अभ्यास लेख ५१
गीत १३२ तू आणि मी, एक आता!
यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे लग्नाची तयारी करा
“सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थितपणे होऊ द्या.”—१ करिंथ. १४:४०.
या लेखात:
ख्रिस्ती जोडपी आपल्या लग्नाच्या दिवशी यहोवाचा आदर कसा करू शकतात ते पाहा.
१-२. लग्न करणाऱ्या जोडप्यांकडून यहोवा कशाची अपेक्षा करतो?
तुमचं लग्न ठरलंय का? जर असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असाल. कदाचित तुम्ही लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली असेल. तुमच्या या आनंदात यहोवासुद्धा सामील आहे. तुमच्या लग्नाच्याa दिवशी आणि पुढेही तुम्ही आनंदी असावं असं त्याला वाटतं.—नीति. ५:१८; गीत. ३:११.
२ तुमच्या लग्नासाठी तुम्ही जी तयारी करता आणि लग्नाच्या दिवशी तुम्ही ज्या गोष्टी करता त्यांतून यहोवाचा आदर झाला पाहिजे. पण हे का गरजेचंय आणि तुम्ही तो कसा करू शकता? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या लेखातून मिळतील. आणि यामुळे लग्नाची तयारी करत असलेल्या ख्रिस्ती जोडप्यांना फायदा होईल. तसंच, आपल्याला जर लग्नाचं आमंत्रण मिळालं असेल किंवा लग्नाच्या तयारीबद्दल कोणी सल्ला मागितला असेल तर या लेखातल्या तत्त्वांमुळे यहोवाचा आदर करायला आपल्यालाही मदत होईल.
यहोवाचा आदर करणं का गरजेचंय?
३. लग्नाची तयारी करताना ख्रिस्ती जोडप्यांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? आणि का?
३ जी जोडपी लग्नाची तयारी करत आहेत, त्यांनी तयारी करत असताना बायबलची तत्त्वं लक्षात घेणं खूप गरजेचंय. असं का म्हणता येईल? कारण यहोवानेच कुटुंब व्यवस्थेची सुरुवात केली. त्यानेच पहिल्या जोडप्याचं, म्हणजे आदाम-हव्वाचं लग्न लावून दिलं. (उत्प. १:२८; २:२४) म्हणून लग्नाची तयारी करताना यहोवा त्याबद्दल काय विचार करतो हे लक्षात घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचंय.
४. लग्नाच्या दिवशी यहोवाचा आदर करण्याचं जोडप्यांकडे कोणतं कारण आहे?
४ लग्नाची तयारी करताना यहोवा त्याबद्दल काय विचार करतो हे लक्षात घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे, तो तुमचा स्वर्गातला पिता आणि सगळ्यात चांगला मित्र आहे. (इब्री १२:९) आणि त्याच्यासोबतची मैत्री तुटेल असं काहीच तुम्हाला करायचं नाही. (स्तो. २५:१४) तसंच, यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे याचाही तुम्ही विचार करू शकता. असं केल्यामुळे तुमच्या लग्नाच्या दिवशी त्याचा आदर व्हावा असं तुम्हाला वाटेल.—स्तो. ११६:१२.
तुम्ही यहोवाचा आदर कसा करू शकता?
५. एखाद्या जोडप्याला लग्नाची तयारी करताना बायबलमुळे कशी मदत होऊ शकते?
५ लग्नाचा कार्यक्रम कशा प्रकारे केला पाहिजे याबद्दल बायबलमध्ये नियमांची यादी दिलेली नाही. जोडपी त्यांच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या भागात सहसा केल्या जाणाऱ्या गोष्टींचा विचार करून लग्नाचा क्रार्यक्रम कसा करायचा हे ठरवू शकतात. त्याच प्रकारे, खरे ख्रिस्ती या नात्याने जोडप्यांनी लग्नाबद्दल असलेल्या सरकारी नियमांचंही पालन केलं पाहिजे. (मत्त. २२:२१) बायबलची तत्त्वं लक्षात ठेवून केलेल्या लग्नाच्या कार्यक्रमामुळे यहोवाचा गौरव होतो आणि तो खूश होतो. मग कोणती तत्त्वं लक्षात ठेवल्यामुळे जोडप्यांना मदत होऊ शकते?
६. जोडप्यांनी लग्नाबद्दल असलेले कायदे पाळणं का गरजेचंय?
६ कायद्यांचं पालन करा. (रोम. १३:१, २) बऱ्याच देशांमध्ये जोडप्यांनी लग्नाबद्दल असलेल्या कायद्यांचं पालन करणं गरजेचं असतं. म्हणून जोडप्यांनी ते राहत असलेल्या ठिकाणी कोणते कायदे पाळले जातात हे जाणून घेतलं पाहिजे. याबाबतीत तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील, तर तुम्ही वडिलांची मदत घेऊ शकता.b
७. लग्नाच्या कार्यक्रमात कसं वातावरण असलं पाहिजे?
७ योग्य वातावरण तयार करा. (१ करिंथ. १०:३१, ३२) तुमच्या लग्नाच्या कार्यक्रमातून जगाची वृत्ती नाही, तर देवाच्या पवित्र शक्तीच्या फळाचे गुण दिसून आले पाहिजेत. (गलती. ५:१९-२६) नवरा मुलगा लग्नानंतर कुटुंबाचा मस्तक बनतो. त्यामुळे लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित रितीने पार पडावा आणि सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा ही त्याची जबाबदारी आहे. मग यासाठी काय करता येईल? जेव्हा लग्नात बायबलवर आधारित भाषण आदराने आणि प्रेमाने दिलं जातं, तेव्हा लग्न ही देवाकडून असलेली भेट आहे हे समजायला इतरांना मदत होते. तसंच, यामुळे लग्नाला उपस्थित असलेल्यांना विवाह किती गंभीर गोष्ट आहे याची जाणीव होते. शिवाय, बरीच जोडपी राज्य सभागृहात लग्नाचं भाषण ठेवायचं निवडतात. जर तुम्हालाही असं करायचं असेल, तर तुम्ही लग्नाच्या बऱ्याच दिवसांआधी वडीलवर्गाला पत्र लिहून याबद्दल परवानगी मागू शकता.
८. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आपण चांगलं वातावरण कसं ठेवू शकतो? (रोमकर १३:१३)
८ रोमकर १३:१३ वाचा. जर तुम्ही लग्नाचं रिसेप्शन ठेवणार असाल, तर त्यात जगाची वृत्ती दिसू नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता? रोमकर १३:१३ मध्ये ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “बेलगाम मौजमस्ती” असं करण्यात आलंय, त्यात अशा पार्ट्या सामील होत्या ज्यात खूप दारू पिली जायची आणि रात्रभर मोठ्या आवाजात गाणी वाजवली जायची. जर तुम्ही रिसेप्शनमध्ये मद्य ठेवायचं निवडलं, तर कोणीही प्रमाणाबाहेर पिणार नाही याची खातरी करा.c जर तुम्ही गाणी लावणार असाल तर इतरांना एकमेकांचं बोलणं ऐकू येणार नाही इतका मोठा आवाज ठेवू नका. तसंच तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी लावता आणि त्यांचे बोल काय आहेत याकडेही लक्ष द्या. नाहीतर त्यामुळे इतरांना अडखळण होऊ शकतं.
९. रिसेप्शनमध्ये होणाऱ्या गोष्टींबद्दल जोडप्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे?
९ तुम्ही रिसेप्शनमध्ये काही व्हिडिओ आणि फोटो दाखवणार आहात का? किंवा तुमचे मित्र आणि घरचे तुमच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहेत का? किंवा तुम्ही एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवणार आहात का? यामुळे तुमचा दिवस आणखी खास बनू शकतो. पण लक्षात असू द्या, की तुम्ही जे काही कराल त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. (फिलिप्पै. ४:८) म्हणून कार्यक्रमाची व्यवस्था करण्याआधी तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘यामुळे इतरांचा अनादर होईल का? यामुळे लग्नाच्या व्यवस्थेचा आदर होईल का?’ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ‘यामुळे यहोवाचा आदर होईल का?’ थोडंफार गमतीशीर बोलणं किंवा विनोद करणं काही चुकीचं नाही. पण कुठल्याही प्रकारचे अश्लील विनोद केले जाऊ नयेत. (इफिस. ५:३) त्यासोबतच तुमच्या घरचे किंवा तुमचे मित्र तुमच्याबद्दल दोन शब्द बोलणार असतील, तर त्यांनी काय बोललेलं तुम्हाला आवडणार नाही हे त्यांना अगोदरच सांगून ठेवा.
१०. लग्नाची तयारी करताना जोडप्यांनी मर्यादांची जाणीव ठेवणं का गरजेचंय? (१ योहा. २:१५-१७)
१० मर्यादेची जाणीव ठेवा. (१ योहान २:१५-१७ वाचा.) यहोवाचे सेवक इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याऐवजी यहोवाचा आदर करतात तेव्हा त्याला खूप आनंद होतो. ज्या ख्रिश्चनांना त्यांच्या मर्यादांची जाणीव असते ते प्रमाणाबाहेर खर्च करत नाहीत आणि आपल्या “धनसंपत्तीचा दिखावा” करत नाहीत. मग साध्या पद्धतीने लग्न केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो? नॉर्वेमध्ये राहणाऱ्या माईकला जसा फायदा झाला तसाच तुम्हालाही होऊ शकतो. तो म्हणतो: “आम्हाला आमच्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहील. आमचं लग्न साध्या पद्धतीने झालं असलं तरी ते खूप चांगलं झालं. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं नाही आणि म्हणून आम्हाला लग्नानंतरही पायनियर सेवा सुरू ठेवता आली.” त्याच प्रकारे, भारतात राहणारी तबीथा म्हणते: “आम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं. त्यामुळे आम्हाला जास्त गोष्टींची तयारी करावी लागली नाही आणि बऱ्याच गोष्टी एकमताने ठरवता आल्या. म्हणून आम्हाला जास्त गोष्टींची चिंताही करावी लागली नाही.”
आपण कुठेही राहत असलो तरी आपल्या लग्नातून आपल्याला मर्यादांची जाणीव असल्याचं दिसून आलं पाहिजे. तसंच, त्यातून सगळ्यांना आनंद आणि चांगल्या आठवणी मिळाल्या पाहिजेत (परिच्छेद १०-११ पाहा)
११. पेहरावाची निवड करताना नवरा-नवरी मर्यादांची जाणीव असल्याचं कसं दाखवू शकतात? (चित्रंसुद्धा पाहा.)
११ तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही काय घालणार हे तुम्ही ठरवलंय का? तुम्हाला त्या दिवशी सगळ्यात छान दिसायचंय यात काहीच शंका नाही. बायबल काळातसुद्धा नवरा-नवरी त्यांच्या पेहरावाकडे खास लक्ष द्यायचे. (यश. ६१:१०) तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नाच्या दिवशी खास कपडे घालाल. पण तरी ते शालीन असले पाहिजेत. (१ तीम. २:९) तुमचा पेहराव कसा होता किंवा तुम्ही कसे दिसत होता फक्त यामुळेच लोकांनी तुमचं लग्न लक्षात ठेवू नये.—१ पेत्र ३:३, ४.
१२. जोडप्यांनी आपल्या लग्नात बायबल तत्त्वांविरूद्ध असलेले रितीरिवाज टाळण्याची खबरदारी का घेतली पाहिजे?
१२ बायबल तत्त्वांविरूद्ध असलेले रितीरिवाज टाळा. (प्रकटी. १८:४) आज जगातल्या लग्नांमध्ये बरेच रितीरिवाज पाळले जातात. त्यांचा संबंध सहसा खोट्या धर्माशी, भूतविद्येशी किंवा अंधश्रद्धेशी असतो. पण यहोवाने आपल्याला अशा सगळ्या अशुद्ध गोष्टींपासून दूर राहायची ताकीद दिली आहे. (२ करिंथ. ६:१४-१७) तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी पाळल्या जाणाऱ्या रितीरिवाजांबद्दल किंवा प्रथांबद्दल तुमच्या मनात शंका असेल, तर त्यांची सुरुवात कुठून झाली हे शोधा आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बायबलची तत्त्वं लागू करा.
१३. जोडपी भेटवस्तूंबद्दल यहोवासारखा दृष्टीकोन कसा ठेवू शकतात?
१३ तुमच्या इथे लग्नात आहेर द्यायची प्रथा आहे का? कदाचित लोक आपल्या ऐपतीप्रमाणे आहेर देत असतील. हे खरंय की आपल्याला इतरांना दिल्यामुळे आनंद होतो. (नीति. ११:२५; प्रे. कार्यं २०:३५) पण, इतरांनी आपल्याला आहेर दिलाच पाहिजे आणि तो महागडाच असला पाहिजे अशी अपेक्षा करणं चुकीचंय. या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण करतो. यामुळे लोकांनी काय दिलंय यापेक्षा त्यांनी मनापासून काहीतरी दिलंय या गोष्टीची आपण कदर बाळगतो.—२ करिंथ. ९:७.
समस्यांचा सामना कसा करता येईल?
१४. काही जोडप्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
१४ तुमच्या लग्नाच्या दिवशी यहोवाचा आदर व्हावा असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. पण त्याची तयारी करताना काही समस्या येऊ शकतात. जसं की, साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी तयारी करताना काही अडचणी येतील. सॉलोमन बेटावर राहणारा चार्ली म्हणतो: “रिसेप्शनला नेमकं कोणाकोणाला बोलवायचं हे ठरवणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. कारण आमची बरीच मित्रमंडळी आहे. आणि सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला लग्नाचं आमंत्रण मिळालं पाहिजे.” आधी उल्लेख केलेली तबीथा म्हणते: “मी जिथे राहते त्या ठिकाणी मोठे रिसेप्शन करणं खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. पण, आम्हाला आमच्या लग्नाला शंभर लोकांनाच बोलवायचं होतं. ही गोष्ट मान्य करायला आमच्या आईवडिलांना जरा वेळ लागला.” भारतात राहणारी सारा म्हणते: “आपल्याकडे किती पैसे आहेत आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याकडे आमच्या इथले लोक खूप लक्ष देतात. माझ्या चुलत भावंडांची लग्नं खूप थाटामाटात झाली. त्यामुळे माझं लग्न त्यांच्यापेक्षा भारी व्हावं असं मला वाटू लागलं.” मग अशा समस्यांवर मात करायला कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल?
१५. लग्नाची तयारी करताना प्रार्थना करणं का गरजेचंय?
१५ लग्नाची तयारी करताना प्रार्थना करा. तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल चिंता वाटते त्यांबद्दल तुम्ही यहोवाला प्रार्थनेत सांगू शकता. (फिलिप्पै. ४:६, ७) योग्य निर्णय घ्यायला, मन शांत ठेवायला आणि गरज असते तेव्हा धाडस दाखवायला मदत व्हावी म्हणून तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. (१ पेत्र ५:७) तुम्ही असं केलं तर यहोवा तुम्हाला कशी मदत करतोय हे पाहून तुमचा त्याच्यावरचा भरवसा वाढेल. या बाबतीत तबीथा म्हणते: “आमच्यात आणि आमच्या कुटुंबात मतभेद होऊ नयेत अशी माझी आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याची इच्छा होती. म्हणून लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करताना प्रत्येक वेळी आम्ही प्रार्थनेने सुरुवात करायचो. आणि खरंच यहोवाने आम्हाला मदत केली, म्हणून सगळं काही अगदी शांत रितीने पार पडलं.”
१६-१७. लग्नाची तयारी करताना आपसात स्पष्टपणे बोलणं का गरजेचंय?
१६ स्पष्टपणे आणि आदराने बोला. (नीति. १५:२२) एक जोडपं म्हणून तुम्हाला तुमच्या लग्नाच्या कार्यक्रमाबद्दल बरेच निर्णय घ्यावे लागतील. जसं की लग्नाची तारीख काय ठरवायची, किती खर्च करायचा, कोणाला बोलवायचं आणि बरंच काही. कोणताही निर्णय घेण्याआधी मिळून चर्चा करा. कोणती बायबल तत्त्वं लागू होतात याचा विचार करा. प्रौढ भाऊबहिणींकडून सल्ला मागा. तसंच, आदराने आणि समजूतदारपणे तुमची मतं मांडा. शिवाय, इतरांनाही त्यांची मतं मांडू द्या. तुमच्या आईवडिलांनी जर तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची विनंती केली, तर समजूतदारपणा दाखवा आणि शक्य असेल तर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. कारण हा दिवस तुमच्यासाठी जितका खास आहे तितकाच त्यांच्यासाठीसुद्धा आहे. पण जर तुम्हाला त्या गोष्टी करणं शक्य नसेल, तर आदराने त्यामागची कारणं त्यांना सांगा. (कलस्सै. ४:६) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाला येणाऱ्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि यहोवाचा महिमा व्हावा हाच त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, ही गोष्ट तुमच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगा.
१७ तुमच्या घरचे जर सत्यात नसतील तर त्यांना तुमच्या आवडीनिवडींबद्दल समजावून सांगणं तुम्हाला कदाचित कठीण जाऊ शकतं. पण तुम्ही त्यांना प्रेमळपणे समजावून सांगू शकता. भारतात राहणारा संथोश म्हणतो: “आमच्या दोघांचे घरचे हिंदू आहेत. त्यामुळे आम्ही बायबल तत्त्वांविरूद्ध असलेले काही रितीरिवाज पाळावेत असं त्यांना वाटत होतं. आम्ही असं का करू शकत नाही हे त्यांना समजावून सांगायला थोडा वेळ लागला. पण बायबल तत्त्वांविरूद्ध नसलेल्या काही गोष्टी करायला आम्ही तयार झालो. जसं की, लग्नाच्या जेवणात आम्ही काही बदल केले. तसंच, आम्ही लग्नात नाचगाणं ठेवलं नाही. कारण आम्हाला माहीत होतं की त्यांना हे आवडणार नाही.”
१८. लग्नाचा दिवस सुरळीतपणे पार पडावा म्हणून तुम्ही काय करू शकता? (१ करिंथकर १४:४०) (चित्रसुद्धा पाहा.)
१८ चांगली योजना करा. जर तुम्ही आधीच चांगली योजना केली तर लग्नाच्या दिवशी तुमची दगदग होणार नाही. (१ करिंथकर १४:४० वाचा.) तायवानमधला वेन असं म्हणतो: “जे भाऊबहीण आम्हाला लग्नात मदत करणार होते त्यांच्यासोबत आम्ही लग्नाच्या काही दिवसांआधी एक छोटीशी मिटींग घेतली. आम्ही त्यांच्यासोबत आमच्या योजनांबद्दल चर्चा केली आणि कार्यक्रमातल्या काही गोष्टींचा सराव केला.” आपण जेव्हा सगळ्या गोष्टी वेळेवर पार पाडतो, तेव्हा कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर करत असतो.
लग्नाआधी चांगली तयारी केल्यामुळे सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडू शकतात (परिच्छेद १८ पाहा)
१९. रिसेप्शन ठरल्याप्रमाणे पार पडावं यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?
१९ जर तुम्ही आधीच काही गोष्टींचा विचार करून ठेवला, तर तुम्हाला काही समस्या टाळता येतील. (नीति. २२:३) उदाहरणार्थ, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी आमंत्रणाशिवायही लोक लग्नाला येत असतील, तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता याचा आधीच विचार करा. लग्नात कायकाय होणार आहे आणि रितीरिवाजांबद्दल तुमचं काय मत आहे हे सत्यात नसलेल्या तुमच्या नातेवाइकांना आधीच सांगून ठेवा. तुमचं रिसेप्शन सुरळीतपणे पार पडावं म्हणून एखाद्या भावाला तुम्ही “मेजवानीची देखरेख” करण्याची जबाबदारी देऊ शकता. (योहा. २:८) तुम्ही केलेल्या सगळ्या योजनांबद्दल जर तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं, तर ठरल्याप्रमाणे सगळं काही पार पाडायला तो तुम्हाला मदत करेल.
२०. जोडप्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
२० लग्नाची तयारी करताना थोडीफार चिंता वाटणं साहजिक आहे. पण लक्षात ठेवा, ही तयारी फक्त एका दिवसासाठी आहे. त्यानंतर तुम्ही सोबत मिळून यहोवाच्या सेवेत एक नवीन प्रवास सुरू कराल. तर मग साध्या पद्धतीने तुमचं लग्न व्हावं आणि त्यातून विवाह व्यवस्थेबद्दल आदर दिसून यावा याची खातरी करा. यहोवावर भरवसा ठेवा. त्याच्या मदतीने तुम्हाला लग्नाची चांगली तयारी करता येईल. तसंच, पुढे जाऊन जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवसाची आठवण कराल, तेव्हा तुम्हाला कोणताही पस्तावा होणार नाही.—स्तो. ३७:३, ४.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श
a शब्दाचा अर्थ: बऱ्याच देशांमध्ये, लग्नात जोडपी देवापुढे शपथ घेण्याचा विधी पाळतात आणि त्यानंतर रिसेप्शन असतं. पण, काही देशांमध्ये असा विधी किंवा रिसेप्शन ठेवलं जात नाही. अशा देशांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनासुद्धा त्यांच्या लग्नाच्या दिवशी बायबल तत्त्वांचा फायदा होऊ शकतो.
b लग्नासाठी असलेल्या कायद्यांबद्दल ख्रिश्चनांचा काय दृष्टिकोन असला पाहिजे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २००६ च्या टेहळणी बुरूज अंकातला “देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ” हा लेख पाहा.
c jw.org वरचा लग्नाच्या जेवणात मद्य ठेवावं का? हा व्हिडिओ पाहा.