नियमन मंडळाचे दोन नवीन सदस्य
५ ऑक्टोबर २०२४ ला झालेल्या वार्षिक सभेत एक खास घोषणा करण्यात आली. त्यात सांगण्यात आलं, की ब्रदर ज्योडी जेडली आणि जेकब रम्फ यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलंय. या दोन्ही भावांनी अनेक वर्षं यहोवाची विश्वासूपणे सेवा केली आहे.
ज्योडी जेडली आणि त्यांची बायको दमारिस
ब्रदर जेडली यांचा जन्म अमेरिकेतल्या मिसूरी या ठिकाणी झाला. ते सत्यात लहानाचे मोठे झाले. त्यांचं कुटुंब अशा ठिकाणी राहत होतं जिथे फार कमी साक्षीदार होते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे भाऊबहीण त्यांच्या इथे प्रचारासाठी यायचे. म्हणून ब्रदर जेडली यांची त्यांच्याशी ओळख झाली. त्या भाऊबहिणींमधली एकता आणि प्रेम पाहून त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. १५ ऑक्टोबर १९८३ ला किशोरवयात असताना त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्यांना प्रचार करायला खूप आवडायचं, म्हणून शाळेचं शिक्षण संपल्यावर सप्टेंबर १९८९ ला त्यांनी पायनियर सेवा सुरू केली.
ब्रदर जेडली लहान असताना त्यांचे आईवडील त्यांना आणि त्यांच्या बहिणीला बेथेल दाखवायला घेऊन जायचे. त्यामुळे दोन्ही मुलांना बेथेल सेवेचं ध्येय ठेवायचं प्रोत्साहन मिळालं आणि त्या दोघांनी ते गाठलंही. सप्टेंबर १९९० ला ब्रदर जेडली वॉलकिल बेथेलला आले. सुरुवातीला त्यांनी साफसफाई विभागात आणि मग आरोग्य सेवा विभागात काम केलं.
त्याच काळात बेथेलच्या आसपास, स्पॅनिश भाषेच्या मंडळ्यांमध्ये वाढ होत होती आणि तिथे भावांची गरज होती. म्हणून ब्रदर जेडली त्यातल्या एका मंडळीत जाऊ लागले आणि स्पॅनिश भाषा शिकू लागले. काही काळाने त्यांची भेट दमारिससोबत झाली. ही बहीण त्यांच्याच विभागात पायनियर सेवा करत होती. नंतर, त्यांचं लग्न झालं आणि दमारिससुद्धा त्यांच्यासोबत बेथेलमध्ये सेवा करू लागली.
ब्रदर ज्योडी यांच्या आईची आणि दमारिसच्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी २००५ मध्ये त्या दोघांना बेथेल सोडावं लागलं. त्या काळात ते दोघं पायनियर म्हणून सेवा करत राहिले. तसंच, ब्रदर ज्योडी यांनी पायनियर सेवा प्रशालेचे प्रशिक्षक म्हणून काम केलं. शिवाय, हॉस्पिटल संपर्क समिती आणि प्रादेशिक बांधकाम समितीतही त्यांनी सेवा केली.
२०१३ मध्ये त्या दोघांना वॉरविक बांधकाम प्रकल्पासाठी पुन्हा बेथेलमध्ये बोलावण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पॅटरसन आणि वॉलकिल इथेसुद्धा सेवा केली. ब्रदर जेडली यांनी स्थानिक डिझाईन/बांधकाम विभागात तसंच, हॉस्पिटल माहिती सेवा विभागात सेवा केली आहे. मार्च २०२३ मध्ये त्यांना सेवा समितीचे सहायक म्हणून नेमण्यात आलं. त्यांना मिळालेल्या जबाबदाऱ्यांबद्दल ते म्हणतात: “जेव्हा तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळते, तेव्हा तुम्हाला खांद्यावर खूप मोठं ओझं असल्यासारखं वाटू शकतं. पण अशा वेळी आपण यहोवावर अवलंबून राहिलं पाहिजे. कारण त्याच्या नावाचा अर्थ आहे की ‘तो व्हायला लावतो.’”
जेकब रम्फ आणि त्यांची बायको इंगा
ब्रदर रम्फ यांचा जन्म अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथे झाला. ते लहान असताना त्यांची आई अक्रियाशील होती, पण तरी तिने त्यांना सत्याबद्दल शिकवायचा प्रयत्न केला. ते दरवर्षी त्यांच्या आजीला भेटायला जायचे. त्यांची आजी विश्वासूपणे यहोवाची सेवा करत होती. तिने त्यांच्या मनात सत्याबद्दल आवड वाढवायला मदत केली. मग १३ वर्षांचे असताना ब्रदर रम्फ यांनी त्यांना बायबल अभ्यास करायची इच्छा असल्याचं सांगितलं. २७ सप्टेंबर १९९२ ला किशोरवयात असतानाच त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची आई पुन्हा सभेला येऊ लागली आणि प्रचार करू लागली. तसंच, त्यांच्या वडिलांनी आणि भावंडांनीसुद्धा बाप्तिस्मा घेतला.
ब्रदर रम्फ मोठे होत होते तेव्हा त्यांनी पाहिलं, की पायनियर किती आनंदी असतात. म्हणून त्यांचं शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी सप्टेंबर १९९५ मध्ये पायनियर सेवा सुरू केली. २००० साली गरज असलेल्या ठिकाणी सेवा करता यावी म्हणून ते इक्वादोर इथे गेले. तिथे त्यांची भेट इंगा नावाच्या पायनियर बहिणीसोबत झाली. ती कॅनडाची होती. पुढे त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर ते इक्वादोरच्या एका छोट्या शहरात सेवा करू लागले. तेव्हा तिथे प्रचारकांचा एक छोटा गट होता. पण आज तिथे एक मोठी मंडळी आहे.
काही काळानंतर, ब्रदर आणि सिस्टर रम्फ यांना खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. नंतर त्यांनी विभागीय सेवासुद्धा केली. २०११ मध्ये त्यांना गिलियडच्या १३२ व्या प्रशालेचं आमंत्रण मिळालं. तिथून पधवीधर झाल्यानंतर त्यांनी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. जसं की, त्यांनी बेथेलमध्ये सेवा केली आणि मिशनरी म्हणून सेवा केली. तसंच, त्यांनी विभागीय सेवासुद्धा केली. शिवाय, त्यांना सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेत प्रशिक्षक म्हणूनसुद्धा सेवा करण्याची संधी मिळाली.
कोव्हिड-१९ महामारीमुळे ब्रदर आणि सिस्टर रम्फ पुन्हा अमेरिकेला आले. तेव्हा त्यांना वॉलकिल बेथेलमध्ये बोलावण्यात आलं. तिथे ब्रदर रम्फ यांना सेवा विभागात प्रशिक्षण देण्यात आलं. पुढे त्यांना पुन्हा इक्वादोरला पाठवण्यात आलं. तिथे ब्रदर रम्फ यांनी शाखा समितीमध्ये सेवा केली. २०२३ मध्ये त्यांना वॉरविकला बोलावण्यात आलं. जानेवारी २०२४ मध्ये त्यांना सेवा समितीचे सहायक म्हणून नेमण्यात आलं. ब्रदर रम्फ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जी सेवा केली त्याबद्दल सांगताना ते म्हणतात: “आपण कुठे सेवा करतो हे महत्त्वाचं नसतं. पण आपण ज्या लोकांसोबत सेवा करतो त्यांच्यामुळे ती नेमणूक खास ठरते.”
हे भाऊ सेवेत खूप मेहनत करतात आणि अशा माणसांची आपण “नेहमी कदर” केली पाहिजे.—फिलिप्पै. २:२९.