अभ्यास लेख १०
गीत ३१ देवासोबत चालत राहा!
यहोवा आणि येशूसारखा विचार करायला शिका!
“ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसलं, त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती ठेवायला तयार असा.”—१ पेत्र ४:१.
या लेखात:
येशूच्या विचार करण्याच्या पद्धतीतून प्रेषित पेत्र काय शिकला आणि आपण काय शिकू शकतो ते पाहा.
१-२. (क) यहोवावर प्रेम करण्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत? (ख) येशूने कसं दाखवून दिलं की तो पूर्ण बुद्धीने यहोवावर प्रेम करतोय?
“तू आपला देव, यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.” (लूक १०:२७) असं बोलून येशूने स्पष्ट केलं की ही आज्ञा नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा आहे. लक्ष द्या की आपण पूर्ण मनाने यहोवावर प्रेम केलं पाहिजे. त्यात आपल्या इच्छा आणि आपल्या भावना सामील आहेत. तसंच, आपण पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम केलं पाहिजे. पण आपण पूर्ण बुद्धीनेही यहोवावर प्रेम केलं पाहिजे. यात एखाद्या गोष्टीबद्दल आपण कसा विचार करतो हे सामील आहे. हे खरंय, की यहोवा कसा विचार करतो हे आपण कधीच पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. पण “ख्रिस्ताचं मन” समजून घेतल्यामुळे यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला बऱ्यापैकी समजून घेता येईल. कारण येशू अगदी हुबेहूब त्याच्यासारखा विचार करतो.—१ करिंथ. २:१६.
२ येशूने पूर्ण बुद्धीने यहोवावर प्रेम केलं. देवाची त्याच्यासाठी काय इच्छा आहे हे त्याला माहीत होतं. त्याप्रमाणे वागायचा त्याने निश्चय केला होता. योग्य ते करण्यासाठी त्याला दुःख सोसावं लागलं तरी तो तसं करायला तयार होता. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा त्याचा निर्धार होता. त्यामुळे त्याने कुठल्याच गोष्टीला त्याच्या या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही.
३. प्रेषित पेत्र येशूकडून काय शिकला आणि त्याने इतर ख्रिश्चनांना काय करायचं प्रोत्साहन दिलं? (१ पेत्र ४:१)
३ पेत्र आणि इतर प्रेषितांकडे येशूसोबत वेळ घालवण्याची एक चांगली संधी होती. त्यामुळे येशू नेमका कसा विचार करतो हे त्यांना शिकायला मिळालं. पेत्रने देवाच्या प्रेरणेने जेव्हा त्याचं पहिलं पत्र लिहिलं, तेव्हा त्याने ख्रिश्चनांना ख्रिस्तासारखी मनोवृत्ती ठेवायचं प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ४:१ वाचा.) मूळ भाषेत पेत्रने “तयार असा” हे जे शब्द वापरलेत ते अशा सैनिकांना लागू होतात, जे युद्धाच्या तयारीसाठी शस्त्रं धारण करतात. त्यामुळे जेव्हा एक ख्रिस्ती येशूसारखी मनोवृत्ती ठेवतो किंवा त्याच्यासारखा विचार करतो, तेव्हा तो पापी प्रवृत्तींविरुद्ध आणि सैतानाच्या या दुष्ट जगाविरुद्ध लढायला एक शक्तिशाली शस्त्र धारण करत असतो.—२ करिंथ. १०:३-५; इफिस. ६:१२.
४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
४ या लेखात येशू कसा विचार करतो आणि आपण त्याच्यासारखं कसं वागू शकतो हे आपण पाहणार आहोत. तसंच, (१) आपल्या विचारांमध्ये एकता असावी म्हणून आपण यहोवासारखा विचार कसा करू शकतो? (२) नम्रता कशी दाखवू शकतो? आणि (३) प्रार्थनेत यहोवावर विसंबून राहून समंजसपणा कसा दाखवू शकतो? या गोष्टीही आपण पाहणार आहोत.
यहोवासारखा विचार करा
५. एकदा पेत्र यहोवासारखा विचार करायला कसा चुकला?
५ एकदा पेत्र यहोवासारखा विचार करायला चुकला. येशूने त्याच्या प्रेषितांना सांगितलं होतं की त्याला यरुशलेमला जावं लागेल, तिथे त्याला धार्मिक पुढाऱ्यांच्या हाती दिलं जाईल, त्याला छळ सोसावा लागेल आणि त्याला ठार मारलं जाईल. (मत्त. १६:२१) पेत्रला माहीत होतं की येशू देवाच्या लोकांना वाचवणार होता. कारण येशू वचन दिलेला मसीहा होता. असं असूनही यहोवा येशूला असंच मरू देईल, ही गोष्ट पेत्रला मान्य करायला खूप कठीण जात होती. (मत्त. १६:१६) त्यामुळे पेत्र येशूला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला: “हे काय बोलतोस प्रभू? तुला नक्कीच असं काही होणार नाही.” (मत्त. १६:२२) येशू आणि पेत्रचं एक मत होत नव्हतं. कारण पेत्र यहोवासारखा विचार करत नव्हता.
६. आपण यहोवासारखा विचार करतोय हे येशूने कसं दाखवून दिलं?
६ येशू अगदी त्याच्या स्वर्गातल्या पित्यासारखा विचार करत होता. म्हणूनच तो पेत्रला म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू माझ्यासाठी अडखळण आहेस. कारण तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.” (मत्त. १६:२३) पेत्रचे हेतू जरी चांगले असले तरी येशूने त्याचा सल्ला नाकारला. कारण येशूने स्वतःवर दया करावी अशी यहोवाची मुळीच इच्छा नव्हती. त्या वेळी पेत्र एक महत्त्वाचा धडा शिकला. तो म्हणजे, आपण देवासारखा विचार केला पाहिजे. आपणही हाच धडा शिकू शकतो.
७. आपल्याला यहोवासारखा विचार करायचाय, हे पेत्रने नंतर कसं दाखवून दिलं? (चित्र पाहा.)
७ नंतर पेत्रने दाखवून दिलं की त्याला यहोवासारखा विचार करायचा आहे. त्या वेळी, सुंता न झालेल्या विदेशी लोकांना देवाच्या लोकांचा भाग बनायची वेळ आली होती. यासाठी, पेत्रला विदेशी असलेल्या कर्नेल्यला प्रचार करण्यासाठी नेमण्यात आलं. विदेशी लोकांपैकी जे ख्रिस्ती बनले त्यांच्यात कर्नेल्य पहिला होता. यहुदी लोक सहसा विदेशी लोकांसोबत जास्त संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे विदेशी लोकांना प्रचार करण्यासाठी पेत्रला त्याचा दृष्टिकोन बदलायची गरज होती. या बाबतीत यहोवाची काय इच्छा आहे हे जेव्हा पेत्रला कळलं तेव्हा त्याने स्वतःचा दृष्टिकोन बदलला. यामुळे जेव्हा त्याला विदेश्यांकडे पाठवण्यात आलं तेव्हा तो “कोणतीच हरकत न घेता” त्यांच्याकडे गेला. (प्रे. कार्यं १०:२८, २९) त्याने कर्नेल्यला आणि त्याच्या घराण्याला प्रचार केला. मग त्यांनी बाप्तिस्मा घेतला.—प्रे. कार्यं १०:२१-२३, ३४, ३५,४४-४८.
पेत्र कर्नेल्यच्या घरात जातोय (परिच्छेद ७ पाहा)
८. आपण यहोवासारखा विचार करतोय हे आपण कसं दाखवू शकतो? (१ पेत्र ३:८)
८ याच्या बऱ्याच वर्षांनंतर, पेत्रने ख्रिश्चनांना त्यांच्या “विचारांत एकता असावी” असं प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ३:८ वाचा.) आपण जर यहोवासारखा विचार केला तर आपल्यात आणि आपल्या भाऊबहिणींच्या विचारांमध्ये एकता असेल. आणि यहोवा कसा विचार करतो हे आपण बायबलमधून शिकू शकतो. उदाहरणार्थ, येशूने त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्याला पहिली जागा देण्याबद्दल सांगितलं होतं. (मत्त. ६:३३) ही गोष्ट लक्षात ठेवून तुमच्या मंडळीतला एक प्रचारक कदाचित पूर्णवेळची सेवा करायचा विचार करेल. मग अशा वेळी तुम्ही त्याला काय सुचवाल? हे सुचवाल का, की ‘पूर्णवेळच्या सेवेत त्याग करत जीवन जगण्याऐवजी आरामदायी जीवन जगणं चांगलं आहे?’ मुळीच नाही. याउलट, त्याने घेतलेल्या निर्णयाला आपण पाठिंबा दिला पाहिजे.
नम्र राहायला शिका
९-१०. येशूने कसं दाखवून दिलं की तो खूप नम्र होता?
९ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने पेत्र आणि इतर प्रेषितांना नम्रतेबद्दल एक महत्त्वाचा धडा शिकवला. याआधी येशूने पेत्र आणि योहानला जेवणाची तयारी करायला पाठवलं होतं. हे येशूचं प्रेषितांसोबतचं शेवटचं जेवण असणार होतं. येशूने जेव्हा पेत्र आणि योहानला जेवणाची तयारी करायला पाठवलं होतं तेव्हा त्यांनी भांड्याची आणि कपड्याची सोय नक्कीच केली असेल. कारण जेवणाआधी पाहुण्यांचे पाय धुवायला या गोष्टी लागणार होत्या. पण हे हलकं काम कोण करणार होतं?
१० हे हलकं काम येशूने केलं. आणि त्यासाठी तो अजिबात लाजला नाही. त्याने दाखवून दिलं की तो खूप नम्र आहे. सहसा दास जे काम करतात ते काम येशूला करताना पाहून प्रेषितांना आश्चर्य वाटलं असेल. त्याने आपलं बाहेरचं वस्त्र काढलं, दुसरं वस्त्र आपल्या कंबरेला गुंडाळलं आणि एका भांड्यात पाणी घेऊन तो शिष्यांचे पाय धुऊ लागला. (योहा. १३:४, ५) सर्व १२ प्रेषितांचे पाय धुवायला येशूला वेळ लागला असेल. विचार करा, या १२ प्रेषितांमध्ये यहूदासुद्धा होता. तो नंतर त्याचा विश्वासघात करणार होता. पण तरी येशूने नम्र राहून हे काम केलं. मग नंतर त्याने शांतपणे प्रेषितांना म्हटलं: “मी आताच जे केलं त्याचा अर्थ तुम्हाला समजला का? तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते योग्य आहे, कारण मी तो आहेच. मग मी प्रभू आणि गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले, तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.”—योहा. १३:१२-१४.
नम्र असण्यात आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल काय विचार करतो हे सामील आहे
११. आपण नम्र राहायला शिकलोय हे पेत्रने कसं दाखवून दिलं? (१ पेत्र ५:५ आणि तळटीप) (चित्रसुद्धा पाहा.)
११ पेत्र येशूच्या नम्रतेमधून शिकला. येशू जेव्हा स्वर्गात परत गेला तेव्हा पेत्रने जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला चमत्काराने बरं केलं. (प्रे. कार्यं १:८, ९; ३:२, ६-८) आणि साहजिकच या गोष्टीमुळे एक मोठा जमाव पेत्रच्या भोवती जमा झाला. (प्रे. कार्यं ३:११) पेत्र ज्या समाजातून आला होता, त्यात पद, प्रतिष्ठा या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जायचं. मग आता पेत्र स्वतःचा गौरव करून घेणार होता का? नाही. त्याने स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधलं नाही. याउलट त्याने नम्र राहून सगळा गौरव यहोवाला आणि येशूला दिला. त्याने म्हटलं: “त्याच येशूच्या नावाने आणि त्याच्या नावावर असलेल्या आमच्या विश्वासाने, हा जो माणूस तुम्ही पाहताय आणि ज्याला तुम्ही ओळखता, तो बरा झालाय.” (प्रे. कार्यं ३:१२-१६) पेत्रने ख्रिश्चनांना जे पत्र लिहिलं त्यात त्याने नम्र राहण्याबद्दल असं म्हटलं की “नम्रतेचं वस्त्र घाला.” या शब्दांवरून येशूने आपल्या कंबरेला वस्त्र बांधून आपल्या प्रेषितांचे पाय धुतले, त्या घटनेची आपल्याला आठवण होते.—१ पेत्र ५:५ आणि तळटीप वाचा.
चमत्कार केल्यावर पेत्रने नम्रपणे सर्व श्रेय यहोवा आणि येशूला दिलं. आपणसुद्धा प्रशंसेची अपेक्षा न करता इतरांसाठी नम्रपणे चांगलं ते करत राहू या (परिच्छेद ११-१२ पाहा)
१२. आपण पेत्रसारखं नेहमी नम्र कसं राहू शकतो?
१२ आपण पेत्रसारखं वागून नेहमी नम्र राहायला शिकू शकतो. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, की एक नम्र व्यक्ती फक्त बोलून तिची नम्रता दाखवत नाही, तर यात आणखीही काही सामील आहे. पेत्रने नम्रतेसाठी जो शब्द वापरला त्यावरून दिसून येतं, की नम्रतेमध्ये आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल काय विचार करतो हे सामील आहे. यहोवावर आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे आपण भाऊबहिणींसाठी चांगल्या गोष्टी करतो; लोकांनी आपली प्रशंसा करावी म्हणून नाही. आपली मेहनत लोकांच्या लक्षात आली नाही तरी आपण यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची आनंदाने सेवा करतो, तेव्हा आपण दाखवून देतो की आपण खऱ्या अर्थाने नम्र आहोत.—मत्त. ६:१-४.
“समंजस असा”
१३. “समंजस” असण्यात काय सामील आहे, हे समजावून सांगा.
१३ “समंजस” असण्यात काय सामील आहे? (१ पेत्र ४:७) एक समंजस ख्रिस्ती व्यक्ती असे निर्णय घ्यायचा प्रयत्न करते, ज्यांतून यहोवाचा दृष्टिकोन दिसून येतो. अशी व्यक्ती जीवनातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा यहोवासोबतच्या नात्याला सगळ्यात जास्त महत्त्व देते. तसंच, तिचा स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन असतो. आणि तिला याची जाणीव असते की तिला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत. यासोबतच ती नेहमी यहोवाला प्रार्थना करून त्याच्यावर विसंबून असल्याचं दाखवून देते.
१४. एकदा पेत्र यहोवावर विसंबून राहायला कसा चुकला?
१४ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या शिष्यांना सावध करत म्हटलं: “आज रात्री तुम्ही सगळे मला सोडून जाल.” यावर पेत्रने आत्मविश्वासाने असं म्हटलं: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले तरी मी तुला कधीही सोडून जाणार नाही!” त्या रात्री येशूने त्याच्या काही शिष्यांना असा सल्ला दिला: “जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.” (मत्त. २६:३१, ३३, ४१) जर पेत्रने हा सल्ला आधीच ऐकला असता तर त्याने धाडसाने आपण येशूचे शिष्य असल्याचं सांगितलं असतं. याउलट त्याने आपल्या प्रभूला ओळखत असल्याचं नाकारलं. या गोष्टीचा पेत्रला नंतर खूप पस्तावा झाला.—मत्त. २६:६९-७५.
१५. पृथ्वीवरच्या आपल्या शेवटच्या रात्री येशूने समंजस असल्याचं कसं दाखवून दिलं?
१५ येशू यहोवावर पूर्णपणे विसंबून होता. तो परिपूर्ण असला तरी त्याने वारंवार यहोवाला प्रार्थना केली. यामुळे त्याला यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायची हिंमत मिळाली. (मत्त. २६:३९, ४२, ४४; योहा. १८:४, ५) येशूने सतत यहोवाला प्रार्थना केली आणि याचा पेत्रवर जबरदस्त प्रभाव पडला असेल.
१६. आपण समंजस बनलोय हे पेत्रने कसं दाखवून दिलं? (१ पेत्र ४:७)
१६ काही काळाने, पेत्र प्रार्थनेत यहोवावर आणखी विसंबून राहायला शिकला. पुनरुत्थान झालेल्या येशूने, पेत्र आणि इतर प्रेषितांना याची खातरी दिली की प्रचार करण्यासाठी लागणारी पवित्र शक्ती त्यांना मिळेल. पण तोपर्यंत येशूने त्यांना यरुशलेममध्ये वाट बघायला सांगितली. (लूक २४:४९; प्रे. कार्यं १:४, ५) मग वाट बघत असताना पेत्रने काय केलं? पेत्र आणि इतर शिष्य “सतत . . . प्रार्थना करत राहिले.” (प्रे. कार्यं १:१३, १४) नंतर पेत्रने आपल्या पहिल्या पत्रात इतर ख्रिश्चनांना समंजस असण्याबद्दल आणि प्रार्थना करून यहोवावर विसंबून राहण्याबद्दल प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ४:७ वाचा.) पेत्र यहोवावर विसंबून राहायला शिकला आणि मंडळीचा आधारस्तंभ बनला.—गलती. २:९.
१७. आपल्याकडे कितीही कौशल्यं असली तरी काय करत राहिलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ समंजस असण्यासाठी आपण नेहमी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याकडे कितीही कौशल्यं असली तरी आपण यहोवाला सतत प्रार्थना केली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण त्याला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतो; खासकरून महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा. आणि आपण असा भरवसा ठेवतो की आपल्यासाठी चांगलं काय हे त्याला माहीत आहे.
आपण पेत्रसारखं मदतीसाठी प्रार्थना करून यहोवावर विसंबून राहू शकतो आणि समंजस असल्याचं दाखवू शकतो; खासकरून महत्त्वाचे निर्णय घेताना (परिच्छेद १७ पाहा)a
१८. आपण यहोवासारखा विचार करायचा प्रयत्न कसा करू शकतो?
१८ यहोवाने आपल्याला त्याच्यासारखे गुण दाखवायची क्षमता दिली आहे, यासाठी आपण त्याचे खरंच किती आभारी आहोत! (उत्प. १:२६) हे खरंय की आपण पूर्णपणे यहोवासारखे गुण दाखवू शकत नाही. (यश. ५५:९) पण पेत्रप्रमाणे आपण यहोवासारखा विचार करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो. तर चला, यासाठी आपण त्याच्यासारखा विचार करत राहू या, नम्र राहू या आणि समंजसपणा दाखवत राहू या.
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
a चित्रांचं वर्णन: इंटरव्यू देण्याआधी एक बहीण मनातल्या मनात प्रार्थना करत आहे.