वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जानेवारी पृ. २०-२५
  • खंडणीबद्दल कदर दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणीबद्दल कदर दाखवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल विद्यार्थी
  • बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती
  • यहोवापासून दूर गेलेले लोक
  • तुम्ही काय कराल?
  • यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • येशूच्या खंडणी बलिदानातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • आपल्याला खंडणीची गरज का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जानेवारी पृ. २०-२५

२३-२९ मार्च, २०२६

गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ

खंडणीबद्दल कदर दाखवा

“ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं.”—२ करिंथ. ५:१४.

या लेखात:

आपण खंडणीबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतो ते पाहू या.

१-२. येशूने दिलेलं खंडणी बलिदान आपल्याला काय करायला भाग पाडतं आणि का? (२ करिंथकर ५:१४, १५) (चित्रसुद्धा पाहा.)

कल्पना करा, की तुम्ही एखाद्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्‍याखाली अडकला आहात. जर एखाद्या व्यक्‍तीने तुम्हाला तिथून बाहेर काढलं तर त्या व्यक्‍तीबद्दल तुम्हाला कसं वाटेल? तिने जरी तुमच्यासोबत इतर लोकांचाही जीव वाचवला असला, तरी तुम्ही स्वतः जाऊन तिचे आभार मानाल आणि तिने तुमच्यासाठी जे केलं ते तुम्ही कधीच विसरणार नाही हे तिला सांगाल.

२ मागच्या लेखात आपण पाहिलं, की आपण वारशाने मिळालेल्या पापापासून स्वतःची सुटका करू शकत नाही. पण येशूच्या खंडणी बलिदानामुळे आपल्याला (१) आपल्या पापांची क्षमा मिळते, (२) परिपूर्ण बनायची आशा मिळते आणि (३) यहोवाशी मैत्री करायला मदत होते. याचा परिणाम म्हणजे आपल्याला नवीन जगात कायम जगण्याची आशा मिळते. खरंच, येशूने दिलेल्या खंडणी बलिदानावरून त्याचं मानवांवर किती प्रेम आहे हे कळतं. खरंतर तो पृथ्वीवर येण्याआधीपासूनच त्याचं मानवांवर खूप प्रेम होतं. (नीति. ८:३०, ३१) म्हणूनच प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं, की “ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं.” (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.) याचा अर्थ येशूचं प्रेम आपल्याला खंडणीसाठी कदर व्यक्‍त करायला आणि ती नेहमी लक्षात ठेवायला भाग पाडतं.

मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, कोसळलेल्या इमारतीखाली दबलेल्या माणसाला बचाव पथकातला एक व्यक्‍ती वाचवतोय.

आपला जीव वाचवणाऱ्‍याचे आपण जसं आभारी असतो, तसंच आपण खंडणीसाठी यहोवा आणि येशूचे आभारी असलं पाहिजे (परिच्छेद १-२ पाहा)


३. प्रत्येकाचा खंडणीबद्दल कदर दाखवण्याचा मार्ग वेगळा का असू शकतो?

३ मग खंडणीबद्दल कदर असल्याचं तुम्ही कसं दाखवाल? कदाचित आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने कदर दाखवेल. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा, तीन लोकांना एका ठिकाणी जायचंय. पण प्रत्येक जण वेगवेगळ्या शहरातून त्यांचा प्रवास सुरू करतो. त्यामुळे साहजिकच तिथे पोहोचण्याचा त्यांचा मार्गही वेगळा असेल. त्याचप्रमाणे, खंडणीबद्दल कदर दाखवण्याचा आपला मार्गही इतरांपेक्षा वेगळा असू शकतो. कारण आपलं यहोवासोबतचं नातं सध्या कसं आहे यावर हे अवलंबून आहे. त्यामुळेच बायबल अभ्यास करत असलेल्या, बाप्तिस्मा झालेल्या आणि यहोवापासून दूर गेलेल्या व्यक्‍तीचा खंडणीबद्दल कदर दाखवण्याचा मार्ग वेगळा असेल. या लेखात आपण याबद्दलच पाहणार आहोत.

बायबल विद्यार्थी

४. यहोवाला बायबल विद्यार्थ्यांबद्दल कसं वाटतं?

४ जर तुम्ही बायबलचा अभ्यास करत असाल तर या गोष्टीचा विचार करा: तुम्ही यहोवाबद्दल शिकायला सुरुवात केली यावरून कळतं, की यहोवाने तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केलंय. तसंच, त्याच्यासोबतची तुमची मैत्री मजबूत करायला तो तुम्हाला मदतही करतोय. (योहा. ६:४४; प्रे. कार्यं १३:४८) यहोवा “हृदयांचं परीक्षण करणारा” देव आहे. याचा अर्थ यहोवाबद्दल शिकण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता, ती तो पाहतो आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जीवन जगायला तुम्ही जे बदल करता ते पाहूनसुद्धा त्याला खूप आनंद होतो. (नीति. १७:३; २७:११) खंडणीमुळेच तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता. (रोम. ५:१०, ११) म्हणून ही गोष्ट कधीच हलक्यात घेऊ नका.

५. बायबल विद्यार्थी फिलिप्पैकर ३:१६ मधला सल्ला कसा पाळू शकतात?

५ तुम्ही जर एक बायबल विद्यार्थी असाल, तर तुम्ही खंडणीसाठी कदर असल्याचं कसं दाखवाल? एक मार्ग म्हणजे, पौलने फिलिप्पैकरांना जो सल्ला दिला तो पाळून. त्याने म्हटलं: “आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.” (फिलिप्पै. ३:१६) या सल्ल्याप्रमाणे जीवनाच्या मार्गावर चालत असताना कोणत्याच गोष्टीला तुमच्या प्रगतीच्या आड येऊ देऊ नका.—मत्त. ७:१४; लूक ९:६२.

६. बायबल विद्यार्थ्यांना बदल करणं कठीण जात असेल तर ते काय करू शकतात? (अनुवाद ३०:११-१४) (चित्रसुद्धा पाहा.)

६ अलिकडेच बायबलमधून शिकलेली एखादी गोष्ट मान्य करणं तुम्हाला कठीण जातंय का? जर असं असेल तर तुम्ही त्यावर संशोधन करू शकता आणि ती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. (स्तो. ८६:११) असं करूनसुद्धा तुम्हाला तो विषय समजून घेणं कठीण जात असेल, तर सध्यापुरता तो विषय बाजूला ठेवा. पण बायबल अभ्यास करायचं सोडू नका. तसंच, यहोवाला न आवडणारी एखादी सवय सोडणं तुम्हाला कठीण जातंय का? असं असेल, तर हे लक्षात ठेवा की यहोवा अपरिपूर्ण मानवांकडून कधीच अशक्य गोष्टींची अपेक्षा करत नाही. म्हणून तुम्ही त्याच्या स्तरांप्रमाणे जगू शकता याची खातरी ठेवा. (अनुवाद ३०:११-१४ वाचा.) यहोवाने वचन दिलंय की तो तुम्हाला नक्की मदत करेल. (यश. ४१:१०, १३; १ करिंथ. १०:१३) म्हणून हार मानू नका. तुमच्यासमोर ज्या समस्या आहेत त्यांकडे लक्ष देण्याऐवजी, यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर कशी दाखवता येईल याकडे लक्ष द्या. यात खंडणीबद्दल कदर दाखवणंही सामील आहे. यहोवावरचं तुमचं प्रेम जसजसं वाढेल, तसतसं तुम्हाला याची खातरी पटेल की “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहा. ५:३.a

एक माणूस “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या पुस्तकाचा धडा ४० वाचत आहे. त्याच्या टेबलावर सिगारेटचं पाकीट आणि काही सिगारेटचे तुकडे दिसत आहेत.

यहोवा कधीच आपल्याकडून अशक्य गोष्टींची अपेक्षा करत नाही. तो आपल्याला त्याच्या स्तरांनुसार जगायला नक्की मदत करेल (परिच्छेद ६ पाहा)


७. सत्यात वाढलेली मुलं कोणत्या गोष्टीवर विचार करू शकतात?

७ मुलांनो, तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून सत्य मिळालंय का? जर असं असेल तर तुम्हीसुद्धा बायबल विद्यार्थी आहात. खरंतर, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे सर्वात महत्त्वाचे बायबल विद्यार्थी आहात. जेव्हा तुम्ही यहोवाच्या जवळ जाण्यासाठी स्वतः पाऊल उचलता, तेव्हा तोसुद्धा तुमच्या जवळ येतो. बायबल म्हणतं: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याको. ४:८; १ इति. २८:९) तो तुम्हाला फक्‍त एका समूहाचा भाग म्हणून पाहत नाही, तर त्याने तुम्हाला वैयक्‍तिकरीत्या त्याच्या जवळ आणलंय; मग तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून सत्य मिळालं असलं तरीही. विचार करा, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला यहोवासोबतची तुमची मैत्री घट्ट करायला मदत झाली आहे? नक्कीच येशूच्या खंडणी बलिदानामुळे. म्हणून यहोवाने तुम्हाला दिलेल्या या भेटीला कधीच कमी समजू नका. (रोम. ५:१, २) या वर्षाच्या स्मारकविधीला उपस्थित राहण्याआधी येशूच्या बलिदानामुळे तुम्हाला काय फायदा झालाय याचा विचार करा. असं केल्यामुळे यहोवाची आणखी जास्त सेवा करायची तुमची इच्छा वाढेल आणि खंडणीबद्दलची तुमची कदरही आणखी वाढेल.b

बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती

८. बाप्तिस्मा घेतलेले भाऊबहीण खंडणीवर विश्‍वास असल्याचं कसं दाखवू शकतात?

८ तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, तर तुम्ही आधीच काही मार्गांनी खंडणीवर विश्‍वास असल्याचं दाखवलं असेल. जसं की, तुम्ही यहोवाच्या जवळ येण्यासाठी काही पावलं उचलली आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जीवन जगण्यासाठी काही बदल केले. इतरांना तुमच्या विश्‍वासाबद्दल सांगून येशूने दिलेली शिष्य बनवण्याची आज्ञा तुम्ही पाळली. तुमचं जीवन यहोवाला समर्पित करून तुम्ही बाप्तिस्मा घेतला. कदाचित खऱ्‍या उपासनेची बाजू घेतल्यामुळे तुम्हाला विरोधाचाही सामना करावा लागला असेल. (२ तीम. ३:१२) तुम्ही विश्‍वासू राहून धीर धरला आणि यहोवावर असलेलं तुमचं प्रेम दाखवलं. यावरूनच खंडणीबद्दल तुम्हाला कदर असल्याचं दिसून आलं.—इब्री १२:२, ३.

९. बाप्तिस्मा झालेल्या ख्रिश्‍चनांसमोर कोणता धोका आहे?

९ बाप्तिस्मा झालेल्या ख्रिश्‍चनांसमोर एक धोका आहे. काळाच्या ओघात खंडणीबद्दलची त्यांची कदर हळूहळू कमी होऊ शकते. हे कसं होऊ शकतं? पहिल्या शतकातल्या इफिसमधल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत काय झालं याचा जरा विचार करा. येशूने त्यांच्या धीराबद्दल त्यांची प्रशंसा केली. पण त्याने त्यांना म्हटलं: “एका गोष्टीसाठी मी तुला दोषी ठरवतो. ती म्हणजे, तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे.” (प्रकटी. २:३, ४) येशूने सांगितल्याप्रमाणे कदाचित जसजसा वेळ जातो तसतसं आपण यहोवाची उपासना करायची म्हणून करू लागतो. कदाचित आपण प्रार्थना करू, सभांना जाऊ आणि प्रचारालाही जाऊ. पण आपण हे सगळं यहोवावरच्या प्रमापोटी नाही, तर फक्‍त एक सवय म्हणून करू. तुमच्याबद्दलही असंच झालंय का? एकेकाळी यहोवाबद्दल असलेलं तुमचं प्रेम आता आटलं असेल तर तुम्ही काय करू शकता?

१०. पौलने तीमथ्यला दिलेला सल्ला तुम्ही कसा लागू करू शकता? (१ तीमथ्य ४:१३, १५)

१० आपण यहोवाची उपासना कशी करतोय आणि आपण यहोवाला आपलं सगळ्यात चांगलं ते कसं देऊ शकतो, यावर प्रेषित पौलने तीमथ्यला विचार करायला सांगितलं. त्याने म्हटलं: “या गोष्टींबद्दल खोलवर विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा.” (१ तीमथ्य ४:१३, १५ वाचा.) तुम्हीही यहोवाच्या सेवेतला तुमचा आवेश कसा टिकवून ठेवू शकता याचा विचार करा. (रोम. १२:११) जसं की, सभांमध्ये पूर्णपणे लक्ष देता यावं म्हणून तुम्ही सभांची चांगली तयारी करू शकता. तसंच वैयक्‍तिक अभ्यासासाठी तुम्हाला एकांत मिळेल असं ठिकाण तुम्ही शोधू शकता. म्हणजे तुम्हाला मनन करायला मदत होईल आणि शिकलेल्या गोष्टींचा जास्त फायदा होईल. जसं शेकोटी पेटत ठेवायला त्यात लाकडं टाकावी लागतात, तसंच खंडणीबद्दल आणि यहोवाने तुमच्यासाठी केलेल्या इतर गोष्टींबद्दलची कदर पुन्हा वाढवायला तुम्हाला या गोष्टी करत राहाव्या लागतील. शिवाय, यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळालेत, यावर स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांत विचार करा. यामुळे तुम्हाला खंडणीबद्दलची कदर वाढवायला मदत होईल. कारण खंडणीमुळेच यहोवासोबत मैत्री करणं तुम्हाला शक्य झालंय.

११-१२. तुमचा आवेश सध्या कमी झाला असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर यहोवाचा आशीर्वाद नाही? समजावून सांगा. (चित्रसुद्धा पाहा.)

११ यहोवाच्या सेवेतला तुमचा आवेश जर कमी झाला असेल, तर यहोवाचा तुमच्यावर आता आशीर्वाद नाही असा विचार करू नका. प्रेषित पौलने करिंथच्या ख्रिश्‍चनांना काय म्हटलं याचा विचार करा. त्याने म्हटलं: “इच्छा नसतानाही मी ते केलं, तरी ती माझी जबाबदारीच आहे. कारण देवाने हे काम माझ्यावर सोपवलं आहे.” (१ करिंथ. ९:१७) त्याला नेमकं काय म्हणायचं होतं?

१२ पौललासुद्धा कधीकधी प्रचार करायची इच्छा व्हायची नाही. पण त्याला त्या वेळी कसं वाटतंय याचा विचार करण्याऐवजी त्याने प्रचार करत राहायचा निश्‍चय केला. याबाबतीत तुम्हीही पौलसारखं करू शकता. तुम्हाला जर आध्यात्मिक गोष्टी करायची इच्छा होत नसेल, तरीही तुम्ही त्या करायचा ठाम निश्‍चय करू शकता. तुमच्यात इच्छा निर्माण व्हावी आणि ते काम पूर्ण करायची ताकद मिळावी म्हणून तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. (फिलिप्पै. २:१३) ज्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या जवळ राहता येईल त्या गोष्टी करत राहा. असं करत राहिल्याने काही काळाने तुमचं यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत होईल आणि तुमचा आवेशही वाढेल.

दोन बहिणी प्रचारासाठी गेल्या आहेत. एका बहिणीने तिच्या बाळालासुद्धा सोबत नेलंय. ती थोडीशी निराश दिसत असल्यामुळे दुसरी बहीण तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देत आहे.

सध्या तुमचा आवेश कमी झाला असला तरी उपासनेशी संबंधीत गोष्टी करत राहा (परिच्छेद ११-१२ पाहा)


१३. “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही” याचं तुम्ही परीक्षण कसं करू शकता?

१३ २ करिंथकर १३:५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण वेळोवेळी स्वतःचं परीक्षण करणं गरजेचंय. त्यात असं म्हटलंय: “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहात हे सतत तपासून पाहा.” असं करत असताना आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकतो. जसं की, ‘मी देवाच्या राज्याला माझ्या जीवनात पहिली जागा देतोय का?’ (मत्त. ६:३३) ‘मी ज्या प्रकारचं मनोरंजन करतो त्यावरून हे दिसतंय का, की मी वाइटाचा द्वेष करतोय?’ (स्तो. ९७:१०) ‘मी भाऊबहिणींसोबत शांतीने आणि एकतेने राहायचा प्रयत्न करतोय का?’ (इफिस. ४:२, ३) स्मारकविधीच्या काळात, यहोवाने खंडणीची व्यवस्था करून आपल्यासाठी जे केलंय त्यावर आपण विचार करतो. आणि असं केल्यामुळे आपण ख्रिस्तासाठी जगतोय की स्वतःसाठी जगतोय याचं परीक्षण करायची आपल्याला एक संधी मिळते.c

यहोवापासून दूर गेलेले लोक

१४. काही भाऊबहीण कोणत्या कारणांमुळे यहोवापासून दूर गेले आहेत?

१४ काही भाऊबहिणींनी सभेला यायचं सोडून दिलंय. यातले काही सत्यात जुने आहेत तर काही नवीन. त्यांनी असं का केलंय? काही भाऊबहीण ‘जीवनाच्या चिंतांमुळे’ भारावून गेले आहेत. (लूक २१:३४) काहींचं भाऊबहिणींच्या वागण्या-बोलण्यामुळे मन दुखावलंय. (याको. ३:२) आणि काहींनी गंभीर पाप केल्यामुळे त्यांना मदत मागायला लाज वाटते. जर तुम्ही या किंवा इतर कारणांमुळे यहोवापासून दूर गेला असाल तर तुम्ही काय करू शकता? खंडणीबद्दलची कदर आणि यहोवा आणि येशूबद्दलचं प्रेम तुम्हाला काय करायला भाग पाडू शकतं?

१५. यहोवाला हरवलेल्या मेंढरांची काळजी असल्याचं तो कसं दाखवतो? (यहेज्केल ३४:११, १२, १६)

१५ यहोवाला त्याच्यापासून दूर गेलेल्यांबद्दल काय वाटतं याचा विचार करा. तो त्यांना सोडून देत नाही. उलट, तो त्याच्या हरवलेल्या मेंढरांना शोधतो, तो त्यांना चारतो आणि पुन्हा कळपात आणतो. (यहेज्केल ३४:११, १२, १६ वाचा.) यहोवा तुमच्या बाबतीतही असंच करतोय. तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच चांगलं ते करायची इच्छा आताही तुमच्यात आहे. तर मग यहोवाने जसं सुरुवातीला तुमचं मन पाहून तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केलं होतं, तसंच तो आताही तुम्हाला परत आणण्यासाठी करू शकणार नाही का?

१६. हरवलेल्या मेंढरांना यहोवाकडे परत यायला कशामुळे मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ यहोवाकडं परत या, या माहितीपत्रिकेत असं म्हटलंय: “तुम्ही परत याल तेव्हा यहोवा तुमचं स्वागत करेल याची खातरी बाळगा. चिंता, दुखावलेल्या भावना यांवर मात करण्यासाठी आणि शुद्ध विवेक मिळवण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. यामुळं तुम्हाला मनःशांती मिळेल. तुम्ही पुन्हा एकदा मंडळीतील बांधवांसोबत यहोवाची सेवा आवेशानं करू शकाल.” लक्षात असू द्या, की वडिलांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. ते तुमच्यासाठी “वाऱ्‍यापासून लपण्याची जागा, आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा” बनू शकतात. (यश. ३२:२) यात काही शंका नाही, की तुम्हाला खंडणीबद्दल कदर आहे आणि ती व्यक्‍त करायची इच्छासुद्धा आहे. त्यामुळे स्वतःला विचारा: ‘पुन्हा यहोवाचा चांगला मित्र बनण्यासाठी मी आता काय करू शकतो?’ (यश. १:१८; १ पेत्र २:२५) उदाहरणार्थ, तुम्ही प्रत्यक्षरीत्या सभेला जाऊ शकता का? यहोवाकडे परत यायची तुमची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे हे तुम्ही वडिलांना सांगू शकता का? असं केल्यामुळे कदाचित ते काही काळासाठी कोणालातरी तुमचा बायबल अभ्यास घ्यायला सांगतील. खंडणीसाठी कदर व्यक्‍त करायला आणि यहोवाकडे परत यायला तुम्ही जी पावलं उचलता त्यावर तो नक्की आशीर्वाद देईल याची तुम्ही खातरी ठेवू शकता.

एका वयस्कर माणसाच्या हातात बायबल आहे आणि तो सभागृहापासून काही अंतरावर उभा आहे. भाऊबहीण सभेला येणाऱ्‍यांचं किती प्रेमाने स्वागत करत आहेत याकडे तो लक्ष देऊन बघत आहे.

स्वतःला विचारा: ‘पुन्हा यहोवाचा चांगला मित्र बनण्यासाठी मी आता काय करू शकतो?’ (परिच्छेद १६ पाहा)


तुम्ही काय कराल?

१७-१८. या वर्षाच्या स्मारकविधीच्याआधी आपण काय करू शकतो?

१७ येशूने म्हटलं, “जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं” म्हणून खंडणी देण्यात आली आहे. (योहा. ३:१६) येशूने त्याच्या जीवनाचं बलिदान दिल्यामुळेच यहोवा पाप आणि मृत्यूतून आपली सुटका करू शकतो. त्यामुळे आपण या गोष्टीला कधीच हलक्यात घेऊ नये. (रोम. ३:२३, २४; २ करिंथ. ६:१) स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांत आपल्याकडे यहोवाच्या आणि येशूच्या प्रेमाबद्दल विचार करायची एक संधी आहे. असं केल्यामुळे त्याबद्दल कदर दाखवायला आपण प्रवृत्त होऊ.

१८ आज जगभरातले लाखो यहोवाचे सेवक ‘स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगत आहेत.’ कारण त्यांच्या मनात खंडणीबद्दल कदर आहे. मग खंडणीबद्दल कदर असल्याचं तुम्ही कसं दाखवू शकता? कदाचित आपण सगळेच या प्रश्‍नाचं वेगवेगळं उत्तर देऊ. पण तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की कदर दाखवण्यासाठी तुम्ही जे काही कराल त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल.—२ करिंथ. ५:१५.

तुमचं उत्तर काय असेल?

  • बायबल विद्यार्थी खंडणीबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतात?

  • बाप्तिस्मा झालेले ख्रिस्ती खंडणीबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतात?

  • यहोवापासून दूर गेलेले लोक खंडणीबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतात?

गीत १४ राजा येशूचं स्वागत करू या!

a बायबलमध्ये शिकलेल्या गोष्टी लागू करायला मदत व्हावी, म्हणून तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या प्रत्येक धड्याच्या शेवटी असलेल्या “ध्येय” या चौकटीचा वापर करू शकता.

b आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता, हे जाणून घेण्यासाठी डिसेंबर २०१७ च्या टेहळणी बुरूज अंकातला “तरुणांनो, ‘आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा’” हा लेख पाहा.

c यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल तुम्ही कदर कशी दाखवू शकता, हे जाणून घेण्यासाठी १५ जून, १९९५ च्या टेहळणी बुरूज अंकातला “देवाची सेवा करण्यास तुम्हाला काय प्रवृत्त करते?” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा