वाचकांचे प्रश्न
स्तोत्र ६१:८ मध्ये दावीदने असं लिहिलं की “मी सर्वकाळ तुझ्या नावाची स्तुती गाईन.” हे शब्द लिहिताना, आपण कधीच मरणार नाही असं दावीदला वाटत होतं का?
नाही. दावीदला तसं वाटत नव्हतं. पण त्याने जे लिहिलं ते खरं आणि अचूक होतं.
त्याने याबद्दल त्या वचनात आणि इतर वचनांत काय लिहिलं त्याकडे लक्ष द्या: “मी सर्वकाळ तुझ्या नावाची स्तुती गाईन, आणि दररोज माझे नवस फेडीन.” “हे यहोवा, माझ्या देवा, मी अगदी पूर्ण मनाने तुझी स्तुती करतो आणि मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.” “मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.”—स्तो. ६१:८; ८६:१२; १४५:१, २.
दावीदने जेव्हा हे शब्द लिहिले, तेव्हा आपण कधीच मरणार नाही असा तो विचार करत नव्हता. त्याला माहीत होतं, की मानवांनी केलेल्या पापामुळे त्यांचा मृत्यू होईल असं यहोवाने सांगितलं होतं. आणि आपणही पापी आहोत याची दावीदला जाणीव होती. (उत्प. ३:३, १७-१९; स्तो. ५१:४, ५) अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांसारख्या विश्वासू सेवकांचासुद्धा मृत्यू झाला होता हे दावीदला माहीत होतं. आणि आज ना उद्या आपलं जीवनही संपेल याची दावीदला जाणीव होती. (स्तो. ३७:२५; ३९:४) पण असं असलं तरी त्याला सर्वकाळ, म्हणजेच जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत यहोवाची स्तुती करायची इच्छा होती. आणि तसं करायचा दृढ निश्चय त्याने केला होता. स्तोत्र ६१:८ मधल्या त्याच्या शब्दांवरून हेच दिसून येतं.—२ शमु. ७:१२.
दावीदने लिहिलेल्या काही स्तोत्रांचा संबंध त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांशी होता. स्तोत्र १८, ५१ आणि ५२ यांच्या उपरिलेखनांवरून आपल्याला हे कळतं. स्वतः एक मेंढपाळ असलेल्या दावीदने २३ व्या स्तोत्रात यहोवाचं वर्णन करताना अशा एका मेंढपाळाचं उदाहरण दिलं जो त्याच्या मेंढरांचं मार्गदर्शन करतो, त्यांना सांभाळतो आणि त्यांचं संरक्षण करतो. आणि यामुळेच दावीदला ‘आयुष्यभर’ यहोवाची सेवा करायची इच्छा होती.—स्तो. २३:६.
पण दावीदने जे काही लिहिलं ते लिहिण्याची प्रेरणा त्याला यहोवाने दिली होती, हेसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच त्याच्या बऱ्याचशा स्तोत्रांमध्ये पुढे होणार असलेल्या गोष्टींबद्दलच्या भविष्यवाण्यासुद्धा होत्या. जसं की, स्तोत्र ११० मध्ये दावीदने अशा काळाबद्दल लिहिलं जेव्हा त्याचा प्रभू, म्हणजे मसीहा स्वर्गात देवाच्या “उजव्या हाताला” बसेल आणि त्याला मोठा अधिकार दिला जाईल. कशासाठी? देवाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि पृथ्वीवरच्या “राष्ट्रांवर न्यायदंड” आणण्यासाठी. हा मसीहा स्वर्गातून राज्य करणार होता आणि “सर्वकाळासाठी याजक” असणार होता. (स्तो. ११०:१-६) दावीद या मसीहाचा पूर्वज होता. स्तोत्र ११० मध्ये दिलेली भविष्यवाणी आपल्याबद्दलच आहे हे येशूनेही मान्य केलं आणि ती भविष्यात पूर्ण होईल असं त्याने सांगितलं.—मत्त. २२:४१-४५.
तर यावरून कळतं, की यहोवाच्या प्रेरणेने दावीदने फक्त त्याच्या काळाबद्दलच लिहिलं नाही, तर भविष्यातल्या अशा काळाबद्दलही लिहिलं जेव्हा त्याचं पुनरुत्थान होईल आणि तो सर्वकाळ यहोवाची स्तुती करू शकेल. आणि यावरून आपल्याला स्तोत्र ३७:१०, ११, २९ या वचनांचा अर्थसुद्धा समजून घ्यायला मदत होते. या वचनांतले शब्द प्राचीन इस्राएलमधल्या परिस्थितीलाही लागू होतात आणि भविष्यात यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करेल, तेव्हा सबंध जगात जी परिस्थिती असेल तिलाही ते लागू होतात.—याच अंकातल्या “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील” या लेखाचा परिच्छेद ८ पाहा.
स्तोत्र ६१:८ आणि त्यासारख्याच इतर वचनांवरून आपल्याला कळतं, की दावीदला प्राचीन इस्राएलमध्ये आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाची स्तुती करायची इच्छा होती. शिवाय, भविष्यात जेव्हा यहोवा त्याला पुन्हा जिवंत करेल तेव्हा तो खरोखर सदासर्वकाळ यहोवाची स्तुती करू शकेल हेसुद्धा या वचनांवरून दिसून येतं.