वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 ऑगस्ट पृ. २०-२५
  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जे गंभीर पाप करतात त्यांना वडील कशी मदत करतात?
  • “सर्वांच्या देखत कानउघाडणी कर”
  • “यहोवा दयाळू आणि खूप करुणामय आहे”
  • मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • वडिलांची मदत घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • पाप करणाऱ्‍यांबद्दल मंडळी यहोवासारखा दृष्टिकोन कसा बाळगते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 ऑगस्ट पृ. २०-२५

अभ्यास लेख ३४

गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श

गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?

“देव दयाळूपणे तुला पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे.”—रोम. २:४.

या लेखात:

गंभीर पाप करणाऱ्‍यांना मंडळीतले वडील कशा प्रकारे मदत करतात ते पाहा.

१. एखाद्याने गंभीर पाप केल्यानंतरही कोणती गोष्ट शक्य होऊ शकते?

मागच्या लेखात आपण पाहिलं, की प्रेषित पौलने करिंथ मंडळीतलं गंभीर पापाचं प्रकरण कशा प्रकारे हाताळलं. पाप करणाऱ्‍याला आपल्या पापाचा पश्‍चात्ताप होत नव्हता. म्हणून त्याला मंडळीतून काढून टाकावं लागलं. पण या लेखाच्या मुख्य वचनाप्रमाणे, काही जण जेव्हा गंभीर पाप करतात, तेव्हा देव त्यांना पश्‍चात्ताप करायला मदत करू शकतो. (रोम. २:४) तर मग मंडळीतले वडील अशा लोकांना पश्‍चात्ताप करायला कशी मदत करू शकतात?

२-३. (क) आपल्या भावाने किंवा बहिणीने गंभीर पाप केलंय असं आपल्याला कळलं, तर आपण काय केलं पाहिजे? (ख) आपण असं का केलं पाहिजे?

२ एखाद्याने गंभीर पाप केलंय हे जर वडिलांना माहीतच नसेल, तर ते त्याची मदत करू शकणार नाहीत. मग आपल्याला जर कळलं, की मंडळीतल्या एखाद्याने गंभीर पाप केलंय आणि त्यामुळे त्याला मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं, तर आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी आपण त्या भावाला किंवा बहिणीला वडिलांकडून मदत घ्यायचं प्रोत्साहन देऊ शकतो.—यश. १:१८; प्रे. कार्यं २०:२८; १ पेत्र ५:२.

३ पण त्या भावाने किंवा बहिणीने वडिलांशी बोलायला नकार दिला तर काय? अशा वेळी त्या भावाला किंवा बहिणीला मदत मिळावी, म्हणून आपण स्वतः जाऊन वडिलांशी बोललं पाहिजे. असं करून आपण त्या भावावर किंवा बहिणीवर प्रेम असल्याचं दाखवू. कारण आपल्याला त्यांना गमवायची इच्छा नाही. कारण ते अशाच प्रकारे वागत राहिले, तर त्यांचं यहोवासोबतचं नातं तुटू शकतं. इतकंच नाही, तर मंडळीचं चांगलं नावसुद्धा खराब होऊ शकतं. म्हणून यहोवावर आणि त्या व्यक्‍तीवर प्रेम असल्यामुळे आपण धैर्याने हे पाऊल उचलू.—स्तो. २७:१४.

जे गंभीर पाप करतात त्यांना वडील कशी मदत करतात?

४. जेव्हा वडील पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला भेटतात, तेव्हा त्यांचा उद्देश काय असतो?

४ मंडळीतलं कोणी जेव्हा गंभीर पाप करतं, तेव्हा वडीलवर्ग त्यांच्यातून योग्यता असलेल्या तीन भावांना निवडतात. हे तीन भाऊ एक समिती म्हणून काम करतात.a हे भाऊ नम्र असतात. त्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव असते. आणि ते पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करायला मदत करतात. पण ते ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवतात, की ते कोणावरही त्याचं मन बदलायची जबरदस्ती करू शकत नाहीत. (अनु. ३०:१९) या वडिलांना हेसुद्धा माहीत असतं, की पाप करणारे सगळेच दावीदप्रमाणे चांगली वृत्ती दाखवणार नाहीत. (२ शमु. १२:१३) पाप करणारे काही जण कदाचित यहोवाच्या ताडनाकडे दुर्लक्ष करतील. (उत्प. ४:६-८) असं असलं तरी, पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करायला मदत करणं हाच वडिलांचा उद्देश असतो. मग जेव्हा ते या व्यक्‍तीला भेटतात, तेव्हा ते कोणत्या तत्त्वांप्रमाणे काम करू शकतात?

५. वडील जेव्हा पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला भेटतात, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन काय असला पाहिजे? (२ तीमथ्य २:२४-२६) (चित्रसुद्धा पाहा.)

५ पाप करणारा यहोवाचं हरवलेलं अनमोल मेंढरू आहे, असा दृष्टिकोन वडील ठेवतात. (लूक १५:४, ६) म्हणून जेव्हा ते त्या भावाला किंवा बहिणीला भेटतात, तेव्हा त्यांचं वागणं आणि बोलणं कठोर नसतं. इतकंच नाही, तर या भेटीत आपल्याला फक्‍त प्रश्‍न विचारायचे आहेत आणि माहिती गोळा करायची आहे, असा ते विचार करत नाहीत. याउलट, ते २ तीमथ्य २:२४-२६ (वाचा.) इथे सांगितलेले गुण दाखवायचा प्रयत्न करतात. वडील त्या व्यक्‍तीशी नम्रतेने आणि सौम्यतेने वागतात. कारण त्यांना त्या व्यक्‍तीच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असतं.

एक मेंढपाळ त्याच्या कळपासोबत दिसतोय, तो आपलं हरवलेलं मेंढरू शोधतोय. हरवलेलं मेंढरू झाडीत आडकलंय आणि त्याच्या पायाला लागलंय.

जुन्या काळातल्या मेंढपाळांप्रमाणे वडील हरवलेल्या मेंढरांना पुन्हा मिळवायचा प्रयत्न करतात (परिच्छेद ५ पाहा)


६. पाप करणाऱ्‍याला भेटण्याआधी, वडील स्वतःचं मन कसं तयार करतात? (रोमकर २:४)

६ वडील स्वतःचं मन तयार करतात. पाप करणाऱ्‍यासोबत वागताना ते यहोवासारखं वागायचा प्रयत्न करतात. ते पौलचे हे शब्द लक्षात ठेवतात: “देव दयाळूपणे तुला पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे.” (रोमकर २:४ वाचा.) वडिलांची मुख्य भूमिका मेंढपाळाची आहे. म्हणून त्यांनी ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाचं पालन केलं पाहिजे आणि मंडळीची काळजी घेताना त्याच्यासारखं वागलं पाहिजे. (यश. ११:३, ४; मत्त. १८:१८-२०) पाप करणाऱ्‍याला भेटण्याआधी वडिलांच्या समितीने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, की त्यांचा उद्देश काय आहे. त्यांचा उद्देश, पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करायला मदत करणं हा आहे. त्यासाठी ते शास्त्रवचनांवर आणि आपल्या प्रकाशनांवर संशोधन करतील. आणि समजशक्‍तीसाठी प्रार्थनासुद्धा करतील. इतकंच नाही, तर त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचाही ते प्रयत्न करतील. असं केल्यामुळे, त्या व्यक्‍तीने अशा प्रकारचा विचार का केला किंवा ती त्याप्रमाणे का वागली हे समजून घ्यायला त्यांना मदत होईल.—नीति. २०:५.

७-८. पाप करणाऱ्‍याला भेटताना वडील यहोवासारखा धीर कसा दाखवू शकतात?

७ वडील यहोवासारखा धीर दाखवतात. ते ही गोष्ट लक्षात ठेवतात, की जुन्या काळात यहोवा पाप करणाऱ्‍यांशी कसा वागला. उदाहरणार्थ, यहोवा काइनशी धीराने वागला. त्याने त्याला हे सांगितलं, की जर त्याने स्वतःमध्ये बदल केला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि बदल केला तर त्याला आशीर्वाद मिळतील. (उत्प. ४:६, ७) तसंच, यहोवाने नाथान संदेष्ट्याकडून दावीदला त्याची चूक दाखवून दिली. नाथानने एका उदाहरणाचा वापर केला आणि दावीदला पश्‍चात्ताप करायला मदत केली. (२ शमु. १२:१-७) शिवाय, बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे यहोवा “वारंवार” आपल्या संदेष्ट्यांना ‘पाठवत राहिला.’ (यिर्म. ७:२४, २५) आपल्या लोकांना मदत करण्याआधी त्यांनी पश्‍चात्ताप करावा याची यहोवा वाट पाहत राहिला नाही. याउलट, त्यांना पश्‍चात्ताप करण्यासाठी मदत करायला त्याने पुढाकार घेतला.

८ गंभीर पाप करणाऱ्‍याला मदत करताना वडील यहोवाच्या उदाहरणाप्रमाणे वागतात. २ तीमथ्य ४:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे ते “पूर्ण सहनशीलतेने” त्याच्यासोबत तर्क करतात. पाप करणाऱ्‍याला योग्य ते करायला मदत करण्यासाठी वडिलांनी नेहमी त्याच्याशी धीराने आणि शांतपणे वागलं पाहिजे. वडील जर स्वतःच रागावले किंवा चिडले, तर पाप करणारा त्यांचा सल्ला कदाचित ऐकणार नाही आणि पश्‍चात्ताप करायला नकार देईल.

९-१०. पाप करणाऱ्‍याकडून कोणत्या गोष्टींमुळे पाप घडलं असेल हे समजायला वडील त्याला कसं मदत करू शकतात?

९ कोणत्या गोष्टींमुळे त्या व्यक्‍तीकडून पाप घडलं हे जाणून घ्यायचा वडील प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, पाप करणाऱ्‍याने वैयक्‍तिक अभ्यासाकडे किंवा प्रचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो विश्‍वासात हळूहळू कमजोर झाला होता का? त्याने यहोवाला नियमितपणे प्रार्थना करायचं सोडून दिलं होतं का? त्याने चुकीच्या इच्छांशी लढायचं सोडून दिलं होतं का? संगतीच्या किंवा मनोरंजनाच्या बाबतीत तो चुकीची निवड करत होता का? अशा आवडीनिवडींचा त्याच्या विचारांवर आणि इच्छांवर कसा प्रभाव पडत होता? त्याने जे केलंय त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं असेल हे त्याला जाणवतंय का?

१० पाप करणाऱ्‍याचं यहोवासोबतचं नातं कसं कमजोर झालं आणि त्यामुळे त्याच्या हातून कसं पाप घडलं, याबद्दल विचार करायला लावण्यासाठी वडील त्याला प्रश्‍न विचारू शकतात. असं करताना ते त्याच्याशी प्रेमळपणे वागतात. वडिलांना ज्या गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, म्हणजे त्याच्याबद्दलच्या खाजगी गोष्टी ते त्याला विचारत नाहीत. (नीति. २०:५) नाथानने दावीदला मदत करण्यासाठी उदाहरणाचा वापर केला. वडीलसुद्धा पाप करणाऱ्‍याशी तर्क करण्यासाठी आणि तो कशा प्रकारे चुकीचा वागला, हे त्याला समजवण्यासाठी अशाच प्रकारे उदाहरणांचा वापर करू शकतात. असं केल्यामुळे, कदाचित पहिल्या भेटीतच पाप करणाऱ्‍याने जे केलं त्याबद्दल त्याला मनापासून पस्तावा होईल. तसंच तो कदाचित पूर्णपणे पश्‍चात्तापही करेल.

११. येशू पापी लोकांसोबत कसा वागाला?

११ वडील येशूसारखं वागायचा प्रयत्न करतात. तार्सच्या शौलला मदत करण्यासाठी येशूने त्याला एक प्रश्‍न विचारला: “शौल, शौल, तू मला का छळत आहेस?” असं करून येशूने त्याला हे समजायला मदत केली, की तो जे करतोय ते चुकीचं आहे. (प्रे. कार्यं ९:३-६) दुसऱ्‍या एका प्रसंगी येशूने ‘ईजबेल नावाच्या स्त्रीबद्दल’ म्हटलं: “मी तिला पश्‍चात्ताप करण्याची संधी दिली.”—प्रकटी. २:२०, २१.

१२-१३. वडील पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करण्यासाठी कसा वेळ देऊ शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ येशूसारखं वागल्यामुळे वडील कधीच घाईघाईने असा विचार करणार नाहीत, की पाप करणारा कधीच पश्‍चात्ताप करणार नाही. काही जण वडिलांच्या समितीला पहिल्यांदा भेटल्यानंतर लगेच पश्‍चात्ताप करतील, तर काही जणांना वेळ लागू शकतो. त्यामुळे वडील पाप करणाऱ्‍याला एकापेक्षा जास्त वेळा भेटायचं ठरवू शकतात. कदाचित पहिल्या भेटीनंतरच पाप करणाऱ्‍याला जे सांगण्यात आलंय, त्याबद्दल तो मनापासून विचार करायला लागेल. इतकंच नाही, तर तो नम्रपणे यहोवाला प्रार्थना करेल आणि कदाचित त्याच्याकडे आपल्या पापांची माफीही मागेल. (स्तो. ३२:५; ३८:१८) मग समिती जेव्हा पुढच्या वेळी त्याला भेटेल, तेव्हा त्याचं वागणं बदललेलं असू शकतं.

१३ पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करायला मदत व्हावी म्हणून वडील त्याच्याशी सहानुभूतीने आणि दयेने वागतात. यहोवाने त्यांच्या मेहनतीवर आशीर्वाद द्यावा अशी ते त्याच्याकडे प्रार्थना करतात. ते आशा बाळगतात, की पाप करणाऱ्‍याने भानावर यावं आणि पश्‍चात्ताप करावा.—२ तीम. २:२५, २६.

कोलाज: १. तीन वडील एका भावाला भेटतात. ते त्याच्याशी बोलत असताना तो दुसरीकडे बघतोय. २. नंतर, ते वडील पुन्हा त्या भावाला भेटतात. या वेळी तो त्यांचं लक्ष देऊन ऐकतोय.

पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करायला मदत करण्यासाठी वडील कदाचित त्याला एकापेक्षा जास्त वेळा भेटायचं ठरवतील (परिच्छेद १२ पाहा)


१४. (क) जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करतो, तेव्हा त्याचं श्रेय कोणाला जातं? (ख) आणि का?

१४ जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो. (लूक १५:७, १०) पण याचं श्रेय कोणाला जातं? वडिलांना जातं का? नाही. पाप करणाऱ्‍यांबद्दल पौलने काय लिहिलं ते आठवा: “कदाचित देव त्यांना . . . पश्‍चात्ताप करायची संधी देईल.” (२ तीम. २:२५) म्हणजे, पाप करणाऱ्‍याला त्याच्या विचारांत आणि वागण्यात बदल करण्यासाठी एखाद्या माणसाने नाही तर यहोवाने मदत केलेली असते. पौलने समजावलं की एखादा जेव्हा पश्‍चात्ताप करतो, तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात. त्याला सत्याबद्दलचं आणखी अचूक ज्ञान मिळतं, तो पुन्हा भानावर येतो आणि सैतानाच्या पाशांपासून सुटू शकतो.—२ तीम. २:२६.

१५. पश्‍चात्ताप करणाऱ्‍याला वडील पुढेही कशी मदत करत राहू शकतात?

१५ पाप करणाऱ्‍याने पश्‍चात्ताप केल्यानंतर वडील त्याच्यासाठी वेळोवेळी मेंढपाळ भेटींची व्यवस्था करतात. असं केल्यामुळे त्याला आपला विश्‍वास मजबूत करत राहायला, सैतानाच्या प्रलोभनांचा सामना करत राहायला आणि योग्य ते करत राहायला मदत होते. (इब्री १२:१२, १३) पाप करणाऱ्‍याने जे केलंय त्याबद्दल कोणतीही गोष्ट वडील इतरांना सांगत नाहीत. पण त्यांना मंडळीला काय सांगायची गरज पडू शकते?

“सर्वांच्या देखत कानउघाडणी कर”

१६. १ तीमथ्य ५:२० इथे पौलने जेव्हा “सर्वांच्या देखत” हे शब्द वापरले तेव्हा त्याचा काय अर्थ होता?

१६ १ तीमथ्य ५:२० वाचा. “जे पाप करत राहतात त्यांना” कसं ताडन द्यायचं, हे सांगायला पौलने हे शब्द तीमथ्यला लिहिले. पण इथे पौलला काय सांगायचं होतं? पौल जेव्हा “सर्वांच्या देखत” असं बोलला, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्ण मंडळीच्या देखत असा नव्हता. याउलट तो फक्‍त अशा लोकांबद्दल बोलत होता ज्यांना घडलेल्या पापाबद्दल माहीत आहे. हे कदाचित त्या घटनेचे साक्षीदार असू शकतात. किंवा असे भाऊबहीण असू शकतात ज्यांच्यापुढे पाप करणाऱ्‍याने कबुली दिली. फक्‍त अशांनाच वडील सांगतील, की हे प्रकरण हाताळण्यात आलंय आणि पाप करणाऱ्‍याला सुधारण्यात आलंय.

१७. जर घडलेल्या पापाबद्दल मंडळीतल्या बऱ्‍याच जणांना माहीत असेल, किंवा माहीत पडण्याची शक्यता असेल, तर मंडळीत कोणती घोषणा केली जाते आणि का?

१७ काही वेळा असं असू शकतं, की जे पाप घडलंय त्याबद्दल मंडळीतल्या बऱ्‍याच जणांना माहीत आहे, किंवा माहीत पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी “सर्वांच्या देखत” यामध्ये संपूर्ण मंडळी येते. त्यामुळे मंडळीतल्या वडिलांपैकी एक जण कदाचित अशी घोषणा करेल, की त्या भावाला किंवा बहिणीला ताडन देण्यात आलंय. का? पौलने म्हटलं: यामुळे बाकीच्यांना “इशारा” मिळेल आणि ते पापात पडणार नाहीत.

१८. बाप्तिस्मा झालेल्या अल्पवयीन मुलाने एखादं गंभीर पाप केलं तर हे प्रकरण वडील कसं हाताळतील? (चित्रसुद्धा पाहा.)

१८ पण मग बाप्तिस्मा झालेल्या १८ वर्षांखालच्या अल्पवयीन मुलांबद्दल काय? त्यांच्या हातून गंभीर पाप घडलं तर? अशा वेळी वडीलवर्ग त्याला आणि त्याच्या ख्रिस्ती आईवडिलांनाb भेटायला दोन वडिलांना नेमेल. त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला पश्‍चात्ताप करायला मदत करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न हे वडील करतील. जर त्या मुलाने चांगली वृत्ती दाखवली असेल आणि त्याचे आईवडील त्याला मदत करत असतील, तर ते दोन वडील हे ठरवतील, की ‘वडिलांची समिती’ बनवायची गरज नाही आणि आईवडीलच त्याला पुढे मदत करत राहतील. कारण वडिलांना हे माहीत आहे, की मुलांना प्रेमळपणे सुधारण्याची जबाबदारी देवाने आईवडिलांना दिली आहे. (अनु. ६:६, ७; नीति. ६:२०; २२:६; इफिस. ६:२-४) यानंतर वडील थोड्याथोड्या काळाने आईवडिलांना भेटतील आणि या गोष्टीची खातरी करतील, की हवी असलेली मदत त्या मुलाला मिळत आहे. पण जर तो अल्पवयीन पश्‍चात्ताप न करता चुकीची कामं करत राहिला तर? अशा वेळी वडिलांची समिती त्याच्या ख्रिस्ती आईवडिलांसोबत त्याला भेटेल.

दोन वडील बाप्तिस्मा झालेल्या एका अल्पवयीन मुलाला त्याच्या आईवडिलांसोबत त्याच्या घरी भेटत आहेत. त्यातला एक वडील त्याला एक वचन दाखवतोय.

जेव्हा एक अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी गंभीर पाप करते तेव्हा वडील त्याला/तिला तिच्या ख्रिस्ती आईवडिलांसोबत भेटतात (परिच्छेद १८ पाहा)


“यहोवा दयाळू आणि खूप करुणामय आहे”

१९. वडील जेव्हा पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला भेटतात तेव्हा ते यहोवासारखं वागायचा कसा प्रयत्न करतात?

१९ जे वडील समितीमध्ये सेवा करतात त्यांना यहोवाने मंडळीला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. (१ करिंथ. ५:७) पण, असं असलं तरी पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी वडील शक्य ते सगळं करतात. म्हणून त्या व्यक्‍तीला मदत करताना त्यांची हीच आशा असते, की ती आपला मार्ग बदलेल. का? कारण त्यांना यहोवासारखं वागायचं असतं. तो “दयाळू आणि खूप करुणामय आहे.” (याको. ५:११) लक्ष द्या प्रेषित योहानने त्याच्या काळातल्या भाऊबहिणींबद्दल अशीच प्रेमळ वृत्ती कशी दाखवली. त्याने लिहिलं: “माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक आहे, म्हणजे येशू ख्रिस्त, जो नीतिमान आहे.”—१ योहा. २:१.

२०. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कधीकधी गंभीर पाप करणारे भाऊबहीण पश्‍चात्ताप करायला नकार देतात. अशा वेळी त्यांना मंडळीतून काढून टाकावं लागतं. मग अशी प्रकरणं मंडळीतले वडील कसे हाताळतात? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू.

तुमचं उत्तर काय असेल?

  • रोमकर २:४ प्रमाणे वडील जेव्हा पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला भेटतात तेव्हा त्यांचा उद्देश काय असतो?

  • २ तीमथ्य २:२४-२६ मधून वडिलांना कोणता सल्ला मिळतो?

  • “सर्वांच्या देखत कानउघाडणी” करण्याचा काय अर्थ होतो?

गीत १०३ मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!

a पूर्वी या समितीला ‘न्यायिक समिती’ म्हटलं जायचं. पण न्याय करणं हा त्यांच्या कामाचा फक्‍त एक पैलू आहे. म्हणून यापुढे आपण हे नाव वापरणार नाही. याउलट, या समितीला आता फक्‍त ‘वडिलांची समिती’ म्हटलं जाईल.

b इथे आईवडिलांबद्दल जे सांगण्यात आलंय ते मुलांचा कायदेशीर सांभाळ करणाऱ्‍यांना किंवा अल्पवयीन मुलांची पालक म्हणून सांभाळ करणाऱ्‍यांनाही लागू होतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा