वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 डिसेंबर पृ. २-७
  • आपण सर्वकाळ जगू शकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण सर्वकाळ जगू शकतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा कायम अस्तित्वात होता आणि असेल
  • आपल्याला कायम जिवंत राहण्यासाठी बनवलंय
  • यहोवाचा मूळ उद्देश बदललेला नाही
  • एक सुंदर भविष्य
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुम्हाला अनंतकाळ जगायचे आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 डिसेंबर पृ. २-७

अभ्यास लेख ४९

आपण सर्वकाळ जगू शकतो

“जो विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.”​—योहान ६:४७.

गीत १४७ सर्वकाळाच्या जीवनाचं वचन

सारांशa

१. सर्वकाळाच्या जीवनावर मनन केल्यामुळे काय होईल?

यहोवाने आपल्याला असं अभिवचन दिलंय, की जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला “सर्वकाळाचं जीवन” मिळेल. (रोम. ६:२३) जेव्हा आपण त्याच्या अभिवचनावर मनन करतो तेव्हा त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढत जातं. आपल्या स्वर्गातल्या पित्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, की आपण त्याच्यापासून कधीच दूर होऊ नये असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याने आपल्याला हे अभिवचन दिलंय.

२. कायम जीवन जगण्याच्या आशेमुळे आपल्याला कशी मदत होते?

२ देवाने दिलेल्या सर्वकाळाच्या जीवनाच्या अभिवचनामुळे आपण धीराने समस्यांचा सामना करू शकतो. अगदी आपल्या शत्रूंनी आपल्याला मारून टाकायची धमकी दिली, तरीसुद्धा आपण यहोवाची सेवा करायचं सोडणार नाही. याचं एक कारण म्हणजे आपला मृत्यू जरी झाला तरी यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे तो आपल्याला पुन्हा जिवंत करेल आणि आपण पुन्हा कधीच मरणार नाही अशी आपल्याला पक्की खातरी आहे. (योहा. ५:२८, २९; १ करिंथ. १५:५५-५८; इब्री २:१५) पण ही खातरी आपण का बाळगू शकतो? याची काही कारणं आता आपण पाहू या.

यहोवा कायम अस्तित्वात होता आणि असेल

३. यहोवा आपल्याला कायमचं जीवन देईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो? (स्तोत्र १०२:१२, २४, २७)

३ बायबल आपल्याला सांगतं, की यहोवा नेहमी अस्तित्वात होता आणि पुढेही त्याचं अस्तित्व कायम राहील. शिवाय तोच जीवनाचा उगम असल्यामुळे आपण अशी खातरी ठेवू शकतो, की तो आपल्याला कायमचं जीवन देऊ शकतो. (स्तो. ३६:९) उदाहरणार्थ, स्तोत्र ९०:२ म्हणतं, की यहोवा “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” अस्तित्वात आहे. (स्तोत्र १०२:१२, २४, २७ वाचा.) शिवाय, हबक्कूक संदेष्ट्यानेही आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल असं लिहिलं: “हे यहोवा, तू तर सर्वकाळापासून आहेस. हे माझ्या देवा, माझ्या पवित्र देवा, तुला मरण नाही.” ​—हब. १:१२

४. यहोवा अस्तित्वात आहे ही गोष्ट समजणं आपल्याला कठीण जातं, म्हणून तो कधीच अस्तित्वात नव्हता असं म्हणता येईल का? समजावून सांगा.

४ यहोवा ‘सर्वकाळ’ अस्तित्वात आहे ही गोष्ट समजून घ्यायला तुम्हाला कठीण जातं का? (यश. ४०:२८) जात असेल तर हे सहाजिक आहे. अलीहूनेसुद्धा यहोवाबद्दल असं म्हटलं: “त्याच्या वर्षांची संख्या आपल्या समजण्यापलीकडे आहे.” (ईयो. ३६:२६) पण एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, म्हणून ती खोटी किंवा चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, सूर्याच्या प्रकाशापासून किंवा पाण्यापासून वीज निर्मिती नेमकी कशी होते ही गोष्ट कदाचित आपल्याला समजत नसेल. पण म्हणून तसं होऊच शकत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्याच प्रकारे यहोवाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, ही गोष्ट आपल्या मानवी बुद्धीला कदाचित पूर्णपणे कधीच समजू शकणार नाही. पण म्हणून यहोवा कायम अस्तित्वात आहे, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. निर्माणकर्त्याचं अस्तित्व, आपल्याला कितपत समजतं आणि कितपत नाही यावर अवलंबून नाही. (रोम. ११:३३-३६) तो तर सूर्य, चंद्र, तारे आणि हे विश्‍वसुद्धा अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून आहे. यहोवा स्वतः आपल्याला सांगतो, की “त्याने आपल्या ताकदीने पृथ्वी बनवली” आहे. खरंतर, त्याने हे “आकाश पसरवलं” त्याच्या आधीपासून तो अस्तित्वात होता. (यिर्म. ५१:१५; प्रे. कार्यं १७:२४) पण यासोबतच आपण कायम जिवंत राहू शकतो ही खातरी देणारं आणखी एक कारण कोणतं आहे?

आपल्याला कायम जिवंत राहण्यासाठी बनवलंय

५. यहोवाने आदाम आणि हव्वाला कशा प्रकारे बनवलं होतं?

५ यहोवाने वनस्पती आणि प्राण्यांना अशा प्रकारे बनवलंय, की ते फक्‍त काही काळच जगू शकतात. पण फक्‍त मानवांनाच त्याने कायम जिवंत राहण्याच्या क्षमतेने बनवलंय. यहोवाने आदामला अशी आज्ञा दिली होती, की “चांगल्यावाइटाचं ज्ञान देणाऱ्‍या झाडाचं फळ खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील.” (उत्प. २:१७) आदाम आणि हव्वाने आज्ञा पाळली असती तर ते कधीच मेले नसते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यहोवाने त्यांना काही काळानंतर “जीवनाच्या झाडाचंही” फळ खाऊ दिलं असतं. त्यामुळे त्यांना या गोष्टीची खातरी मिळाली असती की आपण “सर्वकाळ जिवंत” राहणार आहोत.b​—उत्प. ३:२२.

बायबलमध्ये “सर्वकाळ” या शब्दाचा वापर

बायबलमध्ये हिब्रू शास्त्रवचनांत ‘ओहलाम’  हा शब्द बऱ्‍याच वेळा वापरण्यात आलाय. या शब्दाचं भाषांतर सहसा “सर्वकाळ” असं करण्यात आलंय. हा शब्द अशा एका गोष्टीबद्दल सांगण्यासाठी वापरण्यात आलाय जी बऱ्‍याच काळापासून अस्तित्वात होती किंवा जी भविष्यात खूप मोठ्या काळासाठी अस्तित्वात राहील. म्हणजेच जिच्या सुरवातीबद्दल किंवा अंताबद्दल सांगण्यात आलेलं नाही. (यहो. २४:२; स्तो. २४:७, ९) जिला अंतच नाही अशा गोष्टीच्या बाबतीतही हा शब्द वापरण्यात आला आहे. याच अर्थाने तो यहोवासाठीसुद्धा वापरण्यात आलाय. (स्तो. १०२:१२, २४, २७) नवे जग भाषांतर  यात, या हिब्रू शब्दाचं भाषांतर “सदासर्वकाळ,” “कायम,” “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत,” किंवा “युगानुयुग” असं करण्यात आलंय. वचनात कशाबद्दल बोललं जात आहे, त्यावरून या शब्दाचं भाषांतर कसं करायचं ते ठरवण्यात आलंय.

६-७. (क) मानवांना कायम जगण्यासाठी बनवण्यात आलं होतं असं आपण का म्हणू शकतो? (ख) नवीन जगात तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतील? (चित्र पाहा.)

६ वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनातून एक आश्‍चर्यकारक गोष्ट समजली. त्यांच्या मते आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात जितकी माहिती गोळा करू शकतो, त्याच्या कितीतरी जास्त पटीने माहिती साठवण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे. २०१० मधल्या एका वैज्ञानिक मासिकात (साईन्टीफीक अमेरिकन माईंड) असं म्हटलं आहे, की आपल्या मेंदूमध्ये जवळपास २५ लाख जी.बी. इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा मावू शकतो. म्हणजे जर ३० लाख तास (३०० वर्षं) आपण टिव्ही चालू ठेवला तर जितकी माहिती रेकॉर्ड होईल, तितकी माहिती आपला मेंदू साठवू शकतो. आणि हा फक्‍त एक सरासरी अंदाज आहे! यावरून आपल्याला कळतं, की फक्‍त ७०-८० वर्षांच्या आयुष्यात जितकी माहिती आपण साठवू शकतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती साठवण्याच्या क्षमतेने यहोवाने आपल्या मेंदूला बनवलं आहे.​—स्तो. ९०:१०.

७ यहोवाने आपल्या मनात कायम जगण्याची इच्छा घातली आहे. बायबल सांगतं, की “त्याने माणसांना अनंतकाळाची जाणीव दिली आहे.” (उप. ३:११) म्हणूनच आपल्यापैकी कोणालाही मरावसं वाटत नाही आणि मृत्यू जणू आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटतं. (१ करिंथ. १५:२६) विचार करा, आपण आजारी पडतो तेव्हा आपण तसंच शांत राहून मृत्यूची वाट पाहत बसतो का? नाही. उलट आपण डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार घेऊन त्या आजारातून बरं व्हायचा प्रयत्न करतो. जिवंत राहण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा जेव्हा मृत्यू होतो, मग ती तरुण असो किंवा वयस्कर असो, आपल्याला खूप दुःख होतं आणि आपण दुःखात पूर्णपणे बुडून जातो. (योहा. ११:३२, ३३) आपण कायम जगावं अशी जर यहोवाची इच्छा नसती, तर त्याने तशी इच्छा आपल्या मनात घातलीच नसती आणि तशी क्षमताही आपल्याला दिली नसती. पण आणखीनही काही कारणं आहेत ज्यामुळे आपल्याला या गोष्टीची खातरी होते. चला आता आपण यहोवाने आधी केलेल्या आणि आत्ता करत असलेल्या काही गोष्टींवर चर्चा करू या आणि त्यामुळे आपण कायम जगावं हा त्याचा मूळ उद्देश बदललेला नाही हे कसं कळतं, ते पाहू या.

कोलाज: एक वयस्कर भाऊ खुर्चीवर बसला आहे आणि टेबलवर बरीच औषधं आहेत. तो बायबल वाचत आहे आणि नवीन जगात पूर्णपणे बरं झाल्यानंतर आणि पुन्हा तरुण झाल्यानंतर आपल्याला काय-काय करायचं आहे याची तो कल्पना करत आहे. १. तो बोट चालवत आहे. २. चित्र रंगवत आहे. ३. धबधब्याच्या ठिकाणी पायी फिरत आहे.

सर्वकाळच्या जीवनाची आशा असल्यामुळे नवीन जगात आपण काय-काय करू याची कल्पना केल्यामुळे आपल्याला खूप आनंद होतो (परिच्छेद ७ पाहा)c

यहोवाचा मूळ उद्देश बदललेला नाही

८. यशया ५५:११ मधून आपल्याला यहोवाच्या उद्देशाबद्दल काय कळतं?

८ आदम हव्वाने पाप केलं आणि तेव्हापासून त्यांची मुलं, म्हणजे सगळे लोक मरत आहेत. आणि तरीसुद्धा यहोवाने मानवांबद्दल असलेला आपला मूळ उद्देश बदललेला नाही. (यशया ५५:११ वाचा.) आजसुद्धा त्याची अशीच इच्छा आहे, की त्याच्या विश्‍वासू सेवकांनी कायम जगावं. चला आपण पाहू या, की भूतकाळात यहोवाने त्याच्या लोकांना असं काय सांगितलं आणि काय केलं ज्यावरून आपल्याला कळतं की तो त्याचा उद्देश नक्की पूर्ण करणार आहे.

९. देवाने आपल्याला काय अभिवचन दिलं आहे? (दानीएल १२:२, १३)

९ यहोवाने वचन दिलं आहे, की तो मेलेल्या लोकांना पुन्हा उठवेल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची संधी देईल. (प्रे. कार्यं २४:१५; तीत १:१, २) विश्‍वासू ईयोबलासुद्धा याची खातरी होती की यहोवा मेलेल्या लोकांना पुन्हा उठवण्यासाठी आतूर आहे. (ईयो. १४:१४, १५) दानीएल संदेष्ट्यालासुद्धा माहीत होतं की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची आशा असेल. (स्तो. ३७:२९; दानीएल १२:२, १३ वाचा.) येशूच्या काळातल्या यहुदी लोकांनासुद्धा माहीत होतं, की यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना “सर्वकाळाचं जीवन” देऊ शकतो. (लूक १०:२५; १८:१८) येशूनेसुद्धा लोकांसोबत बोलताना बऱ्‍याच वेळा या गोष्टीचा उल्लेख केला. आणि त्याला स्वतःलासुद्धा यहोवाने जिवंत केलं होतं.​—मत्त. १९:२९; २२:३१, ३२; लूक १८:३०; योहा. ११:२५.

एलीया संदेष्टा सारफथच्या विधवेकडे पुन्हा जिवंत केलेल्या तिच्या मुलाला घेऊन आला आहे आणि ती आनंदाने त्याला जवळ घेत आहे.

एलीयाने केलेल्या पुनरुत्थानावरून आपल्याला कशाची खातरी मिळते? (परिच्छेद १० पाहा)

१०. भूतकाळात झालेल्या पुनरुत्थानांवरून आपल्याला काय कळतं? (चित्र पाहा.)

१० यहोवाने आपल्याला जीवन दिलं आहे, त्यामुळे आपला मृत्यू जरी झाला तरी तो आपल्याला पुन्हा जिवंत करू शकतो. त्याने एलीया संदेष्ट्याला सारफथच्या विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत करायची ताकद दिली. (१ राजे १७:२१-२३) नंतर अलीशा संदेष्ट्यानेसुद्धा शूनेममधल्या स्त्रीच्या मुलाला यहोवाच्या मदतीने पुन्हा जिवंत केलं. (२ राजे ४:१८-२०, ३४-३७) या आणि अशा इतर अहवालांवरून कळतं, की यहोवाकडे मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद आहे. यहोवाने येशूलासुद्धा ही ताकद दिली. पृथ्वीवर असताना त्याने बऱ्‍याच लोकांना जिवंत केलं. (योहा. ११:२३-२५, ४३, ४४) आज येशू स्वर्गात आहे आणि त्याला ‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार देण्यात आलाय.’ आणि त्यामुळे ‘स्मारक कबरींमध्ये असलेल्या सगळ्यांना’ कायमचं जीवन देण्याचं अभिवचन येशू पूर्ण करू शकतो.​—मत्त. २८:१८; योहा. ५:२५-२९.

११. खंडणी बलिदानामुळे आपल्याला कायमचं जीवन मिळणं कसं शक्य झालं?

११ यहोवाने त्याच्या प्रिय मुलाचा इतक्या वेदनादायक रीतीने मृत्यू का होऊ दिला? याचं कारण सांगताना येशूने म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहा. ३:१६) आपल्याला पापांपासून क्षमा मिळावी म्हणून देवाने त्याच्या मुलाचं बलिदान दिलं आणि या खंडणी बलिदानामुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळणं शक्य झालं. (मत्त. २०:२८) देवाच्या उद्देशात असलेल्या या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल पौलने म्हटलं: “कारण मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे, त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं. कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.”​—१ करिंथ. १५:२१, २२

१२. यहोवा त्याच्या राज्याद्वारे आपल्यासाठी असलेला उद्देश कसा पूर्ण करेल?

१२ देवाचं राज्य पृथ्वीवर यावं आणि त्याची इच्छा पृथ्वीवर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायला येशूने त्याच्या अनुयायांना शिकवलं. (मत्त. ६:९, १०) पृथ्वीवर मानवांनी कायमचं जगावं हासुद्धा देवाच्या उद्देशाचाच एक भाग आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने त्याच्या मुलाला मसीही राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त केलं आहे. आणि येशूसोबत मिळून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा पृथ्वीवरून १,४४,००० जणांना गोळा करत आहे.​—प्रकटी. ५:९, १०.

१३. यहोवा आज काय करत आहे आणि आपण आज काय केलं पाहिजे?

१३ आज यहोवा त्याच्या राज्याची प्रजा म्हणून एका ‘मोठ्या लोकसमुदायाला’ गोळा करत आहे आणि त्यांना प्रशिक्षण देत आहे. (प्रकटी. ७:९, १०; याको. २:८) आज लोक एकमेकांचा तिरस्कार करतात. इतर राष्ट्रातल्या लोकांबद्दल आणि वंशांबद्दल त्यांच्या मनात भेदभाव आहे. पण मोठ्या लोकसमुदायातले लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि अशा गोष्टींपासून दूर राहायचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांनी जणू त्यांच्या तलवारी ठोकून नांगरांचे फाळ बनवले आहेत. (मीखा ४:३) जगातले लोक युद्धं करतात आणि त्यात लाखो लोक मारले जातात. पण मोठ्या लोकसमुदायातले लोक इतरांना “खरं जीवन” जगता यावं म्हणून खऱ्‍या देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल शिकवतात. (१ तीम. ६:१९) हे लोक देवाच्या राज्याला पाठिंबा देतात आणि त्यामुळे काही वेळा त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांचा विरोध करतात. आणि कधीकधी तर त्यांना आर्थिक अडचणींनासुद्धा तोंड द्यावं लागतं. पण त्यांच्या गरजा नेहमी पूर्ण होतील या गोष्टीची यहोवा नेहमी काळजी घेतो. (मत्त. ६:२५, ३०-३३; लूक १८:२९, ३०) या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होतं, की देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार आहे आणि ते त्याची इच्छा नेहमी पूर्ण करत राहील.

एक सुंदर भविष्य

१४-१५. यहोवा येशूद्वारे मृत्यूला कायमचं कशा प्रकारे नाहीसं करेल?

१४ येशू आज देवाच्या राज्याचा राजा आहे आणि लवकरच तो यहोवाने दिलेली सगळी अभिवनचनं पूर्ण करेल. (२ करिंथ. १:२०) १९१४ पासून तो त्याच्या शत्रूंवर विजय मिळवत आहे. (स्तो. ११०:१, २) येशू आणि त्याचे सहराजे दुष्ट लोकांचा नाश करतील आणि संपूर्ण जगावर विजय मिळवतील.​—प्रकटी. ६:२.

१५ येशूच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान तो मेलेल्या लोकांना पुन्हा उठवेल. तसंच तो देवाची आज्ञा पाळणाऱ्‍या लोकांना हळूहळू परिपूर्ण व्हायला मदत करेल. मग शेवटची परीक्षा होईल आणि जे लोक नीतिमान ठरतील त्यांना “पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ  राहतील.” (स्तो. ३७:१०, ११, २९) आणि मग “शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.”​—१ करिंथ. १५:२६.

१६. यहोवाची सेवा करण्याचं आपलं मुख्य कारण काय असलं पाहिजे?

१६ आतापर्यंत आपण पाहिलं की कायमचं जीवन जगण्याची आपली आशा ही देवाच्या वचनावर आधारलेली आहे. या आशेमुळे आपल्याला या शेवटच्या कठीण दिवसांतसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहायला मदत होते. पण आपल्याला कायमचं जीवन मिळणार आहे म्हणून आपण यहोवाला एकनिष्ठ राहतो असं नाही. तर आपल्या मनात यहोवाबद्दल आणि येशूबद्दल जे गाढ प्रेम आहे, त्यामुळे आपण त्यांना एकनिष्ठ राहतो. (२ करिंथ. ५:१४, १५) यामुळे आपण त्यांचं अनुकरण करतो आणि आपल्या आशेबद्दल इतरांना सांगतो. (रोम. १०:१३-१५) अशा प्रकारे आपण निस्वार्थ आणि उदार मनोवृत्ती दाखवतो तेव्हा आपण यहोवाचे मित्र बनतो. कारण त्याला अशाच प्रकारच्या लोकांशी मैत्री करायला आवडते.​—इब्री १३:१६

१७. आज आपल्यापैकी प्रत्येकाला कोणता निर्णय घ्यायची गरज आहे? (मत्तय ७:१३, १४)

१७ सर्वकाळाचं जीवन मिळेल अशा लोकांपैकी आपण असू का? यहोवाने आज प्रत्येक व्यक्‍तीला कायमचं जीवन मिळवण्याची संधी दिली आहे. पण जीवनाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर चालायचं की नाही हे ठरवणं आपल्या हातात आहे. (मत्तय ७:१३, १४ वाचा.) नवीन जगात आपण कायमसाठी जगू तेव्हा आपलं जीवन कसं असेल? या प्रश्‍नाचं उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • मानवांना कायम जगण्यासाठी बनवलंय असं आपण का म्हणू शकतो?

  • मानवांनी कायम जगावं हा देवाचा उद्देश अजूनही बदललेला नाही असं आपण का म्हणू शकतो?

  • यहोवाची सेवा करण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं आहे?

गीत १४१ जीवन एक किमया

a यहोवाने आपल्याला असं वचन दिलंय, की आपण या पृथ्वीवर कायमस्वरूपी जिवंत राहू आणि आपल्याला मृत्यूची भीतीही नसेल. तुम्हालाही या पृथ्वीवर कायमचं जगायची इच्छा आहे का? या लेखात आपण अशा काही कारणांवर चर्चा करू या ज्यामुळे यहोवा आपलं अभिवचन नक्की पूर्ण करेल याची आपल्याला पक्की खातरी होईल.

b “बायबलमध्ये ‘सर्वकाळ’ या शब्दाचा वापर” ही चौकट पाहा.

c चित्राचं वर्णन: एक वयस्कर भाऊ त्याला नवीन जगात काय-काय करायचं आहे याची कल्पना करत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा