वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 मार्च पृ. १४-१९
  • तुमचं लक्ष भरकटू देऊ नका!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचं लक्ष भरकटू देऊ नका!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू शकतं?
  • यहोवाच्या सेवेवरून लक्ष भरकटू नये म्हणून येशूने काय केलं?
  • आपण येशूसारखं कसं वागू शकतो?
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 मार्च पृ. १४-१९

१८-२४ मे, २०२६

गीत ३५ “जाणू या कशाचं मोल मोठं!”

तुमचं लक्ष भरकटू देऊ नका!

“यहोवाची इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.”—इफिस. ५:१७.

या लेखात:

लक्ष भरकटवणाऱ्‍या परिस्थितींमध्ये आपण आपल्या जीवनात यहोवाला पहिली जागा कशी देऊ शकतो ते पाहा.

१-२. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमुळेसुद्धा आपलं लक्ष कसं भरकटू शकतं?

विचार करा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुमचा फोन वाजतो. कदाचित तो एक महत्त्वाचा कॉल असू शकतो. पण तुम्ही तो कॉल घेतला तर गाडी चालवण्यावरून तुमचं लक्ष भरकटू शकतं हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून तुम्हाला ठरवावं लागेल, की सध्या फोन उचलणं महत्त्वाचंय की गाडी चालवणं. तसंच, आपल्या जीवनातही बऱ्‍याच वेळेस अशा परिस्थिती येतात जेव्हा सध्या आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे ठरवावं लागू शकतं.

२ आपल्याला दररोज बऱ्‍याचशा महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. आणि यहोवाची सेवाa करणं दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचंय हे आपल्याला माहीत आहे. (मत्त. ६:३३) म्हणून जसं चांगल्या प्रकारे गाडी चालवणाऱ्‍याला कोणत्या गोष्टीमुळे त्याचं लक्ष भरकटू शकतं हे चांगलं माहीत असतं, तसंच यहोवाच्या सेवेत कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू शकतं हे आपल्यालाही माहीत असलं पाहिजे.—नीति. ४:२५; मत्त. ६:२२.

३. या लेखावर चर्चा केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

३ आपण कधीही मुद्दामहून यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष भरकटू देणार नाही. पण तरीही, काही गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू शकतं. (लूक २१:३४-३६) म्हणून यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष लावून ठेवायला मदत व्हावी यासाठी आपण तीन गोष्टी पाहू या. (१) कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू शकतं? (२) यहोवाच्या सेवेवरून लक्ष भरकटू नये म्हणून येशूने काय केलं? (३) आणि आपणही येशूसारखं कसं वागू शकतो?

कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू शकतं?

४-६. कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष सहज भरकटू शकतं?

४ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा बऱ्‍याच महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जसं की, आपल्याला एखादा आजार असू शकतो किंवा आपल्यावर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्‍या असू शकतात. या गोष्टींना बाजूला सारून चालत नाही. पण या महत्त्वाच्या गोष्टींमुळेही यहोवाच्या सेवेवरून आपलं लक्ष भरकटू शकतं का? जर आपण सतत याच गोष्टींचा विचार करत राहिलो, आपला सगळा वेळ आणि शक्‍ती त्यांमागेच खर्च केली तर असं होऊ शकतं.

५ तसंच, कदाचित आपल्याला हिंसेचा सामना करावा लागू शकतो, पैशांची चणचण भासू शकते, किंवा महामारीचा सामना करावा लागू शकतो. (२ तीम. ३:१) यामुळे आपल्याला इतक्या चिंता होऊ शकतात की आपल्याला दुसरं काहीच दिसणार नाही.

६ याशिवाय, आपण काही लोकांच्या जीवनात या सगळ्या गोष्टी घडताना पाहिल्या असतील. आणि यामुळे ते खूप निराश झाल्याचंही आपण पाहिलं असेल. मुळात यहोवाने माणसांना दुःखात राहायला बनवलंच नव्हतं. म्हणून लोकांच्या जीवनात जेव्हा इतक्या समस्या येतात तेव्हा त्यांना जीवन नकोनकोसं वाटू शकतं. अशा वेळी, काही लोक चिंता विसरण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ मनोरंजनात आणि मौजमजेसाठी खर्च करतात. आपल्यासोबतही जर असं काही घडत असेल तर आपण काय करू शकतो? याबाबतीत येशूचं उदाहरण आपल्याला मदत करू शकतं.

यहोवाच्या सेवेवरून लक्ष भरकटू नये म्हणून येशूने काय केलं?

७. येशूचं लक्ष कोणकोणत्या गोष्टींमुळे भरकटू शकलं असतं?

७ येशूसमोरसुद्धा अशा बऱ्‍याच गोष्टी होत्या ज्यांमुळे त्याचं लक्ष भरकटू शकलं असतं. त्या काळात लोकांना गरिबीचा आणि आजारांचा सामना करावा लागायचा. (मत्त. १४:१४; मार्क १४:७) रोमी लोक तसंच इतर यहुदी लोक त्यांच्याशी वाईट वागायचे. म्हणून जेव्हा लोकांनी पाहिलं, की येशूकडे चमत्कार करण्याची शक्‍ती आहे तेव्हा त्यांनी त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. (योहा. ६:१४, १५) तसंच, सैतानानेसुद्धा येशूचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याला जगाचा राजा बनण्याचा एक सोपा मार्ग दाखवला. (मत्त. ४:८, ९) याशिवाय, एकदा पेत्रने येशूला स्वतःवर दया करायचा सल्ला दिला. जर येशूने हा सल्ला पाळला असता तर देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून तो भरकटू शकला असता.—मत्त. १६:२१, २२.

८. येशूला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली?

८ मग येशूला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली? त्याने तीन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे, त्याने यहोवासारखा विचार केला. (योहा. ८:२८; १४:९) दुसरी, तो प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात व्यस्त राहिला. (मत्त. ९:३५) आणि तिसरी, त्याच्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे तो कधीच विसरला नाही. (योहा. ४:३४) म्हणून तो सैतानाच्या मोहांना बळी पडला नाही. त्याला माहीत होतं, की पेत्रला जरी त्याला मदत करायची इच्छा असली तरी त्याचे विचार यहोवासारखे नव्हते. (मत्त. ४:१०; १६:२३) लोक काय बोलतात, काय करतात या सगळ्या गोष्टींना त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या आड येऊ दिलं नाही. कदाचित आज आपलं लक्ष दुसऱ्‍या काही गोष्टींमुळे भरकटू शकतं. पण आपणसुद्धा येशूसारख्या या तीन गोष्टी केल्या तर आपणही यहोवाला आपल्या जीवनात पहिली जागा देऊ शकतो.

आपण येशूसारखं कसं वागू शकतो?

९. इफिसकर ५:१७ प्रमाणे आपण काय केलं पाहिजे?

९ यहोवासारखा विचार करायला शिका. असं केल्यामुळे आपल्याला “यहोवाची इच्छा काय आहे” हे ओळखायला मदत होईल. (इफिसकर ५:१७ वाचा.) बायबल वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे यहोवाला काय आवडतं हे आपल्याला कळतं. पण आपल्यावर आलेल्या एखाद्या परिस्थितीबद्दल बायबलमध्ये काही विशिष्ट माहिती नसेल तर काय? अशा वेळीसुद्धा यहोवा त्याबद्दल कसा विचार करतो हे आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला बायबलचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि शिकलेल्या गोष्टी लागू कराव्या लागतील.

१०. आपण यहोवाची विचारसरणी कशी समजून घेऊ शकतो?

१० बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि यहोवा आपल्याशी कसा वागतो हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला यहोवाची विचारसरणी समजून घेता येईल. (यिर्म. ४५:५) बायबलचे अहवाल वाचताना आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकतो. जसं की, ‘या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं? यहोवासारखा विचार करायला मला स्वतःच्या विचारांमध्ये काय बदल करावे लागतील?’ आपल्याला माहीत आहे, की यहोवाचे विचार आपल्या विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. (यश. ५५:९) म्हणून त्याची इच्छा जाणून घ्यायला आपण त्याला प्रार्थना करू शकतो. (स्तो. १४३:१०) तसंच, आपल्याला त्याच्यासारखा विचार करता यावा म्हणूनसुद्धा आपण त्याला प्रार्थनेत मदत मागू शकतो.—१ योहा. ५:१४.

११. आपण काय करावं असं यहोवाला वाटतं?

११ जसजसं आपण यहोवासारखा विचार करायला शिकतो, तसतसं आपल्याला त्याची इच्छा समजते. अंत येण्याआधी आपण तयार असलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण विसरू नये असं त्याला वाटतं. (मत्त. २४:४४) तसंच, आपण चिंतांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नये असंही त्याला वाटतं. (मत्त. ६:३१, ३२) म्हणून जेव्हा आपल्याला आरोग्याच्या, नोकरीच्या, घरच्या, कुटुंबाच्या किंवा इतर काही चिंता सतावतात, तेव्हा यहोवा आपल्याला चांगला सल्ला देतो. आपल्यासमोर जेव्हा समस्या येतात, तेव्हा आपण बुद्धीसाठी आणि ताकदीसाठी त्याला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं.—स्तो. ५५:२२; नीति. ३:५-७.

१२. आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडतात तेव्हाही आपण आनंदी कसं राहू शकतो? (मत्तय ५:३)

१२ यहोवाच्या सेवेत व्यस्त राहा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्‍या वाईट गोष्टींमुळे आपल्याला थोडीफार चिंता वाटणं साहजिक आहे. पण आपण या गोष्टी घडण्यापासून थांबवू शकत नाही. म्हणून आपण यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिलो तर आपल्याला या गोष्टींची चिंता सतावणार नाही. तसंच, आपण यहोवासोबत चांगलं नातं टिकवून ठेवलं तर आपण आनंदी राहू शकतो. (मत्तय ५:३ वाचा.) यासाठी आपण बायबलचा अभ्यास करणं आणि यहोवाच्या सेवेत आपलं सगळ्यात चांगलं ते करत राहणं गरजेचंय. असं केल्याने आपण दाखवतो, की आपण आपल्या वेळेचा चांगला वापर करतोय आणि यामुळे यहोवा खूश होईल.—नीति. २३:१५.

१३. आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो?

१३ आपण आपल्या “वेळेचा चांगला उपयोग” करावा असा सल्ला बायबल आपल्याला देतं. (इफिस. ५:१५, १६) हे वचन आपल्याला फक्‍त दररोजच्या गोष्टींसाठी वेळेचा चांगला उपयोग कसा करावा हे सांगत नाही. तर अंत येण्याआधी यहोवाच्या सेवेत आपण आपल्या वेळेचा चांगला वापर कसा करू शकतो हे सांगतं. मग, आपण आपल्या वेळेचा चांगला वापर करत आहोत हे आपण कसं दाखवू शकतो? आपण जगात घडणाऱ्‍या वाईट गोष्टींच्या बातम्या सतत बघण्यात, वाचण्यात किंवा ऐकण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ घालवू नये. जर आपण असं केलं तर आपण निराश होऊ शकतो, आपलं लक्ष भरकटू शकतं आणि यहोवाच्या सेवेतला आपला आवेशही कमी होऊ शकतो. पण आपण जर आपल्या वेळेचा चांगला वापर केला, तर आपण अवाजवी चिंतांपासून दूर राहू शकतो आणि आपल्या सेवेत व्यस्त राहू शकतो. तसंच, आपण प्रचार सेवेत आणखी काय करू शकतो या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जसं की, आपण जास्तीत जास्त पुनर्भेटी करण्यात वेळ घालवू शकतो. आपण जर लक्षात ठेवलं, की ‘लोकांचं तारण होणं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळणं’ किती गरजेचंय तर आपण प्रत्येक संधीचा उपयोग करून त्यांना मदत करू.—१ तीम. २:४.

१४. यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ दिवसेंदिवस वाढत चाललेली हिंसा, गरिबी किंवा महामारी यांबद्दल आपण खूप जास्त चिंता करत बसत नाही. कारण या गोष्टी आपल्या काळात घडतील हे बायबलमध्ये आधीच सांगून ठेवलंय. त्यामुळे आपल्याला यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायला मदत होते. तसंच, या गोष्टींमुळे आपण घाबरूनही जात नाही. कारण यहोवा लवकरच या वाईट गोष्टी काढून नवीन जग आणणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपलं मन शांत ठेवायला आणि यहोवावर भरवसा ठेवायला आपल्याला मदत होते.—स्तो. १६:८; ११२:१, ६-८.

एक जोडपं ट्रॉली घेऊन प्रचाराला जात आहे आणि आत्मविश्‍वासाने पुढे पाहात आहे. कोलाज: जगात घडणाऱ्‍या वाईट गोष्टी. १. रागाने पेटून उठलेले लोक आंदोलन करत आहेत. २. मतदानाची आकडेवारी. ३. युद्ध करणारे सैनिक. ४. औषधं. ५. शेअर बाजारात एका कंपनीचे स्टॉक झपाट्याने घसरत आहे.

आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असल्या तरी यहोवाच्या सेवेत व्यस्त राहा (परिच्छेद १४ पाहा)b


१५. १ पेत्र ४:७ प्रमाणे आपण काय केलं पाहिजे आणि का?

१५ कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे कधीच विसरू नका. आज बरेच लोक मनोरंजनात खूप जास्त वेळ वाया घालवतात. आणि जगाचा अंत जवळ आहे याकडे ते लक्ष देत नाहीत. मनोरंजन करणं चुकीचं नाही. पण बायबल आपल्याला याबाबतीत “समंजस” असण्याचा सल्ला देतं. (१ पेत्र ४:७ वाचा.) मग आपण समंजस असल्याचं कसं दाखवू शकतो? मनोरंजनाच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घेतले पाहिजेत. तसंच, आपण आपला सगळा वेळ आणि शक्‍ती मनोरंजन आणि मौजमजा करण्यातच घालवू नये. या बाबतीत योग्य निर्णय घेऊन आपण दाखवू शकतो की आपण यहोवासारखा विचार करतोय. तसंच, आपल्याला समजलंय की जीवनात जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत.—२ तीम. १:७.

१६. आपल्या मृत्यूच्या आधी येशू काय करण्यापासून भरकटला नाही?

१६ आपल्यासाठी काय करणं महत्त्वाचंय हे येशू कधीच विसरला नाही. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याच्यावर खूप समस्या आल्या. तरी तो यहोवाला एकनिष्ठ राहण्यापासून आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यापासून भरकटला नाही. तो प्रार्थना करत राहिला. पण दुसरीकडे त्याचे शिष्य प्रार्थना करण्याऐवजी झोपी गेले. कारण ते ‘दुःखाने थकून गेले होते.’—लूक २२:३९-४६; योहा. १९:३०.

१७. बरेच जण सोशल मिडिया का वापरतात? पण त्यामुळे आपलं लक्ष कसं भरकटू शकतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१७ येशूच्या शिष्यांसारखं आपल्यालाही कधीकधी खूप गळून गेल्यासारखं वाटू शकतं. शेवटल्या काळात जगत असल्यामुळे आपल्याला कदाचित बऱ्‍याच चिंता होऊ शकतात. म्हणून आपल्या चिंता विसरण्यासाठी पुष्कळ लोक सोशल मिडियावर खूप वेळ वाया घालवतात. ते मित्रांशी, घरच्यांशी बोलतात, फोटो पाठवतात आणि मनोरंजन करतात. पण सोशल मिडियावर दररोज वाचायला आणि पाहायला इतक्या नवनवीन गोष्टी असतात की लोक त्यांतच गुंतून जातात आणि आपला सगळा वेळ वाया घालवतात. आपल्यासोबत असं होऊ नये म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘सोशल मिडियामुळे मला खरंच जीवनात काही मदत होत आहे का? की त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपासून माझं लक्ष भरकटतंय?’

एक बहीण घरात बायबल वाचत बसली आहे. पण तिच्या फोनवर सोशल मिडियाचे, मनोरंजनाच्या ॲपचे आणि शॉपिंगच्या ॲपचे नोटिफिकेशन आल्यामुळे तिचं लक्ष भरकटतंय.

सोशल मिडिया, मनोरंजन आणि मौजमजा करण्याबाबतीत चांगले निर्णय घेतल्याने आपलं लक्ष यहोवाच्या सेवेवरून भरकटणार नाही (परिच्छेद १७ पाहा)


१८. मनोरंजन निवडण्याच्या बाबतीत आपण योग्य निर्णय का घेतले पाहिजे?

१८ टी.व्ही. वर किंवा फोनवर आपण काय पाहतो आणि कोणते व्हिडिओ गेम खेळतो या बाबतीतसुद्धा आपण चांगले निर्णय घेणं गरजेचंय. मनोरंजनामुळे आपल्याला चांगला वेळ घालवता येतो आणि त्यातून आपल्याला आनंदही मिळतो. पण आपण कोणत्या प्रकारचं मनोरंजन करणार आणि त्यात किती वेळ घालवणार याची आपण काळजी घेतली पाहिजे. जसं की, एखादा व्हिडिओ पाहून झाल्यावर लगेच दुसरा व्हिडिओ आपल्यासमोर येऊ शकतो आणि तोही पाहण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. यामुळे कदाचित आपण तासंतास व्हिडिओ पाहत बसू. कधीकधी त्यांतल्या काही व्हिडिओंमध्ये हिंसा आणि अश्‍लीलता दाखवली जाऊ शकते. म्हणून आपण सावध राहिलो नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. आशियामधल्या आपल्या एका भावाचा विचार करा. तो आधी चित्रपटांचे व्हिडिओ क्लिप पाहू लागला. मग हळूहळू त्याच्या फोनवर अश्‍लील व्हिडिओ येऊ लागले आणि तो तेही पाहू लागला. शेवटी त्याने पोर्नोग्राफी पाहायला सुरुवात केली. पण योग्य वेळी वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याला मदत केल्यामुळे तो स्वतःला बदलू शकला. त्याने काही ठोस पावलं उचलली. जसं की त्याने फोनमधून काही ॲप डिलिट केले आणि फोन किती वेळ वापरायचा हेही ठरवलं. या भावाच्या उदाहरणावरून दिसतं, की मनोरंजन निवडताना आपण खूप काळजी घेणं गरजेचंय.

१९. मौजमजेसाठी आपण खूप जास्त वेळ दिला तर काय होऊ शकतं?

१९ फिरायला जाण्याच्या आणि मौजमजा करण्याच्या बाबतीतही आपण योग्य निर्णय घेतले पाहिजेत. आपण सगळेच रोजच्या कामांत खूप व्यस्त असतो. त्यामुळे कधीतरी निवांत वेळ मिळावा असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं. पण आपण फिरण्यात आणि मौजमजा करण्यातच खूप वेळ घालवला तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ उरणार नाही. (फिलिप्पै. १:१०) आपण काय करणार आणि किती वेळ करणार हे आपलं आपल्यालाच ठरवावं लागेल. यासाठी आपण स्वतःला विचारू शकतो: “फिरायला जाण्यात आणि मौजमजा करण्यात मी जो वेळ घालवतो त्यातून मी चांगले निर्णय घेत असल्याचं दिसतंय का? मी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देऊन अंतासाठी तयार असल्याचं दाखवतोय का?”

२०. आपलं लक्ष भरकटू न दिल्याने आपल्याला काय फायदा होईल?

२० कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवाच्या सेवेपासून भरकटायला लावणार नाही याची खातरी करा. (यश. ४८:१७) यहोवाच्या मदतीने आपण आपल्या समस्यांचा सामना करू शकतो. तसंच, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्‍या वाईट गोष्टींची आपण जास्त चिंता करू नये. आणि आपण मनोरंजन आणि मौजमजा करण्यातही जास्त वेळ वाया घालवू नये. उलट, आपण यहोवासारखा विचार करू या, त्याच्या सेवेत व्यस्त राहू या आणि महत्त्वाच्या गोष्टी नेहमी आठवणीत ठेवू या. आपण जर असं करत राहिलो तर आपलं लक्ष कधीच भरकटणार नाही आणि आपल्याला “खरं जीवन घट्ट धरून ठेवता” येईल.—१ तीम. ६:१९.

आपलं लक्ष भरकटू नये म्हणून . . .

  • आपण यहोवासारखा विचार करायला का शिकलं पाहिजे?

  • यहोवाच्या सेवेत व्यस्त का राहिलं पाहिजे?

  • महत्त्वाच्या गोष्टी नेहमी आठवणीत का ठेवल्या पाहिजेत?

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

a शब्दाचा अर्थ: यहोवाची सेवा करण्यात बायबलचा अभ्यास करणं, सभांना जाणं, कौटुंबिक उपासना करणं आणि प्रचार करणं सामील आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या उपासनेचा भाग आहेत. तसंच, राज्य सभागृह बांधणं आणि त्याची काळजी घेणं, विपत्ती मदतकार्य करणं, अधिवेशनांमध्ये स्वयंसेवक म्हणून सेवा करणं आणि बेथेलमध्ये सेवा करणंसुद्धा यहोवाच्या सेवेचा, म्हणजेच उपासनेचा भाग आहे.

b चित्राचं वर्णन: जगात घडणाऱ्‍या वाईट गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी एक जोडपं प्रचार कार्यात व्यस्त आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा