वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 ऑक्टोबर पृ. १८-२३
  • यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मनमोकळेपणे प्रार्थना करा
  • आपण मनमोकळेपणे प्रार्थना कशी करू शकतो?
  • बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांचा विचार करा
  • प्रार्थना करून यहोवाच्या आणखी जवळ या
  • एकमेकांसाठी प्रार्थना करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 ऑक्टोबर पृ. १८-२३

अभ्यास लेख ४२

गीत ४४ दीन माणसाची प्रार्थना

यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना करा

“मी पूर्ण मनाने हाक मारतोय. हे यहोवा, मला उत्तर दे.”—स्तो. ११९:१४५.

या लेखात:

बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांवर विचार केल्यामुळे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना करायला कशी मदत होऊ शकते, ते पाहा.

१-२. (क) यहोवाला मनापासून प्रार्थना करणं काहींना कठीण का जाऊ शकतं? (ख) यहोवा आपल्या प्रार्थना लक्ष देऊन ऐकतो असं आपण कशावरून म्हणू शकतो?

तुम्हाला कधी असं वाटलंय का, की तुमच्या प्रार्थना रटाळवाण्या झाल्या आहेत किंवा तुम्ही त्या करायच्या म्हणून करताय, आणि त्या मनापासूनसुद्धा येत नाहीत? असं असेल, तर तुम्ही एकटे नाहीत. आज सगळ्यांचं जीवन धावपळीचं असल्यामुळे आपण कधीकधी गडबडीत प्रार्थना करतो आणि मनापासून प्रार्थना करायला वेळ काढायचं विसरून जातो. शिवाय, यहोवाला आपल्या भावना सांगणं काहींना कठीण जात असेल. कारण आपण त्याच्याशी बोलायच्या लायक नाही असं त्यांना वाटत असेल.

२ बायबलमधून आपल्याला कळतं, की आपल्या प्रार्थना लांबलचक असाव्यात असं यहोवाला वाटत नाही, तर आपण मनापासून आणि नम्रपणे प्रार्थना कराव्यात असं त्याला वाटतं. कारण तो “नम्र लोकांची विनंती” ऐकतो. (स्तो. १०:१७) आपण प्रार्थनेत त्याच्याशी बोललेला शब्द न्‌ शब्द तो ऐकतो. कारण त्याला आपली काळजी आहे.—स्तो. १३९:१-३.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ या लेखात आपण चार प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: आपण यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना का करू शकतो? आपल्याला ती कशी करता येईल? बायबलमध्ये दिलेल्या विश्‍वासू सेवकांच्या प्रार्थनांवर विचार केल्यामुळे आपल्याला आपल्या प्रार्थनेचा दर्जा वाढवायला कशी मदत होईल? चिंतेमुळे आपल्याला यहोवाशी बोलायला शब्दच सुचत नसतील, तर आपण काय करू शकतो?

मनमोकळेपणे प्रार्थना करा

४. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला यहोवाशी मनमोकळेपणे बोलायला मदत होईल? (स्तोत्र ११९:१४५)

४ आपल्याला जेव्हा जाणवतं की यहोवा आपला खरा मित्र आहे आणि तो नेहमी आपल्या भल्याचा विचार करतो, तेव्हा आपण मनमोकळेपणे त्याला प्रार्थना करायला प्रवृत्त होतो. स्तोत्र ११९ च्या लेखकालासुद्धा असंच वाटलं. त्याच्या जीवनात बऱ्‍याच समस्या होत्या. काही लोक त्याच्याशी खूप चुकीचं वागले. (स्तो. ११९:२३, ६९, ७८) तसंच, त्याला त्याच्या कमतरतांशीसुद्धा झगडावं लागलं. (स्तो. ११९:५) असं असलं तरी तो यहोवाशी मनमोकळेपणे बोलायला घाबरला नाही.—स्तोत्र ११९:१४५ वाचा.

५. दोषीपणाच्या भावनेमुळे आपण प्रार्थना करायला का कचरू नये? उदाहरण द्या.

५ यहोवा गंभीर पाप करणाऱ्‍यांनासुद्धा प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. (यश. ५५:६, ७) म्हणून दोषीपणाच्या भावनेमुळे आपण प्रार्थना करण्यापासून स्वतःला रोखू नये. हे समजायला एक उदाहरण घ्या. समजा, तुम्ही एका नवीन ठिकाणी फिरायला गेला आहात. तिथे तुम्ही हरवता किंवा रस्ता चुकता. पण तिथेच राहणारा एक माणूस रस्ता शोधायला तुम्हाला मदत करू शकतो. मग तुम्ही हरवला आहात याची लाज वाटत असल्यामुळे तुम्ही त्या माणसाकडे मदत मागायला कचराल का? मुळीच नाही! त्याच प्रकारे, आपल्या हातून एखादं पाप घडलं किंवा आपण जीवनात वाट चुकलो तरीही आपण यहोवाशी मनमोकळेपणे बोलू शकतो.—स्तो. ११९:२५, १७६.

आपण मनमोकळेपणे प्रार्थना कशी करू शकतो?

६-७. यहोवाच्या गुणांवर विचार केल्यामुळे आपल्याला मनमोकळेपणे यहोवाला प्रार्थना करायला कशी मदत होईल? उदाहरण द्या. (तळटीपसुद्धा पाहा.)

६ मनमोकळेपणे यहोवाला प्रार्थना करणं म्हणजे, आपल्याला नेमकं कसं वाटतंय हे त्याला स्पष्टपणे सांगणं आणि आपल्या मनातल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर व्यक्‍त करणं. मग अशा प्रकारे प्रार्थना करण्यासाठी आपण काय करू शकतो?

७ यहोवाच्या गुणांचा विचार करा.a आपण जितकं जास्त यहोवाच्या गुणांवर विचार करू, तितकं जास्त आपल्याला त्याच्याशी मनमोकळेपणे बोलता येईल. (स्तो. १४५:८, ९, १८) आपली बहीण क्रिस्टीन हिच्या अनुभवाचा विचार करा. तिचे वडील अतिशय रागीट स्वभावाचे होते. ती म्हणते: “यहोवाला एक पिता समजणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. म्हणून मी त्याच्याशी मनमोकळेपणे बोलू शकत नव्हते. मला अशी भीती होती की माझ्या कमतरतांमुळे यहोवा मला सोडून देईल.” मग यहोवाच्या कोणत्या गुणावर मनन केल्यामुळे तिला मदत झाली? ती म्हणते: “यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमावर मी विचार केला. त्यामुळे मला खूप सुरक्षित वाटलं. मला समजलं, की यहोवा माझा हात कधीच सोडणार नाही. मी अडखळले तरी तो मला सावरेल. म्हणून मी आनंदी असो किंवा दुःखी असो, मी माझ्या सगळ्या भावना मनमोकळेपणे यहोवाला सांगू शकते.”

८-९. प्रार्थना करण्याआधी आपण नेमकं काय बोलणार याचा विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? समजावून सांगा.

८ तुम्ही काय बोलाल याचा विचार करा. प्रार्थना करण्याआधी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘सध्या मी कोणत्या समस्यांना तोंड देतोय? असं कोणी आहे का, ज्याला माफ करणं मला कठीण जातंय? माझ्यासमोर असं एखादं नवीन आव्हान आहे का, ज्याचा सामना करायला मला यहोवाच्या मदतीची गरज आहे?’ (२ राजे १९:१५-१९) याशिवाय, येशूने आपल्याला ज्या प्रकारे प्रार्थना करायला शिकवली त्याचा आपण विचार करू शकतो. तसंच, यहोवाच्या नावाबद्दल, त्याच्या राज्याबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल प्रार्थनेत काय बोलता येईल याचासुद्धा आपण विचार करू शकतो.—मत्त. ६:९, १०.

९ आलिस्का नावाच्या बहिणीच्या नवऱ्‍याला जीवघेणा कॅन्सर झाला होता. तिच्यावर आलेल्या या समस्येमुळे प्रार्थना करणं तिला कठीण जात होतं. ती म्हणते: “मी दुःखात इतकी बुडून गेले होते, की प्रार्थनेत नेमकं काय बोलावं हे मला सुचायचं नाही.” मग तिला कशामुळे मदत झाली? ती पुढे म्हणते: “प्रार्थना करण्याआधी, मी काय बोलणार याचा विचार करते. यामुळे मी प्रार्थनेत फक्‍त माझ्याबद्दल आणि माझ्या नवऱ्‍याच्या आजाराबद्दल बोलत नाही. असं केल्यामुळे माझं मन शांत होतं आणि मला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल यहोवाशी बोलता येतं.”

१०. आपण प्रार्थना करायला पुरेसा वेळ का दिला पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)

१० प्रार्थना करायला पुरेसा वेळ द्या. हे खरंय की आपण छोट्या प्रार्थनेतही मनमोकळेपणे यहोवाशी बोलू शकतो. पण असं असलं तरी आपण जेव्हा प्रार्थना करायला जास्त वेळ देतो, तेव्हा आपण आपले विचार स्पष्टपणे यहोवाला सांगू शकतो.b अलिस्काचा नवरा एलायजा असं म्हणतो: “मी दिवसातून बऱ्‍याचदा यहोवाला प्रार्थना करतो. प्रार्थना करायला पुरेसा वेळ दिल्यामुळे मी यहोवाच्या आणखी जवळ आलोय. मला माहितीए, की माझी प्रार्थना कधी संपेल याची यहोवा वाट पाहत नाही. म्हणून प्रार्थना करायाला मला पुरेसा वेळ देता येतो.” हे करून पाहा: प्रार्थना करताना तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि तुम्ही मोठ्याने प्रार्थना करू शकाल अशी एखादी वेळ आणि जागा निवडा. मग नियमितपणे अशा प्रकारे प्रार्थना करायची सवय लावून घ्या.

कोलाज: १. सूर्योदय होण्याआधी एक भाऊ मनन करतोय. त्याच्यासमोर बायबल आणि त्याच्या हातात कॉफीचा कप आहे. २. सूर्योदय झाल्यानंतरही, तो भाऊ तिथेच बसून प्रार्थना करतोय.

अशी वेळ आणि जागा निवडा जिथे तुम्हाला प्रार्थनेसाठी पुरेसा वेळ देता येईल (परिच्छेद १० पाहा)


बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांचा विचार करा

११. बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांवर मनन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (“तुम्हालाही त्यांच्यासारखंच वाटतं का?” ही चौकटसुद्धा पाहा.)

११ बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थना, स्तुतीगीतं आणि स्तोत्रं यांवर मनन केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. यहोवाच्या सेवकांनी त्यांच्या मनातले विचार प्रार्थनेत कशा प्रकारे व्यक्‍त केले, हे समजल्यामुळे तुम्हालासुद्धा मनमोकळेपणे यहोवाला प्रार्थना करायची प्रेरणा मिळेल. या सेवकांनी त्यांच्या प्रार्थनेत यहोवाच्या स्तुतीसाठी वापरलेले शब्द तुम्हालासुद्धा तुमच्या प्रार्थनेत वापरता येतील. तसंच, तुमच्या परिस्थितीला लागू होतील अशा प्रार्थनाही तुम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळतील.

तुम्हालाही त्यांच्यासारखंच वाटतं का?

देवाच्या सेवकांनी वेगवेगळ्या परिस्थितीत मनमोकळेपणे त्याला प्रार्थना केली. तुम्हालाही कधी त्यांच्यासारखंच वाटलंय का?

  • याकोब जेव्हा तणावात होता, तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली. आणि तो यहोवाचा किती आभारी आहे, तसंच त्याचा यहोवावर किती विश्‍वास आहे हे त्याने त्याला सांगितलं.—उत्प. ३२:९-१२.

  • शलमोन राजा तरुण असताना यहोवाने त्याला एक मोठी जबाबदारी सोपवली. त्यामुळे तो खूप भारावून गेला होता. म्हणून त्याने यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली.—१ राजे ३:७-९.

  • बथशेबाशी व्यभिचार केल्यावर दावीदने यहोवाला त्याच्यात “शुद्ध मन उत्पन्‍न” करायची विनंती केली.—स्तो. ५१:९-१२.

  • मरीयाला जेव्हा एक खास जबाबदारी मिळाली तेव्हा तिने यहोवाची स्तुती केली.—लूक १:४६-४९.

अभ्यासासाठी विषय: देवाच्या एखाद्या सेवकाची प्रार्थना वाचा. मग स्वतःला विचारा: तो यहोवाला प्रार्थनेत काय बोलला आणि तो असं का बोलला? मग शिकलेल्या गोष्टी लागू करा.

१२. बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांवर विचार केल्यानंतर तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता?

१२ बायबलमध्ये दिलेल्या प्रार्थनांवर विचार केल्यानंतर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘हे शब्द कोणाचे आहेत? तो हे कोणत्या परिस्थितीत बोलला? त्याने ही प्रार्थना केली तेव्हा त्याच्या भावना माझ्यासारख्याच होत्या का? मी त्यातून काय शिकू शकतो?’ या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी कदाचित तुम्हाला संशोधन करावं लागेल. पण यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही याची खातरी बाळगा. चला याची काही उदाहरणं पाहू या.

१३. हन्‍नाच्या प्रार्थनेतून आपण काय शिकू शकतो? (१ शमुवेल १:१०, ११) (चित्रसुद्धा पाहा.)

१३ १ शमुवेल १:१०, ११ वाचा. जेव्हा हन्‍नाने ही प्रार्थना केली, तेव्हा ती दोन मोठ्या समस्यांचा सामना करत होती. पहिली म्हणजे, ती वांझ होती आणि दुसरी म्हणजे, तिच्या सवतीने तिचं जगणं मुश्‍कील केलं होतं. (१ शमु. १:४-७) जर तुम्हीही बऱ्‍याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करत असाल, तर तुम्हाला हन्‍नाच्या प्रार्थनेतून काय शिकायला मिळेल? हन्‍नाने प्रार्थना करायला पुरेसा वेळ दिला आणि तिचं सगळं ओझं यहोवावर टाकून दिलं आणि त्यामुळे तिला सांत्वन मिळालं. (१ शमु. १:१२, १८) अगदी तसंच, कठीण प्रसंगांना तोंड देत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे यहोवाला सांगा. असं करून तुम्ही तुमचं ‘सगळं ओझं यहोवावर टाकून देऊ’ शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल.—स्तो. ५५:२२.

कोलाज: १. एलकाना त्याच्या दोन मुलांसोबत खेळत असताना हन्‍ना अक्षरशः रडत दुसरीकडे पाहत आहे. २. पनिन्‍नाने तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आनंदाने जवळ घेतलंय. ३. हन्‍ना रडत-रडत अगदी मनापासून प्रार्थना करत आहे. ४. महायाजक एली हाताची घडी घालून हन्‍नाकडे वैतागून बघत बसलाय.

हन्‍नाने यहोवासमोर तिचं मन मोकळं केलं कारण ती वांझ होती आणि तिची सवत तिला सतत टोमणे मारायची (परिच्छेद १३ पाहा)


१४. (क) हन्‍नाच्या उदाहरणातून आपण आणखी काय शिकू शकतो? (ख) आपल्या प्रार्थनांचा दर्जा वाढवण्यासाठी बायबलमधल्या प्रार्थनांमुळे आपल्याला कशी मदत होईल? (तळटीप पाहा.)

१४ शमुवेलच्या जन्माच्या काही वर्षांनंतर त्याची आई हन्‍ना त्याला महायाजक एलीकडे घेऊन गेली. (१ शमु. १:२४-२८) त्या वेळी तिने जी प्रार्थना केली त्यात तिने यहोवा त्याच्या एकनिष्ठ सेवकांची काळजी घेतो आणि त्यांना सांभाळतो यावरचा तिचा भरवसा व्यक्‍त केला.c (१ शमु. २:१, ८, ९) हन्‍नाच्या जीवनातल्या सगळ्या समस्या अजूनही सुटल्या नव्हत्या. पण तरी तिने त्यांवर लक्ष न लावता यहोवाने तिला ज्या प्रकारे आशीर्वाद दिला त्याकडे लावलं. मग आपण यातून काय शिकू शकतो? यहोवाने आपल्याला आतापर्यंत कशी मदत केली यावर जर आपण लक्ष लावलं, तर आपल्याला आत्ताच्या समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करायला मदत होईल.

१५. जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण यिर्मया संदेष्याच्या प्रार्थनेतून काय शिकू शकतो? (यिर्मया १२:१)

१५ यिर्मया १२:१ वाचा. यिर्मया संदेष्ट्याच्या जीवनातसुद्धा समस्या आल्या. दुष्ट लोकांची भरभराट पाहून त्याला चिड आली. तसंच, इस्राएली लोकांनी त्याला जी वाईट वागणूक दिली त्यामुळे तो निराश झाला. (यिर्म. २०:७, ८) यिर्मयाने यहोवासमोर त्याचा राग व्यक्‍त केला, तरी त्याने त्याच्या न्यायावर शंका घेतली नाही. वाईत लोकांना यहोवाने कशा प्रकारे शिक्षा दिली हे पाहून यहोवा न्यायी आहे या गोष्टीवरचा त्याचा विश्‍वास आणखी वाढला. (यिर्म. ३२:१९) मग यिर्मयाकडून आपण काय शिकू शकतो? आज आपणसुद्धा वाईट लोकांची भरभराट होताना पाहतो किंवा लोक आपल्याशी वाईट वागतात. अशा वेळी आपणही आपल्या भावना मनमोकळेपणे यहोवाला सांगू शकतो आणि असा भरवसा ठेवू शकतो की यहोवा त्याच्या ठरवलेल्या वेळी अन्याय काढून टाकेल.

१६. बंदिवासात असलेल्या लेव्याच्या प्रार्थनेतून आपण काय शिकू शकतो? (स्तोत्र ४२:१-४) (चित्रंसुद्धा पाहा.)

१६ स्तोत्र ४२:१-४ वाचा. हे गीत बंदिवासात असलेल्या एका लेव्याने लिहिलं होतं. बंदिवासात असल्यामुळे तो इतर इस्राएली भाऊबहिणींना भेटू शकत नव्हता. त्याला नेमकं कसं वाटत होतं हे त्याने लिहिलेल्या स्तोत्रातून आपल्याला कळतं. कदाचित तुम्हाला तुमच्या विश्‍वासामुळे तुरुंगात टाकलं असेल किंवा आजारपणामुळे घराबाहेर पडणं तुम्हाला शक्य नसेल. अशा वेळी तुम्हालाही त्या लेव्यासारखं वाटू शकतं. कदाचित एका क्षणी तुम्हाला बरं वाटेल आणि दुसऱ्‍याच क्षणी तुम्ही निराश व्हाल. पण असं असलं तरी यहोवाशी बोलल्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांचं परिक्षण करायला मदत होईल आणि योग्य दृष्टीकोनसुद्‌घा ठेवता येईल. त्या लेव्यानेही जेव्हा प्रार्थना केली तेव्हा त्याला जाणवलं की त्याच्याकडे यहोवाची स्तुती करायच्या नवीन संधी आहेत. (स्तो. ४२:५) यासोबतच, यहोवाने त्याची आतापर्यंत कशी काळजी घेतली याचाही त्याने विचार केला. (स्तो. ४२:८) यहोवाला मनापासून प्रार्थना केल्यामुळे तुमच्या मनात अमुक एखादी भावना का बरं येते हे समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल. तसंच, तुम्हाला मनाची शांती मिळेल आणि धीर धरायला मदत होईल.

कोलाज:१. एक लेवी ओसाड रानात मनापासून प्रार्थना करतोय. २. एक वयस्कर भाऊ हॉस्पिटलच्या बेडवर बसून प्रार्थना करतोय. त्याच्या मांडीवर बायबल आहे.

स्तोत्र ४२ लिहिणाऱ्‍या लेव्याने यहोवाला मनापासून प्रार्थना केली. आपणही जर आपल्या भावना यहोवाला सांगितल्या तर आपल्याला योग्य दृष्टीकोन बाळगायला मदत होईल (परिच्छेद १६ पाहा)


१७. (क) योना संदेष्ट्याने केलेल्या प्रार्थनेतून आपण काय शिकू शकतो? (योना २:१, २) (ख)स्तोत्रातली काही वचनं लक्षात ठेवल्यामुळे कठीण परिस्थितीतून जाताना आपल्याला कशी मदत होईल? (तळटीप पाहा.)

१७ योना २:१, २ वाचा. योना संदेष्ट्याने माशाच्या पोटात असताना प्रार्थना केली. त्याने जरी यहोवाची आज्ञा मोडली असली तरी त्याला माहीत होतं की यहोवा त्याची प्रार्थना नक्की ऐकेल. त्याने प्रार्थनेत स्तोत्रातल्या बऱ्‍याच शब्दांचा उल्लेख केला.d यावरून समजतं की त्याला ती स्तोत्रं चांगल्या प्रकारे माहीत असावीत. त्या स्तोत्रांवर विचार केल्यामुळे त्याला खातरी पटली की यहोवा त्याला मदत करेल. अगदी तसंच, आपणसुद्धा बायबलची वचनं तोंडपाठ केली तर कठीण परिस्थितीत प्रार्थना करताना ती वचनं आपल्याला आठवतील आणि आपल्याला सांत्वन मिळेल.

प्रार्थना करून यहोवाच्या आणखी जवळ या

१८-१९. प्रार्थना करताना जर आपल्याला शब्द सुचत नसतील तर रोमकर ८:२६, २७ मधून आपल्याला कोणती खातरी मिळते? उदाहरण द्या.

१८ रोमकर ८:२६, २७ वाचा. कधीकधी आपल्या चिंता आपल्यावर इतक्या हावी होतात, की प्रार्थना करायला आपल्याला शब्दच सुचत नाहीत. पण आपल्याकडे मदत उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत देवाची “पवित्र शक्‍ती स्वतः आपल्यासाठी विनंती करते.” ती कशी? आपल्याला माहीत आहे, की यहोवाने त्याच्या पवित्र शक्‍तीचा वापर करून बायबलच्या लेखकांना बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांच्या प्रार्थना लिहून ठेवायची प्रेरणा दिली. जेव्हा आपल्यालाही प्रार्थनेत काय बोलावं हे सुचत नाही किंवा आपले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत, तेव्हा बायबलमधल्या या प्रार्थना जणू आपणच केल्या आहेत असं समजून यहोवा त्या स्वीकारतो.

१९ या गोष्टीवर विचार केल्यामुळे रशियात राहणाऱ्‍या येलेना नावाच्या बहिणीला खूप मदत झाली. प्रार्थना केल्यामुळे आणि बायबल वाचल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. ती चिंतेत इतकी बुडून गेली होती, की तिला प्रार्थना करणं कठीण जात होतं. ती म्हणते: “त्या वेळी मला आठवलं की अशा परिस्थितीत यहोवा बायबलमधल्या त्याच्या सेवकांच्या प्रार्थनांना, माझ्या प्रार्थना समजून कबूल करेल. यामुळे त्या कठीण काळात मला खूप बरं वाटलं.”

२०. तणावात असताना प्रार्थनेसाठी आपलं मन तयार करायला आपण काय करू शकतो?

२० आपण खूप तणावात असतो तेव्हा प्रार्थना करताना आपलं लक्ष भरकटू शकतं. अशा वेळी आपलं मन तयार करायला आपण स्तोत्रं पुस्तकाचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकू शकतो किंवा दावीद राजासारखं, आपल्या भावना लिहून काढू शकतो. (स्तो. १८, ३४, १४२; उपरीलेखन.) पण प्रार्थनेसाठी आपलं मन तयार व्हावं म्हणून आपण याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही. (स्तो. १४१:२) तुम्हाला ज्या गोष्टींमुळे मदत होते, त्या गोष्टी तुम्ही करू शकता.

२१. आपण यहोवाला पूर्ण भरवशाने प्रार्थना का करू शकतो?

२१ आपल्या “तोंडातून शब्द फुटण्याआधीच” यहोवाला तो माहीत असतो, हे समजल्यामुळे आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो! (स्तो. १३९:४) पण तरी आपला त्याच्यावर किती भरवसा आहे, हे आपण त्याला सांगावं असं त्याला वाटतं. म्हणून आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याला प्रार्थना करायला अजिबात कचरू नये. बायबलमधल्या प्रार्थनांमुळेसुद्धा आपल्याला असं करायची प्रेरणा मिळू शकते. तर मग, आपण पूर्ण मनाने यहोवाला प्रार्थना करू या. आपली सगळी सुखं-दुःखं त्याला सांगू या. आणि अशी खातरी बाळगू या, की यहोवा आपला सगळ्यात चांगला मित्र आहे आणि तो कधीच आपली साथ सोडणार नाही!

तुमचं उत्तर काय असेल?

  • कोणती गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला मनमोकळेपणे यहोवाला प्रार्थना करता येईल?

  • मनमोकळेपणे प्रार्थना करायला आपण कायकाय करू शकतो?

  • बायबलमधल्या प्रार्थनांवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

गीत ४५ माझ्या मनातले विचार

a ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं या पुस्तकात, “यहोवा” या विषयाखाली “यहोवाचे काही खास गुण” हा मुद्दा पाहा.

b मंडळीच्या सभेत सहसा थोडक्यात प्रार्थना केल्या जातात.

c हन्‍नाने आपल्या प्रार्थनेत मोशेने लिहिलेल्या पुस्तकांमधले शब्द वापरले. यावरून कळतं की ती शास्त्रवचनांवर मनन करायला वेळ काढायची. (अनु. ४:३५; ८:१८; ३२:४, ३९; १ शमु. २:२, ६, ७) याच्या कित्येक शतकांनंतर, येशूची आई मरीया हिने केलेली प्रार्थनासुद्धा हन्‍नाच्या प्रार्थनेसारखीच होती.—लूक १:४६-५५.

d उदाहरणार्थ, योना २:३-९ ची तुलना स्तोत्र ६९:१; १६:१०; ३०:३; १४२:२, ३; १४३:४, ५; १८:६; आणि ३:८, सोबत करा. स्तोत्रातली ही वचनं ज्या क्रमात आहेत, त्याच क्रमात योनाने ती त्याच्या प्रार्थनेत वापरली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा