९-१५ मार्च, २०२६
गीत ४५ माझ्या मनातले विचार
निराशेवर मात करणं शक्य आहे!
“माझी किती दयनीय अवस्था आहे!”—रोम. ७:२४.
या लेखात:
आपल्या मनात निराश करणाऱ्या भावना येतात तेव्हा आपण त्यांवर कशी मात करू शकतो ते पाहू या.
१-२. कधीकधी पौलला कसं वाटायचं? आणि आपल्यालाही त्याच्यासारखं कसं वाटू शकतं? (रोमकर ७:२१-२४)
तुम्ही प्रेषित पौलचा विचार करता तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? त्याने बऱ्याच ठिकाणी प्रचार केला, बायबलची बरीच पुस्तकं लिहिली आणि तो एक चांगला शिक्षक होता असंच काहीसं तुम्हाला आठवत असेल. आपल्याला त्याच्याबद्दल अशाच गोष्टी आठवतात, कारण तो खरंच खूप धाडसी होता आणि यहोवाचा एक विश्वासू सेवक होता. पण तुम्हाला माहीत आहे का, की पौलसुद्धा कधीकधी निराश व्हायचा आणि त्यालाही आपल्यासारख्याच चिंतांचा सामना करावा लागायचा?
२ रोमकर ७:२१-२४ वाचा. रोमच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौलने ज्या भावना व्यक्त केल्या तशाच भावना आज आपल्या मनातही येऊ शकतात. तो देवाला विश्वासू असला तरी काही गोष्टींशी त्याला झगडावं लागलं; देवाची इच्छा पूर्ण करायची की स्वत:च्या चुकीच्या इच्छा या गोष्टीशी त्याला झगडावं लागलं. शिवाय, पूर्वी केलेल्या चुका आठवूनसुद्धा तो निराश व्हायचा. इतकंच काय, तर बऱ्याच काळापासून त्याची एक समस्या सुटत नव्हती.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत? (“शब्दाचा अर्थ” पाहा.)
३ पौलला काही गोष्टींशी झगडावं लागलं असलं, तरी तो निराश करणाऱ्या गोष्टींवरचa विचार करत बसला नाही. त्यामुळे आपण पौलकडून खूप शिकू शकतो. आपण पाहू की पौल कधीकधी निराश का झाला? निराशेचा सामना करायला त्याला कशामुळे मदत झाली? आणि आपण निराश होतो तेव्हा आपण काय करू शकतो?
पौल काही वेळा निराश का झाला?
४. कोणत्या गोष्टींमुळे पौल निराश झाला असावा?
४ आधी केलेल्या चुकांमुळे. ख्रिस्ती बनण्याआधी पौलने अशा काही गोष्टी केल्या ज्याचा त्याला नंतर पस्तावा झाला. जसं की, स्तेफनला दगडमार करून ठार मारण्यात आलं तेव्हा तो तिथेच होता. आणि जे काही झालं ते योग्यच होतं असं त्याला वाटलं. (प्रे. कार्यं ७:५८; ८:१) तसंच, पौलने ख्रिश्चनांचा क्रूरपणे छळ करण्यात पुढाकारसुद्धा घेतला.—प्रे. कार्यं ८:३; २६:९-११.
५. पौलने आधी केलेल्या चुकांमुळे त्याला कसं वाटलं?
५ ख्रिस्ती बनल्यानंतरही आधी केलेल्या चुकांमुळे पौलचा विवेक त्याला खूप बोचायचा. आणि वर्षं जशी सरत गेली तसतसं त्याला हे आणखी जास्त वाटू लागलं. उदाहरणार्थ, इ.स. ५५ मध्ये करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पहिल्या पत्रात तो असं म्हणाला: “प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.”(१ करिंथ. १५:९) मग पाच वर्षांनी इफिसच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात तो स्वत:बद्दल म्हणाला: ‘मी पवित्र जनांपैकी सगळ्यात लहानापेक्षा लहान आहे.’ (इफिस. ३:८) तसंच, तीमथ्यला लिहिताना त्याने असं म्हटलं: “मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट माणूस होतो.” (१ तीम. १:१३) विचार करा पौल जेव्हा मंडळ्यांना भेट देत असेल, तेव्हा त्याने आधी छळ केलेल्या लोकांना किंवा त्यांच्या घरच्यांना पाहून त्याला कसं वाटलं असेल?
६. पौलला आणखी कोणत्या गोष्टीची चिंता होती? (तळटीपसुद्धा पाहा.)
६ शरीरात काटा रुतवण्यात आल्यामुळे. पौलच्या जीवनात एक समस्या होती. त्यामुळे काटा रुतल्यावर जसा त्रास होतो, तसा त्रास त्याला होत होता. (२ करिंथ. १२:७) पौलने त्याच्या समस्येचं कारण स्पष्ट केलं नाही. पण त्याच्या शब्दांवरून दिसून येतं की तो कदाचित एखाद्या शारीरिक, भावनिक किंवा दुसऱ्या एखाद्या समस्येतून जात होता.b
७. पौलला योग्य ते करणं कठीण का जायचं? (रोमकर ७:१८, १९)
७ अपरिपूर्णतेमुळे. पौलला त्याच्या अपरिपूर्णतेशीसुद्धा लढावं लागलं. (रोमकर ७:१८, १९ वाचा.) त्याला योग्य ते करायची इच्छा असली तरी त्याच्याकडून बऱ्याचदा चुका व्हायच्या. त्याने मान्य केलं, की त्याला त्याच्या चुकीच्या इच्छांशी सतत झगडावं लागयचं. (१ करिंथ. ९:२७) पण तरी त्याच्या हातून चुका व्हायच्या. इतका प्रयत्न करूनसुद्धा त्याच्या हातून तिच चूक घडत असेल, तेव्हा तो किती निराश होत असेल याचा विचार करा!
पौलने निराशेचा सामना कसा केला?
८. चुकीच्या इच्छांविरूद्ध लढायला पौलने काय केलं?
८ देवाची पवित्र शक्ती चुकीच्या इच्छांविरूद्ध लढायला कशी मदत करू शकते यावर पौलने विचार केला. असं आपण का म्हणू शकतो? त्याने लिहिलेल्या पत्रांमधून आपल्याला हे स्पष्ट होतं. (रोम. ८:१३; गलती. ५:१६, १७) तसंच, ख्रिश्चनांनी कोणत्या चुकीच्या इच्छांविरूद्ध लढलं पाहिजे हेसुद्धा त्याने त्याच्या पत्रांत लिहिलं. (गलती. ५:१९-२१, २६) यात काही शंका नाही, की पौलने त्याच्या पत्रात इतरांना जो सल्ला दिला तो त्याने स्वतःही लागू केला असेल. पौलने त्याच्या चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी त्याच्या कमतरता ओळखल्या, त्याबद्दल वचनांतून सल्ला घेतला आणि काही व्यावहारिक पावलंसुद्धा उचलली.
९-१०. पौलला निराश करणाऱ्या विचारांशी कसं लढता आलं? (इफिसकर १:७) (चित्रसुद्धा पाहा.)
९ पौल काही वेळा निराश झाला असला तरी त्याने त्याचा आनंद टिकवून ठेवला. मंडळ्यांमध्ये भाऊबहीण कशी प्रगती करत आहेत हे ऐकून त्याला आनंद व्हायचा. (२ करिंथ. ७:६, ७) भाऊबहिणींसोबत वेळ घालवून तो खूश व्हायचा. (२ तीम. १:४) तसंच, त्याला माहीत होतं की यहोवा त्याच्यावर खूश आहे. त्यामुळे त्याला “शुद्ध विवेकाने” त्याची सेवा करता आली. (२ तीम. १:३) शिवाय, पौल जेव्हा रोममध्ये तुरुंगात होता तेव्हा त्याने ख्रिश्चनांना “प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा” असा सल्ला दिला. (फिलिप्पै. ४:४) त्याच्या शब्दांवरून कळतं की तो निराशेत बुडून गेला नव्हता. जेव्हा त्याच्या मनात निराश करणारे विचार यायचे, तेव्हा तो लगेच त्याचं मन त्याला आनंदी करणाऱ्या गोष्टींकडे वळवायचा.
१० पौलला आणखी एका गोष्टीमुळे निराश करणाऱ्या विचारांशी लढता आलं. ती म्हणजे, खंडणी खास त्याला मिळालेली भेट आहे असा त्याने विचार केला. (गलती. २:२०; इफिसकर १:७ वाचा.) याचा परिणाम म्हणजे, येशूद्वारे यहोवाने त्याला माफ केलंय याची त्याला खातरी पटली. (रोम. ७:२४, २५) पूर्वी त्याच्या हातून चुका घडल्या असल्या किंवा त्याला त्याच्या अपरिपूर्णतेशी लढावं लागलं असलं, तरी त्याला आनंदाने ‘देवाची पवित्र सेवा करता आली.’—इब्री ९:१२-१४.
आधी केलेल्या चुकांमुळे पौल निराश झाला तेव्हा त्याने खंडणीच्या भेटीवर मनन केलं (परिच्छेद ९-१० पाहा)
११. पौलच्या उदाहरणातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळू शकतं?
११ आपल्यालाही कधीकधी पौलसारखं काही गोष्टींशी सतत झगडावं लागतं. कारण काही वेळा आपण यहोवाला आवडणार नाही अशा प्रकारे विचार करतो किंवा वागतो-बोलतो. त्यामुळे आपली “किती दयनीय अवस्था आहे” असं आपल्याला वाटू शकतं. एका तरुण बहिणीचा विचार करा. तिचं नाव एलिसाc आहे. तिलासुद्धा तिच्या कमतरतांशी लढावं लागलं. त्याबद्दल ती म्हणते: “पौलबद्दल विचार करून मला खूप प्रोत्साहन मिळालं. निराश करणाऱ्या विचारांशी लढणारी मी एकटीच नाही हे जाणून मला खूप हायसं वाटलं. यावरून आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय हे यहोवाला माहीत आहे याची मला आठवण झाली.” तर मग निराश करणाऱ्या विचारांशी झगडावं लागत असूनसुद्धा आपण पौलसारखं आनंदाने आणि शुद्ध विवेकाने यहोवाची सेवा कशी करू शकतो?
आपण निराशेचा सामना कसा करू शकतो?
१२. निराशेवर मात करण्यासाठी आध्यात्मिक गोष्टी करत राहिल्याने कशी मदत होते?
१२ नियमितपणे आध्यात्मिक गोष्टी करत राहा. जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असतो, तेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टींवर लक्ष लावायला मदत होते. आपल्याला माहीत आहे, की पौष्टिक अन्न खालल्यामुळे, नियमितपणे व्यायाम केल्यामुळे आणि पुरेशी झोप घेल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. तसंच, रोज बायबल वाचल्यामुळे, प्रचार केल्यामुळे, सभेची तयारी केल्यामुळे आणि सभेला उपस्थित राहून उत्तरं दिल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. जर आपण या गोष्टी नियमितपणे करत राहिलो, तर निराश करणाऱ्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी आपल्याला चांगल्या गोष्टींवर मन लावायला मदत होईल आणि आपण आनंदी राहू.—रोम. १२:११, १२.
१३-१४. आध्यात्मिक गोष्टी करत राहिल्यामुळे काही भाऊबहिणींना कशी मदत झाली आहे?
१३ जॉन नावाच्या भावाचा विचार करा. ३९ वर्षांचा असताना त्याला कॅन्सर झाला. त्या वेळी त्याचा मुलगा फक्त ३ वर्षांचा होता. सुरुवातीला त्याला निराश करणाऱ्या भावनांशी लढणं खूप कठीण गेलं. तो विचार करायचा, ‘मी इतक्या कमी वयात आजारी कसा पडू शकतो?’ मग या भावनांशी लढायला जॉनला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो: “माझ्या आजारपणामुळे मी खूप गळून जायचो. तरीसुद्धा मी न चुकता माझ्या कुटुंबासोबत आध्यात्मिक गोष्टी करायचो. आम्ही एकही सभा कधी चुकवली नाही, दर आठवडी प्रचाराला जायचो आणि कौटुंबीक उपासनाही करायचो. हे सगळं करणं सोपं नव्हतं. पण तरी आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही.” ते दिवस आठवून जॉन म्हणतो: “समस्या अचानक येतात तेव्हा सुरुवातीला आपल्याला धक्का बसतो. पण लवकरच आपल्याला जाणवतं, की यहोवा आपल्याला ताकद देतोय आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. यहोवाने जशी मला मदत केली तशीच तो तुम्हालाही करू शकतो.”
१४ आधी उल्लेख केलेली एलिसा म्हणते: “नियमितपणे सभेला गेल्यामुळे आणि वैयक्तिक अभ्यास केल्यामुळे, यहोवा माझ्या प्रार्थना ऐकतो आणि माझ्यावर प्रेम करतो याची मला आठवण होते. यामुळे मी खूप खूश होते.” भाऊ नोलन आणि त्यांची पत्नी डिॲन अफ्रिकेत विभागीय कार्य करत आहेत. भाऊ नोलन म्हणतात: “आम्ही निराश झालो तरी आध्यात्मिक गोष्टी करायचं सोडत नाही. यामुळे यहोवा आम्हाला आनंदी राहायला मदत करतो. आम्ही नेहमी हे आठवणीत ठेवायचा प्रयत्न करतो, की यहोवा आम्हाला मदत करेल आणि आम्हाला आशीर्वाद देईल. तो आम्हाला कशी मदत करेल हे आम्हाला माहीत नाही, पण तो आम्हाला नक्की मदत करेल याची आम्हाला खातरी आहे.”
१५. निराश करणाऱ्या विचारांवर मात करायला आणखी काय करता येईल? उदाहरण द्या.
१५ निराश करणाऱ्या भावानांशी लढायाला आपल्याला आणखी काही गोष्टी करणं गरजेचंय. कल्पना करा, तुमची पाठ नेहमी दुखते. हे खरंय, की रोज थोडं चालल्यामुळे तुम्हाला जरा बरं वाटतं. पण तुमची पाठ सारखीसारखी का दुखते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडं संशोधन करावं लागेल आणि डॉक्टरकडेसुद्धा जावं लागेल. त्याच प्रकारे, निराश करणारे विचार जर तुम्हाला सारखेसारखे येत असतील, तर तुम्हाला याबद्दल बायबलमध्ये आणि आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करावं लागेल आणि प्रौढ भाऊबहिणींचीसुद्धा मदत घ्यावी लागेल. पण आणखी कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत होऊ शकते?
१६. तुमच्या मनात निराश करणारे विचार का येतात हे तुम्ही कसं ओळखू शकता? (स्तोत्र १३९:१-४, २३, २४)
१६ तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे समजायला प्रार्थना करा. दावीदला माहीत होतं, की यहोवा त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. म्हणून त्याला चिंता का सतावत आहेत हे जाणून घ्यायला त्याने यहोवाकडे मदत मागितली. (स्तोत्र १३९:१-४, २३, २४ वाचा.) तुमच्या चिंतांचं मूळ कारण काय आहे आणि तुम्ही त्यांवर मात कशी करू शकता हे समजायला तुम्हीही यहोवाकडे मदत मागू शकता. तसंच तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मला नेमकं कशामुळे चिंता सतावते? कोणत्या गोष्टींमुळे मी नकारात्मक विचार करू लागतो? माझ्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मी ते लगेच काढून टाकतो की त्यांवरच विचार करत बसतो?’
१७. कोणत्या विषयांवर वैयक्तिक अभ्यास केल्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टींवर मन लावता येईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ तुमच्या परिस्थितीला लागू होतील अशा विषयांवर वैयक्तिक अभ्यास करा. निराश असताना यहोवाच्या गुणांबद्दल अभ्यास केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रेषित पौलनेसुद्धा खंडणीबद्दल आणि यहोवाच्या क्षमेबद्दल अभ्यास केला. त्यामुळे त्याला खूप फायदा झाला. तुम्हीही असंच करू शकता. यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक आणि jw.org या आपल्या वेबसाईटवर यहोवाची दया, क्षमा आणि एकनिष्ठ प्रेम यांसारख्या वेगवेगळ्या गुणांबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता. वेगवेगळ्या लेखांचा अभ्यास करताना त्यात दिलेली वचनं वाचा आणि त्यांतून मिळणारे धडे लागू करा. तुम्हाला मदत करतील असे काही लेख सापडल्यावर त्यांची एक यादी बनवा. ती दिसेल अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे जेव्हाही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील किंवा तुम्हाला निराश वाटेल तेव्हा तुम्हाला ते वाचता येतील. तसंच, वाचलेली माहिती लागू करायचासुद्धा प्रयत्न करा.—फिलिप्पै. ४:८.
निराश करणाऱ्या भावनांवर मात करता येईल अशा विषयांवर वैयक्तिक अभ्यास करा (परिच्छेद १७ पाहा)
१८. काही भाऊबहिणींना कोणत्या विषयांवर अभ्यास केल्यामुळे मदत झाली आहे?
१८ आधी उल्लेख केलेल्या एलिसाने वैयक्तिक अभ्यासात ईयोबवर संशोधन केलं. ती म्हणते: “माझी परिस्थितीसुद्धा ईयोबसारखीच आहे. त्याच्यावर एकापाठोपाठ एक बऱ्याच समस्या आल्या. त्याच्या समस्यांमागे नेमकं कोण आहे हे त्याला माहीत नव्हतं. पण तो जेव्हा खूप जास्त निराश झाला, तेव्हाही त्याने मदतीसाठी यहोवावर आशा ठेवली.” (ईयो. ४२:१-६) तसंच आधी उल्लेख केलेली डिॲन म्हणते: “आम्ही दोघं यहोवा के करीब आओ या पुस्तकातून अभ्यास करतोय. आम्ही यहोवाचे खूप आभारी आहोत. जसा कुंभार मातीला घडवतो तसाच तो आम्हाला घडवतोय. जेव्हा आम्ही आमच्या चुकांमुळे निराश होतो तेव्हा आम्ही यावर विचार करतो, की यहोवा आम्हाला आणखी चांगली व्यक्ती बनायला मदत करतोय. यामुळे आम्हाला त्याच्या आणखी जवळ जायला मदत होते.”—यश. ६४:८.
यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल आणि आशीर्वाद देईल
१९. काही वेळा आपल्याला कसं वाटू शकतं? पण आपण कशाची खातरी ठेवू शकतो?
१९ या लेखात दिलेल्या सगळ्या गोष्टी लागू केल्यानंतरसुद्धा आपल्याला काही वेळा निराश करणारे विचार सतावू शकतात. पण यहोवाच्या मदतीने आपण त्यांवर मात करू शकतो. सगळेच दिवस सारखे नसले, तरी यहोवासोबत चांगली मैत्री असल्यामुळे आणि तो आपल्यावर खूश आहे या जाणिवेमुळे आपण आनंदाने जीवन जगू शकतो आणि त्याची सेवा करू शकतो.
२०. तुम्ही काय करायचा निश्चय केलाय?
२० तर मग भाऊबहिणींनो आपण पूर्वी केलेल्या चुकांमुळे, जीवनातल्या समस्यांमुळे किंवा आपल्या अपरिपूर्णतेमुळे येणाऱ्या नकारात्मक विचारांशी लढायचा निश्चय करू या. आणि याची खातरी बाळगू या, की यहोवाच्या मदतीने आपण निराश करणाऱ्या विचारांवर विजय मिळवू शकतो. (स्तो. १४३:१०) लवकरच अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला निराश करणाऱ्या भावना कधीच सतावणार नाहीत. आणि आपण रोज कोणत्याही चिंतांशिवाय आपल्या प्रेमळ देवाची, यहोवाची सेवा करू शकू!
गीत ३४ खरेपणाने चालू या
a शब्दाचा अर्थ: ज्या लोकांना काही वेळा “निराश करणाऱ्या भावनांशी” झगडावं लागतं त्यांच्याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. जे लोक बऱ्याच काळापासून निराशेचा सामना करत आहे आणि ज्यांना डॉक्टरांच्या मदतीची गरज आहे त्यांच्याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आलेली नाही.
b पौलच्या पत्रांवरून समजतं की त्याची दृष्टी कमजोर होती. त्यामुळे त्याला पत्र लिहायला आणि त्याची सेवा पूर्ण करायला कठीण जात असेल. (गलती. ४:१५; ६:११) किंवा काही लोकांनी त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे तो चिंतेत असावा. (२ करिंथ. १०:१०; ११:५, १३) कारण काहीही असलं तरी पौलला कोणत्यातरी गोष्टीची चिंता सतावत होती हे नक्की.
c काही नावं बदलण्यात आली आहेत.