अभ्यास लेख ५०
गीत ४८ याहासोबत रोज चालू या
यहोवासारखं नम्र व्हा
“देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा.”—इफिस. ५:१.
या लेखात:
आपण कोणत्या चार मार्गांनी यहोवासारखी नम्रता दाखवू शकतो ते पाहू या.
१. यहोवाची नम्रता इतकी विशेष का आहे?
अधिकार असलेल्या लोकांना तुम्ही कधी नम्र असल्याचं पाहिलंय का? कदाचित नाही. पण यहोवा सर्वशक्तिमान देव असूनही खूप नम्र आहे. (स्तो. ११३:५-८) यहोवासारखा नम्र दुसरा कोणीही नाही. त्याच्यात घमेंडीपणाचा अंशही नाही. तर मग, आता आपण यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या चार पैलूंबद्दल विचार करू या आणि त्यांतून यहोवाची नम्रता कशी दिसून येते हे पाहू या. तसंच, येशूने यहोवासारखी नम्रता कशी दाखवली हेही पाहू या. असं केल्यामुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ आणि त्याच्यासारखं नम्र होऊ.
कोणीही न कचरता यहोवाकडे जाऊ शकतं
२. स्तोत्र ६२:८ मधून आपल्याला यहोवाबद्दल काय कळतं? (चित्रसुद्धा पाहा.)
२ घमेंडी लोकांकडे जायला कोणालाच आवडत नाही. ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असल्यामुळे, लोकांना त्यांच्याशी बोलायला नको नकोसं वाटतं. पण यहोवा खूप वेगळा आहे. आपला स्वर्गातला पिता नम्र असल्यामुळे आपण त्याच्याकडे जावं आणि त्याच्याशी मनमोकळेपणे बोलावं असं त्याला वाटतं. (स्तोत्र ६२:८ वाचा.) एक प्रेमळ पिता जसा आपल्या मुलांच्या समस्या ऐकून घेतो, तसंच यहोवा त्याच्या सेवकांच्या प्रार्थना ऐकून घ्यायला नेहमी तयार असतो. खरंतर, यहोवाने त्याच्या सेवकांच्या बऱ्याच प्रार्थना बायबलमध्ये लिहून ठेवल्या आहेत. यावरून समजतं, की आपण त्याच्याकडे न कचरता जावं असं त्याला वाटतं. (यहो. १०:१२-१४; १ शमु. १:१०-१८) पण जर आपल्याला कधीकधी कमीपणाची भावना सतावत असेल तर काय?
एका लहान मुलाच्या हातून खेळताना फुलदाणी फुटते. पण त्याचे वडील यहोवासारखं नम्र राहून त्याचं ऐकून घेतात (परिच्छेद २ पाहा)
३. आपण रोज यहोवाशी बोलावं असं त्याला वाटतं हे आपण खातरीने का म्हणू शकतो?
३ आपल्याला कमीपणाची भावना सतावत असली, तरी आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. असं का म्हणता येईल? हरवलेल्या मुलाचं उदाहरण देऊन येशूने यहोवाची तुलना एका प्रेमळ पित्याशी केली. या उदाहरणातल्या पश्चात्ताप झालेल्या मुलाला आपल्या घरचे आपल्याबद्दल काय विचार करतील असं वाटत होतं. पण तो मुलगा घरी परत आल्यावर त्याच्या वडिलांनी काय केलं? येशूने सांगितलं की त्या वडिलांनी त्यांच्या मुलाला लांबूनच येताना पाहिलं, तेव्हा “त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” (लूक १५:१७-२०) यहोवा त्या वडिलांसारखाच आहे. चिंतांच्या किंवा दोषीपणाच्या भावनांमुळे दबून गेलेले लोक जेव्हा त्याला प्रार्थना करतात, तेव्हा यहोवा त्यांचं लक्ष देऊन ऐकतो. कारण तो नम्र आहे. (विलाप. ३:१९, २०) प्रेमाने प्रवृत्त होऊन यहोवा आपल्याला सांत्वन देण्यासाठी आपल्याकडे धावत येतो आणि त्याचं आपल्यावर प्रेम असल्याची आपल्याला खातरी करून देतो. (यश. ५७:१५) मग आज यहोवा आपल्या मदतीला कसा धावून येतो? तो बऱ्याचदा मंडळीतल्या वडिलांचा, सत्यात असलेल्या आपल्या घरच्या लोकांचा किंवा भाऊबहिणींचा वापर करून असं करतो. (याको. ५:१४, १५) आपण त्याच्या जवळ जावं असं त्याला वाटतं, म्हणून तो आपल्याला ही मदत पुरवतो.
४. लोक येशूकडे न कचरता का जाऊ शकत होते?
४ येशू त्याच्या पित्यासारखाच वागतो. येशूसुद्धा यहोवासारखा नम्र आहे. म्हणूनच तो पृथ्वीवर होता तेव्हा लोक त्याच्याकडे न कचरता येऊ शकत होते. त्याला प्रश्न विचारायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते. (मार्क ४:१०, ११) म्हणूनच जेव्हा येशू त्यांना एखाद्या विषयाबद्दल त्यांचं मत विचारायचा, तेव्हा ते मनमोकळेपणे त्याला आपलं मत सांगायचे. (मत्त. १६:१३-१६) तसंच, त्यांच्याकडून चुका व्हायच्या तेव्हा येशू आपल्यावर रागवेल अशी भीती त्यांना वाटायची नाही. कारण त्यांना माहीत होतं की तो दयाळू आणि सहनशील आहे. (मत्त. १७:२४-२७) येशूने यहोवाचं हुबेहूब अनुकरण केल्यामुळे त्याच्या शिष्यांना यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेता आलं. (योहा. १४:९) येशूच्या वागण्यावरून त्याच्या शिष्यांना समजलं, की यहोवा त्यांच्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्यांसारखा कठोर आणि गर्विष्ठ नाही. उलट, तो नम्र आहे आणि लोकांनी त्याच्या जवळ जावं असं त्याला वाटतं.
५. आपण नम्र असलो तर लोक आपल्याकडे यायला का कचरणार नाहीत?
५ आपण यहोवासारखं कसं वागू शकतो? आपण जर नम्रतेचा गुण वाढवला, तर लोक आपल्याकडे न कचरता येतील. जी व्यक्ती नम्र नसते तिच्यात ईर्ष्या, गर्विष्ठपणा आणि इतरांना माफ न करायची वृत्ती असते. आणि अशा व्यक्तीपासून लोक चार हात लांबच राहतात. याउलट, जी व्यक्ती नम्र असते तिच्यात दयाळूपणा, धीर आणि माफ करायची वृत्ती असते. आणि लोकांना अशा व्यक्तीसोबत मैत्री करावीशी वाटते. (कलस्सै. ३:१२-१४) मंडळीतल्या वडिलांनी खासकरून असे चांगले गुण दाखवणं खूप गरजेचंय. त्यासाठी त्यांना भाऊबहिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. म्हणूनच त्यांनी विनाकारण झूमवरून सभेला हजर राहू नये, तर प्रत्यक्षरीत्या हजर राहण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करावा. तसंच, जेव्हाजेव्हा शक्य होईल तेव्हातेव्हा त्यांनी भाऊबहिणींसोबत घरोघरचं साक्षकार्य करायचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे भाऊबहिणींची वडिलांसोबत चांगली मैत्री होईल आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडून मदत घ्यायला ते कचरणार नाहीत.
यहोवा समजूतदार आहे
६-७. यहोवाने त्याच्या सेवकांशी वागताना समजूतदारपणा कसा दाखवला? उदाहरण द्या.
६ गर्विष्ठ लोक इतरांशी समजूतदारपणे वागत नाहीत. पण यहोवा नम्र आहे. म्हणून तो नेहमी समजूतदारपणे वागतो आणि इतरांचं ऐकतो. इतकंच काय तर तो आपला निर्णय बदलायलाही तयार असतो. मोशेची बहीण मिर्याम हिच्याशी तो कसा वागला याचा विचार करा. मोशे यहोवाचा प्रतिनिधी होता. पण मिर्यामने आणि अहरोनने त्याच्याविरुद्ध कुरकुर केली. असं करून मिर्यामने खरंतर यहोवाचा अनादर केला. म्हणून यहोवाला खूप राग आला आणि त्याने तिला कुष्ठरोगाने पिडलं. पण अहरोनने जेव्हा तिच्यासाठी यहोवाकडे विनंती केली आणि मोशेने तिला बरं करायची भीक मागितली, तेव्हा यहोवा आपल्या निर्णयावर अडून बसला नाही. तर तो नम्र असल्यामुळे त्याने मिर्यामला बरं केलं.—गण. १२:१-१५.
७ यहोवा हिज्कीया राजाशीसुद्धा नम्रतेने वागला. यहोवाने त्याच्या संदेष्ट्याद्वारे सांगितलं, की हिज्कीया लवकरच मरणार आहे. तेव्हा हिज्कीयाने रडून यहोवाकडे त्याला बरं करायची भीक मागितली. म्हणून यहोवाला त्याची दया आली आणि त्याने त्याचं आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवलं. (२ राजे २०:१, ५, ६) खरंच, यहोवा नम्र असल्यामुळे आपल्याशी दयेने वागतो आणि त्याचा निर्णय बदलायलाही तयार असतो.
८. येशू समजूतदारपणे वागतो असं आपण का म्हणू शकतो? (मार्क ३:१-६)
८ येशू त्याच्या पित्यासारखाच वागतो. पृथ्वीवर असताना येशूने लोकांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्यांना मदत करायला मागेपुढे पाहिलं नाही. उदाहरणार्थ, धार्मिक पुढाऱ्यांचा विरोध असूनही त्याने शब्बाथाच्या दिवशी लोकांना बरं केलं. (मार्क ३:१-६ वाचा.) येशू आजही मंडळीचा मस्तक या नात्याने समजूतदारपणा दाखवतो. एखाद्याच्या हातून पाप घडतं तेव्हा तो त्याच्याशी धीराने वागतो आणि त्याला आपली चूक सुधारायची संधी देतो.—प्रकटी. २:२-५.
९. आपण समजूतदार असल्याचं कसं दाखवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
९ आपण यहोवासारखं कसं वागू शकतो? आपण यहोवासारखं नम्र व्हायचा आणि समजूतदारपणा दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. (याको. ३:१७) उदाहरणार्थ, समजूतदार आईवडील आपल्या मुलांकडून जास्तीची अपेक्षा करणार नाहीत. याकोबचं याबाबतीत एक चांगलं उदाहरण आहे. त्यानेही त्याच्या मुलांकडून जास्तीची अपेक्षा केली नाही. (उत्प. ३३:१२-१४) तसंच, जे आईवडील नम्र आणि समजूतदार असतात ते आपल्या एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी करणार नाहीत. शिवाय, मंडळीतल्या वडिलांनीसुद्धा समजूतदार असणं खूप गरजेचं आहे. मग ते समजूतदारपणा कसा दाखवू शकतात? ते स्वतःच्याच मतावर अडून राहणार नाहीत. उलट, ते इतर वडिलांच्या निर्णयाला पाठिंबा देतील. (१ तीम. ३:२, ३) एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असेल, तर आपण त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (रोम. १४:१) खरंच, आपला ‘समजूतदारपणा सर्वांना कळून यावा’ म्हणून आपण सगळेच मेहनत घेऊ शकतो.—फिलिप्पै. ४:५.
एक वडील प्रचार करताना आपल्या मुलांकडून जास्तीची अपेक्षा करत नाही (परिच्छेद ९ पाहा)
यहोवा धीर धरतो
१०. यहोवाने धीर कसा दाखवला?
१० तुम्ही कदाचित पाहिलं असेल, की गर्विष्ठ लोकांना सहसा वाट पाहायला आवडत नाही. त्यांना धीर धरणं खूप कठीण जातं. पण यहोवाच्या बाबतीत मात्र तसं नाही. धीर धरण्याच्या बाबतीत त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. नोहाच्या दिवसांत त्याने म्हटलं होतं, की दुष्टांचा नाश करण्यासाठी तो १२० वर्षं थांबेल. (उत्प. ६:३) यहोवाने धीर धरल्यामुळे नोहाला आपल्या मुलांना वाढवायला आणि आपल्या कुटुंबासोबत मिळून तारू बांधायला वेळ मिळाला. नंतर, अब्राहामने यहोवाला सदोम आणि गमोराच्या नाशाविषयी बरेच प्रश्न विचारले, तेव्हा त्याने त्याचं धीराने ऐकलं. यहोवा जर गर्विष्ठ असता तर तो अब्राहामला म्हणाला असता, ‘तुझी मला प्रश्न विचारायची हिंमत कशी झाली?’ पण तो नम्र असल्यामुळे त्याने अब्राहामचं धीराने ऐकलं.—उत्प. १८:२०-३३.
११. २ पेत्र ३:९ प्रमाणे, आज यहोवा धीर का धरतोय?
११ यहोवा आज आपल्या काळातही धीराने वागतोय. या दुष्ट जगाचा अंत करण्यासाठी त्याने जो वेळ ठरवलाय त्याची तो धीराने वाट पाहतोय. पण तो धीर का धरतोय? “कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९ वाचा.) मग यहोवाचं वाट पाहणं व्यर्थ आहे का? मुळीच नाही. यहोवाच्या धीरामुळे लाखो लोकांना त्याच्या जवळ यायची संधी मिळाली आहे. आणि आपल्याला खातरी आहे, की आणखी बरेच लोक त्याच्या जवळ येतील. पण याबाबतीत तो कायम वाट पाहत राहणार नाही. त्याचं लोकांवर प्रेम असलं, तरी तो दुष्ट लोकांना कायम हवं तसं वागू देणार नाही. लवकरच तो दुष्टांचा अंत करेल.—हब. २:३.
१२. येशू यहोवासारखा धीर कसा दाखवतोय?
१२ येशू त्याच्या पित्यासारखाच वागतो. हजारो वर्षांपासून, येशू यहोवासारखाच धीर धरतोय. त्याने सैतानाला यहोवावर आणि विश्वासू सेवकांवर चुकीचे आरोप लावताना पाहिलंय. (उत्प. ३:४, ५; ईयो. १:११; प्रकटी. १२:१०) तसंच, त्याने माणसांना हालअपेष्टा सहन करताना पाहिलंय. यामुळे तो “सैतानाची कार्यं उद्ध्वस्त” करायला किती आतुर आहे हे आपण समजू शकतो. (१ योहा. ३:८) पण येशू याबाबतीत धीर दाखवतोय. सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करायची वेळ आली आहे असं यहोवाने सांगेपर्यंत तो धीराने वाट पाहतोय. तो वाट का पाहतोय? कारण तो नम्र आहे. त्याला माहीत आहे, की अंत आणण्याची योग्य वेळ ठरवण्याचा हक्क त्याचा नाही तर यहोवाचा आहे.—प्रे. कार्यं १:७.
१३. येशू धीराने कसं वागला आणि का?
१३ पृथ्वीवर असताना येशू त्याच्या शिष्यांसोबतसुद्धा धीराने वागला. उदाहरणार्थ, त्याचे शिष्य वारंवार आपल्यात श्रेष्ठ कोण या विषयावर वाद घालायचे. पण ते कधीच सुधरणार नाहीत असा येशूने विचार केला नाही. उलट, तो त्यांच्याशी धीराने वागला. (लूक ९:४६; २२:२४-२७) त्याला भरवसा होता, की आज ना उद्या ते नक्की सुधरतील. तुमच्या हातूनसुद्धा एखादी चूक वारंवार घडली आहे का? जर असं असेल, तर तुम्ही खातरी ठेवू शकता, की आपला राजा येशू नम्र असल्यामुळे तुमच्या बाबतीत धीर धरायचं कधीच सोडणार नाही.
१४. आपण आणखी धीर धरायला कसं शिकू शकतो?
१४ आपण यहोवासारखं कसं वागू शकतो? यहोवासारखा विचार करायला आणि वागायला आपल्याला “ख्रिस्ताचं मन” समजून घ्यायची गरज आहे. (१ करिंथ. २:१६) मग आपल्याला ख्रिस्ताचं मन चांगल्या प्रकारे कसं समजून घेता येईल? असं करायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आनंदाच्या संदेशाची पुस्तकं वाचणं. त्यासोबतच त्यांतल्या अहवालांमध्ये येशू कसं वागला आणि तो तसं का वागला, यावर मनन करायला वेळ काढणं. शिवाय, आपल्याला येशूसारखं नम्रपणे विचार करता यावा म्हणून मदतीसाठी आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. ख्रिस्ताचं मन समजून घेतल्यामुळे आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या बाबतीत यहोवासारखा धीर दाखवता येईल.—मत्त. १८:२६-३०, ३५.
यहोवा नम्र लोकांकडे लक्ष देतो
१५. यहोवा नम्र लोकांकडे लक्ष देतो हे कसं कळतं? उदाहरण द्या. (स्तोत्र १३८:६)
१५ स्तोत्र १३८:६ वाचा. यहोवा इतका महान असूनही नम्र लोकांकडे खास लक्ष देतो! जुन्या काळातल्या त्याच्या काही नम्र सेवकांचा विचार करा. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची नावं पटकन आपल्या लक्षात येणार नाहीत. पण यहोवाने त्यांची नावं बायबलमध्ये लिहून ठेवली आहेत. जसं की, यहोवाने मोशेला दबोरा नावाच्या दाईबद्दल लिहून ठेवायला प्रेरित केलं. ती कुलपितांच्या काळात जगली. तिने विश्वासूपणे इसहाक आणि याकोबच्या घराण्यात जवळजवळ १२५ वर्षं सेवा केली. या विश्वासू स्त्रीबद्दल आपल्याला जास्त काही माहीत नसलं, तरी इतरांचं तिच्यावर किती प्रेम होतं याबद्दल यहोवाने बायबलमध्ये लिहून ठेवलं आहे. (उत्प. २४:५९; ३५:८, तळटीप) याच्या बऱ्याच वर्षांनंतर मेंढपाळ असलेल्या दावीदला यहोवाने इस्राएल राष्ट्राचा राजा बनवलं. (२ शमु. २२:१, ३६) येशूच्या जन्माच्या थोड्याच वेळानंतर यहोवाने बेथलेहेममध्ये मसीहाचा जन्म झाल्याची बातमी सगळ्यात आधी नम्र मेंढपाळांना सांगून त्यांना सन्मानित केलं. (लूक २:८-११) तसंच, योसेफ आणि मरीया बाळ येशूला मंदिरात घेऊन गेले, तेव्हा यहोवाने दोन वयस्कर जणांना म्हणजे शिमोन आणि हन्नाला आपल्या मुलाला पाहण्याचा बहुमान दिला. (लूक २:२५-३०, ३६-३८) खरंच, “यहोवा उच्च स्थानावर असूनही, नम्र लोकांकडे लक्ष देतो.”
१६. येशू इतरांशी त्याच्या पित्यासारखाच कसा वागला?
१६ येशू त्याच्या पित्यासारखाच वागतो. येशूनेसुद्धा त्याच्या पित्यासारखंच नम्र लोकांना प्रेम आणि आदर दाखवला. त्याने “अशिक्षित आणि सर्वसाधारण” लोकांना देवाच्या राज्याबद्दलची सत्यं सांगितली. (प्रे. कार्यं ४:१३; मत्त. ११:२५) त्याने आजारी लोकांना फक्त बरंच केलं नाही, तर असं करताना त्याने त्यांना प्रेम आणि आदरही दाखवला. (लूक ५:१३) त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री दासाचं काम करून त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. (योहा. १३:५) तसंच, स्वर्गात जाण्याआधी त्याच्या शिष्यांना एक महत्त्वाचं काम देऊन त्याने त्यांना सन्मानित केलं. ते काम कोणतं होतं? इतरांना सर्वकाळाचं जीवन मिळवायला मदत करणं.—मत्त. २८:१९, २०.
१७. आपण इतरांना प्रेम आणि आदर कसा दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ आपण यहोवासारखं कसं वागू शकतो? आपण लोकांना आनंदाचा संदेश सांगून त्यांना सन्मानित करतो, म्हणजेच त्यांना प्रेम आणि आदर दाखवतो. ते गरीब किंवा श्रीमंत असले, कोणत्याही रंगाचे असले, त्यांचं शिक्षण कितीही झालं असलं तरी आपण त्यांना आनंदाचा संदेश सांगतो. शिवाय, आपल्याला काही गोष्टी आपल्या भाऊबहिणींपेक्षा चांगल्या प्रकारे करता येत असल्या किंवा मंडळीत आपल्याकडे जास्त जबाबदाऱ्या असल्या, तरी आपण आपल्या भाऊबहिणींना प्रेम आणि आदर दाखवतो. (फिलिप्पै. २:३) आपण जेव्हा प्रेम आणि आदर दाखवण्यात ‘पुढाकार घेतो’ तेव्हा आपण यहोवाला खूश करतो.—रोम. १२:१०; सफ. ३:१२.
आपण सगळ्या प्रकारच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगून यहोवासारखी नम्रता दाखवत असतो (परिच्छेद १७ पाहा) a
१८. तुम्हाला यहोवासारखं नम्र का बनावसं वाटतं?
१८ जेव्हा आपण यहोवासारखं नम्र बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लोकांना आपल्याकडे यावंसं वाटतं, आपण समजूतदार असल्याचं दाखवतो आणि आपण आणखी जास्त धीराने वागतो. तसंच, आपण यहोवासारखं इतरांना प्रेम आणि आदर दाखवतो. यात काही शंका नाही, की यहोवा खरंच खूप नम्र आहे. आणि आपणसुद्धा त्याच्यासारखं नम्र बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याच्या नजरेत खूप मौल्यवान ठरतो.—यश. ४३:४.
गीत १५९ यहोवाचा महिमा करा!
a चित्राचं वर्णन: आपल्या बहिणी तुरुंगात कैद्यांना प्रचार करून यहोवासारखी नम्रता दाखवत आहेत.