वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 डिसेंबर पृ. ८-१३
  • “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नंदनवनातलं जीवन कसं असेल?
  • शलमोनचं राज्य ​—नंदनवनाची एक झलक
  • अभिषिक्‍त जन काय करतील?
  • नंदनवनात राहायला योग्य ठरण्यासाठी दुसऱ्‍या मेंढरांना काय करावं लागेल?
  • तुम्ही नंदनवनात कायम जगू शकता
  • एका अपराध्याकडून आपण काय शिकू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “नंदनवनात भेटू या!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • बायबलमध्ये उल्लेख केलेले नंदनवन कोठे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 डिसेंबर पृ. ८-१३

अभ्यास लेख ५०

“तू माझ्यासोबत नंदनवनात असशील”

“आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.”​—लूक २३:४३.

गीत १४५ नंदनवन​—देवाचं अभिवचन

सारांशa

१. येशूने त्याच्या मृत्यूच्या आधी त्याच्यासोबत असलेल्या गुन्हेगाराला काय म्हटलं? (लूक २३:३९-४३)

येशू आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन गुन्हेगारांना खूप वेदना होत होत्या आणि ते आपले शेवटचे श्‍वास मोजत होते. (लूक २३:३२, ३३) हे दोन्ही गुन्हेगार येशूची निंदा करत होते आणि त्यामुळे ते नक्कीच त्याचे शिष्य नव्हते. (मत्त. २७:४४; मार्क १५:३२) पण त्या दोन गुन्हेगारांपैकी एकाचं मन बदलतं आणि तो येशूला म्हणतो: “तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” यावर येशू त्याला म्हणतो: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.”  (लूक २३:३९-४३ वाचा.) येशूने आपल्या सेवाकार्यात ‘स्वर्गाच्या राज्याबद्दल’ लोकांना सांगितलं. कदाचित या गुन्हेगारानेही ते ऐकलं असेल, पण कोणत्याही गोष्टीवरून असं दिसत नाही की तो येशूचा शिष्य बनला होता. शिवाय येशूनेही असं म्हटलं नाही की तो स्वर्गाच्या राज्यात असेल. (मत्त. ४:१७) उलट येशू भविष्यात पृथ्वीवर येणाऱ्‍या नंदनवनाबद्दल बोलत होता. पण आपण असं का म्हणू शकतो?

येशूला वधस्तंभावर लटकवलं आहे. त्याच्या बाजूला असलेला अपराधी त्याच्यासोबत बोलत आहे.

येशूसोबत असणाऱ्‍या अपराध्याबद्दल आपण काय म्हणू शकतो आणि त्याला कदाचित काय माहीत असावं? (परिच्छेद २-३ पाहा)

२. पश्‍चात्तापी गुन्हेगार एक यहुदी होता हे आपल्याला कशावरून कळतं?

२ पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवलेला तो गुन्हेगार कदाचित यहुदी असावा. कारण, तो आपल्यासोबत असलेल्या दुसऱ्‍या गुन्हेगाराला म्हटला: “तुलाही तीच शिक्षा झाली आहे, तरी तुला देवाची  जराही भीती वाटत नाही का?” (लूक २३:४०) यहुदी लोक एकाच देवाची उपासना करायचे पण त्या काळात विदेशी लोक मात्र अनेक देवांची उपासना करायचे. (निर्ग. २०:२, ३; १ करिंथ. ८:५, ६) जर ते गुन्हेगार विदेशी असते तर प्रश्‍न असा असला असता, की “तुला देवांची  जराही भीती वाटत नाही का?” शिवाय येशूला विदेश्‍यांसाठी नाही तर ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांसाठी’ पाठवण्यात आलं होतं. (मत्त. १५:२४) शिवाय, देवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की तो मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल. ही गोष्ट त्या पश्‍चात्तापी गुन्हेगारालाही माहीत असावी. त्याला कदाचित असं वाटत होतं, की देव त्याच्या राज्यात राज्य करण्यासाठी येशूला पुन्हा जिवंत करेल. ही गोष्ट त्याने येशूला जे म्हटलं त्यावरून दिसून येते. शिवाय देव आपल्यालाही जिवंत करेल अशी त्याला आशा होती.

३. येशू जेव्हा नंदनवनाबद्दल बोलला तेव्हा त्या पश्‍चात्ताप करणाऱ्‍या गुन्हेगाराच्या मनात काय आलं असेल? स्पष्ट करा. (उत्पत्ती २:१५)

३ यहुदी असल्यामुळे त्या पश्‍चात्तापी गुन्हेगाराला आदाम आणि हव्वा यांच्याबद्दल आणि यहोवाने त्यांना ज्या नंदनवात ठेवलं होतं त्याबद्दल माहीत असावं. त्यामुळे येशू जेव्हा नंदनवनाबद्दल बोलला तेव्हा तो या पृथ्वीवर येणाऱ्‍या सुंदर परिस्थितीबद्दल बोलत असावा हे त्या गुन्हेगाराने ओळखलं असेल.​—उत्पत्ती २:१५ वाचा.

४. येशू त्या गुन्हेगाराला जे म्हणाला त्यावरून आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?

४ येशू त्या गुन्हेगाराला जे म्हणाला त्यामुळे नंदनवनातलं आपलं जीवन कसं असेल यावर विचार करायची प्रेरणा आपल्याला मिळते. शलमोन राजाच्या काळात जी शांतिदायक परिस्थिती होती त्यातून आपल्याला नंदनवनाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. आणि शलमोनपेक्षा महान असलेला येशू ख्रिस्त आपल्या सहराजांसोबत मिळून या पृथ्वीवर एक सुंदर परिस्थिती आणेल याची खातरी आपण बाळगू शकतो. (मत्त. १२:४२) ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ पृथ्वीवर जगण्याची आशा असल्यामुळे साहजिकच नंदनवनात पृथ्वीवर कायमचं जगण्यासाठी काय करायची गरज आहे, या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असली पाहिजे.​—योहा. १०:१६.

नंदनवनातलं जीवन कसं असेल?

५. नंदनवनातल्या जीवनाबद्दल तुम्ही कशी कल्पना करता?

५ नंदनवनाबद्दल विचार करताना कोणत्या गोष्टी तुमच्या मनात येतात? कदाचित एदेन बागेसारख्या एका सुंदर बगिच्याचं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर येत असेल. (उत्प. २:७-९) तुम्हाला कदाचित मीखा संदेष्ट्याने लिहिलेली भविष्यवाणी आठवेल ज्यात म्हटलं आहे, की देवाचे लोक ‘आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसतील.’ (मीखा ४:३, ४) तसंच बायबलमधली अशी वचनंही तुम्हाला आठवतील ज्यांत म्हटलं आहे की नंदनवनात खायला-प्यायला भरपूर असेल. (स्तो. ७२:१६; यश. ६५:२१, २२) त्यामुळे तुम्ही कदाचित अशी कल्पना कराल, की त्या सुंदर बागेत एक टेबल ठेवला आहे आणि त्या टेबलावर खाण्या-पिण्याचे भरपूर चविष्ट पदार्थ आहेत. तसंच, वातावरणात पाना-फुलांचा सुगंध दरवळत आहे. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत हसत-खेळत गप्पा मारत आहात. त्यांच्यामध्ये पुनरुत्थान झालेली तुमची जवळची माणसंसुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर उभं केलेलं हे सुंदर चित्र फक्‍त एक कल्पना नाही. कारण पृथ्वीवर या सगळ्या गोष्टी खरोखर घडतील. शिवाय, या सगळ्या सुंदर गोष्टींसोबत आपण नंदनवनात समाधान देणाऱ्‍या कामाचाही आनंद घेऊ.

आधीच्या लेखात उल्लेख केलेला वयस्कर भाऊ नवीन जगात आता तरुण आहे आणि येशूच्या बाजूला जो अपराधी होता त्याला शिकवत आहे.

पुनरुत्थान झालेल्या लोकांना शिकवण्याचं महत्त्वाचं काम आपल्याजवळ असेल (परिच्छेद ६ पाहा)

६. आपण नंदनवनात काय-काय करू? (चित्र पाहा.)

६ आपल्याला आपल्या कामातून आनंद मिळावा अशा प्रकारे यहोवाने आपल्याला बनवलं आहे. (उप. २:२४) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान आपण खूप व्यस्त असू. मोठ्या संकटातून बचावलेल्यांसाठी आणि पुनरुत्थान झालेल्या लाखो लोकांसाठी कपड्यांची, राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि त्यामुळे तिथे करण्यासारखं भरपूर काम आपल्याकडे असेल आणि त्या कामातून आपल्याला आनंद मिळेल. आदाम-हव्वाला जसं एदेन बागेची काळजी घेऊन त्या बागेच्या सीमा वाढवायच्या होत्या, तसंच आपल्यालाही या पृथ्वीला सुंदर नंदनवन बनवण्याचं समाधानकारक काम असेल. पुनरुत्थान झालेल्या लाखो लोकांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल जास्त माहीत नसेल. त्यांना शिकवतानासुद्धा आपल्याला किती आनंद होईल याचा विचार करा. तसंच येशूच्या आधी होऊन गेलेल्या विश्‍वासू जनांचंही पुनरुत्थान होईल. आणि त्यांच्या मृत्यूनंतर यहोवाच्या संघटनेत काय-काय झालं हे सांगायचा बहुमानसुद्धा आपल्याकडे असेल.

७. आपण कोणती खातरी बाळगू शकतो आणि का?

७ नंदनवनात शांती असेल, आपल्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील आणि सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित होतील अशी आपण खातरी बाळगू शकतो. कारण आपल्या मुलाच्या राज्यात परिस्थिती कशी असेल याची एक सुंदर झलक यहोवाने आधीच दाखवली आहे. आणि ही झलक आपल्याला शलमोन राजाच्या शासनकाळाबद्दल बायबलमध्ये दिलेल्या अहवालात पाहायला मिळते.

शलमोनचं राज्य ​—नंदनवनाची एक झलक

८. स्तोत्र ३७:१०, ११, २९ मधले शब्द पूर्वीच्या काळात कसे पूर्ण झाले? (याच अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.)

८ भविष्यात एक विश्‍वासू आणि बुद्धिमान राजा राज्य करेल त्या वेळेस परिस्थिती कशी असेल याबद्दल लिहायला दावीद राजाला देवाकडून प्रेरणा मिळाली. (स्तोत्र ३७:१०, ११, २९ वाचा.) येणाऱ्‍या नंदनवनाबद्दल लोकांना सांगताना आपण नेहमी स्तोत्र ३७:११ हे वचन वाचतो. आणि हे बरोबरच आहे कारण येशूनेसुद्धा डोंगरावरच्या प्रवचनात याच वचनातल्या शब्दांचा उल्लेख करून ते भविष्यात पूर्ण होतील असं सांगितलं होतं. (मत्त. ५:५) पण हे शब्द शलमोन राजाच्या काळातसुद्धा पूर्ण झाले. जेव्हा शलमोन राजा राज्य करत होता तेव्हा सगळीकडे शांती आणि भरभराट होती. यहोवाने सांगितलं होतं की त्या देशात ‘दूध आणि मध वाहील.’ आणि हेसुद्धा सांगितलं होतं, की “जर तुम्ही नेहमी माझ्या नियमांनुसार चालत राहिलात . . . [तर] मी देशात शांती आणीन आणि जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही.” (लेवी. २०:२४; २६:३, ६) यहोवाने दिलेली ही सगळी वचनं शलमोन राजाच्या काळात पूर्ण झाली. (१ इति. २२:९; २९:२६-२८) यहोवाने असंही अभिवचन दिलं होतं, की खोट्या देवांची उपासना करणारे दुष्ट लोकसुद्धा “नाहीसे होतील.” (स्तो. ३७:१०) त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की स्तोत्र ३७:१०, ११, २९ ची पूर्णता शलमोन राजाच्या काळातसुद्धा झाली आणि पुढे भविष्यातसुद्धा होईल.

९. शलमोन राजाच्या काळात असलेल्या परिस्थितीबद्दल शबाच्या राणीने काय म्हटलं?

९ शलमोनच्या राज्यात इस्राएलमध्ये इतकी शांती आणि समृद्धी होती, की त्याची बातमी दूर-दूरपर्यंत पोहोचली. शबाच्या राणीलासुद्धा त्याच्याबद्दल कळलं. शलमोनच्या राज्यात परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी ती एका दूरच्या देशातून यरुशलेमला प्रवास करून आली. (१ राजे १०:१) शलमोनच्या राज्यातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर ती म्हणाली: “मी जे काही पाहिलंय, त्यातलं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं! . . . तुमच्या सर्व माणसांना आणि सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!” (१ राजे १०:६-८) पण यहोवा त्याच्या मुलाच्या म्हणजे येशूच्या राज्यात जे करेल त्याची ही फक्‍त एक झलक होती.

१०. येशू शलमोनपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे?

१० येशू प्रत्येक बाबतीत शलमोनपेक्षा श्रेष्ठ आहे. शलमोन अपरिपूर्ण होता आणि त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देवाच्या लोकांवर पुढे अनेक संकटं आली. पण येशू एक परिपूर्ण राजा आहे आणि तो कधीच चुकत नाही. (लूक १:३२; इब्री ४:१४, १५) सैतानाने बऱ्‍याचदा येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. पण या अतिशय कठीण परीक्षांचा येशूने यशस्वीपणे सामना केला. येशूने सिद्ध केलं की तो कधीच पाप करणार नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे त्याच्या प्रजेचं नुकसान होईल. खरंच येशू आपला राजा आहे ही आपल्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!

११. येशूसोबत मिळून कोण राज्य करेल?

११ येशूसोबत राज्य करण्यासाठी १,४४,००० जणांना पृथ्वीवरून घेतलं जाईल. (प्रकटी. १४:१-३) हे लोक मानवजातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पृथ्वीबद्दल असलेला देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी येशूला मदत करतील. या लोकांनी पृथ्वीवर असताना बऱ्‍याच परीक्षांना आणि समस्यांना तोंड दिलं आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे ते चांगल्या प्रकारे समजू शकतील. पण हे सहराजे येशूच्या राज्यादरम्यान काय-काय करतील?

अभिषिक्‍त जन काय करतील?

१२. १,४४,००० जणांकडे कोणतं काम असेल?

१२ शलमोन राजाच्या हातात जितकं काम होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काम येशू आणि त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍यांच्या हातात असेल. शलमोन इस्राएलचा राजा होता आणि त्याला फक्‍त त्याच्या राष्ट्रातल्या लाखो लोकांची काळजी घ्यायची होती. पण जे देवाच्या राज्यात राज्य करतील त्यांना संपूर्ण पृथ्वीवरच्या करोडो लोकांची काळजी घ्यावी लागेल. खरंच यहोवाने १,४४,००० जनांना किती मोठा बहुमान दिलाय!

१३. येशूसोबत राज्य करणारे कोणती महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील?

१३ येशूप्रमाणे १,४४,००० जणसुद्धा राजे आणि याजक म्हणून काम करतील. (प्रकटी. ५:१०) मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे इस्राएली लोकांची शारीरिक आणि अध्यात्मिक रीत्या काळजी घेणं ही याजकांची प्रमुख जबाबदारी होती. नियमशास्त्र हे ‘पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया होतं.’ यावरून आपण म्हणू शकतो की येशूसोबत राज्य करणारे १,४४,००० जणसुद्धा देवाच्या लोकांच्या शारीरिक आणि अध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील. (इब्री १०:१) पण हे राजे आणि याजक पृथ्वीवर असलेल्या देवाच्या लोकांना नेमक्या कोणत्या माध्यमाने मार्गदर्शन पुरवतील हे तर येणारा काळच सांगेल. पण आपण ही खातरी बाळगू शकतो, की येणाऱ्‍या नंदनवनात यहोवा जी काही व्यवस्था करेल त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या त्याच्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत राहील.​—प्रकटी. २१:३, ४.

नंदनवनात राहायला योग्य ठरण्यासाठी दुसऱ्‍या मेंढरांना काय करावं लागेल?

१४. लहान कळप आणि ‘दुसरी मेंढरं’ कशा प्रकारे एकजूट आहेत?

१४ जे लोक येशूसोबत स्वर्गात राज्य करतील त्यांना त्याने ‘लहान कळप’ असं म्हटलं. (लूक १२:३२) पण त्याने आणखी एका गटाबद्दलसुद्धा सांगितलं. त्याने त्या गटाला ‘दुसरी मेंढरं’ असं म्हटलं. या दोन गटांचा मिळून एक कळप बनतो. (योहा. १०:१६) हे दोन्ही गट आज सोबत मिळून काम करत आहेत आणि पृथ्वीला नंदनवन बनवतानासुद्धा ते सोबत मिळून काम करतील. त्या वेळी ‘लहान कळप’ स्वर्गात असेल आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची आशा असेल. पण त्या नंदनवनात राहायला योग्य ठरण्यासाठी दुसऱ्‍या मेंढरातल्या लोकांनी आत्तापासूनच काही गोष्टी करणं गरजेचं आहे.

तोच वयस्कर भाऊ “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या माहितीपत्रकातून औषधाच्या दुकानातल्या एका व्यक्‍तीसोबत चर्चा करत आहे.

नंदनवनातल्या जीवनासाठी आपण तयार आहोत हे आपण आत्तापासूनच दाखवू शकतो (परिच्छेद १५ पाहा)b

१५. (क) ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेले लोक लहान कळपाला कसा पाठिंबा देतात? (ख) दुकानातल्या भावाच्या उदाहरणाचं आपण अनुकरण असं करू शकतो? (चित्र पाहा.)

१५ पश्‍चात्तापी गुन्हेगाराला त्याचा मृत्यू होण्याआधी येशूबद्दल आपली कदर पूर्णपणे दाखवण्याची संधी मिळाली नाही. पण आज ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी येशूबद्दल कदर दाखवण्याची संधी आहे. उदाहरणार्थ, अभिषिक्‍त भावांसोबत आपण ज्या प्रकारे वागतो त्यावरून येशूबद्दल असलेलं आपलं प्रेम आपण दाखवतो. आणि याच आधारावर मेंढरांचा न्याय केला जाईल असं येशूने सांगितलं होतं. (मत्त. २५:३१-४०) प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात उत्साहाने सहभाग घेऊन आपण ख्रिस्ताच्या भावांना पाठिंबा देऊ शकतो. (मत्त. २८:१८-२०) आणि त्यासाठी आपण बायबल अभ्यास घ्यायला दिलेल्या साधनांचा, जसं की कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकाचा चांगला वापर केला पाहिजे. तुम्ही सध्या या पुस्तकातून कोणासोबत बायबल अभ्यास करत आहात का? जर नसाल तर शक्य तितक्या लोकांना या पुस्तकातून बायबल अभ्यास करण्याबद्दल विचारू शकता का?

१६. देवाच्या राज्यात राहण्याची तयारी करण्यासाठी आपण आतापासूनच काय करू शकतो?

१६ यहोवाला नंदनवनात ज्या प्रकारचे लोक हवेत त्या प्रकारची व्यक्‍ती बनण्यासाठी आपल्याला नंदनवन येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. आपण आतापासूनच काही चांगले गुण आपल्यामध्ये वाढवू शकतो. जसं की, आपण आपल्या वागण्या-बोलण्यात नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू शकतो. तसंच आपण सगळ्या बाबतीत संयम बाळगण्याचा प्रयत्न करू शकतो. यासोबतच आपण यहोवाला, आपल्या विवाहसोबत्याला आणि आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ राहिलं पाहिजे. या दुष्ट जगात राहत असताना, देवाच्या स्तरांप्रमाणे जगायचा जितका जास्त आपण प्रयत्न करू तितकं जास्त आपल्याला नंदनवनातही त्याप्रमाणे जगायला सोपं जाईल. शिवाय त्या नवीन जगात उपयोगी पडतील अशी कौशल्य आणि गुण वाढवायचा प्रयत्न आपण आत्तापासूनच करू शकतो. यावरून दिसून येईल की आपण त्या नवीन जगात राहायला उत्सुक आहोत आणि तयारी करत आहोत. याच अंकात असलेला “तुम्ही ‘पृथ्वीचा वारसा’ मिळवायला तयार आहात का?” हा लेख पाहा.

१७. आपण केलेल्या पापांची कधीच क्षमा मिळू शकत नाही असा आपण विचार करावा का? स्पष्ट करा.

१७ जर आपण पूर्वी एखादं गंभीर पाप केलं असेल, तर त्याबद्दल असलेली दोषीपणाची भावना आपण आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला आपल्या पापांची माफी मिळू शकते. पण म्हणून आपण असाही विचार करू नये की आपण “जाणूनबुजून पाप करत राहिलो” तरी यहोवा आपल्याला माफ करेल. (इब्री १०:२६-३१) पण दुसरीकडे आपल्या हातून झालेल्या गंभीर पापाची आपल्याला कधीच माफी मिळू शकणार नाही असाही आपण विचार करू नये. जर आपण आपल्या पापाबद्दल पश्‍चात्ताप केला असेल, यहोवाकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मदत घेतली असेल आणि ते पाप करायचं सोडून दिलं असेल तर आपण खातरी बाळगू शकतो की यहोवाने आपल्याला मोठ्या मनाने क्षमा केली आहे. (यश. ५५:७; प्रे. कार्यं ३:१९) येशूने परूशी लोकांना काय म्हटलं होतं ते आठवा: “मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” (मत्त. ९:१३) आपल्या हातून कितीही मोठं पाप झालं असलं, तरी खंडणी बलिदानात ते पुसून टाकण्याची ताकद आहे.

तुम्ही नंदनवनात कायम जगू शकता

१८. येशूसोबत जो गुन्हेगार होता, त्याच्यासोबत तुम्हाला कोणत्या गोष्टीवर बोलायला आवडेल?

१८ कल्पना करा की तुम्ही नंदनवनात आहात आणि येशू ज्या अपराध्याशी बोलला होता त्याच्याशी तुम्ही बोलत आहात. एकमेकांशी बोलताना तुम्ही दोघंही नक्कीच येशूच्या बलिदानाबद्दल आपली कदर व्यक्‍त कराल. पृथ्वीवर येशूच्या जीवनाच्या शेवटच्या काही तासांत कायकाय घडलं हे तुम्ही कदाचित त्याला विचाराल. तसंच त्याच्या विनंतीला येशूने उत्तर दिलं तेव्हा त्याला कसं वाटलं हेही कदाचित त्याला विचाराल. कदाचित तोही तुम्हाला विचारेल की सैतानाच्या जगाच्या शेवटच्या दिवसात जीवन कसं होतं. खरंच त्या माणसासारख्या असलेल्या इतर लोकांसोबत देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हा आपल्यासाठी किती मोठा बहुमान असेल!​—इफिस. ४:२२-२४.

तोच वयस्कर भाऊ नंदनवनात आता तरुण झाला आहे आणि तो काढत असलेलं चित्र एक बहीण बघत आहे. आजूबाजूला सुंदर डोंगरदऱ्‍या, फुलं-झाडं आहेत. त्याच्याजवळ सिंह, ससा आणि जंगली शेळ्या बसल्या आहेत आणि त्यांच्यात शांती आहे.

एक भाऊ येशूच्या हजार वर्षांच्या काळात आपली कला आणखी सुधारायचा प्रयत्न करत आहे (परिच्छेद १९ पाहा)

१९. नंदनवनातल्या जीवनाचा आपल्याला कधीच कंटाळा का येणार नाही? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१९ नंदनवनात आपल्याला जीवन कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. आपल्याला नेहमी नवीन-नवीन लोकांना भेटायची संधी असेल आणि समाधान देणारं काम असेल. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, आपल्याला दररोज यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल. आणि त्याने पुरवलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेता येईल. यहोवाबद्दल आपण कितीही शिकून घेतलं तरी त्याच्याबद्दल जाणून घेण्यासारख्या आणखी बऱ्‍याच गोष्टी असतील. तसंच त्याने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दलही शिकण्यासारखं बरंच काही असेल. जसजसा काळ जाईल तसतसं त्याच्याबद्दलचं आपलं प्रेम आणखी वाढत जाईल. खरंच, नंदनवनात कायम जगण्याचं वचन दिल्याबद्दल आपण यहोवाचे आणि येशूचे किती मनापासून आभारी आहोत!

तुमचं उत्तर काय असेल?

  • नंदनवनात आपलं जीवन कसं असेल?

  • येशूसोबत राज्य करणारे पृथ्वीला नंदनवन बनवण्यात कशा प्रकारे सहभाग घेतील?

  • नंदनवनात राहायला योग्य बनण्यासाठी ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ आत्तापासूनच काय करायची गरज आहे?

गीत २२ राज्य सुरू झालं​—यावे आता जगी

a नंदनवनात जीवन कसं असेल याबद्दल तुम्ही कधी विचार करता का? तुम्ही नक्कीच विचार करत असाल आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कारण यहोवा आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे त्याबद्दल आपण जितकं जास्त विचार करू तितकं जास्त उत्साहाने आपल्याला लोकांना नवीन जगाबद्दल शिकवता येईल. नवीन जगाबद्दल येशूने आपल्याला जे वचन दिलं आहे त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी हा लेख आपल्याला मदत करेल.

b चित्राचं वर्णन: नंदनवनात पुनरुत्थान झालेल्यांना यहोवाबद्दल शिकवायला उत्सुक असलेला एक भाऊ, आत्तापासूनच इतरांना शिकवण्याच्या कामात सहभाग घेत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा