महिन्याचा मुख्य विषय: “निकडीने सर्वदा देवाच्या वचनाची घोषणा करत राहा.” —२ तीम. ४:२, सुबोधभाषांतर.
सुवार्ता सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचे सोने करा!
१. दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
१ राजा दावीद एक असा मनुष्य होता जो आपल्या परिस्थितीमुळे कधीच खचून गेला नाही. उदाहरणार्थ, यहोवासाठी मंदिर बांधण्याची त्याची मनस्वी इच्छा होती. पण देवाने त्याच्याऐवजी शलमोनाला मंदिर बांधण्यास सांगितले तेव्हा दाविदाने आपली ध्येये बदलली आणि मंदिर बांधण्याच्या कामात शलमोनाला लागेल ती मदत पुरवली. (१ राजे ८:१७-१९; १ इति. २९:३-९) दावीद जे करू शकत नव्हता त्यावर तो विचार करत बसला नाही, तर तो जे काही करू शकत होता त्यावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले. आपणही दाविदाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची संधी कशी शोधू शकतो?
२. आपण कशाचे परीक्षण करू शकतो?
२ जे करू शकता ते करा: साहाय्यक किंवा सामान्य पायनियरिंग करण्यासाठी अनेकांनी साधेसुधे जीवन जगण्याची निवड केली आहे. (१ तीम. ६:८) तुम्हीही तेच करू शकता का? तुमच्या परिस्थितीचे प्रार्थनापूर्वक परीक्षण केल्यास तुम्हाला जाणवेल, की “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” तुमच्यासाठी खुले आहे. तसे असल्यास, त्या संधीचे सोने करा!—१ करिंथ. १६:८, ९.
३. परिस्थितीमुळे आपण पायनियरिंग करू शकत नसलो तरी कोणत्या संधींचा आपण फायदा घेऊ शकतो?
३ पण, परिस्थितीमुळे तुम्हाला पायनियरिंग करणे शक्य नसल्यास काय? अशा वेळी, तुमच्यासमोर असलेल्या इतर संधींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. उदाहरणार्थ, कामाच्या निमित्ताने बाहेरच्या लोकांशी तुमचा संबंध येत असेल तर योग्य संधी साधून तुम्ही त्यांना सुवार्ता सांगू शकता का? किंवा तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टर्स, नर्सेस इत्यादी यांना सुवार्ता सांगण्याच्या संधींचा तुम्ही फायदा घेऊ शकता का? हे विसरू नका, की वयोमानामुळे किंवा गंभीर आरोग्य समस्येमुळे जे चालू-फिरू शकत नाहीत अशांसाठी १५-१५ मिनिटांचा अहवाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देताना, अनौपचारिक साक्षकार्यात तुम्ही किती वेळ खर्च केला, किती साहित्ये दिली; तसेच, स्मारकविधीच्या व अधिवेशनाच्या किती निमंत्रण पत्रिका दिल्या यांची आवर्जून नोंद करा. अशा छोट्या-छोट्या संधीतून मिळणारे पाच-पाच, दहा-दहा मिनिटे जोडल्यानंतर कित्ती तास होऊ शकतात हे पाहून तुम्ही स्वतःच अवाक व्हाल!
४. तुम्ही काय करण्याचा निश्चय केला आहे?
४ आपली परिस्थिती कोणतीही असो, सुवार्ता सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचे आपण सोने करू या! असे केल्यास, आपण राज्यासाठी होताहोईल तितके प्रयत्न करत आहोत याचे समाधान आपल्याला मिळेल.—मार्क १४:८; लूक २१:१-४.