अभ्यास लेख ४३
गीत ४१ यहोवा माझी प्रार्थना ऐक
एकमेकांसाठी प्रार्थना करा
“नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.”—याको. ५:१६.
या लेखात:
इतरांसाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं का आहे आणि आपण ते कसं करू शकतो ते पाहा.
१. आपल्या प्रार्थना यहोवासाठी मौल्यवान आहेत असं आपण का म्हणू शकतो?
प्रार्थना ही आपल्याला मिळालेली एक अनोखी भेट आहे. जरा विचार करा, यहोवाने स्वर्गदूतांना काही कामं सोपवली आहेत. (स्तो. ९१:११) तसंच, त्याने त्याच्या मुलाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. (मत्त. २८:१८) पण प्रार्थना ऐकण्याची जबाबदारी त्याने कोणालाही सोपवलेली नाही. यहोवा स्वतः आपल्या प्रार्थना ऐकतो. बायबलमध्ये त्याला “प्रार्थना ऐकणारा देव” असं म्हटलंय.—स्तो. ६५:२.
२. इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या बाबतीत आपण पौलकडून काय शिकू शकतो?
२ आपण आपल्या चिंतांबद्दल यहोवाला मन मोकळेपणे प्रार्थना करत असलो, तरी आपण इतरांसाठीसुद्धा प्रार्थना केली पाहिजे. या बाबतीत प्रेषित पौलने एक चांगलं उदाहरण मांडलं. जसं की, त्याने इफिसमधल्या मंडळीला लिहिताना असं म्हटलं: “मी नेहमी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमचा उल्लेख करतो.” (इफिस. १:१६) पौलने आपल्या प्रार्थनेत विशिष्ट भाऊबहिणींचासुद्धा उल्लेख केला. जसं की, त्याने तीमथ्यला म्हटलं: “[देवाचे] मी आभार मानतो आणि रात्रंदिवस त्याला याचना करताना न चुकता तुझी आठवण करतो.” (२ तीम. १:३) पौलला आपल्या जीवनात बऱ्याच समस्या होत्या आणि त्यांबद्दल तो यहोवाला प्रार्थना करायचा. (२ करिंथ. ११:२३; १२:७, ८) तरीसुद्धा, त्याने इतरांसाठी प्रार्थना करायला वेळ काढला.
३. इतरांसाठी प्रार्थना करायचं आपण का विसरू शकतो?
३ कधीकधी आपण इतरांसाठी प्रार्थना करायला विसरू शकतो. असं का होऊ शकतं? सबरीनाa नावाची एक बहीण याचं कारण सांगते. ती म्हणते: “आजकाल आपलं जीवन खूप व्यस्त झालंय आणि कधीकधी आपण आपल्याच समस्यांमध्ये इतके गुरफटून जातो, की आपण फक्त त्यांबद्दल प्रार्थना करतो.” तुमच्या बाबतीतही कधी असं झालंय का? असं असेल, तर या लेखामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. या लेखात आपण पाहू, की इतरांसाठी प्रार्थना करणं का गरजेचं आहे? आणि आपण ती कशी करू शकतो या बाबतीत काही व्यावहारिक मार्गही आपण पाहू या.
इतरांसाठी प्रार्थना का करावी?
४-५. इतरांसाठी केलेल्या प्रार्थनेत “खूप ताकद असते” असं आपण का म्हणू शकतो? (याकोब ५:१६)
४ इतरांसाठी केलेल्या प्रार्थनेत “खूप ताकद असते.” (याकोब ५:१६ वाचा.) इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे खरंच काही फायदा होतो का? हो नक्कीच! येशूला माहीत होतं, की प्रेषित पेत्र लवकरच त्याला नाकारणार आहे. म्हणून येशूने त्याला म्हटलं: “तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे.” (लूक २२:३२) इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे खूप जबरदस्त परिणाम घडून येतात ही गोष्ट पौललासुद्धा माहीत होती. म्हणून जेव्हा तो रोममध्ये कैदेत होता तेव्हा त्याने फिलेमोनला असं लिहिलं: “तुमच्या प्रार्थनांप्रमाणे मी तुमच्याकडे परत येईन अशी आशा मी बाळगतो.” (फिले. २२) आणि नेमकं तसंच घडलं! पौलची लवकरच कैदेतून सुटका झाली आणि तो पुन्हा प्रचार काम करू लागला.
५ पण याचा अर्थ असा नाही, की आपण प्रार्थना करून यहोवाला एखादी गोष्ट करायला भाग पाडू शकतो. आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो त्या आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे त्याला चांगलं माहीत असतं. आणि कधीकधी तो आपण केलेल्या मागण्या पूर्ण करायचं निवडतो. त्यामुळे आपण मनापासून यहोवाला एखाद्या गोष्टीबद्दल प्रार्थना करू शकतो आणि तो त्याच्या योग्य वेळी प्रार्थनेचं उत्तर देईल हा भरवसा बाळगू शकतो.—स्तो. ३७:५; २ करिंथकर १:११
६. इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे कोणते फायदे होतात? (१ पेत्र ३:८)
६ इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे एकमेकांबद्दलचा “जिव्हाळा” वाढतो. (१ पेत्र ३:८ वाचा.) ज्या व्यक्तीमध्ये जिव्हाळा किंवा आपुलकी असते ती व्यक्ती इतर जण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत या गोष्टीकडे लक्ष देते आणि म्हणून तिला त्यांना मदत करावीशी वाटते. (मार्क १:४०, ४१) मायकल नावाचा एक वडील असं म्हणतो: “मी इतरांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतो, तेव्हा ते तोंड देत असलेल्या समस्यांची मला आणखी जाणीव होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणखी वाढतं. त्यांना जरी या गोष्टीची जाणीव नसली, तरी मला त्यांच्या आणखी जवळ असल्यासारखं वाटतं.” इतरांसाठी प्रार्थना करायच्या फायद्याबद्दल रिचर्ड नावाचा आणखी एक वडील असं म्हणतो: “आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यांना मदत करायची आपली इच्छा आणखी वाढते. ज्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करतोय तिला मदत करायला आपण जेव्हा एखादं पाऊल उचलतो, तेव्हा एका अर्थाने यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत असतो.”
७. इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला आपल्या समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला कशी मदत होते? (फिलिप्पैकर २:३, ४) (चित्रंसुद्धा पाहा.)
७ इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे समस्या असतानाही आपल्या परिस्थितीबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला आपल्याला मदत होते. (फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.) हे जग सैतानाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या न् कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:१२) आपण जेव्हा इतरांसाठी प्रार्थना करायची सवय लावतो, तेव्हा आपल्याला १ पेत्र ५:९ मधले शब्द लक्षात ठेवायला मदत होते. तिथे असं म्हटलंय: “संपूर्ण जगातले तुमचे बांधव अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.” पायनियर असलेली आपली बहीण कॅथरीन असं म्हणते: “इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे मला ही गोष्ट लक्षात ठेवायला मदत होते, की फक्त मी नाही तर इतर जणही कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे, मी माझ्याच समस्यांवर गरजेपेक्षा जास्त विचार करत बसत नाही.”
इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला आपल्या समस्यांकडे योग्य दृष्टीकोनातून पाहायला मदत होते (परिच्छेद ७ पाहा) d
त्यांना आपल्या प्रार्थनांची गरज का आहे?
८. आपण कोणाकोणासाठी प्रार्थना करू शकतो?
८ आपण कोणाकोणासाठी प्रार्थना करू शकतो? आपण आजारी भाऊबहिणींसाठी आणि शाळेत दबावाचा आणि थट्टेचा सामना करणाऱ्या साक्षीदारांच्या मुलांसाठी प्रार्थना करू शकतो. तसंच, आपण वयस्कर भाऊबहिणींसाठीही प्रार्थना करू शकतो. याशिवाय, बऱ्याच भाऊबहिणींना घरच्यांच्या किंवा सरकाराच्या विरोधाचा सामना करावा लागतो. (मत्त. १०:१८, ३६; प्रे. कार्यं १२:५) काही भाऊबहिणींना राजकीय अशांततेमुळे आपली घरं सोडून दुसरीकडे जावं लागलंय. तर इतरांना नैसर्गिक विपत्तींचा सामना करावा लागलाय. आपण जरी या भाऊबहिणींना ओळखत नसलो, तरी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. असं केल्यामुळे आपण “एकमेकांवर प्रेम करा” ही येशूने दिलेली आज्ञा पाळत असतो.—योहा. १३:३४.
९. आपण यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या भावांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रार्थना का केली पाहिजे?
९ आपण यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या भावांसाठीसुद्धा प्रार्थना करू शकतो. जसं की, आपण नियमन मंडळासाठी आणि त्यांच्या सहायकांसाठी, शाखा समितीमध्ये काम करणाऱ्या भावांसाठी आणि शाखा कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून सेवा करणाऱ्यांसाठी प्रार्थना करू शकतो. त्यासोबतच आपण विभागीय पर्यवेक्षकांसाठी, मंडळीतल्या वडिलांसाठी आणि सहायक सेवकांसाठीसुद्धा प्रार्थना करू शकतो. हे भाऊ आपल्यासाठी खूप मेहनत घेतात. पण आपण हे विसरू नये, की त्यांच्या जीवनातही समस्या असतात. (२ करिंथ. १२:१५) विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करणारा आपला भाऊ मार्क असं म्हणतो: “माझ्या सेवेमुळे मला नेहमी माझ्या आईवडिलांसोबत राहता येत नाही. म्हणून मला त्यांच्या वाढत्या वयाची चिंता वाटते. तसंच, त्यांची तब्येतही खराब असते. माझी बहीण आणि तिचा पती जरी त्यांची काळजी घेत असले, तरी मी त्यांच्यासाठी हवं तितकं करू शकत नाही या गोष्टीमुळे मला वाईट वाटतं.” मेहनत करणाऱ्या आपल्या या जबाबदार भावांच्या चिंतांबद्दल, किंवा समस्यांबद्दल आपल्याला माहीत असलं किंवा नसलं, तरी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहू शकतो. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) तसंच, आपण त्यांच्या पत्नींसाठीसुद्धा प्रार्थना करू शकतो. कारण त्यांच्या मदतीमुळेच हे भाऊ आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात.
१०-११. एकाच वेळी बऱ्याच भाऊबहिणींसाठी केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकतो का? स्पष्ट करा.
१० आतापर्यंत आपण चर्चा केली त्याप्रमाणे आपण एकाच वेळी बऱ्याच भाऊबहिणींसाठी प्रार्थना करू शकतो. जसं की, जे भाऊबहीण तुरुंगात आहेत किंवा ज्यांनी आपल्या जवळच्यांना मृत्यूत गमावलंय अशा सगळ्यांना यहोवाने मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करू शकतो. अशा प्रार्थना करताना आपण कदाचित एका विशिष्ट भावाचा किंवा बहिणीचा विचार करणार नाही, तर सगळ्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करू. डोनाल्ड नावाचा एक वडील असं म्हणतो: “आपले पुष्कळ भाऊबहीण समस्यांना तोंड देत असतात. त्यामुळे आम्ही कधीकधी अशा सगळ्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करतो.”
११ यहोवा अशा प्रार्थना ऐकतो का? हो नक्कीच. कारण आपले भाऊबहीण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे आपल्याला नेहमीच माहीत नसतं. म्हणून आपण एकाच वेळी अशा सगळ्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करू शकतो. (योहा. १७:२०; इफिस. ६:१८) खरंतर अशा प्रकारच्या प्रार्थनांमुळे, आपलं “संपूर्ण बंधूसमाजावर प्रेम” आहे ही गोष्ट सिद्ध होते.—१ पेत्र २:१७.
एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
१२. भाऊबहिणींच्या गरजांकडे लक्ष दिल्यामुळे त्यांच्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना करायला आपल्याला कशी मदत होईल?
१२ भाऊबहिणींच्या गरजांकडे लक्ष द्या. एकाच वेळी बऱ्याच भाऊबहिणींसाठी प्रार्थना करण्यासोबतच, आपण एखाद्याचं नाव घेऊनसुद्धा प्रार्थना करू शकतो. तुमच्या मंडळीत एखाद्याला गंभीर आजार झालाय का? किंवा एखादं मूल शाळेत दबावाचा सामना करत असल्यामुळे निराश झालंय का? किंवा मग मुलांचा एकट्याने सांभाळ करत असलेल्या एखाद्या पालकाला आपल्या मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवणं कठीण जातंय का? (इफिस. ६:४) आपण जर आपल्या भाऊबहिणींकडे लक्ष दिलं तर त्यांच्याबद्दलच आपलं प्रेम आणखी वाढेल आणि यामुळे त्यांच्यासाठी प्रार्थना करायला आपल्याला प्रोत्साहन मिळेल.b—रोम. १२:१५.
१३. आपण ज्या भाऊबहिणींना वैयक्तिकरित्या ओळखत नाही त्यांच्यासाठीसुद्धा आपण कशी प्रार्थना करू शकतो?
१३ नाव घेऊन प्रार्थना करा. आपण जरी आपल्या भाऊबहिणींना भेटलो नसलो, तरी आपण त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करू शकतो. उदाहरणार्थ, क्रिमिया, इरिट्रिया, रशिया आणि सिंगापूर अशा देशांमध्ये तुरुंगात असलेल्या भाऊबहिणींसाठी आपण प्रार्थना करू शकतो. आपल्याला त्यांची नावं jw.org या आपल्या वेबसाईटवर मिळतील.c विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करणारा ब्रायन असं म्हणतो: “तुरुंगात असलेल्या आपल्या भाऊबहिणींची नावं मी लिहून काढतो आणि ती मोठ्याने वाचतो. त्यामुळे माझ्या वैयक्तिक प्रार्थनेत त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करायला मला मदत होते.”
१४-१५. आपण भाऊबहिणींच्या विशिष्ट गरजांसाठी प्रार्थना कशी करू शकतो?
१४ विशिष्ट गरजांसाठी प्रार्थना करा. आधी उल्लेख केलेला मायकल असं म्हणतो: “मी जेव्हा आपल्या वेबसाईटवर तुरुंगात असलेल्या भावांबद्दल वाचतो, तेव्हा मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांना कसं वाटत असेल या गोष्टीचा विचार करतो. जर मी त्यांच्या जागी तुरुंगात असतो, तर मला नक्कीच माझ्या बायकोची काळजी वाटली असती. तिच्या गरजा पूर्ण होत आहेत की नाहीत या गोष्टीचीही मला चिंता वाटली असती. अशा प्रकारे विचार केल्यामुळे, तुरुंगात असलेल्या विवाहीत भावांच्या नेमक्या गरजा काय असतील, हे मला कळतं आणि त्याबद्दल मी प्रार्थना करतो.”—इब्री १३:३, तळटीप
१५ तुरुंगामध्ये असलेल्या आपल्या भावांना रोज कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी हे समजतं. उदाहरणार्थ, तुरुंगातल्या सुरक्षा रक्षकांनी भावांसोबत प्रेमाने वागावं आणि अधिकार पदावर असलेल्या लोकांनी आपल्या भावांना उपासना करायची मोकळीक द्यावी, या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करू शकतो. (१ तीम. २:१, २) तसंच, तुरुंगातल्या भावांनी दाखवलेल्या मजबूत विश्वासामुळे त्यांच्या मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळावं यासाठीसुद्धा आपण प्रार्थना करू शकतो. शिवाय, भावांच्या चांगल्या उदाहरणामुळे इतरांनीसुद्धा राज्याचा संदेश स्वीकारावा यासाठीही आपण प्रार्थना करू शकतो. (१ पेत्र २:१२) हीच गोष्ट कठीण परिस्थितींचा सामना करत असलेल्या आपल्या इतर भाऊबहिणींसाठीसुद्धा आपण लागू करू शकतो. आपण जेव्हा भाऊबहिणींच्या गरजांकडे लक्ष देतो, त्यांची नावं घेऊन प्रार्थना करतो आणि त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण दाखवतो, की आपलं एकमेकांबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत आहे.—१ थेस्सलनी. ३:१२.
प्रार्थना करताना आणखी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
१६. प्रार्थना करताना आपण आणखी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? (मत्तय ६:८)
१६ आपण आतापर्यंत पाहिलं की आपल्या प्रार्थनेमुळे इतरांना मदत होऊ शकते. पण प्रार्थना करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा त्याला एखादी गोष्ट माहीत नाही अशा प्रकारे आपण त्याला सांगू नये. तसंच, एखादी परिस्थिती कशी हाताळावी याबाबतीत सल्ला दिल्यासारखंसुद्धा आपण त्याच्याशी बोलू नये. कारण, आपल्याला ‘कशाची गरज आहे हे आपण मागायच्या आधीच यहोवाला माहीत असतं.’ (मत्तय ६:८ वाचा.) मग आपण इतरांसाठी प्रार्थना का करावी? याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे, आपल्याला इतरांची काळजी आहे. तसंच, आपलं एकमेकांवर प्रेम असल्यामुळे आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो. आपल्या सेवकांचं हे प्रेम पाहून यहोवाला खूप आनंद होतो.
१७-१८. आपण एकमेकांसाठी प्रार्थना का केली पाहिजे हे उदाहरण देऊन समजावून सांगा.
१७ कधीकधी आपल्याला वाटेल, की आपल्या प्रार्थनांमुळे भाऊबहिणींची परिस्थिती बदलत नाही. पण तरीसुद्धा आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आपलं त्यांच्यावर असलेलं प्रेम दिसून येतं आणि यहोवासुद्धा या गोष्टीकडे लक्ष देतो. ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. एका कुटुंबाचा विचार करा. त्या कुटुंबातला मुलगा एक दिवशी खूप आजारी पडतो. तेव्हा त्याची छोटी बहीण तिच्या वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणते: “पप्पा, दादा खूप आजारी आहे. काहीतरी करा ना!” खरंतर, पुढे काय करायचं हे तिच्या वडिलांना माहीत आहे. शिवाय, त्यांचं आपल्या मुलावर प्रेम असल्यामुळे ते त्याची चांगली काळजी घेत आहेत. पण तरी, आपल्या मुलीला तिच्या भावाची किती काळजी आहे हे पाहून तिच्या वडिलांना खूप आनंद होतो.
१८ अगदी तसंच, आपण एकमेकांची काळजी घ्यावी आणि एकमेकांसाठी प्रार्थना करावी असं यहोवाला वाटतं. आपण जेव्हा एकमेकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा हे दिसून येतं, की आपल्याला फक्त आपलीच नाही तर इतरांच्या गरजांचीही काळजी आहे आणि यहोवा ही गोष्ट कधीच विसरत नाही. (२ थेस्सलनी. १:३; इब्री ६:१०) तसंच, या लेखात आपण पाहिलं की आपल्या प्रार्थनेमुळे कधीकधी इतरांची परिस्थितीसुद्धा बदलू शकते. म्हणून, आपण नेहमी एकमेकांसाठी प्रार्थना करत राहू या.
गीत १०१ एकता जपू या
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b jw.org वर तकाशी शिमीझू: यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे हा व्हिडिओ पाहा.
c तुरुंगात असलेल्या आपल्या भाऊबहिणींची नावं जाणून घेण्यासाठी jw.org (इंग्रजी) वर “जेहोवाज विटनेसेस इंप्रीजन्ड फॉर देअर फेथ—बाय लोकेशन” असं शोधा.
d चित्राचं वर्णन: समस्यांचा सामना करत असलेले भाऊबहीण इतर भाऊबहिणींसाठी प्रार्थना करत आहेत.