अभ्यास लेख ३९
गीत ५४ हाच खरा मार्ग!
योग्य मनोवृत्ती असलेल्यांना लवकरात लवकर मदत करा
“सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या सगळ्यांनी विश्वास स्वीकारला.”—प्रे. कार्यं १३:४८.
या लेखात:
लोकांना बायबल अभ्यासासाठी विचारणं आणि सभांना बोलावणं का महत्त्वाचं आहे ते पाहू या.
१. लोक प्रचारात आनंदाचा संदेश ऐकून कसा प्रतिसाद देतात? (प्रेषितांची कार्यं १३:४७, ४८; १६:१४, १५)
पहिल्या शतकात बऱ्याच लोकांनी आनंदाचा संदेश ऐकल्यावर लगेच सत्य स्वीकारलं. (प्रेषितांची कार्यं १३:४७, ४८; १६:१४, १५ वाचा.) आजही बरेचशे लोक जेव्हा पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. काही लोक सुरुवातीला आनंदाच्या संदेशात आवड दाखवत नसले, तरी ते नंतर त्याबद्दल शिकून घ्यायला तयार होऊ शकतात. तर मग, प्रचारात योग्य मनोवृत्ती असलेले लोक आपल्याला भेटतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
२. शिष्य बनवण्याचं काम, बागेत काम करणाऱ्या माळ्याच्या कामासारखं कसं आहे?
२ एक उदाहरण घ्या. शिष्य बनवण्याच्या कामाची तुलना आपण बागेत काम करणाऱ्या माळ्याच्या कामाशी करू शकतो. बागेत एका झाडाचं फळ जेव्हा पिकतं, तेव्हा माळी ते लवकर काढून घेतो. पण त्याच वेळी तो इतर कामंही करतो. जसं की, तो इतर झाडांची काळजी घेतो आणि त्यांना पाणी घालतो. त्याच प्रकारे आपल्याला आवड दाखवणारे लोक भेटतात, तेव्हा त्यांना आपण लगेच ख्रिस्ताचे शिष्य बनण्यासाठी मदत करतो. पण त्याच वेळी, जे शिष्य बनण्यासाठी अजून तयार नाहीत त्यांना आपण बायबलबद्दल आणि देवाबद्दल शिकून घेणं का गरजेचं आहे हे पाहायला मदत करतो. (योहा. ४:३५, ३६) समंजसपणामुळे आपल्याला योग्य ती पद्धत वापरून समोरच्या व्यक्तीला मदत करता येईल. म्हणून या लेखात आपण पाहू, की आपल्या संदेशात आवड दाखवणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी पहिल्या भेटीत आपण काय करू शकतो. त्यासोबतच, आपण त्यांना प्रगती करत राहण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो हेही आपण या लेखात पाहणार आहोत.
आनंदाच्या संदेशात आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला आपण कशी मदत करू शकतो?
३. प्रचारात आवड दाखवणारे लोक भेटतात तेव्हा आपण काय करू शकतो? (१ करिंथकर ९:२६)
३ प्रचारात आपल्याला आवड दाखवणारी व्यक्ती भेटते, तेव्हा तिने लगेच यहोवाबद्दल शिकून घ्यावं आणि त्याच्या जवळ जावं अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण पहिल्या भेटीतच तिला बायबल अभ्यासासाठी विचारू शकतो आणि सभेला बोलवू शकतो.—१ करिंथकर ९:२६ वाचा.
४. बायबल अभ्यासासाठी लगेच तयार झालेल्या व्यक्तीचा अनुभव सांगा.
४ बायबल अभ्यासासाठी विचारणं. काही लोक लगेच बायबल अभ्यासासाठी तयार होतात. या उदाहरणाचा विचार करा. एकदा गुरुवारच्या दिवशी कॅनडामधले काही भाऊबहीण ट्रॉलीवरचं साक्षकार्य करत होते. तिथे एक तरुण मुलगी आली आणि तिने कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक वाचायला घेतलं. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका बहिणीने तिला बायबल अभ्यासासाठी विचारलं. ती मुलगी त्यासाठी लगेच तयार झाली आणि तिने आपला नंबरही दिला. नंतर, त्याच दिवशी त्या मुलीने बहिणीला मेसेज करून ‘आपण बायबल अभ्यास केव्हा सुरू करू शकतो?’ असं विचारलं. त्यावर बहिणीने म्हटलं, की ती शनिवारी किंवा रविवारी अभ्यासासाठी येऊ शकते. तेव्हा ती मुलगी तिला म्हणाली: “उद्या केला तर चालेल का? मी उद्या फ्रीए.” त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तिचा बायबल अभ्यास सुरू झाला. विशेष म्हणजे, ती मुलगी लगेच रविवारच्या सभेलासुद्धा आली. आणि तिने पुढे सत्यात भरभर प्रगती केली.
५. जर एखादी व्यक्ती लगेच बायबल अभ्यासाला तयार झाली नाही तर आपण काय करू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
५ हे खरं आहे, की त्या मुलीसारखं आपला संदेश ऐकणारे सगळेच जण लगेच बायबल अभ्यासाला तयार होणार नाहीत. काहींना कदाचित त्यासाठी वेळ लागू शकतो. मग आपल्याला त्यांना मदत कशी करता येईल? कदाचित आपल्याला त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलून सुरुवात करावी लागेल. त्यासोबतच, जर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला आणि आपल्याला त्यांची काळजी असल्याचं दाखवलं, तर थोड्याच काळात आपल्याला त्यांचा बायबल अभ्यास सुरू करता येऊ शकतो. मग आपण त्यांना बायबल अभ्यासासाठी कसं विचारू शकतो? प्रभावीपणे बायबल अभ्यास चालवणाऱ्या बऱ्याच भाऊबहिणींना हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
चित्रात दाखवलेल्या लोकांनी बायबल अभ्यास सुरू करावा म्हणून तुम्ही त्यांना काय म्हणू शकता? (परिच्छेद ५ पाहा) a
६. बायबलवर चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
६ ज्या भाऊबहिणींना बायबल अभ्यास सुरू करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी असं म्हटलं, की काही ठिकाणी “स्टडी,” “अभ्यास” किंवा “बायबल अभ्यास,” यांसारखे शब्द वापरायचं आपण टाळू शकतो. त्याऐवजी आपण जर “चर्चा” किंवा “पाहू या,” “चांगल्या गोष्टी शिकू या,” “आणखी जाणून घेऊ या” यांसारखे शब्द वापरले, तर फायदा होऊ शकतो. त्या व्यक्तीशी तुम्हाला पुन्हा बोलता यावं त्यासाठी तुम्ही कदाचित तिला असं म्हणू शकता: “तुम्हाला माहीत आहे बायबलमध्ये आपल्या जीवनातल्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत?” किंवा “बायबल हे फक्त एक धार्मिक पुस्तक नाहीए, तर त्यातून आपल्याला रोजच्या जीवनासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.” त्यासोबतच तुम्ही असंही म्हणू शकता: “यावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज नाही. १०-१५ मिनिटं दिलीत तरी पुरेशी आहेत आणि त्यातून आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी समजतील.” पण याबद्दल सांगताना आपण “दर आठवडी भेटू या” यांसारखे शब्द टाळा. कारण त्यामुळे त्या व्यक्तीला वाटेल की दर वेळी ती व्यक्ती तुम्हाला भेटायला बांधील आहे.
७. आपण जे शिकतोय तेच सत्य आहे, हे काहींना कधी जाणवलं? (१ करिंथकर १४:२३-२५)
७ सभांचं आमंत्रण देणं. असं दिसतं की प्रेषित पौलच्या काळात काही लोक जेव्हा पहिल्यांदा सभेला आले होते, तेव्हा त्यांना जाणवलं की हेच सत्य आहे. (१ करिंथकर १४:२३-२५ वाचा.) आजच्या काळातही असंच होऊ शकतं. बरेच नवीन लोक सभांना येऊ लागल्यावर भरभर प्रगती करू लागतात. मग आपण, आपल्या बायबल विद्यार्थ्यांना सभेला यायचं आमंत्रण कधी देऊ शकतो? कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या दहाव्या धड्यामध्ये सभेला यायचं आमंत्रण देण्यात आलंय. पण तुम्हाला दहावा धडा सुरू होईपर्यंत वाट पाहायची गरज नाही. तुम्ही पहिल्या भेटीतच त्या व्यक्तीला शनिवारी-रविवारी होणाऱ्या सभेचं आमंत्रण देऊ शकता. त्या वेळी तुम्ही तिला जाहीर भाषणाचा विषय सांगू शकता किंवा त्या आठवड्यात होणाऱ्या टेहळणी बुरूज अभ्यासातला एखादा मुद्दा सांगू शकता.
८. जेव्हा तुम्ही एखाद्याला सभेचं आमंत्रण देता, तेव्हा तुम्ही त्याला कायकाय सांगू शकता? (यशया ५४:१३)
८ जेव्हा आपण आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला आपल्या सभेचं आमंत्रण देतो, तेव्हा आपल्या सभा इतर धार्मिक कार्यक्रमांपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे आपण तिला सांगू शकतो. एकदा बायबल अभ्यास करणारी एक स्त्री पहिल्यांदा सभेला आली. तेव्हा टेहळणी बुरूज अभ्यास घेणाऱ्या भावाला पाहून तिने तिचा बायबल अभ्यास घेणाऱ्या बहिणीला विचारलं: “यांना सगळ्यांचीच नावं कशी काय माहीत आहेत?” तेव्हा बहिणीने तिला सांगितलं: “जसं आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्या लोकांची नावं माहीत असतात, तसंच मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव माहीत करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो.” या गोष्टीचं त्या स्त्रीला खूप आश्चर्य वाटलं, कारण तिने तिच्या चर्चमध्ये हे कधीच पाहिलं नव्हतं. याशिवाय, आपण सभांना का जातो, हेसुद्धा आपण आवड दाखवणाऱ्या लोकांना सांगू शकतो. (यशया ५४:१३ वाचा.) आपण त्यांना सांगू शकतो की आपण यहोवाची उपासना करायला, त्याच्याकडून शिकायला आणि एकमेकांना प्रोत्साहन द्यायला सभांना जातो. (इब्री २:१२; १०:२४, २५) त्यामुळे सभा खूप सुव्यवस्थितपणे होतात. याशिवाय, आपण त्यांना आणखी काही गोष्टी सांगू शकतो. जसं की, तिथे व्यावहारिक मार्गदर्शन दिलं जातं आणि कोणतेही रितीरिवाज किंवा विधी केले जात नाहीत. (१ करिंथ. १४:४०) तसंच, राज्य सभागृहाची रचना अशा प्रकारे केलेली असते, की तिथे शिकण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार होईल. त्यासोबतच आपण त्यांना हेही सांगू शकतो, की राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ असल्यामुळे आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही किंवा सामाजिक गोष्टींच्या बाबतीत वाद घालत नाही. तुमच्या विद्यार्थ्याला सभांना यायचं आमंत्रण देताना यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ दाखवूनसुद्धा तुम्ही त्याला मदत करू शकता. त्यामुळे सभागृहामध्ये नेमकं काय होईल याचा त्याला एक अंदाज येईल.
९-१०. आपण एखाद्या व्यक्तीला सभेचं आमंत्रण देतो, तेव्हा तिला सभेत भाग घ्यायची किंवा साक्षीदार बनायची जबरदस्ती केली जाणार नाही याची खातरी आपण तिला कशी देऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
९ काही जण आपल्या सभेला यायला कचरतात, कारण त्यांना वाटतं की त्यांना त्यांचा धर्म सोडावा लागेल. पण त्यांना खातरी करून द्या, की आपल्या सभेला कोणीही येऊ शकतं आणि कोणावरही सभेत भाग घ्यायची किंवा साक्षीदार बनायची जबरदस्ती केली जात नाही. आपण त्यांना हेही सांगू शकतो, की आईवडील त्यांच्या मुलांना घेऊन सभेला येऊ शकतात. आपल्या सभांमध्ये मुलांसाठी वेगळे वर्ग भरवले जात नाहीत. उलट, आईवडील आणि मुलं सोबत मिळून शिकू शकतात. त्यामुळे आईवडिलांना हे माहीत असतं की आपली मुलं काय शिकत आहेत. (अनु. ३१:१२) त्यासोबतच आपण त्यांना हेसुद्धा सांगू शकतो की आपल्या सभांमध्ये वर्गणी गोळा केली जात नाही किंवा दानपात्र फिरवलं जात नाही. कारण आपण येशूच्या आज्ञेचं पालन करतो. त्याने म्हटलं: “तुम्हाला फुकट मिळालंय तुम्हीही फुकट द्या.” (मत्त. १०:८) शिवाय, तुम्ही बायबल विद्यार्थ्यांना हेसुद्धा सांगू शकता, की सभांना यायला त्यांनी महागडे कपडेच घातले पाहिजे असं नाही. कारण यहोवा बाहेरचं रूप पाहत नाही, तर तो हृदय पाहतो.—१ शमु. १६:७.
१० जेव्हा एक व्यक्ती सभेला येते तेव्हा तिचं मनापासून स्वागत करा. वडिलांसोबत आणि इतर भाऊ बहिणींसोबत तिची भेट घालून द्या. भाऊबहीण किती प्रेमळ आहेत आणि किती काळजी करणारे आहेत हे ती व्यक्ती जेव्हा पाहील, तेव्हा तिला पुन्हा सभेला यावंसं वाटेल. तिच्याकडे बायबल नसेल तर सभा चालू असताना तुमच्या बायबलमधून तिला वचनं दाखवा. शिवाय, वक्ता ज्या विषयावर बोलतोय आणि ज्यावर चर्चा केली जात आहे, ते समजून घ्यायला तिला मदत करा.
एक व्यक्ती जितक्या लवकर सभेला येईल, तितक्या लवकर तिला फायदा होईल (परिच्छेद ९-१० पाहा)
बायबल अभ्यास सुरू होतो, तेव्हा आपण काय करू शकतो?
११. तुम्हाला घरमालकाच्या वेळेची किंमत आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
११ जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा बायबल अभ्यास घेता, तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकता? घरमालकाच्या वेळेची किंमत असल्याचं दाखवून द्या. उदाहरणार्थ, तुमच्या भागातले लोक वेळ पाळत नसले, तरी तुम्ही दिलेली वेळ पाळा. पहिल्या भेटीत घरमालकाचा जास्त वेळ घेऊ नका. काही अनुभवी प्रचारकांचं असं म्हणणं आहे, की घरमालकाला जरी आणखी ऐकायची इच्छा असली तरी थोडं बोलून चर्चा संपवल्याने फायदा होऊ शकतो. त्यासोबतच स्वतःच जास्त बोलू नका, तर घरमालकालाही बोलायची संधी द्या.—नीति. १०:१९.
१२. बायबल अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच आपलं काय ध्येय असलं पाहिजे?
१२ सुरुवातीपासूनच तुमचं ध्येय बायबल विद्यार्थ्याला यहोवा आणि येशूबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांच्यावरचं प्रेम वाढवायला मदत करणं, हे असलं पाहिजे. यासाठी तुम्ही त्याचं लक्ष स्वतःकडे किंवा तुमच्याकडे किती ज्ञान आहे याकडे नाही, तर देवाच्या वचनाकडे वळवलं पाहिजे. (प्रे. कार्यं १०:२५, २६) प्रेषित पौलचं या बाबतीत खूप चांगलं उदाहरण आहे. त्याने शिकवताना नेहमी इतरांचं लक्ष येशूकडे वेधलं. कारण लोकांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत व्हावी, म्हणून यहोवाने येशूला पाठवलं होतं. (१ करिंथ. २:१, २) नंतर पौलने भाऊबहिणींना काही चांगले गुण वाढवणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं. कारण या गुणांची तुलना सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांशी केली जाऊ शकते. (१ करिंथ. ३:११-१५) या मौल्यवान गुणांमध्ये विश्वास, बुद्धी, समंजसपणा आणि यहोवाची भीतीसुद्धा सामील आहे. (स्तो. १९:९, १०; नीति. ३:१३-१५; १ पेत्र १:७) तर मग तुमच्या विद्यार्थ्याला त्याचा विश्वास मजबूत करायला आणि यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करून तुम्हीसुद्धा पौलसारखं वागू शकता.—२ करिंथ. १:२४.
१३. बायबल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपण धीर आणि समंजसपणा कसा दाखवू शकतो? (२ करिंथकर १०:४, ५) (चित्रसुद्धा पाहा.)
१३ इतरांना शिकवताना येशूसारखं नेहमी धीराने आणि समंजसपणे वागा. बायबल विद्यार्थ्याला अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्न विचारायचं टाळा. जर त्याला एखादी शिकवण समजून घेणं कठीण जात असेल, तर त्यावरच रेंगाळत बसण्याऐवजी पुढच्या मुद्द्यावर जा. आणि नंतर पुन्हा त्या मुद्द्यावर या. एखादी शिकवण बायबल विद्यार्थ्यावर लादण्याऐवजी त्याला शिकलेल्या गोष्टीवर विचार करायला आणि त्याप्रमाणे बदल करायला वेळ द्या. (योहा. १६:१२; कलस्सै. २:६, ७) खोट्या शिकवणींची तुलना बायबल भक्कम बुरुजाशी करतं. (२ करिंथकर १०:४, ५ वाचा.) म्हणून ते पाडून टाकण्याआधी, यहोवाला आपला आश्रय बनवण्यासाठी बायबल विद्यार्थ्याला मदत करणं खूप गरजेचं आहे.—स्तो. ९१:९.
एखाद्या व्यक्तीच्या मनात सत्य रुजावं म्हणून त्याला वेळ द्या (परिच्छेद १३ पाहा)
नवीन लोक सभेला आल्यावर आपण काय करू शकतो?
१४. सभेला आलेल्या नवीन लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे?
१४ नवीन लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले असू शकतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही वेगवेगळी असू शकते. असं असलं तरी, यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो, की आपण त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. (याको. २:१-४, ९) मग सभेला आलेल्या सगळ्या नवीन लोकांसोबत आपण प्रेमाने कसं वागू शकतो?
१५-१६. आपण नवीन लोकांवर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो?
१५ काही लोक आपल्या सभेला फक्त उत्सुकतेपोटी किंवा दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या एखाद्या भावाने किंवा बहिणीने सांगितल्यामुळे सभेला आले असतील. म्हणून, जेव्हा तुम्ही अशा नवीन लोकांना सभेला आलेलं पाहता, तेव्हा स्वतःहून जाऊन त्यांच्याशी बोला. त्यांचं स्वागत करा. पण त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असं काहीही करू नका. तुम्ही सभेत त्यांच्याशेजारी बसू शकता. त्यांच्याकडे कदाचित बायबल किंवा मासिक नसेल. म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या प्रतीतून दाखवू शकता किंवा त्यांना एक प्रत देऊ शकता. त्यासोबतच त्यांना आपण नवीन जागी आलोय किंवा अनोळखी ठिकाणी आलोय, असं वाटणार नाही याची काळजी घ्या. एकदा एक माणूस पहिल्यांदा आपल्या सभेला आला होता. त्याने खूप साधे कपडे घातले होते. म्हणून त्याचं स्वागत करणाऱ्या एका भावाला त्याने म्हटलं, की त्याला त्याच्या कपड्यांमुळे अवघडल्यासारखं वाटतंय. पण त्या भावाने त्याला समजावून सांगितलं, की यहोवाचे साक्षीदार सर्वसामान्य लोकांसारखेच आहेत. म्हणून त्याला घाबरण्याची गरज नाही. पुढे त्या माणसाने बाप्तिस्मा घेतला आणि तो त्या भावाचे शब्द कधीच विसरला नाही. पण लक्षात असू द्या, नवीन लोक सभेला येतात तेव्हा सभेच्या आधी किंवा नंतर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये लुडबुड करू नका.—१ पेत्र ४:१५.
१६ साक्षीदार नसलेल्या लोकांचा अपमान होईल असं काही करू नका. त्यांच्याबद्दल बोलताना, सभांमध्ये भाग हाताळताना किंवा उत्तरं देताना त्यांचा अनादर होईल असं काहीही बोलू नका. असं करूनसुद्धा आपण नवीन लोकांवर प्रेम असल्याचं दाखवू शकतो. तसंच, ते अडखळतील असं काही त्यांना बोलू नका. (तीत २:८; ३:२) उदाहरणार्थ, त्यांच्या विश्वासाचा अनादर होईल असं काहीही आपण बोलणार नाही. (२ करिंथ. ६:३) जे भाऊ जाहीर भाषण सादर करतात ते या गोष्टीची खास काळजी घेऊ शकतात. जे शब्द किंवा जे विषय साक्षीदार नसलेल्या लोकांना माहीत नाहीत, त्याबद्दल ते फोड करून सांगू शकतात. अशा प्रकारे ते साक्षीदार नसलेल्या लोकांना लक्षात ठेवून भाषण तयार करू शकतात.
१७. योग्य मनोवृत्ती असलेले लोक भेटल्यावर आपण काय करू शकतो?
१७ जसजसे दिवस सरत चाललेत, तसतसं आपलं प्रचाराचं काम आणखीनच महत्त्वपूर्ण होत चाललंय. म्हणूनच आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असलेल्या” लोकांना शोधत राहू या. (प्रे. कार्यं १३:४८) असं करत असताना त्यांना बायबल अभ्यासासाठी विचारायला आणि सभांना बोलवायला मागेपुढे पाहू नका. असं करून, आपण त्यांना “जीवनाकडे जाणाऱ्या” रस्त्यावर पहिली पावलं टाकायला मदत करत असतो.—मत्त. ७:१४.
गीत ६४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
a चित्राचं वर्णन: मिलिटरीतून रिटायर झालेला एक माणूस निवांतपणे वऱ्हांड्यात बसलाय. दोन भाऊ त्याच्याशी बोलत आहेत. कामाच्या गडबडीत असलेल्या एका आईला दोन बहिणी साक्ष देत आहेत.