वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 जुलै पृ. २०-२५
  • तुम्ही समाधानी राहायचं ‘रहस्य शिकून घेतलंय’ का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही समाधानी राहायचं ‘रहस्य शिकून घेतलंय’ का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कृतज्ञतेचा गुण वाढवा
  • नम्र राहा
  • आपल्या आशेवर मनन करा
  • “त्याची भीती बाळगणाऱ्‍यांना काहीच कमी पडत नाही”
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • सत्य आणि असत्यमधला फरक ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 जुलै पृ. २०-२५

अभ्यास लेख ३१

गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!

तुम्ही समाधानी राहायचं ‘रहस्य शिकून घेतलंय’ का?

“कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहायला मी शिकून घेतलं आहे.”—फिलिप्पै. ४:११.

या लेखात:

कृतज्ञतेचा गुण वाढवून, नम्र राहून आणि भविष्यातल्या आशेवर मनन करून आपण समाधानी राहायला कसं शिकू शकतो, ते पाहू या.

१. समाधानी असण्याचा काय अर्थ होतो आणि काय अर्थ होत नाही?

तुम्ही समाधानी आहात का? जो समाधानी असतो. त्याला सध्याच्या आशीर्वादांवर विचार केल्यामुळे आनंद आणि शांती मिळते. त्याच्याकडे नसलेल्या गोष्टींसाठी तो नाराज राहत नाही किंवा चिडत नाही. पण समाधानी राहण्याचा असा अर्थ होत नाही, की आपण हातावर हात ठेऊन बसायचं आणि काहीच मेहनत करायची नाही. उदाहरणार्थ, आपल्याला जर यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त करायचं असेल, तर त्यात चुकीचं असं काहीच नाही. (रोम. १२:१; १ तीम. ३:१) पण जर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी जबाबदारी मिळाली नाही, तरी समाधानी असल्यामुळे आपल्याला आपला आनंद टिकवून ठेवता येईल.

२. समाधानी न राहणं इतकं धोकादायक का आहे?

२ आपण जर समाधानी राहिलो नाही, तर आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये जे समाधानी नसतात, ते गरज नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. दुःखाची गोष्ट म्हणजे काही भाऊबहिणींनी तर, पैशांची आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टींची चोरीसुद्धा केली आहे. त्यांनी कदाचित स्वतःची अशी समजूत घातली असेल, की ‘तो माझा हक्क आहे,’ ‘मी त्यासाठी खूप वाट पाहिली आहे’ किंवा मग ‘मी नंतर पैसे परत करीन.’ काहीही असलं तरी कुठल्याही प्रकारची चोरी यहोवाला आवडत नाही आणि त्यामुळे त्याचा अनादर होतो. (नीति. ३०:९) काही जण तर, यहोवाच्या सेवेत जबाबदारी न मिळाल्यामुळे इतके निराश झालेत की त्यांनी अक्षरशः यहोवाची सेवा करायचंच सोडून दिलंय. (गलती. ६:९) पण यहोवाचे समर्पित सेवक असं करायचा विचार तरी कसा करू शकतात? समाधानी राहायचं सोडून दिल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून असं झालं असेल.

३. फिलिप्पैकर ४:११, १२ मधून आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी मिळते?

३ आपण सगळेच स्वतःमध्ये समाधानी वृत्ती वाढवू शकतो. प्रेषित पौलने म्हटलं: “कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहायला मी शिकून घेतलं आहे.” (फिलिप्पैकर ४:११, १२ वाचा.) लक्षात घ्या, की त्याने हे शब्द तुरुंगात असताना लिहिले. तशा परिस्थितीतसुद्धा त्याने त्याचा आनंद गमावला नव्हता. का? कारण त्याने समाधानी राहायचं ‘रहस्य शिकून घेतलं’ होतं. आपल्याला जर समाधानी राहायला कठीण जात असेल, तर पौलच्या शब्दांमुळे आणि अनुभवामुळे आपल्याला मदत होऊ शकते. आपल्याला याची खातरी मिळू शकते, की आपण स्वतःमध्ये समाधानी वृत्ती वाढवू शकतो. आपण अशी अपेक्षा करू नये, की आपल्याला आपल्या परिस्थितीत आपोआपच समाधानी राहता येईल. याउलट आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आपण ते कसं करू शकतो? चला आता त्याबद्दल पुढे पाहू या.

कृतज्ञतेचा गुण वाढवा

४. कृतज्ञ असल्यामुळे आपल्याला समाधानी राहायला कशी मदत होऊ शकते? (१ थेस्सलनीकाकर ५:१८)

४ कृतज्ञ व्यक्‍ती सहसा समाधानी असते. (१ थेस्सलनीकाकर ५:१८ वाचा.) उदाहरणार्थ, आपण जर आपल्याकडे असलेल्या गरजेच्या गोष्टींसाठी कृतज्ञता दाखवली, तर आपल्याकडे नसलेल्या गोष्टींची आपण सहसा जास्त चिंता करत बसणार नाही. यहोवाच्या सेवेत आपल्याकडे सध्या ज्या जबाबदाऱ्‍या आहेत, त्याबद्दल जर आपण कदर बाळगली तर आपण आपल्याला हव्या असलेल्या नवीन जबाबदारीची हाव बाळगणार नाही. आपली सध्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यावर आपण लक्ष देऊ. म्हणूनच बायबलमध्येही आपल्याला प्रार्थनेत यहोवाचे आभार मानायचं उत्तेजन दिलंय. आपण जर आभारी असलो तर आपल्याला “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” मिळवायला मदत होईल.—फिलिप्पै. ४:६, ७.

५. इस्राएली लोकांनी कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ असायला पाहिजे होतं? (चित्रसुद्धा पाहा.)

५ इस्राएली लोकांच्या बाबतीत काय झालं, याचा विचार करा. इजिप्तमध्ये त्यांना जे अन्‍न मिळायचं ते मिळत नसल्यामुळे त्यांनी बऱ्‍याचदा कुरकुर केली. (गण. ११:४-६) हे खरं आहे की ओसाड रानात त्यांचं जीवन सोपं नव्हतं. पण कुठल्या गोष्टींमुळे त्यांना समाधानी राहायला मदत झाली असती? यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केलं होतं, त्यावर त्यांनी मनन करायला पाहिजे होतं आणि त्याबद्दल त्याचे आभार मानायला पाहिजे होते. इजिप्तमध्ये असताना जेव्हा त्यांना गुलामांसारखी वाईट वागणूक दिली जात होती, तेव्हा यहोवाने इजिप्तच्या लोकांवर दहा पीडा आणल्या. मग यहोवाने त्यांची तिथून सुटका केली. तेव्हा ते इजिप्तच्या लोकांकडून सोनं-चांदी आणि कपडे ‘लुटून’ बाहेर निघाले. (निर्ग. १२:३५, ३६) आणि जेव्हा इजिप्तचे लोक इस्राएली लोकांचा पाठलाग करून तांबड्या समुद्राकडे आले, तेव्हा यहोवाने त्यांना वाचवण्यासाठी समुद्र दुभागला. त्यानंतर ओसाड रानातून प्रवास करत असताना यहोवाने त्यांना दररोज मान्‍ना खाऊ घातला. पण तरी इस्राएली लोक कुरकुर का करत होते? त्यांच्याजवळ पुरेसं अन्‍न नव्हतं म्हणून नाही, तर यहोवाने त्यांना जे काही दिलं होतं, त्याबद्दल त्यांना कदर नसल्यामुळे ते कुरकुर करत होते.

काही इस्राएली लोक मोशेजवळ मान्‍नाविषयी कुरकुर करत आहेत. बाकीचे लोक हे पाहता-पाहता मान्‍ना गोळा करत आहेत.

इस्राएली लोकांना समाधानी का राहता आलं नाही? (परिच्छेद ५ पाहा)


६. आपण कोणत्या मार्गांनी कृतज्ञतेचा गुण वाढवू शकतो?

६ मग तुम्ही कृतज्ञतेचा गुण कसा वाढवू शकता? सगळ्यात आधी तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला दररोज वेळ काढा. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी आभार मानावेसे वाटतात, त्या दोन-तीन गोष्टी कदाचित तुम्ही लिहू शकता. (विलाप. ३:२२, २३) दुसरी गोष्ट म्हणजे, इतरांचे आभार माना. इतर जण तुमच्यासाठी जे काही करतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानायला पुढाकार घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमितपणे यहोवाचे आभार माना. (स्तो. ७५:१) तिसरी गोष्ट म्हणजे, असे मित्र निवडा ज्यांच्यात कृतज्ञतेचा गुण आहे. कारण तुमच्या मित्रांचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो. ते जर सतत आभार मानत असतील, तर तुम्हीही आभार मानाल. पण जर ते सतत कुरकुर करत असतील, तर तुम्हीही सतत कुरकुर कराल. (अनु. १:२६-२८; २ तीम. ३:१, २, ५) तुम्ही जर आभार मानायच्या संधी शोधल्या, तर तुम्हाला तुमच्या समस्यांबद्दल आणि तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल जास्त वाईट वाटणार नाही.

७. आची नावाच्या बहिणीने कृतज्ञतेचा गुण कसा वाढवला आणि त्याचा काय परिणाम झाला?

७ इंडोनेशियामध्ये राहणाऱ्‍या आची नावाच्या बहिणीचा विचार करा. ती म्हणते: “कोविड-१९ महामारीच्या वेळी मी माझ्या परिस्थितीची तुलना इतर भाऊबहिणींच्या परिस्थितीशी करू लागले. त्यामुळे मी खूप निराश झाले. आणि मी समाधानी राहू शकत नव्हते.” (गलती. ६:४) मग कोणत्या गोष्टीमुळे तिला स्वतःचा दृष्टिकोन बदलता आला? ती म्हणते: “मला दररोज जे आशीर्वाद मिळत होते, त्यांचा मी विचार करू लागले. आणि यहोवाच्या संघटनेचा भाग असल्यामुळे मला ज्या चांगल्या गोष्टी मिळत आहेत, त्यावरही मी विचार करू लागले. मग मी त्यासाठी यहोवाचे आभार मानले. यामुळे मला माझा आनंद परत मिळवता आला आणि मी समाधानी राहू शकले.” जर तुमच्यावरही निराश करून टाकणारे विचार हावी होत असतील, तर पुन्हा कृतज्ञतेचा गुण वाढवण्यासाठी तुम्ही अशीच पावलं उचलू शकता.

नम्र राहा

८. बारूख कोणत्या पाशात अडकला?

८ यिर्मया संदेष्ट्याचा सचिव बारूख काही वेळासाठी एका पाशात अडकला. यिर्मया संदेष्ट्याला बेईमान इस्राएली लोकांना न्यायदंडाचा संदेश सांगायचा होता. आणि या कामात यिर्मयाला मदत करायची जबाबदारी बारूखला मिळाली होती. एक वेळ अशी आली, की बारूखचं लक्ष विचलित झालं. यहोवाची आपल्याकडून जी अपेक्षा आहे, त्यावर लक्ष लावण्याऐवजी बारूख स्वतःचा आणि त्याला जे हवंय त्या गोष्टींचा जास्त विचार करू लागला. म्हणून यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने त्याला असं म्हटलं: “तू मोठमोठ्या गोष्टी मिळवायची इच्छा बाळगतोस. अशा इच्छा बाळगू नकोस.” (यिर्म. ४५:३-५) दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा त्याला असं म्हणत होता, की आहे त्या परिस्थितीत समाधानी राहा. बारूखने हा सल्ला स्वीकारला आणि त्यानंतर तो कायमसाठी यहोवाचा मित्र बनून राहिला.

९. १ करिंथकर ५:६, ७ प्रमाणे नम्रतेमुळे आपल्याला कोणती गोष्ट ओळखायला मदत होईल? (चित्रंसुद्धा पाहा.)

९ कधीकधी एका ख्रिस्ती व्यक्‍तीला असं वाटू शकतं, की सेवेतला अमुक एक बहुमान त्याला मिळालाच पाहिजे; कारण तो त्याचा हक्क आहे. त्याच्यात कदाचित कौशल्य असेल, तो मेहनती असेल किंवा अनुभवी असेल. किंवा मग या तिन्ही गोष्टी त्याच्यात असतील. पण तो बहुमान त्याला न मिळता दुसऱ्‍याला मिळाला असेल. मग अशा परिस्थितीत निराश न होण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत होईल? तो कदाचित १ करिंथकर ५:६, ७ (वाचा.) मध्ये दिलेल्या पौलच्या शब्दांवर विचार करू शकतो. आपल्याला मिळालेला प्रत्येक बहुमान आणि प्रत्येक कौशल्य आपल्याला यहोवाकडून मिळतं. या देणग्या आपण कमवत नाही किंवा आपण त्यांच्या लायक नाही. खरंतर यहोवाच्या अपार कृपेमुळेच आपल्याला या देणग्या मिळाल्या आहेत.—रोम. १२:३, ६; इफिस. २:८, ९.

कोलाज: यहोवाच्या सेवेत जबाबदाऱ्‍या असलेले भाऊबहीण. १. एक भाऊ उपासनेसाठी असलेल्या इमारतीच्या पाईपचं प्रेशर चेक करतोय. २. साइन लँग्वेजच्या संमेलनात एक बहीण मुलाखत देत आहे. ३. एक भाऊ जाहीर भाषण देतोय.

आपल्याकडे असलेली प्रत्येक देणगी यहोवाच्या अपार कृपेमुळेच आहे (परिच्छेद ९ पाहा) b


१०. आपण नम्रतेचा गुण कसा वाढवू शकतो?

१० येशूने आपल्यासमोर जे उदाहरण मांडलंय, त्यावर खोलवर विचार करून आपण नम्रतेचा गुण वाढवू शकतो. जेव्हा येशूने प्रेषितांचे पाय धुतले, तेव्हा काय घडलं याचा विचार करा. प्रेषित योहानने म्हटलं: “(१) आपल्या पित्याने सगळ्या गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या आहेत आणि (२) आपण देवाकडून आलो आहोत आणि (३) देवाकडे जात आहोत हे माहीत असून . . . [येशू] शिष्यांचे पाय धुऊ लागला.” (योहा. १३:३-५) या सगळ्या गोष्टींमुळे येशू असा विचार करू शकला असता, की खरंतर शिष्यांनी माझे पाय धुतले पाहिजेत. पृथ्वीवर असताना त्याने कधीच असा विचार केला नाही, की आपण ऐशआरामाचं जीवन जगलं पाहिजे. (लूक ९:५८) येशू नम्र होता. तो समाधानी होता. खरंच, त्याने आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलंय!—योहा. १३:१५.

११. नम्रतेमुळे डेनिसला समाधानी राहायला कशी मदत झाली?

११ नेदरलँड्‌समध्ये राहणाऱ्‍या डेनिस नावाच्या भावाने येशूसारखं नम्र राहायचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यासाठी सोपं नव्हतं. तो म्हणतो: “मला हवी असलेली जबाबदारी जेव्हा एखाद्याला मिळते, तेव्हा मला कधीकधी असं वाटतं, की ती जबाबदारी मला मिळायला पाहिजे होती. आणि त्यामुळे मी खूप निराश होतो. पण असं जेव्हा होतं, तेव्हा मी नम्रतेच्या विषयावर अभ्यास करतो. JW लायब्ररी ॲपवर मी नम्रतेबद्दलची काही वचनं टॅग (tag) करून ठेवली आहेत. त्यामुळे मला ती पटकन शोधता येतात. आणि पुन्हापुन्हा वाचता येतात. त्यासोबतच, नम्रतेबद्दल असलेले काही व्हिडिओसुद्धा मी माझ्या फोनवर डाउनलोड करून ठेवलेत.a आणि मी ते बऱ्‍याचदा ऐकतो. या सगळ्या गोष्टींवरून मला हे कळलंय, की आपण यहोवाच्या सेवेत जे करतो ते आपल्या नाही, तर यहोवाच्या गौरवासाठी असलं पाहिजे. तसंच, यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही करतो त्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा एक छोटासा वाटा आहे.” जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीत समाधानी नसल्यासारखं वाटत असेल, तर नम्रतेचा गुण वाढवण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलू शकता. यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत होईल आणि तुम्हाला समाधानी असल्यासारखं वाटेल.—याको. ४:६, ८.

आपल्या आशेवर मनन करा

१२. भविष्यात होणाऱ्‍या कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला समाधानी राहायला मदत होईल? (यशया ६५:२१-२५)

१२ जेव्हा आपण भविष्याच्या आपल्या आशेवर मनन करतो, तेव्हा आपल्याला आणखीन समाधानी राहता येतं. आपण आज बऱ्‍याच समस्यांचा आणि संकटांचा सामना करत आहोत. पण यशयाच्या पुस्तकातून आपल्याला कळतं, की समस्यांचा सामना करत असताना आपल्याला कसं वाटतं हे यहोवा समजू शकतो. तसंच तो या समस्या काढून टाकण्याचं वचनही आपल्याला देतो. (यशया ६५:२१-२५ वाचा.) भविष्यात आपण सुरक्षित असू. आपण चांगल्या आणि सुंदर घरांमध्ये राहू. तसंच, आपण अशी कामं करू ज्यांमुळे आपल्याला आनंद मिळेल. आपण पौष्टिक आणि चविष्ट अन्‍न खाऊ. आपल्याला किंवा आपल्या मुलांना कुठल्याच गोष्टीचा धोका नसेल. (यश. ३२:१७, १८; यहे. ३४:२५) आपलं भविष्य खूप सुंदर आहे आणि सुरक्षित आहे!

१३. कोणत्या परिस्थितीत कदाचित आपल्याला आपल्या आशेवर लक्ष लावावं लागेल?

१३ आज कधी नव्हे इतकं आपल्याला आपल्या आशेवर लक्ष लावण्याची गरज आहे. का? कारण आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच “कठीण” समस्यांचा सामना करावा लागतोय. (२ तीम. ३:१) पण यहोवा आपल्याला मार्गदर्शन देऊन, बळ देऊन आणि आपल्या पाठीशी उभं राहून या समस्यांचा सामना करायला दररोज मदत करतोय. (स्तो. १४५:१४) तसंच, आपल्या आशेमुळेही आपल्याला कठीण समस्यांचा सामना करायला मदत होते. कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणं कठीण जात असेल. मग याचा अर्थ असा होतो का, की तुमची परिस्थिती कधीच सुधारणार नाही? नाही तसं नाही. यहोवाने वचन दिलंय, की तो नंदनवनात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही. (स्तो. ९:१८; ७२:१२-१४) तुम्ही कदाचित आज आजारपणाचा, निराशेचा किंवा म्हातारपणामुळे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करत असाल. मग तुम्ही कायमसाठी हे सगळं सोसत राहणार का? नक्कीच नाही. कारण देवाच्या नवीन जगात आजारपण आणि मृत्यू कायमचा नाहीसा होईल. (प्रकटी. २१:३, ४) हे खरंय, की आजच्या जगात आपल्यावर समस्या तर येतीलच. पण आपल्या आशेमुळे आपली चिडचिड होणार नाही. आपण निराश राहणार नाही. उलट, आपण समाधानी असू. अन्यायाचा, आजारपणाचा किंवा इतर कुठल्याही परीक्षेचा सामना करत असतानाही आपण समाधानी राहू शकतो. का? कारण आपल्यासमोर कितीही कठीण प्रसंग आले तरी आपल्याला हे माहीत आहे, की ही “संकटं तात्पुरती” आहेत आणि लवकरच नवीन जगात आपल्याला यातून कायमची सुटका मिळेल.—२ करिंथ. ४:१७, १८.

१४. आपण आपली आशा पक्की कशी करू शकतो?

१४ आपण पाहिलं की समाधानी राहण्यासाठी आशा खूप महत्त्वाची आहे. मग आपण आपली आशा कशी पक्की करू शकतो? ज्या प्रकारे एखाद्या व्यक्‍तीला लांबच्या गोष्टी स्पष्ट पाहण्यासाठी चष्मा लावावा लागू शकतो, त्याच प्रकारे आपल्याला आपली आशा पक्की करण्यासाठी काही पावलं उचलावी लागू शकतात. त्यामुळे भविष्यातलं नंदनवन आपल्याला आणखीन स्पष्टपणे पाहता येईल. आपल्याला जर पैशांची चिंता असेल, तर आपण अशा एका जगाची कल्पना करू शकतो जिथे पैसा, कर्ज आणि गरीब-श्रीमंतीचा भेद कायमचा मिटून जाईल. तसंच यहोवाच्या सेवेत एखादी जबाबदारी न मिळाल्यामुळे जर आपण चिंतेत असू, तर आपण नंदनवनाचा विचार करू शकतो. कारण परिपूर्ण झाल्यानंतर आणि हजारो वर्षांसाठी यहोवाची सेवा केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या चिंता फार क्षुल्लक वाटतील. (१ तीम. ६:१९) आपल्या परिस्थितीवर विचार करण्याऐवजी भविष्यावर मनन करणं कदाचित सुरुवातीला आपल्याला कठीण वाटेल. पण आपण जितक्या जास्त वेळा मनन करू, तितकं जास्त आपल्याला तसं करणं सोपं जाईल.

१५. क्रिस्टाने जे म्हटलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१५ आशेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते हे समजून घेण्यासाठी क्रिस्टा नावाच्या बहिणीचा विचार करा. ती आधी उल्लेख केलेल्या डेनिसची बायको आहे. ती म्हणते: “मला असा एक आजार आहे ज्यामुळे माझे स्नायू कमजोर होत आहेत. त्यामुळे मी चालू-फिरू शकत नाही. आणि मला सतत व्हीलचेअर वापरावी लागते. मला बऱ्‍याचदा झोपूनच राहावं लागतं. मला दररोज खूप त्रास होतो. माझ्या डॉक्टरने अलीकडेच मला असं सांगितलंय, की माझी परिस्थिती सुधारण्याच्या पलीकडेए. पण मी लगेच स्वतःला म्हटलं, ‘माझ्या आशेबद्दल त्याला काय माहीत? मी जसं भविष्याकडे पाहते तसं तो पाहत नाही.’ मी माझ्या आशेवर लक्ष लावते. त्यामुळे माझं मन शांत होतं. आज मला या जगात समस्यांचा सामना करावा लागत असला, तरी नवीन जगात मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेईन.”

“त्याची भीती बाळगणाऱ्‍यांना काहीच कमी पडत नाही”

१६. यहोवाची भीती बाळगणाऱ्‍यांना “काहीच कमी पडत नाही,” असं दावीद राजा का म्हणू शकला?

१६ यहोवाचे सेवक समाधानी असले, तरी त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दावीद राजाचंच उदाहरण घ्या. त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. त्याच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले. त्याचा विश्‍वासघात करण्यात आला. कितीतरी वर्षांपर्यंत त्याला त्याचा जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. तरी एका कठीण समस्येचा सामना करत असताना तो यहोवाबद्दल म्हणाला: “त्याची भीती बाळगणाऱ्‍यांना काहीच कमी पडत नाही.” (स्तो. ३४:९, १०) तो असं का म्हणू शकला? कारण त्याला माहीत होतं की यहोवा त्याच्या समस्या काढून टाकणार नसला, तरी तो त्याला गरजेच्या गोष्टी नक्की पुरवेल. (स्तो. १४५:१६) दावीदप्रमाणे आपणसुद्धा ही खातरी ठेवू शकतो की आपल्यावर समस्या येतात, तेव्हा यहोवा आपल्याला सांभाळेल. आणि हे माहीत असल्यामुळे आपण समाधानी राहू शकतो.

१७. तुम्ही समाधानी राहायचं रहस्य शिकून घ्यायचा निश्‍चय का केलाय?

१७ यहोवाची इच्छा आहे की आपण समाधानी असावं. (स्तो. १३१:१, २) म्हणून, समाधानी राहण्याचं रहस्य शिकून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करा. जर तुम्ही कृतज्ञता वाढवण्यासाठी, नम्र राहण्यासाठी आणि आपली आशा पक्की करण्यासाठी मेहनत घेतली, तर तुम्ही म्हणू शकाल “मी समाधानी आहे.”—स्तो. १६:५, ६.

खाली दिलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला समाधानी राहायला कशी मदत होऊ शकते?

  • कृतज्ञतेचा गुण वाढवणं.

  • नम्र राहणं.

  • आशेवर मनन करणं.

गीत ११८ दे विश्‍वासाचं दान!

a उदाहरणार्थ, jw.org वर नम्र की गर्विष्ठ? हा सकाळच्या उपासनेचा कार्यक्रम पाहा.

b चित्राचं वर्णन: एक भाऊ उपासनेसाठी असलेल्या इमारतीच्या दुरुस्तीचं काम करतोय, साइन लँग्वेज शिकलेली एक बहीण संमेलनात मुलाखत देत आहे आणि एक भाऊ जाहीर भाषण देतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा