जीवन कथा
यहोवाने आम्हाला ‘जिथे पेरलंय तिथे फुलत राहायला’ मदत केली
“जिथे पेरलंय तिथे फुलत राहा!” हा सल्ला जरा विचित्र वाटू शकतो. पण मॅट्स आणि ॲन-कॅटरीन या स्वीडनच्या जोडप्याला बऱ्याचदा एका अर्थाने “पेरण्यात आलं.” ते कसं आणि या सल्ल्याचा त्यांना कसा फायदा झाला? चला पाहू या.
१९७९ मध्ये ब्रदर आणि सिस्टर कॅसहोल्म हे गिलियड प्रशालेला उपस्थित राहिले होते. तेव्हापासून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी “पेरण्यात आलं” किंवा नेमण्यात आलं. त्यांनी इराण, मॉरिशस, म्यानमार, टांझानिया, युगांडा आणि झैर या ठिकाणी सेवा केली. त्यांच्या प्रशालेचे प्रशिक्षक ब्रदर जॅक रेडफर्ड यांनी एकदा वर्गात त्यांना “जिथे पेरलंय तिथे फुलत राहा!” हा सल्ला दिला होता. एका झाडाप्रमाणे त्यांना ज्या-ज्या वेळी “पेरण्यात आलं,” “उपटण्यात आलं” आणि “पुन्हा पेरण्यात आलं,” त्या-त्या वेळी या सल्ल्याचा त्यांना फायदा झाला. चला आपण त्यांच्याकडूनच ऐकू या.
मॅट्स आधी तुम्ही सांगा. तुम्हाला सत्य कसं मिळालं?
मॅट्स: दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आम्ही पोलंडमध्ये राहत होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी कॅथोलिक चर्चमधला ढोंगीपणा पाहिला होता. तरीपण ते म्हणायचे की “जगात सत्य कुठे ना कुठेतरी असेलच.” काही काळाने माझ्या लक्षात आलं, की ते बरोबर बोलत होते. एकदा मी बरीच जुनी पुस्तकं वाचण्यासाठी विकत आणली होती. त्यात एक निळं पुस्तक होतं. त्याचं नाव होतं सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निर्विते. त्या पुस्तकाचं शीर्षक माझ्या मनात बसलं. मी ते पुस्तक आणलं त्याच रात्री ते संपूर्ण वाचून काढलं. सकाळपर्यंत मला याची खातरी पटली होती, की मला सत्य सापडलंय.
एप्रिल १९७२ पासून मी यहोवाच्या साक्षीदारांची बरीच प्रकाशनं वाचू लागलो आणि त्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला येशूच्या उदाहरणातल्या त्या व्यापाऱ्यासारखंच वाटत होतं. एक मौल्यवान मोती विकत घेण्यासाठी त्याने आपलं सगळं काही ‘विकून टाकलं’ होतं. मीसुद्धा मला सापडलेला सत्याचा “मोती” विकत घेण्यासाठी युनिव्हर्सिटीतलं शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचं माझं स्वप्न विकून टाकलं होतं. (मत्त. १३:४५, ४६) मग मी १० डिसेंबर १९७२ ला बाप्तिस्मा घेतला.
एका वर्षातच माझ्या आईवडिलांनी आणि लहान भावानेही सत्य स्वीकारलं आणि बाप्तिस्मा घेतला. मग जुलै १९७३ ला मी पूर्ण वेळेची सेवा सुरू केली. आमच्या मंडळीत बरेच आवेशी पायनियर होते. ॲन-कॅटरीन त्यांच्यापैकी एक होती. ती खूप सुंदर आणि आध्यात्मिक होती. आम्ही दोघं प्रेमात पडलो आणि १९७५ ला आमचं लग्न झालं. त्यानंतर पुढची चार वर्षं आम्ही स्वीडनमधल्या स्ट्रॉमसंड या गावात सेवा केली. ते ठिकाण खूप सुंदर होतं आणि तिथले बरेच लोक चांगलं ऐकून घ्यायचे.
ॲन-कॅटरीन: माझे वडील जेव्हा स्टॉकहोममध्ये युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेत होते, तेव्हा शेवटी-शेवटी त्यांना सत्य मिळालं. त्या वेळी मी फक्त तीन महिन्यांची होते. पण तरीसुद्धा माझे वडील मला सभांना आणि प्रचाराला घेऊन जायचे. माझ्या आईला हे सगळं आवडत नव्हतं आणि ती साक्षीदारांना चुकीचं सिद्ध करायचा खूप प्रयत्न करायची. पण तिला ते जमलं नाही आणि तिनेही बाप्तिस्मा घेतला. मी जेव्हा १३ वर्षांची होते, तेव्हा माझा बाप्तिस्मा झाला आणि १६ वर्षांची असताना मी पायनियर सेवा सुरू केली. उमिया या ठिकाणी प्रचारकांची जास्त गरज होती. तिथे सेवा केल्यानंतर मी खास पायनियर बनले.
आमचं लग्न झाल्यावर आम्हाला बऱ्याच लोकांना सत्य शिकवायची संधी मिळाली. त्यांच्यापैकी एक होती मेवर नावाची एक तरुण मुलगी. तिने सत्यासाठी खेळात करियर करायचं स्वप्न सोडून दिलं होतं. नंतर ती माझ्या लहान बहिणीसोबत पायनियर सेवा करू लागली. मग १९८४ ला त्या दोघींनी गिलियड प्रशाला केली आणि आता त्या दोघी इक्वेडोरमध्ये मिशनरी म्हणून सेवा करत आहेत.
तुम्हाला बऱ्याच मिशनरी नेमणुका मिळाल्या आहेत. मग ‘जिथे पेरलंय तिथे फुलत राहण्यासाठी’ कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत झाली?
मॅट्स: आम्हाला बऱ्याचदा नवीन नेमणुकांमध्ये “पुन्हापुन्हा पेरण्यात आलं,” पण येशूसारखं वागल्यामुळे आम्हाला आमच्या नेमणुकांमध्ये “मूळ धरायला” मदत झाली; खासकरून येशूच्या नम्रतेचं अनुकरण केल्यामुळे आम्हाला खूप मदत झाली. (कलस्सै. २:६, ७) जसं की आम्हाला ज्या ठिकाणी नेमण्यात आलं, तिथल्या भाऊबहिणींनी आमच्याशी जुळवून घ्यावं अशी अपेक्षा करण्याऐवजी ते अमुक एक गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने का करत आहेत, हे समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला त्यांचे विचार, त्यांची संस्कृती समजून घ्यायची होती. त्यामुळे आम्ही जितकं जास्त येशूसारखं वागलो, तितकं जास्त आम्हाला जाणवू लागलं की आम्ही “वाहत्या पाण्याजवळ लावलेल्या” झाडासारखे आहोत आणि आम्ही कोणत्याही नेमणुकीत बहरू शकतो.—स्तो. १:२, ३.
वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देण्यासाठी आम्हाला खूप प्रवास करावा लागायचा
ॲन-कॅटरीन: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावलेल्या झाडाला वाढण्यासाठी सूर्यकिरणांचीही गरज असते. यहोवा नेहमी आमच्यासाठी ‘सूर्यासारखा’ होता. (स्तो. ८४:११) त्याने आम्हाला भाऊबहिणींच्या प्रेमाची ऊब जाणवू दिली. उदाहरणार्थ, इराणमधल्या तेहरानच्या छोट्या मंडळीतल्या भाऊबहिणींनी आम्हाला जो पाहुणचार दाखवला, त्यावरून आम्हाला बायबल काळातल्या सेवकांनी जो पाहुणचार दाखवला होता त्याची आठवण झाली. आम्हाला इराणमध्ये राहायला आवडलं असतं, पण जुलै १९८० ला त्या देशात यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी लावण्यात आली आणि आम्हाला ४८ तासांच्या आत तो देश सोडून जायला सांगण्यात आलं. म्हणून मग आम्हाला आफ्रिकेतल्या झैर (आताचं काँगो) या ठिकाणी पुन्हा नेमण्यात आलं.
१९८२ मध्ये झैरमधल्या आमच्या नेमणुकीच्या सुंदर आठवणी
जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की आम्हाला आफ्रिकेत नेमण्यात आलंय, तेव्हा मी खूप रडले. कारण मी तिथल्या सापांबद्दल आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल ऐकलं होतं. आणि त्याची मला धास्तीच बसली होती. पण आमच्या चांगल्या ओळखीच्या एका जोडप्याने तिथे बराच काळ सेवा केली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं: “तुम्ही आफ्रिकेत अजून आलेसुद्धा नाहीत, त्यामुळे घाबरू नका. आम्हाला खातरी आहे की तुम्हाला आफ्रिका नक्की आवडेल.” आणि तसंच झालं! तिथले भाऊबहीण खूप प्रेमळ आणि जीव लावणारे होते. खरंतर जेव्हा सहा वर्षांनी झैरमध्ये आपल्या कामावर बंदी लावण्यात आली आणि आमची तिथून निघण्याची वेळ झाली, तेव्हा मी यहोवाला प्रार्थना करत होते, की “यहोवा प्लीज आम्हाला आफ्रिकेत राहू दे.”
एवढ्या वर्षांत तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळाले?
१९८८ मध्ये तांझानियात असताना आमची “झोपायची खोली”
मॅट्स: वेगवेगळ्या ठिकाणी नेमणुका पूर्ण करत असताना आम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीच्या मिशनरी भाऊबहिणींशी मैत्री करायची संधी मिळाली. तसंच काही नेमणुकांमध्ये आम्हाला बरेच बायबल अभ्यास घेण्याचा आनंद अनुभवता आला. कधीकधी तर आमच्याकडे प्रत्येकी २० बायबल अभ्यास तरी असायचे. त्यासोबतच आफ्रिकेतल्या भाऊबहिणींनी दाखवलेला पाहूणचार आणि प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही. तांझानियामधल्या मंडळ्यांना भेटी देत असताना बऱ्याच भाऊबहिणींनी आमच्यासाठी ‘ऐपतीपेक्षा जास्त केलं.’ जसं की, आम्ही रात्री आमच्या गाडीत झोपायचो. तीच आमची “झोपायची खोली” होती. त्या वेळी भाऊबहीण गरीब असूनसुद्धा आम्हाला काय हवं नको ते पाहायचे. (२ करिंथ. ८:३) तसंच, आम्ही दोघं रात्रीच्या वेळी गप्पा मारायचो आणि दिवसभरातल्या गोष्टी एकमेकांना सांगायचो. यहोवाने आम्हाला कशी मदत केली त्याबद्दल एकमेकांशी बोलायचो. ती वेळ आमच्या दोघांसाठी खूप खास होती!
ॲन-कॅटरीन: माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या भाऊबहिणींना जाणून घेतल्यामुळे खूप आनंद झाला. आम्ही नवीन भाषा शिकलो जसं की फारसी, फ्रेंच, लुगांडा आणि स्वाहिली. त्यासोबतच आम्हाला त्या-त्या भाषेच्या लोकांच्या संस्कृतीबद्दलही जाणून घेता आलं. आम्हाला नवीन लोकांना प्रगती करायला मदत करता आली. आम्ही नवीन मित्र बनवू शकलो आणि त्यांच्यासोबत “खांद्याला खांदा लावून” यहोवाची सेवा करू शकलो.—सफ. ३:९.
त्यासोबतच आम्ही जेव्हा-जेव्हा नवीन ठिकाणी गेलो, तेव्हा-तेव्हा तिथला निसर्ग पाहून आम्हाला खूप छान वाटायचं. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही एखादी नवीन नेमणूक स्वीकारायचो, तेव्हा असं वाटायचं की आम्ही एका प्रवासाला निघालोय आणि यहोवा त्यात आमचा गाईड आहे. त्याने आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या, ज्या आम्ही स्वतःहून कधीच शिकू शकलो नसतो.
तांझानियामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करताना
तुम्हाला कोणत्या समस्या आल्या आणि तुम्ही त्यांचा सामना कसा केला?
मॅट्स: कधीकधी आम्हाला मलेरियासारख्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला. आणि ॲन-कॅटरीनला अचानक काही ऑपरेशन करावे लागले. तसंच, आम्हाला आमच्या आईवडिलांची काळजी वाटत होती. कारण त्यांचं वय वाढत चाललं होतं. पण आम्ही आमच्या भावंडांचे खरंच खूप आभार मानतो, कारण त्यांनी त्यांची खूप चांगली काळजी घेतली. त्यांनी धीराने, आनंदाने आणि प्रेमाने त्यांचं सगळं केलं. (१ तीम. ५:४) तरी कधीकधी आम्हाला असं वाटायचं, की फक्त लांब राहून त्यांना मदत करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी आणखीन जास्त करू शकलो असतो. आणि या विचाराने आम्ही कधीकधी निराश व्हायचो.
ॲन-कॅटरीन: १९८३ ला झैरमध्ये सेवा करत असताना मला कॉलरा झाला. डॉक्टरने मॅट्सला सांगितलं, की “हिला आत्ताच्या आत्ता या देशातून बाहेर ने! “ त्यामुळे दुसऱ्याच दिवशी आम्ही मालवाहतूक विमानाने स्वीडनला गेलो. कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
मॅट्स: आम्हाला असं वाटलं, की आमची मिशनरी सेवा इथेच संपते की काय. त्यामुळे आम्ही खूप निराश झालो आणि रडलो. पण डॉक्टरने सांगितलं त्याच्या अगदी उलटच घडलं. ॲन-कॅटरीनची तब्येत सुधारू लागली आणि एका वर्षानंतर आम्ही पुन्हा झैरला परत आलो. पण या वेळी आम्ही लुबुम्बाशी इथल्या स्वाहिली भाषेच्या एका छोट्या मंडळीत आलो.
ॲन-कॅटरीन: लुबुम्बाशीमध्ये असताना माझं बाळ जन्माआधीच गेलं. आमचा कुटुंब वाढवण्याचा विचार नसला, तरी माझ्या बाळाचं जाणं मला सहन झालं नाही. पण त्या दुःखाच्या काळात यहोवाने आम्हाला एक अनपेक्षित भेट दिली. आम्हाला कधी नव्हे इतके बायबल अभ्यास सुरू करता आले. आणि एका वर्षातच आमच्या मंडळीतल्या प्रचारकांची संख्या ३५ वरून ७० ला गेली आणि सभांच्या उपस्थितीची संख्या ४० वरून २२० ला गेली. आम्ही प्रचारात फार व्यस्त झालो आणि यहोवाने दिलेल्या या आशीर्वादामुळे मला खूप सांत्वन मिळालं. आजही आम्ही आमच्या बाळाचा विचार करतो आणि त्याच्याबद्दल बोलतो. नवीन जगात यहोवा आमचं हे दुःख पूर्णपणे काढून टाकेल त्या काळाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
मॅट्स: एक वेळ अशी आली की ॲन-कॅटरीन खूप जास्त कमजोर झाली. मलासुद्धा एक प्रकारचा कॅन्सर झाला. आणि त्यासाठी मला एक मोठं ऑपरेशन करावं लागलं. पण आता माझी तब्येत ठीक आहे आणि ॲन-कॅटरीनही यहोवाच्या सेवेत शक्य ते सगळं करत आहे.
आमच्या लक्षात आलं की समस्यांचा सामना करणारे आम्ही फक्त एकटेच नाही. १९९४ ला रवांडामध्ये झालेल्या नरसंहारानंतर, आम्ही तिथल्या शरणार्थी शिबिरांमध्ये असलेल्या भाऊबहिणींना भेटायला गेलो होतो. त्यांचा विश्वास, त्यांचा धीर आणि त्या परिस्थितीतसुद्धा त्यांनी दाखवलेला पाहुणचार पाहून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, यहोवाकडे त्याच्या लोकांना कोणत्याही परीक्षेत सांभाळण्याची ताकद आहे.—स्तो. ५५:२२.
ॲन-कॅटरीन: मला आठवतंय, २००७ मध्ये युगांडा शाखेचं समर्पण होतं. तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करत होतो. आमच्यासोबत बसमध्ये जवळपास २५ भाऊबहीण होते. त्यात काही मिशनरी होते आणि काही बेथेलमधले भाऊबहीण होते. आम्ही सगळे केनियामधल्या नैरोबीला चाललो होतो. पण केनियाच्या सीमेला पोहोचण्याआधीच, आमचा एक मोठा अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका ट्रकने आमच्या गाडीला धडक दिली होती. त्यात आमचा ड्रायव्हर आणि पाच भाऊबहीण जागीच गेले आणि नंतर एक बहीण हॉस्पिटलमध्ये वारली. या भाऊबहिणींना पुन्हा भेटण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत!—ईयो. १४:१३-१५.
मलासुद्धा थोडीफार दुखापत झाली होती. काही काळाने माझ्या जखमा भरल्या. पण अपघातामुळे आमच्या दोघांना आणि काही भाऊबहिणींना मानसिक रित्या खूप त्रास झाला. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मी रात्रीची घाबरून अचानक उठायचे आणि मला हार्ट अटॅकसारखी लक्षणं वाटायची. हे सगळं खूप भयंकर होतं. पण यहोवाला सारखंसारखं प्रार्थना करून आणि आवडीची वचनं वाचून मला मदत झाली. आम्ही डॉक्टरांचीसुद्धा मदत घेतली आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. आता माझी ही लक्षणं आटोक्यात आली आहेत आणि ज्यांना माझ्यासारखाच त्रास होतोय, त्यांना यहोवाने सांत्वन द्यावं अशी आम्ही प्रार्थना करतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या कठीण समस्यांचा सामना करण्याबद्दल बोलत होता तेव्हा तुम्ही म्हणालात, की यहोवाने तुम्हाला “अंड्यांसारखं नेलं.” तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं?
मॅट्स: स्वाहिली भाषेत एक म्हण आहे ज्याचा अर्थ होतो, “आम्हाला अंड्यांसारखं उचलून नेण्यात आलं.” जसं एक व्यक्ती अंडी फुटू नयेत म्हणून ती सांभाळून नेतो, त्याच प्रकारे यहोवाने आम्हा दोघांनाही आमच्या प्रत्येक नेमणुकीत खूप सांभाळलंय. आम्हाला ज्याची गरज होती, त्या गोष्टी नेहमी आमच्याजवळ होत्या आणि गरजेपेक्षा जास्त होत्या. यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला त्याचं प्रेम आणि पाठिंबा जाणवू दिला. त्यातला एक मार्ग म्हणजे, नियमन मंडळाने दाखवलेली सहानुभूती.
ॲन-कॅटरीन: यहोवाने आम्हाला प्रेमळपणे जी मदत केली त्याचं एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं. एकदा मला घरून फोन आला आणि मला कळलं, की माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि खूप आजारी आहेत. मॅट्स नुकताच मलेरियातून बरा झाला होता आणि घरी जायला आमच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे आम्ही आमची कार विकायचं ठरवलं. त्यानंतर लगेच आम्हाला दोन फोन आले. पहिला फोन एका जोडप्याचा होता. त्यांनी आमच्या परिस्थितीबद्दल ऐकलं होतं आणि त्यांना आमच्या एका तिकिटाचे पैसे देऊन आम्हाला मदत करायची होती. दुसरा फोन एका वयस्कर बहिणीचा होता. तिने पैशांचा एक बॉक्स तयार केला होता आणि त्यावर “गरज असलेल्यांसाठी” असं लिहिलं होतं. ते पैसे देऊन त्या बहिणीलाही आम्हाला मदत करायची होती. अशा प्रकारे काही मिनिटांतच यहोवा आमच्या मदतीला धावून आला होता.—इब्री १३:६.
तुमच्या ५० वर्षांच्या पूर्ण वेळेच्या सेवेदरम्यान तुम्हाला काय शिकायला मिळालं?
म्यानमारमधली आमची नवीन नेमणूक
ॲन-कॅटरीन: मला शिकायला मिळालं, की ‘शांत राहण्यात आणि यहोवावर भरवसा ठेवण्यातच’ आपली ताकद आहे. जेव्हा आपण येहोवावर भरवसा ठेवतो, तेव्हा आपलं युद्ध त्याचं युद्ध होतं. (यश. ३०:१५; २ इति. २०:१५, १७) प्रत्येक नेमणुकीत यहोवाला आमचं सगळ्यात चांगलं दिल्यामुळे, आम्हाला इतके आशीर्वाद मिळालेत जे आम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने मिळू शकले नसते.
मॅट्स: मला शिकायला मिळालेला सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे, प्रत्येक परिस्थितीत यहोवावर अवलंबून राहणं आणि तो माझ्या वतीने कसं कार्य करतो हे पाहणं गरजेचं आहे. (स्तो. ३७:५) त्याने वचन दिल्याप्रमाणे नेहमी मला मदत केली आहे. आणि आजही म्यानमारमधल्या बेथलमध्ये सेवा करत असताना, आम्ही ही मदत अनुभवतोय.
यहोवाने आमच्यावर एकनिष्ठ प्रेम केलं आणि तेच प्रेम तो आपली सेवा वाढवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांवर करेल अशी आमची आशा आहे. आम्हाला खातरी आहे, की जर त्यांनी यहोवाची मदत स्वीकारली तर त्यांनाही जिथे पेरलं आहे तिथे फुलत राहण्यासाठी मदत होईल.