वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 ऑगस्ट पृ. २६-३१
  • मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका”
  • मंडळीतून काढून टाकलेल्यांना वडील कशी मदत करतात?
  • मंडळी काय करू शकते?
  • यहोवासारखी दया आणि करुणा दाखवा
  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • पाप करणाऱ्‍यांबद्दल मंडळी यहोवासारखा दृष्टिकोन कसा बाळगते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांशी यहोवाचे साक्षीदार कसं वागतात?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • वडिलांची मदत घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 ऑगस्ट पृ. २६-३१

अभ्यास लेख ३५

गीत १२३ देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला

मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत

“ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा ९९ नीतिमान माणसांपेक्षा, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात जास्त आनंद व्यक्‍त केला जाईल.”—लूक १५:७.

या लेखात:

मंडळीतून काही जणांना का काढून टाकावं लागतं? अशा लोकांना पश्‍चात्ताप करायला आणि यहोवासोबतचं नातं पुन्हा जोडायला मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात, ते पाहा.

१-२. (क) गंभीर पाप करून जे पश्‍चात्ताप करत नाहीत अशांबद्दल यहोवाला कसं वाटतं? (ख) गंभीर पाप करणाऱ्‍यांनी काय करावं असं यहोवाला वाटतं?

यहोवा सगळ्याच प्रकारचं वागणं खपवून घेतो असं नाही. उलट त्याला पापाची घृणा वाटते. (स्तो. ५:४-६) त्याने त्याच्या वचनात जे नीतिमान स्तर सांगितले आहेत, त्यांचा आपण आदर करावा असं त्याला वाटतं. आपण हे स्तर पाळत असताना तो आपल्यासारख्या अपरिपूर्ण लोकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (स्तो. १३०:३, ४) पण त्याच वेळी जी “अधार्मिक माणसं देवाच्या अपार कृपेचं निमित्त देऊन निर्लज्ज वर्तन करतात” त्यांचं वागणं यहोवा खपवूनही घेत नाही. (यहू. ४) बायबल सांगतं अशा ‘दुष्ट लोकांचा’ हर्मगिदोनाच्या युद्धात नाश होणार आहे.—२ पेत्र ३:७; प्रकटी. १६:१६.

२ असं असलं तरी, कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही. या आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, की “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) मंडळीतले वडीलही या बाबतीत यहोवासारखं वागतात. ते पाप करणाऱ्‍याला आपले चुकीचे मार्ग बदलायला आणि यहोवासोबतचं नातं पुन्हा जोडायला धीराने मदत करतात. पण तरी पाप करणारे सगळेच पश्‍चात्ताप करतात असं नाही. (यश. ६:९) पश्‍चात्ताप करण्यासाठी वारंवार मदत करूनसुद्धा काही जण पाप करत राहतात. मग अशा परिस्थितीत वडिलांनी काय केलं पाहिजे?

“त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका”

३. (क) पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी व्यक्‍तीसोबत काय केलं जावं असं बायबल म्हणतं? (ख) जेव्हा पाप करणाऱ्‍याला मंडळीतून काढून टाकलं जातं, तेव्हा एका अर्थाने त्या गोष्टीसाठी तो स्वतःच जबाबदार आहे असं आपण का म्हणू शकतो?

३ जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करत नाही, तेव्हा वडिलांना १ करिंथकर ५:१३ मधलं मार्गदर्शन पाळावं लागतं. तिथे म्हटलंय: “त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.” खरंतर एका अर्थाने तो पाप करणारा स्वतःच त्या गोष्टीसाठी जबाबदार असतो. कारण त्यानेa जे काही पेरलंय त्याचीच तो कापणीही करत असतो. (गलती. ६:७) आपण असं का म्हणू शकतो? कारण, पश्‍चात्ताप करण्यासाठी वडिलांनी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा त्याने ती मदत नाकारलेली असते. (२ राजे १७:१२-१५) आणि त्याच्या कामांवरून दिसून येतं, की त्याने यहोवाच्या आज्ञा मोडायचं निवडलंय.—अनु. ३०:१९, २०.

४. पश्‍चात्ताप न करणाऱ्‍याला मंडळीतून काढून टाकल्याची घोषणा का केली जाते?

४ पाप करणारा जेव्हा पश्‍चात्ताप करत नाही तेव्हा त्याला मंडळीतून काढून टाकलं जातं. आणि तो आता यहोवाचा साक्षीदार नाही हे मंडळीला कळावं म्हणून सभेमध्ये एक छोटीशी घोषणा केली जाते.b पाप करणाऱ्‍याचा सर्वांसमोर अपमान करायला ही घोषणा केली जात नाही. याउलट, या घोषणेमुळे मंडळीला शास्त्रवचनांत दिलेला सल्ला पाळायला मदत होते. कारण बायबल म्हणतं, अशा व्यक्‍तीची “संगत सोडून द्या” आणि “त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका.” (१ करिंथ. ५:९-११) यहोवाने हे मार्गदर्शन आपल्याच फायद्यासाठी दिलंय. प्रेषित पौलनेही म्हटलं: “थोडंसं खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं.” (१ करिंथ. ५:६) जे यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार चालायचा प्रयत्न करतात त्यांचा निर्धार अशा लोकांमुळे कमजोर होऊ शकतो.—नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३.

५. जेव्हा एखाद्याला मंडळीतून काढून टाकलं जातं तेव्हा आपण त्याच्याबद्दल कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे? आणि का?

५ पण एखाद्याला मंडळीतून काढून टाकलं जातं तेव्हा आपण त्याच्याबद्दल कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे? हे खरं आहे, की आपण त्याच्यासोबत उठणं-बसणं ठेवत नाही. तरी त्याच्या बाबतीत काहीच आशा नाही असंही आपण समजत नाही. याउलट, तो यहोवाचं हरवलेलं मेंढरू आहे या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहतो. कारण जेव्हा एक मेंढरू कळपापासून दूर जातं तेव्हा ते परत कळपात येण्याची शक्यताही असते. लक्षात असू द्या की त्या व्यक्‍तीने आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, तो या क्षणी आपल्या समर्पणाच्या वचनानुसार जीवन जगत नाही. त्यामुळे तो कदाचित कायमच्या जीवनाची आशा गमावून बसू शकतो. (यहे. १८:३१) पण जोपर्यंत यहोवा दया दाखवतोय, तोपर्यंत ती व्यक्‍ती बदलण्याची आणि यहोवाकडे परत येण्याची आशा असते. मग, ज्याला मंडळीतून काढून टाकलं जातं त्याला वडील कशी मदत करू शकतात?

मंडळीतून काढून टाकलेल्यांना वडील कशी मदत करतात?

६. ज्याला मंडळीतून काढून टाकण्यात आलंय त्याला मदत करण्यासाठी वडील काय करतात?

६ एखाद्याला मंडळीतून काढून टाकल्यावर वडील त्याला यहोवाकडे परत यायला मदत करायचं सोडून देतात का? अजिबात नाही. जेव्हा पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीला हे सांगितलं जातं की त्याला मंडळीतून काढून टाकलं जाईल, तेव्हा मंडळीत पुन्हा यायला त्याने कोणती पावलं उचलली पाहिजेत हेसुद्धा वडिलांची समिती त्याला सांगते. पण वडील फक्‍त एवढंच करणार नाही. गंभीर पापाच्या बऱ्‍याचशा प्रकरणांमध्ये ते पाप करणाऱ्‍याला सांगतील, की काही महिन्यांनी ते त्याला पुन्हा भेटतील. त्या वेळी त्याचं मन बदललंय की नाही हे ते पाहण्याचा प्रयत्न करतील. आणि जर तो भेटायला तयार असेल तर वडील त्याला पश्‍चात्ताप करायचं आणि यहोवाकडे परत यायचं प्रेमळपणे प्रोत्साहन देतील. आणि त्या वेळी जरी त्याचं मन बदललेलं नसलं, तरी त्याला पश्‍चात्ताप करायला मदत करण्यासाठी वडील त्याला पुढेही अधूनमधून भेटत राहतील.

७. मंडळीतून ज्यांना काढून टाकण्यात आलंय त्यांच्या बाबतीत वडील यहोवासारखी दया दाखवायचा कसा प्रयत्न करतात? (यिर्मया ३:१२)

७ मंडळीतून ज्यांना काढून टाकण्यात आलंय त्यांच्या बाबतीत वडील यहोवासारखी दया दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे समजण्यासाठी काही उदाहरणांकडे लक्ष द्या. इस्त्राएली लोकांना मदत करण्याआधी, त्यांनी पश्‍चात्ताप करावा याची यहोवा वाट पाहत बसला नाही. याउलट, त्यांनी पश्‍चात्ताप करण्याआधीच यहोवाने संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवून पुढाकार घेतला. या अंकाच्या दुसऱ्‍या लेखात आपण काय पाहिलं त्याचाही विचार करा. होशेय संदेष्ट्याची बायको अजूनही पाप करत होती. तरी, यहोवाने त्याला तिच्यासोबत समेट करायला सांगितलं. यातून यहोवाने त्याच्या लोकांना शिकवलं की तो किती दयाळू आहे. (होशे. ३:१; मला. ३:७) आज ख्रिस्ती वडील यहोवाच्या या गुणाचं अनुकरण करतात. आणि त्यांनाही मनापासून वाटतं की पाप करणाऱ्‍याने यहोवाकडे परत यावं. म्हणून त्या व्यक्‍तीला यहोवाकडे परत यायला कठीण जाईल अशी कोणतीही गोष्ट ते करत नाहीत.—यिर्मया ३:१२ वाचा.

८. हरवलेल्या मुलाच्या उदाहरणातून आपल्याला यहोवाच्या दयेबद्दल आणखी काय कळतं? (लूक १५:७)

८ या अंकाच्या दुसऱ्‍या लेखात आपण हरवलेल्या मुलाचं जे उदाहरणं पाहिलं त्याचाही विचार करा. हरवलेला मुलगा दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं. आणि “त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” (लूक १५:२०) इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? मुलाने क्षमेची भीक मागावी याची वडील वाट पाहत बसले नाहीत. याउलट, कुठल्याही प्रेमळ पित्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे, वडीलसुद्धा मंडळीपासून भरकटलेल्यांच्या बाबतीत असाच दृष्टिकोन बाळगायचा प्रयत्न करतात. त्यांची इच्छा असते की, या हरवलेल्या मेंढराने “पुन्हा घरी यावं.” (लूक १५:२२-२४, ३२) आणि जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करून मंडळीत परत येतो, तेव्हा स्वर्गात यहोवाला, येशूला, स्वर्गदूतांना आणि पृथ्वीवर सगळ्या भाऊबहिणींना खूप आनंद होतो!—लूक १५:७ वाचा.

९. यहोवा पापी लोकांना काय करायचं प्रोत्साहन देतो?

९ आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्यावरून स्पष्ट होतं, की यहोवा पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी लोकांचं पाप खपवून घेत नाही. पण त्यासोबतच, तो त्यांच्याकडे पाठही फिरवत नाही. त्याची इच्छा आहे की त्यांनी त्याच्याकडे परत यावं. पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांबद्दल यहोवाला काय वाटतं हे होशेय १४:४ मध्ये सांगण्यात आलंय. तिथे यहोवा म्हणतो: “मी त्यांचा अविश्‍वासूपणा बरा करीन. मी माझ्या स्वतःच्या इच्छेने त्यांच्यावर प्रेम करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.” खरंच, किती जबरदस्त शब्द आहेत! यहोवाच्या या शब्दांमुळे वडिलांना, पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीमध्ये पश्‍चात्तापाची चिन्हं पाहायचं प्रोत्साहन मिळतं. आणि जे यहोवाला सोडून गेलेत त्यांनाही या शब्दांवरून अशी खातरी मिळते, की यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी परत यावं अशी त्याची इच्छा आहे.

१०-११. ज्यांना बऱ्‍याच वर्षांपूर्वी मंडळीतून काढून टाकण्यात आलं होतं त्यांना वडील कशी मदत करतील?

१० पण कदाचित काही जणांना बऱ्‍याच वर्षांआधी मंडळीतून काढून टाकण्यात आलं असेल. मग अशा लोकांबद्दल काय? त्यांना मंडळीतून ज्या कारणासाठी काढून टाकण्यात आलं होतं, ती गोष्ट कदाचित ते आता करतही नसतील. काहींना तर त्यांना मंडळीतून का काढून टाकण्यात आलंय हेसुद्धा आठवत नसेल. एखाद्याला मंडळीतून काढून कितीही काळ लोटला असला, तरी वडील त्याला शोधायचा आणि भेटायचा प्रयत्न करतील. अशा वेळी ते त्याच्यासोबत प्रार्थना करू शकतात. शिवाय ते त्याला मंडळीत पुन्हा यायचं प्रोत्साहनही देतील. हे खरंय की बऱ्‍याच वर्षांपर्यंत मंडळीपासून दूर राहिल्यामुळे, तो आध्यात्मिक रित्या कमजोर झाला असेल. म्हणून जर त्याने मंडळीत पुन्हा यायची इच्छा दाखवली, तर वडील त्याच्यासोबत बायबल अभ्यासाची व्यवस्था करतील; मग त्याला मंडळीत अजून स्वीकारलं गेलं नसलं तरीसुद्धा. पण प्रत्येक प्रकरणामध्ये त्या व्यक्‍तीसोबत कोण बायबल अभ्यास करेल हे वडीलच ठरवतील.

११ वडील यहोवाच्या प्रेमाचं आणि दयेचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे जे यहोवाला सोडून गेलेत अशा सगळ्यांपर्यंत पोहोचायचा हे भाऊ प्रयत्न करतील. आणि त्यांना हे सांगतील, की यहोवाच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी अजूनही उघडे आहेत. जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करतो आणि त्याचे पापी मार्ग सोडून देतो, तेव्हा उशीर न करता त्याला मंडळीत पुन्हा स्वीकारलं जाऊ शकतं.—२ करिंथ. २:६-८.

१२. (क) कोणत्या प्रकरणांच्या बाबतीत वडिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे? (ख) पाप करणाऱ्‍या काही लोकांना यहोवा कधीच दया दाखवणार नाही असा विचार आपण का करू नये? (तळटीपसुद्धा पाहा.)

१२ गंभीर पापाच्या काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एखाद्याला मंडळीत पुन्हा स्वीकारलं जाण्याआधी वडिलांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, लहान मुलांचं लैंगिक शोषण, धर्मत्याग किंवा विवाह मोडण्यासाठी कट रचणं. अशा प्रकरणांच्या बाबतीत, पापी व्यक्‍तीने खरंच पश्‍चात्ताप केलाय का, याची वडिलांनी खातरी केली पाहिजे. (मला. २:१४; २ तीम. ३:६) कारण त्यांच्यावर कळपाचं संरक्षण करायची जबाबदारी आहे. पण त्याच वेळी आपण सगळ्यांनी हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, की जी व्यक्‍ती मनापासून पश्‍चात्ताप करते आणि आपली चुकीची कामं सोडून देते तिचा यहोवा पुन्हा स्वीकार करतो. त्यामुळे इतरांचा विश्‍वासघात करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या बाबतीत वडील सावधगिरी बाळगतील. पण तरी त्यांनी कधीच असा विचार करू नये, की अशा प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या व्यक्‍तीला यहोवाची मर्जी कधीच मिळू शकणार नाही.c—१ पेत्र २:१०.

मंडळी काय करू शकते?

१३. (क) वडिलांनी ज्यांना ताडन दिलंय त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? (ख) ज्यांना मंडळीतून काढून टाकलं जातं त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे?

१३ या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे कधीकधी एखाद्याला ताडन दिल्याची घोषणा केली जाते. अशा वेळी आपण त्याच्यासोबत आधीसारखं उठणं-बसणं ठेवू शकतो. कारण त्याने पश्‍चात्ताप केलेला असतो आणि आपला चुकीचा मार्ग सोडून दिलेला असतो. (१ तीम. ५:२०) तसंच, तो अजूनही मंडळीचा भाग असतो. आणि चांगली कामं करत राहायला त्याला भाऊबहिणींकडून प्रोत्साहनाची गरज असते. (इब्री १०:२४, २५) पण ज्याला मंडळीतून काढून टाकलं जातं, त्याच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. आपण अशा माणसाची “संगत सोडून देतो” आणि “त्याच्यासोबत जेवायलाही बसत नाही.”—१ करिंथ. ५:११.

१४. मंडळीतून ज्याला काढून टाकलं जातं त्याच्याशी वागताना भाऊबहीण त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर कसा करू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ पण मग याचा असा अर्थ होतो का, की ज्याला मंडळीतून काढून टाकण्यात आलंय त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो? नक्कीच नाही! हे खरंय की आपण त्याच्यासोबत उठणं-बसणं ठेवणार नाही. पण जर तो आपला नातेवाईक असला किंवा मंडळीतून काढून टाकण्याआधी आपला जवळचा मित्र असला, तर त्याला सभांना यायचं आमंत्रण द्यायचं की नाही हे ठरवण्यासाठी, आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करू शकतो. मग सभेला आल्यावर आपण त्याच्याशी कसं वागलं पाहिजे? पूर्वी आपण अशा व्यक्‍तीला “नमस्ते” सुद्धा म्हणत नव्हतो. पण आता प्रत्येक भावाने किंवा बहिणीने त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. काहींना वाटेल की त्या व्यक्‍तीला नमस्ते करण्यात किंवा सभांमध्ये आल्यावर थोडक्यात तिचं स्वागत करण्यात काही हरकत नाही. पण आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण त्याच्याबरोबर जास्त वेळ बोलणार नाही किंवा इतर वेळी त्याच्यासोबत वेळ घालवणार नाही.

कोलाज: १. मंडळीतून काढून टाकलेल्या एका स्त्रीला एक बहीण फोन करते आणि तिला सभेला बोलवते. २. ती बहीण आणि तिचे पती त्या स्त्रीचं थोडक्यात स्वागत करतात.

ज्यांना मंडळीतून काढून टाकण्यात आलंय त्यांना सभांना बोलवायचं की नाही, किंवा सभांमध्ये त्यांना नमस्ते म्हणायचं की नाही हे ठरवताना भाऊबहीण त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करू शकतात (परिच्छेद १४ पाहा)


१५. २ योहान ९-११ मध्ये कोणत्या प्रकारच्या पापी लोकांबद्दल सांगण्यात आलंय? (“योहान आणि पौल एकाच प्रकारच्या पापाबद्दल बोलत होते का?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१५ पण काही जण कदाचित म्हणतील: ‘बायबल तर म्हणतं की जे अशा व्यक्‍तीला नमस्कार करतात ते त्याच्या दुष्ट कामांत सहभागी होतात, मग त्याबद्दल काय?’ (२ योहान ९-११ वाचा.) पण या वचनांचा मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतला, तर त्यावरून दिसतं की हे मार्गदर्शन धर्मत्यागी लोकांच्या बाबतीत आणि इतरांना वाईट कामं करायला प्रवृत्त करत राहणाऱ्‍यांच्या बाबतीत लागू होतं. (प्रकटी. २:२०) त्यामुळे जो माणूस धर्मत्यागी शिकवणी किंवा इतर चुकीच्या गोष्टी पसरवत राहतो, त्याला वडील भेटणार नाहीत. असं असलं तरी पुढे जाऊन तो पश्‍चात्ताप करेल अशी आपल्याला आशा असते. पण जोपर्यंत तो असं करत नाही, तोपर्यंत आपण त्याला नमस्कार करणार नाही किंवा मंडळीच्या सभांमध्ये त्याला बोलवणारही नाही.

योहान आणि पौल एकाच प्रकारच्या पापाबद्दल बोलत होते का?

देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या आपल्या दुसऱ्‍या पत्रात प्रेषित योहानने म्हटलं: “यापेक्षा वेगळं शिक्षण देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याला आपल्या घरात घेऊ नका किंवा त्याला नमस्कारही करू नका. कारण जो कोणी त्याला नमस्कार करतो तो त्याच्या दुष्ट कामांत सहभागी आहे.”—२ योहा. १०, ११.

पण १ करिंथकर ५:११ मध्ये प्रेषित पौलने भाऊबहिणींना, मंडळीतून काढून टाकलेल्यांची ‘संगत सोडून द्यायला’ सांगितलं. मग प्रश्‍न आहे की इथे योहान आणि पौल एकाच प्रकारच्या पापाबद्दल बोलत होते का? नक्कीच नाही.

हे दोन्ही प्रेषित दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पापांबद्दल बोलत होते. पौल अनैतिक लैंगिक कृत्य करणाऱ्‍या माणसाबद्दल बोलत होता. तर जवळपास ४३ वर्षांनंतर, योहान धर्मत्यागी लोकांबद्दल, खोट्या शिकवणी पसरवणाऱ्‍यांबद्दल आणि चुकीच्या वागणुकीला बढावा देणाऱ्‍या लोकांबद्दल बोलत होता. उदाहरणार्थ, काही जण असं शिकवत होते, की येशू हा ख्रिस्त नाही.— १ योहा. २:२२; ४:२, ३.

योहानने जेव्हा पत्रं लिहिली तेव्हा मंडळीत धर्मत्याग वणव्यासारखा पसरला होता. योहानला माहीत होतं, की तो हे पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण असं असलं तरी, एक प्रेषित म्हणून शक्य तितक्या प्रमाणात धर्मत्याग ‘रोखून धरण्याची’ त्याची जबाबदारी त्याने पार पाडली.—२ थेस्सलनी. २:७.

म्हणून योहानने भाऊबहिणींना अशा खोट्या शिक्षकांपासून आणि फसवणाऱ्‍यांपासून सावध राहायचा इशारा दिला. त्याने भाऊबहिणींना सांगितलं, की त्यांनी अशा लोकांना कधीच घरात घेऊ नये किंवा त्यांना नमस्कारही करू नये. कारण त्यांनी जर साधा नमस्कारसुद्धा केला असता, तर धर्मत्यागी लोकांना त्यांच्या खोट्या शिकवणी सांगायची आयती संधी मिळाली असती. आज आपणसुद्धा जर अशा लोकांच्या वेबसाईटवर किंवा सोशल मिडियावर काही लिहिलं तर असंच होऊ शकतं. बायबल म्हणतं आपण जर धर्मत्यागी शिकवणी पसरवणाऱ्‍या लोकांना नमस्कार केला, तर आपणही त्यांच्या “दुष्ट कामांत सहभागी” होऊ.

याउलट पौल १ करिंथकरच्या ५ व्या अध्यायात अनैतिक लैंगिक कृत्य करणाऱ्‍या माणसाबद्दल बोलत होता. आणि त्यासाठी त्या माणसाला मंडळीतून काढून टाकावं लागलं होतं. पण असं दिसतं, की तो माणूस काही धर्मत्यागी नव्हता किंवा इतरांना यहोवाच्या स्तरांविरुद्ध वागायलाही सांगत नव्हता. (प्रकटीकरण २:२० सोबत तुलना करा.) त्यामुळे पौलने भाऊबहिणींना त्या माणसाची संगत सोडून द्यायला सांगितलं होतं. इतकंच काय तर, त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका असं म्हटलं होतं. पण भाऊबहिणींनी त्याला कधीच नमस्कार करू नये असं मात्र त्याने सांगितलं नव्हतं.

यहोवासारखी दया आणि करुणा दाखवा

१६-१७. (क) पापी लोकांनी काय करावं असं यहोवाला वाटतं? (यहेज्केल १८:३२) (ख) पापी लोकांना पश्‍चात्ताप करायला मदत करताना वडील कसं दाखवू शकतात की ते यहोवाचे सहकारी आहेत?

१६ या अंकाच्या पाच लेखांमधून आपण काय शिकलो? कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही. (यहेज्केल १८:३२ वाचा.) यहोवाला वाटतं की पापी लोकांनी पुन्हा त्याच्यासोबत नातं जोडावं आणि समेट करावा. (२ करिंथ. ५:२०) म्हणूनच प्राचीन काळापासून तो त्याच्या भरकटलेल्या लोकांना, तसंच बंडखोर सेवकांना पश्‍चात्ताप करायला आणि त्याच्याकडे परत यायला विनंती करत आलाय. आज वडिलांना देवासोबत काम करून त्याचे सहकारी बनण्याचा बहुमान मिळालाय. तेसुद्धा पाप करणाऱ्‍यांना पश्‍चात्ताप करायला मदत करतात.—रोम. २:४; १ करिंथ. ३:९.

१७ विचार करा, जेव्हा एखादा पश्‍चात्ताप करतो तेव्हा स्वर्गात किती आनंद होत असेल! प्रत्येक वेळी जेव्हा एखादं हरवलेलं मेंढरू मंडळीत परत येतं, तेव्हा आपल्या स्वर्गातल्या पित्याला, यहोवाला खूप आनंद होतो. खरंच, यहोवा किती दयाळू, करुणामय आणि अपार कृपा दाखवणारा देव आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टींवर मनन करतो तेव्हा त्याच्याबद्दलचं आपलं प्रेम वाढत राहतं.—लूक १:७८.

तुमचं उत्तर काय असेल?

  • काही लोकांना मंडळीतून का काढून टाकलं जातं?

  • वडील यहोवासारखी दया कशी दाखवू शकतात?

  • ज्यांना मंडळीतून काढून टाकलं जात त्यांच्याशी वागताना भाऊबहीण बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर कसा करू शकतात?

गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!

a या लेखात पाप करणारी व्यक्‍ती पुरुष आहे असं जरी सांगण्यात आलं असलं तरी, यात दिलेली माहिती स्त्रियांनाही लागू होते.

b इथून पुढे आपण अशा लोकांच्या बाबतीत बहिष्कृत हा शब्द वापरणार नाही. याउलट, पौलने १ करिंथकर ५:१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण अशांच्या बाबतीत मंडळीतून काढून टाकलेले असे शब्द वापरू.

c काही लोकांच्या पापांना कधीच माफ केलं जाणार नाही असं बायबल म्हणतं. कारण अशा लोकांनी नेहमी देवाच्या विरोधात वागायचं ठरवलेलं असतं. आणि त्यांना माफी द्यायची की नाही हे फक्‍त यहोवा आणि येशूच ठरवू शकतात.—मार्क ३:२९; इब्री १०:२६, २७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा