वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 डिसेंबर पृ. २६-३०
  • वृद्धांनो—मंडळीसाठी तुम्ही मोलाचे आहात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वृद्धांनो—मंडळीसाठी तुम्ही मोलाचे आहात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो?
  • तुमच्यामुळे इतरांना फायदा होऊ शकतो
  • तुम्ही यहोवासाठी जे काही केलंय त्याची त्याला कदर आहे
  • इतरांना मदत करण्यात नेहमी व्यस्त राहा
  • त्याच्या अंतःकरणातील इच्छेची पूर्तता झाली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते द्या आणि आनंदी राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आपले वयस्कर भाऊबहीण अनमोल रत्नांसारखे आहेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 डिसेंबर पृ. २६-३०
कोलाज: वयस्कर भाऊबहीण आनंदाने यहोवाची सेवा करत आहेत. १. एक भाऊ आनंदाने पुढे पाहतोय. २. एक बहीण तिची काळजी घेणाऱ्‍या स्त्रीला पत्रिका देत आहे. ३. एक बहीण सभेत उत्तर देत आहे. ४. प्रचारात असताना एक बहीण एका तरुण भावाचा हात धरून चालत आहे. ५. एक भाऊ राज्य सभागृहात दोन लहान मुलांसोबत आणि त्यांच्या आईसोबत वेळ घालवत आहे.

वृद्धांनो—मंडळीसाठी तुम्ही मोलाचे आहात

“तरुण असताना मी ज्याज्या गोष्टी करायचे त्या आठवून मला आश्‍चर्य वाटतं. पण वय झाल्यामुळे आता ते सगळं मला जमत नाही.”—कॉनी, ८३ वर्षं.

तुम्हालाही या बहिणीसारखंच वाटतं का? कदाचित तुम्ही बरीच वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली असेल. पण आता तुम्हाला जास्त करता येत नसल्यामुळे तुमच्या मनात स्वतःबद्दल कमीपणाची भावना येत असेल. कदाचित तुम्ही आधी करत असलेल्या गोष्टींची तुलना आता करत असलेल्या गोष्टींशी करत असाल. मग असे विचार टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

यहोवा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो?

तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘यहोवा माझ्याकडून काय अपेक्षा करतो?’ अनुवाद ६:५ मधले शब्द वाचून तुम्हाला खूप सांत्वन मिळेल. तिथे म्हटलंय: “तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करा.”

या वचनाप्रमाणे यहोवा तुमच्याकडून अपेक्षा करतो, की तुम्ही तुमच्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्‍तीने त्याच्यावर प्रेम करावं. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी किंवा तुम्ही आधी जे करत होता त्याच्याशी करणार नाही.

जरा याचा विचार करा: तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही यहोवाला तुमचं सगळ्यात चांगलं ते देत होता. पण आता तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही यहोवाला सगळ्यात चांगलं ते देत आहात. जर तुम्ही अशा प्रकारे विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पूर्वीसारखंच आताही यहोवाला तुमचं सगळ्यात चांगलं ते देत आहात.

कोलाज: एक बहीण बऱ्‍याच वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहे. १. बऱ्‍याच दशकांआधी एक तरुण बहीण घरोघरचं साक्षकार्य करताना एका स्त्रीशी बोलते. २. आता ती वयस्कर झाली आहे आणि एका तरुण बहिणीसोबत फोनवरून साक्षकार्य करत आहे.

तुम्ही तरुण होता तेव्हा यहोवाला तुमचं सगळ्यात चांगलं ते देत होता आणि म्हातारपणातही तुम्ही यहोवाला तुमचं सगळ्यात चांगलं ते देत आहात

तुमच्यामुळे इतरांना फायदा होऊ शकतो

तुम्ही काय करू शकत नाही याचा विचार करण्याऐवजी, तुमच्या अनुभवामुळे तुम्ही इतरांना कशी मदत करू शकता याचा विचार करा. तुम्ही पुढे दिलेल्या काही मार्गांनी इतरांची मदत करू शकता:

तुमचा अनुभव इतरांना सांगा. पुढे दिलेल्या बायबलच्या काही वचनांचा विचार करा:

राजा दावीद: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय, पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं, किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी भीक मागत असलेलं पाहिलं नाही.”—स्तो. ३७:२५.

यहोशवा: “पाहा! मी काही आता जास्त दिवस जगणार नाही. आणि तुम्हाला हे पक्कं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल जितकी अभिवचनं दिली होती त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही; प्रत्येक अभिवचन तुमच्या बाबतीत पूर्ण झालंय. त्यातला एकही शब्द अपुरा राहिलेला नाही.”—यहो. २३:१४.

कदाचित तुम्हालाही दावीद आणि यहोशवासारखंच वाटत असेल. ते त्यांच्या अनुभवातून बोलले. यहोवाच्या या विश्‍वासू सेवकांनी बऱ्‍याच वर्षांपासून या गोष्टी अनुभवल्या होत्या म्हणून त्यांच्या शब्दांना वजन होतं.

तुम्ही जर बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असाल, तर तुम्हाला त्याची सेवा केल्यामुळे जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांबद्दल तुम्ही इतरांना सांगू शकता. यहोवाने त्याच्या लोकांना एखाद्या खास मार्गाने मदत केल्याचं तुम्हाला आठवतंय का? जर असं असेल तर त्याबद्दल इतरांना सांगा. तुमच्या अनुभवामुळे इतरांना खूप फायदा होऊ शकतो आणि प्रोत्साहनही मिळू शकतं.—रोम. १:११, १२.

सभेला प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनसुद्धा तुम्ही इतरांना प्रोत्साहन देऊ शकता. आणि यामुळे तुम्हालाही फायदा होऊ शकतो. आधी उल्लेख केलेली कॉनी म्हणते: “सभेला गेल्यामुळे मी निराश राहत नाही. मला भाऊबहिणींकडून जर इतकं प्रेम मिळत असेल तर मी दुःखी कशी राहीन? मला त्यांची किती कदर आहे हे दाखवण्यासाठी मी त्यांना छोटे-मोठे गिफ्ट देते. तसंच, भाऊबहिणींसोबत आध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायचा मी प्रयत्न करते.”

तुम्ही यहोवासाठी जे काही केलंय त्याची त्याला कदर आहे

बायबलमध्ये यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांची उदाहरणं दिली आहेत. त्यांना त्यांच्या वयामुळे यहोवासाठी हवं तेवढं करता येत नसलं, तरी यहोवाने त्यांच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं. येशूच्या जन्माच्या वेळी हयात असलेल्या शिमोन नावाच्या एका वृद्ध इस्राएली व्यक्‍तीचा विचार करा. तो जेव्हा मंदिरात जात असेल तेव्हा बऱ्‍याच तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या हाताळताना पाहत असेल. माणसांच्या दृष्टीने पाहिलं, तर शिमोनला असं वाटू शकलं असतं की यहोवाच्या नजरेत त्याची खूप कमी किंमत असेल. पण यहोवा तसा विचार करत नव्हता. तो शिमोनकडे “नीतिमान आणि देवाची भीती बाळगणारा माणूस” म्हणून पाहायचा. तसंच त्याने त्याला बाळ येशूला पाहायचा बहुमानही दिला. इतकंच काय, तर यहोवाने त्याला मसीहाबद्दल भविष्यवाणी करायचीसुद्धा प्रेरणा दिली! (लूक २:२५-३५) शिमोन आता म्हातारा झालाय आणि तो जास्त काही करू शकत नाही असा यहोवाने विचार केला नाही. उलट, त्याने त्याच्या मजबूत विश्‍वासाकडे पाहिलं. बायबल म्हणतं, यहोवाची ‘पवित्र शक्‍ती त्याच्यावर होती.’

योसेफ आणि मरीया शिमोनला बाळ येशू दाखवत आहे.

यहोवाने शिमोनला बाळ येशूला पाहायचा बहुमान दिला आणि मसीहाबद्दल भविष्यवाणी करायचीसुद्धा प्रेरणा दिली

तुमची परिस्थिती कशीही असली, तरी तुम्ही विश्‍वासूपणे करत असलेल्या सेवेची यहोवाला खूप कदर आहे याची तुम्ही खातरी बाळगू शकता. कारण बायबलमध्ये असं सांगितलंय, की आपल्याकडे जे नाही त्याची यहोवा अपेक्षा करत नाही, तर आपल्याकडे जे आहे त्याप्रमाणे आपण दिलं तर तो ते मान्य करतो.—२ करिंथ. ८:१२.

ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे तुम्ही काय करू शकता याचा जरा विचार करा. जसं की, थोड्या वेळासाठी का असेना, तुम्ही घरोघरच्या, फोनवरच्या किंवा दुसऱ्‍या एखाद्या प्रकारच्या साक्षकार्यात अजूनही भाग घेऊ शकता का? तसंच, तुम्ही एखाद्या भावाला किंवा बहिणीला फोन करून किंवा एखादं कार्ड पाठवून प्रोत्साहन देऊ शकता का? इतरांना प्रेम दाखवण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी त्यांना खूप प्रोत्साहन मिळू शकतं. खासकरून, यहोवाची बरीच वर्षं विश्‍वासूपणे सेवा केलेल्या व्यक्‍तीने असं केलं तर त्याचा आणखी चांगला प्रभाव पडू शकतो.

काहींना शारीरिक समस्या असतात. “तिला जगण्याची आशा मिळाली” या चौकटीत असलेला दक्षिण अफ्रिकेतला एक अनुभव वाचा.

नेहमी लक्षात असू द्या, तुमच्या विश्‍वासूपणामुळे आणि एकनिष्ठतेमुळे इतरांना प्रोत्साहन मिळू शकतं. धीर धरण्याच्या बाबतीत तुम्ही एक चांगलं उदाहरण मांडलं असल्यामुळे तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.

इतरांना मदत करण्यात नेहमी व्यस्त राहा

संशोधनावरून असं दिसून आलंय, की जे वयस्कर स्त्री-पुरूष इतरांना मदत करण्यात व्यस्त असतात त्यांची तब्येत आणि विचार करण्याची क्षमता चांगली असते आणि ते मोठं आयुष्य जगतात.

हे खरंय की चांगली कामं करून वयामुळे येणाऱ्‍या सगळ्या समस्या आपण काढून टाकू शकत नाही. फक्‍त देवाचं राज्यच म्हातारपण आणि मृत्यू येण्यामागचं मूळ कारण काढून टाकू शकतं. ते कारण म्हणजे, आपली अपरिपूर्ण स्थिती.—रोम. ५:१२.

पण आतासुद्धा यहोवा तुमच्याकडून ज्या गोष्टीची अपेक्षा करतो, त्या गोष्टी करून तुम्ही तुमचा विश्‍वास मजबूत ठेवू शकता आणि यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहील. या गोष्टींमध्ये इतरांना यहोवाबद्दल सांगणंही सामील आहे. वयस्कर भाऊबहिणींनो, तुम्ही यहोवाच्या सेवेत जे काही करत आहात त्याची त्याला खूप कदर आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तसंच, तुमच्या विश्‍वासामुळे मंडळीलाही खूप फायदा होतो यात काही शंका नाही.

एक वयस्कर बहीण ट्रॉलीवरचं साक्षकार्य करत आहे. ती दुःखात असलेल्या एका तरुण स्त्रीला बायबलचं वचन दाखवत आहे.

तिला जगण्याची आशा मिळाली

एकदा एक तरुण स्त्री ट्रॉली जवळून जात होती. तेव्हा ट्रॉलीजवळ उभ्या असलेल्या वयस्कर बहिणीने तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बहिणीने त्या स्त्रीला विचारलं, की ती तिला बायबलमधून एखादं वचन वाचून दाखवू शकते का. मग तिने त्या स्त्रीला यिर्मया २९:११ हे वचन वाचून दाखवलं. त्यात म्हटलंय, की यहोवाचे आपल्याबद्दलचे विचार शांतीचे आहेत, संकटाचे नाहीत. मग बहिणीने तिला विचारलं: “तुझं भविष्य कसं असावं असं देवाला वाटतं?”

ही गोष्ट त्या स्त्रीच्या मनाला भिडली. तिच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आलं. ती म्हणाली: “मला भविष्यात शांती आणि आशा मिळावी असं त्याला वाटतं. हे वचन दाखवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. मला भरवसा आहे की हे माझ्या प्रार्थनेचंच उत्तर आहे. अलीकडे माझ्या जीवनात एका मागून एक इतक्या समस्या आल्या की मी स्वतःचा जीव घ्यायचा विचार करत होते. पण सकाळी मी देवाला अशी प्रार्थना केली, की तुला जर माझी खरंच काळजी असेल तर मला एखादं चिन्ह दाखव. आणि मग आपली काहीच ओळख नसताना तुम्ही माझ्याशी बोललात, हे वचन वाचून दाखवलं. देव माझ्याबद्दल नेमका काय विचार करतो हे मला समजलं. हा योगायोग असूच शकत नाही.”

मग बहिणीने तिला jw.org वरचे आत्महत्येचा विचार टाळायला मदत करतील असे काही लेख दाखवले. तसंच, बहिणीने तिला बायबल अभ्यास कसा चालवला जातो हे सांगितलं आणि सभेचं आमंत्रणही दिलं. याच्या पुढच्या आठवडी ती स्त्री सभेला आली आणि आता कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रिकेतून तिचा अभ्यास सुरू आहे.

तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही ट्रॉलीवरचं साक्षकार्य करू शकता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा