वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जानेवारी पृ. २-७
  • मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • फेनिकेच्या स्त्रीसारखी नम्रता, चिकाटी आणि विश्‍वास दाखवा
  • पेत्रसारखं वागा—देवाच्या वचनातून शिकत राहा
  • पौलसारखं वागा—नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला
  • दावीदसारखं वागा—यहोवाला तुमचं संरक्षण करू द्या
  • मार्गदर्शनासाठी नेहमी यहोवावर अवलंबून राहा
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा आणि येशूसारखा विचार करायला शिका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जानेवारी पृ. २-७

२-८ मार्च, २०२६

गीत ९७ यहोवाच्या वचनाने जगू या

मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहा

२०२६ सालचं वार्षिक वचन: “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्त. ५:३.

या लेखात:

यहोवाच्या मार्गदर्शनातून फायदा मिळवून खऱ्‍या अर्थाने आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू या.

१. जीवन जगण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते? (मत्तय ५:३)

आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. उदाहरणार्थ, आपल्याला अन्‍न, वस्त्र आणि निवाऱ्‍याची गरज असते हे त्याला माहीत आहे. थोड्या काळासाठी का होईना यांपैकी आपली एक जरी गरज भागली नाही, तरी आपलं जगणं मुष्कील होऊ शकतं. पण याशिवाय आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. (मत्तय ५:३ वाचा.) या गोष्टीची जाणीव असल्यामुळेच आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो.

२. आपली परिस्थितीसुद्धा भीक मागणाऱ्‍या व्यक्‍तीसारखी कशी आहे?

२ “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” यासाठी असलेल्या मूळ शब्दाचा अर्थ देवाच्या पवित्र शक्‍तीसाठी भीक मागणं असा होतो. आता एका भीक मागणाऱ्‍या व्यक्‍तीची कल्पना करा. तो रस्त्याच्या कडेला उभा आहे. त्याचे कपडे मळीन आणि फाटके आहेत. पुरेसं अन्‍न न मिळाल्यामुळे तो पार वाळून आणि थकून गेलाय. त्याच्याकडे पाहून कोणालाच त्याच्याकडे जावंसं वाटत नाही. दिवसा त्याला उन्हातान्हात भटकावं लागतं आणि रात्री थंडीगारठ्यात झोपावं लागतं. त्याला माहीत आहे की त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला कोणाच्यातरी मदतीची गरज आहे. त्याच प्रकारे ज्याला देवाच्या मार्गदर्शनाची भूक असते त्याला माहीत असतं, की तो त्याची परिस्थिती स्वतःहून सुधारू शकत नाही. म्हणूनच तो यहोवाकडून आध्यात्मिक अन्‍न घेण्यासाठी आतुर असतो.

३. आपण या लेखात काय पाहणार आहोत?

३ या लेखात आपण येशूकडे मदतीची भीक मागणाऱ्‍या फेनिकेच्या स्त्रीबद्दल सगळ्यात आधी पाहणार आहोत. देवाच्या मार्गदर्शनाची भूक असणाऱ्‍यांनी कोणते तीन गुण दाखवले पाहिजेत हे आपण तिच्याकडून शिकणार आहोत. तसंच, देवाच्या मार्गदर्शनाची भूक असणाऱ्‍या प्रेषित पेत्र, प्रेषित पौल आणि दावीद यांच्या उदाहरणातूनसुद्धा आपण शिकणार आहोत.

फेनिकेच्या स्त्रीसारखी नम्रता, चिकाटी आणि विश्‍वास दाखवा

४. फेनिकेची स्त्री येशूकडे का आली?

४ एकदा फेनिकेची एक स्त्री येशूकडे आली. तिच्या मुलीला “दुष्ट स्वर्गदूताने पछाडल्यामुळे” ती खूप त्रासात होती. (मत्त. १५:२१-२८) येशूने तिच्या मुलीला बरं करावं म्हणून ती गुडघ्यांवर बसून त्याच्याकडे मदतीची भीक मागू लागली. असं करताना त्या स्त्रीने काही खास गुण दाखवले. ते कोणते?

५. फेनिकेच्या स्त्रीने कोणते गुण दाखवले आणि येशूने काय केलं? (चित्रसुद्धा पाहा.)

५ फेनिकेच्या स्त्रीने येशूकडे मदत मागितली, तेव्हा येशूने म्हटलं: “मुलांसाठी असलेली भाकर कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.” त्या स्त्रीच्या जागी दुसरं कोणी असतं, तर त्याला वाईट वाटलं असतं आणि तो तिथून निघून गेला असता. पण फेनिकेच्या स्त्रीला मात्र राग आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही. यावरून समजतं की ती नम्र होती. तिने फक्‍त नम्रताच नाही तर चिकाटीही दाखवली. तिने हार मानली नाही. ती येशूकडे मदतीची भीक मागत राहिली. तिने असं का केलं? कारण तिचा येशूवर जबरदस्त विश्‍वास होता. तिचा विश्‍वास पाहून येशूने तिला मदत करायचं ठरवलं. त्याने आधी असं म्हटलं होतं, की त्याला फक्‍त ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांकडे’ पाठवण्यात आलंय. पण तरी त्याने तिच्या मुलीला बरं केलं.

येशू आणि त्याचे तीन शिष्य जेवत असताना फेनिकेची स्त्री तिथे येते आणि गुडघे टेकून येशूकडे मदतीची भीक मागते.

येशूकडून मदत मिळवण्यासाठी फेनिकेच्या स्त्रीला नम्रता, चिकाटी आणि विश्‍वास हे तीन गुण दाखवण्याची गरज होती (परिच्छेद ५ पाहा)


६. फेनिकेच्या स्त्रीच्या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

६ आपण यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चाललो तर आपल्याला फायदा होऊ शकतो. पण असं करण्यासाठी आपल्याला त्या स्त्रीसारखं नम्र बनावं लागेल, चिकाटी दाखवावी लागेल आणि यहोवावर मजबूत विश्‍वास ठेवावा लागेल. आपण नम्र असलो तरच आपण यहोवाकडे मदत मागायचं कधी सोडणार नाही. त्यासोबतच आपला येशूवर विश्‍वास असला पाहिजे. शिवाय, त्याने आपलं मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना नेमलंय त्यांच्यावरही आपला विश्‍वास असला पाहिजे. (मत्त. २४:४५-४७) आपण नम्र असतो, मदतीसाठी यहोवावर अवलंबून असतो आणि त्याच्यावर आपला विश्‍वास असतो, तेव्हा यहोवाला आणि येशूला खूप आनंद होतो. आपण जर असं करत राहिलो तर ते आपल्याला मदत करतील आणि आपलं मार्गदर्शन करत राहतील. (याकोब १:५-७ सोबत तुलना करा.) आता आपण पाहू या, की यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतो आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या कशा पुरवतो. तसंच, आपण प्रेषित पेत्र, पौल आणि दावीद यांच्या उदाहरणावरही लक्ष देऊ.

पेत्रसारखं वागा—देवाच्या वचनातून शिकत राहा

७. पेत्रला येशूने कोणती जबाबदारी दिली? आणि असं असलं तरी त्याला काय करायची गरज होती? समजावून सांगा. (इब्री लोकांना ५:१४–६:१)

७ प्रेषित पेत्रचं उदाहरण घ्या. पेत्रने ओळखलं की येशू हाच मसीहा आहे आणि “सर्वकाळाचं जीवन देणाऱ्‍या गोष्टी” सांगण्यासाठी यहोवा त्याचा वापर करतोय. हे ओळखणाऱ्‍या सुरुवातीच्या यहुदी लोकांपैकी तो एक होता. (योहा. ६:६६-६८) स्वर्गात जाण्याआधी येशूने पेत्रला अशी आज्ञा दिली: “माझ्या लहान मेंढरांना चार.” (योहा. २१:१७) पेत्रने विश्‍वासूपणे ही आज्ञा पाळली. तसंच त्याने यहोवाच्या प्रेरणेने दोन पत्रंसुद्धा लिहिली आणि आज ती पत्रं बायबलचा भाग आहेत. पण मग पेत्रला देवाच्या वचनाचा अभ्यास करायची गरज नव्हती असा याचा अर्थ होता का? नाही. प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या दोन पत्रांचा पेत्रने अभ्यास केला. त्याने मान्य केलं, की पौलने लिहिलेल्या “काही गोष्टी समजायला कठीण आहेत.” (२ पेत्र ३:१५, १६) पण पेत्रने हार मानली नाही. पौलने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या गोष्टी जरी ‘जड अन्‍नासारख्या’ असल्या, तरी त्या समजून घ्यायला आणि लागू करायला यहोवा आपली मदत करेल असा पेत्रला विश्‍वास होता.—इब्री लोकांना ५:१४–६:१ वाचा.

८. यहोवाने नवीन गोष्टींचा खुलासा केल्यानंतर पेत्रने काय केलं?

८ यहोवाकडून मिळालेलं मार्गदर्शन स्वीकारून पेत्रने यहोवावर विश्‍वास असल्याचं दाखवलं. उदाहरणार्थ, या घटनेचा विचार करा. यापो शहरात पेत्रला एक दृष्टांत मिळाला. त्यात त्याला मोशेच्या नियमशास्त्रानुसार अशुद्ध असलेले प्राणी कापून खायला सांगण्यात आलं. पेत्र यहुदी असल्यामुळे त्याच्यासाठी ही एक घृणास्पद गोष्ट होती. तो लगेच म्हणाला: “शक्यच नाही प्रभू, कारण मी आजपर्यंत कधीही दूषित आणि अशुद्ध असं काहीही खाल्लं नाही.” पण त्याला असं सांगण्यात आलं: “देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.” (प्रे. कार्यं १०:९-१५) यानंतर पेत्रने आपले विचार बदलले. आपण असं का म्हणू शकतो? दृष्टांतानंतर लगेचच, विदेशी असलेल्या कर्नेल्यने पाठवलेली तीन माणसं पेत्रकडे आली. त्यांनी त्याला कर्नेल्यकडे यायला आणि त्याच्याशी बोलायला सांगितलं. यहुदी लोक विदेशी लोकांना अशुद्ध समजायचे. यामुळे पेत्रचं कर्नेल्यच्या घरी जाणं शक्यच नव्हतं. (प्रे. कार्यं १०:२८, २९) पण यहोवाकडून मिळालेलं नवीन मार्गदर्शन पेत्रने स्वीकारलं. आणि त्याने मान्य केलं की यहोवाने त्याच्यासमोर काही नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे. (नीति. ४:१८) त्याने कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याला आनंदाचा संदेश सांगितला. कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याने सत्य स्वीकारलं, त्यांच्यावर पवित्र शक्‍ती आली आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम केल्यामुळे पेत्रला हे सगळं पाहण्याचा बहुमान मिळाला.—प्रे. कार्यं १०:४४-४८.

९. समजायला अवघड असलेल्या गोष्टींचा अभ्यास करत राहिल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात?

९ पेत्रसारखं आपणही देवाच्या वचनाचा दररोज अभ्यास केला पाहिजे. बहुतेक वेळा जे समजायला सोपं असतं तेच आपण वाचतो. पण आपण जड अन्‍न घ्यायलासुद्धा तयार असलं पाहिजे. ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला कमीतकमी दोन फायदे होतील. पहिला, यहोवाबद्दल शिकल्यामुळे आपलं त्याच्यावरचं प्रेम आणि आदर आणखी वाढेल. आणि दुसरा, आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल इतरांना सांगायचं आपल्याला आणखी प्रोत्साहन मिळेल. (रोम. ११:३३; प्रकटी. ४:११) पेत्रच्या उदाहरणातून आपल्याला आणखी एक धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे बायबलच्या वचनाबद्दल असलेल्या आपल्या समजूतींत सुधारणा करण्यात येते, तेव्हा आपण त्या लवकरात लवकर स्वीकारायला आणि त्याप्रमाणे वागायला तयार असलं पाहिजे. असं केल्यामुळेच यहोवा आपल्याला मार्गदर्शन देत राहील आणि आपणसुद्धा त्याची विश्‍वासूपणे सेवा करत राहू.

पौलसारखं वागा—नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला

१०. कलस्सैकर ३:८-१० प्रमाणे यहोवाला खूश करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१० आपल्याला जर खऱ्‍या अर्थाने आनंदी व्हायचं असेल आणि यहोवाकडून मार्गदर्शन मिळवायचं असेल, तर आपल्याला यहोवाला आवडेल असं व्यक्‍तिमत्त्व घालणं गरजेचंय. आपण हे कसं करू शकतो हे आपल्याला यहोवाच सांगतो. (कलस्सैकर ३:८-१० वाचा.) पण असं व्यक्‍तिमत्त्व घालायला बराच वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते. पौलचंच उदाहरण घ्या. तो लहान असल्यापासूनच देवाला खूश करण्यासाठी मेहनत घ्यायचा. (गलती. १:१४; फिलिप्पै. ३:४, ५) पण देवाची उपासना करायची योग्य पद्धत त्याला माहीत नव्हती. आणि येशूबद्दलचं सत्यही त्याला माहीत नव्हतं. तो घमेंडी होता. म्हणून देव खूश होईल असं तो वागत नव्हता. पौल स्वतःबद्दल असं म्हणतो की तो, “एक उद्धट माणूस” होता.—१ तीम. १:१३.

११. पौलला कोणते बदल करण्याची गरज होती? समजावून सांगा.

११ ख्रिस्ती बनण्याआधी पौल खूप रागीट होता. प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या एका अहवालात सांगितल्याप्रमाणे त्याला येशूच्या शिष्यांचा इतका राग आला होता, की तो त्यांना “धमकावत होता आणि त्यांची हत्या करायच्या ईर्ष्येने पेटला होता.” (प्रे. कार्यं ९:१) पण यात काहीच शंका नाही, की पौलला ख्रिस्ती बनल्यानंतर त्याचं जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकायला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल. (इफिस. ४:२२, ३१) तरीसुद्धा बायबल म्हणतं की एकदा पौल आणि बर्नबा यांच्यात एक वाद झाला, तेव्हा तो इतका वाढला की त्यांच्यात “कडाक्याचं भांडण झालं.” (प्रे. कार्यं १५:३७-३९) त्या वेळी पौल, यहोवा खूश होईल असं वागला नाही. पण तरी तो यहोवाला आवडेल असे गुण स्वतःमध्ये वाढवायला मेहनत घेत राहिला. कारण त्याला यहोवाला खूश करायचं होतं.—१ करिंथ. ९:२७.

१२. नवीन व्यक्‍तिमत्त्व घालायला पौलला कशामुळे मदत झाली?

१२ पौल नम्र असल्यामुळे त्याने स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वात बदल केले. यासाठी तो स्वतःवर अवलंबून राहिला नाही. (फिलिप्पै. ४:१३) पेत्रप्रमाणेच तोसुद्धा ‘देव पुरवत असलेल्या सामर्थ्यावर’ अवलंबून राहिला. (१ पेत्र ४:११) असं असलं तरी काही वेळा पौलकडून चुका झाल्या आणि तो निराश झाला. पण अशा वेळी तो देवाने त्याच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्यांवर विचार करायचा. आणि यामुळे त्याला स्वतःमध्ये बदल करत राहायचं बळ मिळायचं.—रोम. ७:२१-२५.

१३. आपण पौलसारखं कसं वागू शकतो?

१३ आपण बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी पौलसारखंच आपल्यालाही आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करत राहणं खूप गरजेचंय. हे खरंय, की आपल्याकडून चुका होतील. जसं की, आपल्याला पटकन राग येईल किंवा एखाद्याचं मन दुखेल असं काहीतरी आपण बोलू किंवा करू. पण असं घडलं, तरी आपण यहोवाला कधीच खूश करू शकत नाही असा आपण विचार करू नये. उलट, आपण स्वतःत बदल करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. (रोम. १२:१, २; इफिस. ४:२४) असं करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, यहोवा आपल्यासाठी त्याचे स्तर बदलेल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. उलट त्याने दिलेलं व्यक्‍तिमत्त्व आपल्याला घालता यावं म्हणून आपणच स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.

दावीदसारखं वागा—यहोवाला तुमचं संरक्षण करू द्या

१४-१५. यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपलं संरक्षण करतो? (स्तोत्र २७:५) (चित्रसुद्धा पाहा.)

१४ खऱ्‍या अर्थाने आनंदी राहण्यासाठी आपल्याला यहोवाच्या संरक्षणाचीसुद्धा गरज आहे. मग यहोवा आपलं संरक्षण कसं करतो? आणि त्याने आपलं संरक्षण करावं म्हणून आपण काय करू शकतो?

१५ यहोवा आपलं कठीण काळातसुद्धा संरक्षण करू शकतो याची दावीद राजाला पूर्ण खातरी होती. (स्तोत्र २७:५ वाचा.) आपल्या बाबतीत काय? आज यहोवा आपलं संरक्षण कसं करतो? आपला त्याच्यावरचा विश्‍वास कमजोर होईल अशा प्रत्येक धोक्यापासून तो आपलं संरक्षण करतो. त्याने असं वचन दिलंय, की आपल्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही हत्यार आपल्यावर चालणार नाही. (स्तो. ३४:७; यश. ५४:१७) सैतान आणि त्याला साथ देणारे कितीही शक्‍तीशाली असले, तरी ते आपलं कायमचं नुकसान करू शकत नाहीत. त्यांनी आपला जीव घेतला, तरी यहोवा आपलं पुनरुत्थान करू शकतो. (१ करिंथ. १५:५५-५७; प्रकटी. २१:३, ४) आपण काही वेळा चिंतेत इतके बुडून जाऊ शकतो, की आपल्याला यहोवाची सेवा करावीशी वाटणार नाही. पण अशा वेळीसुद्धा यहोवा आपल्याला मदत करतो. (नीति. १२:२५; मत्त. ६:२७-२९) यहोवाने आपल्याला बरेच भाऊबहीण दिले आहेत. ते कठीण काळात आपल्याला प्रोत्साहन देतात आणि मदत करतात. आपल्याला शिकवण्यासाठी आणि आपलं यहोवासोबतचं नातं चांगलं ठेवण्यासाठी यहोवाने आपल्याला मंडळीत वडीलसुद्धा दिले आहेत. (यश. ३२:१, २) तसंच, यहोवा आणखी कोणत्या मार्गांनी आपलं संरक्षण आणि आपली मदत करतो हे आपल्याला सभांमधून शिकायला मिळतं.—इब्री १०:२४, २५.

एक बहीण “टेहळणी बुरूज” अभ्यास सुरू असताना उत्तर देण्यासाठी हात वर करत आहे. इतर भाऊबहीणसुद्धा त्यांचं हात वर करत आहेत.

एक बहीण भाऊबहिणींसोबत सभेला उपस्थित राहून यहोवाकडून मार्गदर्शन घेत आहे (परिच्छेद १४-१५ पाहा)


१६. यहोवाने दावीदचं संरक्षण कसं केलं?

१६ दावीदने यहोवाच्या आज्ञा पाळल्या, तेव्हा यहोवाने त्याला योग्य निर्णय घ्यायला मदत केली. अशा प्रकारे यहोवाने त्याचं संरक्षण केलं. (नीतिवचनं ५:१, २ सोबत तुलना करा.) पण दावीदने जेव्हा यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा चुकीच्या निर्णयांमुळे होणाऱ्‍या परिणामांपासून यहोवाने त्याला वाचवलं नाही. (२ शमु. १२:९, १०) पण काही वेळा दावीदला त्याची चूक नसतानाही दुःखं सहन करावी लागली. अशा वेळी त्याने मनमोकळेपणे यहोवाला प्रार्थना केली. आणि यहोवाने त्याला या गोष्टीची खातरी करून दिली, की त्याचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याला त्याची काळजी आहे. यामुळे दावीदच्या चिंता कमी झाल्या.—स्तो. २३:१-६.

१७. आपण दावीदसारखं कसं वागू शकतो?

१७ आपणसुद्धा निर्णय घेण्याआधी दावीदसारखं यहोवाकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तसंच, आपण जर यहोवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून चुकीचे निर्णय घेतले, तर त्यामुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांपासून तो आपलं संरक्षण करणार नाही हेसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (गलती. ६:७, ८) शिवाय आपली चूक नसतानाही आपल्याला दुःख सहन करावं लागलं, तर आपण यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना करू शकतो. आणि तो आपल्या मनाचं आणि विचारांचं संरक्षण करेल ही खातरी बाळगू शकतो.—फिलिप्पै. ४:६, ७.

मार्गदर्शनासाठी नेहमी यहोवावर अवलंबून राहा

१८. देवाकडून मार्गदर्शन मिळवण्याबद्दल लोक काय विचार करतात? पण आपण काय केलं पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)

१८ “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत” हे आपलं २०२६ सालचं वार्षिक वचन आहे. खरंच, मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहणं आज कधी नव्हे इतकं महत्त्वाचंय. कारण, आज लोकांना देवाचं मार्गदर्शन नको आहे आणि ते त्यांना हवी तशी देवाची उपासना करतात. तसंच इतर काही जण देवाच्या नाही, तर माणसांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतात. यामुळे ते खूश नाहीत. अशा लोकांचा आपण स्वतःवर प्रभाव होऊ देऊ नये. तर मग भाऊबहिणींनो, आपण यहोवाच्या वचनाचा अभ्यास करत राहू या, त्याला आवडतील असे गुण वाढवत राहू या आणि त्याच्या आज्ञा पाळून त्याचं संरक्षण मिळवत राहू या.

कोलाज: आधीच्या चित्रात दाखवलेली बहीण यहोवाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहते. १. ती “टेहळणी बुरूज” अभ्यास करत आहे. २. ती एका जोडप्याच्या घरी जेवण घेऊन जाते. भावाच्या डोक्याला पट्टी बांधलेली आहे आणि त्याला सलाईन लावली आहे. ३. दोन भाऊ तिची मेंढपाळ भेट घेत आहेत.

आपण मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहिलं पाहिजे, त्याला आवडतील असे गुण वाढवले पाहिजेत आणि त्याच्याकडून संरक्षण मिळवत राहिलं पाहिजे (परिच्छेद १८ पाहा)a

तुमचं उत्तर काय असेल?

  • पेत्रप्रमाणे आपण देवाचं मार्गदर्शन कसं मिळवू शकतो?

  • पौलप्रमाणे आपण देवाचं मार्गदर्शन कसं मिळवू शकतो?

  • दावीदप्रमाणे आपण देवाचं मार्गदर्शन कसं मिळवू शकतो?

गीत १६२ आस ज्ञानाची तुझ्या

a चित्राचं वर्णन: आधीच्या चित्रातली बहीण टेहळणी बुरूजचा अभ्यास करून यहोवाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहते, यहोवाला खूश करण्यासाठी ती इतरांशी दयेने वागते आणि मंडळीतले वडील तिला प्रोत्साहन देतात तेव्हा ते मनापासून स्वीकारते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा