१५-२१ जून, २०२६
गीत १२२ निर्भय व निश्चयी राहा!
समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा
“माझ्यावर संकटं आणि दुःखं आली, तरी तुझ्या आज्ञा मला प्रिय वाटतात.”—स्तो. ११९:१४३.
या लेखात:
समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपल्याला त्यांचा यशस्वीपणे सामना कसा करता येईल ते पाहा.
१-२. समस्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
यहोवासाठी त्याचे सगळे सेवक खूप अनमोल आहेत. असं असलं तरी, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचं जीवन “त्रासाने आणि दुःखाने” भरलेलंय. (स्तो. ९०:१०) तुमच्याबद्दल काय? यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला सध्या अन्यायाचा, विरोधाचा किंवा छळाचा सामना करावा लागतोय का? वाढत्या वयामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय का? तुमच्यावर एखादं दुःख कोसळलंय का? तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय का?
२ समस्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण त्यांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचंय. असं केल्याने आपल्याला त्यांचा धीराने सामना करता येईल. गाडी चालवताना आपल्या गाडीची काच साफ असणं जितकं गरजेचंय, तितकंच समस्यांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचंय. गाडीची काच साफ नसल्यामुळे आपल्याला पुढे येणारे अडथळे दिसले नाहीत, तर ते पार करायला आपल्याला योग्य पाऊल उचलता येणार नाही. म्हणूनच या लेखात आपण तीन प्रश्नांवर चर्चा करू या. (१) आपण समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं असं यहोवाला वाटतं? (२) आपण जर यहोवासारखा दृष्टिकोन ठेवला नाही तर काय होऊ शकतं? आणि (३) आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा आपण काय करू शकतो?
समस्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण त्यांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणं गरजेचंय (परिच्छेद २ पाहा)
समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा
३. आपल्या जीवनात समस्या का येतात?
३ या दुष्ट जगात समस्या तर येतीलच. कारण आपण सगळे अपरिपूर्ण आहोत आणि सैतान या जगाचा शासक आहे. खरंतर, जसजसं या जगाचा अंत जवळ येतोय, तसतसं आपल्या समस्या आणखीनच वाढत जातील. आपल्याला कदाचित नैसर्गिक, मानवनिर्मित किंवा दुष्ट लोकांमुळे येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (मत्त. २४:८; २ तीम. ३:१३) पण आपल्याला कदाचित वाटेल, की यहोवा या समस्या आताच का काढून टाकत नाही? पण विचार करा, जर यहोवाने या समस्या आताच काढल्या तर तो सैतानाला हे जग चालवायला मदत करतोय असा याचा अर्थ होईल. म्हणून सैतानाचं राज्य आहे तोपर्यंत आपल्या जीवनात समस्या तर येतीलच.—उप. ९:१२.
४. आणखी कोणत्या कारणांमुळे आपल्या जीवनात समस्या येतात?
४ येशूचे शिष्य असल्यामुळे आपल्या जीवनात आणखी समस्या येतात. येशूने म्हटलं होतं, की त्याच्या शिष्यांचा छळ केला जाईल. (मत्त. २४:९; योहा. १६:२) ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपला विश्वास डळमळत नाही. (१ थेस्सलनी. ३:३, ४) उलट, आपण योग्य मार्गावर चालत आहोत याची आपल्याला खातरी मिळते. आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे, सगळ्यात मोठ्या वादविषयात आपण कोणाच्या बाजूने आहोत हे दाखवायची आपल्याला संधी मिळते. सैतानाने आणखी एक दावा केलाय, तो म्हणजे माणसं फक्त स्वार्थासाठी देवाची उपासना करतात. आणि हे सिद्ध करायला तो यहोवाच्या लोकांवर समस्या आणण्यात कोणतीच कसर सोडत नाही. (ईयो. १:९-११) पण एवढं असूनही आपण धीराने समस्यांचा सामना करतो आणि यहोवावर प्रेम करत राहतो तेव्हा यहोवा खूप खूश होतो.—नीति. २७:११.
५. उपदेशक ७:१३, १४ मधून आपल्याला काय समजतं? (चित्रंसुद्धा पाहा.)
५ यहोवा समस्या येऊ देतो. यहोवा कधीच दुष्टपणे वागत नाही किंवा वाईट गोष्टींनी आपली परीक्षा घेत नाही. (याको. १:१३) मग शलमोन राजाने असं का म्हटलं, की ‘देवाने संकटाचा दिवस बनवला आहे?’ (उपदेशक ७:१३, १४ वाचा.) यहोवा आपल्यावर समस्या आणतो असं त्याला म्हणायचं नव्हतं. तर, यहोवा सध्या आपल्यावर येणाऱ्या समस्या रोखत नाही असं त्याला म्हणायचं होतं. तसंच समस्यांबद्दल आपण योग्य दृष्टिकोन कसा ठेवू शकतो याबद्दलही त्याने दोन गोष्टी सांगितल्या. या दुष्ट जगात आपल्यावर चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस येतील. जेव्हा ‘चांगला दिवस’ असतो, तेव्हा आपण यहोवाचे आभार मानू शकतो आणि तो दिवस त्याच्याकडून भेट असल्याचं समजू शकतो. दुसरी, “भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे माणूस खातरीने सांगू शकत नाही.” म्हणजे, उद्याचा दिवस चांगला असेल की वाईट हे ठरवणं आपल्या हातात नाही. त्यामुळे नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्यांवर अनपेक्षितपणे समस्या येतात.
सैतानाच्या जगात आपल्यावर चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस येतील हे आपण स्वीकारलं पाहिजे (परिच्छेद ५ पाहा)
६. यहोवा आपल्यावर समस्या का येऊ देतो? (इब्री लोकांना १२:७, ११)
६ जर आपण समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला समजेल, की यहोवा आपल्याला स्वतःवर नाही तर त्याच्यावर अवलंबून राहायला शिकवतोय. आपल्या समस्या यहोवाच्या नजरेतून सुटत नाहीत. त्या पाहून त्यालाही दुःख होतं आणि त्याला आपल्याला मदत करावीशी वाटते. त्याने आपल्याला “काळोख्या दरीतून” जरी जाऊ दिलं, तरी तो आपली साथ कधीच सोडत नाही. तो आपलं मार्गदर्शन करत राहतो, आपल्याला त्याच्या प्रेमाची खातरी करून देतो आणि धीर धरण्यासाठी लागणारी ताकदसुद्धा देतो. (स्तो. २३:४) शिवाय, समस्यांमुळे आपल्याला आपल्या कमतरता ओळखता येतात. आणि देवाच्या मदतीने त्यांच्यावर मात करून चांगले गुण वाढवता येतात. (इब्री लोकांना १२:७, ११ वाचा.) ईयोबचाच विचार करा. त्याला नम्रतेचा गुण वाढवायची गरज होती. यहोवाने जरी त्याच्यावर समस्या आणल्या नसल्या, तरी त्या कठीण काळात त्याने त्याला चांगले गुण वाढवायला मदत केली. (ईयो. ४२:१-६) आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की कोणतीही समस्या आली तरी यहोवा आपलं कायमचं नुकसान होऊ देणार नाही. आपण समस्यांचा धीराने सामना करतो आणि यहोवाला विश्वासू राहतो तेव्हा आपण “पूर्णपणे विजयी” ठरतो.—रोम. ८:३५-३९.
७. छळ होतो तेव्हा आपण आनंदी का राहू शकतो?
७ छळ होत असतानाही आनंदी राहता येतं. तुमच्या विश्वासामुळे तुमचा छळ होत असेल, तर यहोवा तुमच्यावर खूश नाही असा विचार करू नका. उलट, तुम्ही यहोवाची आज्ञा पाळत असल्याचा हा पुरावा आहे याची खातरी बाळगा. (मत्त. ५:१०-१२) तुम्ही जर छळाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला प्रेषितांसारखं आनंदी राहता येईल. तसंच, चांगल्या गोष्टींसाठी तुमचा छळ होतोय या गोष्टीचा तुम्हाला अभिमान बाळगता येईल. (प्रे. कार्यं ५:४०-४२) शिवाय, छळ होत असताना आपण यहोवाला विश्वासू राहिलो, तर इतरांना चांगली साक्ष मिळेल आणि ते “देवाचा गौरव करतील.” (१ पेत्र २:१२) लक्षात असू द्या, यहोवा आपल्याला परीक्षेतून बाहेर आल्यावरच नाही तर परीक्षेत असतानाही आशीर्वाद देऊ शकतो. योसेफच्या बाबतीतही त्याने हेच केलं होतं.—उत्प. ३९:३, २३.
८. धीर धरल्यामुळे आपल्याला काय मिळेल?
८ आपल्या समस्या तात्पुरत्या आहेत. ईयोबसारखंच आपल्याही समस्या कायम राहणार नाहीत. बायबल म्हणतं: “यहोवाने ईयोबच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या आयुष्यातल्या नंतरच्या दिवसांत त्याला जास्त आशीर्वाद दिले.” (ईयो. ४२:१२) यहोवा ईयोबसारखंच आपल्यालाही एका अर्थाने आपल्या ‘आयुष्यातल्या नंतरच्या दिवसांत जास्त आशीर्वाद देणार आहे.’ आणि तो काळ कधीच संपणार नाही. त्या आशीर्वादांपुढे आज आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या समस्या खूप किरकोळ आहेत. म्हणून जर आज आपण धीर धरला, तर यहोवा आपल्याला पुढे खूप मोठा मोबदला देईल.—मत्त. २४:१३.
योग्य दृष्टिकोन न ठेवल्यामुळे काय होऊ शकतं?
९. चुकीचा दृष्टिकोन ठेवल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं?
९ कोणत्याही समस्येला तोंड देत असताना, योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आणखी समस्या टाळता येतात. उदाहरणार्थ, यहोवाच आपल्या समस्यांसाठी जबाबदार आहे असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. ईयोबलाही असंच वाटलं होतं. म्हणून त्याने ‘देवाऐवजी स्वतःला निर्दोष ठरवायचा प्रयत्न’ केला. (ईयो. ३२:२) तसंच, नामीनेही सुरुवातीला तिच्या समस्यांसाठी यहोवाला दोष दिला. (रूथ १:१३, २०, २१) जर ईयोब आणि नामीने आपला चुकीचा दृष्टिकोन बदलला नसता, तर यहोवासोबतचं त्यांचं नातं कमजोर झालं असतं. (नीति. १९:३) पण, यहोवाने त्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलायला मदत केली. ते विश्वासू राहिल्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वाद दिले.
१०. समस्येत असताना आपल्याला कदाचित काय वाटू शकतं?
१० यहोवा आपल्या समस्यांसाठी जबाबदार नाही हे आपल्याला माहीत आहे. पण तरी समस्या येतात तेव्हा त्याला आपली काळजी आहे की नाही असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. अशा चुकीच्या विचारांमुळे आपण निराश होऊ शकतो. (नीति. २४:१०) दावीद राजाच्या आणि हबक्कूक संदेष्ट्याच्या जीवनातही बऱ्याच समस्या आल्या. त्यामुळे यहोवाचं आपल्या याचनांकडे लक्ष आहे की नाही असं त्यांनाही कधीकधी वाटायचं. (स्तो. १०:१; हब. १:२) पण तरी, त्यांनी प्रार्थना करायचं सोडलं नाही. आणि यहोवानेही त्यांना दाखवून दिलं, की तो त्यांच्यासोबत आहे. यहोवा आपल्याबाबतीतही असंच करू शकतो.—स्तो. १०:१७.
११. समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन न ठेवल्यामुळे काय होऊ शकतं?
११ योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे समस्या आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्या का आल्या असा प्रश्नही पडणार नाही. (१ पेत्र ४:१२) येशूला छळाचा सामना करावा लागेल ही गोष्ट समजून घेणं त्याच्या शिष्यांना खूप कठीण गेली. (लूक १८:३३, ३४) येशूने याबद्दल त्यांना बऱ्याचदा समजावून सांगितलं होतं. तरीसुद्धा यहोवा त्याच्यावर इतक्या समस्या येऊ देणार नाही असं पेत्रला वाटलं. पण येशूला माहीत होतं, की अशा प्रकारे विचार केल्यामुळे आपल्याला यहोवाची इच्छा पूर्ण करता येणार नाही. म्हणून त्याने पेत्रची चूक सुधारली. (मार्क ८:३१-३३) येशूच्या मृत्यूनंतरसुद्धा शिष्यांना या गोष्टी समजून घेणं कठीण गेलं. असं असलं तरी येशूने आशा सोडली नाही. पुनरुत्थान झाल्यावर येशू त्यांच्याशी बोलला आणि त्याला छळ सहन करून का मरावं लागलं हे ‘शास्त्रवचनांतून अगदी स्पष्ट करून’ त्याने त्यांना सांगितलं. (लूक २४:२५-२७, ३२, ४४-४८) पुढे शिष्यांनाही छळाचा सामना करावा लागणार होता. म्हणून येशूने शिकवलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे त्यांना तयार रहायला मदत होणार होती. छळाबद्दल आणि समस्यांबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय त्यावर मनन केल्याने आपल्यालाही त्यांसाठी तयार राहायला मदत होईल.
१२. आपल्या परिस्थितीबद्दल चुकीचा दृष्टिकोन ठेवल्याने आपल्याला कसं वाटू शकतं?
१२ कधीकधी आपली परिस्थिती आपल्याला वाटते तितकी वाईट नसते. पण आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं. हे समजवायला येशूने द्राक्षमळ्यात काम करणाऱ्या मजूरांचं उदाहरण दिलं. काही मजूरांना वाटलं, की त्यांच्यावर अन्याय झालाय. पण त्यांचा मालक त्यांना म्हणाला: “हे बघ, मी तुझ्यावर काही अन्याय केला नाही.” (मत्त. २०:१०-१३) खरंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांना अन्याय झाल्यासारखं वाटलं. आपल्याबाबतीतही असं होऊ शकतं. आपल्याला जर एखादी जबाबदारी सोडावी लागली किंवा आपल्याला हवी ती जबाबदारी मिळाली नाही, तर आपल्याला त्या मजूरांसारखंच वाटू शकतं. मग, अशा परिस्थितीत योग्य दृष्टिकोन ठेवायला आपल्याला कशामुळे मदत होईल?
आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा आपण काय करू शकतो?
१३. आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा काय होऊ शकतं?
१३ समस्यांबद्दल बायबल काय म्हणतं हे तुम्हाला माहीत असेल. इतकंच काय, तर दुसरे लोक समस्येत असताना त्यांना मदत करायला तुम्ही काही वचनांचा वापरसुद्धा केला असेल. पण जेव्हा तुमच्यावर समस्या येते, तेव्हा त्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल. कदाचित तुम्हाला वाटेल, की यहोवा तुम्हाला शिक्षा देतोय किंवा तो तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. मग अशा परिस्थितीत योग्य दृष्टिकोन ठेवायला तुम्ही कोणती पावलं उचलू शकता?
१४. तुम्ही कशासाठी प्रार्थना करू शकता? (फिलिप्पैकर ४:१३)
१४ यहोवाकडे मदत मागा. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय हे यहोवाला मनमोकळेपणे सांगा. यहोवाने तुम्हाला नेमकी कशी मदत करावी हेही त्याला सांगा. समस्येचा धीराने सामना करता यावा म्हणून यहोवाकडे बळ मागा. तसंच, योग्य निर्णय घेता यावेत म्हणून त्याच्याकडे बुद्धी मागा. यहोवा तुमच्या प्रार्थनांचं उत्तर तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारे देऊ शकतो. (इफिस. ३:२०) तो तुम्हाला मदत करण्यासाठी स्वर्गदूतांचा आणि भाऊबहिणींचा वापर करू शकतो. (स्तो. ३४:७) यहोवा वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला मदत करू शकतो. त्यामुळे तो करत असलेली मदत ओळखा आणि स्वीकारा. तो त्याची पवित्र शक्ती सर्वांना उदारपणे देतो. म्हणून समस्या कितीही मोठी असली तरी तुम्हाला त्याचा सामना करता येईल.—फिलिप्पैकर ४:१३ वाचा.
१५. समस्यांचा सामना करायला तुम्हाला कशामुळे मदत होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ यहोवाच्या सेवेत व्यस्त राहा. यहोवाच्या सेवेत तुम्ही पूर्वी बरंच काही करत असाल. पण समस्यांमुळे तुम्हाला आता तितकं करणं शक्य होत नसेल. असं असलं तरी शक्य तितकं करण्याचा प्रयत्न करत राहा. खरंतर, “संकटं आणि दुःखं” येतात तेव्हा यहोवासारखा विचार करणं आणखी महत्त्वाचंय. (स्तो. ११९:१४३) म्हणून नियमितपणे बायबल वाचा, त्याचा अभ्यास करा आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करा. आणि त्यांबद्दल शक्य होईल तितकं इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच, सभांना जायचा आणि त्यात सहभाग घ्यायचासुद्धा प्रयत्न करा. भाऊबहिणींसोबत होता होईल तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत तुम्हाला कदाचित एकटं राहावंसं वाटेल, पण तसं करू नका.—नीति. १८:१.
यहोवासोबतचं नातं टिकवून ठेवण्यासाठी शक्य ते सगळं करत राहा (परिच्छेद १५ पाहा)
१६. तुमच्या मनात कोणत्या शंका येऊ शकतात आणि तुम्ही त्या कशा काढू शकता? (२ करिंथकर १०:४, ५)
१६ शंका दूर करा. समस्या येतात तेव्हा आपल्या मनात स्वतःबद्दल किंवा यहोवाबद्दल शंका येऊ शकतात. आणि अशा शंका “भक्कम बुरुजांसारख्या” असू शकतात. पण आपण त्यांना उलथून टाकलं पाहिजे. (२ करिंथकर १०:४, ५ वाचा.) असं करण्यासाठी आपल्याला बायबल आणि प्रकाशनांमधल्या ‘देवाच्या ज्ञानामुळे’ मदत होईल. जसं की, (१) यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे का याबद्दल तुम्हाला कदाचित शंका वाटेल. अशा वेळी प्रेषित पौलचा विचार करा. प्रचार करत असताना त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. पण त्याने त्याचा विश्वास कमी होऊ दिला नाही. उलट येशू त्याच्यावर खूश आहे या गोष्टीची त्याने सतत स्वतःला खातरी करून दिली. (२ करिंथ. ११:२३-२७) (२) पूर्वीच्या चुकांसाठी यहोवाने तुम्हाला माफ केलंय की नाही असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं. पण बायबल म्हणतं, की यहोवा पूर्णपणे माफ करतो. बायबलमधल्या अशा वचनांची यादी करा. (यश. ४३:२५) मग ती वचनं वाचा आणि त्यांवर मनन करा. (स्तो. ११९:९७) (३) एखादं दुःख कोसळल्यामुळे तुमच्या मनात कदाचित अशी शंका येईल, की यहोवा आपल्या विश्वासू सेवकांचं रक्षण करतो की नाही. असं असेल तर यहोवा आपल्यावर दुःख का येऊ देतो आणि त्याच्यासोबतचं नातं टिकवून ठेवायला तो आपल्याला कशी मदत करतो याबद्दल संशोधन करा. (स्तो. ९१:९-१२) तसंच, ज्या भाऊबहिणींनी यशस्वीपणे अशा संकटांचा सामना केलाय त्यांचे अनुभव वाचा.a
१७. समस्या येतात तेव्हा आपण काय करू शकतो?
१७ सध्या तुम्ही ‘चांगल्या दिवसाचा’ आनंद घेत आहात का? जर असं असेल तर यहोवाच्या चांगुलपणाचा विचार करा आणि त्याचे आभार माना. (उप. ७:१४) पण तुमच्या जीवनात जर एखादी समस्या आली, तर तिच्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहा आणि यहोवावरचा तुमचा भरवसा वाढवत राहा. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला त्या समस्येचा धीराने सामना करता यावा, म्हणून यहोवा ‘तिच्यातून बाहेर पडायचा मार्ग तयार करेल.’ (१ करिंथ. १०:१३) पण आपल्या भाऊबहिणींच्या जीवनात समस्या येतात, तेव्हा त्यांचा सामना करायला आपण त्यांना मदत कशी करू शकतो? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.
गीत १५० आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!
a जसं की, jw.org वर ब्रदर डेव्हीड माझा यांची जीवन कथा आहे. यात ते आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून कसं सावरलं याबद्दल सांगितलंय.