वाचक विचारतात . . .
बायबलमध्ये उल्लेख केलेले नंदनवन कोठे आहे?
▪ येशूवर निर्भीडपणे विश्वास व्यक्त करणाऱ्या एका मरणासन्न मनुष्याला येशूने असे अभिवचन दिले: “तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४३, NW) हा मनुष्य नेमके कोठे असणार होता? हे नंदनवन स्वर्गात असणार होते की पृथ्वीवर? किंवा, मानव आपला न्याय होण्याची वाट पाहतात अशा आणखी एखाद्या ठिकाणी ते असणार होते का?
आपले पूर्वज एके काळी नंदनवनात राहत होते. बायबल आपल्याला असे सांगते: “परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. . . . परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले.” (उत्प. २:८, १५) या शब्दांचे ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आले तेव्हा “बाग” या शब्दाचा अनुवाद पॅराडायसोस असा करण्यात आला होता, ज्याचा मराठीत “नंदनवन” असा अनुवाद करण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे एक दांपत्य, कुटुंब वाढल्यामुळे आपल्या घराचा विस्तार करते, त्याचप्रमाणे जसजसे मानवी कुटुंब वाढत जाणार होते तसतसे आपल्या पहिल्या पालकांनीदेखील एदेन बागेतील नंदनवनाच्या सीमा वाढवायच्या होत्या. देवाने त्यांना म्हटले: “पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.”—उत्प. १:२८.
त्या वेळी आपल्या निर्माणकर्त्याचा असा उद्देश होता, की मानवांनी पृथ्वीवरील नंदनवनात राहून आपली संतती वाढवावी. ते सर्व, पृथ्वीवरील बागेत सदासर्वकाळ जीवन जगणार असल्यामुळे, कबरस्तानांची गरज भासणार नव्हती. पृथ्वी ही मानवजातीचे कायमचे निवासस्थान बनणार होती. म्हणूनच, आपल्या पृथ्वी ग्रहावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये आपल्या मनाला इतकी भावतात! आपली निर्मितीच मुळात एका सुंदर पृथ्वीवर राहण्यासाठी करण्यात आली होती.
देवाचा हा उद्देश बदलला आहे का? नाही. कारण यहोवा आपल्याला असे आश्वासन देतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यश. ५५:११) मानवाची निर्मिती केल्याच्या ३,००० पेक्षा अधिक वर्षांनंतर बायबलने “पृथ्वीचा घडणारा व कर्ता” याविषयी असे म्हटले, की “त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही,” तर “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यश. ४५:१८) आजही देवाची हीच इच्छा आहे. पृथ्वी नक्कीच एक नंदनवन बनेल.
लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या नंदनवनाविषयीचे अनेक उतारे मुळात पृथ्वीवरील जीवनाचे वर्णन करतात. उदाहरणार्थ, यशयाची एक भविष्यवाणी असे म्हणते: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.” (यश. ६५:२१) घरे कोठे बांधली जातात व द्राक्षाचे मळे कोठे लावले जातात? फळे कोठे खाल्ली जातात? पृथ्वीवर. स्तोत्र ३७:२९ स्पष्टपणे असे म्हणते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”
येशूनेदेखील पृथ्वीवरील नंदनवनाचा उल्लेख केला. हे खरे आहे, की त्याने स्वर्गातील नंदनवनाचेदेखील अभिवचन दिले. पण, ते केवळ काही निवडक लोकांसाठीच होते. (लूक १२:३२) या निवडक लोकांचे, मृत्यूनंतर स्वर्गातील नंदनवनात पुनरुत्थान करण्यात येते आणि ते ख्रिस्तासोबत मिळून पृथ्वीवरील नंदनवनावर शासन करतात. (प्रकटी. ५:१०; १४:१-३) येशूसोबत स्वर्गातून राज्य करणारे हे शासक याची खातरी करतील, की पृथ्वीवरील नंदनवनाचे सुव्यवस्थितपणे नियमन केले जाईल व सर्व कारभार देवाच्या स्तरांनुसार चालविला जाईल.
पृथ्वीबद्दल देवाची हीच इच्छा आहे हे येशूला माहीत होते. कारण, एदेन बागेची निर्मिती करण्यात आली तेव्हा तो स्वर्गात आपल्या पित्यासोबत होता. पृथ्वीवरील भावी नंदनवनातील जीवन, आज विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठी खुले आहे. (योहा. ३:१६) अशांना येशू असे अभिवचन देतो: ‘तुम्ही माझ्याबरोबर नंदनवनात असाल.’—लूक २३:४३. (w१०-E १२/०१)
[७ पानांवरील चित्राचे श्रेय]
© FORGET Patrick/SAGAPHOTO.COM/Alamy