अभ्यास लेख ३३
गीत १३० क्षमा करत राहा
पाप करणाऱ्यांबद्दल मंडळी यहोवासारखा दृष्टिकोन कसा बाळगते?
“एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर . . . आपल्यासाठी एक सहायक आहे.”—१ योहा. २:१.
या लेखात:
करिंथ मंडळीत गंभीर पापाचं प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं, त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहा.
१. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत यहोवाची काय इच्छा आहे?
यहोवाने आपल्या प्रत्येकाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची क्षमता दिली आहे. त्यामुळे आपण दररोज निर्णय घेतो. पण एक व्यक्ती जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करते आणि त्याच्या कुटुंबाचा भाग बनते, तेव्हा ती एक महत्त्वाचा निर्णय घेत असते. यहोवाची इच्छा आहे की सगळ्यांनीच हा निर्णय घ्यावा. का बरं? कारण त्याचं लोकांवर प्रेम आहे आणि त्यांचं चांगलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. त्याला वाटतं, की सगळ्यांनी त्याच्याशी मैत्री करावी आणि कायम जगावं.—अनु. ३०:१९, २०; गलती. ६:७, ८.
२. ज्यांनी अजूनही पश्चात्ताप केला नाही त्यांनी काय केलं पाहिजे असं यहोवाला वाटतं? (१ योहान २:१)
२ असं असलं तरी, यहोवा कोणालाही त्याची उपासना करायची जबरदस्ती करत नाही. प्रत्येकाने काय केलं पाहिजे हे त्याने स्वतः ठरवावं असं त्याला वाटतं. पण बाप्तिस्मा झालेल्या एखाद्याने देवाचा नियम मोडला आणि गंभीर पाप केलं तर काय? जर त्याने पश्चात्ताप केला नाही तर त्याला मंडळीतून काढून टाकलं पाहिजे. (१ करिंथ. ५:१३) असं असलं तरी यहोवाची इच्छा आहे, की त्याने त्याच्याकडे परत यावं. खरंतर खंडणीची तरतूद करण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण त्यामुळे पश्चात्तापी व्यक्तीला माफी मिळू शकते. (१ योहान २:१ वाचा.) आपला प्रेमळ देव गंभीर पाप करणाऱ्या लोकांना विनंती करतो, की त्यांनी पश्चात्ताप करावा.—जख. १:३; रोम. २:४; याको. ४:८.
३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ आपण पापाबद्दल आणि पाप करणाऱ्या व्यक्तीबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगावा असं त्याला वाटतं. आपण हे कसं करू शकतो, याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. हा लेख वाचत असताना पुढे दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या: (१) करिंथ मंडळीमध्ये गंभीर पापाचं प्रकरण कसं हाताळण्यात आलं? (२) पाप करणाऱ्या व्यक्तीने पश्चात्ताप केला तेव्हा प्रेषित पौलने मंडळीला काय करायला सांगितलं? (३) गंभीर पाप करणाऱ्यांबद्दल यहोवाला कसं वाटतं?
पहिल्या शतकात गंभीर पापाचं प्रकरण कसं हाताळण्यात आलं?
४. पहिल्या शतकातल्या करिंथ मंडळीत कोणती घटना घडली? (१ करिंथकर ५:१, २)
४ १ करिंथकर ५:१, २ वाचा. पौलच्या तिसऱ्या मिशनरी दौऱ्यात त्याला नवीनच सुरू झालेल्या करिंथ मंडळीमधून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. त्या मंडळीतला एक भाऊ त्याच्या सावत्र आईसोबत संबंध ठेवत होता. असं वागणं खूप धक्कादायक होतं. आणि अशी कामं ‘विदेश्यांमध्येही केली जात नव्हती.’ करिंथ मंडळी त्याचं हे वागणं खपवून तर घेत होतीच, पण त्यांनी त्याला मंडळीत राहूसुद्धा दिलं होतं. कदाचित काही जणांनी विचार केला असेल, की अपरिपूर्ण माणसांशी यहोवा किती दयेने आणि प्रेमाने वागतो याचं हे उदाहरण आहे. पण यहोवा त्याच्या लोकांमध्ये कोणतंही गंभीर पाप खपवून घेत नाही. त्या माणसाच्या अशा निर्लज्ज वागण्यामुळे मंडळीचं चांगलं नाव खराब होत होतं. इतकंच नाही, तर त्याच्यासोबत ऊठबस करत असलेल्या मंडळीतल्या इतरांवरही त्याचा वाईट प्रभाव पडत असावा. मग प्रेषित पौलने मंडळीला काय करायला सांगितलं?
५. पौलने मंडळीला काय करायला सांगितलं आणि त्याचा काय अर्थ होता? (१ करिंथकर ५:१३) (चित्रसुद्धा पाहा.)
५ १ करिंथकर ५:१३ वाचा. देवाच्या प्रेरणेने पौलने मंडळीला एक पत्र लिहिलं. त्यात त्याने सांगितलं, की पश्चात्ताप न करणाऱ्या पापी व्यक्तीला मंडळीतून काढून टाकलं जावं. मग इतर विश्वासू भाऊबहिणींनी त्याच्याशी कसं वागयचं होतं? पौलने त्यांना ‘अशा माणसाची संगत सोडून द्यायला’ सांगितलं. याचा काय अर्थ होता? पौलने त्यांना सांगितलं, की त्यांनी ‘त्याच्यासोबत जेवायलाही बसू नये.’ (१ करिंथ. ५:११) कारण आपण जेव्हा एखाद्यासोबत जेवतो, तेव्हा आपण त्याच्यासोबत वेळ घालवत असतो. स्पष्टच आहे, पौलला मंडळीला हे सांगायचं होतं, की त्यांनी अशा माणसासोबत ऊठबस करू नये. यामुळे त्याच्या वाईट प्रभावापासून मंडळीचं संरक्षण होणार होतं. (१ करिंथ. ५:५-७) तसंच, त्या माणसाला याची जाणीव झाली असती, की तो यहोवापासून किती दूर गेलाय. आणि वाईट वाटल्यामुळे त्याला पश्चात्ताप करायला मदत झाली असती.
पौलने देवाच्या प्रेरणेने करिंथ मंडळीला लिहिलेल्या पत्रात असं सांगितलं, की त्यांनी पश्चात्ताप न करणाऱ्या पापी व्यक्तीला मंडळीतून काढून टाकावं (परिच्छेद ५ पाहा)
६. पौलच्या पत्राचा मंडळीवर आणि पापी व्यक्तीवर काय परिणाम झाला?
६ करिंथ मंडळीला पत्र मिळाल्यानंतर ते काय करतील असा प्रश्न पौलला पडला. पण नंतर तीतने एक चांगली बातमी आणली. पौलने पत्रात जे काही सांगितलं होतं ते मंडळीने ऐकलं होतं. (२ करिंथ. ७:६, ७) पौलने दिलेल्या सूचना त्यांनी पाळल्या होत्या. इतकंच नाही तर, पत्र लिहिल्यानंतर काही महिन्यांनी पाप करणाऱ्या व्यक्तीने पश्चात्तापही केला होता. त्याने त्याचं वागणं आणि मनोवृत्ती बदलली होती आणि यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे वागायला सुरुवात केली होती. (२ करिंथ. ७:८-११) मग आता पौल मंडळीला कोणत्या सूचना देणार होता?
पश्चात्ताप करणाऱ्या पापी व्यक्तीशी मंडळीला कशा प्रकारे वागायचं होतं?
७. पापी व्यक्तीला मंडळीतून काढून टाकल्यामुळे कोणता चांगला परिणाम झाला? (२ करिंथकर २:५-८)
७ २ करिंथकर २:५-८ वाचा. पौलने म्हटलं, की “त्या माणसाला बहुतेक जणांनी जे ताडन दिलं आहे, ते पुरेसं आहे.” दुसऱ्या शब्दांत, त्याला जे ताडन मिळालं होतं त्याचा उद्देश पूर्ण झाला होता. कोणता उद्देश? त्याला पश्चात्ताप करायला मदत करायचा.—इब्री १२:११.
८. पौलने मंडळीला पुढे काय करायला सांगितलं?
८ पौलने मंडळीला सांगितलं: “तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या . . . त्याला तुमच्या प्रेमाचं आश्वासन द्या.” लक्ष द्या, पौलची इच्छा होती, की मंडळीने त्या व्यक्तीला पुन्हा आपल्यात घ्यावं. पण त्यासोबतच त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून त्याला याची जाणीव करून द्यावी, की त्यांनी त्याला मनापासून क्षमा केली आहे आणि त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. यामुळे हे दिसणार होतं, की तो मंडळीत पुन्हा आल्यामुळे त्यांना आनंद झालाय.
९. पश्चात्ताप करणाऱ्या पापी माणसाला क्षमा करणं काहींना कठीण का गेलं असेल?
९ पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीचं मंडळीत पुन्हा स्वागत करायला काहींना कठीण गेलं असेल का? बायबलमध्ये असं काही सांगितलेलं नाही, पण कदाचित तसं झालंही असेल. कारण त्या माणसाने जे पाप केलं होतं, त्यामुळे मंडळीला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. तसंच, काहींच्या मनाला त्यामुळे ठेचही लागली असेल. मंडळीतल्या इतर भाऊबहिणींनी यहोवाच्या आज्ञा पाळायला खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे काहींना वाटलं असेल, की इतकं गंभीर पाप करणाऱ्या माणसाचं मंडळीत प्रेमाने स्वागत करणं चुकीचं आहे. (लूक १५:२८-३० सोबत तुलना करा.) असं असलं तरी, परत आलेल्या या भावावर मंडळीने मनापासून प्रेम करणं का महत्त्वाचं होतं?
१०-११. जर वडिलांनी पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला माफ केलं नसतं तर काय झालं असतं?
१० कल्पना करा, पश्चात्ताप करणाऱ्या या व्यक्तीला वडिलांनी मंडळीत पुन्हा घेतलं नसतं तर? किंवा, मंडळीत परत आल्यावर इतर भाऊबहिणींनी त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं नसतं तर? असं झालं असतं तर, तो ‘दुःखात पार बुडून’ गेला असता. तसंच, आपण यहोवाची सेवा पुन्हा कधीच करू शकणार नाही, असं त्याला वाटलं असतं. आणि यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करण्यासाठी त्याने प्रयत्नच केले नसते.
११ पण याहून वाईट म्हणजे, मंडळीतल्या भाऊबहिणींनी पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला माफ करायला नकार दिला असता, तर त्यांचं यहोवासोबतचं नातं धोक्यात आलं असतं. ते कसं? कारण असं करून ते यहोवासारखं नाही तर सैतानासारखं वागले असते. सैतान कठोर आहे आणि तो अजिबात दया दाखवत नाही. पण याउलट, यहोवा पश्चात्ताप करणाऱ्या पापी लोकांना दया दाखवून क्षमा करतो. मंडळीतल्या भाऊबहिणींनी जर त्या माणसाला क्षमा केली नसती, तर सैतानाचा हेतू साध्य झाला असता; त्या माणसाचं यहोवासोबतचं नातं तुटलं असतं.—२ करिंथ. २:१०, ११; इफिस. ४:२७.
१२. करिंथमधले भाऊबहीण यहोवासारखं कसं वागू शकत होते?
१२ करिंथमधले भाऊबहीण सैतानासारखं नाही, तर यहोवासारखं कसं वागू शकत होते? यहोवा पश्चात्ताप करणाऱ्या लोकांशी जसा वागतो तसं वागून. लक्ष द्या बायबलच्या काही लेखकांनी यहोवाबद्दल काय म्हटलं. दावीदने म्हटलं: यहोवा “चांगला आणि क्षमाशील आहे.” (स्तो. ८६:५) मीखाने लिहिलं: “तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि . . . पापांची तू आठवण ठेवत नाहीस.” (मीखा ७:१८) यशयानेही म्हटलं: “दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा, आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत; त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल, त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.”—यश. ५५:७.
१३. पश्चात्ताप करणाऱ्या माणासाला मंडळीत पुन्हा घेणं योग्य का होतं? (“करिंथमधल्या माणसाला मंडळीत परत कधी घेण्यात आलं?” ही चौकट पाहा)
१३ यहोवासारखं वागण्यासाठी करिंथमधल्या भाऊबहिणींना पश्चात्ताप करणाऱ्या माणसाचं मंडळीत पुन्हा स्वागत करायचं होतं आणि त्याला आपल्या प्रेमाची खातरी करून द्यायची होती. पौलने दिलेल्या सूचना त्यांनी पाळल्या आणि त्या माणसाचं पुन्हा मंडळीत स्वागत केलं. अशा प्रकारे त्यांनी “सगळ्या बाबतींत आज्ञा” पाळल्या आहेत हे दाखवून दिलं. (२ करिंथ. २:९) हे खरंय, की या माणसाला मंडळीतून काढून काहीच महिने झाले होते. पण, त्याला मिळालेल्या ताडनामुळे त्याला पश्चात्ताप करायला मदत झाली होती. म्हणून त्याला मंडळीत पुन्हा घेण्यासाठी उशीर करण्यात काहीच अर्थ नव्हता.
आपण यहोवासारखं न्यायाने आणि दयेने कसं वागू शकतो?
१४-१५. करिंथ मंडळीत गंभीर पापाचं प्रकरण ज्या प्रकारे हाताळण्यात आलं, त्यावरून आपण काय शिकतो? (२ पेत्र ३:९) (चित्रसुद्धा पाहा.)
१४ करिंथमध्ये हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळण्यात आलं, ते “आपल्याला शिक्षण देण्यासाठी” बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलं. (रोम. १५:४) या घटनेमधून आपल्याला कळतं, की यहोवा आपल्या लोकांमध्ये गंभीर पाप खपवून घेत नाही. काहींना वाटतं, की यहोवा दयाळू देव असल्यामुळे तो पश्चात्ताप न करणाऱ्यांनाही मंडळीत राहू देईल. पण यहोवा तसं करत नाही. तो दयाळू असला, तरी तो वाईट गोष्टी अजिबात खपवून घेत नाही. आणि तो त्याच्या नीतिमान स्तरांशी तडजोडही करत नाही. (यहू. ४) यहोवाने जर असं केलं तर ते दया दाखवणं नसेल. कारण त्यामुळे मंडळीतल्या इतर जणांचंही नुकसान होईल.—नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३.
१५ आपल्याला माहीत आहे, की कोणाचाही नाश होऊ नये असं यहोवाला वाटतं. आणि शक्य असेल तेव्हा तो लोकांना वाचवायचा प्रयत्न करतो. जे पापी लोक आपलं मन बदलतात आणि त्याच्यासोबत पुन्हा नातं जोडायचा प्रयत्न करतात त्यांना तो दया दाखवतो. (यहे. ३३:११; २ पेत्र ३:९ वाचा.) करिंथमधल्या माणसाने पश्चात्ताप करून आपला पापी मार्ग सोडला होता. म्हणूनच, यहोवाने पौलचा वापर करून मंडळीला समजावलं, की त्या माणसाला त्यांनी माफ करावं आणि मंडळीत त्याचं पुन्हा स्वागत करावं.
यहोवासारखं प्रेम आणि दया दाखवून भाऊबहीण मंडळीत पुन्हा घेतलेल्यांचं मनापासून स्वागत करतात (परिच्छेद १४-१५ पाहा)
१६. करिंथ मंडळीतलं प्रकरण ज्या प्रकारे हाताळण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
१६ करिंथ मंडळीतलं प्रकरण ज्या प्रकारे हाताळण्यात आलं, त्यावरून आपल्याला हे समजायला मदत होते, की यहोवा किती प्रेमळ, नीतिमान आणि न्यायी देव आहे. (स्तो. ३३:५) यहोवाच्या या सुंदर गुणांमुळे आपल्याला त्याची आणखी स्तुती करावीशी वाटते. आपल्यापैकी प्रत्येक जण पापी आहे आणि आपल्याला यहोवाच्या क्षमेची गरज आहे. म्हणून यहोवाने खंडणीची जी तरतूद केली आहे, त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण त्याचा आभारी आहे. कारण त्यामुळेच आपल्याला क्षमा मिळू शकते. यहोवाचं त्याच्या लोकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचं चांगलं व्हावं असं त्याला वाटतं. हे समजल्यावर आपल्याला खरंच किती सांत्वन आणि दिलासा मिळतो, नाही का?
१७. येणाऱ्या लेखांमध्ये कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?
१७ मग, आज गंभीर पापाची प्रकरणं कशी हाताळली जातात? मंडळीतले वडील यहोवाचा दृष्टिकोन ठेवून पाप करणाऱ्या व्यक्तीला पश्चात्ताप करायला कशी मदत करू शकतात? जेव्हा वडील एखाद्याला मंडळीतून काढून टाकायचा किंवा पुन्हा घ्यायचा निर्णय घेतात, तेव्हा मंडळीने कसं वागलं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या लेखांमध्ये दिली जातील.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श