३० मार्च–५ एप्रिल, २०२६
गीत ७६ वाटतं कसं सांगा?
सत्य शिकवताना प्रेमळ शब्द वापरा
‘यहोवा सत्याचा देव आहे.’—स्तो. ३१:५.
या लेखात:
इतरांना फायदा होईल अशा प्रकारे आपण त्यांना सत्य कसं सांगू शकतो ते पाहा.
१. आपल्याला जर यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे?
तुम्हाला कोणी असं विचारलंय का, की “तुम्ही सत्यात कसे आलात?” तुम्ही म्हणाला असाल, की “मी लहानपणापासून सत्यात आहे.” किंवा मग “मी अलीकडेच सत्यात आलोय.” तुमच्या उत्तरावरून कळतं, की सत्यामुळे तुमचं जीवन बदललंय. आणि आपल्याला माहीत आहे, की जर आपल्याला यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल तर आपलं सत्यावर प्रेम असलं पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. यात प्रामाणिक असणंसुद्धा सामील आहे.—स्तो. १५:१-३.
२. (क) येशूबद्दल लोकांना काय माहीत होतं? (ख) येशूने सांगितलेल्या सत्याचा लोकांवर काय परिणाम झाला असेल?
२ येशू नेहमी खरं बोलायचा. त्याच्या शत्रूंनासुद्धा माहीत होतं, की लोकांना आवडत नसलं तरी तो नेहमी खरं बोलतो. (मत्त. २२:१६) सत्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल तो म्हणाला: “मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलोय.” (मत्त. १०:३५) याचा अर्थ लोकांनी त्याचा विरोध करावा असं त्याला वाटत नव्हतं. पण सत्यामुळे असंच घडेल हे त्याला माहीत होतं. (मत्त. २३:३७) काही जण सत्यावर प्रेम करतील, तर काही सत्याचा विरोध करतील हे त्याला माहीत होतं.—२ थेस्सलनी. २:९-११.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ लोकांना आवडत नसलं, तरी आपण येशूसारखं प्रामाणिक राहायचा आणि नेहमी खरं बोलायचा प्रयत्न करतो. आपण सांगत असलेल्या गोष्टी लोकांना आवडत नसल्या, तरी आपण प्रचार करतो आणि लोकांना बायबलचं सत्य सांगतो. पण आपल्याला यासुद्धा गोष्टीचा विचार करायची गरज आहे, की आपण लोकांना सत्याबद्दल कधी आणि कसं सांगणार. म्हणून या लेखात आपण सगळ्यात आधी पाहू, की आपल्याला सत्य कुठे सापडू शकतं. मग आपण पाहू, की आपण सत्य का, कसं आणि कधी बोललं पाहिजे. या गोष्टी जाणून घेतल्यामुळे आपल्याला विचार करून आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरून लोकांना सत्याबद्दल सांगता येईल. असं करून आपल्याला त्यांना प्रेमाने सत्य सांगता येईल.
आपल्याला सत्य कुठे सापडू शकतं?
४. यहोवा सत्याचा स्रोत असल्याचं आपण का म्हणू शकतो?
४ यहोवा सत्याचा स्रोत आहे. तो नेहमी खरं बोलतो. उदाहरणार्थ, योग्य आणि अयोग्य यांबद्दल तो आपल्याला जे काही सांगतो ते खरंय. (स्तो. १९:९; ११९:१४२, १५१) तो भविष्याबद्दल जे काही सांगतो ते सगळं जसंच्या तसं घडतं. (यश. ५५:१०, ११) तो दिलेलं वचन नेहमी पाळतो. (गण. २३:१९) खरंतर, खोटं बोलणं त्याच्यासाठी अशक्य आहे. (इब्री ६:१८) आणि यामुळेच त्याला बायबलमध्ये ‘सत्याचा देव’ म्हटलंय.—स्तो. ३१:५.
५. देवाला शोधणं अवघड का नाही? समजावून सांगा. (प्रेषितांची कार्यं १७:२७)
५ लोक काहीही म्हणत असले, तरी ‘सत्याचा देव’ यहोवा याला आपण शोधू शकतो. आणि देव अस्तित्वात असल्याचे बरेच पुरावे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. (रोम. १:२०) अथेन्समधल्या सुशिक्षित ग्रीक लोकांच्या समूहाशी बोलताना पौल म्हणाला, “देवाची अशी इच्छा आहे, की माणसांनी त्याचा शोध घ्यावा” आणि “देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रेषितांची कार्यं १७:२७ वाचा.) खरंतर, सत्य शोधत असलेल्या नम्र लोकांना यहोवा स्वतः आपल्याकडे आकर्षित करतो.—योहा. ६:४४.
६. बायबलमध्ये कोणती सत्यं आहेत आणि तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ का आहात?
६ यहोवाला शोधण्याचा एक मार्ग म्हणजे, बायबलचा अभ्यास करणं. बायबलची पुस्तकं लिहिणाऱ्या माणसांना यहोवाने त्याच्या पवित्र शक्तीने प्रेरित केलं. (२ पेत्र १:२०, २१) म्हणून बायबलमध्ये जे काही सांगितलंय ते खरं आणि भरवशालायक आहे. उदाहरणार्थ, विश्वाची आणि पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली हे बायबलमध्ये सांगितलंय. (उत्प. १:१, २६) आपण पाप का करतो, जगात इतकं दुःख आणि मरण का आहे याबद्दलही त्यात सांगितलंय. (रोम. ५:१२; ६:२३) तसंच, “खोटेपणाचा बाप” असलेल्या सैतानाने जे नुकसान केलंय ते यहोवा त्याच्या मुलाद्वारे भरून काढेल असंही त्यात सांगितलंय. (योहा. ८:४४; रोम. १६:२०) शिवाय, येशू दुष्ट लोकांचा नाश करेल, मेलेल्यांना उठवेल, पृथ्वीला पुन्हा नंदनवन बनवेल आणि आपल्याला परिपूर्ण व्हायला मदत करेल याबद्दलही त्यात लिहिलंय. (योहा. ११:२५, २६; १ योहा. ३:८) बायबलमधल्या या सगळ्या गोष्टींवर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. खरंच, यहोवाने आपल्याला सत्य शिकवून आणि ते इतरांना शिकवायची संधी देऊन आपल्याला किती मोठा बहुमान दिलाय!—मत्त. २८:१९, २०.
आपण सत्य का बोलतो?
७-८. खरं बोलण्यामागचा आपला हेतू का महत्त्वाचा आहे? उदाहरण द्या. (मार्क ३:११, १२) (चित्रंसुद्धा पाहा.)
७ आधी पाहिल्याप्रमाणे, आपल्याला जर यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल, तर आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. पण एवढंच करणं पुरेसं नाही. आपण खरं का बोलतो हेसुद्धा यहोवासाठी महत्त्वाचंय. येशू पृथ्वीवर असताना एकदा काय झालं याचा विचार करा. (मार्क ३:११, १२ वाचा.) येशू गालील समुद्राजवळ प्रचार करत असताना, लोकांची गर्दी त्याच्याभोवती जमा झाली. त्यात दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेले काही लोकसुद्धा होते. ते येशूसमोर पडले आणि असं म्हणू लागले: “तू देवाचा मुलगा आहेस.” ते येशूबद्दल खरं बोलले. पण त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. त्यांना कदाचित लोकांचा विश्वास जिंकून त्यांना यहोवापासून दूर घेऊन जायचं होतं. खरं बोलण्यामागचा त्यांचा हेतू स्वार्थी होता. पण येशू मात्र भुलवला गेला नाही किंवा त्यांच्यावर खूश झाला नाही. उलट, त्याने त्या दुष्ट स्वर्गदूतांना त्याच्याबद्दल प्रचार न करायची आज्ञा दिली.
८ या अहवालातून आपण कोणता धडा शिकू शकतो? खरं बोलण्यामागचा आपला हेतू नेहमी योग्य असला पाहिजे. आपलं यहोवावर प्रेम आहे. त्यामुळेच आपण इतरांना सत्य शिकवलं पाहिजे. आणि जर त्यांनी आपली प्रशंसा केली, तर आपण सगळा महिमा यहोवाला दिला पाहिजे.—मत्त. ५:१६; प्रे. कार्यं १४:१२-१५ सोबत तुलना करा.
सत्य शिकवताना तुम्ही इतरांचं लक्ष कोणाकडे वेधता? (परिच्छेद ७-८ पाहा)
९. आपण काय करणं टाळलं पाहिजे आणि का?
९ कधीकधी लोक आपली प्रशंसा करतात. पण अशा वेळी आपण त्यांचं लक्ष यहोवाकडे वळवणं गरजेचंय. विचार करा, एखाद्या जबाबदार भावाने आपल्यावर भरवसा ठेवून आपल्याला एखादी माहिती सांगितली. आणि ती फक्त आपल्यापर्यंतच ठेवायला सांगितली. पण तरीही आपण ती माहिती दुसऱ्यांना सांगितली आणि नंतर ती खरी असल्याचं त्यांना कळलं तर त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ते आपली वाहवाह करतील आणि सहसा आपल्याकडे अशी महत्त्वाची किंवा गुप्त माहिती असते असाही ते विचार करू लागतील. असं केल्यामुळे आपण लोकांच्या नजरेत तर मोठे होऊ, पण यहोवाला मात्र नाराज करू. (नीति. ११:१३) कारण आपण फक्त गुप्त माहितीचा उलगडाच केला नाही, तर त्यामागचा आपला हेतूही चुकीचा होता.
सत्य कसं बोलावं?
१०. आपलं बोलणं “प्रेमळ” असण्याचा काय अर्थ होतो? (कलस्सैकर ४:६)
१० कलस्सैकर ४:६ वाचा. प्रेषित पौलने कलस्सैमधल्या ख्रिश्चनांना आठवण करून दिली, की त्यांचं बोलणं “नेहमी प्रेमळ” असलं पाहिजे. पौलला नेमकं काय म्हणायचं होतं? इथे जो ग्रीक शब्द वापरण्यात आलाय त्याचा अर्थ असा होतो, की आपल्या बोलण्याचा इतरांना फायदा व्हायला पाहिजे. तसंच, आपलं बोलणं प्रेमळ आणि इतरांना आवडेल असंसुद्धा असलं पाहिजे.
११-१२. आपण इतरांना सुज्ञपणे सत्य का सांगितलं पाहिजे? उदाहरण द्या. (चित्रंसुद्धा पाहा.)
११ एखाद्याला बायबलचं सत्य शिकवताना, पौलने प्रेमळपणे बोलण्याचा जो सल्ला दिला तो आपण लागू केला पाहिजे. बायबलमधलं सत्य एका दुधारी तलवारीसारखं आहे. ते आपलं बाहेरचं आणि आतलं व्यक्तिमत्त्व उघड करतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर ते आपल्या खऱ्या भावना आणि हेतूंची पारख करायला मदत करतं. (इब्री ४:१२) पण आपण बायबलचा सुज्ञपणे वापर केला नाही, तर इतरांना वाईट वाटू शकतं किंवा ते आपल्यासोबत वाद घालू शकतात. हे कसं होऊ शकतं?
१२ कल्पना करा, तुम्हाला प्रचारात एक धार्मिक माणूस भेटतो. तो रोज मूर्तींना प्रार्थना करतो. त्याला त्याच्या कुटुंबासोबत नाताळ आणि ईस्टर साजरा करायला खूप आवडतं. अशा वेळी तुम्ही काय कराल? मूर्तींना प्रार्थना करणं चुकीचं आहे आणि नाताळ आणि ईस्टर हे खोट्या धर्मातून आलेले सण आहेत, हे तुम्ही लगेच त्याला बायबलमधून दाखवाल का? (यश. ४४:१४-२०; २ करिंथ. ६:१४-१७) जर तुम्ही पहिल्याच भेटीत असं केलं, तर तुम्ही त्याला सत्य तर सांगाल, पण तुम्ही देवाच्या वचनाचा सुज्ञपणे वापर करत नसाल.
तुम्ही सुज्ञपणे सत्य कसं शिकवू शकता? (परिच्छेद ११-१२ पाहा) a
१३. आपले शब्द मिठाने रुचकर केल्यासारखे असावेत म्हणून आपण काय करू शकतो?
१३ पौलने सांगितल्याप्रमाणे आपलं बोलणं मिठाने रुचकर केल्यासारखं असलं पाहिजे. पण त्याला असं म्हणायचं नव्हतं, की आपण सत्य लपवावं किंवा अर्धसत्य सांगावं. उलट, आपलं बोलणं मिठाने रुचकर केल्यासारखं, म्हणजेच इतरांना आवडेल असं असलं पाहिजे. (ईयो. १२:११) असं करणं नेहमीच सोपं नसतं. आपल्याला जर एखाद्या पदार्थाची चव आवडत असेल, तर ती इतरांनाही आवडेल असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. त्याच प्रकारे, आपण जे बोलतो ते इतरांना आवडेल असा आपण विचार करू. पण खरंतर तसं नसतं. उदाहरणार्थ, काही संस्कृतींमधले लोक त्यांचं मत स्पष्टपणे मांडतात; अगदी त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांसमोरही. पण काही संस्कृतींच्या लोकांना असं करणं चुकीचं वाटतं. म्हणूनच पौलने म्हटलं, की “प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं” हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला आवडतं त्याप्रमाणे नाही, तर इतरांना आवडेल अशा प्रकारे आपण बोललं पाहिजे आणि त्यांच्या संस्कृतीचाही विचार केला पाहिजे.
सत्य कधी बोलावं?
१४. पृथ्वीवर असताना येशूला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी त्याने त्याच्या शिष्यांना सांगितल्या का? समजावून सांगा.
१४ येशू त्याच्या शिष्यांसोबत नेहमी प्रेमाने बोलायचा आणि त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवायचा. (मार्क ६:३४) पण असं असलं तरी, त्यांना अजून खूप काही शिकून घ्यायचं होतं. येशूने त्याला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या नाहीत. कारण त्याला त्यांच्या मर्यादांची जाणीव होती. त्याला माहीत होतं, की त्यांना काही गोष्टी सांगण्याची ती योग्य वेळ नव्हती. खरंतर त्या गोष्टी त्यांना त्या वेळी झेपणार नव्हत्या. (योहा. १६:१२) मग आपण येशूकडून काय शिकू शकतो?
१५. बायबल विद्यार्थ्याला आपण एकाच वेळी सगळी माहिती सांगितली पाहिजे का? समजावून सांगा. (नीतिवचनं २५:११) (चित्रसुद्धा पाहा.)
१५ येशूच्या उदाहरणातून आपण हेच शिकतो, की आपल्याला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी आपण एखाद्याला एकाच वेळी सांगणार नाही. तर आपण येशूसारखं लोकांच्या परिस्थितीचा विचार करू. हे आपल्याला कसं करता येईल? आधी उल्लेख केलेल्या धार्मिक माणसाचा विचार करा. त्याला त्याच्या कुटुंबासोबत नाताळ आणि ईस्टर साजरा करायला खूप आवडतं. आपल्याला माहीत आहे, की हे सण खोट्या धर्मातून आले आहेत आणि यहोवाला ते आवडत नाहीत. पण कल्पना करा, की त्या व्यक्तीचा तुम्ही नाताळाच्या एक दोन आठवड्यांआधी बायबल अभ्यास सुरू केला आहे. अशा वेळी तुम्ही त्याला नाताळ खोट्या धर्मातून आलाय हे बायबलमधून लगेच दाखवाल का आणि त्याने ते करणं सोडून द्यावं अशी अपेक्षा कराल का? असं करून तुम्ही त्याच्याशी प्रेमळपणे वागत असाल का? हे खरंय, की काही बायबल विद्यार्थी शिकलेल्या गोष्टी लगेच लागू करतात. पण काहींना तसं करायला वेळ लागू शकतो. आपल्या विद्यार्थ्याने बदल करावेत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याला झेपतील अशा गोष्टी योग्य वेळ पाहून सांगितल्या पाहिजेत.—नीतिवचनं २५:११ वाचा.
सत्य कधी सांगायचं आणि कितपत सांगायचं हे ठरवताना येशूसारखं वागा (परिच्छेद १५ पाहा)
१६. ‘सत्याच्या मार्गावर चालत राहायला’ आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो?
१६ आपण इतरांना यहोवाबद्दलचं सत्य शिकायला मदत करतो, तेव्हा आपल्याला फार आनंद होतो. आपल्याला जर त्यांना ‘सत्याच्या मार्गावर चालत राहायला’ मदत करायची असेल, तर त्यांच्यासमोर आपलं एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे. (३ योहा. ३, ४) आपण ज्या प्रकारे आपलं जीवन जगतो, त्यावरून आपला देवाच्या अभिवचनांवर पूर्ण भरवसा असल्याचं दिसलं पाहिजे. खरं बोलताना आपला हेतू चांगला असला पाहिजे. सत्य शिकवताना आपण प्रेमाने बोललं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे. लोक आपली प्रशंसा करतात तेव्हा आपण त्यांचं लक्ष यहोवाकडे वळवलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण दाखवून देऊ, की आपण सत्याचा देव यहोवा याच्या बाजूने आहोत.
गीत १६० “आनंदाचा संदेश”!
a चित्राचं वर्णन: पहिल्या चित्रात, एक भाऊ घरमालकाच्या घरात ख्रिस्मस ट्री पाहतो आणि नाताळ खोट्या धर्मातून आलाय हे समजावून सांगायला त्याला एक लेख दाखवतो. दुसऱ्या चित्रात, भाऊ घरमालकाला पालकांसाठी व्यावहारिक सल्ले असलेला एक लेख दाखवतो. यांपैकी कोणत्या पद्धतीमुळे घरमालकाला जास्त फायदा होईल?