जीवन कथा
“हे युद्ध यहोवाचं आहे”
२८ जानेवारी २०१० ला मी फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग शहरात होतो. हे ठिकाण खूप सुंदर होतं. पण तिथे मी फिरायला गेलो नव्हतो. मी कायदा विभागाच्या भावांसोबत तिथे एका खटल्यासंदर्भात गेलो होतो. मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयासमोर आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्कांचं समर्थन करायचं होतं. फ्रान्सच्या सरकाराचं असं म्हणणं होतं, की आपण त्यांना ८,९०,००,००० डॉलर देणं लागतो. पण खरंतर, हे सगळं बेकायदेशीर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाचं नाव, त्याच्या लोकांचं नाव आणि त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या. पण त्या दिवशी त्या खटल्याच्या सुनावणीमध्ये जे झालं त्यावरून हे सिद्ध झालं, की “हे युद्ध यहोवाचं होतं.” (१ शमु. १७:४७) कसं, ते सांगतो.
१९९९ मध्ये फ्रान्सच्या सरकारने असं म्हटलं, की १९९३ ते १९९६ दरम्यान फ्रान्सच्या शाखेला जे दान मिळालं होतं, त्यावर त्यांना कर भरावा लागेल. त्यामुळे, आम्ही फ्रान्सच्या बऱ्याच कोर्टांमध्ये न्याय मागितला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणून मग आम्ही कोर्टामध्ये पुन्हा अपील केलं. पण त्याचासुद्धा काहीच फायदा झाला नाही. उलट, सरकारने शाखेच्या बँक खात्यातून ६३,००,००० डॉलर जप्त केले. त्यामुळे मानवी हक्कांचं युरोपियन न्यायालय, आमची शेवटची आशा होती. पण या न्यायालयाने आम्हाला सांगितलं, की खटला सुरू होण्यापूर्वी आम्ही आणि फ्रान्सच्या सरकारच्या कायदा विभागाने कोर्टाच्या अधिकाऱ्याला भेटावं आणि आपसात हे प्रकरण मिटवून टाकावं.
आमचा असा अंदाज होता, की कोर्टाचा अधिकारी आमच्यावर दबाव टाकेल आणि फ्रान्सच्या सरकाराला थोडेफार पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाकायला सांगेल. पण आम्हाला हे माहीत होतं, की आम्ही त्यांना एक पै जरी दिली, तर ते बायबल तत्त्वांच्या विरोधात होईल. कारण भाऊबहिणींनी हे दान राज्याच्या कामासाठी दिलं होतं आणि त्यामुळे सरकारचा त्याच्यावर काहीच हक्क नव्हता. (मत्त. २२:२१) पण असं असलं तरी, कोर्टाचा मान राखून आम्ही तिथे गेलो.
२०१० साली मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयासमोर उभे असलेले कायदा विभागातले काही भाऊ
आम्ही सुनावणीसाठी कोर्टात एकत्र आलो. सुरुवातीलाच कोर्टाच्या अधिकारीने आम्हाला सांगितलं, की यहोवाच्या साक्षीदारांना फ्रान्सच्या सरकारला कराची काही रक्कम द्यावी लागेल. पण यहोवाच्या पवित्र शक्तीने आम्हाला त्या मॅडमला असं विचारायला प्रेरित केलं, की “तुम्हाला माहीत आहे का, की सरकारने आधीच आमच्या खात्यातून ६३,००,००० डॉलर जप्त केलेत?”
हे ऐकून तिला धक्काच बसला. जेव्हा सरकारच्या कायदा विभागाने तिला हे सगळं खरं असल्याचं सांगितलं, तेव्हा या खटल्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला. ती त्यांच्यावर खूप रागावली. आणि तिने लगेच सुनावणी संपवली. आम्ही विचारही केला नव्हता अशा प्रकारे यहोवाने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. सुनावणी संपली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. जे काही घडलं होतं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता.
३० जून २०११ ला मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने एकमताने आपल्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी असं म्हटलं, की हा कर बेकायदेशीर आहे. त्यासोबतच त्यांनी फ्रान्सच्या सरकारला जप्त केलेले सगळे पैसे व्याजासकट परत करायला सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे फ्रान्समधले आपले भाऊबहीण आजपर्यंत मोकळेपणाने शुद्ध उपासना करू शकत आहेत. आम्ही त्या वेळी जो प्रश्न विचारला, तो आमच्या कधी डोक्यातही आला नव्हता. त्या एका प्रश्नामुळे खटल्याची दिशाच बदलून गेली. तो प्रश्न जणू गल्ल्याथचा जीव घेणाऱ्या दगडासारखा होता. दावीदने गल्ल्याथला म्हटलं होतं, की “हे युद्ध यहोवाचं आहे.” अगदी तसंच घडताना आम्ही पाहिलं. म्हणूनच आम्हाला हा विजय मिळाला.—१ शमु. १७:४५-४७.
पण आपल्याला मिळालेला हा पहिलाच विजय नाही. मोठमोठ्या सरकारांनी आणि धर्मांनी आपला विरोध केला असला, तरी आपण ७० देशांच्या उच्च न्यायालयांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये १,२२५ खटले जिंकले आहेत. या विजयांमुळे आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण झालंय. ते हक्क म्हणजे, एक धर्म म्हणून मान्यता मिळणं, सार्वजनिक साक्षकार्य करणं, राष्ट्रीय सणांमध्ये भाग घ्यायला नकार देणं आणि रक्तसंक्रमणाला नकार देणं.
न्यूयॉर्कमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करत असूनसुद्धा मी युरोपच्या खटल्याचा भाग झालो. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कसं? चला सांगतो.
मिशनरी आईवडिलांच्या संस्कारात वाढणं
माझे वडील जॉर्ज आणि माझी आई लुसिल हे गिलियडच्या १२ व्या वर्गातून पदवीधर झाले होते. १९५६ ला माझा जन्म झाला, तेव्हा ते इथियोपियामध्ये सेवा करत होते. पहिल्या शतकातल्या प्रचारक फिलिप्पच्या नावावरून त्यांनी माझं नाव ठेवलं होतं. (प्रे. कार्यं २१:८) पण त्याच्या दुसऱ्याच वर्षी आपल्या कामावर बंदी आली. मी खूप लहान होतो. तरी मला चांगलं आठवतंय, की आमचं कुटुंब लपूनछपून उपासना करायचं. त्या वेळी मला त्या सगळ्या गोष्टींची खूप मजा वाटायची. पण दुःखाची गोष्ट म्हणजे १९६० मध्ये आम्हाला अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने तो देश सोडायला लावला.
१९५९ साली इथिओपिया इथल्या ॲडिस अबाबामध्ये असलेल्या माझ्या कुटुंबाला भेट देताना नेथन नॉर (अगदी डावीकडे)
मग आम्ही अमेरिकेच्या विचिटा या ठिकाणी जाऊन राहू लागलो. मिशनरी असताना माझ्या आईवडिलांचा जो आवेश होता तो जराही कमी झाला नव्हता. त्यांनी माझी मोठी बहीण ज्युडी, माझा लहान भाऊ लेस्ली आणि मला, लहानपणापासूनच यहोवावर प्रेम करायला शिकवलं. त्या दोघांचाही जन्म इथियोपियाचाच. मग १३ वर्षांचा असताना माझा बाप्तिस्मा झाला. पुढे ३ वर्षांनी आमचं कुटुंब पेरूमधल्या अरेकिपाला जिथे जास्त गरज होती, त्या ठिकाणी जाऊन सेवा करू लागलं.
१९७४ मध्ये मी फक्त १८ वर्षांचा असताना पेरू शाखेने मला आणि आणखी चार भावांना खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी निवडलं. आम्हाला अँडीज पर्वतांवरच्या अशा क्षेत्रांमध्ये प्रचार करण्यासाठी पाठवण्यात आलं, जिथे आधी कधीच प्रचार झाला नव्हता. तिथे आम्हाला क्वेचुआ आणि आयमारा या भाषा बोलणाऱ्या मूळ रहिवाशांना प्रचार करायचा होता. आम्ही घरासारख्या असणाऱ्या गाडीत राहायचो आणि त्या गाडीला आम्ही “नोहाचं तारू” म्हणायचो. कारण ती तशीच दिसायची. त्या वेळच्या खूप सुंदर आठवणी आहेत माझ्याकडे. तिथल्या लोकांना आम्ही बायबलमधून दाखवायचो, की यहोवा लवकरच गरिबी, आजारपण आणि मृत्यू काढून टाकणार आहे. (प्रकटी. २१:३, ४) आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिथल्या बऱ्याच लोकांनी सत्य स्वीकारलं.
१९७४ साली “नोहाचं तारू”
जागतिक मुख्यालयात सेवा करणं
नियमन मंडळाचे सदस्य भाऊ अल्बर्ट श्रोडर हे १९७७ ला पेरूला आले होते. तेव्हा त्यांनी मला जागतिक मुख्यालयाच्या बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी अर्ज भरायचं प्रोत्साहन दिलं. मी तसंच केलं. मग १७ जून १९७७ पासून मी ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करू लागलो. पुढची चार वर्षं मी तिथे साफसफाईच्या आणि दुरुस्तीच्या विभागात काम केलं.
१९७९ साली आमच्या लग्नाच्या दिवशी
जून १९७८ ला लुईसियानाच्या न्यू ऑर्लिन्समध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. तिथे मी एलिझाबेथ ॲवलॉनला भेटलो. तिचं संगोपनही माझ्यासारखंच झालं होतं. तिच्या आईवडिलांसाठीसुद्धा सत्य जीवन होतं. तेव्हा एलिझाबेथ चार वर्षांपासून पायनियर सेवा करत होती आणि तिला पुढेही पूर्ण वेळेची सेवा करायची होती. आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे आम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेता आलं आणि आम्ही प्रेमात पडलो. २० ऑक्टोबर १९७९ ला आमचं लग्न झालं आणि आम्ही सोबत मिळून बेथेल सेवा सुरू केली.
लग्नानंतर आम्ही ब्रुकलिन स्पॅनिश मंडळीला जाऊ लागलो. तिथले भाऊबहीण खूप प्रेमळ होते. पुढच्या काही वर्षांनंतर आम्ही तीन वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये गेलो. तिथल्या भाऊबहिणींनी आम्हाला बेथेल सेवा करत राहण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. तसंच, आमच्या घरीसुद्धा वयस्कर आईवडिलांची काळजी घेण्यासाठी आमच्या काही मित्रांनी आणि कुटुंबातल्या लोकांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळेच आम्हाला आमची सेवा करता आली.
१९८६ साली ब्रुकलिन स्पॅनिश मंडळीत असलेले बेथेलचे सदस्य
कायदा विभागातलं माझं काम
जानेवारी १९८२ ला मला कायदा विभागात सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. मग तीन वर्षांनंतर बेथेलने मला वकील बनण्यासाठी कायद्याचं शिक्षण घ्यायला सांगितलं. या कोर्सच्या वेळी मला एक जबरदस्त गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे की यहोवाच्या साक्षीदारांनी जे खटले जिंकलेत, त्यामुळे अमेरिकेतल्या आणि इतर देशांमधल्या बऱ्याच लोकांना काही गोष्टी करायचं स्वातंत्र्य मिळालंय. त्या खटल्यांबद्दल वर्गात खूप खोलवर चर्चा व्हायची.
१९८६ ला, म्हणजे मी फक्त ३० वर्षांचा असताना मला कायदा विभागाचा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. माझं वय इतकं कमी असूनसुद्धा मला ही जबाबदारी देण्यात आली होती आणि बेथेलने माझ्यावर भरवसा ठेवला होता, याचा मला आनंद होता. पण मला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळे मला खूप भीतीसुद्धा वाटत होती. कारण मला हे माहीत होतं की माझी ही नेमणूक सोपी नसणार होती.
१९८८ ला मी वकील बनलो. पण या शिक्षणाचा माझ्यावर आणि यहोवासोबतच्या माझ्या नात्यावर किती वाईट प्रभाव पडला होता हे माझ्या लक्षातही आलं नाही. उच्च शिक्षणामुळे एक व्यक्ती महत्त्वाकांक्षी होऊ शकते आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू शकते. पण एलिझाबेथने मला त्या पाशातून वाचवलं. माझी आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी मी ज्या गोष्टी करायचो, त्या पुन्हा करायला तिने मला मदत केली. त्यासाठी वेळ लागला खरा, पण हळूहळू माझी आध्यात्मिकता पुन्हा सुधारली. मी माझ्या अनुभवावरून हे खातरीने सांगू शकतो, की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला भरपूर ज्ञान असणं आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नसते. तर यहोवासोबतच्या नात्यामुळे आणि त्याच्यावरच्या तसंच त्याच्या लोकांवरच्या प्रेमामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो.
आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं
कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं लक्ष बेथेलमधल्या कायदा विभागाला मदत करण्यासाठी आणि कोर्टात आपला प्रचाराचा हक्क मिळवण्यासाठी लावलं. मला माझ्या कामात खूप मजा यायची. पण ते करणं तितकंच कठीण होतं, कारण संघटनेत पटापट बदल होत होते. उदाहरणार्थ, सुरुवातीला आपण आपल्या प्रकाशनांसाठी दान मागायचो, पण १९९१ ला कायदा विभागाला सांगण्यात आलं की त्यांनी पुढाकार घेणाऱ्या भावांना दान मागायचं बंद करण्याबद्दल निर्देशन द्यावं. त्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशनांसाठी दान मागणं बंद केलं. यामुळे बेथेलमधलं आणि क्षेत्रातलं काम सोपं झालं आणि कर देताना येणाऱ्या समस्या टाळता आल्या. काही जणांना असं वाटलं होतं, की यामुळे आपल्या संघटनेचं खूप नुकसान होईल आणि प्रचाराचं कामसुद्धा थंड पडेल. पण असं काहीच झालं नाही. याच्या अगदी उलटच झालं. १९९० पासून प्रचारकांची संख्या दुप्पट झाली आहे आणि लोकांना एक पैसुद्धा खर्च न करता आध्यात्मिक अन्न मिळतंय. मी हे स्वतः अनुभवलंय की यहोवाच्या मदतीमुळे आणि विश्वासू आणि बुद्धिमान दासाच्या मार्गदर्शनामुळेच संघटनेत होणारे मोठमोठे बदल यशस्वी होत आहेत.—निर्ग. १५:२; मत्त. २४:४५.
पण फक्त चांगल्या वकिलांमुळेच आपण कोर्टात खटले जिंकतो असं नाही. तर बऱ्याचदा यहोवाच्या लोकांच्या चांगल्या वागण्याचा अधिकाऱ्यांवर चांगला प्रभाव पडतो. याचं एक उदाहरण मी १९९८ ला पाहिलं. तेव्हा क्युबामध्ये खास अधिवेशनांसाठी नियमन मंडळाचे तीन सदस्य आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या. आम्ही बऱ्याचदा तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांना हे सांगितलं होतं, की आपण राजकारणात कोणत्याही प्रकारे भाग घेत नाही. पण जेव्हा त्यांनी स्वतः पाहिलं की हे भाऊबहीण किती प्रेमाने आणि आदराने वागत आहेत, तेव्हा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव पडला.
पण काही वेळा न्याय मिळवण्यासाठी आपल्याला कोर्टामध्ये ‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करावं लागतं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून द्यावी लागते.’ (फिलिप्पै. १:७) उदाहरणार्थ, कित्येक दशकांपर्यंत युरोपमधल्या आणि दक्षिण कोरियामधल्या अधिकाऱ्यांनी सैन्यात भरती न होण्याचा आपला हक्क मान्य केला नाही. यामुळे युरोपमधल्या जवळजवळ १८,००० भावांना आणि दक्षिण कोरियामधल्या १९,००० पेक्षा जास्त भावांना सैन्यात भरती न झाल्यामुळे तुरुंगात जावं लागलं.
सरतेशेवटी ७ जुलै २०११ ला मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने बयात्यान आर्मेनिया या खटल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळे संपूर्ण युरोपमध्ये आपल्या विश्वासामुळे सैन्यात भरती व्हायला नकार देणाऱ्यांना पर्यायी नागरी सेवा निवडणं शक्य झालं. त्यानंतर २८ जून २०१८ ला दक्षिण कोरियाच्या कोर्टानेसुद्धा अशाच प्रकारचा निर्णय दिला. त्या तरुण भावांपैकी एकानेही जर तडजोड केली असती, तर हा विजय मिळालाच नसता.
जागतिक मुख्यालयातलं आणि जगभरातल्या शाखांमधलं कायदा विभाग उपासना करायचा आणि प्रचार करायचा हक्क मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. ज्या भाऊबहिणींना सरकाराकडून विरोधाचा सामना करावा लागतोय, त्यांच्या वतीने कोर्टासमोर उभं राहणं हा आमच्यासाठी एक बहुमान आहे. आम्ही जरी एखादा खटला जिंकला नाही, तरी आम्हाला राज्यपालांना आणि राजांना साक्ष द्यायची संधी मिळते. (मत्त. १०:१८) आम्ही जेव्हा कोर्टासमोर कागदपत्रं सादर करतो, तेव्हा त्यात शास्त्रवचनांचाही उल्लेख करतो. त्यामुळे खटला चालू झाल्यावर न्यायाधीशांना, वकिलांना, मीडियाच्या आणि इतर लोकांना त्या वचनांचा अभ्यास करावाच लागतो. त्यामुळे प्रामाणिक मनाच्या बऱ्याच लोकांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल कळतं आणि त्यांचा विश्वास बायबलवर आधारित आहे, हेसुद्धा कळतं. विशेष म्हणजे त्यातले काही लोक आपले भाऊबहीणसुद्धा झालेत.
थँक्यू, यहोवा!
मागच्या ४० वर्षांत मला खूप बहुमान मिळालेत. त्यामुळे मला न्यायिक खटल्यांच्या संदर्भात जगभरातल्या शाखा कार्यालयांसोबत मिळून काम करता आलंय. तसंच बऱ्याच उच्च न्यायालयांसमोर आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांसमोर उभं राहता आलंय. जागतिक मुख्यालयातल्या आणि जगभरातल्या कायदा विभागात काम करणारे भाऊबहीण बरीच मेहनत घेतात. आणि त्यांच्या या मेहनतीची मला मनापासून कदर वाटते. यहोवाने माझ्या संपूर्ण आयुष्यात मला खूप आशीर्वाद दिलेत आणि यामुळे मी समाधानी आहे!
मागच्या ४५ वर्षांत माझ्या चांगल्या आणि वाईट काळातसुद्धा एलिझाबेथने माझी प्रेमाने साथ दिली आहे. तिची तब्येत बरी नसते आणि त्यामुळे ती खूप थकून गेली आहे. पण असं असूनसुद्धा तिने माझी साथ कधीच सोडली नाही आणि म्हणून मला तिचं खूप कौतुक करावसं वाटतं.
दावीदने म्हटलं: “यहोवा त्याच्या लोकांचं सामर्थ्य आहे.” (स्तो. २८:८) आणि आम्हीसुद्धा हेच अनुभवलं, की ताकद आणि विजय हे आपल्या क्षमतांमुळे मिळत नाहीत, तर यहोवा आपल्याला ते देतो. खरंच, “हे युद्ध यहोवाचं आहे.”