वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 सप्टेंबर पृ. १४-१९
  • इतरांचा आदर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांचा आदर करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांचा आदर करण्याचा काय अर्थ होतो?
  • घरच्यांचा आदर करा
  • भाऊबहिणींचा आदर करा
  • बाहेरच्या लोकांचा आदर करा
  • आज लोक आदर का करत नाहीत?
    सावध राहा!—२०२४
  • तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का असावे?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 सप्टेंबर पृ. १४-१९

अभ्यास लेख ३८

गीत १२० येशूसारखं प्रेमळ होऊ या!

इतरांचा आदर करा

“सोन्याचांदीपेक्षा आदर मिळवणं बरं!”—नीति. २२:१.

या लेखात:

इतरांचा आदर करणं का गरजेचं आहे आणि तसं करणं कठीण वाटत असलं तरीही आपण तो कसा करत राहू शकतो, ते पाहू या.

१. लोक जेव्हा आपला आदर करतात तेव्हा आपल्याला छान का वाटतं? (नीतिवचनं २२:१)

लोक जेव्हा तुमचा आदर करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच खूप छान वाटत असेल! सगळ्यांनाच असं वाटतं, की इतरांनी आपला आदर करावा. म्हणून लोक आपला आदर करतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. त्यामुळेच बायबलमध्ये असं म्हटलंय, की “सोन्याचांदीपेक्षा आदर मिळवणं बरं!”—नीतिवचनं २२:१ वाचा.

२-३. इतरांचा आदर करणं आपल्यासाठी नेहमीच सोपं का नसतं, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२ इतरांचा आदर करणं आपल्यासाठी कदाचित नेहमीच सोपं नसेल. याचं एक कारण म्हणजे, आपल्याला इतरांच्या चुका दिसतात. तसंच आपण अशा जगात राहतोय, जिथे लोकांना एकमेकांबद्दल आदरच उरलेला नाही. पण आपण वेगळं असलं पाहिजे. का बरं? कारण यहोवाची इच्छा आहे, की आपण “सर्व प्रकारच्या लोकांचा आदर” करावा.—१ पेत्र २:१७.

३ आदर करण्याचा काय अर्थ होतो, याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपण आपल्या (१) घरच्यांचा, (२) भाऊबहिणींचा आणि (३) बाहेरच्या लोकांचा आदर कसा करू शकतो हेही पाहणार आहोत. शिवाय, इतरांचा आदर करणं जेव्हा कठीण असतं तेव्हाही आपण तो कसा करू शकतो, याबद्दलसुद्धा आपण पाहणार आहोत.

इतरांचा आदर करण्याचा काय अर्थ होतो?

४. इतरांचा आदर करण्याचा काय अर्थ होतो?

४ इतरांचा “आदर” किंवा “सन्मान” करण्याचा अर्थ, त्यांच्याबद्दल चांगला विचार करणं आणि त्यांच्याशी चांगलं वागणं. जेव्हा आपण एखाद्याचे चांगले गुण किंवा त्याची चांगली कामं बघतो किंवा मग एखाद्याकडे एखादा अधिकार असतो, तेव्हा आपण त्याच्याशी जसं वागतो त्यातून आपण त्याचा आदर करत असल्याचं दिसतं. पण हा आदर फक्‍त दाखवण्यासाठी नाही, तर मनापासून आला पाहिजे.—मत्त. १५:८.

५. इतरांचा आदर करायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

५ आपण इतरांचा आदर करावा अशी यहोवाची इच्छा आहे. जसं की, त्याने आपल्याला ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचा’ आदर करायला सांगितलंय. (रोम. १३:१, ७) पण काही जण असं म्हणतील, की लोक जोपर्यंत चांगलं वागतील तोपर्यंतच मी त्यांचा आदर करेन. पण असं म्हणणं खरंच योग्य आहे का? आपण यहोवाचे सेवक आहोत. त्यामुळे एखादी व्यक्‍ती जशी वागते-बोलते फक्‍त त्या आधारावर आपण तिचा आदर करत नाही. तर यहोवाची इच्छा असल्यामुळे आपण तिचा आदर करतो. असं करून खरंतर आपण यहोवाला खूश करत असतो.—यहो. ४:१४; १ पेत्र ३:१५.

६. एखादी व्यक्‍ती जेव्हा आपला अनादर करते तेव्हासुद्धा तिचा आदर करणं शक्य आहे का? समजावून सांगा. (चित्रसुद्धा पाहा.)

६ पण जर कोणी आपला आदर करत नसेल, तरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्‍तीचा आदर करणं शक्य आहे का? हो, ते शक्य आहे! काही उदाहरणांचा विचार करा. शौल राजाने योनाथानचा इतरांसमोर अपमान केला होता. (१ शमु. २०:३०-३४) पण तरीसुद्धा योनाथान त्याच्याशी आदराने वागला. शौलच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत त्याने त्याची साथ सोडली नाही. (निर्ग. २०:१२; २ शमु. १:२३) महायाजक एलीनेसुद्धा हन्‍नावर आरोप लावला की ती नशेत आहे. (१ शमु. १:१२-१४) पण तरी ती त्याला उलट बोलली नाही. खरंतर एलीचं महायाजक आणि एक पिता म्हणून संपूर्ण इस्राएल राष्ट्रात नाव खराब झालं होतं. पण तरीसुद्धा ती त्याच्याशी आदराने बोलली. (१ शमु. १:१५-१८; २:२२-२४) शिवाय, पहिल्या शतकात अथेन्समधल्या माणसांनी प्रेषित पौलला ‘वटवट्या’ असं म्हणून त्याचा अपमान केला होता. (प्रे. कार्यं १७:१८) तरी पौल त्यांच्याशी खूप आदराने बोलला. (प्रे. कार्यं १७:२२) आपल्याही मनात जर यहोवाबद्दल गाढ प्रेम असेल आणि त्याला खूश करायची इच्छा असेल, तर आपण इतरांचा आदर करू; मग ते कितीही कठीण असलं तरीही. म्हणून आपण हे पाहू या, की आपण कोणाकोणाचा आदर केला पाहिजे आणि तो का केला पाहिजे.

योनाथान, शौल आणि इस्राएली सैनिक तलवारी, भाले आणि ढालींचा वापर करून युद्ध करत आहेत.

शौलने जरी योनाथानचा अपमान केला असला, तरी योनाथानने त्याची साथ कधीच सोडली नाही आणि तो शेवटपर्यंत शौल राजाच्या बाजूने उभा राहिला (परिच्छेद ६ पाहा)


घरच्यांचा आदर करा

७. कुटुंबातल्या लोकांचा आदर करणं कधीकधी आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

७ घरच्यांचा आदर करणं कठीण का जाऊ शकतं? आपण आपल्या घरच्यांसोबत बराच वेळ घालवतो. त्यामुळे त्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयी आपल्याला माहीत असतात. तसंच, घरात काही जण आजारी असतात आणि त्यामुळे त्यांची काळजी घेणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. किंवा काही जण खूप चिंता करतात. मानसिक तणावामुळे त्यांची चिडचिड होऊ शकते. असेही काही जण असतात, जे आपल्याला त्रास होईल अशा प्रकारे वागतात किंवा बोलतात. कुटुंबातले लोक जेव्हा एकमेकांचा आदर करत नाहीत, त्यांचं एकमेकांसोबत पटत नाही, तेव्हा ते घर शांतीचा आणि आनंदाचा निवारा राहत नाही. त्याऐवजी ते युद्धाची रणभूमीच बनून जातं. हे समजायला एक उदाहरण घेऊ या. जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला संधिवाताचा त्रास असतो, तेव्हा तिची हाडं झिजतात आणि त्यामुळे तिच्या सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. अगदी तसंच, जेव्हा आपण आपल्या कुटुंबात एकमेकांचा आदर करत नाही, तेव्हा एका अर्थाने कुटुंबातली नाती झिजतात आणि सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. संधिवातावर उपचार नसल्यामुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्‍तीशी आदराने वागल्यामुळे बिघडलेली नातीसुद्धा सुधारू शकतात.

८. आपल्या घरच्यांचा आदर करणं महत्त्वाचं का आहे? (१ तीमथ्य ५:४, ८)

८ आपण घरच्यांचा आदर का करावा? (१ तीमथ्य ५:४, ८ वाचा.) तीमथ्यला लिहिलेल्या पहिल्या पत्रात, घरच्यांनी एकमेकांची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल पौलने सांगितलं. तो असंही म्हणाला, की आपण घरच्यांचा आदर फक्‍त आपलं कर्तव्य आहे म्हणून नाही, तर तो आपल्या उपासनेचा भाग आहे म्हणून केला पाहिजे. यहोवाने कुटुंबाची व्यवस्था घालून दिली आहे. (इफिस. ३:१४, १५) म्हणून जेव्हा आपण घरच्यांचा आदर करतो, तेव्हा आपण खरंतर कुटुंबाची व्यवस्था घालून देणाऱ्‍या यहोवा देवाचा आदर करत असतो. (१ तीम. ५:४) आपल्या घरच्यांचा आदर करण्याचं हे किती जबरदस्त कारण आहे!

९. पतीपत्नी एकमेकांचा आदर कसा करू शकतात? (चित्रंसुद्धा पाहा.)

९ घरच्यांचा आदर कसा करावा? कुटुंबात जो पती आपल्या पत्नीचा आदर करतो, तो तिला खूप मौल्यवान समजतो. म्हणूनच तो फक्‍त चारचौघांतच नाही, तर एकट्यातसुद्धा तिच्याशी प्रेमाने वागतो. (नीति. ३१:२८; १ पेत्र ३:७) तो तिला कधीच मारत नाही, तिचा अपमान करत नाही किंवा तिला कमीपणा वाटेल असं काही करत नाही. अर्जेंटिनामध्ये राहणारा जेम्सa म्हणतो: “माझी बायको आजारी असते. त्यामुळे कधीकधी मला वाईट वाटेल असं काहीतरी ती बोलते. जेव्हाजेव्हा असं काहीतरी घडतं, तेव्हा मी स्वतःला या गोष्टीची आठवण करून देतो की ती असं बोलतीए खरं, पण तिच्या मनात तसं काहीच नाही. कधीकधी वातावरण इतकं तापतं, की मी स्वतःला १ करिंथकर १३:५ ची आठवण करून देतो आणि यामुळे मला तिच्यासोबत रागात नाही, तर आदराने बोलायला मदत होते.” (नीति. १९:११) तसंच, आपल्या पतीचा आदर करणारी पत्नी इतरांसमोर त्याचा अपमान करणार नाही. (इफिस. ५:३३) ती त्याला टोमणे मारणार नाही, त्याची थट्टा करणार नाही आणि त्याला नावं ठेवणार नाही. तिला या गोष्टीची जाणीव असते, की अशा प्रकारे वागल्यामुळे त्यांच्या नात्याला गंज लागून ते कमजोर पडू शकतं. (नीति. १४:१) इटलीमध्ये राहणाऱ्‍या एका बहिणीचा नवरा कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करतो. त्याच्याबद्दल ती म्हणते: “कधीकधी हे खूप जास्त टेन्शन घेतात. आधी माझ्या शब्दांवरून आणि माझ्या चेहऱ्‍याच्या हावभावांवरून असं दिसून यायचं, की मी त्यांचा आदर करत नाही. पण इतरांचा आदर करणाऱ्‍या लोकांबरोबर वेळ घालवल्यामुळे मला यांचा आदर करायला जास्त मदत मिळाली आहे.”

कोलाज: लग्न झालेलं एक जोडपं एकमेकांशी आदराने वागत आहे. १. किचनमधे जेवण बनवत असताना एक पती त्याच्या पत्नीशी प्रेमाने बोलत आहे. २. पती एका वृद्ध भावाला जेवण आणून देतोय. हे पाहून त्याची पत्नी इतर पाहुण्यांसमोर त्याची प्रशंसा करत आहे.

आपण आपल्या घरच्यांचा आदर करतो तेव्हा खरंतर आपण आपल्या कुटुंबप्रमुखाचा म्हणजेच यहोवाचा आदर करत असतो (परिच्छेद ९ पाहा)


१०. तरुण मुलं आपल्या आईवडिलांचा आदर कसा करू शकतात?

१० तरुणांनो, आपल्या आईवडिलांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करा. (इफिस. ६:१-३) त्यांच्याशी आदराने बोला. (निर्ग. २१:१७) त्यांचं वय जसजसं वाढत जातं, तसतसं त्यांना तुमच्या मदतीची गरज लागू शकते. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं सगळं करून त्यांचा आदर करा. मारिया नावाच्या बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. तिचे वडील यहोवाचे साक्षीदार नाहीत. जेव्हा ते आजारी पडले, तेव्हा तिला त्यांची काळजी घेणं खूप अवघड गेलं. कारण ते तिच्याशी नीट वागत नव्हते. ती म्हणते: “मी माझ्या वडिलांचा आदर करते. म्हणून मी यहोवाला अशी प्रार्थना केली की मला तो आदर फक्‍त मनात नाही, तर वागण्या-बोलण्यातून दाखवायला मदत कर. मी असा तर्क केला की जर यहोवा माझ्याकडून आईवडिलांचा आदर करायची अपेक्षा करतो, तर तसं करायला तो साहजिकच मला मदतही करेल. काही काळानंतर माझ्या लक्षात आलं, की माझा आदर मिळवायला माझ्या वडिलांना बदल करण्याची गरज नाही. ते कसेही वागत राहिले तरी मी त्यांचा आदर करू शकते.” जेव्हा आपल्या घरातले चुका करतात आणि तरीही आपण त्यांचा आदर करतो तेव्हा आपण हे दाखवतो, की यहोवाने घालून दिलेल्या कुटुंबाच्या व्यवस्थेचा आपण आदर करत आहोत.

भाऊबहिणींचा आदर करा

११. आपल्या भाऊबहिणींचा आदर करणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

११ भाऊबहिणींचा आदर करणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं? आपले भाऊबहीण बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगतात. पण तरी काही जण कधीकधी आपल्याशी वाईट वागतील, आपल्याला समजून घेणार नाहीत किंवा मग आपल्याला वैताग आणतील. त्यामुळे आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्या मनात काहीतरी असेल किंवा त्यांच्याविरुद्ध आपल्याला “काही तक्रार” असेल, तर त्यांचा आदर करत राहणं कदाचित आपल्याला अवघड जाऊ शकतं. (कलस्सै. ३:१३) मग आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

१२. आपण आपल्या भाऊबहिणींचा आदर करणं इतकं महत्त्वाचं का आहे? (२ पेत्र २:९-१२)

१२ आपण भाऊबहिणींचा आदर का केला पाहिजे? (२ पेत्र २:९-१२ वाचा.) पेत्रने त्याच्या दुसऱ्‍या पत्रात असं सांगितलं, की पहिल्या शतकातल्या मंडळीतले काही भाऊबहीण देवाने सन्मानित केलेल्यांबद्दल म्हणजेच वडिलांबद्दल अपमानास्पद बोलत होते. विश्‍वासू स्वर्गदूतसुद्धा हे सगळं पाहत होते. मग त्यांनी काय केलं? बायबल असं सांगतं, की यहोवाबद्दल आदर असल्यामुळे त्यांनी या उद्धट माणसांविरुद्ध एकही चुकीचा शब्द काढला नाही. ही किती विशेष गोष्ट आहे! स्वर्गदूत पापी माणसांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी या उद्धट माणसांविरुद्ध एकही चुकीचा शब्द काढला नाही. उलट, त्यांनी न्याय करायचं आणि त्यांना शिक्षा करायचं काम यहोवावर सोपवून दिलं. (रोम. १४:१०-१२; यहूदा ९ सोबत तुलना करा.) मग आपण या विश्‍वासू स्वर्गदूतांकडून काय शिकू शकतो? विचार करा, आपल्यासाठी जर आपल्या विरोधकांचा अनादर करणं चुकीचं आहे, तर मग भाऊबहिणींचा अनादर करणं किती चुकीचं ठरेल! खरंतर, बायबल सांगतं की आपण त्यांचा आदर करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. (रोम. १२:१०) असं करून मुळात आपण यहोवाचा आदर करत असतो.

१३-१४. आपण भाऊबहिणींचा आदर कसा करू शकतो? उदाहरणं द्या. (चित्रंसुद्धा पाहा.)

१३ आपण भाऊबहिणींचा आदर कसा करू शकतो? वडिलांनो, जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा नेहमी प्रेमाने शिकवा. (फिले. ८, ९) एखाद्याला सल्ला द्यायची गरज असते, तेव्हा तुम्ही तो रागाने नाही तर प्रेमाने द्या. बहिणींनो, दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलू नका किंवा कोणाची बदनामी करू नका. असं केल्यामुळे इतरांना एकमेकांचा आदर करायला तुम्ही मदत करत असता. (तीत २:३-५) शिवाय, आपण सगळेच मंडळीतल्या वडिलांचा आदर करू शकतो. त्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू शकतो. तसंच ते मंडळीच्या सभा चालवण्यासाठी, प्रचाराच्या कामात पुढाकार घेण्यासाठी आणि ज्यांनी चुकीचं पाऊल उचललंय अशांना मदत करण्यासाठी जी मेहनत घेतात त्याबद्दल त्यांचे आभार मानू शकतो.—गलती. ६:१; १ तीम. ५:१७.

१४ आपली बहीण रोसिओ म्हणते की तिला मंडळीतल्या एका वडिलांनी जेव्हा सल्ला दिला, तेव्हा त्यांचा आदर करायला तिला खूप अवघड गेलं. ती म्हणते: “मला वाटलं त्यांनी मला खूप कठोरपणे सल्ला दिला. घरीसुद्धा मी त्यांच्याबद्दल वाईट-साईट बोलत होते. त्यांना माझी काळजी नाही आणि म्हणून मला त्यांचा सल्ला ऐकण्याची गरज नाही असं मला वाटायचं. पण तरीसुद्धा मी ते कधी माझ्या चेहऱ्‍यावर दाखवलं नाही.” मग या बहिणीला कशामुळे मदत झाली? ती म्हणते: “बायबल वाचत असताना एकदा मी १ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचलं. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की मी त्या भावाचा आदर करत नाहीये, तेव्हा माझं मन मला खाऊ लागलं. मी यहोवाला खूप प्रार्थना केली आणि याबद्दल आपल्या प्रकाशनांमध्ये काही माहिती शोधली. यामुळे मला माझ्या मनोवृत्तीत बदल करायला मदत झाली. काही काळाने माझ्या हे लक्षात आलं की प्रॉब्लेम त्या भावात नाही, तर माझ्यातच होता. माझ्यात गर्व होता. आता मला समजतंय की आपल्यात जर नम्रता असेल, तरच आपण इतरांचा आदर करू शकतो. मला अजूनही माझ्यात काही बदल करायची गरज आहे. पण जेव्हा मी इतरांचा आदर करायचा प्रयत्न करते, तेव्हा मला असं वाटतं की यहोवा माझ्यावर खूश आहे.”

कोलाज: एक वयस्कर बहीण बायबल वाचत असताना, मंडळीतले वडील किती वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेहनत घेतात यावर विचार करत आहे. १. मंडळीतल्या सभेत एक वडील भाषण देत आहेत. २. तोच भाऊ एका वयस्कर भावाला व्हीलचेअरवर बसायला मदत करतोय. ३. तो सभागृहाच्या बाहेर पडलेला बर्फ फावड्याने बाजूला करतोय.

मंडळीतल्या वडिलांना सहकार्य करून आणि ते घेत असलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभार मानून आपण सगळेच त्यांचा आदर करू शकतो (परिच्छेद १३-१४ पाहा)


बाहेरच्या लोकांचा आदर करा

१५. बाहेरच्या लोकांचा आदर करणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

१५ बाहेरच्या लोकांचा आदर करणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं? कधीकधी प्रचारात आपल्याला असे लोक भेटतात ज्यांना देवाबद्दल किंवा बायबलबद्दल काहीच घेणं-देणं नसतं. (इफिस. ४:१८) काहींच्या घरच्यांचा विश्‍वास वेगळा असतो आणि त्यांचं पूर्ण बालपण त्यात गेलेलं असतं. म्हणून ते आपण सांगत असलेला संदेश ऐकायला तयार होत नाहीत. शिवाय, आपल्या कामावरचे लोक किंवा शाळेतले सोबतीही कधीकधी आपल्याशी खूप कठोरपणे वागतात. तसंच, आपल्या कामावरच्या बॉसला किंवा शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा कदाचित आपण घेत असलेल्या मेहनतीची किंमत नसते. या कारणांमुळे आपल्या मनात त्यांच्यासाठी असलेला आदर दिवसेंदिवस कमी होऊ शकतो आणि आपणसुद्धा त्यांच्यासारखेच वागू शकतो.

१६. विश्‍वासात नसलेल्या लोकांचा आदर करणं का महत्त्वाचं आहे? (१ पेत्र २:१२; ३:१५)

१६ आपण बाहेरच्या लोकांचा आदर का केला पाहिजे? ही गोष्ट नेहमी आठवणीत ठेवा, की आपण विश्‍वासात नसलेल्या लोकांशी कसं वागतो, याकडे यहोवाचं पूर्ण लक्ष असतं. प्रेषित पेत्रने ख्रिश्‍चनांना या गोष्टीची आठवण करून दिली, की त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे एखादा “देवाचा गौरव” करायला प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून जेव्हा आपल्याला आपल्या विश्‍वासाची बाजू मांडायची असते, तेव्हा पेत्र म्हणाला की आपण ते “सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून” केलं पाहिजे. (१ पेत्र २:१२; ३:१५ वाचा.) आपल्याला जेव्हा मोठमोठ्या अधिकाऱ्‍यांसमोर किंवा इतर लोकांसमोर आपल्या विश्‍वासाची बाजू मांडण्याची गरज पडते, तेव्हा ते आपण अशा प्रकारे सांगितलं पाहिजे जणू यहोवा तिथेच आहे आणि आपण कसं बोलतोय हे तो पाहतोय. खरंतर, आपण रोजच बाहेरच्या लोकांशी जे बोलतो आणि ज्या पद्धतीने बोलतो, ते सगळं यहोवा बघत असतो आणि ऐकत असतो. बाहेरच्या लोकांचा आदर करण्यासाठी आपल्याकडे किती जबरदस्त कारण आहे!

१७. आपण बाहेरच्या लोकांचा आदर कसा करू शकतो?

१७ आपण बाहेरच्या लोकांचा आदर कसा करू शकतो? प्रचारात कधीकधी आपल्याला बायबलबद्दल कमी माहिती किंवा अगदी काहीच माहीत नसलेले लोक भेटतात, तेव्हा आपण त्यांना कमी समजणार नाही. उलट, आपण त्यांना देवासाठी मौल्यवान असलेले समजू आणि त्यासोबतच आपल्यापेक्षा श्रेष्ठही समजू. (हाग्ग. २:७; फिलिप्पै. २:३) प्रचारात जर एखाद्याने तुमचा अपमान केला, तर त्याला उलट उत्तर देण्याचा मोह टाळा. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे हे दाखवायचा प्रयत्न करू नका. (१ पेत्र २:२३) तुम्हाला पस्तावा होईल असं काहीतरी तुम्ही बोलून गेलात, तर मात्र त्याची लगेच माफी माग. त्यासोबतच कामावरच्या लोकांचा तुम्ही आदर कसा करू शकता? तुमच्या कामात मेहनत घ्या. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही काम करता, त्यांच्यातले चांगले गुण पाहायचा प्रयत्न करा. (तीत २:९, १०) जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता, मेहनती असता आणि तुमचं काम मनापासून करता, तेव्हा लोक तुमच्यावर नेहमीच खूश होतील असं नाही, पण देवाला मात्र नक्की आनंद होईल.—कलस्सै. ३:२२, २३.

१८. आपण इतरांचा आदर करणं आणि तो वाढवत राहणं का महत्त्वाचं आहे?

१८ इतरांचा आदर करण्याची आणि तो आदर वाढवत राहण्याची आपल्याकडे किती चांगली कारणं आहेत! आपण या लेखात पाहिलं, की आपण आपल्या घरच्यांचा आदर करतो, तेव्हा खरंतर आपण आपल्या कुटुंबप्रमुखाचा म्हणजेच यहोवाचा आदर करत असतो. तसंच, आपण भाऊबहिणींचा आदर करतो, तेव्हासुद्धा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचा आदर करत असतो. आणि आपण जेव्हा बाहेरच्या लोकांचा आदर करतो, तेव्हा आपण त्यांना यहोवाचा आदर करायची आणि त्याचा गौरव करायची एक संधी देत असतो. काही माणसांकडून जरी कधीच आपल्याला आदर मिळाला नाही, तरी आपण त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यहोवा यासाठी आपल्याला आशीर्वाद देईल. तो आपल्याला असं वचन देतो: “जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन.”—१ शमु. २:३०.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण आपल्या घरच्यांचा आदर कसा करू शकतो?

  • आपण आपल्या भाऊबहिणींचा आदर कसा करू शकतो?

  • आपण बाहेरच्या लोकांचा आदर कसा करू शकतो?

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा