीस सुरुवातीला तिची ओळख करून द्यायची, संभाषण सुरू करायची आणि मग मला वचनं वाचायला लावायची. मग मी वचनं वाचायचो आणि एखादं प्रकाशन द्यायचो. काही काळाने मीसुद्धा संभाषण सुरू करायला शिकलो. माझ्या वडिलांनीसुद्धा मला खूप मदत केली. १९५४ च्या शेवटीशेवटी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्यानंतरसुद्धा ते मला प्रचारात मदत करत राहिले. मला सत्यात वाढवायला त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्यासाठी सभा आणि प्रचार खूप महत्त्वाचा होता. म्हणून आम्ही न चुकता सभांना आणि प्रचाराला जायचो.

मला शाळेत काही खूप चांगले मार्क मिळायचे नाही. पण तरी त्या १२ वर्षांत मी जे काही शिकलो त्याचा मला आजही फायदा होतोय. मला गणिताबद्दल बरंच शिकायला मिळालं. तसंच, इंग्रजी व्याकरणाचा माझा पाया भक्कम झाला. शिवाय, मी इंग्रजी भाषेचा आणि लेखनाचा कोर्ससुद्धा केला. त्यामुळे मला आज लेखन विभागाच्या माझ्या कामात खूप फायदा होतोय.

मला संगीतात आवड कशी, असं लोक सहसा मला विचारतात. खरंतर, माझ्या आईवडिलांना संगीताची आवड होती. सात वर्षांचा असताना मी पियानोच्या क्लासला जायचो. पण माझ्या शिक्षिकेला वाटायचं, की हे काही मला जमणार नाही. म्हणून तिने माझ्या वडिलांना माझा क्लास बंद करायला सांगितला. आणि तिचं बरोबरही होतं. कारण त्या वेळी मला खरंच संगीत शिकण्यात फारसा रस नव्हता.

काही महिन्यांनी माझ्या वडिलांनी मला दुसरीकडे क्लास लावला. या वेळी मात्र मी गायन आणि पियानो दोन्ही शिकत होतो. आणि मी खरंच खूप चांगलं करत होतो. माझा आवाज खूप सुरेल होता आणि मी बऱ्‍याच स्पर्धाही जिंकल्या होत्या. पुढे मला संगीत शिकवता यावं, म्हणून मी संगीताच्या डिग्रीचा अभ्यास करत होतो. यामुळे मला पूर्ण वेळेच्या सेवेतही मदत होईल असं मला वाटलं. पण डिग्री करत असताना मला कळलं, की याचा अभ्यास करण्यात आणि परीक्षा देण्यात माझा खूप वेळ जातोय. म्हणून मी ते अर्धवटच सोडून दिलं आणि १९६३ मध्ये पायनियर सेवा सुरू केली.

पायनियर सेवेतला आनंद

एक वर्ष पायनियर सेवा केल्यानंतर मला खास पायनियर म्हणून ऑन्टारियोच्या कापुस्कासिंग इथे पाठवण्यात आलं. डॅनिएल स्किनर नावाचा भाऊ तिथे माझा पायनियर पार्टनर होता. तो वयाने माझ्यापेक्षा दुप्पट होता. मंडळीतली वेगवेगळी कामं कशा प्रकारे हाताळली जातात याबद्दल त्याने मला बरंच शिकवलं. २० वर्षांचा असतानाच मला मंडळीच्या सेवा समितीत नेमण्यात आलं. त्यामुळे मला खूप काही शिकून घ्यायचं होतं. आज आपली संघटना पुन्हा तरुण भावांना प्रशिक्षण द्यायला पुढाकार घेत आहे हे पाहून मला खूप आनंद होतो. जर या भावांनी मेहनत घेतली, तर तरुणपणातच ते यहोवाच्या खूप कामी येऊ शकतात.

कापुस्कासिंग इथे राहणं काही सोपं नव्हतं. थंडीच्या दिवसांत तिथलं तापमान -४४ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचायचं. आणि जेव्हा थंडी थोडी कमी असायची तेव्हाही तापमान -३३ अंश सेल्सिअस इतकं असायचं. डॅनिएल आणि मी सहसा सगळीकडे चालत जायचो. तिथे पायनियर सेवा केल्यामुळे मला खूप आनंद मिळाला. त्याचं एक कारण म्हणजे, लिंडा कोल नावाच्या बहिणीशी माझी ओळख झाली. ती आता लिंडा स्प्लेन आहे.

लिंडा खूप आवेशी होती. तिच्याकडे खूप पुनर्भेटी होत्या. ती खूप उदार आणि प्रेमळ होती. तिला लोकांसोबत वेळ घालवायलाही खूप आवडायचं. तिची आई गोल्डी हिचं यहोवावर खूप प्रेम होतं. त्या वेळी लिंडाचे वडील ॲलन सत्यात नव्हते. ते त्यांचा विरोध करायचे. पण असं असूनही लिंडाची आई लिंडाला आणि तिच्या दोन भावांना म्हणजे जॉन आणि गॉर्डनला नेहमी सभेला आणि प्रचाराला घेऊन जायची. एक वेळ तर अशी आली, की हे चौघेही पायनियर सेवा करत होते. काही वर्षांनी लिंडाचे वडीलही सत्यात आले आणि आवेशाने यहोवाची सेवा करू लागले.

मला आणखी प्रशिक्षण मिळावं म्हणून १९६५ साली मला कॅनडाच्या बेथेलमध्ये एक महिन्याच्या राज्य सेवा प्रशालेसाठी बोलवण्यात आलं. तिथे मला गिलियड प्रशालेचा अर्ज भरायला सांगण्यात आलं. मी कधी मिशनरी सेवेचा विचारही केला नव्हता. कारण मला ते जमेल असं मला वाटत नव्हतं. पण तरी मी अर्ज भरला. आणि मग मला ४२ व्या क्लासला जायची संधी मिळाली. गिलियड प्रशालेत आम्ही कितपत प्रगती करतोय हे आमचे प्रशिक्षक वेळोवेळी आम्हाला सांगायचे. माझ्या पहिल्या रिपोर्टमध्ये मला प्रशाला सुरू असताना संघटनेबद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायचं प्रोत्साहन देण्यात आलं. मी फक्‍त २१ वर्षांचा होतो आणि त्या वेळी तो सल्ला माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला.

रेडिओ, टी.व्ही. आणि प्रेसच्या लोकांशी कसं बोलायचं याबद्दलसुद्धा आम्हाला गिलियडमध्ये शिकवण्यात आलं. मला हे सगळं शिकताना खूप मजा आली. भविष्यात याचा किती फायदा होणार आहे याची तेव्हा मला कल्पना नव्हती. मी याबद्दल तुम्हाला पुढे सांगणारच आहे.

सेनेगलमधली नेमणूक

गिलियड प्रशालेतून पदवीधर झाल्यानंतर मला आणि मायकल होले या भावाला आफ्रिकेच्या सेनेगल इथे मिशनरी सेवेसाठी पाठवण्यात आलं. त्या वेळी त्या देशात जवळपास १०० प्रचारक होते.

इथे काही महिने सेवा केल्यानंतर मला शाखा कार्यालयात आठवड्यातून एक दिवस काम करायचं आमंत्रण मिळालं. ते “शाखा कार्यालय” म्हणजे मिशनरी घरातली फक्‍त एक खोली होती. भाऊ इमॅन्वेल पतेराकीस त्या वेळी तिथले शाखा सेवक होते. शाखा कार्यालय खूप छोटं असलं तरी इथूनच देशात होणाऱ्‍या संघटनेच्या कामाची देखरेख केली जाते याची ते मला नेहमी आठवण करून द्यायचे. एकदा असं झालं, की त्यांनी मिशनरी भाऊबहिणींना प्रोत्साहन देणारं पत्र पाठवायचं ठरवलं. त्या काळात पत्राच्या प्रती बनवणं काही सोपं नव्हतं. तसंच ते फार खर्चीकही होतं. त्यामुळे आम्हाला टाईपरायटरचा वापर करून प्रत्येक पत्र टाईप करावं लागायचं. यासाठी खूप मेहनत लागायची, कारण एकदा चूक झाली तर ती मिटवता येत नव्हती.

त्या दिवशी मी काम आटपून घरी परत जात असताना भाऊ पतेराकीस यांनी माझ्या हातात एक पाकीट दिलं. ते म्हणाले, “डेवीड, संघटनेने हे पत्र तुझ्यासाठी पाठवलंय.” नंतर ते पाकीट उघडल्यावर मला त्यात मीच टाईप केलेलं पत्र दिसलं. यावरून मला एक गोष्ट शिकायला मिळाली, की शाखा कार्यालय लहान असो किंवा मोठं आपण नेहमी संघटनेच्या कामाचा आदर केला पाहिजे.

काही भाऊबहीण फोटो काढत आहेत. त्यांच्यात भाऊ डेविड स्प्लेनही आहेत. ते सगळे खूप आनंदी दिसत आहेत.

१९६७ साली, सेनेगलमध्ये मिशनरी भाऊबहिणींसोबत

मला तिथल्या मंडळीत खूप मित्र मिळाले. आणि सहसा शनिवारी मी मंडळीतल्या भाऊबहिणींसोबतच वेळ घालवायचो. मला आजही ते दिवस आठवतात! आम्ही अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत. मी फ्रेंच भाषा तिथेच शिकलो. आणि जगभरातल्या शाखांना भेट देत असताना मला याचा खूप फायदा झाला.

१९६८ मध्ये लिंडा आणि माझं लग्न ठरलं. लग्नानंतर आम्हाला सेनेगलमध्येच राहून पायनियर सेवा करायची होती. म्हणून मी बऱ्‍याच काळापर्यंत पार्ट-टाईम नोकरी शोधत होतो. पण मला ती काही मिळेना. कारण तिथे सहसा स्थानिक लोकांना कामावर ठेवलं जायचं. मग आम्ही कॅनडाला परत आलो आणि आमचं लग्न झालं. त्यानंतर आम्हाला न्यू ब्रून्सविकच्या एडमंडस्टन या छोट्या शहरात खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. हे शहर क्यूबेकच्या सीमेवर होतं.

फुलांनी सजवलेल्या वाटेवर डेविड आणि लिंडा स्प्लेन उभे आहेत आणि स्माईल करत आहेत.

१९६९ साली, आमच्या लग्नाच्या दिवशी

न्यू ब्रून्सविक आणि क्यूबेकमधली नेमणूक

त्या वेळी तिथे एकही साक्षीदार नव्हता. पण काही मोजके बायबल अभ्यास चालू होते. कॅथोलिक चर्चचा तिथल्या लोकांवर खूप दबदबा होता. जवळजवळ प्रत्येक घराबाहेर ‘यहोवाच्या साक्षीदारांनी आत येऊ नये’ अशी पाटी असायची. पण अशा पाट्या असो किंवा नसो आम्ही प्रत्येक घरात प्रचार करायचो. कारण त्या वेळी आम्ही या पाट्यांची जास्त पर्वा करायचो नाही. तिथलं एक कॅथोलिक चर्च पेपरमध्ये प्रत्येक आठवडी अशी बातमी द्यायचं: “चला, आपण यहोवाच्या साक्षीदारांना शोधू या आणि त्यांचं नामोनिशाण मिटवू या.” त्या वेळी तिथे फक्‍त चारच यहोवाचे साक्षीदार होते. व्हिक्टर आणि वेल्डा नॉर्बर्ग आणि मी आणि लिंडा. त्यामुळे स्पष्टच होतं की ते कोणाबद्दल बोलत होते.

आमच्या विभागीय पर्यवेक्षकांची पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही. आमच्यासोबत एक आठवडा राहिल्यावर ते म्हणाले: “सध्या तुम्ही लोकांच्या मनात यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्यावरच लक्ष द्या.” तेव्हापासून आम्ही यावरच काम करू लागलो. हळूहळू तिथल्या लोकांना यहोवाचे साक्षीदार चर्चच्या गर्विष्ठ पाळकांपेक्षा किती वेगळे आहेत हे कळू लागलं. आता त्या शहरात एक छोटी मंडळी आहे.

तिथे जवळजवळ एक वर्ष सेवा केल्यावर आम्हाला क्यूबेक शहरामधल्या एका मोठ्या मंडळीत सेवा करायला पाठवण्यात आलं. आम्ही तिथे सहा महिने सेवा केली. तिथल्या भाऊबहिणींनी आमचा खूप चांगला पाहुणचार केला. त्यानंतर आम्हाला विभागीय कार्यासाठी नेमण्यात आलं.

पुढची १४ वर्षं आम्ही क्यूबेकच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सेवा केली. तिथे सेवा करून आम्ही खूप खूश होतो. त्या वेळी क्यूबेकमधलं प्रचाराचं काम खूप जोरात सुरू होतं. आणि चांगले परिणामही पाहायला मिळत होते. मंडळीत कुटुंबच्या कुटुंबं बायबल अभ्यास करून प्रगती करत होती!

जीव ओतून काम करणारे भाऊबहीण

कॅनडामधले फ्रेंच बोलणारे भाऊबहीण खूप मनमिळावू आहेत. पोटात एक आणि ओठांवर एक असं त्यांचं नसतं. ते नेहमी आनंदी राहतात आणि आवेशाने सेवा करतात. पण असं असलं तरी, त्यांच्यातल्या बऱ्‍याच जणांना सत्य स्वीकारणं खूप कठीण गेलं. बऱ्‍याच जणांना घरच्यांकडून भयंकर विरोध होतो. इतकंच काय, तर काही तरुणांना त्यांचे आईवडील असं म्हणून धमकवतात, की “घरात राहायचं असेल, तर अभ्यास बंद करावा लागेल.” पण यातले खूप कमी या दबावाला बळी पडलेत. खरंच, सत्यात खंबीर उभे असलेल्या तरुण भाऊबहिणींना पाहून यहोवाला किती अभिमान वाटत असेल!

क्यूबेकमध्ये पायनियर आणि खास पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍या मेहनती भाऊबहिणींना मी कसा विसरू शकतो? ते कॅनडाच्या वेगवेगळ्या भागांतून तिथे सेवा करायला आले होते. त्यांनी फ्रेंच भाषा तर चांगल्या प्रकारे शिकून घेतलीच, शिवाय तिथल्या स्थानिक लोकांवर कॅथोलिक चर्चचा किती पगडा आहे हेही समजून घेतलं. त्यामुळे त्यांना तिथल्या लोकांच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल जाणून घ्यायला खूप मदत झाली.

खास पायनियरांना सहसा दूरवरच्या आणि प्रचारक नसलेल्या क्षेत्रांमध्ये पाठवलं जायचं. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल लोकांचं चुकीचं मत असल्यामुळे या पायनियरांना सहजासहजी पार्ट-टाईम नोकरी किंवा राहायला घरं मिळायची नाहीत. आणि घरं मिळाली तरी ती परवडण्यासारखी नव्हती. म्हणून त्यांना चार-चार, सहा-सहा आणि कधीकधी तर आठ-आठ जण मिळून राहण्याशिवाय पर्याय नसायचा. नवीन जोडप्यांनाही असंच राहावं लागायचं. इतकं असूनही त्यांची चिकाटी, मेहनत करायची इच्छा कमी झाली नव्हती. त्यांना बायबल अभ्यास मिळाला की त्या विद्यार्थ्याला मदत करायला ते शक्य ते सगळं करायचे. आज क्यूबेकमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे हे भाऊबहीण आता दुसऱ्‍या गरज असलेल्या क्षेत्रांत सेवा करत आहेत.

आम्ही मंडळ्यांना भेटी द्यायचो, तेव्हा सहसा शनिवारी सकाळी तरुणांसोबत प्रचार करायचो. त्यामुळे त्यांना कोणत्या अडचणी आहेत हे आम्हाला समजायचं. त्यांतले काही तरुण आज दुसऱ्‍या देशांमध्ये मिशनरी म्हणून सेवा करत आहेत. आणि इतर काही दुसऱ्‍या महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या हाताळत आहेत.

त्या काळात, काही मंडळ्यांना आमच्या जाण्या-येण्याचा खर्च करणं परवडायचं नाही. त्यामुळे आम्हालाच तो करावा लागायचा. म्हणून काही वेळा महिना अखेरीस आमच्याकडे पैसेच उरायचे नाहीत. पण अशा परिस्थितीत आम्ही पूर्णपणे यहोवावर अवलंबून असायचो. आणि त्याने आमची साथ कधीच सोडली नाही. कशी न कशी पुढच्या मंडळीत जायची आमची सोय व्हायचीच.

विश्‍वासू भावांकडून मिळालेले मोलाचे धडे

क्यूबेकमध्ये असताना मला बऱ्‍याचदा रेडिओ, टी.व्ही. आणि प्रेस यांसारख्या माध्यमांचा वापर करून साक्ष द्यायची संधी मिळाली. या कामासाठी मला गिलियडमध्ये प्रशिक्षण मिळालं होतं याचा मला आनंद आहे. मला लेऑन्स क्रैपो या भावासोबत काम करायचीसुद्धा संधी मिळाली. तेसुद्धा विभागीय पर्यवेक्षक होते आणि मिडियाच्या लोकांशी बोलायचा त्यांना चांगला अनुभव होता. मिडियाच्या मोठमोठ्या व्यक्‍तींशी बोलताना, ते भाऊ कधीच आपल्याला किती अनुभव आहे हे दाखवायचे नाहीत. उलट, ते त्यांना म्हणायचे: “मी आणि माझा मित्र लोकांना बायबलबद्दल सांगतो. आम्हाला मिडियाबद्दल जास्त काही माहीत नाही. यहोवाच्या साक्षीदारांचं एक अधिवेशन होणार आहे याची बातमी देण्यासाठी आम्हाला पाठवण्यात आलंय. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल.” अशा प्रकारे नम्रपणे बोलल्यामुळे मिडियाचे बरेच लोक आम्हाला मदत करायला तयार व्हायचे.

नंतर, मला शाखेने ग्लेन हाऊ या भावासोबत काम करायला नेमलं. ते वकील होते. आम्हाला मिडियामध्ये चर्चेत असलेले नाजूक विषय हाताळायला नेमलं होतं. गिलियडमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि भाऊ लेऑन्ससोबत काम करून मिळालेल्या अनुभवाचा या कामात मला खूप फायदा झाला. भाऊ ग्लेनसोबत काम करणंही माझ्यासाठी बहुमान होता. न्यायव्यवस्थेच्या वेगवेगळ्या लोकांशी ते एकदम बेधडकपणे बोलायचे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांचं यहोवावर मनापासून प्रेम होतं.

पुढे माझ्या वडिलांची तब्येत खालावली. त्यांची देखभाल करता यावी म्हणून १९८५ मध्ये शाखेने आम्हाला पश्‍चिम कॅनडाच्या विभागात सेवा करायला नेमलं. पण तीन महिन्यांनीच माझे वडील वारले. मग पुढची काही वर्षं आम्ही इथेच सेवा केली. त्यानंतर १९८९ मध्ये आम्हाला अमेरिकेच्या बेथेलमध्ये सेवा करायला बोलवण्यात आलं. आम्ही असा कधी विचारही केला नव्हता, की आम्हाला बेथेलमध्ये बोलवलं जाईल! आम्ही जवळजवळ १९ वर्षं विभागीय कार्य केलं, पण आता आम्हाला ते सोडावं लागणार होतं. या वर्षांमध्ये आम्ही कितीतरी भाऊबहिणींच्या घरी राहिलो, त्यांच्यासोबत जेवलो, वेळ घालवला आणि त्यांनीही आमचा मनापासून पाहुणचार केला. त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी आम्ही कायम त्यांचे आभारी राहू.

अमेरिकेमध्ये असताना

ब्रुकलिनमध्ये गेल्यावर मला सेवा विभागात काम करायला सांगण्यात आलं. तिथे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मला खूप फायदा झाला. तसंच, एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती मिळवण्याआधी मी कोणत्याही निष्कर्षावर पोहचू नये हे मी तिथे काम करत असताना शिकलो. मग १९९८ मध्ये मला लेखन विभागात काम करायची संधी मिळाली. आणि अजूनही मी तिथलं काम शिकून घ्यायचा प्रयत्न करतोय. मला भाऊ जॉन बार यांच्यासोबत बरीच वर्षं सेवा करायचा बहुमान मिळाला. ते लेखन समितीचे संयोजक होते. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि त्यांच्याकडून मिळालेलं प्रशिक्षण मी कधीच विसरू शकणार नाही. ते खूप चांगले भाऊ होते. त्यांच्यात येशूसारखे चांगले गुण होते.

डेविड आणि लिंडा स्प्लेन जॉन आणि मिल्ड्रेड बार यांच्यासोबत फोटोसाठी उभे आहेत.

जॉन आणि मिल्ड्रेड बार यांच्यासोबत

लेखन समितीच्या नम्र भाऊबहिणींसोबत काम करणं माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. कोणतंही काम करण्याआधी ते मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतात. तसंच त्यांना याची जाणीव आहे, की त्यांना त्यांच्या कामात मिळत असलेलं यश त्यांच्या कौशल्यामुळे नाही तर यहोवाच्या पवित्र शक्‍तीमुळे मिळतं.

२० भाऊबहिणी मंचावर राज्य गीत गात आहेत आणि भाऊ स्प्लेन संगीत निर्देशन करत आहेत. शिवाय, एक बहीण पियानो वाजवत आहे.

२००९ च्या वार्षिक सभेत संगीत निर्देशन करत असताना

भाऊ स्प्लेन आनंदाने एका बहिणीला बायबल देत आहेत.

२०१४ मध्ये कोरीयाच्या सियोलमधल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भाऊबहिणींना बायबल देत असताना

आतापर्यंत लिंडा आणि मला ११० वेगवेगळ्या देशांतल्या भाऊबहिणींना भेटायचा बहुमान मिळालाय. आणि या देशांत काम करणारे मिशनरी भाऊबहीण, शाखा समितीचे सदस्य आणि पूर्ण वेळचे सेवक यहोवावर किती प्रेम करतात हेसुद्धा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यांतल्या काही देशांमध्ये भाऊबहिणींना युद्धांचा, आर्थिक समस्यांचा आणि छळाचा सामना करावा लागतोय. तरीसुद्धा ते आवेशाने आणि एकनिष्ठपणे यहोवाची सेवा करत आहेत. खरंच, त्यांना पाहून यहोवा किती खूश होत असेल!

या संपूर्ण काळात माझी नेमणूक पूर्ण करायला लिंडाने मला नेहमी मदत केली. तिचं लोकांवर खूप प्रेम आहे आणि ती नेहमी इतरांना मदत करत असते. ती खूप सहजपणे लोकांसोबत संभाषण सुरू करते. तसंच, तिने बऱ्‍याच लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत केली आहे. इतकंच काय, तर यहोवापासून दूर गेलेल्यांनाही त्याच्या जवळ यायला तिने मदत केली आहे. खरंच, ती माझ्यासाठी यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहे! आता आमचं वय होत चाललंय, त्यामुळे आम्हाला आधीसारखं जास्त करता येत नाही. पण बरेच तरुण भाऊबहीण व्यावहारीक मार्गांनी आम्हाला मदत करतात. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.—मार्क १०:२९, ३०.

मागच्या ८० वर्षांचा मी विचार करतो, तेव्हा मला यहोवाचे खरंच खूप आभार मानावेसे वाटतात. स्तोत्रकर्त्याने जे म्हटलं ते मी स्वतः अनुभवलंय. त्याने म्हटलं: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस, आणि मी अजूनही तुझी अद्‌भुत कार्यं घोषित करत आहे.” (स्तो. ७१:१७) मलाही नेहमी हेच करत राहायची इच्छा आहे.

a हे प्रशिक्षण आज आपल्याला आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत मिळतंय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा