अभ्यास लेख ३०
गीत ९७ यहोवाच्या वचनाने जगू या
आपल्याला आजसुद्धा बायबलच्या मूलभूत शिकवणींचा फायदा होऊ शकतो का?
“मी तुम्हाला सतत या गोष्टींची आठवण करून देईन. अर्थात, तुम्हाला या गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत आणि . . . सत्यात तुम्ही अगदी खंबीर आहात.”—२ पेत्र १:१२.
या लेखात:
बऱ्याच वर्षांआधी शिकलेली बायबलची मूलभूत सत्यं आपण आजही कशी लागू करू शकतो हे पाहू या.
१. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सत्य शिकलात तेव्हा त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला?
बायबलच्या मूलभूत शिकवणींमुळे आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. उदाहरणार्थ, देवाचं नाव यहोवा आहे हे जेव्हा आपण पहिल्यांदा शिकलो, तेव्हा त्याचे मित्र बनण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचललं. (यश. ४२:८) तसंच, मेलेल्या लोकांच्या स्थितीबद्दल आपण शिकलो तेव्हा मरण पावलेल्या आपल्या जवळच्या लोकांना त्रास होत असेल का, याबद्दलची चिंता करायचं आपण सोडून दिलं. (उप. ९:१०) शिवाय, देव या संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवेल याबद्दलसुद्धा आपण शिकलो, तेव्हा भविष्याबद्दलची काळजी करायचं आपण सोडून दिलं. आपण फक्त ७० किंवा ८० वर्षांसाठी नाही, तर कायमसाठी जगू याची आपल्याला खातरी पटली.—स्तो. ३७:२९; ९०:१०.
२. प्रौढ ख्रिश्चनांनासुद्धा बायबलच्या मूलभूत शिकवणींचा फायदा होऊ शकतो, हे आपल्याला २ पेत्र १:१२, १३ मधून कसं दिसतं?
२ आपण बायबलच्या मूलभूत शिकवणींना कधीच हलक्यात घेऊ नये. प्रेषित पेत्रने त्याचं दुसरं पत्र अशा भाऊबहिणींना लिहिलं, जे ‘सत्यात अगदी खंबीर होते.’ (२ पेत्र १:१२, १३ वाचा.) पण त्यांना मंडळीत आध्यात्मिक धोक्यांचा सामना करावा लागत होता. कारण मंडळीत असे काही लोक होते, जे त्यांना सत्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करत होते. (२ पेत्र २:१-३) या धोक्यांपासून भाऊबहिणींचं संरक्षण व्हावं, म्हणून पेत्रला त्यांना मदत करायची इच्छा होती. म्हणून त्याने त्यांना आधीच शिकलेल्या काही गोष्टींची आठवण करून दिली. यामुळे या भाऊबहिणींना शेवटपर्यंत टिकून राहायला मदत होणार होती.
३. सगळ्याच ख्रिश्चनांनी बायबलच्या मूलभूत शिकवणींवर मनन का करत राहिलं पाहिजे, हे समजावून सांगा.
३ आपण जसजसं सत्यात प्रौढ होत जातो, तसतसं आपल्याला बायबलच्या मूलभूत शिकवणींमधून नवनवीन धडे शिकायला मिळू शकतात. कल्पना करा: आपण दोन लोकांना एक पदार्थ बनवायला सांगतो. त्यातली पहिली व्यक्ती खूप अनुभवी आहे आणि दुसरी व्यक्ती नुकतंच स्वयंपाक करायला शिकली आहे. तो पदार्थ बनवण्यासाठी आपण त्या दोघांनाही सारखंच सामान देतो. पहिली व्यक्ती अनुभवी असल्यामुळे ती त्याच सामानाचा वापर करून अगदी वेगळ्या पद्धतीने तो पदार्थ बनवेल आणि तो पदार्थ खूप चविष्ट बनेल. अगदी तसंच, जो बऱ्याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत आलाय आणि ज्याने नुकतीच बायबलची सत्यं शिकली आहेत, त्या दोघांचा बायबलच्या मूलभूत शिकवणींकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल. आपल्या बाबतीतही हेच खरंय. आपला बाप्तिस्मा झाल्यापासून आपली परिस्थिती बदलली असेल आणि यहोवाच्या सेवेत आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यासुद्धा मिळाल्या असतील. म्हणून आपण खूप आधी शिकलेल्या बायबलच्या शिकवणींना आताच्या परिस्थितीला लागू करतो, तेव्हा कदाचित आपल्याला काही नवीन गोष्टी आणि व्यावहारिक धडे शिकायला मिळू शकतात. चला, आता आपण प्रौढ ख्रिश्चनांना बायबलच्या तीन मूलभूत शिकवणींतून काय शिकायला मिळू शकतं ते पाहू या.
यहोवा निर्माणकर्ता आहे
४. यहोवाच निर्माणकर्ता आहे हे जाणून घेतल्यामुळे त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडलाय?
४ “ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.” (इब्री ३:४) आपल्याला माहीत आहे, की ही पृथ्वी आणि त्यावरचं जीवन हे सगळं काही एका बुद्धिमान आणि शक्तिशाली निर्माणकर्त्याने बनवलंय. त्याने आपल्याला बनवलं असल्यामुळे त्याला आपल्याबद्दल खडा न् खडा माहिती आहे. इतकंच काय, तर त्याला आपली काळजीसुद्धा आहे. आपल्यासाठी काय चांगलं आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. यहोवाच निर्माणकर्ता आहे, हे साधंसं सत्य माहीत असल्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पडला. आणि त्यामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ आणि उद्देश मिळाला.
५. कोणतं सत्य माहीत असल्यामुळे आपल्याला नम्र राहायला मदत होते? (यशया ४५:९-१२)
५ यहोवाच निर्माणकर्ता आहे हे सत्य माहीत असल्यामुळे आपल्याला नम्र राहायला मदत होते. आता ईयोबचा विचार करा. ईयोब स्वतःवर जास्त लक्ष देत होता आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून यहोवाने त्याला या गोष्टीची आठवण करून दिली, की तो सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आहे. (ईयो. ३८:१-४) यामधून ईयोब हे शिकला, की देवाचे विचार हे माणसांच्या विचारांपेक्षा श्रेष्ठ असतात. आपल्या सर्वशक्तिमान निर्माणकर्त्याबद्दल लिहिताना यशया संदेष्ट्यानेही पुढे असं लिहिलं: “मातीचा गोळा आपल्याला घडवणाऱ्या कुंभाराला कधी विचारेल का? ‘हे तू काय बनवतोस?’”—यशया ४५:९-१२ वाचा.
६. आपला निर्माणकर्ता किती शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे यावर आपल्याला कदाचित कधी विचार करावा लागेल? (चित्रंसुद्धा पाहा.)
६ एक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा यहोवाची बरीच वर्षं सेवा करते तेव्हा तिच्याकडे खूप अनुभव येतो. म्हणून ती मार्गदर्शनासाठी यहोवावर आणि त्याच्या वचनावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या विचारांवर अवलंबून राहू शकते. (ईयो. ३७:२३, २४) पण यहोवा किती महान आहे आणि त्याची बुद्धी किती अफाट आहे, यावर खोलवर विचार केल्यामुळे काय होऊ शकतं? (यश. ४०:२२; ५५:८, ९) या मूलभूत सत्यामुळे यहोवाचे विचार आपल्या विचारांपेक्षा किती श्रेष्ठ आहेत याची तिला जाणीव होईल. यामुळे तिला नम्र राहायला मदत होईल.
आपल्या मतांबद्दल योग्य दृष्टिकोन टिकवून ठेवायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (परिच्छेद ६ पाहा) d
७. मार्गदर्शनात झालेला बदल स्वीकारण्यासाठी राहेलाने काय केलं?
७ स्लोवेनियात राहणाऱ्या राहेला नावाच्या आपल्या बहिणीचा विचार करा. तिला या गोष्टीची जाणीव झाली, की आपल्या निर्माणकर्त्याबद्दल विचार केल्यामुळे संघटनेत होणारे बदल स्वीकारायला मदत होते. ती म्हणते: “पुढाकार घेणारे भाऊ जे निर्णय घेतात ते स्वीकारायला मला कधीकधी कठीण जातं. जसं की, २०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८ मध्ये भावांनी दाढी ठेवायची की नाही याबद्दल सांगण्यात आलं होतं. पण हा रिपोर्ट पाहूनसुद्धा मी जेव्हा पहिल्यांदा दाढी ठेवलेल्या एका भावाला भाषण देताना पाहिलं, तेव्हा मला धक्काच बसला. हा बदल स्वीकारायला मला मदत मिळावी म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली.” राहेलाला ही गोष्ट लक्षात आली, की स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता या नात्याने यहोवा त्याच्या संघटनेचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायला सक्षम आहे. एखादी नवीन समज येते तेव्हा त्यानुसार बदल करायला आणि नवीन मार्गदर्शन स्वीकारायला तुम्हालाही जर कठीण जात असेल, तर तुम्ही काय करू शकता? अशा वेळी तुम्ही नम्र राहून आपल्या निर्माणकर्त्याच्या अफाट बुद्धीवर आणि शक्तीवर मनन करू शकता.—रोम. ११:३३-३६.
देव आपल्यावर दुःख का येऊ देतो?
८. यहोवा आपल्यावर दुःख का येऊ देतो हे शिकल्यामुळे आपल्याला कसा फायदा झालाय?
८ यहोवा आपल्यावर दुःख का येऊ देतो? ज्या लोकांना या प्रश्नाचं उत्तर अजून कळलेलं नाही, ते एकतर देवावर खूप रागावतात किंवा तो मुळात अस्तित्वातच नाही असा निष्कर्ष काढतात. (नीति. १९:३) याउलट आपल्याला हे समजलंय, की यहोवामुळे नाही तर वारशाने मिळालेल्या पाप आणि अपरिपूर्णतेमुळे आपल्यावर दुःख येतं. आपण हेसुद्धा शिकलो की यहोवा धीराने वागतो आणि यामुळेच लाखो लोकांना त्याच्याबद्दल शिकून घेता आलंय आणि त्यांना हेसुद्धा समजलंय की यहोवा दुःख कायमचं काढून टाकेल. (२ पेत्र ३:९, १५) ही सत्यं जाणून घेतल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळालं आणि त्याच्यासोबतचं नातं घट्ट करायलासुद्धा मदत झाली.
९. यहोवा आपल्यावर दुःख का येऊ देतो या गोष्टीवर आपल्याला खासकरून कोणत्या परिस्थितींमध्ये विचार करावा लागेल?
९ आपल्याला माहीत आहे की जोपर्यंत यहोवा दुःखांचा अंत करत नाही, तोपर्यंत आपल्याला धीर धरावा लागेल. पण कधीकधी आपल्याला किंवा आपल्या जवळच्यांना चिंतांचा, अन्यायाचा किंवा मृत्यूचा सामना करावा लागतो. तेव्हा कदाचित आपल्या मनात विचार येईल, की यहोवा लवकर पाऊल का उचलत नाही. (हब. १:२, ३) अशा वेळी आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे, की यहोवा नीतिमान लोकांना दुःख का सोसू देतो.a (स्तो. ३४:१९) आपण त्याच्या उद्देशावरही मनन केलं पाहिजे. तो म्हणजे, तो सगळं दुःख कायमचं काढून टाकेल.
१०. आपल्या आईच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायला ॲनला कशी मदत झाली?
१० दुःखाबद्दलचं सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला धीर धरायला मदत होते. हिंद महासागरातल्या एका बेटावर राहणाऱ्या ॲन नावाच्या बहिणीचा विचार करा. ती म्हणते: “काही वर्षांपूर्वी माझी आई वारली, तेव्हा मी पार खचून गेले. पण मी सतत स्वतःला याची आठवण करून द्यायचे, की यहोवा दुःखाला जबाबदार नाहीये. खरंतर सगळ्या प्रकारचं दुःख काढून टाकण्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा जिवंत करण्यासाठी तो आतुर आहे. या सत्यावर मनन केल्यामुळे माझं मन शांत होतं आणि कधीकधी मलाच याचं आश्चर्य वाटतं.”
११. यहोवा आपल्यावर दुःख का येऊ देतो यावर विचार केल्यामुळे आपल्याला प्रचार करायची प्रेरणा कशी मिळते?
११ देव आपल्यावर दुःख का येऊ देतो, हे सत्य माहीत असल्यामुळे आपल्याला प्रचार करायची प्रेरणा मिळते. प्रेषित पेत्रने म्हटलं, की यहोवाच्या धीरामुळे पश्चात्ताप करणाऱ्यांना तारण मिळतं. पुढे त्याने म्हटलं: “त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा! तुमची वागणूक पवित्र असली पाहिजे आणि तुम्ही देवाच्या भक्तीची कार्यं केली पाहिजेत.” (२ पेत्र ३:११) ‘देवाच्या भक्तीच्या कार्यांमध्ये’ प्रचारचं कामसुद्धा येतं. आपल्या स्वर्गातल्या पित्याप्रमाणे आपलं लोकांवर प्रेम आहे आणि आपली इच्छा आहे की त्यांनीसुद्धा देवाच्या नवीन जगात जगावं. यहोवा धीर धरून तुमच्या भागातल्या लोकांना त्याची उपासना करायची संधी देतोय. या कामामध्ये देवाचे सहकारी म्हणून काम करण्याची आणि अंत येण्याआधी जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मदत करायची तुमच्याकडे संधी आहे!—१ करिंथ. ३:९.
आपण “शेवटच्या दिवसांत” जगतोय
१२. आपण “शेवटच्या दिवसांत” जगतोय हे माहीत असल्यामुळे आपल्याला कसा फायदा झालाय?
१२ “शेवटच्या दिवसांत” लोक कसे असतील याबद्दल बायबल अगदी अचूक माहिती देतं. (२ तीम. ३:१-५) आपण जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक कसे वागतात हे बघतो, तेव्हा आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की बायबलमध्ये जे सांगितलंय ते अगदी अचूक आहे. जेव्हा लोकांची वृत्ती दिवसेंदिवस बिघडत जात असल्याचं आपण पाहतो, तेव्हा देवाचं वचन भरवशालायक आहे यावरचा आपला भरवसा वाढतो.—२ तीम. ३:१३-१५.
१३. लूक १२:१५-२१ मध्ये येशूने दिलेलं उदाहरण लक्षात ठेवून आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१३ आपण शेवटच्या दिवसांत जगतोय ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष लावायला मदत होते. आणि हे करणं का महत्त्वाचंय हे आपल्याला लूक १२:१५-२१ (वाचा.) मध्ये येशूने दिलेल्या श्रीमंत माणसाच्या उदाहरणातून कळतं. त्या माणसाला ‘मूर्ख’ का म्हणण्यात आलं? तो श्रीमंत होता म्हणून नाही, तर त्याने चुकीच्या गोष्टींना महत्त्व दिलं म्हणून त्याला मूर्ख म्हणण्यात आलं. ‘त्याने स्वतःसाठी धनसंपत्ती साठवली होती. पण तो देवाच्या दृष्टीने श्रीमंत नव्हता.’ मग त्याचं असं करणं चुकीचं का होतं? देव त्या माणसाला म्हणाला: “आज रात्री तू मरशील.” मग यातून आपण काय शिकतो? अंत येण्यासाठी जास्त वेळ उरला नाही. त्यामुळे आपण स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘माझ्या ध्येयांवरून मी कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देत असल्याचं कळतं? मी माझ्या मुलांना कोणती ध्येयं ठेवायचं प्रोत्साहन देतो? मी माझ्या ताकदीचा, पैशांचा आणि साधनांचा वापर स्वतःसाठी संपत्ती गोळा करायला करतोय, की स्वर्गात संपत्ती साठवायला करतोय?’
१४. मिकीसारखंच आपण शेवटच्या दिवसांत जगतोय याच्या पुराव्यांवर विचार करणं का महत्त्वाचंय?
१४ आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत याच्या पुराव्यांवर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. आणि असंच काहीसं मिकी नावाच्या बहिणीसोबत घडलं. ती म्हणते: “माझं शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला प्राण्यांबद्दल अभ्यास करायचा होता; त्यातच करिअर करायचं होतं. यासोबतच मला पायनियर सेवा सुरू करायची होती आणि गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायची होती. पण मंडळीतल्या काही भाऊबहिणींनी मला एक सल्ला दिला. जगात करिअर करणं आणि त्याच वेळी आध्यात्मिक ध्येय गाठणं मला खरंच शक्य आहे का, यावर त्यांनी मला विचार करायला सांगितलं. त्यांनी मला या गोष्टीचीसुद्धा आठवण करून दिली की या जगाचा अंत खूप जवळ आहे. शिवाय नवीन जगात प्राण्यांवर अभ्यास करायला माझ्याकडे वेळच वेळ असेल. म्हणून मी ते करिअर न निवडता एक छोटा कोर्स केला. त्यामुळे पायनियर सेवा करता येईल अशी नोकरी मला मिळाली. नंतर जिथे गरज होती त्या ठिकाणी म्हणजे इक्वादोरला मला जाता आलं.” आज मिकी आणि तिचा नवरा त्याच देशात विभागीय कार्य करत आहेत.
१५. आनंदाच्या संदेशात आवड न दाखवलेल्या लोकांबद्दल आपण आशा सोडू नये हे आपल्याला याकोबच्या उदाहरणातून कसं कळतं? (चित्रंसुद्धा पाहा.)
१५ जर लोकांनी आता आनंदाच्या संदेशात आवड दाखवली नाही, तर आपण निराश होऊ नये. कारण लोक बदलू शकतात. येशूचा भाऊ याकोब याच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने येशूला मोठं होत असताना पाहिलं. त्याने येशूला मसीहा बनल्याचं पाहिलं. इतर कोणत्याही माणसाने शिकवलं नसेल अशा प्रकारे त्याने त्याला इतरांना शिकवताना पाहिलं. पण तरीही बऱ्याच वर्षांपर्यंत तो येशूचा शिष्य बनला नाही. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो त्याचा शिष्य बनला. इतकंच नाही तर तो खूप आवेशीसुद्धा होता.b (योहा. ७:५; गलती. २:९) त्याचप्रमाणे तुमच्या नातेवाइकांनी किंवा लोकांनी आनंदाच्या संदेशात आवड दाखवली नाही, तर त्यांच्याबद्दल आशा सोडू नका. आपण शेवटच्या दिवसांत जगत असल्यामुळे आपलं प्रचाराचं काम खूप जास्त महत्त्वाचंय ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज तुम्ही त्यांना जे काही सांगाल त्याचा पुढे जाऊन त्यांच्यावर प्रभाव पडेल. कदाचित मोठं संकट सुरू झाल्यावर त्यांना त्या गोष्टी आठवतील.c
सत्यात नसलेले आपले नातेवाईक कधी न कधी सत्यात येतील अशी आशा ठेवायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (परिच्छेद १५ पाहा) e
यहोवा आठवण करून देत असलेल्या गोष्टींसाठी त्याचे आभार माना
१६. यहोवा आपल्याला ज्या गोष्टींची आठवण करून देतो त्यांतून तुम्हाला कसा फायदा झालाय? (“इतरांना मदत करण्यासाठी मूलभूत सत्यांचा वापर करा” ही चौकटसुद्धा पाहा.)
१६ आपल्याला मिळत असलेल्या आध्यात्मिक अन्नापैकी काही, अशा लोकांसाठी तयार करण्यात येतं ज्यांनी बायबलची मूलभूत सत्यं आजपर्यंत कधीच ऐकलेली नाहीत. उदाहरणार्थ, दर आठवड्याला आपल्याला ऐकायला मिळणारी जाहीर भाषणं, jw.org वरचे काही लेख आणि व्हिडिओ. तसंच साक्षीदार नसलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या आपल्या सार्वजनिक आवृत्त्या. हे सगळं साहित्य त्यांना लक्षात ठेवून तयार करण्यात आलं असलं, तरी यहोवा आपल्यालाही त्या मूलभूत सत्यांची आठवण करून देत असतो. आणि त्यांचा आपल्याला फायदाच होतो. आपलं यहोवावरचं प्रेम वाढतं, त्याच्या वचनावरचा विश्वास मजबूत होतो आणि इतरांना बायबलची मूलभूत सत्यं कुशलपणे शिकवायलासुद्धा आपल्याला मदत होते.—स्तो. १९:७.
१७. कोणकोणत्या परिस्थितींमध्ये आपण बायबलच्या मूलभूत शिकवणींचा विचार करू शकतो?
१७ यहोवाचे साक्षीदार या नात्याने जेव्हा बायबल सत्याबद्दलची आपली समज स्पष्ट केली जाते तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. पण असं असलं तरी, बायबलच्या ज्या मूलभूत शिकवणींमुळे आपण सत्याकडे आकर्षित झालो होतो, त्यांसाठीही आपल्या मनात कदर असली पाहिजे. एखाद्या परिस्थितीत यहोवाच्या संघटनेच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याला स्वतःच्याच मतांवर अडून राहण्याचा मोह होऊ शकतो. अशा वेळी आपण स्वतःला नम्रपणे या गोष्टीची आठवण करून दिली पाहिजे, की सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली देव यहोवा या संघटनेचं नेतृत्व करतोय. जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर समस्या येते, तेव्हा आपण धीर धरला पाहिजे. आणि यहोवा आपल्यावर ही परिस्थिती का येऊ देतोय, या गोष्टीचासुद्धा विचार केला पाहिजे. आपण आपल्या वेळेचा आणि साधनांचा वापर कसा करायचा हे ठरवत असताना आपण शेवटच्या दिवसांत जगतोय आणि आपल्याकडे फार कमी वेळ उरलाय या गोष्टीची आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. तर मग, यहोवा आपल्याला आठवण करून देत असलेल्या गोष्टींमुळे आपला विश्वास मजबूत होत राहो, आपल्याला प्रोत्साहन मिळत राहो आणि आपण चांगले निर्णय घेत राहो!
गीत ९५ सत्याचा प्रकाश वाढत जातो!
d चित्राचं वर्णन: वडील वर्गाची सभा चालू असताना एक वडील त्याचं मत मांडतोय. पण ते मत इतर वडिलांना पटत नाही. नंतर तोच वडील ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहतो आणि त्याला स्वतःच्या मताबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगायला मदत होते.
e चित्राचं वर्णन: एक बहीण वैयक्तिक अभ्यास करत असताना आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत, याच्या पुराव्यांवर विचार करते. यामुळे ती तिच्या बहिणीला फोन करते आणि तिला साक्ष देते.